Sunday, June 27, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 33 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३३

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 33 
Doha 191 to 196 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३३ 
दोहा १९१ ते १९६

दोहा—भाइहु लावहु धोख जनि आजु काज बड़ मोहि ।

सुनि सरोष बोले सुभट बीर अधीर न होहि ॥ १९१ ॥

तो म्हणाला, ‘ बंधूंनो, मरणाला घाबरु नका.आज माझी फार मोठी कामगिरी आहे. ‘ हे ऐकून सर्व योद्धे मोठ्या जोषाने एक स्वरात म्हणाले, ‘ हे वीरश्रेष्ठ भिऊ नका. ॥ १९१ ॥

राम प्रताप नाथ बल तोरे । करहिं कटकु बिनु भट बिनु घोरे ॥

जीवत पाउ न पाछें धरहीं । रुंड मुंडमय मेदिनि करहीं ॥ ३ ॥

हे नाथ ! श्रीरामचंद्रांच्या प्रतापामुळे आणि तुमच्या बळावर आम्ही भरताच्या सेनेमधील एक एक वीर व घोडे मारुन टाकू. जिवात जीव असेपर्यंत मागे फिरणार नाही. पृथ्वीला मुंडकी आणि धडांनी भरुन टाकू.’ ॥ १ ॥

दीख निषादनाथ भल टोलू । कहेउ बजाउ जुझाऊ ढोलू ॥

एतना कहत छींक भइ बॉंए । कहेउ सगुनिअन्ह खेत सुहाए ॥

निषादराजाने आपल्या वीरांचे उत्कृष्ट दल पाहून म्हटले, ‘ लढाईचा

ढोल वाजवा.’ एवढे म्हणताच डावीकडे कुणी तरी शिंकले. शकुन जाणणारे म्हणाले की, ‘ जय होणार ‘ ॥ २ ॥

बूढ़ु एकु कह सगुन बिचारी । भरतहि मिलिअ न होइहि रारी ॥

रामहि भरतु मनावन जाहीं । सगुन कहइ अस बिग्रहु नाहीं ॥

एका वयोवृद्धाने शकुनाचा विचार करुन सांगितले की, ‘ भरताला भेटून घ्या. त्याच्याशी युद्ध होणार नाही. भरत श्रीरामचंद्रांचे मन वळविण्यासाठी जात आहे, विरोध नाही, असे शकुन सांगतो. ‘ ॥ ३ ॥

सुनि गुह कहइ नीक कह बूढ़ा । सहसा करि पछिताहिं बिमूढ़ा ॥

भरत सुभाउ सीलु बिनु बूझें । बड़ि हित हानि जानि बिनु जूझें ॥

हे ऐकल्यावर निषादराज गुह म्हणाला, ‘ म्हातारा योग्य सांगत आहे. घाईने कोणतेही काम केल्यावर मूर्ख लोकांना पश्चात्ताप करावा लागतो. भरताचा स्वभाव जाणून घेतल्याविना युद्ध करण्यामध्ये हिताची मोठी हानी होईल. ॥ ४ ॥

दोहा—गहहु घाट भट समिटि सब लेउँ मरम मिलि जाइ ।

बूझि मित्र अरि मध्य गति तस तब करिहउँ आइ ॥ १९२ ॥

म्हणून हे वीरांनो ! तुम्ही सर्वजण जमून सर्व घाट रोखून धरा. मी जाऊन भरताला भेटून त्याचा मानस जाणून घेतो. त्याच्या मनातील भाव मित्राचा आहे, शत्रूचा, की तटस्थपणाचा हे जाणून घेतल्यावर तशी व्यवस्था करुया. ॥ १९२ ॥

लखब सनेहु सुभायँ सुहाएँ । बैरु प्रीति नहिं दुरइँ दुराएँ ॥

अस कहि भेंट सँजोवन लागे । कंद मूल फल खग मृग मागे ॥

त्याच्या चांगल्या स्वभावावरुन त्याचे प्रेम मी ओळखेन. प्रेम आणि वैर हे लपविल्याने लपत नाहीत. ‘ असे म्हणून त्याने भेटीसाठी सामान गोळा केले, कंदमुळे, फळे, पक्षी व हरणे मागविली. ॥ १ ॥

मीन पीन पाठीन पुराने । भरि भरि भार कहारन्ह आने ॥

मिलन साजु सजि मिलन सिधाए । मंगल मूल सगुन सुभ पाए ॥

कोळी लोकांनी जून व पुष्ट असलेल्या पहिना नावाच्या माशांचे भारे भरुन आणले. भेटीचे सामान सज्ज करुन गुह निघाला, तेव्हा मंगलदायक शुभशकुन झाले. ॥ २ ॥

देखि दूरि तें कहि निज नामू । कीन्ह मुनीसहि दंड प्रनामू ॥

जानि रामप्रिय दीन्हि असीसा । भरतहि कहेउ बुझाइ मुनीसा ॥

निषादराजाने मुनिराज वासिष्ठांना पाहून आपले नाव सांगून लांबूनच दंडवत प्रणाम केला. मुनीश्र्वर वसिष्ठांनी त्याला रामाचा प्रिय समजून आशीर्वाद दिला आणि भरताला समजावून सांगितले की, ‘ हा श्रीरामांचा मित्र आहे. ‘ ॥ ३ ॥

राम सखा सुनि संदनु त्यागा । चले उतरि उमगत अनुरागा ॥

गाउँ जाति गुहँ नाउँ सुनाई । कीन्ह जोहारु माथ महि लाई ॥

‘ हा श्रीरामांचा मित्र आहे, ‘ एवढे ऐकताच भरत रथातून उतरला. तो रथातून उतरुन प्रेमाच्या उत्साहाने त्याच्याकडे जाऊ लागला. निषादराज गुहाने आपले गाव, जात व नाव सांगून भूमीवर माथा टेकून जोहार केला. ॥ ४ ॥

दोहा—करत दंडवत देखि तेहि भरत लीन्ह उर लाइ ।

मनहुँ लखन सन भेंट भइ प्रेमु न हृदयँ समाइ ॥ १९३ ॥

तो दंडवत करीत आहे, असे पाहून भरताने त्याला उठवून मिठी मारली. त्याच्या मनात प्रेम सामावत नव्हते. जणू काही प्रत्यक्ष लक्ष्मणाची भेट झाली, असे त्याला वाटले. ॥ १९३ ॥

भेंटत भरतु ताहि अति प्रीती । लोग सिहाहिं प्रेम कै रीती ॥

धन्य धन्य धुनि मंगल मूला । सुर सराहि तेहि बरिसहिं फूला ॥

भरताने मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. प्रेमाची ही रीत पाहून सर्व लोक प्रशंसा करु लागले. मांगल्याचे मूळ असलेले ‘ धन्य धन्य ‘ असे म्हणत देव त्याची स्तुती करीत फुलांचा वर्षाव करु लागले. ॥ १ ॥

लोक बेद सब भॉंतिहिं नीचा । जासु छॉंह छुइ लेइअ सींचा ॥

तेहि भरि अंक राम लघु भ्राता । मिलत पुलक परिपूरित गाता ॥

ते म्हणत होते की, ‘ ज्याला लौकिक दृष्ट्या व वेद-मताप्रमाणे नीच मानले जाते, ज्याच्या सावलीला स्पर्श झालास स्नान करावे लागते, त्याच निषादाला मिठी मारुन श्रीरामचंद्रांचा भाऊ भरत हा आनंदाने व प्रेमाने रोमांचित होऊन त्याला भेटत आहे. ॥ २ ॥

राम राम कहि जे जमुहाहीं । तिन्हहि न पाप पुंज समुहाहीं ॥ 

यह तौ राम लाइ उर लीन्हा । कुल समेत जगु पावन कीन्हा ॥      

जे लोक जांभई देताना राम-राम म्हणतात, म्हणजेच आळसामध्ये का होईना, ज्यांच्या मुखातून राम-नाम येते, त्यांच्यासमोर पापांचे समूह फिरकत नाहीत. या गुहाला तर प्रत्यक्ष श्रीरामांनी आलिंगन दिले आणि त्याला सहकुटुंब जगाला पवित्र करणारा करुन टाकले. ॥ ३ ॥

करमनास जलु सुरसरि परई । तेहि को कहहु सीस नहिं धरई ॥

उलटा नामु जपत जगु जाना । बालमीकि भए ब्रह्म समाना ॥

कर्मनाशा नदीचे पाणी गंगेला मिळते, तेव्हा ते शिरावर कोण धारण करीत नाही, सांगा बरे ! मरा, मरा असे उलटे नाम जपल्याने वाल्मीकी ब्रह्मस्वरुप झाले, हे जगाला माहीत आहे. ॥ ४ ॥

दोहा—स्वपच सबर खस जमन जड़ पावँर कोल किरात ।

रामु कहत पावन परम होत भुवन बिख्यात ॥ १९४ ॥

चांडाळ, शबर, खस, यवन, कोल, किरात इत्यादी मूर्ख व क्षुद्रसुद्धा रामनाम घेतल्यामुळे अत्यंत पवित्र आणि त्रिभुवनात विख्यात होतात, ॥ १९४ ॥

नहि अचिरिजु जुग चलि आई । केहि न दीन्हि रघुबीर बड़ाई ॥

राम नाम महिमा सुर कहहीं । सुनि सुनि अवध लोग सुखु लहहीं ॥

यात काहीही आश्र्चर्य नाही. युगा-युगांतरापासून हीच रीत चालत आलेली आहे. श्रीरघुनाथांनी कुणाला मोठेपण दिले नाही ?’ देव अशाप्रकारे रामनामाचा महिमा सांगत होते व ते ऐकन अयोध्येचे लोक सुखावत होते. ॥ १ ॥

 रामसखहि मिलि भरत सप्रेमा । पूँछी कुसल सुमंगल खेमा ॥

देखि भरत कर सीलु सनेहू । भा निषाद तेहि समय बिदेहू ॥

रामांचा मित्र असलेल्या निषादराजाला प्रेमाने भेटल्यावर भरताने त्याचे क्षेमकुशल विचारले. भरताचे वर्तन व प्रेम पाहून निषाद त्याप्रसंगी देहभान विसरुन विदेह झाला. ॥ २ ॥

सकुच सनेहु मोदु मन बाढ़ा । भरतहि चितवत एकटक ठाढ़ा ॥

धरि धीरजु पद बंदि बहोरी । बिनय सप्रेम करत कर जोरी ॥

त्याच्या मनात संकोच, प्रेम च आनंद इतका वाढला की, तो मुग्ध होऊन भरताकडे एकटक बघत राहिला. नंतर धीर धरुन त्याने पुन्हा भरताच्या चरणांना वंदन केले व प्रेमाने हात जोडून तो विनंती करु लागला. ॥ ३ ॥

कुसल मूल पद पंकज पेखी । मैं तिहुँ काल कुसल निज लेखी ॥

अब प्रभु परम अनुग्रह तोरें । सहित कोटि कुल मंगल मोरें ॥

‘ हे प्रभो ! सुखरुपतेचे मूळ असलेल्या तुमच्या चरणकमलांच्या दर्शनाने मी तिन्ही काळात सुखरुप झालो आहे, हे मी ओळखले. आता तुमच्या परम अनुग्रहामुळे कोटी-कोटी पिढ्यांसह माझे कल्याण झाले. ॥ ४ ॥

दोहा—समुझि मोरि करतूति कुल प्रभु महिमा जियँ जोइ ॥

जो न भजइ रघुबीर पद जग बिधि बंचित सोइ ॥ १९५ ॥

माझी करणी व कूळ जाणून, मी नीच जातीचा असूनही अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक असलेल्या भगवान रामचंद्रांनी माझ्यासारख्या शूद्राला आपल्या अहैतुकी कृपेने आपले मानले. या गोष्टीचा विचार करुन जो मनुष्य श्रीरघुवीरांच्या चरणांचे भजन करीत नाही, तो या लोकी विधात्याकडून ठकविला गेला, असे समजावे. ॥ १९५ ॥

कपटी कायर कुमति कुजाती । लोक बेद बाहेर सब भॉंती ॥

राम कीन्ह आपन जबही तें । भयउँ भुवन भूषन तबही तें ॥

मी कपटी, भित्रा, कुबुद्धीचा आणि नीच जातीचा आहे. लोक व वेद या दोन्ही दृष्ट्या सर्व प्रकारे बहिष्कृत आहे; परंतु ज्या क्षणीं श्रीरामचंद्रांनी मला आपलेसे केले, त्या क्षणापासून मी विश्वाचे भूषण ठरलो.’ ॥ १ ॥

देखि प्रीति सुनि बिनय सुहाई । मिलेउ बहोरि भरत लघु भाई ॥

कहि निषाद निज नाम सुबानीं । सादर सकल जोहारीं रानीं ॥

निषादराजाचे प्रेम पाहून व त्याचे गोड बोलणे ऐकून भरताचा छोटा भाऊ शत्रुघ्न हा त्याला भेटला. नंतर निषादराजाने आपले नांव सांगून नम्र व मधुर वाणीने सर्व राण्यांना आदराने जोहार केला. ॥ २ ॥

जानि लखन सम देहिं असीसा । जिअहु सुखी सय लाख बरीसा ॥

निरखि निषादु नगर नर नारी । भए सुखी जनु लखनु निहारी ॥

राण्यांनी त्याला लक्ष्मणासारखा मानून आशीर्वाद दिला की, ‘ तू लाखो वर्षे सुखाने राहा.’ नगरातून आलेले स्त्री-पुरुष निषादाला पाहून असे आनंदून गेले की, जणू ते लक्ष्मणालाच पाहात होते. ॥ ३ ॥

कहहिं लहेउ एहिं जीवन लाहू । भेंटेउ रामभद्र भरि बाहू ॥

सुनि निषादु निज भाग बड़ाई । प्रमुदित मन लइ चलेउ लेवाई ॥

सर्व म्हणत होते की, ‘ जीवनाचा लाभ यालाच मिळाला. कल्याण स्वरुप श्रीरामचंद्रांनी याला आपल्या हातांनी मिठीत घेतले.’ निषाद आपल्या भाग्याचा महिमा ऐकून मनातून खूप आनंदित झाला आणि सर्वांना बरोबर घेऊन निघाला. ॥ ४ ॥

दोहा—सनकारे सेवक सकल चले स्वामि रुख पाइ ।

घर तरु तर सर बाग बन बास बनाएन्हि जाइ ॥ १९६ ॥

त्याने आपल्या सर्व सेवकांना इशारा केला. स्वामींच्या मनातले ओळखून ते निघाले आणि त्यांनी त्या लोकांना राहण्यासाठी घरांमध्ये, वृक्षांखाली, तलावांकाठी, बागांमधून व जंगलांतून जागा तयार केल्या. ॥  १९६ ॥

सृगंबेरपुर भरत दीख जब । भे सनेहँ सब अंग सिथिल तब ॥

सोहत दिएँ निषादहि लागू । जनु तनु धरें बिनय अनुरागू ॥

भरताने जेव्हा शृंगवेरपुर पाहिले, तेव्हा प्रेमामुळे तो देहभान हरपून बसला. तो निषादाच्या खांद्यावर हात ठेवून जाताना असा शोभून दिसत होता की, जणू विनय आणि प्रेम देह धारण करुन आले आहेत. ॥ १ ॥

एहि बिधि भरत सेनु सबु संगा । दीखि जाइ जग पावनि गंगा ॥

रामघाट कहँ कीन्ह प्रनामू । भा मनु मगनु मिले जनु रामू ॥

अशाप्रकारे संपूर्ण सेना बरोबर घेऊन भरताने जगाला पवित्र करणार्‍या गंगा नदीचे दर्शन घेतले. जिथे श्रीरामांनी स्नान-संध्या केली होती, त्या रामघाटाला प्रणाम केला. त्याचे मन आनंदात इतके मग्न होते की, जणू त्याला प्रत्यक्ष श्रीरामांची भेट झाली. ॥ २ ॥

करहिं प्रनाम नगर नर नारी । मुदित ब्रह्ममय बारि निहारी ॥

करि मज्जनु मागहिं कर जोरी । रामचंद्र पद प्रीति न थोरी ॥

नगरातील स्त्री-पुरुष प्रणाम करीत होते आणि गंगेचे ब्रह्मरुप जल पाहून आनंदित होत होते. गंगेत स्नान केल्यावर हात जोडून हाच वर मागत होते की, श्रीरामांच्या चरणीचे आमचे प्रेम कमी न होता वाढत राहो. ॥ ३ ॥

भरत कहेउ सुरसरि तव रेनू । सकल सुखद सेवक सुरधेनु ॥

जोरि पानि बर मागउँ एहू । सीय राम पद सहज सनेहू ॥

भरत म्हणाला,  ‘ हे गंगे, तुझी धूळ सर्वांना सुख देणारी व

 सेवकांसाठी कामधेनूच आहे. मी हात जोडून हेच वरदान

 मागतो की, श्रीसीतारामांच्या चरणीं माझे प्रामाणिक प्रेम

 राहो. ‘ ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment