Thursday, March 24, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 2 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग २

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 2 
Chand 1 to Doha 4 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग २ 
छं० १ ते दोहा ४

छं०—नमामि भक्त वत्सलं । कृपालु शील कोमलं ।

भजामि ते पदांबुजं । अकामिनां स्वधामदं ॥ १ ॥

‘ हे भक्तवत्सल, हे कृपाळू, हे कोमल स्वभावाचे, मी तुम्हांला नमस्कार करतो. निष्काम पुरुषांना आपले परमधाम देणार्‍या तुमच्या चरणकमलांना मी भजतो. ॥ १ ॥

निकाम श्याम सुंदरं । भवाम्बुनाथ मंदरं ।

प्रफुल्ल कंज लोचनं । मदादि दोष मोचनं ॥ २ ॥

तुम्ही अत्यंत सुंदर, सावळे, संसाररुपी समुद्राचे मंथन करण्यासाठी मंदराचलरुप, प्रफुल्लित कमलासमान नेत्रांचे आणि मद इत्यादी दोषांपासून मुक्त करणारे आहात. ॥ २ ॥

प्रलंब बाहु विक्रमं । प्रभोऽप्रमेय वैभवं ।

निषगं चाप सायकं । धरं त्रिलोक नायकं ॥ ३ ॥

हे प्रभो, तुमच्या लांब भुजांचा पराक्रम आणि तुमचे ऐश्वर्य बुद्धीपलीकडील आहे. भाले व धनुष्य-बाण धारण करणारे तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी, ॥ ३ ॥

दिनेश वंश मंडनं । महेश चाप खंडनं ।

मुनींद्र संत रंजनं । सुरारि वृदं भंजनं ॥ ४ ॥

सूर्यवंशाचे भूषण, महादेवांचे धनुष्य मोडणारे, मुनिराज व संतांना आनंद देणारे तसेच देवांचे शत्रू असलेल्या असुरांचे समूह नष्ट करणारे आहात. ॥ ४ ॥

मनोज वैरि वंदितं । अजादि देव सेवितं ।

विशुद्ध बोध विग्रहं । समस्त दूषणापहं ॥ ५ ॥

तुम्हांला कामदेवाचे शत्रू असलेले महादेव वंदन करतात. ब्रह्मदेव इत्यादी देव तुमची सेवा करतात. तुमचा विग्रह विशुद्ध ज्ञानमय असून तुम्ही संपूर्ण दोषांचा नाश करणरे आहात. ॥ ५ ॥

नमामि इंदिरा पतिं । सुखाकरं सतां गतिं ।

भजे सशक्ति सानुजं । शची पति प्रियानुजं ॥ ६ ॥

हे लक्ष्मीपती, हे सुखनिधान, हे सत्पुरुषांचे आश्रय, मी तुम्हांला नमस्कार करतो. हे इंद्राचे प्रिय अनुज वामनावतार, स्वरुपभूत शक्ती सीता व लक्ष्मण यांचेसह मी तुम्हांला भजतो. ॥ ६ ॥

त्वदंघ्रि मूल ये नराः । भजंति हीन मत्सराः ।

पतंति नो भवारणवे । वितर्क वीचि संकुले ॥ ७ ॥

जे लोक मत्सररहित होऊन आपल्या चरण-कमलांची सेवा करतात, ते तर्क-वितर्करुपी तरंगांनी पूर्ण असलेल्या संसाररुपी समुद्रात पडत नाहीत. ॥ ७ ॥

विविक्त वासिनः सदा । भजंति मुक्तये मुदा ।

निरस्य इंद्रियादिकं । प्रयांति ते गतिं स्वकं ॥ ८ ॥

जे एकांतवासी लोक मुक्तीसाठी विषयांपासून इंद्रियादींचा निग्रह करुन तुम्हांला प्रेमाने भजतात, ते तुमच्या गतीला प्राप्त होतात. ॥ ८ ॥

तमेकमद्भुतं प्रभुं । निरीहमीश्र्वरं विभुं ।

जगद्गुरुं च शाश्र्वतं । तुरीयमेव केवलं ॥ ९ ॥

जे अद्वितीय, मायिक जगाहून विलक्षण, सर्वसमर्थ, इच्छारहित, सर्वांचे स्वामी, व्यापक, जगद्गुरु, नित्य, तिन्ही गुणांपलीकडील आणि आपल्या स्वरुपात स्थित असलेले असे तुम्ही आहात. ॥ ९ ॥

भजामि भाव वल्लभं । कुयोगिनां सुदुर्लभं ।

स्वभक्त कल्प पादपं । समं सुसेव्यमन्वहं ॥ १० ॥

आणि जे भावप्रिय, विषयी पुरुषांना अत्यंत दुर्लभ, आपल्या भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारे कल्पवृक्ष, पक्षपातरहित आणि नित्य आनंदाने सेवा करण्यास योग्य आहात, अशा तुम्हाला मी निरंतर भजतो. ॥ १० ॥

