Tuesday, June 29, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 2 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग २

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 2 
Ovya 34 to 56 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग २ 
ओव्या ३४ ते ५६
मूळ श्लोक
श्रीभगवानुवाच
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे ।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्जज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १ ॥
१) श्रीकृष्ण म्हणाले, आतां अत्यंत गुह्य असें हें ( ब्रह्माचें ) ज्ञान, प्रपंचज्ञानासह, असूयारहित अशा तुला सांगतों. हें जाणल्यानें तूं अशुभ संसारापासून मुक्त होशील.  
नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।
जें हें अंतःकरणींचें गुज । जीवाचिये ॥ ३४ ॥
३४) अथवा अर्जुना, हेंच वर्म, जें माझ्या अंतःकरणांतील जीवाची गोष्ट आहे, ती तुला पुन्हां सांगतों.  
येणें मानें जीवाचें हियें फोडावें । मग गुज कां पां मज सांगावें ।
ऐसें कांहीं स्वभावें । कल्पिशी जरी ॥ ३५ ॥
३५) एवढी जीवाच्या आंतली गोष्ट बाहेर काढून मग ती गुप्त गोष्ट मला कां सांगावी, अशी कांहीं कल्पना तुझ्या मनांत सहजच जर आली असेल,  
तरी परियेसीं प्राज्ञा । तूं आस्थेचीच संज्ञा ।
बोलिलिये गोष्टींची अवज्ञा । नेणसी करुं ॥ ३६ ॥
३६) तर बुद्धिमान् अर्जुना ऐक. तूं ज्ञानप्राप्तीच्या तीव्र इच्छेचीच खूण ( मूर्ति ) आहेस, आणि त्याप्रमाणें सांगितलेल्या गोष्टीचा अनादर करणें तुला माहीत नाहीं. 
म्हणोनि गूढपण आपलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो ।
परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ॥ ३७ ॥
३७) म्हणून आमचें गुप्तपण मोडलें तर मोडो !  शिवाय न बोलण्याची ( अशी ) जी गोष्ट तीहि बोलली जावो ! पण आमच्या अंतःकरणांतील गुप्त गोष्ट तुझ्या मनांत उतरो. 
अगा थानीं कीर दूध गूढ । परि थानासीचि नव्हे कीं गोड ।
म्हणोनि सरो कां सेवितयाची चाड । जरी अनन्य मिळे ॥ ३८ ॥
३८) बा अर्जुना, स्तनांत खरोखर दूध गुप्त असतें, पण त्याची गोडी स्तनास नसते; याकरितां एकनिष्ठ सेवन करणर्‍याची इच्छा स्तनपान करुन तृप्त होईना का ?  
मुडाहूनि बीज काढिलें । मग निर्वाळलिये भूमी पेरिलें ।
तरि तें सांडीविखुरीं गेलें । म्हणों ये कायी ॥ ३९ ॥
३९) कणगींतून बीं काढलें, आणि मग तें निर्मळ केलेल्या जमिनींत पेरलें, तर तें सांडण्यालवंडण्यांत गेले असें म्हणतां येईल काय ?  
यालागीं सुमनु आणि शुद्धमती । जो अनिंदकु अनन्यगती ।
पैं गा गौप्यही परी तयाप्रती । चावळिजे सुखें ॥ ४० ॥
४०) याकरितां चांगल्या मनाचा व शुद्ध बुद्धीचा आणि निंदा न करणारा व एकनिष्ठ असा श्रोता जर मिळाला, तर त्यास आपली गोष्ट गुह्य असली तरी खुशाल सांगावी,
तरि प्रस्तुत आतां गुणीं इहीं । तूं वांचूनि आणिक नाहीं ।
म्हणोनि गुज तरी तुझां ठायीं । लपवूं नये ॥ ४१ ॥
४१) तर आता सध्या ह्या गुणांनी युक्त तुझ्यावांचून दुसरा कोणी दिसत नाहीं, म्हणून जरी गुह्य गोष्ट असली तरी तुझ्या ठिकाणीं ती लपवून ठेवतां येत नाही.   
आतां किती नावानावा गुज । म्हणतां कानडें वाटेल तुज ।
तरि ज्ञान सांगेन सहज । विज्ञानेंसी ॥ ४२ ॥
४२) आतां वारंवार ' गुह्य गुह्य ' असें म्हटले असतां तुला चमत्कारिक वाटेल. तर आता तुला सहजच प्रपंचज्ञानसहित आत्मज्ञान सांगेन. 
परि तेंचि ऐसेनि निवाडें । जैसें भेसळलें खरें कुडें ।
मग काढिजे फाडोवाडें । पारखूनियां ॥ ४३ ॥
४३) परंतु, जसें खरेंखोटें एकत्र मिसळलेलें असतां, तें परीक्षा करुन निरनिराळें काढावें, त्याप्रमाणें निवाडा करुन ज्ञानविज्ञान ( तुला ) सांगेन.  
कां चांचूचेनि सांडसें । खांडिजे पय पाणी राजहंसें ।
तुज ज्ञान विज्ञान तैसें । वांटूनि देऊं ॥ ४४ ॥
४४) अथवा, ज्याप्रमाणें राजहंसानें आपल्या चोंचीच्या चिमट्यानें एकत्र मिसळलेलें दूध व पाणी वेगळें करावें, त्याप्रमाणें तुला ज्ञान व विज्ञान हें स्वच्छ वेगवेगळें सांगूं
मग वारयाचियां धारसां । पडिला कोंडा कां नुरेचि जैसा ।
आणि अन्नकणाचा आपैसा । राशि जोडे ॥ ४५ ॥
