Saturday, February 12, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 14 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग १४

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 14 
Ovya 317 to 335 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग १४ 
ओव्या ३१७ ते ३३५

आतां पैं माझेनि एकें अंशें । हें जग व्यापिलें असे ।

यालागीं भेदु सांडूनि सरिसें । साम्यें भज ॥ ३१७ ॥

317) माझ्या एकाच अंशानें हें सर्व जग व्यापलेलें आहे; याकरितां आतां भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीनें मला सर्व ठिकाणीं सारखें भज.

ऐसें विबुघवनवसंतें । तेणें विरक्तांचेनि एकांतें ।

बोलिलें जेथ श्रीमंतें । श्रीकृष्णदेवें ॥ ३१८ ॥

३१८) ज्ञानीपुरुषरुपी वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण, असें जे श्रीमंत श्रीकृष्णदेव, ते याप्रमाणें बोलले.

तेथ अर्जुन म्हणे स्वामी । येतुलें हें रामस्य बोलिलेती तुम्ही ।

जे भेदु एक आणि आम्ही । सांडावा एकीं ॥ ३१९ ॥

३१९) तेव्हां अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून, त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असें आपण अविचारानें बोलतात.

हां हो सूर्य म्हणे काय जगातें । अंधारे दवडा कां परौतें ।

केवीं घसाळ म्हणे देवा तूंते । तरी अधिक हा बोलु ॥ ३२० ॥

३२०) सूर्य काय लोकांना असें म्हणतो की मला यावयाचें आहें, म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा ( सूर्यापुढे जसा अंधार नाहीं तसा तुमच्या स्वरुपापुढे भेद नाहीं; असें असून तुम्ही ‘ भेद टाक ‘ म्हणून अचिचारानें सांगतां ) पण तुम्हांला दांडगे कसें म्हणावें ? कारण तो अधिक प्रसंग होतो.  

तुझें नांवचि एक कोण्ही वेळे । जयांचिये मुखासि कां काना मिळे ।

तयांचिया हृदयातें सांडुनि पळे । भेदु जी साच ॥ ३२१ ॥

३२१) कोणत्याहि वेळीं तुझें नांवच त्यांच्या मुखांत येईल, अथवा कानावर पडेल, त्यांच्या अंतःकरणाला भेद खरोखर टाकून पळतो.  

तो तूं परब्रह्मचि असकें । मज दैवें दिधलासि हस्तोदकें ।

तरी आतां भेदु कायसा कें । देखावा कवणें ॥ ३२२ ॥

३२२) असा जो तूं पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवानें हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणें प्राप्त झाला आहेस; तर आतां भेद हा कसला, कोठें व कोणी पाहावयाचा आहे ?  

जी चंद्रबिंबाचां गाभारां । रिगालियावरीही उबारा ।

परि राणेपणें शार्ङ्गधरा । बोला हें तुम्हीं ॥ ३२३ ॥

३२३) अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागांत प्रवेश केल्यावरहि ‘ उकडतें ‘ असें जर कोणी म्हटले, तर तें शोभेल काय ? परंतु हे श्रीकृष्णा, आपण आपल्या मोठेपणांत असें बोलत आहांत ?  

तेथ सावियाचि परितोषोनि देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें ।

मग म्हणेतुवां न कोपावें । आमुचिया बोला ॥ ३२४ ॥

३२४) त्या वेळीं देवानें सहजच अतिशय संतुष्ट होऊन, अर्जुनाला मनापासून आलिंगन दिलें आणि मग म्हटलें, अर्जुना, आमच्या बोलण्याबद्दल रागावूं नकोस.  

आम्हीं तुज भेदाचिया वाहाणीं । सांगितलीं जे विभूतींची कहाणी ।

ते अभेदें काय अंतःकरणीं । मानिली कीं न मने ॥ ३२५ ॥

३२५) आम्हीं भेदाच्या मार्गानें जी तुला विभूतींची कथा सांगितली तीं अभेदभावानें तुझ्या मनाला पटली की नाहीं,   

हेंचि पहावयालागीं । नावेंक बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं ।

तंव विभूती तुज चांगी । आलिया बोधा ॥ ३२६ ॥

३२६) हेंच पाहण्याकरितां आम्ही क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीनें बोलून पाहिलें, तो आम्हांस असें आढळलें कीं, आम्ही सांगितलेल्या विभूति तुला चांगल्या समजल्या.         

येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें ।

परि देखतसें विश्र्व आघवें । तुवां भरलें ॥ ३२७ ॥

३२७) यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूति समजल्या कीं नाहीं, हें तुमचें तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की, हे सर्व विश्व तुमच्याच स्वरुपानें भरलेले आहे.  

पैं राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला वरैतु ।

या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥ ३२८ ॥

३२८) संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभूतीला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला.

कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल नव्हे दैव दवडणें ।

हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तव आंतुही आंधळा ॥ ३२९ ॥

३२९) संजय हा अंतःकरणांत वाईट वाटून ( मनांत ) म्हणाला, असलें भाग्य आलें असतां तें दडवणें, हें आश्चर्य नाहीं काय ? धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे, असें मला वाटत होतें, पण ( त्यास मी अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असतां हा अगदीं स्तब्ध व उदासीन आहे यावरुन )  मला असें वाटतें कीं हा धृतराष्ट्र जसा चर्मचक्षूंनीं आंधळा आहे, तसा अंतःकरणांतही ज्ञानचक्षूंनी आंधळा आहे.     

परि असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे मानु ।

कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥ ३३० ॥

३३०) ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात, ) पण हें संजयाचे बोलणें राहूं द्या. तो अर्जुना आपल्या हिताचें प्रमाण वाढवीत आहे ( कशावरुन ? ) तर हा विभूतीचा अनुभव त्याला मिळाल्यावरसुद्धा, त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली.

म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां डोळ्याप्रती ॥

इये आर्तीचां पाउलीं मती । उठती जाहली ॥ ३३१ ॥

३३१) अर्जुन आपल्याशीं असे म्हणावयास लागला कीं, हा ( सर्व विश्र्वात एक भगवंताचे स्वरुप व्याप्त आहे ) माझ्या अंतःकरणांतील अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा, अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने उचल घेतली,

मियां इहींच दोहीं डोळा । झोंबावें विश्र्वरुपा सकळा ।

एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ॥ ३३२ ॥

३३२) मीच याच दोन डोळ्यांनी सर्व विश्वरुप पाहावें, एवढी मोठी इच्छा तो दैवानें थोर म्हणून करीत होता.

आजि तो कल्पतरुची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती देखा ।

जें जें येईल तयाचिया मुखा । तें तें साच करीतसे येरु ॥ ३३३ ॥

३३३) आज अर्जुन कल्पतरुची फांदी आहे म्हणून या फांदीला वांझ फुलें येणार नाहींत, असें समजा. जें जें अर्जुन म्हणेल तें तें श्रीकृष्ण परमात्मा खरें करीत आहे.

जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।

तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥ ३३४ ॥

३३४) प्रल्हादानें ( माझा नारायण सर्व पदार्थांत व्याप्त आहे असें हिरण्यकश्यपूस ) सांगितल्याकारणानें तो विषाहिसकट सर्व पदार्थ आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरु लाभला होता.

म्हणोनि विश्र्वरुप पुसावयालागीं । पार्थ रिगता होईल कवणे भंगीं ।

तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा ॥ ३३५ ॥

३३५) म्हणून मला विश्वरुप दाखवा, हें श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीनें सरसावेल तें मी पुढल्या प्रसंगी सांगेन, असें निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.                  

इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥

( श्लोक ४२; ओव्या ३३५ ) श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥ 



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 13श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग १३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 13 
Ovya 300 to 316 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग १३ 
ओव्या ३०० ते ३१६

मूळ श्लोक

न तदस्ति विना यत् स्यान् मया भूतं चराचरम् ॥ ३९ ॥

३९) हे अर्जुना, या सर्व भूतांचे जें बीज तें मी आहें, स्थावरजंगम अशी कोणतीहि वस्तू नाहीं कीं, जी माझ्यावांचून ( अस्तित्वात ) असूं शकेल.     

नान्तोऽस्ति मम दिव्यानां विभूतीनां परंतप ।

एष तूद्देशतः प्रोक्तो विभूतेर्विस्तरो मया ॥ ४० ॥

४०) हे शत्रूतापना, माझ्या दिव्य विभूतींचा अंत नाहीं. हा विभूतींचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे.

पैं पर्जन्याचिया धारां । वरी लेख करवेल धनुर्धरा ।

कां पृथ्वीचिया तृणांकुरां । होईल ठी ॥ ३०० ॥

३००) अर्जुना, पावसाच्या धारांची गणाना करतां येईल काय ? अथवा पृथ्वीवर उगवणार्‍या गवताचे अंकुर किती आहेत, याचा निश्चय करतां येईल काय ?

पैं महोदधीचिया तरंगां । व्यवस्था धरुं नये जेवीं गा ।

तेवीं माझिया विशेष लिंगां । नाहीं मिती ॥ ३०१ ॥

३०१) अर्जुना, महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणें ठेवता येणार नाहीं, त्याप्रमाणें  माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाहीं. 

ऐशियाही सातपांच प्रधाना । विभूती सांगितलिया तुज अर्जुना ।

तो हा उद्देशु जो गा मना । आहाच गमला ॥ ३०२ ॥

३०२) माझ्या मुख्य विभूतींना पार नाहीं असें जरी आहे, तरी तुझ्या विचारण्यावरुन आम्हीं तुला पंचाहत्तर मुख्य विभूति सांगितल्या; पण हें आमचें जें थोडक्यांत विभूति सांगणे, ते अर्जुना, आमच्या मनाला वरवरचे वाटतें. 