अनूप रुप भूपतिं । नतोऽहमुर्विजा पतिं ।

प्रसीद मे नमामि ते । पदाब्ज भक्ति देहि मे ॥ ११ ॥

हे अनुपम सुंदर, हे पृथ्वीपती, हे जानकीनाथ, मी तुम्हांला प्रणाम करतो. माझ्यावर प्रसन्न व्हा. मी तुम्हांला नमस्कार करतो. मला आपल्या चरणकमलांची भक्ती द्या. ॥ ११ ॥

पठंति ये स्तवं इदं । नरादरेण ते पदं ।

व्रजंति नात्र संशयं । त्वदीय भक्ति संयुताः ॥ १२ ॥

जे लोक ही स्तुती आदराने म्हणतील, ते तुमच्या भक्तीने युक्त होऊन तुमच्या परमपदास प्राप्त होतील, यांत शंका नाही.’ ॥ १२ ॥         

दोहा०—बिनती करि मुनि नाइ सिरु कह कर जोरि बहोरि ।

चरन सरोरुह नाथ जनि कबहुँ तजै मति मोरि ॥ ४ ॥

मुनींनी अशी विनंती करुन नतमस्तक होऊन, हात जोडून म्हटले, ‘ हे नाथ, माझी बुद्धी तुमचे चरण-कमल कधी न सोडो.’ ॥ ४ ॥

अनुसुइया के पद गहि सीता । मिली बहोरि सुसील बिनीता ॥

रिषिपतिनी मन सुख अधिकाई । आसिष देइ निकट बैठाई ॥

नंतर परम शीलवती विनम्र सीतेने अत्रिपत्नी अनसूयेचे पाय धरुन तिची भेट घेतली. ऋषिपत्नीच्या मनास खूप आनंद झाला. तिने आशीर्वाद देऊन सीतेला जवळ बसवून घेतले. ॥ १ ॥

दिब्य बसन भूषन पहिराए । जे नित नूतन अमल सुहाए ॥

कह रिषिबधू सरस मृदु बानी । नारिधर्म कछु ब्याज बखानी ॥

आणि तिने नित्य नवी, निर्मळ आणि सुदंर राहाणारी दिव्य वस्त्रे व अलंकार सीतेला घातले. नंतर ऋषि-पत्नी त्या निमित्ताने मधुर व कोमल वाणीने स्त्रियांच्या काही धर्मांचे वर्णन सांगू लागली.      

मातु पिता भ्राता हितकारी । मितप्रद सब सुनु राजकुमारी ॥

अमित दानि भर्ता बयदेही । अधम सो नारि जो सेव न तेही ॥

‘ हे राजकुमारी, ऐक. माता, पिता, भाऊ हे सर्व हितकारक असतात, परंतु ते एका मर्यादेपर्यंतच सुख देणारे आहेत. परंतु हे जानकी, पती हा मोक्षरुप असीम सुख देणारा असतो. अशा पतीची जी सेवा करीत नाही, ती स्त्री अधम होय. ॥ ३ ॥

धीरज धर्म मित्र अरु नारी । आपद काल परिखिअहिं चारी ॥

बृद्ध रोगबस जड़ धनहीना । अंध बधिर क्रोधी अति दीना ॥

धैर्य, धर्म, मित्र व स्त्री या चौघांची परीक्षा संकटकाळीच होत असते. वृद्ध, रोगी, मूर्ख, निर्धन, अंध, बहिरा, क्रोधी व अत्यंत दीन, ॥ ४ ॥

ऐसेहु पति कर किएँ अपमाना । नारि पाव जमपुर दुख नाना ॥

एकइ धर्म एक ब्रत नेमा । कायँ बचन मन पति पद प्रेमा ॥

अशाही पतीचा अपमान केल्यास स्त्रीला यमपुरीत तर्‍हेतर्‍हेचे दुःख भोगावे लागते. शरीर, वचन आणि मनाने पतीच्या चरणी प्रेम करणे हा स्त्रीचा एकच धर्म आहे, एकच व्रत आहे आणि एकच नियम आहे. ॥ ५ ॥

जग पतिब्रता चारि बिधि अहहीं । बेद पुरान संत सब कहहीं ॥

उत्तम के अस बस मन माहीं । सपनेहुँ आन पुरुष जग नाहीं ॥

जगात चार प्रकारच्या पतिव्रता असतात. वेद, पुराण व संत हे सर्व असे म्हणतात की, जगात माझा पती सोडल्यास दुसरा पुरुष माझ्या स्वप्नातही येत नाही, असा भाव उत्तम श्रेणीच्या पतिव्रतेच्या मनात असतो. ॥ ६ ॥

मध्यम परपति देखइ कैसें । भ्राता पिता पुत्र निज जैसें ॥

धर्म बिचारि समुझि कुल रहई । सो निकिष्ट त्रिय श्रुति अस कहई ॥

मध्यम श्रेणीची पतिव्रता दुसर्‍या पुरुषाला अवस्थेप्रमाणे आपला सख्खा भाऊ, पिता किंवा पुत्र यांच्या रुपात पाहाते. जी धर्माचा विचार करुन आणि आपल्या कुळाची मर्यादा जाणून स्वतःचा ( मनात असूनही ) परपुरुषापासून बचाव करते, ती निकृष्ट प्रतीची पतिव्रता होय, असे वेद म्हणतात. ॥ ७ ॥

