Dashak Aakarava Samas Dahava Nispruha Vartanuk
Samas Dahava Nispruha Vartanuk, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Mahant. Mahant and his qualities are described in here.
समास दहावा निस्पृह वर्तणूक
श्रीराम ।
मूर्ख येकदेसी होतो । चतुर सर्वत्र पाहातो ।
जैसा बहुधा होऊन भोगितो । नाना सुखें ॥ १ ॥
१) मूर्ख माणूसआकुंचित दृष्टीनें जीवनाकडे पाहातो. चतुर माणुस सर्वांगीण दृष्टीनें विश्र्वाकडे बघतो. अंतरात्मा ज्याप्रमाणें अनेक जीवांमधें व्यापून निरनिराळी सुखें भोगतो, तसाच चतुर माणूस अनेकांच्या जीवनांत समरस होतो.
तोचि अंतरात्मा महंत । तो कां होईल संकोचित ।
प्रशस्त जाणता समस्त । विख्यात योगी ॥ २ ॥
२) अंतरात्मा हाच महंत आहे. तो कधीं आकुंचित होणार नाहीं. तो अति विशाल, महान आहे. तो सर्व जाणणारा आहे. तोच विख्यात योगी आहे.
कर्ता भोक्ता तत्वता । भूमंडळीं सर्व सत्ता ।
त्यावेगळा त्यास ज्ञाता । पाहेसा कवणु ॥ ३ ॥
३) जगामध्यें खरा कर्ता व भोक्ता अंतरात्माच आहे. सर्व जगावर त्याची सत्ता चालते. तो स्वतः स्वतःला जाणू शकतो. दुसरा कोणी त्यास जाणु शकत नाही.
ऐसें महंतें असावें । सर्व सार शोधून घ्यावें ।
पाहों जातों न संपडावें । येकायेकी ॥ ४ ॥
४) महंतानी या अंतरात्म्यासारखें बनले पाहिजे. सर्व सार तेवढें त्यानें शोधून घ्यावें.कोणी पहायला आल्यास त्यानें सहज सांपडू नये.
कीर्तिरुपें उदंड ख्यात । जाणती लाहान थोर समस्त ।
वेश पाहातां शाश्र्वत । येकहि नाहीं ॥ ५ ॥
५) महंताची कीर्ति सगळीकडे पसरलेली असल्यानें सगळ्या लहान थोर माणसांना त्याची माहिती असते. पण तो कायम एक वेष घालून फिरत नाही.
प्रगट कीर्ति ते ढळेना । बहुत जनास कळेना ।
पाहों जातां आढळेना । काये कैसें ॥ ६ ॥
६) त्याची कीर्ति कधीं कमी होत नाही. पण पुष्कळ लोकांना त्याची माहिती नसते. त्याला शोधायला गेल्यास तो कसा व काय आहे हे ठाऊक नसल्यानें तो सांपडत नाहीं.
वेषभूशण तें दूषण । कीर्तिभूषण तें भूषण ।
चाळणेविण येक क्षण । जाऊंच नेदी ॥ ७ ॥
७) वेष हें कांही माणसाचे खरें भूषण नाही. कीर्ति हे त्याचे खरें भूषण आहे. आपल्या समोरील समस्यांवर त्याचें अखंड मनन चालूं असते.
त्यागी वोळखीचे जन । सर्वकाळ नित्य नूतन ।
लोक शोधून पाहाती मन । परी इच्छा दिसेना ॥ ८ ॥
८) खरा महंत आपली ओळखीची माणसें सोडतो व नवनविन माणसें आपलीशी करुन घेतो. लोक अनेक प्रकारें त्याचें अंतरंग शोधू पाहातात. पण त्यांना त्याच्या अंतर्यामी कोठलीही इच्छा किंवा वासना आढळत नाहीं.
