Monday, July 12, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 10 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १०

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 10 
Ovya 236 to 264 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १० 
ओव्या २३६ ते २६४

परि चुळा एकाचिया चाडे । जेविं गंगेतेंचि ठाकावें पडे ।

तेविं आर्त बहु कां थोडे । तरि सांगावें देवा ॥ २३६ ॥

२३६) परंतु एक चूळभर पाण्याची इच्छा असली तरी ज्याप्रमाणें गंगेला जावें लागतें, त्याप्रमाणें आमची ऐकण्याविषयींची इच्छा फार असो अथवा थोडी असो, तरी तें देवांनाच सांगितलें पाहिजे.  

तेथें देवें म्हणितलें राहें । जो संतोषु आम्हां जाहाला आहे ।

तयावरी स्तुति साहे । ऐसें उरलें नाहीं ॥ २३७ ॥

२३७) त्यावेळीं श्रीकृष्ण म्हणाले, हे असूं दे. तुझी आस्था पाहुन जो कांहीं आम्हांस आनंद झाला आहे, त्याच्यावर आता स्तुति सहन होईल, असें राहिलें नाहीं. 

पें परिसतु आहासि निकियापरी । तेंचि वक्तृत्वा वर्‍हाडीक करी ।

ऐसें पुरस्करोनि श्रीहरी । आदरिलें बोलों ॥ २३८ ॥

२३८) तूं उत्तम तर्‍हेनें ऐकत आहेस, तेंच आमच्या बोलण्याला बोलावून आणण्याचें काम करतें. याप्रमाणें अर्जुनास शाबासकी देऊन श्रीकृष्णांनी बोलण्यास प्रारंभ केला.

मूल श्लोक

ज्ञानयज्ञेन चाप्यन्ते यजन्तो मामुपासते ।

एकत्वेन पृथकत्वेन बहुधा विश्वतोमुखम् ॥ १५ ॥

१५) तसेंच दुसरें कित्येक, सर्वतोमुख जो मी, त्या माझें ज्ञानयज्ञानें एकत्वानें ( आपल्या स्वप्नांतील पदार्थांशीं, जागृत झाल्यावर, जागृत पुरुष जसें ऐक्य पाहतो, त्या अभेद ज्ञानानें ), व निरनिराळ्या प्रकारानें ( जो आकार जेथें दिसेल, तो मीच आहे, अशा अभेदज्ञानानेंच ) वेगळेपणानें यजन करुन माझी उपासना करतात.      

तरी ज्ञानयज्ञु तो एवंरुपु । तेथ आदिसंकल्पु हा युपु ।

महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ २३९ ॥

२३९) तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञामध्यें महामूळ संकल्प हा, पशु बांधावयाचा खांब आहे; पंचमहाभूतें हा मांडव आहे व द्वैत हा पशु आहे, 

मग पाचांचें जे विशेष गुण । अथवा इंद्रियें आणि प्राण ।

हेचि यज्ञोपचारभरण । अज्ञान घृत ॥ २४० ॥

२४०) नंतर पंचमहाभूतांचें जे शब्दस्पर्शादि विशेष गुण, अथवा इंद्रियें व प्राण हीच यज्ञाची साहित्यसामग्री असून अज्ञान हें तूप आहे.

तेथ मनबुद्धीचिया कुंडा--। आंतु ज्ञानाग्नि धडफुडा ।

साम्य तेचि सुहाडा । वेदि जाणें ॥ २४१ ॥

२४१) तेथें मन व बुद्धि या कुंडांत प्रज्वलित ज्ञानरुपी अग्नि असून, हे मित्रा अर्जुना, सुखदुःखादि द्वंद्वांविषयीं जी चित्ताची समता, ती वेदी ( त्या यज्ञांतील शुद्ध केलेला यज्ञाचा ओटा ) होय, असें समज.    

सविवेकमतिपाटव । तेचि मंत्रविद्यागौरव ।

शांति स्त्रुक्स्त्रुव । जीव यज्वा ॥ २४२ ॥

२४२) आत्मानात्मविचार करण्याविषयींची जी बुद्धीची कुशलता तीच मंत्रविद्येची शोभा आहे. शांति ही स्त्रुक्स्त्रुवा नांवाचीं यज्ञपात्रें आहेत व जीव हा यज्ञ करणारा आहे.  

तो प्रतीतीचेनि पात्रें । विवेकमहामंत्रें ।

ज्ञानाग्निहोत्रें । भेदु नाशी ॥ २४३ ॥

२४३) तो यज्ञ करणारा जीव, स्वरुपानुभवरुप पात्रानें, ब्रह्मविचाररुप महायंत्रानें व ज्ञानरुप अग्निहोत्रकर्मानें, जीव व ईश्वर यांच्या भन्नपणाची आहुति देऊन, तो भेद नाहींसा करतो.    

तेथ अज्ञान सरोनि जाये । आणि यजिता यजन हें ठाये ।

आत्मसमरसीं न्हाये । अवभृथीं जेव्हां ॥ २४४ ॥

२४४) त्या वेलेस अज्ञानरुपी तूप सरुन जातें आणि यज्ञ करणरा व यज्ञ करणें ही थांबतात आणि जेव्हां यज्ञ करणारा जीव, अवभृथस्नानाच्या वेळीं आत्मैक्यरुपी पाण्यानें स्नान करतो,

तेव्हां भूतें विषय करणें । हें वे गळालें कांहीं न म्हणे ।

आघवें एकचि ऐसें जाणे । आत्मबुद्धि ॥ २४५ ॥

२४५) तेव्हां तो यज्ञ करणारा, पंचमहाभूतें, शब्दादि विषय व इंद्रियें, हीं कांहीं वेगळेपणानें समजत नाहीं. कारण आत्मबुद्धीमुळे तो ही सर्व एकच आहेत, असें जाणतो.

जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना ।

मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ॥ २४६ ॥

२४६) अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की, झोपेला वश होऊन स्वप्नांतील ही चित्रविचित्र सेना मीच झालों होतो ना;

आतां सेना ते सेना नव्हे । हें मीच एक आघवें ।

ऐसें एकत्वें मानवे । विश्र्व तया ॥ २४७ ॥

२४७) जागें झाल्यावर तो म्हणतो कीं, ( स्वप्नांत पाहिलेली होती ) ती सेना आतां ( खरोखरीची ) सेना नाहीं, तर स्वप्नामध्यें सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतों. अशा एकत्वानें संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येतें.

मग तो जीवु हे भाष सरे । आब्रह्म परमात्मबोधें भरे ।

ऐसें भजती ज्ञानाध्वरें । एकत्वें येणें ॥ २४८ ॥

२४८) अशा अनुभवावर आल्यावर मग, मी जीव आहें, ही त्याची कल्पना नाहीशी होते; ब्रह्मदेवापासून तों मुंगीपर्यंत, सर्व ब्रह्मरुपच आहे, अशा ज्ञानानें तो परिपूर्ण होतो. याप्रमाणें ज्ञानयज्ञद्वारां ते या ऐक्य भावनेनें माझें भजन करतात.   

अथवा अनादि हें अनेक । जें आनासारिखें एका एक ।

आणि नामरुपादिक । तेंही विषम ॥ २४९ ॥

२४९) अथवा अनादिकालापासून हें अनेकत्व असेंच आहे. कारण ( जगांतील पदार्थ ) एकसारखें एक नाहीत व त्यांची नामेंरुपेंसुद्धा भिन्न भिन्न आहेत.

म्हणोनि विश्र्व भिन्न । परि न भेदे तयांचें ज्ञान ।

जैसें अवयव तरी आन आन । परि एकेचि देहींचे ॥ २५० ॥

२५०) म्हणून जरी विश्वांत त्याच्या दृष्टीस भिन्न भिन्न पदार्थ पडले, तरी त्या योगानें त्याचे ज्ञान भेद पावत नाही. ज्याप्रमाणें अवयव निरनिराळे आहेत खरे, परंतु ते सर्व एकाच देहाचें आहेत.

कां शाखा सानिया थोरा । परि आहाति एकाचिये तरुवरा ।

बहु रश्मि परि दिनकरा । एकाचे जेवीं ॥ २५१ ॥

२५१) अथवा, जशा लहानमोठ्या फांद्या आहेत खर्‍या, परंतु त्या एकाच झाडाच्या असतात व ज्याप्रमाणें किरणें अनेक खरीं, परंतु एकाच सूर्याची असतात. 

तेविं नानाविधा व्यक्ती । आनानें नामें आनानी वृत्ती ।

ऐसें जाणती भेदलां भूतीं । अभेदा मातें ॥ २५२ ॥

२५२) त्याप्रमाणें नाना प्रकारच्या व्यक्ति, त्यांची भिन्न भिन्न नांवें व त्यांचे भिन्न भिन्न स्वभाव, याप्रमाणें भेद असलेल्या प्राण्यांत अभिन्न जो मी, त्या मला ते जाणतात, 

येणें वेगळालेपणें पांडवा । करिती ज्ञानयज्ञु बरवा ।

जे न भेदती जानिवा । जाणते म्हणउनि ॥ २५३ ॥

२५३) अर्जुना, ( अशा इंद्रियांना गोचर होणार्‍या ) भेद प्रतीतिद्वारां ते चांगला ( अभेद ) ज्ञानयज्ञ करतात. कारण कीं, ते पुरुष स्वरुपज्ञानी असल्याकारणानें विश्वांतील भिन्न भिन्न पदार्थांच्या, भिन्न भिन्न ज्ञानानें भेदाला पावत नाहींत. ( तर त्या भिन्न भिन्न ज्ञानांतून अन्वयदृष्टीनें परमात्म्याला ते पाहतात ).   

ना तरी जेधवां जिये ठायीं । देखती कां जें जें कांहीं ।

तें मी वांचूनि नाहीं । ऐसाचि बोधु ॥ २५४ ॥

२५४) अथवा जेव्हां ज्या ठिकाणी जें जें कांहीं ते पाहतात, तें तें माझ्या स्वरुपावांचून दूसरें कांहीं नाहीं, असाच त्यांचा बोध असतो. 

पाहें पां बुडबुडां जेउता जाये । तेउतें जळचि एक तया आहे ।

मग विरे अथवा राहे । तर्‍ही जळाचिमाजि ॥ २५५ ॥

२५५) असें पाहा कीं, बुडबुडा जेथें जाईल, तेथें त्याला एक पाणी मात्रच आहे; मग राहिला तरी पाण्यांतच अथवा नाहींसा झाला तरी पाण्यांतच ! 

कां पवनें परमाणु उचलले । ते पृथ्वीपणावेगळे नाहीं गेले ।

आणि माघौतें जरी पडले । तरी पृथ्वीचिवरी ॥ २५६ ॥

२५६) अथवा वार्‍यानें पृथ्वीचे कण वर उचलले तरी ते पृथ्वीकणांहून वेगळे झाले नाहींत आणि वर गेलेले कण जरी पुन्हां खालीं पडले, तरी ते पृथ्वीवरच पडतात.   

तैसें भलतेथ भलतेणें भावें । भलतेंही न हो अथवा होआवें ।

परि तें मी ऐसें आघवें । होऊनि ठेलें ॥ २५७ ॥

२५७) त्याप्रमाणें वाटेल तेथें, वाटेल त्या भावानें ( स्थितीनें

 ), वाटेल तेंहि न व्हावे अथवा व्हावें, पण तें मी ( परमात्मा

 ) आहें, असें सर्व त्यास ( अनुभवानें ) होऊन राहिलेलें

 असतें.  

अगा हे जेव्हडी माझी व्याप्ति । तेव्हडीचि तयांचि प्रतीति ।

ऐसें बहुधाकारीं वर्तती । बहुचि होउनि ॥ २५८ ॥

२५८) बा अर्जुना ! जेवढी ही माझी व्याप्ति आहे, तेवढाच त्यांचाहि अनुभव असतो, याप्रमाणें ते अनुभवाच्या अंगानें, मद्रूप होऊन, अनेक आकारांनीं वावरत असतात.    

हें भानुबिंब आवडेतया । सन्मुख जैसें धनंजया ।

तैसे ते विश्र्वा या । समोर सदा ॥ २५९ ॥

२५९) अरे अर्जुना, जसें हे सूर्यबिंब वाटेल त्याच्या संमुख असतें, त्याप्रमाणें ते ( पुरुष ) नेहमीं या विश्वाच्या समोर असतात.

अगा तयांचिया ज्ञाना । पाठी पोट नाहीं अर्जुना ।

वायु जैसा गगना । सर्वांगीं असे ॥ २६० ॥

२६०) अर्जुना, त्यांच्या ज्ञानाला पुढली बाजू व मागली बाजू असें नाहीं; ज्याप्रमाणें वायु हा आकाशाच्या सर्व पोकळी भर आहे,

तैसा मी जेतुला आघवा । तेंचि तुक तयांचिया सद्भावा ।

तरी न करितां पांडवा । भजन जहालें ॥ २६१ ॥

२६१) त्याप्रमाणें जेवढा संपूर्ण मी आहे, तेंच वजन त्यांच्या सद्भावास असतें. ( म्हणजे तेवढा संपूर्ण त्यांचा अनुभव असतो. ) असें असल्यामुळें, अर्जुना, त्यांनी कृतीनें जरी भजन केलें नाहीं, तरी तें त्यांच्याकडून सहजच होत असते.

एर्‍हवीं तरी सकळ मीचि आहें । तरी कवणीं कें उपासिला नोहे ।

एथ एकें जाणणेनविण ठाये । अप्राप्तासी ॥ २६२ ॥

२६२) सहज विचार करुन पाहिलें तर, जगांतील सर्व पदार्थ मीच आहे, मग कोणाकडून कोठे माझी उपासना होत नाहीं असें म्हणावे ? असे असूनहि ज्यांची अशा प्रकारची समजूत झाली नाहीं, त्यांची तशी समजूत न झाल्यामुळेंच त्यांस हे भजन घडत नाहीं.

परि तें असो येणें उचितें । ज्ञानयज्ञें यजितसांते ।

उपासिती मातें । ते सांगितले ॥ २६३ ॥

२६३) परंतु तें असूं दे, अशा या योग्य ज्ञानयज्ञानें भजन करणारे, माझी जे उपासना करतात, ते भक्त मी तुला सांगितले.

अखंड सकळ हें सकळां मुखीं । सहज अर्पत असे मज एकीं ।

नेणणेयासाठीं मूर्खी । न पविजोचि मातें ॥ २६४ ॥

२६४) हें सर्व, सर्वांच्या द्वारें, सदोदित, माझ्या एकट्याच्या

 ठिकाणी सहजच अर्पण होत आहे; ( म्हणजे सर्व प्राणी जें

 कांहीं करतात, तें सर्व मला एकट्यालाच अर्पण होतें;

 कारण त्या सर्वांच्या रुपानें मीच एक आहे ). पण मूर्खांनीं

 हें न जाणल्यामुळें ( तें सहज अर्पण होणारें सर्व कर्म )

 मला प्राप्त होत नाहीं. 

 


Custom Search

No comments:

Post a Comment