बिनु अवसर भय तें रह जोई । जानेहु अधम नारि जग सोई ॥

पति बंचक परपति रति करई । रौरव नरक कल्प सत परई ॥

 आणि ज्या स्त्रीला व्यभिचाराची संधी मिळत नाही, किंवा जी भीतीमुळे पतिव्रता राहते. जगात त्या स्त्रीला अधम मानावे. पतीचा विश्वासघात करुन जी स्त्री परपुरुषाशी रती करते, ती स्त्री तर शंभर कल्पांपर्यंत रौरव नरकात पडते. ॥ ८ ॥

छन सुख लागि जनम सत कोटी । दुख न समुझ तेहि सम को खोटी ॥

बिनु श्रम नारि परम गति लहई । पतिब्रत धर्म छाड़ि छल गहई ॥

क्षणभराच्या सुखासाठी कोट्यावधी जन्मामध्ये भोगावे लागणारे दुःख जिला समजत नाही. त्या स्त्रीसारखी दुष्ट कोण असणार ? जी स्त्री फसवणूक न करता पतिव्रत्य धर्म स्वीकारते, तिला विनासायास परम गती प्राप्त होते. ॥ ९ ॥

पति प्रतिकूल जनम जहँ जाई । बिधवा होइ पाइ तरुनाई ॥

परंतु जी पतीविरुद्ध वागते. ती पुढे जेथे जन्म घेते, तेथे ती

 तारुण्यातच विधवा होते.     



Custom Search

ShriRamCharitManas Aranyakand Part 1 Sholak 1 to Sopan 3 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग १


 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 1 
Sholak 1 to Sopan 3 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग १ 
श्र्लोक १ ते सोपान ३

मूळ श्लोक

मूलं धर्मतरोर्विवेकजलधेः पूर्णेन्दामानन्ददं

वैराग्याम्बुजभास्करं ह्यघघनध्वान्तापहम् ।

मोहाम्भोधरपूगपाटनविधौ स्वःसम्भवं शङ्करं

वन्दे ब्रह्मकुलं कलङ्कशमनं श्रीरामभूपप्रियम् ॥

धर्मरुपी वृक्षाचे मूळ, विवेकरुपी समुद्राला आनंदित करणारे पूर्णचंद्र, वैराग्यरुपी कमळाला विकसित करणारे सूर्य, पापरुपी घोर अंधकार समूळ नष्ट करणारे, तिन्ही ताप हरण करणारे, मोहरुपी मेघांच्या समूहाला छिन्न-भिन्न करण्याच्या क्रियेमध्ये आकाशात उत्पन्न होणार्‍या वार्‍यासारखे ब्रह्मदेवांचे आत्मज, कलंकनाशक आणि महाराज श्रीरामचंद्रांना प्रिय अशा श्रीशंकरांना मी वंदन करतो. ॥ १ ॥

सान्द्रानन्दपयोदसौभगतनुं पीताम्बरं सुन्दरं

पाणौ बाणशरासनं कटिलसत्तूणीरभारं वरम् ॥

राजीवायतलोचनं धृतजटाजूटेन संशोभितं

सीतालक्ष्मणसंयुतं पथिगतं रामाभिरामं भजे ॥

ज्यांचे शरीर सजल मेघांसारखे सुंदर, श्यामल आणि आनंदघन आहे, ज्यांनी सुंदर वल्कलाचे पीतांबर धारण केले आहे, ज्यांच्या हातांमध्ये धनुष्य-बाण आहेत, ज्यांच्या कमरेला उत्तम भाले शोभून दिसत आहेत, ज्यांचे कमलासमान विशाल नेत्र आहेत आणि ज्यांनी मस्तकावर जटाजूट धारण केला आहे, त्या अत्यंत शोभायमान श्रीसीता व लक्ष्मण यांच्यासह मार्गाने निघालेल्या आनंद देणार्‍या श्रीरामचंद्रांना मी भजतो. ॥ २ ॥       

सोपान १

सो०—उमा राम गुन गूढ़ पंडित मुनि पावहिं बिरति ।

पावहिं मोह बिमूढ़ जे हरि बिमुख न धर्म रति ॥

श्रीशंकर म्हणतात, ‘ हे पार्वती, श्रीरामांचे गुण गूढ आहेत. पंडित व मुनी ते जाणून वैराग्य प्राप्त करतात. परंतु जे लोक भगवंताशी विन्मुख असतात आणि ज्यांना धर्माबद्दल प्रेम नाही, ते महामूर्ख लोक त्यांची लीला ऐकून त्यावर विश्र्वास ठेवत नाहीत. ॥ १ ॥

पुर नर भरत प्रीति मैं गाई । मति अनुरुप अनूप सुहाई ॥

अब प्रभु चरित सुनहु अति पावन । करत जे बन सुर नर मुनि भावन ॥

अयोध्या व मिथिलावासींच्या तसेच भरताच्या अनुपम आणि सुंदर प्रेमाचे गायन मी आपल्या बुद्धीप्रमाणे केले. आता देव, मनुष्य आणि मुनी यांच्या मनाला आवडणारे प्रभू श्रीरामचंद्रांचे वनात घडलेले अत्यंत पवित्र चरित्र ऐक. ॥ १ ॥

