Saturday, August 14, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 38 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ३८

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 38 
Doha 221 to 226 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ३८ 
दोहा २२१ ते २२६

दोहा—मगबासी नर नारि सुनि धाम काम तजि धाइ ।

देखि सरुप सनेह सब मुदित जनम फलु पाइ ॥ २२१ ॥

वाटेत राहाणारे स्त्री-पुरुष ही वार्ता ऐकताच घरदार व कामकाज सोडून धावत येत आणि त्यांचे रुप-सौंदर्य आणि प्रेम पाहून सर्वजण जन्माचे सार्थक झाल्याचे मानून आनंदित होत होते. ॥ २२१ ॥

कहहिं सपेम एक एक पाहीं । रामु लखनु सखि होहिं कि नाहीं ॥

बय बपु बरन रुपु सोइ आली । सीलु सनेहु सरिस सम चाली ॥

गावातील स्त्रिया एक दुसरीला प्रेमाने म्हणत की, ‘ सखी, हे राम-लक्ष्मण आहेत का ? हे सखी, यांची अवस्था, शरीर व रंग-रुप अगदी तसेच आहे. वागणे व स्नेह त्यांच्यासारखेच आणि चालणेसुद्धा त्यांच्यासारखेच आहे. ॥ १ ॥

बेषु न सो सखि सीय न संगा । आगें अनी चली चतुरंगा ॥

नहिं प्रसन्न मुख मानस खेदा । सखि संदेहु होइ एहिं भेदा ॥

परंतु हे सखी, यांचा तसा मुनिवेष नाही आणि बरोबर सीताही नाही. यांच्यापुढे चतुरंग सेना चालली आहे. शिवाय यांचे मुख प्रसन्न नाही. मनातून खंत आहे. हे सखी, या फरकामुळे वेगळेपणा वाटतो.’ ॥ २ ॥

तासु तरक तियगन मन मानी । कहहिं सकल तेहि सम न सयानी ॥

तेहि सराहि बानी फुरि पूजी । बोली मधुर बचन तिय दूजी ॥

तिचा तर्क इतर स्त्रियांना पटला. सर्वजणी म्हणत होत्या की, हिच्या सारखी शहाणी कोणी नाही. तिची वाखाणणी करीत व ‘ तुझे म्हणणे खरे आहे ‘ असे म्हणत दुसरी एकजण गोड शब्दांत म्हणाली. ॥ ३ ॥

कहि सपेम सब कथाप्रसंगू । जेहि बिधि राम राज रस भंगू ॥

भरतहि बहुरि सराहन लागी । सील सनेह सुभाय सुभागी ॥

श्रीरामांच्या राजतिलकाचा आनंद कसा भंग पावला, तो सर्व प्रसंग सांगून ती भाग्यवान स्त्री भरताचे वर्तन, स्नेह व स्वभाव यांची प्रशंसा करु लागली. ॥ ४ ॥

दोहा—चलत पयादें खात फल पिता दीन्ह तजि राजु ।

जात मनावन रघुबरहि भरत सरिस को आजु ॥ २२२ ॥

‘ बघा, पित्याने दिलेले राज्य सोडून हा भरत पायी चालत आहे आणि फलाहार करीत श्रीरामांना अयोध्येला परतण्याची विनवणी करण्यास जात आहे. यांच्यासारखा दुसरा कोण ( रामभक्त ) आहे ? ॥ २२२ ॥

भायप भगति भरत आचरनु । कहत सुनत दुख दूषन हरनू ॥

जो किछु कहब थोर सखि सोई । राम बंधु अस काहे न होई ॥

भरताचा बंधु-भाव, भक्ती आणि त्याचे वर्तन, याविषयी सांगणे व ऐकणे हे दोष हरण करणारे आहे. हे सखी, त्याच्याविषयी जितके सांगावे, तितके थोडेच आहे. श्रीरामांचा भाऊ असा का असणार नाही बरे ? ॥ १ ॥

हम सब सानुज भरतहि देखें । भइन्ह धन्य जुबती जन लेखें ॥

सुनि गुन देखि दसा पछिताहीं । कैकइ जननि जोगु सुतु नाहीं ॥

शत्रुघ्नासह भरताला पाहून आज आम्ही सर्वजणी मोठ्या भाग्यवान स्त्रियांच्या पंक्तीत आलो. ‘ अशा प्रकारे भरताचे गुण ऐकून आणि त्याची दशा पाहून स्त्रियांना वाईट वाटत होते आणि त्या म्हणत होत्या की, ‘ हा पुत्र कैकेयीसारख्या मातेला शोभत नाही. ‘ ॥ २ ॥

