Saturday, July 3, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 8 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग ८

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 8 
Ovya 188 to 205 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग ८ 
ओव्या १८८ ते २०५

मूळ श्लोक

महान्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः ।

भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ॥ १३ ॥

१३) हे पार्था, पण दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे, भूतांचे आदि कारण व क्षयरहित असा मला जाणून , अनन्य होऊन, माझी भक्ति करतात. 

तरी जयांचिये चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी ।

जयां निजेलियांतें उपासी । वैराग्य गा ॥ १८८ ॥

१८८) ज्यांच्या शुद्ध मनरुपी क्षेत्रांत मी क्षेत्रसंन्यासी होऊन राहतों व जे पुरुष निजलें असतां वैराग्य त्यांची उपासना करतें.  

जयांचिया आस्थेचिया सद्भावा । आंतु धर्मु करी राणिवा ।

जयांचें मन ओलावा । विवेकासी ॥ १८९ ॥

१८९) ज्यांच्या कळकळीच्या चांगल्या वासनेंत धर्म राज्य करतो व ज्यांचे तृप्त मन विचारास जीवन आहे; 

जे ज्ञानगंगे नहाले । पूर्णता जेऊनि धाले ।

जे शांतीसि आले । पालव नये ॥ १९० ॥

१९०) ज्यांनी ज्ञानरुपी गंगेंत स्नान केलेलें आहे व जे पुरुष पूर्णता जेवून तृप्त झाले आहेत आणि जे पुरुष शांतिरुपी वेलीला फुटलेलीं कोंवळीं पानें आहेत; 

जे परिणामा निघाले कोंभ । जे धैर्यमंडाचे स्तंभ ।

जे आनंदसमुद्रीं कुंभ । चुबकळोनि भरिले ॥ १९१ ॥

१९१) जें पुरुष परिणामाला ( पूर्ण अवस्थेला ) फुटलेले अंकुर आहेत. जे ( सात्विक ) धैर्यरुपी मांडवांचे खांब आहेत, जे पुरुष ब्रह्मानंदरुपी समुद्रांत तुडुंब बुडवून भरलेले घट आहेत;   

जयां भक्तीची येतुली प्राप्ती । जे केवल्यातें परौते सर म्हणती ।

जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥ १९२ ॥

१९२) ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ति ( झालेली ) असते कीं, ते मोक्षाला, पलीकडे हो, असे म्हणतात; ज्यांच्या सहज कर्माचरणामध्यें निति जगलेली दिसते;

ते आघवांचि करणीं । लेंइले शांतीचीं लेणीं ।

जयांचें चित्त गवसणी । व्यापका मज ॥ १९३ ॥

१९३) ज्यांनी सर्व इंद्रियांच्या ठिकाणी शांतीचें अलंकार धारण केले आहेत व ज्यांचे चित्त मी जो सर्वव्यापक, त्या मला आच्छादणारी खोळ झालें आहे;

ऐसे जे महानुभाव । जे दैविये प्रकृतीचें दैव ।

जे जाणोनियां सर्व । स्वरुप माझें ॥ १९४ ॥

१९४) असे जे व्यापक अनुभवाचे पुरुष आहेत, ते दैवी प्रकृतीचे दैव आहेत; ते महात्मे हे सर्व माझेंच स्वरुप आहे असें जाणून,  

मग वाढतेनि प्रेमें । मातें भजती जे महात्मे ।

परि दुजेपण मनोधर्में । शिवतलें नाहीं ॥ १९५ ॥

१९५) मग वाढत्या प्रेमानें मला भजतात; पण ( त्यांची भक्ति अशी एकविध असते कीं,  आपल्या मनाच्या संकल्पानें, देव एक उपस्य व मी एक उपासक निराळा आहे.) असा दुसरेपणा त्यांच्या मनाला शिवत नाही.  

ऐसे मीच होऊनि पांडवा । करिती माझी सेवा ।

परि नवलावो तो सांगावा । असे आइक ॥ १९६ ॥

१९६) अर्जुना, याप्रमाणें मीच होऊन ते माझी सेवा करतात; पण त्यांचा सेवा करण्याचा प्रकार आश्चर्यकारक आहे तो सांगतो; तो ऐक.

मूळ श्लोक

सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्र्च दृढव्रताः ।

नमसत्यन्तश्र्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते ॥ १४ ॥

१४) सदा माझा नामघोष करणारे, ( अष्टांग योगमार्गानें माझ्या प्राप्तीसाठीं ) निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक ( सर्व मीच आहें असें समजून सर्वत्र मला ) नमस्कार करणारे, असे ( माझ्या ठिकाणीं ) नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. 

तरी कीर्तनाचेनि नटनाचें । नाशिले व्यवसाय प्रायश्र्चितांचे ।

जे नामचि नाहीं पापाचें । ऐसें केलें ॥ १९७ ॥

१९७) तर त्यांनी कीर्तनाच्या उत्कर्षानें प्रायश्चितांचा धंदा नष्ट केला. कारण कीं, त्यांनीं पापाचें नांवच नाहींसे केलें.

यमदमा अवकळा आणिली । तीर्थें ठायावरुनि उठविलीं ।

यमलोकींची खुंटिली । राहाटी आघवी ॥ १९८ ॥

१९८) यमदमांना निस्तेजता आणली, तीर्थांना पाप नाहींसें करणारें असें जें श्रेष्ठ पद मिळालें होतें, त्या श्रेष्ठपदावरुन उठविलें; ( व ) पापें करुन लोक यमलोकास जात नाहींसे झाले.

यमु म्हणे काय यमाचें । दमु म्हणे कवणातें दमावें ।

तीर्थें म्हणती काय खावें । दोष ओखदासि नाहीं ॥ १९९ ॥

१९९) यम हें साधन म्हणूं लागलें की, ( आतां ) निग्रह कोणाचा करावा ? ( कारण ज्याचा निग्रह करावयाचा, तें मन कीर्तनाच्या योगानें आत्मरुप झालें ) दम हें साधन म्हणूं लागलें, कोणत्या इंद्रियांचें दमन करावें ? ( कारण किर्तनानें सर्व इंद्रियें आत्मस्वरुपांत तल्लीन झाली.) तीर्थें म्हणावयास लागलीं कीं, पापच जर औषधाला राहिलें नाहीं, तर आम्हीं खावें काय ?      

ऐसे माझेनि नामघोषें । नाहीं करिती विश्र्वाचीं दुःखें ।

अवघें जगचि महासुखें । दुमदुमित भरलें ॥ २०० ॥

२००) याप्रमाणें माझ्या नामघोषानें ते विश्वाचीं दुःखें नाहींशीं करतात व सर्व जगच ब्रह्मसुखानें जिकडे तिकडे कोंदून भरतात. 

ते पाहांटेवीण पाहावित । अमृतेंवीण जीववित ।

योगेंवीण दावित । कैवल्य डोळां ॥ २०१ ॥

२०१) ते ( महात्मे ) प्राकृत सूर्याच्या पहाटेशिवाय ज्ञानरुप दिवसाचा उदय करतात व अष्टांगयोगाशिवाय मोक्ष डोळ्यांना दाखवितात.

परी राया रंका पाड धरुं । नेणती सानेया थोरां कडसणी करुं ।

एकसरें आनंदाचें आवारु । होत जगा ॥ २०२ ॥

२०२) परंतु हा राजा आहे, हा रंक आहे, असा योग्यताभेद ते मनांत धरींत नाहींत; व लहान मोठा अशी निवड करीत नाहींत व जगाला एकसारखें आनंदाचे कोट होतात.

कहीं एकधेनी वैकुंठा जावें । तें तिहीं वैकुंठचि केलें आघवें ।

ऐसे नमघोषगौरवें । धवळलें विश्र्व ॥ २०३ ॥

२०३) ( पूर्वीं असें होतें कीं ), कधी  तरी एखाद्यानें वैकुंठाला जावें, तें यांनीं सर्व वैकुंठच केले; याप्रमाणें माझ्या नामघोषाच्या माहात्म्याने संपूर्ण विश्व प्रकाशित केलें.

तेजें सूर्य तैसे सोज्वळ । परि तोहि अस्तवे हें किडाळ ।

चंद्र संपूर्ण एखादे वेळ । हे सदा पुरते ॥ २०४ ॥

२०४) तेजाने ते महात्मे सूर्यासारखें लखलखीत आहेतअसें म्हणावें; परंतु सूर्याचा अस्त होतो, हा सूर्यात दोष आहे ( व महात्म्यांच्या ज्ञानोदयाचा कधींच अस्त होत नाहीं ) , ( त्यांस चंद्राची उपमा द्यावी तर ) चंद्र एखाद्या वेळेसच ( फक्त पौर्णिमेसच ) पूर्ण असतो आणि हे महात्मे स्वरुपस्थितीने नेहमी पूर्ण असतात. 

मेघ उदार परी वोसरे । म्हणऊनि उपमेसी न पुरे ।

हे निःशंकपणें सपांखरे । पंचानन ॥ २०५ ॥

२०५) मेघ वृष्टि करण्यांत उदार असतो पण तो ओसरतो;

 म्हणून तो मेघ या ( बोधाची सदैव वृष्टि करणार्‍या )

 महात्म्यास उपमा देण्यास पुरेसा नाही. हे महात्मे

 निःसंशयपणानें कृपाळू असें सिंह आहेत.



Custom Search

No comments:

Post a Comment