एक बार चुनि कुसुम सुहाए । निज कर भूषन राम बनाए ॥

सीतहि पहिराए प्रभु सादर । बैठे फटिक सिला पर सुंदर ॥

एकदा सुंदर फुले वेचून श्रीरामांनी आपल्या हातांनी तर्‍हेतर्‍हेचे अलंकार बनविले आणि सुंदर स्फटिक शिळेवर बसलेल्या प्रभूंनी मोठ्या प्रेमाने ते सीतेला घातले. ॥ २ ॥

सुरपति सुत धरि बायस बेषा । सठ चाहत रघुपति बल देखा ॥

जिमि पिपीलिका सागर थाहा । महा मंदमति पावन चाहा ॥

देवराज इंद्राचा नीच मूर्ख पुत्र जयंत हा कावळ्याचे रुप घेऊन श्रीरघुनाथांचे सामर्थ्य पाहू इच्छित होता, ज्याप्रमाणे निर्बुद्ध मुंगी समुद्राचा थांग पाहू इच्छिते. ॥ ३ ॥

सीता चरन चोंच हति भागा । मूढ़ मंदमति कारन कागा ॥

चला रुधिर रघुनायक जाना । सींक धनुष सायक संधाना ॥

तो मूर्ख व मंदबुद्धीमुळे भगवंतांच्या बळाची परीक्षा घेण्यासाठी बनलेला कावळा सीतेच्या चरणांवर चोच मारुन पळाला. जेव्हा रक्त वाहू लागले, तेव्हा श्रीरामांनी ते पाहिले व धनुष्यावर बोरुचा बाण लावून सोडला. ॥ ४ ॥

दोहा—अति कृपाल रघुनायक सदा दीन पर नेह ।

ता सन आइ कीन्ह छलु मूरख अवगुन गेह ॥ १ ॥

श्रीरघुनाथ हे अत्यंत कृपाळू आहेत आणि त्यांचे दीनांवर नेहमी प्रेम असते, त्यांच्याशीही अवगुणांचे घर असलेल्या त्या मूर्ख जयंताने कपट केले. ॥ १ ॥

प्रेरित मंत्र ब्रह्मसर धावा । चला भाजि बायस भय पावा ॥

धरि निज रुप गयउ पितु पाहीं । राम बिमुख राखा तेहि नाहीं ॥

मंत्राने प्रेरित असलेला तो ब्रह्मबाण सुसाट निघाला. कावळा घाबरुन पळू लागला. तो आपले खरे रुप घेऊन इंद्राकडे गेला, परंतु श्रीरामांचा तो विरोधी असल्याचे पाहून इंद्राने त्याला जवळ केले नाही. ॥ १ ॥

भा निरास उपजी मन त्रासा । जथा चक्र भय रिषि दुर्बासा ॥

ब्रह्मधाम सिवपुर सब लोका । फिरा श्रमित ब्याकुल भय सोका ॥

तेव्हा तो निराश झाला. ज्याप्रमाणे दुर्वास ऋषीला चक्र पाठीमागे लागल्यामुळे भीती वाटली, त्याप्रमाणे जयंताच्या मनाला भय वाटू लागले. तो ब्रह्मलोक, शिवलोक इत्यादी सर्व लोकांमध्ये थकून व भय-शोकाने व्याकूळ होऊन पळत निघाला. ॥ २ ॥

काहूँ बैठन कहा न ओही । राखि को सकइ राम कर द्रोही ॥

मातु मृत्यु पितु समन समाना । सुधा होइ बिष सुनु हरिजाना ॥

परंतु कुणी त्याला बसायलाही सांगितले नाही. श्रीरामांच्या शत्रूला कोण जवळ करणार ? काकभुशुंडी म्हणाले, ‘ हे गरुडा, अशा व्यक्तीला माता ही मृत्यु सारखी, पिता हा यमासारखा आणि अमृत हे विषासारखे बनते. ॥ ३ ॥

मित्र करइ सत रिपु कै करनी । ता कहँ बिबुधनदी बैतरनी ॥

सब जगु ताहि अनलहु ते ताता । जो रघुबीर बिमुख सुनु भ्राता ॥

मित्र त्याच्याशी शेकडो शत्रूंप्रमाणे वागू लागले. देवनदी गंगा ही त्याच्यासाठी यमपुरीची वैतरणी नदी बनते. हे बंधू, ऐक. जो श्रीरघुनाथांशी विन्मुख होतो, त्याला संपूर्ण जग हे अग्नीपेक्षाही अधिक होरपळवणारे होते.’ ॥ ४ ॥

नारद देखा बिकल जयंता । लागि दया कोमल चित संता ॥

पठवा तुरत राम पहिं ताही । कहेसि पुकारि प्रनत हित पाही ॥

नारदांनी जेव्हा व्याकूळ जयंताला पाहिले, तेव्हा त्यांना दया आली. कारण संतांचे मन मोठे कोमल असते. त्यांनी त्याची समजूत घालून त्याला तत्काळ श्रीरामांच्याकड़े पाठविले. त्यांनी त्याला सांगितले की, तू श्रीरामांना जाऊन असे म्हण की, ‘ हे शरणागतांचे हितकारी, मला वाचवा.’ ॥ ५ ॥

