Saturday, August 14, 2021

ShriRamCharitManas AyodhyaKanda Part 40 श्रीरामचरितमानस अयोध्याकाण्ड भाग ४०

 

ShriRamCharitManas 
AyodhyaKanda Part 40 
Doha 233 to 238 
श्रीरामचरितमानस 
अयोध्याकाण्ड भाग ४० 
दोहा २३३ ते २३८

दोहा—मातु मते महुँ मानि मोहि जो कछु करहिं सो थोर ।

अघ अवगुन छमि आदरहिं समुझि आपनी ओर ॥ २३३ ॥

मी मातेशी सहमत असल्याचे समजून, ते जे काही करतील, ते थोडेच आहे. परंतु ते आपले बिरुद व संबंध जाणून माझी पापे व अवगुण क्षमा करुन माझा आदरच करतील. ॥ २३३ ॥

जौं परिहरहिं मलिन मनु जानी । जौं सनमानहिं सेवकु मानी ॥

मोरें सरन रामहि की पनही । राम सुस्वामि दोसु सब जनही ॥

हवे तर ते माझे मन दूषित समजून माझा त्याग करोत, हवे तर आपला सेवक समजून माझा सन्मान करोत, माझ्यासाठी श्रीरामांच्या पादुकाच मला शरण-स्थान आहेत. श्रीराम हे चांगले स्वामी आहेत. दोष जो आहे तो सर्व मज सेवकाचाच आहे. ॥ १ ॥

जग जस भाजन चातक मीना । नेम पेम निज निपुन नबीना ॥

अस मन गुनत चले मग जाता । सकुच सनेहँ सिथिल सब गाता ॥

जगामध्ये चातक व मासे हेच कीर्तीला पात्र आहेत, तेच नेम आणि प्रेम यांची जपणूक करण्यात निपुण आहेत. असा मनात विचात करीत भरत वाटेने निघाला होता. त्याचे शरीर संकोच व प्रेमाने मलूल झाले होते. ॥ २ ॥

फेरति मनहुँ मातु कृत खोरी । चलत भगति बल धीरज धोरी ।

जब समुझत रघुनाथ सुभाऊ । तब पथ परत जताइल पाऊ ॥

मातेची दुष्टता जणू त्याला मागे ओढत होती, परंतु धैर्य धरुन भरत भक्तीच्या जोरावर पुढे जात होता. जेव्हा श्रीरघुनाथांच्या स्वभावाची आठवण येई, तेव्हा वाटेवर त्याचे पाय जलद जलद पडत होते. ॥ ३ ॥

भरत दसा तेहि अवसर कैसी । जल प्रबाहँ जल अलि गति जैसी ॥

देखि भरत कर सोचु सनेहू । भा निषाद तेहि समयँ बिदेहू ॥

त्यावेळी भरताची दशा अशी होती, जशी पाण्याच्या प्रवाहात भोवर्‍याची असते. भरताची मनःस्थिती व प्रेम पाहून निषादराजसुद्धा देहभान विसरला. ॥ ४ ॥

दोहा—लगे होन मंगल सगुन सुनि गुनि कहत निषादु ।

मिटिहि सोचु होइहि हरषु । पुनि परिनाम बिषादु ॥ २३४ ॥

मंगल शकुन होऊ लागले. ते ऐकून व विचार करुन निषादराज म्हणाला की, ‘ चिंता दूर होईल, हर्ष होईल पण शेवटी दुःख होईल.’ ॥ २३४ ॥

सेवक बचन सत्य सब जाने । आश्रम निकट जाइ निअराने ॥

भरत दीख बन सैल समाजू । मुदित छुधित जनु पाइ सुनाजू ॥

भरताने गुहाचे सर्व बोलणे खरे मानले व तो आश्रमाजवळ जाऊन पोहोचला. तेथील वने व पर्वतांचे समूह पाहिले, तेव्हा भरताला इतका आनंद झाला की, जणू एखाद्या भुकेलेल्याला चविष्ट अन्न मिळावे. ॥ १ ॥

ईति भीति जनु प्रजा दुखारी । त्रिबिध ताप पीड़ित ग्रह मारी ॥

जाइ सुराज सुदेस सुखारी । होहिं भरत गति तेहि अनुहारी ॥

ज्याप्रमाणे ईतीच्या भीतीने दुःखी झालेली आणि त्रितापांनी व क्रूर ग्रहांनी आणि महामारींनी पिडलेली प्रजा एखाद्या उत्तम प्रदेशात व उत्तम राज्यात गेल्यावर सुखी होते, अगदी तशीच दशा भरताची झाली होती. ॥ २ ॥

