Dashak Tisara Samas Pahila JanmaDukha Nirupan
Samas Pahila JanmaDukha Nirupan is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about the pains suffered while taking birth on this earth.
समास पहिला जन्मदुःख निरुपण
श्रीराम ॥
जन्म दुःखाचा अंकुर । जन्म शोकाचा सागर ।
जन्म भयाचा डोंगर । चळेना ऐसा ॥ १ ॥
अर्थ१) जन्म हा दुःखरुपी वृक्षाचा अंकुर आहे. जसा जसा हा अंकुर वाढतो, म्हणजेच वृक्ष होतो तसे तसे दुःखही वाढत जाते. जन्म हा शोकाचा सागर आहे. समुद्र हा जसा नेहमी भरलेला असतो, तसेच मानसाचे जीवन दुःखांनी नेहमी भरलेलेच असते. जन्म हा भय भीतिचा डोंगर आहे. डोंगराप्रमाणेच भय पण हालत नाही.
जन्म कर्माची आटणी । जन्म पातकाची खाणी ।
जन्म काळाची जाचणी । निच नवी ॥ २ ॥
२) जन्म हा केलेल्या कर्माचे फलित आहे. केलेल्या कर्माचा कांही भाग कर्मफलाच्या रुपाने भोगण्यासाठी जन्म आहे. जन्म हे पाप आहे. ईश्र्वराला विसरुन दृश्याच्या ओढीने केलेले कर्म दुःख सुरु करणारे होते. जन्म म्हणजे काळाचा जाच होय. काळ दृश्यामध्ये बदल करतअसतो, असा नवीन बदल व नवा नाश हे काळ घडवून आणत असतो. म्हणजे काळाचा जाचच असतो.
जन्म कुविद्येचे फळ । जन्म लोभाचें कमळ ।
जन्म भ्रांतीचें पडळ । ज्ञानहीन ॥ ३ ॥
३) जन्म हा कुविद्येने (अज्ञानाने मागील जन्मी) जगल्यामुळे होतो. लोभाचे (आसक्ति) फलित जन्म आहे. वासनांच्या आसक्तिमुळे, ज्ञानहीन जगल्यामुळे भ्रांतींतच जीव राहतो व परत जन्म घ्यावा लागतो.
जन्म जिवासी बंधन । जन्म मृत्यासी कारण ।
जन्म हेंचि अकारण । गथागोवी ॥ ४ ॥
४) जन्म म्हणजे जीवाचे बंधन आहे. जन्मामुळे देहप्राप्ती व त्यामुळे देहाच्या सुख-दुःखरुपी मर्यादा यामुळे जीवास बंधन होते. जन्म झाला म्हणजे मृत्यु येणारच. जन्मामुळे जीवाचा ईश्र्वराशी असलेला संबंध तुटतो व नाशीवंत देहाशी संबंध येतो व देहाच्या सुख-दुःखांत तो अडकतो, यामुळे जन्म जीवाच्या गुरफटण्यास कारण होतो.
जन्म सुखाचा विसर । जन्म चिंतेचा आगर ।
जन्म वासनाविस्तार । विस्तारला ॥ ५ ॥
५) जीव ईश्र्वराला विसरल्यामुळे जन्माबरोबर सुखाचाही विसर व चिंतेचा मोठा डोंगर. जीवाची सुख मिळवण्याची धडपड त्याला चिंतेच्या खाईंत लोटते. सुखाच्या धडपडीने निरनिराळ्या वासनांच्या जाळ्यांतून वासना वाढतच जातात.
जन्म जिवाची आवदसा । जन्म कल्पनेचा ठसा ।
जन्म लांवेंचा वळसा । ममतारुप ॥ ६ ॥
६) जन्म जीवाला मी ईश्र्वर आहे ह्या कल्पनेपासून मी देह आहे या कल्पनेवर आणून त्याचे अधःपतन करतो. जन्म म्हणजे मी देहही ममतारुपी डाकिण त्याला अज्ञानांतच ठेवते किंबहुना अज्ञान वाढवते.
जन्म मायेचें मैंदावें । जन्म क्रोधाचें विरावें ।
जन्म मोक्षास आडवें । विघ्न आहे ॥ ७ ॥
७) जन्म म्हणजे मायेने निर्माण केलेली देहबुद्धि म्हणजेच कपट होय. जन्म हे क्रोधाचे फलित होय. जन्मामुळे जीवास मोक्ष मिळविण्याव्या मार्गांतील विघ्न आहे. मायेमुळे देहबुद्धि व देहबुद्धिमुळे अज्ञान व अज्ञानाने मोक्ष नाही.