कोउ कह दूषनु रानिहि नाहिन । बिधि सबु कीन्ह हमहि जो दाहिन ॥

कहँ हम लोक बेद बिधि हीनी । लघु तिय कुल करतूति मलीनी ॥

कुणी म्हणत होती की, ‘ यात राणीचाही दोष नाही. हे सर्व विधात्याने घडविले आहे. तो आम्हांला अनुकूल आहे, म्हणून आम्हांला यांचे दर्शन घडले. नाहीतरी कुठे आम्ही लौकिकदृष्ट्या व वैदिक दृष्ट्या मर्यादाहीन, कुल व करणी या दोन्हींमध्ये मलिन, तुच्छ स्त्रिया, ॥ ३ ॥           

बसहिं कुदेस कुगॉंव कुबामा । कहँ यह दरसु पुन्य परिनामा ॥

अस अनंदु अचिरिजु प्रति ग्रामा । जनु मरुभूमि कलपतरु जामा ॥

आम्ही वाईट प्रदेशात आणि कुग्रामांत राहातो आणि स्त्रियांमध्येसुद्धा नीच स्त्रिया आहोत, आणि कुठे हे महान पुण्यामुळे होणारे यांचे दर्शन. ‘ असाच आनंद आणि आश्चर्य गावा-गावात लोकांना वाटत होते, जणु मरुभूमीमध्ये कल्पवृक्ष उगवला असावा. ॥ ४ ॥

दोहा—भरत दरसु देखत खुलेउ मग लोगन्ह कर भागु ।

जनु सिंघलबसिन्ह भयउ बिधि बस सुलभ प्रयागु ॥ २२३ ॥

भरताचे स्वरुप पाहून वाटेत राहाणार्‍या लोकांचे भाग्य उजळले. जणू दैवयोगाने सिंहल द्विपातील रहिवाश्यांना तीर्थराज प्रयाग सुलभ झाले. ॥ २२३ ॥

निज गुन सहित राम गुन गाथा । सुनत जाहिं सुमिरत रघुनाथा ॥

तीरथ मुनि आश्रम सुरधामा । निरखि निमज्जहिं करहिं प्रनामा ॥

अशा प्रकारे आपल्या गुणांबरोबरच श्रीरामांच्या गुणांचे गायन ऐकत आणि श्रीरघुनाथांचे स्मरण करीत भरत चालला होता. वाटेत तो तीर्थ पाहून स्नान करीत होता. मुनींचे आश्रम आणि देवांची मंदिरें पाहून प्रणाम करीत होता. ॥ १ ॥

मनहीं मन मागहिं बरु एहू । सीय राम पद पदुम सनेहू ॥

मिलहिं किरात कोल बनबासी । बैखानस बटु जती उदासी ॥

आणि मनातल्या मनात हा वर मागत होता की, श्रीसीतारामांच्या चरण-कमलांच्या ठायी प्रेम वसो. वाटेत भिल्ल, कोल इत्यादी वनवासी आणि वानप्रस्थ, ब्रह्मचारी, संन्यासी आणि विरक्त भेटत होते. ॥ २ ॥

करि प्रनामु पूँछहिं जेहि तेही । केहि बन लखनु रामु बैदेही ॥

ते प्रभु समाचार सब कहहीं । भरतहि देखि जनम फलु लहहीं ॥

त्यांपैकी सर्वांना प्रणाम करुन तो विचारत होता की, लक्ष्मण, श्रीराम व जानकी हे कोणत्या वनात आहेत ? ते लोक प्रभु श्रीरामांची सर्व वार्ता सांगत व भरताला पाहून त्यांच्या जन्माचे सार्थक होत, होते. ॥ ३ ॥

जे जन कहहिं कुसल हम देखे । ते प्रिय राम लखन सम लेखे ॥

एहि बिधि बूझत सबहि सुबानी । सुनत राम बनबास कहानी ॥

ते म्हणत की, ‘ आम्ही त्यांना सुखरुप पाहिले आहे, ते भरताला श्रीराम-लक्ष्मणांसमान प्रिय वाटत अशा प्रकारे भरत सुंदर वाणीने विचारत होता व श्रीरामांच्या वनवासाची कथा ऐकत जात होता. ॥ ४ ॥

दोहा—तेहि बासर बसि प्रातहीं चले सुमिरि रघुनाथ ॥

राम दरस की लालसा भरत सरिस सब साथ ॥ २२४ ॥

त्या दिवशी तेथेच थांबून दुसर्‍या दिवशी सकाळीच श्रीरघुनाथांचे स्मरण करुन भरत निघाला. सोबत असलेल्या सर्व लोकांनाही भरतासारखीच श्रीरामांच्या दर्शनाची लालसा होती. ॥ २२४ ॥