येरां विभूतिविस्तारांसि कांहीं । एथ सर्वथा लेख नाहीं ।

म्हणौनि परिससीं तूं काई । आम्ही सांगों किती ॥ ३०३ ॥

३०३) बाकीच्या आमच्या विभूतीविस्ताराला येथें मुळींच कांहीं मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व तूं ऐकणार काय ?

यालागीं एकिहेळां तुज । दाऊं आतां वर्म निज ।

सर्वभूतांकुरें बीज । विरुढत असे तें मी ॥ ३०४ ॥

३०४) याकरितां आम्ही आपलें वर्म आतां तुला एकदम सांगतों. तें असें की, सर्व प्राणिरुप अंकुरानें वाढणारें जें बीज तें मी आहे.

म्हणोनि सानें थोर न म्हणावें । उंच नीच भाव सांडावे ।

एक मीचि ऐसें मानावें । वस्तुजातातें ॥ ३०५ ॥

३०५) एवढ्याकरितां लहानमोठें अशी निवड करुं नये. अधिकउणी अशी योग्यतेची कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत, त्या मीच एक आहे, असें समजावे.

तरी यावरी साधारण । आईक पां आणिकही खुणा ।

तरी अर्जुना ते तूं जाण । विभूति माझी ॥ ३०६ ॥

३०६) अर्जुना, यापेक्षांहि सर्वसामान्य आणखी एक खूण आहे. ती ऐक. त्यावरुन ती माझी विभूति आहे असें तूं समज.

मूळ श्लोक

यद्यद्विभूतिमत्वत्त्वं श्रीमदूर्जितमेव वा ।

तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोंऽशसंभवम् ॥ ४१ ॥

४१) जी जी वस्तु वैभवानें, संपत्तीनें अथवा उदारतेनें युक्त असेल, ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे, असें जाण.

जेथ जेथ संपत्ति आणि दया । दोन्ही वसती आलिया असती ठाया ।

ते ते जाण धनंजया । विभूती माझी ॥ ३०७ ॥

३०७) अर्जुना, ज्या ज्या ( पुरुषाच्या ) ठिकाणीं ऐश्वर्य आणि दया हीं दोन्ही राहावयास आलेलीं असतील, तो तो पुरुष माझी विभूति आहे असे समज.  

अथवा बहुनैतेन किं ज्ञातेन तवार्जुन ।

विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो  जगत् ॥ ४२ ॥

४२) अथवा हे अर्जुना, हें ( प्रत्येक वस्तूचें ) वेगवेगळें ज्ञान तुला काय करावयाचें ? ( कारण असा तूं मला कोठवर जाणशील ? तर थोडक्यांत सांगतों ) मी आपल्या एकाच अंशानें हें सर्व विश्व व्यापून राहिलों आहें.

अथवा एकलें एक बिंब गगनीं । तरी प्रभा फांके त्रिभुवनीं ।

तेवीं एकाक्रियाची सकळ जनीं । आज्ञा पाळिजे ॥ ३०८ ॥

३०८) अथवा, सूर्यबिंब जसें आकाशांत एकटें एकच असतें, पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यांत पसरतो, त्याप्रमाणें या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात.  

तयांते एकलें झणी म्हण । ते निर्धन या भाषा नेण ।

काय कामधेनूसवें सर्व साहान । चालत असे ॥ ३०९ ॥

३०९) त्या पुरुषांना तूं कदाचित एकटें असें म्हणशील, तर असें म्हणूं नकोस. ते निर्धन आहेत असें समजूं नकोस. ( जरी त्यांच्याजवळ साधनें प्रत्यक्ष दिसली नाहींत; तरी ती त्यांच्या अंगभूत आहेतच.) कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते कीं काय ?

तियेतें जें जेधवां जो मागे । तें ते एकसरेंचि प्रसवों लागे ।

तेवीं विश्र्वविभव तया अंगें । होऊनि आहाति ॥ ३१० ॥

३१०) तिच्याजवळ जो जें जेव्हां मागेल, तें ती एकदम प्रसवूं लागते. त्याप्रमाणें विश्वांतील ऐश्वर्यें त्यांच्या अंगभूत होऊन राहातात.    

तयातें वोळखावया हेचि संज्ञा । जे जगें नमस्कारिजे आज्ञा ।

ऐसें आथि ते जाण प्राज्ञा । अवतार माझे ॥ ३११ ॥

३११) त्यांना ओळखायची खूण हीच कीं, त्यांची आज्ञा जगाला शिरसावंद्य असते. बुद्धिवान् अर्जुना, असे जे आहेत, ते माझे अवतार समज.

आतां सामान्य विशेष । हें जाणणें एथ महादोष ।

कां जे मीचि एक अशेष । विश्र्व आहे म्हणोनि ॥ ३१२ ॥

३१२) आतां हें संपूर्ण विश्व मीच आहें म्हणून या विश्वांत एक साधारण व मुख्य, अशी निवड करणें म्हणजें मोठे पाप आहे.

तरी आतां साधारण आणि चांगु । ऐसा कैसेनि पां कल्पावा विभागु ।

वायां आपुलियेचि मती वंगु । भेदाचा लावावा ॥ ३१३ ॥   

३१३) तर आतां एक साधारण व एक चांगला असा भेद कसा कल्पावा ? आपल्याच बुद्धीनें माझ्या ठिकाणीं भेदाचा कलंक व्यर्थ कां लावावा ?   

एर्‍हवी तरी तूप कासया घुसळावें । अमृत का रांधूनि अर्धे करावें ।

हा गां वायूसि काय डावें--। उजवें अंग आहे ॥ ३१४ ॥

३१४) नाहीं तर तूप कशाला घुसळावयाचें ? अमृताला शिजवून काय अर्धे करावयाचें ? बाबा अर्जुना, वार्‍याला उजवें डावें असें वेगवेगळें अंग आहे काय ?  

पैं सूर्यबिंबासि पोट पाठीं । पाहतां नासेल आपुली दिठी ।

तेवीं माझां स्वरुपी गोठी । सामान्यविशेशाची नाहीं ॥ ३१५ ॥

३१५) सूर्यबिंबाला पोटपाठ आहे का म्हणून पाहावयास गेलें तर, आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल; त्याप्रमाणें माझ्या स्वरुपाच्या ठिकाणीं सामान्यविशेषाची नुसती गोष्टहि नाहीं.

आणि सिनाना विभूति । मज अपारातें मविसील किती ।

म्हणोनि किंबहुना सुभद्रपती । असो हें जाणणें ॥ ३१६ ॥

३१६) आणि निरनिराळ्या विभूतींद्वारां अमर्याद जो मी, त्या

 मला किती मोजशील ? यास्तव अर्जुना, फार बोलून काय

 करावयाचें आहे ? हा विभूति जाणण्याचा प्रकार राहूं दे.

  


Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 12 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग १२

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 12 
Ovya 281 to 299 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग १२ 
ओव्या २८१ ते २९९

मूळ श्लोक

बृहत् साम तथा साम्नां गायत्री छन्दसामहम् ।

मासानां मार्गशीर्षोऽहमृतूनां कुसुमाकरः ॥ ३५ ॥

३५) तसेंच ( चौदा सामांमध्ये बृहत् साम मी आहें, मासांमधें मार्गशीर्ष मास मी आहें;  ऋतुंमध्ये वसंत ऋतु मी आहे.

वेदराशीचिया सामा--। आंत बृहत्साम जे प्रियोत्तमा ।

तें मी म्हणे रमा- - । प्राणेश्र्वरु ॥ २८१ ॥

२८१) अत्यंत आवडत्या अर्जुना, वेदांमध्ये असलेल्या रथंतरादि सामांमध्ये बृहत्साम, ही माझी विभूति आहे, असें लक्ष्मीचा पति श्रीकृष्ण म्हणाला.    

गायत्री छंद जें म्हणिजे । तें सकळां छंदांमाजि माझें ।

स्वरुप हें जाणिजे । निभ्रांत तुवां ॥ २८२ ॥

२८२) ज्यास गायत्री छंद असें म्हणतात, तो सर्व छंदामध्यें माझे स्वरुप आहे, असें तूं निःसंशय सनज.

मासांआंत मार्गशीरु । तो मी म्हणे शार्ङ्गधरु ।

ऋतूंमाजीं कुसुमाकरु । वसंतु तो मी ॥ २८४ ॥   

२८३) सर्व महिन्यांमध्यें मार्गशीर्ष नांवाचा महिना, तो मी आहें, असें शार्ङ्गधर श्रीकृष्ण म्हणाले. सहा ऋतूंमध्यें पुष्पांची खाण जो वसंत ऋतु तो मीच आहें.    

मूळ श्लोक

द्यूतं छलयतामस्मि तेजस्तेजस्विनामहम् ।

जयोऽस्मि व्यवसायोङस्मि सत्त्वं सत्त्ववतामहम् ॥ ३६ ॥

३६) छलन करणार्‍या वस्तूंमध्यें द्यूत मी आहें, तेजस्वी पदार्थांमधील तेज मी आहें, सिद्धि मी आहें, उद्योग मी आहें. सात्त्विक वस्तूंमध्यें सत्त्व मी आहें.