जन्म जिवाचें मीपण । जन्म अहंतेचा गुण ।
जन्म हेंचि विस्मरण । ईश्र्वराचें ॥ ८ ॥
८) जन्म हा जीवास मी-मी असे मीपण देतो. जन्म अहकांर देतो. तसाच जन्म हा जीवाला ईश्र्वराचे विस्मरण देतो.
जन्म विषयांची आवडी । जन्म दुराशेची बेडी ।
जन्म काळाची कांकडी । भक्षिताहे ॥ ९ ॥
९) जन्म हा जीवांत देहबुद्धि निर्माण करत असल्याने विषयांची आवड निर्माण करतो. कधीही तृप्त न होणार्या वासनांच्यामुळे चुकीच्या आशा व त्यांची बेडी जीवाच्या भोवती पडते. माणसाने काकडी खाणे जितके त्यास सोपे तसेच काळाला माणसाचे शरीर खाणे सहज सोपे असते.
जन्म हाचि विषम काळ । जन्म हेचि वोखटी वेळ ।
जन्म हा अति कुश्र्चीळ । नर्कपतन ॥ १० ॥
१०) जन्म हा वाईट काळ, वाईट वेळ व दुःखरुपी नरकांत पडणे होय. हे सर्व का तर जीव हा जन्मामुळे ईश्र्वराला विसरतो, देहबुद्धिला धरुन जगतो व त्यामुळे त्याला दुःखातच राहावे लागते.
पाहातां शरीराचें मूळ । या ऐसें नाहीं अमंगळ ।
रजस्वलेचा जो विटाळ । त्यामध्यें जन्म यासी ॥ ११ ॥
११) शरीराचे मूळ शोधले तर त्यासारखे अमंगळ काहीच नाही, असे वाटेल. स्त्रीच्या विटाळापासून शरीर तयार होते.
अत्यंत दोष ज्या विटाळा । त्या विटाळाचाचि पुतळा ।
तेथें निर्मळपणाचा सोहळा । केवी घडे ॥ १२ ॥
१२) अतिशय अशुद्ध असा विटाळाचा हा देह. त्याला कितीही शुद्ध करु म्हटले तरी तो शुद्ध होणे कठीण.
रजस्वलेचा जो विटाळ । त्याचा आळोन जाला गाळ ।
त्या गाळाचेंच केवळ । शरीर हें ॥ १३ ॥
१३) स्त्रीचा विटाळ दाट होऊन आळला की त्याचेच शरीर तयार होते.
वरिवरि दिसे वैभवाचें । अंतरीं पोतडें नर्काचें ।
जैसें झांकणे चर्मकुंडाचें । उघडितांच नये ॥ १४ ॥
१४) शरीर वरवर सुंदर दिसले तरी ते एक घाणीने भरलेले पोतेच असते. चांभाराची कातडी पोतडी जशी दुर्गंधयुक्त असते, ती उघडूच नये पण उघडली तर त्या घाणीने, दुर्गंधीने पळून जावेसे वाटते.
कुंड धुतां शुद्ध होतें । यास प्रत्यईं धुईजेतें ।
तरी दुर्गंधी देहातें । शुद्धता नये ॥ १५ ॥
१५) कुंड धुतले तर स्वच्छ होते, देहाला मात्र रोज धुतला (रोज आपण आंघोळ करतोच) तरी त्याची दुर्गंधीने, घाणीने भरलेले शरीर शुद्ध होत नाही.
अस्तीपंजर उभविला । सीरानाडीं गुंडाळिला ।
मेदमांसे सरसाविला । सांदोसांदीं भरुनी ॥ १६ ॥
१६) देह कसा तयार झाला ? तर हाडांचा सापळा उभा केला, तो शिरा, नाड्या यांनी गुंडाळला, सांध्यासांध्यांत चरबी व मांस भरले व देह तयार झाला. अशुद्ध शब्दें शुद्ध नाहीं । तेंहि भरले असे देहीं ।
नाना व्याधी दुःखें तेहि। अभ्यांतरी वसती ॥ १७ ॥
१७) रक्त अशुद्ध ते शुद्ध नसतेच, ते देहांत भरले, निरनिराळे रोग व दुःखे यांनीही या देहांत राहावयास जागा केली आहे.
नर्काचें कोठार भरलें । आंत बाहेरी लिडीबिडिलें ।
मूत्रपोतडे जमलें । दुर्गंधीचें ॥ १८ ॥
१८) शरीर म्हणजे आंतून बाहेरुन घाणीने भरलेले, लडबडलेले नरकाचे कोठारच आहे. मूत्राने भरलेले दुर्गंधीचे पोतडेच आहे.
