Saturday, February 27, 2021

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 13 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १३

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 13 
Ovya 361 to 390 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १३ 
ओव्या ३६१ ते ३९०

तरी पार्था हें झणें । सायास घेशी हो मनें ।

वायां बागुल इयें दुर्जनें । इंद्रियें करिती ॥ ३६१ ॥

३६१) तरी अर्जुना, यांत कष्ट आहेत, असा तुझ्या मनाचा ग्रह कदाचित होऊन असेल, तर तो तसा होऊं देऊं नकोस. हीं दुष्ट इंद्रियें याचा उगाच बाऊ करतात.    

पाहें पां आयुष्याचा अढळ करी । जें सरतें जीवित वारी ।

तया औषधातें वैरी । काय जिव्हा न म्हणे ॥ ३६२ ॥

३६२) पाहा बरें, आयुष्याला स्थिर करणारें व संपत आलेल्या जीविताला मागें आणणारें जें औषध, त्याला जिव्हा शत्रु समजत नाहीं काय ! 

ऐसें हितासि जें जें निकें । तें सदाचि या इंद्रियां दुखे ।

एर्‍हवी सोपें योगासारिखें । कांहीं आहे ॥ ३६३ ॥  

३६३) त्याप्रमाणें आपल्या हितास जें जें चांगलें, तें या इंद्रियांना सदोदित दुःखकारक वाटतें. एर्‍हवीं योगासारखें सोपें कांहीं आहे काय ?

मूळ श्र्लोक

यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया ।

यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ २० ॥

२०) जेथें योगाच्या अभ्यासाच्याचें नियमन पावलेलें चित्त विषयांपासून परावृत्त होतें, तेथें साधक आपण आपल्याला पाहून आत्मस्वरुपीं सुख पावतो.    

सुखमात्यन्तिकं यत् तद् बुद्धिग्राह्यमतीन्द्रियम् ।

वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ २१ ॥

२१) जें सुख सर्वोत्कृष्ट आहे, जें ( केवळ ) बुद्धिगम्य आहे, जें इंद्रियांना अगोचर आहे व जें सुख भोगीत असतांना तो योगी आपल्या स्वरुपापासून चलन पावत नाहीं, ( असें सुख योग्याच्या अनुभवाला येतें. )

म्हणोनि आसनाचिया गाढिका । जो आम्हीं अभ्यासु सांगितला निका ।

तेणें होईल तरी हो कां । निरोधु यया ॥ ३६४ ॥

३६४) म्हणून आसनाच्या बळकटपणापासून आरंभ करुन जो आम्ही तुला चांगला योगाभ्यास सांगितला, त्या योगानें या इंद्रियांचा निरोध झाला तर होईल. 

एर्‍हवीं तरी येणें योगें । जैं इंद्रियां विंदाण लागे ।

तैं चित्त भेटों रिगे । आपणपेयां ॥ ३६५ ॥

३६५) एर्‍हवीं तरी या योगामुळें ज्या वेळेला इंद्रियांचा निग्रह होतो, त्या वेळेला त्या वेळेला चित्त आपल्या ( चैतन्याच्या ) भेटीला निघतें.  

परतोनि पाठिमोरें ठाके । आणि आपणियांतें आपण देखे ।

देखतखेंवो वोळखे । म्हणे तत्त्व तें मी ॥ ३६६ ॥

३६६) तें ज्या वेळेला विषयांना सोडून परत अंतर्मुख होतें आणि आपण आपल्या आत्मस्वरुपाला पाहातें, आणि पाहिल्याबरोबर त्यास स्वरुपाची ओळख पटते व तें तत्त्व मी आहें, अशा समजुतीवर तें येतें.

तिये ओळखीचिसरिसें । सुखाचियां साम्राज्यीं बैसे ।

चित्तपण समरसें । विरोनि जाय ॥ ३६७ ॥

३६७) त्या ओळखीबरोबर तें सुखाच्या साम्राज्यावर बसतें, आणि तेथें आत्म्याशीं समरस झाल्यानें चित्ताचा चित्तपणा नाहींसा होतो; 

जयापरतें आणिक नाहीं । जयातें इंद्रियें नेणती कहीं ।

तें आपणचि आपुलां ठायीं । होऊनि ठाके ॥ ३६८ ॥

३६८) व ज्याहून दुसरें कांहीं नाहीं व ज्याला इंद्रियें केव्हांच जाणत नाहींत, असें जें चैतन्य, तें, मन आपल्या स्वतः आपल्या ठिकाणी होऊन राहतें.   

मूळ श्र्लोक

यं लब्ध्वा चापरं लाभं मन्यते नाधिकं ततः ।

यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते ॥ २२ ॥

२२) आणि जें सुख मिळालें असतां त्यापेक्षा अधिक असा दुसरा कांहीं लाभ आहे, असें मानीत नाहीं, व ( ज्या ) सुखामध्यें असतांना योगी मोठ्या दुःखानेंदेखील डगमगत नाहीं.

मग मेरुपासूनि थोरें । देह दुःखाचेनि डोंगरें ।

दाटिजो पां परि भारें । चित्त न दटे ॥ ३६९ ॥

३६९) मग मेरुपेक्षां मोठ्या दुःखाच्या डोंगरानें त्याचा देह जरी दडपला, तरी पण त्या भारानें त्याचें चित्त दडपत नाहीं. 

कां शस्त्रेंवरी तोडिलिया । देह आगीमाजीं पडलिया ।

चित्त महासुखीं पहुडलिया । चेवोचि नये ॥ ३७० ॥

३७०) अथवा शस्त्रानें त्याचा देह तोडला, किंवा देह अग्नीमध्यें पडला तरी, चित्त निरतिशय सुखांत लीन झाल्यामुळें, परत वृत्तीवर येत नाहीं.

ऐसें आपणपां रिगोनि ठाये । मग देहाची वास न पाहे ।

आणिकचि सुख होऊनि जाये । म्हणूनि विसरे ॥ ३७१ ॥

३७१) याप्रमाणें चित्त आपल्या ठिकाणी येऊन राहिल्यावर मग देहतादात्म्य घेत नाहीं व अलौकिक सुखच बनल्यामुळें तें चित्त देहाला विसरतें. 

मूळ श्लोक

तं विद्यात् दुःखसंयोगवियोगं योगसंज्ञितम् ।

स निश्चयेन योक्तव्यो योगोऽनिर्विण्णचेतसा ॥ २३ ॥

२३) त्या दुःखाच्या संयोगानें विहीन अशा सुखाला योग ही संज्ञा आहे, असें जाणावें. निश्चयपूर्वक व उत्साही अंतःकरणानें युक्त होऊन या, योगानें अनुष्ठान करावें.    

जया सुखाचिया गोडी । मन आर्तीची सेचि सोडी ।

संसाराचिया तोंडीं । गुंतलें जें ॥ ३७२ ॥

३७२) ज्या सुखाची चटक लागल्यानें संसाराच्या तोंडांत गुंतलेलें जें मन, तें विषयवासनेची आठवणहि ठेवीत नाहीं;  

जें योगाची बरव । संतोषाची राणीव ।

ज्ञानाची जाणीव । जयालागीं ॥ ३७३ ॥

३७३) जें सुख योगाचें सौभाग्य आहे, संतोषाचें राज्य आहे आणि ज्याच्याकरितां ज्ञान समजून घ्यावयाचें असतें,

तें अभ्यासिलेनि योगें । सावेव देखावें लागे ।

देखिलें तरी आंगें । होईजेल गा ॥ ३७४ ॥

३७४) तें ( सुख ) योगाचा अभ्यास करुन मूर्तिमंत पाहिलें पाहिजे आणि पाहिल्यावर मग, तो पाहणारा आपणच स्वतः सुखरुप होऊन जातो.