वृष्णीनां वासुदेवोऽस्मि पाण्डवानां धनञ्जयः ।

मनीनामप्यहं व्यासः कवीनामुशना कविः ॥ ३७ ॥

३७) यादवांमध्यें श्रीकृष्ण मी आहें. पाण्डवांमध्यें धनंजय मी आहें, मुनींमध्यें व्यास मुनी मी आहें, कवींमध्यें शुक्राचार्य मी आहें.

छळितयां विंदाणा--। माजी जूं तें मी विचक्षणा ।

म्हणोनि चोहटां चोरी परि कवणा । निवारुं न ये ॥ २८४ ॥

२८४) हे चतुर अर्जुना, कपटकारक कारस्थानांमध्यें जुगार ती माझी विभूति आहे;  म्हणून उघड उघड चव्हाट्यावर जरी चोरी होते, तरी कोणास निवारण करतां येत नाही.  

अगा अशेषांही तेजसां—। आंत तेज ते मी भरवंसा ।

विजयो मी कार्योद्देशां । सकळांमाजीं ॥ २८५ ॥

२८५) अर्जुना, एकूणएक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारें जें तेज; तें मी आहें, अशी खात्री असूं दे. मी सर्व व्यवहारांतील उद्दिष्टांमध्यें विजय ( हातात घेतलेल्या कामांत येणारें यश ) आहे.  

जेणें चोखळ दिसे न्याय । तो व्यवसायांत व्यवसाय ।

माझेंचि स्वरुप हें राय । सुरांचा म्हणे ॥ २८६ ॥

२८६) सर्व उद्योगांत ज्या उद्योगानें शुद्ध न्याय दिसतो, ( म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाहीं ) तो माझेंच स्वरुप आहे, असें सर्व देवांचे राजे भगवान म्हणाले.  

सत्त्वाथिलियांआंतु । सत्त्व मी म्हणे अनंतु ।

यादवमाजीं  श्रीमंतु । तोचि तो मी ॥ २८७ ॥

२८७) सत्त्वगुणसंपन्नांमध्यें जें सत्त्व आहे, तें मी आहें, असें अनंत म्हणाला; आणि यदुकुळांतील पुरुषंमध्ये ऐश्र्वर्यनवान जो कृष्ण तोच तो मी आहे.      

जो देवकीवसुदेवास्तव जाहला । कुमारीसाठीं गोकुळी गेला !

तो मी प्राणासकट पियाला । पूततेनें ॥ २८८ ॥

२८८) जो देवकी वसुदेवांपासून जन्मास आलेला व जो योगमाया नांवाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली गोकुळांत गेलेला त्या मी कृष्णाने पूतना राक्षसीचें तिच्या प्राणासह शोषण केले

नुघडतां बाळपणाची फुली । जेणें मियां अदानवी सृष्टि केली ।

करिं गिरि धरुनि उमाणिली । महेंद्रमहिमा ॥ ८९ ॥

२८९) बाळपणची दशा संपली नाहीं तोंच, ज्या मी दैत्यरहित सृष्टि केली आणि करांगुळीवर गोवर्धन पर्वत धारण करुन इंद्राचा थोरपणा मोडून टाकला ( म्हणजे इंद्राचा गर्व हरण केला ) 

कालिंदीचे  हृदयशल्य फेडिलें । जेणें मियां जळत गोकुळ राखिलें ।

वासरुवांसाठीं लाविलें । विरंचीस पिसें ॥ २९० ॥

२९०) यमुनेला हृदयांत काट्याप्रमाणे सलणारा ( जो कालिया नाग ) त्याचा नाश केला. ज्या मीं दावाग्नीपासून जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केलें व ब्रह्मदेवानें गायींवासरें व गोपाळ यांचें हरण केलें असतांना त्यांच्यासारखे दुसरे गोपाळ, गायीं, वासरें वगैर आपण बनून ) ब्रह्मदेवास वेड लावलें;     

प्रथमदशेचिये पहांटे--। माजी कंसाऐशीं अचाटें ।

महाधेंडीं अवचटें । लीळाचि नासिलीं ॥ २९१ ॥

२९१) बाल्यावस्थेंच्या सुरवातीलाच कंसासारखी अचाट मोठाली            धेंडे अकस्मात सहज नाहींशी केली.          

हें काहय कितीएक सांगावें । तुवांही देखिलें ऐकिलें असे आघवें ।

तरि यादवांमाजी जाणावें । हेंचि स्वरुप माझें ॥ २९२ ॥

२९२) हें एक एक वेगळें किती सांगणार ? हें सर्व तूंदेखील पाहिलेलें व ऐकलेलें आहेस. तर यादवांमध्ये हेंच ( कृष्ण ) माझें स्वरुप आहे, असे समज.

आणि सोमवंशीं तुम्हां पांडवां--। माजीं अर्जुन तो मी जाणावा ।

म्हणोनि एकमेकांचिया प्रेमभावा । विघडु न पडे ॥ २९३ ॥

२९३) आणि सोमवंशामधील तुम्हां पांडवांमध्यें जो तूं अर्जुन, तो मी आहे, असें समज. म्हणून तुमच्या आमच्या परस्रांमधील स्नेहसंबंधामध्ये बिघाड येत नाहीं.