पुर्तें कोणाकडे पाहेना । पुर्तें कोणासीं बोलेना ।
पुर्तें येके स्थळी राहेना । उठोन जातो ॥ ९ ॥
९) मोकळेपणानें तो कोणाकडे पाहात नाही. अघळपघळ तो कोणाशी बोलत नाही. फार काळ एका ठिकाणीं राहात नाही. तो लगेच तेथून निघून जातो.
जातें स्थळ तें सांगेना । सांगितलें तेथें तरी जायेना ।
आपुली स्थिती अनुमाना । येवोंच नेदी ॥ १० ॥
१०) आपण कोठें जाणार हें तो सांगत नाही. सांगितलेंच तर तेथें जाईलच असें नाही. आपण कसें, काय आहोत हे कोणास कळूं देत नाहीं.
लोकीं केलें तें चुकावी । लोकीं भाविलें तें उलथवी ।
लोकीं तर्किलें तें दावी । निर्फळ करुनी ॥ ११ ॥
११) लोकांनी त्याच्याबद्दल केलेला अंदाज चुकवितो. लोकांनी त्याच्याबद्दल केलेली भावना उलटीपालटी करतो. लोकांनी जो तर्क केलेला असेल तो निर्फळ करतो.
लोकांस पाह्याचा आदर । तेथें याचा अनादर ।
लोकसर्वकाळ तत्पर । तेथें याची अनिछ्या ॥ १२ ॥
१२) लोकांना जें पहावयाची हौस असते तें महंताला किरकोळ वाटते. लोकांची मनें ज्या गोष्टींमधें रमतात, त्या गोष्टींची त्याला इच्छाही होत नाही.
एवं कल्पितां कल्पेना । ना तर्कितांहि तर्केना ।
कदापी भावितां भावेना । योगेश्र्वर ॥ १३ ॥
१३) अशा रीतीनें ज्याची स्थिति कल्पनेनें करता येत नाहीं, तर्कानें आकलन होत नाहीं, आणि समजून घ्यावी म्हटलें तर समजत नाहीं, तो खरा योगेश्र्वर महंत होय.
ऐसें अंतर सांपडेना । शरीर ठाईं पडेना ।
क्षणयेक विशंभेना । कथाकीर्तन ॥ १४ ॥
१४) या महंताच्या मनांत काय आहे तें कळत नाहीम. शरीरानें तो एके ठिकाणी सांपडत नाहीम. पण एक क्षणभरदेखील तो भगवंताच्या गुणानुवादाला विसंबत नाही. तो भगवंताचें गुणवर्णन अखंड करीत राहतो.
लोक संकल्प विकल्प करिती ।
ते अवघेचि निर्फळ होती ।
जनाची जना लाजवी वृत्ति । तेव्हां योगेश्र्वर ॥ १५ ॥
१५) त्याच्याबद्दल लोक अनेक तर्कवितर्क करतात. पण तो सगळें खोटे ठरवतो. असें झाल्यानें लोकांना आपल्या तर्कवितर्काबद्दल लाज वाटते. असें ज्याच्या बाबतींत घडते तो महंत खरा योगेश्र्वर समजावा.
बहुतीं शोधून पाहिलें । बहुतांच्या मनास आलें ।
तरी मग जाणावें साधिलें । महत्कृत्य ॥ १६ ॥
१६) महंतानें नव्यानें आरंभलेल्या कार्याबद्दल प्रथम लोकांच्या मनांत अश्रद्धा असते. लोक बारकाईनें तपासून पाहातात. पुष्कळ माणसांना तें पटलें, आवडलें कीं, आनेक माणसें त्या कार्यांत भाग घेतात. असें घडून आलें म्हणजें फार मोठें कार्य साधलें असें समजावें.
अखंड येकांत सेवावा । अभ्यासचि करीत जावा ।
काळ सार्थकचि करावा । जनासहित ॥ १७ ॥
१७) महंतानें अधूनमधून एकांतात जावें. ध्यान धारणा व ग्रंथांचा अभ्यास चालूं ठेवावा. लोकांना मार्गाला लावून त्यांचा व आपला काळ सार्थकीं लावावा.