( अतिवृष्टी, दुष्काळ, उंदरांचा उपद्रव, टोळधाडी, पक्षी व इतर राजांचे आक्रमण या शेतीच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल असलेल्या उपद्रवांना ‘ ईती ‘ असे म्हणतात. )

राम बास बन संपति भ्राजा । सुखी प्रजा जनु पाइ सुराजा ॥

सचिव बिरागु बिबेकु नरेसू । बिपिन सुहावन पावन देसू ॥

श्रीरामांच्या निवासामुळे वन-संपदा अशी शोभून दिसत होती की, जणू चांगला राजा मिळाल्याने प्रजा सुखी होते. शोभिवंत वन हा पवित्र देश होता आणि विवेक हा त्याचा राजा होता आणि वैराग्य हा त्याचा मंत्री होता. ॥ ३ ॥

भट जम नियम सैल रजधानी । सांति सुमति सुचि सुंदर रानी ॥

सकल अंग संपन्न सुराऊ । राम चरन आश्रित चित चाऊ ॥

यम, नियम हे योद्धे होते. पर्वत ही राजधानी होती. शांती व सुबुद्धी या दोन सुंदर राण्या होत्या. विवेकरुपी श्रेष्ठ राजा हा राज्याच्या सर्व अंगांनी परिपूर्ण होता आणि श्रीरामचंद्रांच्या चरणांचा आश्रित असल्यामुळे त्याच्या मनात आनंद होता. ॥ ४ ॥

( स्वामी, अमात्य, सुहृद, कोष, राज्य, दुर्ग व सेना ही राज्याची सात अंगे होत. )        

दोहा—जीति मोह महिपालु दल सहित बिबेक भुआलु ।

करत अकंटक राजु पुरँ सुख संपदा सुकालु ॥ २३५ ॥

मोहरुपी राजाला सेनेसह जिंकून विवेकरुपी राजा निष्कंटक राज्य करीत होता. त्याच्या नगरात सुख, संपत्ती व सुकाळ भरलेला होता. ॥ २३५ ॥

बन प्रदेस मुनि बास घनेरे । जनु पुर नगर गाउँ गन खेरे ॥

बिपुल बिचित्र बिहग मृग नाना । प्रजा समाजु न जाइ बखाना ॥

वनरुपी प्रांतांमध्ये मुनींची जी पुष्कळ निवासस्थाने आहेत. तीच जणू शहरे, नगरे, गावे आणि खेड्यांचे समूह होत. पुष्कळ प्रकारचे पक्षी आणि अनेक अनेक पशू हे जणू प्रजा होत. त्यांचे वर्णन करणे कठीण. ॥ १ ॥

खगहा करि हरि बाघ बराहा । देखि महिष बृष साजु सराहा ॥

बयरु बिहाइ चरहिं एक संगा । जहँ तहँ मनहुँ सेन चतुरंगा ॥

गेंडे, हत्ती, सिंह, वाघ, डुक्कर, रेडे व बैल पाहून राजाच्या समृद्धीची प्रशंसा करीत राहावे, असे वाटे. हे सर्व प्राणी आपापसातील वैरभाव सोडून सर्वत्र बरोबर फिरत होते, जणू ती चतुरंग सेना होय. ॥ २ ॥

झरना झरहिं मत्त गज गाजहिं । मनहुँ निसान बिबिधि बिधि बाजहिं ॥

चक चकोर चातक सुक पिक गन । कूजत मंजु मराल मुदित मन ॥

पाण्याचे झरे वाहात होते आणि हत्ती धुंदीमध्ये चीत्कार करीत होते. ते म्हणजे तेथे अनेक प्रकारचे वाजणारे नगारे होते. चक्रवाक, चकोर, चातक. पोपट आणि कोकिळ यांचे थवे आणि सुंदर हंस प्रसन्न चित्ताने किलबिलाट करीत होते. ॥ ३ ॥

अलिगन गावत नाचत मोरा । जनु सराज मंगल चहु ओरा ॥

बेलि बिटप तृन सफल सफूला । सब समाजु मुद मंगल मूला ॥

भ्रमरांचे थवे गुंजारव करीत होते आणि मोर नाचत होते. जणू या उत्कृष्ट राज्यात चोहीकडे मांगल्य पसरले होते. वेली, वृक्ष, तृण हे सर्व फळा-फुलांनी डवरले होते. सर्व समाज आनंदाचे व मांगल्याचे मूळ बनून गेला होता. ॥ ४ ॥

