Shri Dnyaneshwari
आतां पैं माझेनि एकें अंशें
। हें जग व्यापिलें असे ।
यालागीं भेदु सांडूनि
सरिसें । साम्यें भज ॥ ३१७ ॥
317) माझ्या एकाच अंशानें हें सर्व जग व्यापलेलें
आहे; याकरितां आतां भेदभावना टाकून ऐक्यदृष्टीनें मला सर्व ठिकाणीं सारखें भज.
ऐसें विबुघवनवसंतें । तेणें
विरक्तांचेनि एकांतें ।
बोलिलें जेथ श्रीमंतें ।
श्रीकृष्णदेवें ॥ ३१८ ॥
३१८) ज्ञानीपुरुषरुपी
वनाचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण, असें जे श्रीमंत श्रीकृष्णदेव,
ते याप्रमाणें बोलले.
तेथ अर्जुन म्हणे स्वामी ।
येतुलें हें रामस्य बोलिलेती तुम्ही ।
जे भेदु एक आणि आम्ही ।
सांडावा एकीं ॥ ३१९ ॥
३१९) तेव्हां अर्जुन
म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून, त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे, असें आपण
अविचारानें बोलतात.
हां हो सूर्य म्हणे काय
जगातें । अंधारे दवडा कां परौतें ।
केवीं घसाळ म्हणे देवा
तूंते । तरी अधिक हा बोलु ॥ ३२० ॥
३२०) सूर्य काय लोकांना
असें म्हणतो की मला यावयाचें आहें, म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सारा (
सूर्यापुढे जसा अंधार नाहीं तसा तुमच्या स्वरुपापुढे भेद नाहीं; असें असून तुम्ही
‘ भेद टाक ‘ म्हणून अचिचारानें सांगतां ) पण तुम्हांला दांडगे कसें म्हणावें ?
कारण तो अधिक प्रसंग होतो.
तुझें नांवचि एक कोण्ही
वेळे । जयांचिये मुखासि कां काना मिळे ।
तयांचिया हृदयातें सांडुनि
पळे । भेदु जी साच ॥ ३२१ ॥
३२१) कोणत्याहि वेळीं
तुझें नांवच त्यांच्या मुखांत येईल, अथवा कानावर पडेल, त्यांच्या अंतःकरणाला भेद
खरोखर टाकून पळतो.
तो तूं परब्रह्मचि असकें ।
मज दैवें दिधलासि हस्तोदकें ।
तरी आतां भेदु कायसा कें ।
देखावा कवणें ॥ ३२२ ॥
३२२) असा जो तूं पूर्ण
परब्रह्म, तो मला माझ्या दैवानें हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणें प्राप्त झाला
आहेस; तर आतां भेद हा कसला, कोठें व कोणी पाहावयाचा आहे ?
जी चंद्रबिंबाचां गाभारां ।
रिगालियावरीही उबारा ।
परि राणेपणें शार्ङ्गधरा ।
बोला हें तुम्हीं ॥ ३२३ ॥
३२३) अहो महाराज,
चंद्रबिंबाच्या मध्यभागांत प्रवेश केल्यावरहि ‘ उकडतें ‘ असें जर कोणी म्हटले, तर
तें शोभेल काय ? परंतु हे श्रीकृष्णा, आपण आपल्या मोठेपणांत असें बोलत आहांत ?
तेथ सावियाचि परितोषोनि
देवें । अर्जुनातें आलिंगिलें जीवें ।
मग म्हणेतुवां न कोपावें ।
आमुचिया बोला ॥ ३२४ ॥
३२४) त्या वेळीं
देवानें सहजच अतिशय संतुष्ट होऊन, अर्जुनाला मनापासून आलिंगन दिलें आणि मग
म्हटलें, अर्जुना, आमच्या बोलण्याबद्दल रागावूं नकोस.
आम्हीं तुज भेदाचिया
वाहाणीं । सांगितलीं जे विभूतींची कहाणी ।
ते अभेदें काय अंतःकरणीं ।
मानिली कीं न मने ॥ ३२५ ॥
३२५) आम्हीं भेदाच्या
मार्गानें जी तुला विभूतींची कथा सांगितली तीं अभेदभावानें तुझ्या मनाला पटली की
नाहीं,
हेंचि पहावयालागीं । नावेंक
बोलिलों बाहेरिसवडिया भंगीं ।
तंव विभूती तुज चांगी ।
आलिया बोधा ॥ ३२६ ॥
३२६) हेंच
पाहण्याकरितां आम्ही क्षणभर बाह्य दृष्टीच्या रीतीनें बोलून पाहिलें, तो आम्हांस
असें आढळलें कीं, आम्ही सांगितलेल्या विभूति तुला चांगल्या समजल्या.
येथ अर्जुन म्हणे देवें । हें आपुलें आपण जाणावें
।
परि देखतसें विश्र्व आघवें । तुवां भरलें ॥ ३२७ ॥
३२७) यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही
सांगितलेल्या विभूति समजल्या कीं नाहीं, हें तुमचें तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर
म्हणाल तर असा आहे की, हे सर्व विश्व तुमच्याच स्वरुपानें भरलेले आहे.
पैं राया तो पांडुसुतु । ऐसिये प्रतीतीसि जाहला
वरैतु ।
या संजयाचिया बोला निवांतु । धृतराष्ट्र राहे ॥
३२८ ॥
३२८) संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या
अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभूतीला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर
धृतराष्ट्र स्वस्थ राहिला.
कीं संजयो दुखवलेनि अंतःकरणें । म्हणतसे नवल
नव्हे दैव दवडणें ।
हा जीवें धाडसा आहे मी म्हणें । तव आंतुही आंधळा
॥ ३२९ ॥
३२९) संजय हा अंतःकरणांत वाईट वाटून ( मनांत
) म्हणाला, असलें भाग्य आलें असतां तें दडवणें, हें आश्चर्य नाहीं काय ?
धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे, असें मला वाटत होतें, पण ( त्यास मी
अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असतां हा अगदीं स्तब्ध व उदासीन आहे यावरुन ) मला असें वाटतें कीं हा धृतराष्ट्र जसा
चर्मचक्षूंनीं आंधळा आहे, तसा अंतःकरणांतही ज्ञानचक्षूंनी आंधळा आहे.
परि असो हें तो अर्जुनु । स्वहिताचा वाढवितसे
मानु ।
कीं याहीवरी तया आनु । धिंवसा उपनला ॥ ३३० ॥
३३०) ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात, ) पण
हें संजयाचे बोलणें राहूं द्या. तो अर्जुना आपल्या हिताचें प्रमाण वाढवीत आहे (
कशावरुन ? ) तर हा विभूतीचा अनुभव त्याला मिळाल्यावरसुद्धा, त्याला दुसरी एक अचाट
इच्छा उत्पन्न झाली.
म्हणे हेचि हृदयाआंतुली प्रतीती । बाहेरी अवतरो कां
डोळ्याप्रती ॥
इये आर्तीचां पाउलीं मती । उठती जाहली ॥ ३३१ ॥
३३१) अर्जुन आपल्याशीं असे म्हणावयास लागला
कीं, हा ( सर्व विश्र्वात एक भगवंताचे स्वरुप व्याप्त आहे ) माझ्या अंतःकरणांतील
अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा, अशा इच्छेच्या प्रवृत्तीने माझ्या बुद्धीने
उचल घेतली,
मियां इहींच दोहीं डोळा । झोंबावें विश्र्वरुपा सकळा
।
एवढी हांव तो दैवाआगळा । म्हणऊनि करी ॥ ३३२ ॥
३३२) मीच याच दोन डोळ्यांनी सर्व विश्वरुप
पाहावें, एवढी मोठी इच्छा तो दैवानें थोर म्हणून करीत होता.
आजि तो कल्पतरुची शाखा । म्हणोनि वांझोळें न लगती
देखा ।
जें जें येईल तयाचिया मुखा । तें तें साच करीतसे
येरु ॥ ३३३ ॥
३३३) आज अर्जुन कल्पतरुची फांदी आहे म्हणून
या फांदीला वांझ फुलें येणार नाहींत, असें समजा. जें जें अर्जुन म्हणेल तें तें
श्रीकृष्ण परमात्मा खरें करीत आहे.
जो प्रल्हादाचिया बोला । विषाहीसकट आपण जाहला ।
तो सद्गुरु असे जोडला । किरीटीसी ॥ ३३४ ॥
३३४) प्रल्हादानें ( माझा नारायण सर्व पदार्थांत
व्याप्त आहे असें हिरण्यकश्यपूस ) सांगितल्याकारणानें तो विषाहिसकट सर्व पदार्थ
आपण झाला, असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरु लाभला होता.
म्हणोनि विश्र्वरुप पुसावयालागीं । पार्थ रिगता
होईल कवणे भंगीं ।
तें सांगेन पुढिलिये प्रसंगीं । ज्ञानदेव म्हणे
निवृत्तीचा ॥ ३३५ ॥
३३५) म्हणून मला विश्वरुप दाखवा, हें
श्रीकृष्णास विचारावयास अर्जुन कोणत्या पद्धतीनें सरसावेल तें मी पुढल्या प्रसंगी सांगेन,
असें निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
इति
श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे
विभूतियोगो नाम दशमोऽध्यायः ॥
( श्लोक ४२; ओव्या ३३५ )
श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