आतुर सभय गहेसि पद जाई । त्राहि त्राहि दयाल रघुराई ॥

अतुलित बल अतुलित प्रभुताई । मैं मतिमंद जानि नहिं पाई ॥

व्याकूळ व भयभीत झालेल्या जयंताने जाऊन श्रीरामांचे पाय धरले व म्हटले, ‘ हे दयाळू रघुनाथा, रक्षण करा. तुमचे अतुल्य बळ व अतुल्य सत्ता माझ्या मंदबुद्धीला ओळखता आली नाही. ॥ ६ ॥

निज कृत कर्म जनित फल पायउँ । अब प्रभु पाहि सरन तकि आयउँ ॥

सुनि कृपाल अति आरत बानी । एकनयन करि तजा भवानी ॥

आपल्या कर्माचे फळ मला मिळाले. आता हे प्रभू. माझे रक्षण करा. मी केवळ तुमचाच आश्रय पाहून आलो आहे.’ श्रीशिव म्हणतात, हे पार्वती, कृपाळू श्रीरघुनाथांनी त्याचे अत्यंत दुःखाचे बोलणे ऐकून त्याला एकाक्ष करुन सोडून दिले. ॥ ७ ॥

कीन्ह मोह बस द्रोह जद्यपि तेहि कर बध उचित ।

प्रभु छाड़ेउ करि  छोह को कृपाल रघुबीर सम ॥ २ ॥

त्याने मूर्खपणाने खोडी काढली होती, म्हणून त्याचा वध करणेच योग्य होते; परंतु प्रभूंनी कृपा करुन त्याला सोडून दिले. श्रीरामांच्यासारखा कृपाळू दुसरा कोण असणार ? ॥ २ ॥

रघुपति चित्रकूट बसि नाना । चरित किए श्रुति सुधा समाना ॥

बहुरि राम अस मन अनुमाना । होइहि भीर सबहिं मोहि जाना ॥

चित्रकूटामध्ये राहून श्रीरघुनाथांनी अनेक लीला केल्या, त्या कानांनी ऐकण्यास अमृतासारख्या गोड आहेत. काही काळांनंतर श्रीरामांना वाटले की, सर्व लोकांना मी कळून आलो आहे. त्यामुळे येथे मोठी गर्दी होईल. ॥ १ ॥स

सकल मुनिन्ह सन बिदा कराई । सीता सहित चले द्वौ भाई ॥

अत्रि के आश्रम जब प्रभु गयऊ । सुनत महामुनि हरषित भयऊ ॥

म्हणून सर्व मुनींचा निरोप घेऊन व सीतेला बरोबर घेऊन दोघे बंधू निघाले. जेव्हा प्रभू अत्रिमुनींच्या आश्रमात आले, तेव्हा त्यांच्या आगमनाची वार्ता ऐकून महामुनींना आनंद झाला. ॥ २ ॥

पुलकित गात अत्रि उठि धाए । देखि रामु आतुर चलि आए ।

करत दंडवत मुनि उर लाए । प्रेम बारि द्वौ जन अन्हवाए ॥

त्यांचे शरीर पुलकित  झाले. अत्री मुनि उठून धावत गेले. ते धावत येत असल्याचे पाहून श्रीराम आणखी वेगाने पुढे गेले दंडवत करीत असतानाच मुनींनी श्रीरामांना उठवून हृदयाशी धरले आणि प्रेमाश्रूंनी दोघा बंधूंना न्हाऊ घातले. ॥ ३ ॥

देखि राम छबि नयन जुड़ाने । सादर निज आश्रम तब आने ॥

करि पूजा कहि बचन सुहाए । दिए मूल फल प्रभु मन भाए ॥

श्रीरामांचे सौंदर्य पाहून मुनींचे नेत्र तृप्त झाले. ते त्यांना आदराने आश्रमात घेऊन आले. पूजा केल्यावर सुंदर बोलून मुनींनी मुळे-फळे दिली, ती प्रभूंना खूप आवडली. ॥ ४ ॥

सो०—प्रभु आसन आसीन भरि लोचन सोभा निरखि ।

मुनिबर परम प्रबीन जोरि पानि अस्तुति करत ॥ ३ ॥

प्रभू आसनावर विराजमान झाले. डोळे भरुन त्यांचे

 लावण्य पाहून ज्ञानी मुनिश्रेष्ठ हात जोडून स्तुती करु

 लागले. ॥ ३ ॥



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 5 Ovya 123 to 153 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ५ ओव्या १२३ ते १५३

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 11 Part 5 
Ovya 123 to 153 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ५ 
ओव्या १२३ ते १५३

श्लोक

श्रीभगवानुवाच:

पश्य मे पार्थ रुपाणि शतशोऽथ सहस्त्रशः ।

नानाविधानि दिव्यानि नानावर्णाकृतीनि च ॥ ५ ॥

५) श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, नाना प्रकारचीं, नाना वर्णांची व नाना आकृतींची माझीं शेकडों, हजारों ( दिव्य ) रुपें पाहा.  