जंत किडे आणी आंतडी । नाना दुर्गंधीची पोतडी ।
अमुप लवथविती कातडी । कांटाळवाणी ॥ १९ ॥
१९) शरीरांत जंत व किडे आहेत. आतडी घाणीने भरलेली दुर्गंधाची पोती व घाणेरडी कातडी सगळीकडे लोंबत असते.
सर्वांगास सिर प्रमाण । तेथें बळसें वाहे घ्राण ।
उठे घाणी फुटतां श्रवण । ते दुर्गंधी ने घवे ॥ २० ॥
२०) शरीरांतील सर्वांत श्रेष्ठ भाग म्हणजे डोके. पण तेथेही नाकांतून शेंबुड येतो. कान फुटले तर असह्य दुर्गंधी येते.
डोळां निघती चिपडें । नाकीं दाटतीं मेकडें ।
प्रातःकाळीं घाणी पडे । मुखीं मळासारिखी ॥ २१ ॥
२१) डोळ्यांतून चिपाडें निघतात, नाकामध्यें मेंकडे होतात, सकाळी तोंडांतून घाण बाहेर पडते.
लाळ थुंका आणी मळ । पीत श्र्लेष्मा प्रबळ ।
तयास म्हणती मुखकमळ । चंद्रासारिखें ॥ २२ ॥
२२) तोंडांत लाळ, थुंकी, इतर घाण, नाकांत पिवळा शेंबुड, आणि अशा मुखाला कमळची व चंद्राची उपमा देतात.
मुख ऐसे कुश्र्चीळ दिसे । पोटीं विष्टा भरली असे ।
प्रत्यक्षास प्रमाण नसे । भूमंडळीं ॥ २३ ॥
२३) मुख असे घाणेरडे तर पोटांत विष्टा, मूत्र भरलेले; हे प्रत्यक्ष प्रमाणच या जगती आहे.
पोटीं घालितां दिव्यान्न । कांहीं विष्टा कांहीं वमन ।
भागीरथीचें घेता जीवन । त्याची होये लघुशंका ॥ २४ ॥
२४) चांगले अन्न खाल्ले तरी काहीची विष्टा होते, तर काही ओकून पडते. गंगेचे पवित्र पाणी प्यायले तरी त्याचे मूत्र बनते.
एवं मळ मूत्र आणी वमन । हेंचि देहाचें जीवन ।
येणेंचि देह वाढे जाण । यदर्थी संशय नाहीं ॥ २५ ॥
२५) याप्रमाणे मळ, मूत्र आणि ओकारी हेच एकंदरींत जीवन व याप्राकारेच देह वाढतो, यांत संशय नाही.
पोटीं नस्तां मळ मूत्र वोक । मरोन जाती सकळ लोक ।
जाला राव अथवा रंक । पोटीं विष्टा चुकेना ॥ २६ ॥
२६) मळ, मूत्र व ओक पोटांत नसतील तर सगळे लोक मरुन जातील. राजा असो श्रीमंत असो पोटांत विष्टा असतेच असते.
निर्मळपणें काढूं जातां । तरी देह पडेल तत्त्वता ।
एवं देहाची वेवरता । ऐसी असे ॥ २७ ॥
२७) ही सर्व घाण शरीरांतून काढून स्वच्छ केले तर देह टिकणार नाही. तो मरुन जाईल. अशी देहाची व्यवस्था असते.
ऐसा हा धड असतां । येथाभूत पाहों जातां ।
मग ते दुर्दशा सांगतां । शंका बाधी ॥ २८ ॥
२८) देह धड असतांना वर्णन केल्याप्रमाणे देहाचे घणेरडेपण सांगितले, ते खरे वाटत नाही, आणि खरच इतका घाणेरडा देह आहे कां ? अशी शंका मनांत येते.
ऐसिये कारागृहीं वस्ती । नवमास बहु विपत्ती ।
नवहि द्वारें निरोधती । वायो कैंचा तेथें ॥ २९ ॥
२९) अशा या तुरुंगांत देह राहात असल्याने (जन्मापूर्विंचे) नऊ महिने फार आपत्तीतून देहास जावे लागते. गर्भाशयांत वायु नसल्याने गर्भाची नवद्वारे- २ डोळे, २ कान, २ नाकपुड्या, तोंड, गुद व उपस्थ ही बंद असतात.