उत्तम गुण तितुके घ्यावे । घेऊन जनास सिकवावे ।
उदंड समुदाये करावे । परी गुप्तरुपें ॥ १८ ॥
१८) आपण स्वतः उत्तम गुण घ्यावें आणि लोकांना शिकवावे. मोठे मोठे लोकसमुह बनवावे. पण तें गुप्त असावेत.
अखंड कामाची लगबग । उपासनेस लावावें जन ।
लोक समजोन मग । आज्ञा इच्छिती ॥ १९ ॥
१९) निरंतर कामें करण्याची, उरकण्याची मोठीं घाई असावी. लोकांना भगवंताच्या उपासनेला लावाण्यांत दिरंगाई करुं नये. म्हणजे लोक गुरु म्हणून मान देतात व आज्ञा पाळण्यास तयार असतात.
आधीं कष्ट मग फळ । कष्टचि नाहीं तें निर्फळ ।
साक्षेपेंविण केवळ । वृथापुष्ट ॥ २० ॥
२०) आधीं कष्ट व मग फळ हा जीवनाचा नियम आहे. कष्ट केलें नाहींत तर फळ मिळणार नाहीं. श्रम केल्यावाचून जो निरुद्योगीपणानें जगतो तो ऐतखाऊ समजावा.
लोक बहुत शोधावें । त्यांचे अधिकार जाणावे ।
जाणजाणोन धरावे । जवळ दुरी ॥ २१ ॥
२१) पुष्कळ लोकांचे सूक्ष्म निरिक्षण करावें. त्यांची पात्रता, लायकी ओळखावी व मग त्याच्या त्याच्या लायकीप्रमाणें त्याला जवळ करावें किंवा दूर सारावें.
अधिकारपरत्वें कार्य होतें । अधिकार नस्तां वेर्थ जातें ।
जाणोनि शोधावीं चित्तें । नाना प्रकारें ॥ २२ ॥
२२) ज्याची जी योग्यता असते त्याप्रमाणें त्याच्या शक्तीनें त्याच्याकडून कार्य होते. योग्यता व शक्ती नसेल तर कार्य व श्रम वाया जातात. यासाठीं लायकी ठरवण्यास लोकांचे अंतरंग अनेक प्रकारे तपासून बघावें.
अधिकार पाहोन कार्य सांगणें । साक्षेप पाहोन विश्र्वास धरणें ।
आपला मगज राखणें । कांहींतरी ॥ २३ ॥
२३) माणसाचा अधिकार बघून त्याला झेपेल असें काम त्यास सांगावें. माणसाची ताकद बघून त्याचा विश्वास धरावा. पण हें करत असतांना आपलें मोठेपण, महत्व टिकवून ठेवावें.
हें प्रचितीचें बोलिलें । आधीं केलें मग सांगितलें ।
मानेल तरी पाहिजे घेतलें । कोणीयेकें ॥ २४ ॥
२४) स्वतः अनुभव घेऊन मी हे बोलत आहे. मी हें आधीं केलें व मग जगाला सांगितलें. जर पटलें तर कोणीतरी तसें वागून पाहावें.
महंतें महंत करावे । युक्तिबुद्धीने भरावे ।
जाणते करुन विखरावे । नाना देसीं ॥ २५ ॥
२५) महंतानें दुसरें महंत तयार करावेत. त्यांना युक्ति व बुद्धि शिकवावी. त्यांना ज्ञानसंपन्न करुन देशाच्या निरनिराळ्या भागांत लोकसंग्रहार्थ पाठवून द्यावें.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे निस्पृहवर्तणुकनाम समास दाहावा ॥
Samas Dahava Nispruha Vartanuk
समास दहावा निस्पृह वर्तणूक
Custom Search