संन्यासी तुवां होऊनि जनीं । चोरुनि नेली माझी भगिनी ।

तर्‍ही विकल्प नुपजे मनीं । मी तूं दोन्ही स्वरुप एक ॥ २९४ ॥

२९४) या लोकांमध्यें तूं संन्यासी होऊन माझी बहीण चोरुन नेलीस, तर माझ्या मनांत कांहीं विकल्प उत्पन्न झाला नाही; कारण मी व तूं दोघेहि एकरुप आहोंत.  

मुनींआंत व्यासदेवो । तो मी म्हणे यादवरावो ।

कवीश्र्वरांमाजीं धैर्या रावो । उशनाचार्य मी ॥ २९५ ॥

२९५) सर्व मुनींमध्यें जे व्यासदेव ती माझी विभूति आहे, असें यादवश्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले; मोठमोठाल्या पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य माझी विभूति आहे.

मूळ श्लोक

दण्डो दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम् ।

मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम् ॥ ३८ ॥

३८) दमन करणारांचा ( दमनाला साधनीभूत ) दंड मी आहें, जयाची इच्छा करणारांचे नीतिशास्त्र मी आहें, ( सर्व ) गुह्य वस्तूंमध्यें मौन मी आहें, ज्ञानी माणसांचें ज्ञान मी आहें.

अगा दमितयांमाझारीं । अनिवार दंडु तो मी अवधारीं ।

जो मुंगियेलागोनि ब्रह्मावेरीं । नियमित पावे ॥ २९६ ॥

२९६) अर्जुना, नियमन करणार्‍यांमध्यें जें मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचे सारखें नियमन करतें, तें अनिवार्य शासन, ही माझी विभूति आहे, असें समज.

पैं सारासार निर्धारितयां । धर्मज्ञानाचा पक्षु धरितयां ।

सकळशास्त्रांमाजीं ययां । नीतिशास्त्र तें मी ॥ २९७ ॥

२९७) सारासार विचार करणार्‍या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणार्‍या सगळ्या शास्त्रांमध्ये नितिशास्त्र तें मी आहे.

आघवियाची गूढां--। आंतु मौन तें मी सुहाडा ।

म्हणोनि न बोलतयां पुढां । स्रष्टाही नेण होय ॥ २९८ ॥

२९८) हे राजा अर्जुना, सर्व गुह्यांमध्यें मौन, तें मी आहें म्हणून न बोलणारांपुढें ब्रह्मदेवहि अज्ञानी होतो. 

अगा ज्ञानियांचां ठायीं । ज्ञान तें मी पाहीं ।

आतां असो हें ययां कांहीं । पार न देखों ॥ २९९ ॥

२९९) अर्जुना, ज्ञानवान पुरुषाच्या ठिकाणी असणारे जें ज्ञान, ती माझी विभूति आहें, असें समज. आतां हें राहूं दे. या विभूतिंचा कांहीं अंतच दिसत नाहीं.   



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 11 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ११

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 11 
Ovya 259 to 280 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ११ 
ओव्या २५९ ते २८०

मूळ श्लोक

सर्गाणामादिरन्तश्च मध्यं चैवाहमर्जुन ।

अध्यात्मविद्या विद्यानां वादः प्रवदतामहम् ॥ ३२ ॥

३२) हे अर्जुना, सर्व सृष्ट वस्तूंचा आदि, अंत तसाच मध्य मीआहें, विद्यांमध्यें अध्यात्मविद्या मी आहें आणि वादविवाद करणारांचा वाद मी आहें.

अक्षराणामकारोऽस्मि द्वन्द्वः सामासिकास्य च ।

अहमेवाक्षयः कालौ धाताऽहंविश्वतोमुखः ॥ ३३ ॥

३३) अक्षरांमध्यें अकार मी आहें; आणि समासांमध्यें द्वंद्वसमास मी आहें. क्षयरहित काल मी आहें. सर्व जगाला उत्पन्न करणारा विश्वमुखी पुरुष मी आहें.  

जैसीं अवघींचि नक्षत्रें वेंचावीं । ऐसी चाड उपजेल जें जीवीं ।

तैं गगनाची बांधावी । लोथ जेवीं ॥ २५९ ॥

२५९) आकाशांतील एकूणएक नक्षत्रें टिपून घ्यावींत, अशी ज्या वेळेला अंतःकरणांत इच्छा उत्पन्न होईल, त्या वेळेला आकाशाचेंच गाठोडें बांधणें ज्याप्रमाणें बरें;

कां पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा । तरि भूगोलचि काखे सुवावा ।

तैसा विस्तारु माझा पहावा । तरि जाणावें मातें ॥ २६० ॥

२६०) किंवा पृथ्वीच्या परमाणुंची मोजदाद करावी, अशी

 जर इच्छा असेल तर ही सर्व पृथ्वीच बगलेत घालावी,

 त्याप्रमाणे माझी व्याप्ति जर पाहावयाची असेल तर,

 माझेंच ज्ञान करुन घ्यावें.   

जैसें शाखांसी फूल फळ । एकिहेळां वेटाळूं म्हणिजे सकळ ।

तरि उघडुनियां मूळ । जेवीं हातीं घेपे ॥ २६१ ॥

२६१) फांद्यासकट फुलें व फळें ही सर्व एका वेळेंतच हस्तगत व्हावीं, असें जर मनांत असेल, तर जसें त्या झाडाचे एक मूळ उपटून हातात घेतले पाहिजे;

तेवीं माझें विभूतिविशेष । जरी जाणों पाहिजेती अशेष ।

तरी स्वरुप एक निर्दोष । जाणिजे माझें ॥ २६२ ॥

२६२) त्याप्रमाणें माझ्या मुख्य मुख्य विभूति जर सर्वच जाणण्याची इच्छा असेल, तर एकच माझेंच दोषरहित स्वरुप जाणावें.

एर्‍हवीं वेगळालिया विभूती । कायिएक परिससी किती ।

म्हणोनि एकिहेळां महामती । सर्व मी जाण ॥ २६३ ॥

२६३) एर्‍हवीं वेगवेगळ्या विभूति तूं किती ऐकणार ? म्हणून बुद्धिमान् अर्जुना, एकदाच समज कीं, हे सर्व मी आहें. 

मी आघवियेची सृष्टी । आदिमध्यांती किरीटी ।

ओतप्रोत पटीं । तंतु जेवी ॥ २६४ ॥

२६४) ज्याप्रमाणें वस्त्रांमध्ये आडवें उभें एक सुतच भरलेलें असतें, त्याप्रमाणें या सर्व जगाच्या प्रारंभी, मध्यें आणि शेवटी, मीच सर्व भरलेला आहे.  

ऐसिया व्यापका मातें जैं जाणावें । तैं विभूतिभेदें काय करावें ।

परि हे तुझी योग्यता नव्हे । म्हणोनि असो ॥ २६५ ॥

२६५) अशा सर्वव्यापक असलेल्या मला जाणले असतां मग वेगवेगळ्या विभूति सांगून काय करावयाच्या आहेत ?. परंतु, एवढी तुझी योग्यता नाही म्हणून हे असूं दे.   

कां जे तुवां पुसिलिया विभूती । म्हणोनि तिया आईक सुभद्रापती ।

तरी आतां विद्यांमाजीं प्रस्तुती । अध्यात्मविद्या ते मी ॥ २६६ ॥

२६६) किंवा ज्या अर्थी तूं विभूति विचारल्यास त्या अर्थी अर्जुना, मी सांगत आहें, त्या तूं ऐक. तर आतां प्रस्तुत, सर्व विद्यांमध्ये जी अध्यात्म विद्या आहे, ती माझी विभूति आहे.    

अगा बोलतयांचिया ठायीं । वादु तो मी पाहीं ।

जो सकलशास्त्रसंमतें कहीं । सरेचिना ॥ २६७ ॥

२६७) अरे बाबा ! सर्व शास्त्रांचे एकमत होऊन कधींच न संपणारा असा जो वक्त्यांमधील वादविवाद, तो मी आहें असे समज. 

जो निर्वंचूं जातां वाढे । आइकिलियां उत्प्रेक्षे सळु चढे ।

जयावरी बोलतयांचीं गोडें । बोलणीं होती ॥ २६८ ॥

२६८) वादांतील विषयाचा निश्र्चय करुं लागलें असतां, तो वाद वाढतो व जो ऐकला असतां तर्कास जोर येतो व ज्या तर्कावर बोलणारांची गोड भाषणें ( मात्र ) होतात, ( पण निर्णय काहींच लागत नाहीं. )

ऐसा प्रतिपादनामाजीं वादु । तो मी म्हणे गोविंदु ।

अक्षरांआंतु विशदु । अकारु तो मी ॥ २६९ ॥

२६९) याप्रमाणें प्रतिपादनामध्यें जो वाद चालतों, ती माझी विभूति आहे, असें श्रीकृष्ण म्हणाले. सर्व अक्षरांमध्यें स्पष्ट असें ‘ अ ‘ हें अक्षर, ती माझी विभूति आहे.   

पैं गा समासांमाझारीं । द्वन्द्व तो मी अवधारीं ।

मशकालागोनि ब्रह्मावेरीं । ग्रासिता तो मी ॥ २७० ॥

२७०) अर्जुना, सर्व समासांमध्ये द्वंद्व नांवाचा समास, ती माझी विभूति आहे. चिलटापासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांचा ग्रास करणारा जो काल, तो मी आहे.

मेरुमंदारादिकीं सर्वीं । सहित पृथ्वीतें विरवी ।

जो एकार्णवातेंही जिरवी । जेथिंचा तेथें ॥ २७१ ॥

२७१) मेरु, मंदार इत्यादि सर्व पर्वतांसहित पृथ्वीला जो विरवितो, जो जलरुप झालेल्या जगालाहि जेथल्या तेथेंच आटून टाकतो; 

जो प्रळयतेजा देत मिठी । सगळियां पवनातें गिळी किरीटी ।

आकाश जयाचिया पोटीं । सामावलें ॥ २७२ ॥

२७२) जो प्रलयकाळच्या तेजाला ग्रासून अर्जुना, संपूर्ण वार्‍याला गिळून टाकतो आणि हे राहिलेलें आकाशदेखील ज्याच्या पोटांत मावतें; 

ऐसा अपार जो कालु । तो मी लक्ष्मीलीळु ।

मग पुढती सृष्टीचा मेळु । सृजिता तो मी ॥ २७३ ॥ 

याप्रमाणें अमर्याद जो काळ ती माझी विभूति आहे, असें लक्ष्मीशीं लीला करणारा श्रीकृष्ण म्हणाला. मग यानंतर पुन्हां सृष्टीचा जमाव उत्पन्न करणारा जो ब्रह्मदेव माझी विभूति आहे.     

मूळ श्लोक

मृत्युः सर्वहरश्र्चाहमुद्भवश्र्च भविष्यताम् ।

कीर्तिः श्रीर्वाक्च नारीणां स्मृतिर्मेधा धृतिः क्षमा ॥ ३४ ॥

३४) सर्वांचा संहार करणारा मृत्यु मी आहें. ( पुन्हां

 कल्पान्तीं ) उत्पत्ति पावणार्‍या प्राण्यांना उत्पन्न करणारा

 मी आहें. स्त्रीलिंगवाचक वस्तूंमध्ये कीर्ति, संपत्ति, वाणी,

 स्मृति, बुद्धि, धृति आणि क्षमा ( या सात ) मी आहें.

आणि सृजिलिया भूतांतें मीचि घरीं । सकळां जीवनही मीचि अवधारीं ।

शेखीं सर्वांतें या संहारीं । तेव्हां मृत्युही मीचि ॥ २७४ ॥

२७४) आणि उत्पन्न झालेल्या भूतांना धारण करणारा मीच आहे. ऐक, या सर्वांना जीवन मीच आहें.

आतां स्त्रीगणांचां पैकीं । माझिया विभूती सात आणिकी ।

तिया ऐक कवतिकीं । सांगिजतील ॥ २७५ ॥

२७५) आता आणखी माझ्या सात विभूति स्त्रीवर्गांपैकीं आहेत. त्याहि सहजच सांगितल्या जातील, तूं ऐक.

तरी नीच नवी जे कीर्ति । अर्जुना ते माझी मूर्ती ।

आणि औदार्येंसी जे संपत्ती । तेही मीचि जाणें ॥ २७६ ॥

२७६) तरी नेहमी भरभाटींत असलेली जी कीर्ति, अर्जुना, ती माझी विभूति आहे आणि औदार्याची जोड असलेली जी संपत्ति, ती देखिल माझी विभूति आहे, असें समज.

आणि ते गा मी वाचा । जे सुखासनीं न्यायाचां ।

आरुढोनि विवकाचां । मार्गीं चाले ॥ २७७ ॥

२७७) आणि जी वाचा न्यायाच्या सुहासनावर बसून विवेकाच्या वाटेनें चालते, ती वाचा मी आहें.   

देखिलेनि पदार्थें । जे आठवूनि दे मातें ।

ते स्मृतिही पैं एथें । त्रिशुद्धि मी ॥ २७८ ॥

२७८) पदार्थ पाहिल्याबरोबर माझी आठवण करुन देणारी अशी जी स्मृति, ती निश्र्चयेंकरुन येथें मी आहें.

पैं स्वहिता अनुजायिनी । मेधा ते गा मी इये जनीं ।

धृती मी त्रिभुवनीं । क्षमा ते मी ॥ २७९ ॥

२७९) स्वहिताला अनुकूल अशी जी बुद्धि, ती या लोकांमध्ये मी आहें व त्रैलोक्यांत धैर्य व क्षमा मी आहे.

एवं नारींमाझारीं । या सातही शक्ति मीचि अवधारीं ।

ऐसें संसारगजकेसरी । म्हणता जाहला ॥ २८० ॥   

२८०) याप्रमाणें स्त्रीवर्गामध्यें या सातहि शक्ति मीच आहें,

 असें समज; संसाररुपी हत्तीला मारणारा श्रीकृष्णरुपी

 सिंह म्हणाला.   



Custom Search