४५) मळणी करुन एकत्र निसळलेलें कण व भूस वार्‍याच्या धारेवर उफणलें असतां, मग जसा कोंडा उडून जाऊन, धान्याची आपोआप रास जमते;
तैसेंजें जाणितलेयासाठीं । संसार संसाराचिये गांठी ।
लाऊनि बैसवी पाटीं । मोक्षश्रियेचां ॥ ४६ ॥
४६) त्याप्रमाणें जें ज्ञान जाणल्यामुळें, तें ज्ञान संसार संसाराच्या गांठी लावून ( अनात्मतत्वाच्या ठिकाणी ठेवून ) मोक्षरुपी लक्ष्मीच्या पटावर ( जाणणार्‍यास ) बसविते.
मूळ श्लोक
राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । 
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥
२) हें ( ज्ञान ) सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ट, प्रत्यक्ष अनुभवास येणारें, धर्माला अनुसरुन असलेलें, अनायासें आचरण करतां ( मिळवितां ) येणारें आणि क्षयरहित आहे.    
जें जाणयेयां आघवेयांचां गांवीं । गुरुत्वाची आचार्यपदवी ।
जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥
४७) जें स्वरुपज्ञान या सर्व विद्यांच्या गांवांमध्यें श्रेष्ठ त्याच्या आचार्यपदावर ( अधिष्ठित ) आहे आणि जें ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जें पवित्र गोष्टींचा राजा आहे; 
आणि धर्माचें निजधाम । तेविंचि उत्तमाचें उत्तम ।
पैं जया येतां नाहीं काम । जन्मांतराचें ॥ ४८ ॥
४८) आणि जें धर्माचें स्वतःचें राहाण्याचें घर आहे आणि त्याचप्रमाणें जें सर्व उत्तम पदार्थांत उत्तम आहे व ज्याच्या ठिकाणीं प्राप्त झालें असतां पुनः दुसर्‍या जन्माचें काम ( उरत ) नाहीं,  
मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।
प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ॥ ४९ ॥
४९) गुरुमुखांतून तें ज्ञान अमळसें उगवतांना दिसतें; पण तें हृदयांत मूळचें सिद्धच असतें, तसें तें आपोआप प्रत्यक्ष आनुभवाला येऊं लागतें.   
तेविंचि पैं गा सुखाचां पाउटीं । चढतां येइजे जयाचिया भेटी ।
मग भेटल्या कीर मिठी । भोगणेयाहि पडे ॥ ५० ॥
५०) त्याचप्रमाणें अरे अर्जुना, ज्याच्या भेटीला सुखाच्या चढत्या पायर्‍यांनीं यावयाचें असतें, आणि जें भेटलें असतां निश्चयेकरुन भोगणेंहि संपतें. 
परि भोगाचिया ऐलीकडिलिये मेरे । चित्त उभें ठेलेंचि सुख भरे ।
ऐसें सुलभ आणि सोपारें । वरि परब्रह्म ॥ ५१ ॥
५१) परंतु भोगाच्या अलीकडच्या कांठवर चित्त उभें राहिल्याबरोबर सुखानें पूर्ण भरुन जातें, असें तें ( स्वरुपज्ञान ) कष्टांवाचून मिळणारें व सोपें असून, शिवाय तें श्रेष्ठ ब्रह्म आहे.  
पैं गा आणिकही एक याचें । जें हाता आलें तरी न वचे ।
आणि अनुभवितां कांहीं न वेचे । वरि विटेहि ना ॥ ५२ ॥
५२) अर्जुना, याचें आणखीहि एक माहात्म्य आहे. तें असें की, जें प्राप्त झालें असतां कधीं ( हातांतून ) जात नाहीं आणि अनुभविलें असतां कांहीं सुद्धा कमी होत नाहीं व शिवाय त्यांत विकारहि उत्पन्न होत नाहींत. 
येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका ।
ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ॥ ५३ ॥
५३) तर्ककुशल अर्जुना, या ठिकाणीं जर तूं अशी शंका घेशील कीं, एवढी ज्ञानासारखी ही वस्तु ( तिचा ) अनुभव घेतल्याशिवाय लोकांत कशी राहिली ? 
एकोत्तरेयाचिया वाढी । जे जळतिये आगीं घालिती उडी ।
ते अनायासें स्वगोडी । सांडिती केविं ॥ ५४ ॥
५४) शंभराला एक व्याज मिळून एकशेएक रुपये व्हावेत, म्हणून जळत्या अग्नीसारख्या धोक्यांत उडी घालतात असे जे लोक, ते कष्टांवााचून मिळणारी स्वरुपसुखाची गोडी कशी टाकतील ?  
तरि पवित्र आणि रम्य । तेविंचि सुखोपायेंचि गम्य ।
आणि स्वसुख वरि धर्म्य । वरि आपणपां जोडे ॥ ५५ ॥
५५) तरी पवित्र आणि रम्य त्याचप्रमाणें सुखोपायानेंच प्राप्त होणारें स्वसुख, परंतु धर्माला धरुन मिळणारें, शिवाय तें आपल्याच ठिकाणीं आपल्याला मिळतें.  
ऐसा अवधाचि सुरवाडु आहे । तरी जनाहातीं केविं उरों लाहे ।
हा शंकेचा ठाव कीर होये । परि न धरावी तुवां ॥ ५६ ॥
५६) याप्रमाणें हें सर्व प्रकारें सुखकारक आहे, तर तें लोकांच्या सेवनांतून राहिलें कसें ? ही खरोखर शंकेची जागा आहे, परंतु तूं अशी शंका धरुं नकोस.



Custom Search

No comments:

Post a Comment