अर्जुना तुवां एक दावा म्हणितलें । आणि तेंचि दावूं तरि काय दाविलें ।

आतां देखें आघवें भरिलें । माझांचि रुपीं ॥ १२३ ॥

१२३) अर्जुना,तूं एक विश्र्वरुप दाखवा, असें म्हटलेंस आणि आम्हीं तेंच ( एक विश्वरुप ) दाखविलें, तर त्यांत आम्हीं काय मोठेसें दाखविलें? तर आतां तूं असें पाहा कीं, सर्व ( विश्र्व ) माझ्या स्वरुपांत सामावलेले आहे.    

एकें कृशें एकें स्थूळें । एकें र्‍हस्वें एकें विशाळें ।

पृथुतरें सरळें । अप्रांतें एकें ॥ १२४ ॥

१२४) कांही रोडकीं, कांही लठ्ठ, कांहीं ठेंगू, कांहीं प्रशस्त, कांहीं फारच विस्तृत, सडपातळ व कांहीं अमर्याद,

एकें अनावरें प्रांजळें । सव्यापारें निश्र्चळें ।

उदासीनें स्नेहाळें । तीव्रें एकें ॥ १२५ ॥

१२५) कांहीं न आवरणारीं व कांहीं प्रामाणिक, कांहीं सक्रिय व कांहीं निष्क्रिय, कांहीं उदासीन, कांहीं प्रेमळ, कांहीं कडक,

एकें घूर्णितें सावधें । असलगें एकें अगाधें ।

एकें उदारें अतिबद्धें । क्रुद्धें एकें ॥ १२६ ॥

१२६) कांहीं धुंद, कांहीं सावध, कांहीं उघड व कांहीं गूढ, कांहीं उदार, कांहीं कृपण आणि रागावलेलीं कांहीं;

एकें संतें सदामदें । स्तब्धें एकें सानंदें ।

गर्जितें निःशब्दें । सौम्यें एकें ॥ १२७ ॥

१२७) कांहीं सदाचरणीं, कांहीं सदा मदोन्मत्त, कांहीं स्तब्ध, कांहीं आनंदित, कांहीं गर्जना करणारी, कांहीं शब्दरहित व कांहीं शांत;

एकें साभिलाषें विरक्ते । उन्निद्रितें एकें निद्रितें ।

परितुष्टें एकें आर्ते । प्रसन्नें एकें ॥ १२८ ॥ 

१२८) कांहीं आशाखोर आणि कांहीं निराश, कांहीं जागीं झालेलीं व कांहीं झोपलेलीं, कांहीं सर्व बाजूंनी संतुष्ट, कांहीं पीडित आणि कांहीं प्रसन्न;

एकें अशस्त्रें सशस्त्रें । एकें रौद्रें अतिमित्रें ।

भयानकें एकें पवित्रें । लयस्थें एकें ॥ १२९ ॥

१२९) कांहीं बिनहत्यारी व काहीं हत्यारी, कांहीं तामसी व कांहीं अतिशय स्नेहाळू व कांहीं भयंकर, कांहीं पवित्र आणि कांहीं समाधीत असलेलीं;

एकें जनलीलाविलासें । एकें पालनशीलें लालसें ।

एकें संहारकें सावेशें । साक्षिभूतें एकें ॥ १३० ॥

१३०) कांहीं उत्पन्न करण्याचा स्वभाव असलेलीं, कांहीं मोठ्या आवेशानें संहार करणारी, कांहीं तटस्थ म्हणून राहिलेली;

एवं नानाविधें परि बहुवसें । आणि दिव्यतेजप्रकाशें ।

तेवींचि एकएकऐसें वर्णेही नव्हे ॥ १३१ ॥

१३१) याप्रमाणें अनेक प्रकारचीं, परंतु पुष्कळ व दिव्य तेजानें प्रकाशरुप, अशीं ती रुपें होती. त्याचप्रमाणें वर्णाच्याहि बाबतीत तीं रुपें एकसारखीं एक नव्हती.  

एकें तातलें साडेपंधरें । तैसीं कपिलवर्णें अपारें ।

एकें सरागें जैसें सेंदुरें । डवरलें नभ ॥ १३२ ॥ 

१३२) कांहीं तावून काढलेल्या उत्तम सोन्यासारखीं, त्याचप्रमाणें पिंगट रंग असलेली अनंत रुपें; आणि कांहीं ज्याप्रमाणें शेंदरानें माखलेले आकाश असावें त्याप्रमाणें शेंदरी.  