दोहा—राम सैल सोभा निरखि भरत हृदयँ अति पेमु ।

तापस तप फलु पाइ जिमि सुखी सिरानें नेमु ॥ २३६ ॥

श्रीरामांच्या पर्वताची शोभा पाहून भरताच्या मनात अत्यंत प्रेम दाटून आले. तपस्वी पुरुष नियमांचे पारणे झाल्यावर तपस्येचे फळ मिळाल्याने आनंदित होतो, त्याप्रमाणे, ॥ २३६ ॥

मासपारायण, विसावा विश्राम

नवाह्नपारायण, पाचवा विश्राम

तब केवट ऊँचें चढ़ि धाई । कहेउ भरत सन भुजा उठाई ॥

नाथ देखिअहिं बिटप बिसाला । पाकरि जंबु रसाल तमाला ॥

मग निषादराज धावत जाऊन उंच चढला आणि हात वर करुन म्हणू लागला, ‘ हे नाथ, हे जे पिंपरी, जांभळे, आंबे व तमालाचे वृक्ष दिसत आहेत,’ ॥ १ ॥

जिन्ह तरुबरन्ह मध्य बटु सोहा । मंजु बिसाल देखि मनु मोहा ॥

नील सघन पल्लव फल लाला । अबिरल छाहँ सुखद सब काला ॥

ज्या श्रेष्ठ वृक्षांमध्ये एक सुंदर व विशाल वटवृक्ष शोभत आहे, ज्याला पाहून मन मोहून जाते, ज्याची पाने निळसर व दाट आहेत आणि ज्याला लाल फळे लागलेली आहेत, ज्याची दाट सावली ही सर्व ऋतूंमध्ये सुखकर असते. ॥ २ ॥

मानहुँ तिमिर अरुनमय रासी । बिरची बिधि सँकेलि सुषमा सी ।

ए तरु सरित समीर गोसॉंई । रघुबर परनकुटी जहँ छाई ॥

जणू ब्रह्मदेवांनी परम शोभा एकत्र करुन अंधकार आणि लालिमा यांची रास रचली होती, असे हे वृक्ष नदीजवळ आहेत आणि हे राजकुमार ! तेथेच श्रीरामांची पर्णकुटी आहे. ॥ ३ ॥

तुलसी तरुबर बिबिध सुहाए । कहुँकहुँसियँ कहुँलखन लगाए ।

बट छायॉं बेदिका बनाई । सियँ निज पानि सरोज सुहाई ॥

तेथे तुळशीची अनेक झाडे शोभत आहेत. कुठे सीतेने तर कुठे लक्ष्मणाने ती लावलेली आहेत. याच वटवृक्षाच्या सावलीमध्ये सीतेने आपल्या कर-कमलांनी सुंदर चबुतरा बनविला आहे. ॥ ४ ॥

दोहा—जहॉं बैठि मुनिगन सहित नित सिय रामु सुजान ।

सुनहिं कथा इतिहास सब आगम निगम पुरान ॥ २३७ ॥

तेथे ज्ञानी श्रीराम मुनिवृंदांसमवेत बसून नित्य शास्त्र, वेद आणि पुराणे यांच्या कथा श्रवण करतात.’ ॥ २३७ ॥

सखा बचन सुनि बिटप निहारी । उमगे भरत बिलोचन बारी ॥

करत प्रनाम चले दोउ भाई । कहत प्रीति सारद सकुचाई ॥

मित्राचे बोलणे ऐकून आणि ते वृक्ष पाहून भरताच्या नेत्रांमध्ये पाणी आले. दोघे बंधू प्रणाम करीत पुढे निघाले. त्यांच्या प्रेमाचे वर्णन करण्यास सरस्वतीसुद्धा संकोच पावेल. ॥ १ ॥

हरषहिं निरखि राम पद अंका । मानहुँ पारसु पायउ रंका ॥

रज सिर धरि हियँ नयनन्हि लावहिं । रघुबर मिलन सरिस सुख पावहिं ॥

श्रीरामचंद्रांची चरणचिन्हे पाहून दोघे बंधू असे आनंदित झाले की, जणू एखाद्या दरिद्री मनुष्याला परीस मिळावा. तेथील धूळ मस्तकावर धारण करुन ती त्यांनी आपल्या हृदयाला आणि नेत्रांना लावली. तेव्हा तर त्यांना श्रीराम भेटल्याचाच आनंद झाला. ॥ २ ॥    