मूळ श्लोक

संकल्पप्रभवान् कामांस्त्यक्त्वा सर्वानशेषतः ।

मनसैवेन्द्रियग्रामं विनियम्य समन्ततः ॥ २४ ॥

२४) संकल्पापासून उत्पन्न होणार्‍या सर्व कामांना निःशेष टाकून, सर्व इंद्रियांचें सर्व बाजूंनीं मनानें नियमन करुन,

परि तोचि योगु बापा । एके परी आहे सोपा ।

जरी पुत्रशोकु संकल्पा । दाखविजे ॥ ३७५ ॥

३७५) पण बाबा अर्जुना, एका प्रकारानें तो योग सोपा आहे. ( तो कसा म्हणशील तर ) संकल्पाला पुत्रशोक दाखवावा. [ संकल्पाचा पुत्र जो काम ( विषयवासना ) तो नाहींसा करावा. ]

हा विषयांतें निमालिया आइके । इंद्रियें नेमाचिया धारणीं देखे ।

तरी हियें घालुनि मुके । जीवितांसी ॥ ३७६ ॥

३७६) हा संकल्प जर विषयवासना मेल्या असें ऐकेल व इंद्रियें नेमलेल्या स्थितींत आहेत, असें पाहिल, तर तो ऊर फुटून प्राणास मुकेल.

ऐसें वैराग्य हें करी । तरी संकल्पाची सरे वारी ।

सुखें धृतीचां धवळारीं । बुद्धि नांदे ॥ ३७७ ॥ 

३७७) असें हें वैराग्यानें केलें, तर संकल्पाची येरझार संपते व बुद्धि धैर्याच्या महालांत सुखानें वास करते.    

मूळ श्लोक

शनैः शनैरुपरमेत् बुद्ध्या धृतिगृहीतया ।

आत्मसंस्थं मनः कृत्वा न किंचिदपि चिन्तयेत् ॥ २५ ॥

२५) धैर्ययुक्त असा बुद्धीनें हळूहळू ( बाह्य प्रपंचापासून मनाचा ) उपरम करावा व मनाला आत्म्याच्या ठिकाणीं स्थिर करुन, दुसर्‍या कशाचेंहि चिंतन करुं नये.

यतो यतो निश्चरति मनश्चञ्चलमस्थिरम् ।

ततस्ततो नियम्यैतदात्मन्येव वशं नयेत् ॥ २६ ॥

२६) चंचल वृत्ति ( अत एव ) अस्थिर असें मन ( आत्म्याकडून निघून ) ज्याच्या ज्याच्यामुळें बाहेर जातें त्याच्या त्याच्यापासून नियमन करुन त्याला आत्म्याच्याच ताब्यांत आणावें. 

बुद्धी धैर्या होय वसौटा । तरी मनातें अनुभवाचिया वाटा ।

हळु हळु करी प्रतिष्ठा । आत्मभुवनीं ॥ ३७८ ॥

३७८) बुद्धि जर धर्माला आश्रयस्थान झाली, तर ती मनाला अनुभवाच्या वाटेनें हळूहळू आत्मानुभवांत कायमचें स्थिर करते,  

याही एके परी । प्राप्ति आहे विचारीं ।

हें न ठके तरी सोपारी । आणिक ऐकें ॥ ३७९ ॥

३७९) याहि एका तर्‍हेनें ब्रह्मप्राप्ति आहे, याचा विचार कर आणि हें जर तुला साध्य होत नसेल तर आणखी एक सोपी युक्ति आहे, ती ऐक.

आतां नियमुचि हा एकला । जीवें करावा आपुला ।

जैसा कृतनिश्र्चयाचिया बोला-। बाहेर नोहे ॥ ३८० ॥

३८०) आतां तूं जो निश्चय करशील, त्याच्या आज्ञेच्या बाहेर जो नियम कधी जाणार नाहीं, अशा प्रकारचा हा एकच नियम जीवाभावापासून तूं आपलासा कर.

जरी येतुलेनि चित्त स्थिरावे । तरी काजा आलें स्वभावें ।

न राहे घालावें । मोकलुनी ॥ ३८१ ॥

३८१) जर येवढ्यानें चित्त स्थिर झालें, तर सहजच काम

 झालें, आणि जर येवढ्यानें तेम स्थिर झालें नाहीं तर

 त्याला मोकळें सोडून द्यावें.  

मग मोकलिलें जेथ जेथ जाईल । तेथूनि नियमुचि घेऊनि येईल । ऐसोनि स्थैर्याची होईल । सवे यया ॥ ३८२ ॥

३८२) मन मोकळें सोडलें असतां तें जेथें जाईल, तेथून नियमच त्यास परत घेऊन येईल, अशा रीतीनें यालाहि स्थैर्याची सवय होईल. 

मूळ श्लोक

प्रशान्तमनसं ह्येन योगिनं सुखमुत्तमम् ।

उपैति शान्तरजसं ब्रह्मभूतमकल्मषम् ॥ २७ ॥

२७) ( याप्रमाणें अभ्यास केल्यानें ) ज्याच्या मनाला उत्तम शांती मिळाली आहे, ज्याचा रजोगुण नाश पावला आहे, जो पापपुण्यादिका विरहित आहे व जो ब्रह्मस्वरुप झाला आहे, अशा योग्याला श्रेष्ठ सुख प्राप्त होतें.  

पाठीं केतुलेनि एकें वेळें । तया स्थैर्याचेनि मेळें ।

आत्मस्वरुपाजवळें । येईल सहजें ॥ ३८३ ॥

३८३) नंतर कांहीं एका वेळानें त्या स्थैर्याच्या योगानें मन सहज आत्मस्वरुपाजवळ येईल.

तयातें देखोनि आंगा घडेल । तेथ अद्वैतीं द्वैत बुडेल ।

आणि ऐक्यतेजें उघडेल । त्रैलोक्य हें ॥ ३८४ ॥

३८४) आणि मनानें त्या आत्मस्वरुपास पाहिल्याबरोबर, तें मन स्वतः आत्मस्वरुप होऊन जाईल; तेव्हां त्या अद्वैत स्वरुपांत द्वैत नाहीसें होईल; आणि नंतर हे सर्व त्रैलोक्य ऐक्याच्या तेजानें प्रकाशित होईल.   

आकाशीं दिसे दुसरें । तें अभ्र जैं विरे ।

तैं गगनचि कां भरे । विश्र्व जैसें ॥ ३८५ ॥

३८५) आकाशामध्यें निराळे दिसणारे जे मेघ ते नाहीसे झाल्यावर ज्याप्रमाणें संपूर्ण विश्व आकाशानेंच भरलेलें असतें; 

तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।

ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ॥ ३८६ ॥

३८६) त्याप्रमाणें आत्मस्वरुपीं चित्त लयाला गेलें कीं संपूर्ण विश्व चैतन्यमयच होतें. या सुलभ उपायानें अशी ( एवढी मोठी ) प्राप्ति होते.

मूळ श्लोक

युञ्जन्नेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः ।

सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यन्तं सुखमश्नुते ॥ २८ ॥

२८) या प्रकारें सर्वदा मन आत्म्याच्या ठिकाणीं स्थिर करणारा योगी पापांनी विरहित होतो व अनायासानें ब्रह्मसाक्षात्काररुपीं आत्यंतिक सुख भोगतो. 

या सोपिया योगस्थिति । उकलु देखिला गा बहुतीं ।

संकल्पाचिया संपत्ती । रुसोनियां ॥ ३८७ ॥

३८७) संकल्पाच्या संपत्तीचा ( विषयवासनांचा ) त्याग करुन पुष्कळांनी या सोप्या योगमार्गाचा अनुभव घेतला आहे.

ते सुखाचेनि सांगातें । आले परब्रह्मा आंतौतें ।

तेथ लवण जैसें जळातें । सांडूं नेणे ॥ ३८८ ॥

३८८) ते पुरुष अनायासें परब्रह्माच्या आंत आले. ( ते कसें तर ) मीठ पाण्यांत मिळाले असतां पाण्यास सोडून जसें तें वेगळें राहात नाहीं;   

तैसें होय तिये मेळीं । मग सामरस्याचिया राउळीं ।

महासुखाची दिवाळी । जगेंसि दिसे ॥ ३८९ ॥

३८९) त्याप्रमाणें त्या योग्याची जेव्हां परब्रह्माशीं मिळणी होते, तेव्हां एकस्वरुपाची स्थिति होते. मग समरसतेच्या मंदिरांत संपूर्ण जगासह त्याला महासुखाची दिवाळी दिसते. 

ऐसें आपुले पायवरी । चालिले आपुले पाठीवरी ।

हें पार्था नागवे तरी । आन ऐकें ॥ ३९० ॥

३९०) आपल्या पायांनी आपल्या पाठीवर चालण्यासारखें

 हें आहे. अर्जुना, म्हणून जर तें तुला करतां येणार नाहीं,

 तर दुसरें सांगतों. ऐक.



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 12 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १२

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 12 
Ovya 331 to 360 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग १२ 
ओव्या ३३१ ते ३६०

देवा गोठीचि हे ऐकतां । बोधु उपजतसे चित्ता ।

मा अनुभवें तल्लीनता । नव्हेल केवीं ॥ ३३१ ॥

३३१) देवा, योगाचें हें वर्णनच केवळ ऐकलें असतां चित्तांत ज्ञान उत्पन्न होतें, तर मग अनुभवानें तल्लीनता कशी होणार नाहीं ?    

म्हणऊनि एथ कांहीं । अनारिसें नाहीं ।

परी नावभरी चित्त देईं । बोला एका ॥ ३३२ ॥

३३२) म्हणून तुझ्या सांगण्यांत कांहीं अन्यथा नाहीं; परंतु क्षणभर माझ्या एक बोलण्याकडे लक्ष दे.

आतां कृष्णा तुवां सांगितला योगु । तो मना तरी आला चांगु ।

परि न शके करुं पांगु । योग्यतेचा ॥ ३३३ ॥

३३३) कृष्णा, तूं जो आतां योग सांगितलास, तो माझ्या मनाला तर चांगलाच पटला. परंतु माझ्या ठिकाणीं अधिकाराची उणीव असल्यामुळें मी त्याचें अनुष्ठान करुं शकत नाहीं. 

सहजें आंगिक जेतुली आहे । तेतुलियाची जरी सिद्धि जाये ।

तरी हाचि मार्गु सुखोपायें । अभ्यासीन ॥ ३३४ ॥

३३४) माझ्या अंगांत स्वभावतःच जितकी योग्यता आहे, तेवढ्याच योग्यतेनें जर हा अभ्यास सिद्धीला जाईल, तर याच मार्गाचा मी सुखानें अभ्यास करीन.

नातरी देवो जैसें सांगतील । तैसें आपणपां जरी न ठकेल ।

तरी योग्यतेवीण होईल । तेंचि पुसों ॥ ३३५ ॥

३३५) अथवा देव जसें सांगतील तसें जर आपल्या हातून होणार नसेल, तर योग्यतेशिवाय जे होण्याजोगें असेल तेंच विचारुं,

जीवींचिये ऐसी धारण । म्हणोनि पुसावया जाहलें कारण ।

मग म्हणे तरी आपण । चित्त देइजो ॥ ३३६ ॥

३३६) माझ्या मनाची अशी समजूत झाली म्हणून पुसण्याचें प्रयोजन पडलें; म्हणून मी म्हणतों, आपण ( इकडे ) लक्ष द्यावें.

हां हो जी अवधारिलें । हें जें साधन तुम्हीं निरुपिलें ।

आवडतयाहि अभ्यासिलें । फावों शके ॥ ३३७ ॥

३३७) अहो महाराज, ऐकलें का ? तुम्ही जें हें साधन सांगितलें, त्याचें वाटेल त्यानें अनुष्ठान केलें, तर तें साध्य होईल काय ?

कीं योग्यतेवीण नाहीं । ऐसें हन आहे कांहीं ।

तेथ कृष्ण म्हणती तरी काई । धनुर्धरा ॥ ३३८ ॥

३३८) अथवा, योग्यतेशिवाय प्राप्त होत नाहीं, असें कांहीं ( येथें ) आहे ? ( असें अर्जुनानें विचारलें. ) तेव्हां श्रीकृष्ण म्हणतात, अर्जुना, हें तूं काय विचारतोस ?

हें काज कीर निर्वाण । परि आणिकहि जें कांहीं साधारण ।

तेंहि अधिकाराचे वोडवेविण । काय सिद्धि जाय ॥ ३३९ ॥

३३९) ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे; पण इतर कांहीं साधारण काम असतें, तें तरी अधिकाराच्या योग्यतेशिवाय सिद्धीस जातें काय ?

पैं योग्यता जे म्हणिजे । ते प्राप्तीची आधीन जाणिजे ।

का जें योग्य होऊनि कीजे । तें आरंभीं फळे ॥ ३४० ॥

३४०) परंतु योग्यता जी म्हणावयाची ती प्राप्तीच्या आधीन आहे, असें समजावें; कारण योग्य होऊन जें करावें तें आरंभींच फलदायक होते.