एकें सावियाचि चुळुकीं । जैसें ब्रह्मकटाह खचिलें माणिकीं ।

एकें अरुणोदयासारिखीं । कुंकुमवर्णें ॥ १३३ ॥

१३३) रत्नांनी ब्रह्मांड जडल्यामुळें तें जसें चमकत असावें, तशा प्रकारचीं कित्येक रुपें स्वाभाविक सौंदर्यानें चमकणारीं होतीं व कित्येक अरुणोदयाच्या केशरी वर्णाप्रमाणें होतीं; 

एकें शुद्धस्फटिकसोज्वळें । एकें इंद्रनीळसुनीळें ।

एकें अंजनाचलसकाळें । रक्तवर्णे एकें ॥ १३४ ॥

१३४) कांहीं शुद्ध स्फटिकाप्रमाणें शुभ्र असलेली, कांहीं इंद्रनील मण्याप्रमाणे चांगलीं निळीं असलेली, कांहीं काजळाच्या पर्वताप्रमाणें अतिशय काळीं असलेलीं, कांहीं तांबड्या रंगाचीं;

एकें लसत्कांचनसम पिंवळीं । एकें नवजलदश्यामळीं ।

एकें चांपेगौरी केवळीं । हरितें एकें ॥ १३५ ॥

१३५) कांहीं तेजदार सोन्याप्रमाणें पिवळ्या रंगाची, कांहीं नव्या मेघाप्रमाणें काळ्यासावळ्या वर्णांची, कांहीं केवळ चाफ्याप्रमाणें गोरी असलेली आणि कांहीं हिरव्या रंगाचीं;

एकें तप्तताम्रतांबडीं । एकें श्र्वेतचंद्र चोखडीं ।

ऐसीं नानावर्णें रुपडीं । देख माझीं ॥ १३६ ॥

१३६) कांहीं तापलेल्या तांब्यासारखीं तांबडी, कांही पांढर्‍या चंद्रासारखीं शुद्ध, अशी ही माझीं नाना रंगांची स्वरुपें पाहा.

हे जैसे कां आनान वर्ण । तैसें आकृतींही अनारिसेपण ।

लाजा कंदर्प रिघाला शरण । तैसें सुंदरें एकें ॥ १३७ ॥

१३७) हे ज्याप्रमाणें वेगवेगळे रंग आहेत, त्याप्रमाणें त्यांच्या आकृत्याहि वेगवेगळ्या आहेत. मदनहि लज्जित होऊन शरण येईल, अशी कित्येक सुंदर आहेत,

एकें अतिलावण्यसाकारें । एकें स्निग्धवपुमनोहरें ।

शृंगारश्रियेचीं भांडारें । उघडिलीं जैसीं ॥ १३८ ॥

१३८) कांहीं रुपें अति सुंदर बांध्यांची आहेत, कांहीं तुळतुळीत शरीराचीं मन हरण करणारीं आहेत, जणू काय शृंगारलक्ष्मीचे भांडारखाने उघडले आहेत, अशीं आहेत.

एकें पीनावयव मांसाळें । एकें शुष्कें अतिविक्राळें ।

एकें दीर्घकंठे विताळें । विकटें एकें ॥ १३९ ॥

१३९) कांहीं पुष्ट अवयवाची व खूप मांस असलेलीं, कांहीं वाळलेली अतिशय भयंकर, कांहीं उंच मानेचीं, कांही मोठ्या टाळूची व कांहीं हिडीस रुपांची  

एवं नानाविधाकृती । इयां पाहतां पारु नाहीं सुभद्रापती ।

जपाचां एकेकीं अंगप्रांती । देख पां जग ॥ १४० ॥

१४०) ह्याप्रमाणें अनेक प्रकारच्या आकृत्या आहेत. अर्जुना, ह्या आकृत्या पाहावयास लागलें तर त्यांना अंत नाहीं आणि त्यांच्या एकएका शरीरभागावर तूं जग पाहा.

श्लोक

पश्यादित्यान् वसून् रुद्रानश्विनौ मरुतस्तथा ।

बहून्यदृष्टपूर्वाणि पश्याश्चर्याणि भारत ॥ ६ ॥

६) आदित्य, वसु, रुद्र, अश्विनीकुमार आणि वायु पाहा. हे भरतकुलोत्पन्ना, पूर्वी कधीं न पाहिलेलीं अनेक आश्चर्ये अवलोकन कर.

जेथ उन्मीलन होत आहे दिठी । तेथ पसरती आदित्यांचिया सृष्टी ।

पुढती निमीलनीं मिठी । देत आहाती ॥ १४१ ॥

१४१) ज्या ठिकाणी ( विश्वरुप भगवंताच्या ) दृष्टि उघडतात, त्या ठिकाणी सूर्याच्या सृष्ट्या पसरतात व जेथें त्या दृष्ट्या मिटतात, तेथे त्या सूर्याच्या सृष्ट्या मावळतात.

वदनींचिया वाफेसवें । होत ज्वाळामय आघवें ।

जेथ पावकादिक पावे । समूह वसूंचे ॥ १४२ ॥

१४२) तोंडाच्या वाफेबरोबर सर्व ज्वालामय होतें. त्या ठिकाणीं अग्निआदिकरुन वसूंचा समुदाय प्राप्त होतो. 

आणि भ्रूलतांचे शेवट । कोपें मिळों पाहती एकवाट ।

तेथ रुद्रगणांचे संघाट । अवतरत देखें ॥ १४३ ॥

१४३) आणि भुवयांची टोकें रागानें एकत्र होऊं पाहतात, त्या ठिकाणीं रुद्रगणांचे समुदाय उत्पन्न होतात.पाहा.