वोका नरकाचे रस झिरपती । ते जठराग्नीस्तव तापती ।
तेणें सर्वहि उकडती । अस्तिमांस ॥ ३० ॥
३०) मातेच्या पोटांतील ओका, विष्टा यांची घाण जठरांतील उष्णतेने गरम होते व गर्भाचे मांस, हाडे उकडून निघतात.
त्वचेविण गर्भ खोळे । तव मातेसी होती डोहळे ।
कटवतिक्षणें सर्वांग पोळे । तया बाळकाचें ॥ ३१ ॥
३१) गर्भाला त्वचा नसते, पातळ खोळींत मातेच्या खाण्याने विशेषतः डोहाळी लागल्यावर तिखट, आंबट, कडू अशा खाण्याने बाळाचे सर्वांग पोळून निघते.
बांधलें चर्माचें मोटाळें । तेथें विष्ठेचें पेटाळें ।
रसउपाय वंकनाळें । होत असे ॥ ३२ ॥
३२) गर्भ म्हणजे चामड्यांत गुंडाळलेले गाठोडे असते. तेथेच (मातेच्या देहांतील विष्टेनी भरलेले (आतडयांचे) वेटोळे असते. गर्भाच्या नाळामधून त्याला हवे असलेले रस, पोषक द्रवे मिळतात.
विष्ठा मूत्र वांती पीत । नाकीं तोंडीं निघती जंत ।
तेणें निर्बुजलें चित्त । आतिशयेंसीं ॥ ३३ ॥
३३) मळ, मूत्र, ओक व पित्त यामुळे नाकातोडांतून जंत बाहेर येतात, त्यामुळे गर्भाचा जीव फार घाबराघुबरा होतो.
ऐसिये कारागृहीं प्राणी । पडिला अत्यंत दाटणीं ।
कळवळोन म्हणे चक्रपाणी । सोडवीं येथून आतां ॥ ३४ ॥
३४) अशा तुरुंगांत पडलेला तो जीव देवाला कळवळून सांगतो की, देवा आतां येथुन सोडव.
देवा सोडविसी येथून । तरी मी स्वहित करीन ।
गर्भवास हा चुकवीन । पुन्हां न ये येथें ॥ ३५ ॥
३५) देवा, तूं येथून मला सोडवलसे तर मी माझे भले करीन आणी हा परत गर्भवास चुकवीन. परत येथे येणार नाही.
ऐसी दुखवोन प्रतिज्ञा केली । तंव जन्मवेळ पुढें आली ।
माता आक्रंदों लागली । प्रसूतकाळीं ॥ ३६ ॥
३६) अशी अती दुःख झाल्याने प्रतिज्ञा केली. आतां जन्म घेण्याची वेळ जवळ आली. प्रसूतीच्या वेदनांनी आई ओरडू लागली.
नाकीं तोंडीं बैसलें मांस । मस्तकद्बारें सांडी स्वास ।
तेंहि बुजलें निशेष । जन्मकाळीं ॥ ३७ ॥
३७) जन्मवेळीं गर्भाच्या नाकातोंडावर मांस बसले. डोक्यावरील टाळू मधुन श्र्वास घेऊ लागला तर तेही बुजले.
मस्तकद्वार तें बुजलें । तेणें चित्त निर्बुजलें ।
प्राणी तळमळूं लागलें । चहूंकडे ॥ ३८ ॥
३८) मस्तकाचे टाळूचे द्वारपण बुजल्याने बाळाचा जीव घाबरा झाला. तो श्र्वासाविना तळमळु लागला.
स्वास उस्वास कोंडला । तेणें प्राणी जाजावला ।
मार्ग दिसेनासा जाला । कासावीस॥ ३९ ॥
३९) श्र्वासोश्र्वास कोंडल्याने व बाहेर पडायचा मार्ग पण दिसेनासा झाल्याने बाळ कासावीस झाला.
चित्त बहु निर्बुजलें । तेणें आडभरी भरलें ।
लोक म्हणती आडवें आलें । खांडून काढा ॥ ४० ॥
४०) कासावीस झालेले ते बालक बाहेर येण्याची धडपड करता करता भलतीकडेच अडकले. लोक म्हणू लागले की, आडवे आले म्हणून तुकडे करुन बाहेर काढा.
मग ते खांडून काढिती । हस्तपाद छेदून घेती ।
हातां पडिले तेंचि कापिती । मुख नासिक उदर ॥ ४१ ॥
४१) मग ते बाळाचे हातपाय , तसेच तोंड, नाक, पोट जे अवयव सापडतील ते कापून काढतात.
ऐसे टवके तोडिले । बाळकें प्राण सोडिले ।
मातेनेंहि सांडिलें । कळिवर ॥ ४२ ॥
४२) अशी कापाकाप झाल्यावर बाळाने प्राण सोडला. आईनेही देह टाकला.
मृत्य पावला आपण । मातेचा घेतला प्राण ।
दुःख भोगिलें दारुण । गर्भवासीं ॥ ४३ ॥
४३) अशाप्रकारे तो जीव मेला व त्याने आईचाही जीव घेतला. ह्याशिवाय गर्भवासाचे दारुण दुःख भोगलेच.
तथापी सुकृतेंकरुनी । मार्ग सांपडला योनी ।
तर्हीं आडकला जाउनी । कंठ स्कंदी मागुता ॥ ४४ ॥
४४) यदाकादाचित जन्मवेळी बाहेर येण्यासाठी जीवाला योनी मार्ग सांपडलांच तर त्या लहान मार्गांतून बाहेर येतांना गळा, खांदा वगैरे कोठेतरी अडकतेच.
तये संकोचित पंथीं । बळेंचि वोढून काढिती ।
तेणे गुणें प्राण जाती । बाळकाचे ॥ ४५ ॥
४५) मग त्या अरुंद मार्गांतून बाळाला ओढून बाहेर काढतात. त्यामुळे बाळाचे प्राण जातात.
बाळकाचे जातां प्राण । अंतीं होये विस्मरण ।
तेणें पूर्वील स्मरण । विसरोन गेला ॥ ४६ ॥
४६) जन्माला येण्याच्यावेळी जीव भगवंताची आठवण विसरुन जातो. त्यामुळे प्राण गेल्यावर, गर्भांत असतांना भगवंताची केलेली विनवणी विसरतो.
गर्भी म्हणे सोहं सोहं । बाहेरी पडतां म्हणे कोहं ।
ऐसा कष्टी जाला बहु । गर्भवासीं ॥ ४७ ॥
४७) गर्भांत असतांना जीव सोहं सोह ( मी परमेश्र्वर आहे) म्हणत असतो. तर जन्म घेतांना बाहेर पडतांना मी कोण मी कोण असे म्हणणारा जीव गर्भवासाच्या यातनांनी दुःखी होतो.
दुःखा वरपडा होता जाला । थोरा कष्टीं बाहेरी आला ।
सवेंच कष्ट विसरला । गर्भवासाचे ॥ ४८ ॥
४८) गर्भवासाच्या यातनांतून सुटुन मोठ्या कष्टाने बाहेर आला, आणि गर्भवासाचे दुःख, यातना विसरला.
सुंन्याकार जाली वृत्ती । कांहीं आठवेना चित्तीं ।
अज्ञानें पडिली भ्रांती । तेणें सुखचि मानिलें ॥ ४९ ॥
४९) मन शून्याकार झाले. पूर्विंचे कांही (गर्भवासाचे दुःख )आठवेना. अज्ञानाचे आवरण मनावर पडून भ्रांत अवस्था झाली. जीव आतां तेच सुख मानू लागला.
देह विकार पावलें । सुखदुःखें झळंबलें ।
असो ऐसें गुंडाळलें । मायाजाळीं ॥ ५० ॥
५०) देहाचे विकार मागे लागले. सुख-दुःखाचे खेळ सुरु झाले. अशारीतीने मायेच्या जाळ्यांत जीव अडकला.
ऐसें दुःख गर्भवासीं । होतें प्राणीामात्रासीं ।
म्हणोनियां भगवंतासी । शरण जावें ॥ ५१ ॥
५१) असे गर्भवासी असतांना प्राणीमात्रांनादुःख, यातना होतात. म्हणून भगवंताला शरण जावे.
जो भगवंताचा भक्त । तो जन्मापासून मुक्त ।
ज्ञानबळें विरक्त । सर्वकाळ ॥ ५२ ॥
५२) जो भगवंताचा भक्त असतो, तो जन्मापासून मुक्त होतो. आत्मज्ञान झाल्याने तो सर्वकाळ विरक्त असतो. ऐशा गर्भवासीं विपत्ती । निरोपिल्या येथामती ।
सावध होऊन श्रोतीं । पुढें अवधान द्यावें ॥ ५३ ॥
५३) अशा गर्भावस्थेंतील आपत्तीचें, दुःखाचे वर्णन मला जमले तसे केले. श्रोत्यांनी सावधपणे पुढिल भागाकडे लक्ष द्यावे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जन्मदुःखनिरुपणनाम समास पहिला ॥
Samas Pahila JanmaDukha Nirupan
समास पहिला जन्मदुःख निरुपण
Custom Search