देखि भरत गति अकथ अतीवा । प्रेम मगन मृग खग जड़ जीवा ॥

सखहि सनेह बिबस मग भूला । कहि सुपंथ सुर बरषहिं फूला ॥

भरताची ती अत्यंत अवर्णनीय दशा पाहून वनातील पशु, पक्षी व वृक्षादी जड जीव प्रेम-मग्न झाले. अधिक प्रेम-वश झाल्यामुळे निषादराजही रस्ता चुकला. तेव्हा रस्ता दाखवून देव फुले उधळू लागले. ॥ ३ ॥

निरखि सिद्ध साधक अनुरागे । सहज सनेहु सराहन लागे ॥

होत न भूतल भाउ भरत को । अचर सचर चर अचर करत को ॥

भरताच्या प्रेमाची ही दशा पाहून सिद्ध व साधक लोकसुद्धा प्रेममग्न झाले आणि त्याच्या स्वाभाविक प्रेमाची प्रशंसा करु लागले की, जर या पृथ्वीतलावर भरताचा जन्म झाला नसता, तर जडाला चेतन व चेतनाला जड कुणी केले असते ? ( भरताचे प्रेम पाहून जड चेतनासारखे व चेतन जडासारखे स्तब्ध झाले. ) ॥ ४ ॥

दोहा—पेम अमिअ मंदरु बिरहु भरतु पयोधि गँभीर ।

मथि प्रगटेउ सुर साधु हित कृपासिंधु रघुबीर ॥ २३८ ॥

प्रेम हे अमृत आहे, विरह हा मंदराचल आहे आणि भरत हा समुद्र आहे. कृपासागर श्रीरामचंद्रांनी देव आणि साधूंच्या कल्याणासाठी स्वतः या भरतरुपी समुद्राचे विरहरुपी मंदराचलाने मंथन करुन हे प्रेमरुपी अमृत प्रकट केले आहे. ॥ २३८ ॥

सखा समेत मनोहर जोटा । लखेउ न लखन सघन बन ओटा ॥

भरत दीख प्रभु आश्रमु पावन । सकल सुमंगल सदनु सुहावन ॥

मित्र निषादराजासोबत येत असलेल्या या सुंदर जोडीला दाट वनाच्या आडून लक्ष्मण पाहू शकला नाही. भरताने प्रभू श्रीरामचंद्रांचा सर्व मांगल्याचे धाम, सुंदर व पवित्र असलेला आश्रम पाहिला. ॥ १ ॥

करत प्रबेस मिटे दुख दावा । जनु जोगीं परमारथु पावा ॥

देखे भरत लखन प्रभु आगे । पूँछे बचन कहत अनुरागे ॥

आश्रमात प्रवेश करताच भरताचे दुःख व दाह नाहीसे झाले. जणू योग्याला परमार्थच गवसला. भरताला दिसले की, लक्ष्मण प्रभूंच्यासमोर उभा राहून विचारलेल्या प्रश्नांची प्रेमाने उत्तरे देत होता. ॥ २ ॥      

सीस जटा कटि मुनि पट बॉंधें । तून कसें कर सरु धनु कॉंधें ॥

बेदी पर मुनि साधु समाजू । सीय सहित राजत रघुराजू ॥

त्याच्या डोक्यावर जटा होत्या. कमरेला वल्कले नेसलेली होती आणि त्यानांच बाणांचा भाता बांधला होता. हातात बाण व खांद्यावर धनुष्य होते. वेदीवर मुनी व साधु-समाज बसला होता आणि तेथे श्रीराम सीतेसह विराजमान होते. ॥ ३ ॥

बलकल बसन जटिल तनु स्यामा । जनु मुनिबेष कीन्ह रति कामा ॥

कर कमलनि धनु सायकु फेरत । जिय की जरनि हरत हँसि हेरत ॥

श्रीरामांनी वल्कले परिधान केली होती, जटा धारण

 केल्या होत्या व त्यांचा श्याम रंग होता. सीताराम असे

 वाटत होते की, जणू रतीने व कामदेवाने मुनिवेश धारण

 केला आहे. श्रीराम आपल्या करकमलांत धनुष्य-बाण

 फिरवीत होते, आणि जेव्हा ते हसत, तेव्हा पाहणार्‍याच्या

मनातील दुःख हरण होत होते व त्याला परमानंद व

 शांतता लाभत होती. ॥ ४ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment