Friday, August 13, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 9 Part 15 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ९ भाग १५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 9 Part 15 
Ovya 398 to 414 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ९ भाग १५ 
ओव्या ३९८ ते ४१४

मूळ श्लोक

यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् ।

यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम् ॥ २७ ॥ 

२७) हे कौंतेया, तूं जें करतोस, जे भोगतोस, जें हवन करतोस, जें दान करतोस, जें तप करतोस तें ( सर्व ) मला अर्पण कर.

जे जे कांहीं व्यापार करिसी । कां भोग हन भोगिसी ।

अथवा यज्ञीं यजिसी । नानाविधीं ॥ ३९८ ॥

३९८) तूं जे जे कांहीं व्यवहार करतोस, किंवा शब्ददि विषयांचा भोग घेशील, अथवा अनेक प्रकारच्या यशरुप कर्मांनीं कर्मांनीं हवन करशील;

नातरी पात्रविशेषें दानें । कां सेवकां देसी जीवनें ।

तपादि साधनें । व्रतें करिसी ॥ ३९९ ॥

३९९) किंवा विशिष्ट योग्यता पाहून दानें देखील; अथवा तूं आयजलया नोकरांना जीं वेतनें देइशील किंवा तप लेंगरे साधनें आद्यशक्ति किंवा व्रतानें आचरण करशील;

तें क्रियाजात आघवें । जें जैसें निपजेल स्वभावें ।

तें भावना करोनि करावें । माझिया मोहरा ॥ ४०० ॥

४००) ( तात्पर्य ) जें जें कर्म जसें तुझ्याकडून स्वभावतः घडेल ( मग तें सांग असो अथवा असांग ) तें सर्व कर्म माझ्याप्रीत्यर्थ आहे, अशा समजूतीनें कर.  

परि सर्वथा आपुलां जीवीं । केलियाची शंका कांहींचि नुरवीं ।

ऐसीं धुवोनि कर्में द्यावीं । माझां हातीं ॥ ४०१ ॥

४०१) परंतु अमुक कर्म मी केलें अशी कर्तृत्वाची आठवण आपलया मनामध्यें तूं मूळींच ठेवूं नकोस. याप्रमाणें सर्व कर्मे शुद्ध करुन मला अर्पण कर.

मूळ श्लोक 

शुभाशुभफलैरेवं मोक्ष्यसे कर्मबन्धनैः ।

संन्यासयोगयुक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि ॥ २८ ॥

२८) या प्रकारें ( केलें असतां ), कर्माचीं जीं शुभाशुभफलरुप बंधनें, त्यापासून तूं मुक्त होशील. ( या ) संन्यासरुपी कर्मयोगानें युक्त होऊन मुक्त झालास, म्हणजे तू मला प्राप्त होशील.     

मग अग्निकुंडी बीजे घातलीं । तियें अंकुरदशे जेविं मुकलीं ।

तेविं न फळतीचि मज अर्पिलीं । शुभाशुभें ॥ ४०२ ॥

४०२) मग ज्याप्रमाणें अग्नीच्या कुंडामध्यें टाकलेलें बीं, अंकुर उत्पन्न होणार्‍या दशेला आंचवतें, त्याचप्रमाणें मला अर्पण केलेलीं बरी वाईट कर्में कांहींच फळ देत नाहींत. 

अगा कर्में जैं उरावें । तैं तिहीं सुखदुःखीं फळावें ।

आणि तयातें भोगावया यावें । देहा एका ॥ ४०३ ॥

४०३) अर्जुना, ज्या वेळेला कर्में ( अर्पण न केल्यामुळें ) शिल्लक राहतात, त्या वेळेला त्यांचे फळ सुखदुः’खांच्या रुपानें तयार होतें व तें भोगण्याकरितां एखादा देह घ्यावा लागतो.

तें उगाणिलें मज कर्म । तेव्हाचि पुसिलें मरण जन्म ।

जन्मासवें भ्रम । वरचिलही गेले ॥ ४०४ ॥

४०४) तें कर्म ज्या क्षणीं मला अर्पण केलें, त्या क्षणींच जन्ममरण पार नाहीसें झालें आणि जन्म नाहींसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टहि नाहीसे झाले.

म्हणऊनि अर्जुना यापरी । पाहेचा वेळु नव्हेल भारी ।

हे संन्यासयुक्ति सोपारी । दिधली तुज ॥ ४०५ ॥

४०५) म्हणून अर्जुना, याप्रमाणें ही सोपी युक्ति तुला दिली आहे ( तर ही याच क्षणीं अमलांत आण ) . ती जर उद्या अमलांत आणूं म्हणून म्हणशील तर फलप्राप्तीस ( कर्मरहित होण्यास ) तितकाच जास्त वेळ लागणार नाहीं काय ?

या देहाचिया बांदोडी न पडिजे । सुखदुःखाचां सागरीं न बुडिजे ।

सुखें सुखरुपा घडिजे । माझियाचि अंगा ॥ ४०६ ॥

४०६) ( वर सांगितलेली युक्ति अमलांत आणली असतां ) देहरुपी बंदिखान्यांत पडावें लागत नाहीं, आणि सुखरुप जें माझें स्वरुप, त्याच्याशी  अनायासें ऐक्य होतें.

मूळ श्लोक

समोऽहं सर्वभुतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः ।

ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम् ॥ २९ ॥

२९) मी सर्व भूतांच्या ठिकाणीं सम आहें; मला आपला न परका कोणी नाहीं. जे मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणीं आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणीं आहें.

तो मी पुससी कैसा । तरि जो सर्वभूतीं सदा सरिसा ।

जेथ आपपरु ऐसा । भागु नाहीं ॥ ४०७ ॥

४०७) ( भक्त ज्याचें स्वरुप बनतो ) तो मी कसा आहे म्हणून विचारशील, तर ( सांगतों ऐक ). जो मी सर्व प्राण्यांमध्यें सारखा व्यापून राहिलेलों आहें व जेथें आपला व परका असा भेद नाहीं; 

जे ऐसिया मातें जाणोनि । अहंकाराचा कुरुठा मोडोनि ।

जे जीवें कर्में करुनि । भजती मातें ॥ ४०८ ॥

४०८) अशा प्रकारें सर्व समान असणारा जो मीं, त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराचें ठिकाण नाहींसे करतात व मनोभावानें कर्में करुन तद्द्वारां माझें भजन करतात;    

ते वर्तत दिसती देहीं । परि ते देहीं ना माझा ठायीं ।

आणि मी तयांचां हृदयीं । समग्र असें ॥ ४०९ ॥

४०९) ते देहांत वावरतांना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणीं देहतादात्म्य नसतें. ते माझ्या ठिकाणीं रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणांत संपूर्ण आहें.

सविस्तर वटत्व जैसें । बीजकणिकेमाजीं असे ।

आणि बीजकणु वसे । वटीं जेवीं ॥ ४१० ॥

४१०) आपल्या विस्तारासह वटत्व ज्याप्रमाणें वडाच्या लहालशा बीमध्यें असतें आणि त्याप्रमाणें तें लहानसें बीं ज्याप्रमाणें वडाच्या झाडांतहि असतें,  

तेवीं आम्हां तयां परस्परें । बाहेरी नामाचींचि अंतरें ।

वांचूनि आंतुवट वस्तुविचारें । मी तेचि ते ॥ ४११ ॥

४११) तसें आमच्यांत आणि भक्तांत, परस्परांमध्यें बाह्यनामरुपात्मक देहदृष्टीनें भेद आहे वास्तविक विचार केला तर, अंतरंग आत्मदृष्टीनें ते आणि मी एकच आहोत.  

आतां जायांचें लेणें । जैसें आंगावरी आहाचवाणें ।

तैसें देह धरणें । उदास तयाचें ॥ ४१२ ॥

४१२) आतां उसनें मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले, तरी त्या दागिन्यांविषयीं घालणार्‍याच्या मनांत जरी उदासीनता असते, तसे ते भक्तहि ( आपल्या देहाविषयीं उदासिन असतात. 

परिमळु निघलिया पवनापाठीं । मागें वोस फूल राहे देठीं ।

तैसें आयुष्यचिये मुठी । केवल देह ॥ ४१३ ॥

४१३) ( जर ते देहावर उदासीन आहेत, तर त्यांनीं देह ठेवलाच कां ? तर त्यांनी ठेवलाच नाही. परंतु केवळ त्यांच्या ( उरलेल्या ) आयुष्यानें धरुन ठेवला आहे. हीच गोष्ट येथें उदाहरणानें स्पष्ट करतात. ) वायूने आपल्या बरोबर फुलांतील सर्व सुगंध नेल्यास मग, मागें केवळ देठाला जसें सुगंधशून्य फूल राहतें, त्याप्रमाणें भक्ताचा देह ( केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ ) आयुष्य धरुन ठेवतें,      

येर अवष्टंभु जो आघवा । तो आरुढोनि मद्भवा ।

मजाचि आंतु पांडवा । पैठा जाहला ॥ ४१४ ॥

४१४) अर्जुना, एर्‍हवीं त्यांचा सर्व देहाहंकार माझ्या स्वरुपीं

 येऊन माझ्यांतच स्थित झाला.



Custom Search

No comments:

Post a Comment