मंगल सगुन होहिं सब काहू । फरकहिं सुखद बिलोचन बाहू ॥

भरतहि सहित समाज उछाहू । मिलिहहिं रामु मिटिहि दुख दाहू ॥

सर्वांना मंगलसूचक शकुन होऊ लागले. पुरुषांचे उजवे, तर स्त्रियांचे डावे नेत्र आणि भुजा स्फुरत होत्या. सर्व परिवाराबरोबरच भरताला असा उत्साह वाटत होता की, श्रीराम भेटतील आणि दुःखाची आग शांत होईल. ॥ १ ॥

करत मनोरथ जस जियँ जाके । जाहिं सनेह सुराँ सब छाके ॥

सिथिल अंग पग मग डगि डोलहिं । बिहबल बचन पेम बस बोलहिं ॥

ज्याच्या मनात जसे असते, त्याप्रमाणे तो स्वतः मनोरथ करित असतो. सर्वजण स्नेहरुपी मदिरेमुळे धुंद होऊन चालले होते. त्यांची शरीरे थकली होती, वाटेवर पाय डगमगत होते आणि प्रेमाधिक्यामुळे विव्हळ होऊन ते बोलत होते. ॥ २ ॥

रामसखाँ तेहि समय देखावा । सैल सिरोमनि सहज सुहावा ॥

जासु समीप सरित पय तीरा । सीय समेत बसहिं दोउ बीरा ॥

रामांचा मित्र निषादराज याने त्याचवेळी स्वाभाविकपणे सुंदर असलेला पर्वतश्रेष्ठ कामदगिरी दाखविला. त्याच्याजवळच पयस्विनी नदीकाठी सीतेसह दोघे बंधू निवास करीत होते. ॥ ३ ॥

देखि करहिं सब दंड प्रनामा । कहि जय जानकि जीवन रामा ॥

प्रेम मगन अस राजसमजू । जनु फिरि अवध चले रघुराजू ॥

सर्व लोकांनी तो पर्वत पाहून ‘ जानकीजीवन श्रीरामचंद्र की जय ‘ , असे म्हणत त्याला दंडवत प्रणाम केला. राजपरिवारही प्रेमामध्ये असा मग्न झाला की, जणू श्रीरघुनाथ अयोध्येला परत निघाले आहेत. ॥ ४ ॥

दोहा—भरत प्रेमु तेहि समय जस तस कहि सकइ न सेषु ।

कबिहि अगम जिमि ब्रह्मसुखु अह मम मलिन जनेषु ॥ २२५ ॥

भरताच्या मनात त्यावेळी जे प्रेम उफाळून आले होते, त्याचे वर्णन शेषसुद्धा करु शकणार नाही. ज्याप्रमाणे अहंता आणि ममता यांमुळे मलिन झालेल्या मनुष्यांना ब्रह्मानंद अगम्य असतो, त्याप्रमाणे कवीला ते प्रेम आगम्य आहे. ॥ २२५ ॥

सकल सनेह सिथिल रघुबर कें । गए कोस दुइ दिनकर ढरकें ॥

जलु थलु देखि बसे निसि बीतें । कीन्ह गवन रघुनाथ पिरीतें ॥

सर्व लोक प्रेमाने विह्वल झाल्यामुळे सूर्यास्त होईपर्यंत दोन कोसच चालू शकले आणि पाणी व निवार्‍याची सोय पाहून रात्री तेथेच काहीच न खाता-पिता थांबले. रात्र सरल्यावर श्रीरघुनाथांवर प्रेम असलेला भरत पुढे निघाला. ॥ १ ॥

उहॉं रामु रजनी अवसेषा । जागे सीयँ सपन अस देखा ॥

सहित समाज भरत जनु आए । नाथ बियोग ताप तन ताए ॥

तिकडे श्रीरामचंद्र रात्र अजून शिल्लक उरली असतांनाच जागे झाले. त्या रात्री सीतेला स्वप्न पडले, ते ती प्रभूंना सांगू लागली की, सर्व परिवारासह भरत येथे येत आहे. प्रभूंच्या वियोगाग्नीमुळे त्याचे शरीर पोळून निघत आहे. ॥ २ ॥

सकल मलिन मन दीन दुखारी । देखीं सासु आन अनुहारी ॥

सुनि सिय सपन भरे  जल लोचन । भए सोचबस सोच बिमोचन ॥

सर्व लोक मनातून उदास, दीन व दुःखी झाले होते. सासूबाईसुद्धा वेगळ्याच दिसल्या. ‘ सीतेचे स्वप्न ऐकून श्रीरामचंद्रांच्या नेत्रांत पाणी भरुन आले आणि सर्वांना चिंतेतून मुक्त करणारे प्रभू स्वतःच चिंतित झाले. ॥ ३ ॥

लखन सपन यह नीक न होई । कठिन कुचाह सुनाइहि कोई ॥

अस कहि बंधु समेत नहाने । पूजि पुरारि साधु सनमाने ॥

आणि म्हणाले, ‘ लक्ष्मणा, हे स्वप्न काही चांगले नाही. एखादी भयप्रद वार्ता कुणीतरी येऊन सांगेल.’ असे म्हणून सांगेल.’ असे म्हणून त्यांनी भावाबरोबर स्नान केले आणि त्रिपुरारी महादेवांचे पूजन करुन साधूंना सन्मानित केले. ॥ ४ ॥

छं०—सनमानि सुर मुनि बंदि बैठे उतर दिसि देखत भए ।

नभ धूरि खग मृग भूरि भागे बिकल प्रभु आश्रम गए ॥

तुलसी उठे अवलोकि कारनु काह चित सचकित रहे ।

सब समाचार किरात कोलन्हि आइ तेहि अवसर कहे ॥

देवांचे पूजन आणि मुनींचे वंदन झाल्यावर श्रीराम बसले आणि उत्तर दिशेकडे पाहू लागले. आकाशात धुरळा पसरत होता. पुष्कळसे पक्षी आणि पशू व्याकूळ होऊन पळत प्रभूंच्या आश्रमाकडे येत होते. तुलसीदास म्हणतात की, हे पाहून श्रीराम उठून उभे राहीले आणि विचार करु लागले की, असे व्हायचे काय कारण असावे ? मनात त्यांना आश्चर्य वाटत होते. त्याचवेळी कोल-भिल्लांनी येऊन सर्व बातमी सांगितली.

सो०—सुनत सुमंगल बैन मन प्रमोद तन पुलक भर ।

सरद सरोरुह नैन तुलसी भरे सनेह जल ॥ २२६ ॥

तुलसीदास म्हणतात की, ते त्यांचे मंगल बोलणे ऐकताच श्रीरामांच्या मनाला खूप आनंद झाला. शरीर पुलकित झाले आणि शरदऋतूमधील प्रफुल्लित कमलांसारखे त्यांचे नेत्र प्रेमाश्रूंनी भरुन गेले. ॥ २२६ ॥

बहुरि सोचबस भे सियरवनू । कारन कवन भरत आगवनू ॥

एक आइ अस कहा बहोरी । सेन संग चतुरंग न थोरी ॥

सीतापती श्रीरामांच्या मनांत पुन्हा विचार आला की, भरताच्या येण्याचे काय कारण असावे ? नंतर एकाने येऊन सांगितले की, भरताबरोबर जंगी चतुरंग सेनाही आहे. ॥ १ ॥

सो सुनि रामहि भा अति सोचू । इत पितु बच इत बंधु सकोचू ॥

भरत सुभाउ समुझि मन माहीं । प्रभु चित हित थिति पावत नाहीं ॥

हे ऐकून श्रीरामांना फार काळजी वाटू लागली. एकीकड़े पित्याचे वचन, तर दुसरीकडे भरताची भीड. भरताचा स्वभाव मनात जाणल्यावर प्रभू श्रीरामचंद्रांच्या मनाला कुठेही आधार दिसेना. ॥ २ ॥

समाधान तब भा यह जाने । भरतु कहे महुँ साधु सयाने ॥

लखन लखेउ प्रभु हृदयँ खभारु । कहत समय सम नीति बिचारु ॥

परंतु भरत साधु-स्वभावाचा व शहाणा आहे आणि माझे म्हणणे ऐकणारा आहे. हे लक्षात आल्यावर श्रीरामांना समाधान झाले. प्रभू श्रीरामांच्या मनात चिंता आहे, असे लक्ष्मणाला दिसले. तेव्हा तो प्रसंगानुरुप आपले नीतियुक्त विचार मांडू लागला. ॥ ३ ॥

बिनु पूछें कछु कहउँ गोसाईं । सेवकु समयँ न ढीठ ढिठाईं ॥

तुम्ह सर्बग्य सिरोमनि स्वामी । आपनि समुझि कहउँ अनुगामी ॥

‘ हे स्वामी, न विचारता मी काही सांगत आहे. प्रसंगी

 सेवकाने काही आगळीक केली, तरी ती आगळीक

 मानायची नसते. हे स्वामी, सर्वज्ञांमध्ये तुम्ही अग्रगण्य

 आहात. तुम्हांला सर्व कळते, तरीही मी आपल्या

समजुतीप्रमाणे जे रास्त आहे, ते सांगतो, ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment