Sunday, June 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 8 Part 8 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ८ भाग ८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 8 Part 8 
Ovya 191 to 219 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ८ भाग ८ 
ओव्या १९१ ते २१९
ऐसें जाणूनि योगीश्र्वर । जयातें म्हणती परमपर ।
जें अनन्यगतीचें घर । गिंवसीत ये ॥ १९१ ॥
१९१) वर सांगितल्याप्रमाणें या पुरुषांचे स्वरुप आहे, असें जाणून श्रेष्ठ योगी ज्याला ( पुरुषाला ) सर्वांत पलीकडची गति असें म्हणतात; आणि जो परमात्मा एकनिष्ठ भक्तांचें घर शोधीत येतो.
जें तनूवाचाचित्तें । नाइकती दुजिये गोष्टीतें ।
तया एकनिष्ठेचें पिकतें । सुक्षेत्र जें ॥ १९२ ॥
१९२) जे कायावाचामनानें परमात्म्यावांचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्या एकनिष्ठांच्या एकनीष्ठतेचें पीक देणारें जें चांगले शेत आहे. 
हें त्रैलोक्यचि पुरुषोत्तमु । ऐसा साचु जयांचा मनोधर्मु ।
तयां आस्तिकांचा आश्रमु । पांडवा गा ॥ १९३ ॥
१९३) हें त्रैलोक्यच पुरुषोत्तम आहे, अशी ज्यांची पक्की समजूत आहे, त्या आस्तिकांचें; अर्जुना, जें ( परमात्मस्वरुप ) राहण्याचें ठिकाण आहे;   
जें निगर्वाचें गौरव । जें निर्गुणाची जाणीव ।
जें सुखाची राणिव । निराशांसी ॥ १९४ ॥
१९४) जें गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, जें गुणातीत पुरुषांचे ज्ञान आहे व निरिच्छ पुरुषांस जें सुखाचें राज्य आहे; 
जें संतोषियां वाढिलें ताट । जें अर्चितां अनाथांचें मायपोट ।
भक्तीसी उजू वाट । जया गांवा ॥ १९५ ॥
१९५) जें संतोषी पुरुषांस वाधलेले ताट आहे; जें संसाराची चिंता न करणारें असून ज्यांना माझ्यावाचून दुसरा कोणी मालक नाहीं, अशा भक्तांचें मायपोट आहे आणि ज्या गांवाला, पोहोचण्याला भक्ति हीच रसाळ वाट आहे;   
हें एकैक सांगोनि वाया । काय फार करुं धनंजया ।
पैं गेलिया जया ठाया । तो ठावोचि होईजे ॥ १९६ ॥  
१९६) अर्जुना, हें एकेक सांगून व्यर्थ विस्तार कशाला करुं ? परंतु ज्या ठिकाणीं गेलें असतां तें ठिकाणच आपण होतों.      
हिंवाचिया झळुका । जैसें हिंवचि पडे उष्णोदका ।
कां समोर जालिया अर्का । तमचि प्रकाशु होय ॥ १९७ ॥
१९७) थंडीच्या झुळुकांनी जसें ऊन पाणीच थंड होतें अथवा सूर्यासमोर अंधार आला असतां तो अंधारच प्रकाश बनतो; 
तैसा संसारु जया गांवा । गेला सांता पांडवा ।
होऊनि ठाके आघवा । मोक्षाचाचि ॥ १९८ ॥
१९८) अर्जुना, त्यप्रमाणें ज्या परमात्मस्वरुपीं मुक्कामाला हा ( दुःखरुप देहबुद्ध्यादिसंघातरुपी ) संसार पोंचला असतां, तो संसार सर्व बाजूंनीं मोक्षच ( दुःखरुप देहबुद्ध्यादिसंघातरुपी ) संसार पोंचला असतां, तो संसार सर्व बाजूंनी मोक्षच ( दुःखशून्य व सुखरुप असा ) होऊन राहातो.
तरि अग्नीमाजीं आलें । जैसें इंधनचि अग्नि जाहलें ।
पाठीं न निवडेचि कांहीं केलें । काष्टपण ॥ १९९ ॥
१९९) तरी ज्याप्रमाणें लांकूड अग्नीत गेलें म्हणजे अग्निरुपच होते व तें अग्निरुप झाल्यावर पुनः लांकूडपणानें निराळें काढूं म्हटले तर तें जसें निराळे निघतच नाही;    
नातरी साखरेचा माघौता । बुद्धिंमतपणेंही करितां ।
परि ऊंस नव्हे पंडुसुता । जियापरी ॥ २०० ॥
२००) अथवा उसाची साखर झाल्यावर त्या साखरेचा मूळचा ऊस करण्याचें जरी बुद्धिमान पुरुषानेंहि मनांत आणलें तरी पुनः ऊस होणें ज्याप्रमाणे शक्य नाहीं;
लोहाचें कनक जहालें । हें एकें परिसें केलें ।
आतां आणिक कैचें तें गेलें । लोहत्व आणी ॥ २०१ ॥
२०१) परिसानें लोखंडाचें सोनें केलें; आतां आणिक दुसरा पदार्थ कोठें आहे कीं, जो नाहींसा झालेला लोखंडपणा पुनः आणील ?   
म्हणोनि तूप होऊनि माघौतें । जेवीं दूधपणा न येचि निरुतें ।
तेवि पावोनियां जयातें । पुनरावृत्ति नाहीं ॥ २०२ ॥
२०२) म्हणून ज्याप्रमाणें दुधाचे तूप झाल्यावर तुपाला पुनः दुधपणा खात्रीनें येत नाहीं, त्याप्रमाणें ज्या परमात्मस्वरुपास पावल्यावर पुर्जन्म नाहीं; 
तें माझें परम । साचोकारें निजधाम ।
हें आंतुवट तुज वर्म । दाविजत असे ॥ २०३ ॥
२०३) असें जें स्वरुप, ते माझें स्वतःचे खरोखर श्रेष्ठ ठिकाण आहे; ही अंतरंगातील गुह्य गोष्ट तुला दाखवीत आहें.  
मूळ श्लोक
यत्र काले त्वनावृत्तिमावृत्तिं चैव योगिनः ।
प्रयाता यान्ति तं कालं वक्ष्यामि भरतर्षभ ॥ २३ ॥
२३) हे भरतश्रेष्ठा, तथापि कोणत्या कालीं देहावसान झाले असतांना योगी आवावृत्तिप्रत जातात ( जन्ममेणापासून मुक्त होतात ) व ( कोणत्या कालीं देहावसान झालें असतांना ) आवृत्तिप्रत ( पुनर्जन्माप्रत, ) जातात, तो काल सांगतों,  
तेवींचि आणिकेंही एकें प्रकारें । हे जाणतां आहे सोपारें ।
तरि देह सांडितेनि अवसरें । जेथ मिळती योगी ॥ २०४ ॥
२०४) त्याप्रमाणें आणखीहि एका प्रकारानें हें ( निजधाम ) जाणणें सोपें आहे. तरी योगी लोक योग्य कालीं देहत्याग करुन जेथें प्राप्त होतात ( तें माझें निजधाम होय );
अथवा अवचटें ऐसें घडे । जे अनवसरें देह सांडे ।
तरि माघौतें येणें घडे । देहासीचि ॥ २०५ ॥
२०५) अथवा, अकस्मात असें घडतें कीं, योग्याचा देह अयोग्य कालीं पडला, तर त्याला पुनःजन्माला यावें लागतें, 
म्हणोनि काळशुद्धी जरी देह ठेविती । तरी ठेवितखेवीं ब्रह्मचि होती ।
एर्‍हवीं अकाळीं तरी येती । संसारा पुढती ॥ २०६ ॥
२०६) म्हणून योग्यांनीं योग्य कालीं देह ठेवला, तर देह ठेवतांक्षणींच ब्रह्म होतात; एर्‍हवीं त्यांनीं जर अयोग्य कालीं देह ठेवला तर ते पुनः संसाराला येतात;  
तैसें सायुज्य आणि पुनरावृत्ती । ये दोन्हीअवसराआधीन आहाती ।
तो अवसरु तुजप्रती । प्रसंगें सांगों ॥ २०७ ॥
२०७) त्याप्रमाणें मद्रुप होणें आणि जन्ममरणांच्या फेर्‍यांत सांपडणें हीं दोन्हीं ठराविक मरणवेळेच्या आधीन आहेत.आतां प्रसंगानुसार त्याच कालासंबंधानें विचार तुला सांगतों.  
तरि ऐकें गा सुभटा । पातालिया मरणाचा माजिवटा ।
पांचै आपुलालिया वाटा । निघती अंती ॥ २०८ ॥
२०८) तर अर्जुना, ऐक. मरणाचा जोर प्राप्त झाला असतां शेवटीं पंचमहाभूतें आपापल्या वाटेनें निघतात.  
ऐसां वरिपडिलां प्रयाणकाळीं । बुद्धीतें भ्रमु न गिळी ।
स्मृति नव्हे आंधळी । न मरे मन ॥ २०९ ॥
२०९) असा मरणकाल प्राप्त झाला असतांना बुद्धिला भ्रम गिळीत नाहीं, स्मरणशक्ति आंधळी होत नाही; आणखी मन मरत नाहीं, 
हा चेतनावर्गु आघवा । मरणीं असे टवटवा ।
परि अनुभविलिया ब्रह्मभावा । गंवसणी होऊनि ॥ २१० ॥
२१०) याप्रमाणें हा सर्व इंद्रिसमुदाय मरणसमयीं टवटवीत असतो; पण तो अनुभवलेल्या ब्रह्मस्थितीला आकलन केल्यामुळें प्रसन्न असतो.
ऐसा सावध हा समवावो । आणि निर्वाणवेर्‍हीं निर्वाहो ।
हें तरीच घडे जरी सावावो । अग्नीचा आथी ॥ २११ ॥
२११) याप्रमाणें हा इंद्रियसमुदाय सावध असणें आणि तो त्याचा सावधपणा शेवटपर्यंत टिकणें, हें जर, अग्नीचें साह्य असेल तर घडेल.
पाहा पां वारेन कां उदकें । जैं दिवियाचें दिवेपण झांके ।
तैं असतीच काय देखे । दिठी आपुली ॥ २१२ ॥
२१२) असें पाहा कीं, वार्‍यानें अथवा पाण्यानें जेव्हा दिव्याचा प्रकाश नाहींसा होतो, तेव्हां ( शाबूत ) असलेली आपलीच दृष्टि पाहूं शकते काय ?   
तैसें देहांतींचेनि विषमवातें । देह आंत बाहेरि श्र्लेष्मा आते ।
तैं विझोनि जाय उजितें । अग्नीचें जेव्हां ॥ २१३ ॥
२१३) त्याप्रमाणें देह पडण्याच्या वेळी होणार्‍या त्रिदोषानें देह आंतबाहेर कफानें व्यापला जातो, त्या वेळीं जेव्हां अग्नीचें तेज विझून जातें,  
ते वेळीं प्राणासीचि प्राणु नाहीं । तेथ बुद्धि असोनि करील काई ।
म्हणोनि अग्निविण देहीं । चेतना न थरे ॥ २१४ ॥    
२१४) त्या वेळीं प्राणासच क्रियाशक्ति नसते, मग तेथें बुद्धि असून काय करील ? म्हणून अग्निशिवाय शरीरांत चेतना ( ज्ञानकला ) टिकत नाही.         
अगा देहींचा अग्नि जरी गेला । तरी देह नव्हे चिखलु वोला ।
वायां आयुष्यवेळु आपुला । आंधारां गिंवसी ॥ २१५ ॥
२१५) अरे अर्जुना, जर देहांतील अग्नी गेला, तर तो देह नहीं, ओला चिखल आहे. असें झालें म्हणजे आयुष्य आपला वेळ व्यर्थ अंधारांत शोधीत राहातें. 
आणि मागील स्मरण आघवें । तें तेणें अवसरें सांभाळावें ।
मग देह त्यजूनि मिळावें । स्वरुपीं कीं ॥ २१६ ॥
२१६) आणि वास्तविक पाहिलें असतां, मागील जें सर्व स्मरण आहे, तें त्या वेळीं तसेंच ठेवायचें असते आणि मग देह टाकून परमात्मस्वरुपी मिळावयाचें असतें.   
तंव तयादेहश्र्लेष्माचां चिखलीं । चेतनाचि बुडोनि गेली ।
तेथ मागिली पुढिली हे ठेली । आठवण सहजें ॥ २१७ ॥
२१७) परंतु देहाला ज्या कफानें व्यापलें, त्या कफाच्या चिखलांत चेतना बुडून गेली, तेथें मागील ( केलेल्या अभ्यासाची ) पुढील ( स्वरुपस्थितीची ) आठवण स्वाभाविक रीतीनें थांबली.
म्हणोनि आदीचि अभ्यासु जो केला । तो मरण न येतांचि निमोनि गेला ।
जैसें ठेवणें न दिसतां मालवलां । दीपु हातींचा ॥ २१८ ॥
२१८) म्हणून ज्याप्रमाणें ठेवलेली वस्तु पाहण्याकरितां हातांत घेतलेला दिवा, ती वस्तु दिसण्यापूर्वीच  मालवून जावा, त्याप्रमाणें मरणाच्या अगोदरच जो जन्मभर अभ्यास केला, तो मरण येण्याच्या पूर्वींच नाहींसा झाला.  
आता असो हें सकळ । जाण पां ज्ञानासि अग्नि मूळ ।
तया अग्नीचें प्रयाणीं बळ । संपूर्ण आथी ॥ २१९ ॥
२१९) आतां हें सगळें असूं दे. असे समज कीं, ज्ञानाला मूळ कारण अग्नि आहे. त्या अग्नीचें मरणकाळीं संपूर्ण बळ असावें,



Custom Search

No comments:

Post a Comment