पैं सौम्यतेचां वोलावां । मिती नेणिजे अश्र्विनौदेवां ।

श्रोत्रीं होती पांडवा । अनेक वायु ॥ १४४ ॥

१४४) विश्वरुपाच्या सौम्यतेच्या औलाव्यामध्यें अगणित अश्विनी देव उत्पन्न होतात आणि अर्जुना, विश्वरुपाच्या कानांच्या ठिकाणी अनेक वायु उत्पन्न होतात.

यापरी एकेकाचिये लीळे । जन्मती सुरसिद्धांचीं कुळें ।

ऐसीं अपारें आणि विशाळें । रुपें इयें पाहीं ॥ १४५ ॥

१४५) याप्रमाणें एकएका स्वरुपाच्या सहज खेळामध्यें देवांचे व सिद्धांचे समुदाय उत्पन्न होतात अशी ही अमर्याद व प्रचंड रुपें पाहा.

जयातें सांगावया वेद बोबडे । पहावया काळाचेंही आयुष्य थोडें ।द

धातयाही परि न सांपडे । ठाव जयांचा ॥ १४६ ॥

१४६) ज्या स्वरुपांचें वर्णन करण्यास वेद असमर्थ आहेत जीं स्वरुपें पाहावयास काळाचेहि आयुष्य थोडें आहे आणि ब्रह्मदेव खरा सर्वज्ञ, पण त्यालाहि ज्या स्वरुपाचा पत्ता लागत नाहीं;

जयांतें देवत्रयी कहीं नायके । तियें इयें प्रत्यक्ष देख अनेकें ।

भोगीं आश्र्चर्याचीं कवतिकें । महाऋद्धी ॥ १४७ ॥

१४७) ज्या स्वरुपाविषयीं तिन्ही देवांना कधीहि ऐकायास येत नाहीं, अशीं जी हीं अनेक रुपें, तीं तूं प्रत्यक्ष पाहा आणि कौतुकानें आश्चर्याचें मोठे ऐश्वर्य भोग.

मूळ श्लोक

इहैकस्थं जगत् कृत्स्नं पश्याद्य सचराचरम् ।

मम देहे गुडाकेश यच्चान्यद्  द्रष्टुमिच्छसि ॥ ७ ॥

७) हे अर्जुना, चराचरयुक्त सर्व जग व जर ( आणखी )

 दुसरें पाहण्याची इच्छा असेल, तर येथें माझ्या शरीरामध्ये

 एका ठिकाणीं स्थित आहे, तें आतां पाहा.  

इया मूर्तीचिया किरीटी । रोममूळीं देखें पां सृष्टी ।

सुरतरुतळवटीं । तृणांकुर जैसे ॥ १४८ ॥

१४८) अर्जुना, ज्याप्रमाणें कल्पतरुच्या बुडाशीं गवताचें शेंकडों अंकुर असतात, त्याप्रमाणें या विश्र्वमूर्तीच्या प्रत्येक केसाच्या बुडाशीं सृष्ट्या पाहा.

आणि वाताचेनि प्रकाशें । उडतां परमाणु दिसती जैसे ।

भ्रमत ब्रह्मकटाह तैसें । अवयवसंधीं ॥ १४९ ॥

१४९) आणि ज्याप्रमाणें वार्‍यानें उडणारे परमाणू प्रकाशांत दिसतात, त्याप्रमाणें विश्वरुपाच्या सांध्यांत अनेक ब्रह्मांडें वर खालीं जातांना दिसतात.  

एथ एकैका चिया प्रदेशीं । विश्र्व देख विस्तारेंशी ।

आणि विश्र्वाही परौतें मानसीं । जरी देखावें वर्ते ॥ १५० ॥

१५०) या विश्वरुपाच्या एक एक भागावर तूं संपूर्ण विस्तारासह विश्व पाहा आणि तुझ्या मनांत जर विश्वाहि पलीकडे पाहावें असें वाटत असेल,

तरी तियेही विषयींचें कांहीं । एथ सर्वथा सांकडें नाहीं ।

सुखें आवडे तें माझां देही । देखसी तूं ॥ १५१ ॥

१५१) तर त्याविषयींहि येथें मुळींच अडचण नाहीं. तुला वाटेल तें तूं माझ्या देहाच्या ठिकाणीं पाहा. 

ऐसें विश्र्वमूर्ती तेणें । बोलिलें कारुण्यपूर्णें ।

तंव देखत आहें कीं नाहीं न म्हणे । निवांतुचि येरु ॥ १५२ ॥

१५२) याप्रमाणें करुणेनें पूर्ण भरलेले विश्वरुपधारी श्रीकृष्ण परमात्मा बोलले, तेव्हां मी विश्वरुप पाहात आहें कां नाहीं असें कांहीं न बोलतां अर्जुन उगाच राहिला.

एथ कां पां हा उगला । म्हणोनि कृष्णें जंव पाहिला ।

तंव आर्तीचें लेणें लेइला । तैसाचि आहे ॥ १५३ ॥

१५३) या प्रसंगीं हा स्तब्ध कां राहिला आहे, म्हणून

 कृष्णानें ज्या वेळेस याच्याकडे पाहिलें, तेव्हां तो इच्छेचा

 अलंकार घालून तसाच उत्कंठित असलेला आढळला.



Custom Search