तरी तैसी एथ कांहीं । सावियाचि केणी नाहीं ।

आणि योग्यांची काई । खाणी असे ॥ ३४१ ॥

३४१) तर तसा कांहीं येथें योग्यता हा सहज बाजारांत मिळणारा माल नाहीं; आणि योग्य पुरुषाची खाणी आहे काय ?

नावेक विरक्तु । जाहला देहधर्मीं नियतु ।

तरि तोचि नव्हे व्यवस्थितु । अधिकारिया ॥ ३४२ ॥

३४२) थोडासा विरक्त असून देहाच्या गरजा ज्यानें आवरल्या आहेत, तोच या कामीं योग्य अधिकारी नाहीं काय ?

येतुलालिये आयणीमाजि येवढें । योग्यपण तूंतेंही जोडे ।

ऐसें प्रसंगें सांकडे । फेडिलें तयाचें ॥ ३४३ ॥

३४३) एवढ्या युक्तिनें एवढी योग्यता तुलाहि प्राप्त होईल. ( ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात कीं, ) अशी त्याची अडचण देवांनी ओघानेंच दूर केली.

मग म्हणे गा पार्था । ते हे ऐसी व्यवस्था ।

अनियतासि सर्वथा । योग्यता नाहीं ॥ ३४४ ॥

३४४) मग देव पुढें म्हणतात, अर्जुना, त्याचा असा नियम आहे कीं, जो अनियमित वागतो त्यास मुळीच योग्यता नाहीं.

मूळ श्लोक

नात्यश्नतस्तु योगोऽस्ति न चैकान्तमनश्नतः ।

न चातिस्वप्नशीलस्य जाग्रतो नैव चार्जुन ॥ १६ ॥

१६) पण हे अर्जुना, अति खाणारा, ( अथवा ) अगदींच न खाणारा ( किंवा ) अति झोप घेणारा ( अथवा ) मुळींच झोप न घेणारा, असा ( जो असेल ) त्याला योग प्राप्त होणार नाहीं.

जो रसनेंद्रियाचा अंकिला । कां निद्रेसी जीवें विकला ।

तो नाहीं एथ म्हणितला । अधिकारिया ॥ ३४५ ॥

३४५) जो जिव्हेच्या आधीन आहे किंवा झोपेला जीवापासून वाहिलेला आहे, तो योगाविषयीं अधिकारी आहे असें म्हणतां येत नाहीं.

अथवा आग्रहाचिये बांदोडी । क्षुधा तृषा कोंडी ।

आहारातें तोडी । मारुनियां ॥ ३४६ ॥

३४६) अथवा जो हट्टाच्या बंधनानें भूक व तहान कोंडतो व भुकेला मारुन आहार तोडतो;

निद्रेचिया वाटा नवचे । ऐसा दृढिवेचेनि अवतरणें नाचे ।

तें शरीरचि नव्हे तयाचें । मा योगु कवणाचा ॥ ३४७ ॥

३४७) व जो निद्रेच्या वाटेस जात नाहीं; याप्रमाणें ज्याच्या ठिकाणीं हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो, त्याचें तें शरीरच त्याच्या ताब्यांत राहणार नाहीं, तर मग योग कोण करणार ?    

म्हणोनि अतिशयें विषय सेवावा । तैसा विरोध न व्हावा ।

कां सर्वथा निरोधु करावा । हेंही नको ॥ ३४८ ॥

३४८) म्हणून विषयांचें अतिसेवन करावें अशी विरोधी बुद्धि नसावी; किंवा वाजवीपेक्षां फाजील नियमन करणें हेंहि कामाचें नाहीं. 

मूळ श्लोक

युक्ताहारविहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु ।

युक्तस्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखहा ॥ १७ ॥

१७) ज्याचें खाणें व हिंडणें परिमित आहे, जो सर्व कर्म मापून करतो, ज्याच्या निद्रा व जागर परिमित आहेत, त्याला ( हा ) योग ( संसाररुपी ) दुःखाचा नाश करणारा होतो.

आहार तरी सेविजे । परी युक्तीचेनि मापें मविजे ।

क्रियाजात आचरिजे । तयाचि स्थिती ॥ ३४९ ॥

३४९) अन्न तर सेवन करावें, परंतु नियमाच्या मापानें मोजलेलें असावें; त्याचप्रमाणें इतर सर्व क्रिया कराव्यात.

मपितलां बोलीं बोलिजे । मितलां पाउलीं चालिजे ।

निद्रेही मानु दीजे । अवसरें एकें ॥ ३५० ॥

३५०) मोजके शब्द बोलावेत, नितमित पावलांनीं चालावें व एका योग्य वेळीं झोपेलाहि मान द्यावा.

जागणें जरी जाहलें । तरी व्हावें तें मितलें ।

येतुलेनि धातुसाम्य संचलें । असेल सुखें ॥ ३५१ ॥

३५१) जागावयाचें जरी झालें तरी तेंहि परिमितच असावें; एवढ्यानें अनायासें कफवातादि सर्व धातूंची समता राहील.

ऐसें युक्तिचेनि हातें । जैं इंद्रियां वोपिजे भातें ।

तैं संतोषासी वाढतें । मनचि करी ॥ ३५२ ॥

३५२) अशा नियमितपणानें इंद्रियांना विषय दिले असतां मनच संतोषाला वाढवितें.

मूळ श्र्लोक

यदा विनियतं चित्तमात्मन्येवावतिष्ठते ।

निस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युचते तदा ॥ १८ ॥  

१८)  जेव्हां नियमन केलेलें असें चित्त आत्म्याच्या ठिकाणीं लय पावतें, ( आणि जेव्हां ) सर्व प्रकारच्या इच्छांविषयीं ( साधक ) निरिच्छ होतो, तेव्हां त्याला योग सिद्ध झाला असें म्हणतात.  

बाहेर युक्तीची मुठा पडे । तंव आंत सुख वाढे ।

तेथें सहजेंचि योगु घडे । नाभ्यासितां ॥ ३५३ ॥

३५३) बाह्येंद्रियांना नियमितपणें वळण पडतें आणि मग अंतःकरणांत सुख वाढतें. अशा स्थितींत अभ्यासाचे कष्ट न पडतां योगाचा अभ्यास सहजच होतो.   

जैसें भाग्याचिये भडसे । उद्यमाचेनि मिसें ।

मग समृद्धिजात आपैसें । घर रिघे ॥ ३५४ ॥ 

३५४) ज्याप्रमाणें दैवाचा उदय झाला असतां, मग उद्योगाचें निमित्त होतें; नंतर सर्व ऐश्र्वर्ये आपोआप घरीं चालत येतात;   

तैसा युक्तिमंतु कौतुकें । अभ्यासाचिये मोहरा ठाके ।

आणि आत्मसिद्धीचि पिके । अनुभवु तयाचा ॥ ३५५ ॥

 ३५५) त्याप्रमाणें नियमानें वागणारा पुरुष ज्या वेळेस लीलेनें आपला मोर्चा योगाभ्यासाकडे वळवितो, त्याच वेळेला त्याचा अनुभव आत्मप्राप्तिरुपानें पिकतो. 

म्हणोनि युक्ति हे पांडवा । घडे जया सदैवा ।

तो अपवर्गीचिये राणिवा । अळंकरिजे ॥ ३५६ ॥

३५६) म्हणून अर्जुना, हा नियमितपणा ज्या भाग्यवानाच्या हातून घडतो तो पुरुष मोक्षाच्या राज्यानें अलंकृत होतो.

मूळ श्र्लोक

यथा दीपो निवातस्थो नेङ्गते सोपमा स्मृता ।

योगिनो यतचित्तस्य युञ्जतो योगमात्मनः ॥ १९ ॥

१९) निवार्‍याच्या (ज्या ठिकाणी वारा नाही ) जागीं असलेला दीवा ज्याप्रमाणें हालत नाहीं, तीच उपमा चित्ताचें नियमन केलेल्या व आत्मयोगाचें अनुष्ठान करणार्‍या योगी मनुष्यासंबंधानें जाणावी.    

युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग होय जें बरवें ।

तेथ क्षेत्रसंन्यासें स्थिरावें । मानस जयाचें ॥ ३५७ ॥

३५७) नियम आणि योग ज्या वेळीं एकत्र होतात व असा दोहींचा प्रयागरुप चांगला संगम जेथें होतो, त्या ठिकाणीं ज्याचें मन क्षेत्रसंन्यास करुन स्थिर होतें,

तयातें योगयुक्त म्हण । हेंही प्रसंगें जाण ।

तें दीपाचें उपलक्षण । निर्वातींचिया ॥ ३५८ ॥

३५८) त्याला तूं योगयुक्त म्हण. त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला निर्वात स्थळींच्या दिव्याची उपमा योग्य होईल, हेंहि तूं प्रसंगानुसार समज.

आतां तुझें मनोगत जाणोनि । कांहीं एक आम्ही म्हणोनि ।

तें निकें चित्त देऊनि । परिसावें गा ॥ ३५९ ॥

३५९) आतां तुझ्या मनांतीलअभिप्राय ओळखून तुला मी कांहीं थोडें सांगतों, तें तूं चांगलें चित्त देऊन ऐक.

तूं प्राप्तीची चाड वाहसी । परि अभ्यासीं दक्षु नव्हसी ।

तें सांग पां काय बिहसी । दुबाडपणा ॥ ३६० ॥

३६०) तूं प्राप्तीची इच्छा बाळगतोस, परंतु अभ्यास

 करण्याविषयीं तत्पर असत नाहींस; तर सांग बाबा, तूं

 कठीणपणाला भितोस काय ? 



Custom Search

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 11 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ११

 

Shri Dnyaneshwari Adhyay 6 Part 11 
Ovya 301 to 330 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ६ भाग ११ 
ओव्या ३०१ ते ३३०

ते वेळीं कुंडलिनी हे भाष जाये । मारुत ऐसें नाम होये ।

परि शक्तिपण तें आहे । जंव न मिळे शिवीं ॥ ३०१ ॥

३०१) त्या वेळीं कुंडलिनी ही भाषा जाते व तिला मारुत असें नांव येतें. पण जोपर्यंत ती शिवाशीं एक होत नाहीं, तोपर्यंत तिचें शक्तिपण असतेंच.

मग जालंधर सांडी । ककारांत फोडी ।

गगनाचिये पाहाडीं । पैठी होय ॥ ३०२ ॥

३०२) मग ती प्राणवायुरुप शक्ति जालंधर बंधाचें उल्लंघन करुन टाळ्यावरती नऊ इंद्रियांचें ऐक्य होण्याचें काकीमुख म्हणून स्थान आहे, त्याचा भेद करुन, मग मूर्ध्न्याकाशरुपी पहाडावर जाऊन राहाते. 

ते ॐकाराचिये पाठी । पाय देत उठाउठी ।

पश्यंतीचिये पाउटी । मागां घाली ॥ ३०३

३०३) ती ॐकाराच्या पाठीवर तत्काळ पाय देऊन पश्यंती वाणीची पायरी मागें टाकते. 

पुढां तन्मात्रा अर्धवेरी । आकाशाचां अंतरीं ।

भरती गमे सागरीं । सरिता जैशी ॥ ३०४ ॥

३०४) पुढें समुद्रांत जशा नद्या मिळालेल्या दिसतात, त्याप्रमाणें अर्धमात्रापर्यंतच्या ॐकाराच्या मात्रा मूर्ध्निआकाशांत मिळतात.

मग ब्रह्मरंध्रीं स्थिरावोनी । सोऽहंभावाचिया बाह्या पसरुनीं ।

परमात्मलिंगा धांवोनी । आंगा घडे ॥ ३०५ ॥

३०५) मग ब्रह्मरंध्राच्या ठिकाणीं स्थिर होऊन, ‘ तें ब्रह्म मी ’ या भावनारुप बाहु पसरुन त्वरेनें परब्रह्मरु लिंगाशीं ऐक्य पावते. 

तंव महाभूतांची जवनिक फिटे । मग दोहींसि होय झटें ।

तेथ गगनासकट आटे । समरसीं तिये ॥ ३०६ ॥

३०६) तेव्हां पंचमहाभूतांचा पडदा नाहींसा होऊन मग शक्ति आणि परमात्मा यांचें ऐक्य होतें; त्या ऐक्यांत मूर्ध्निआकाशासकट सगळ्यांचा लय होतो.

पैं मेघाचेनि मुखीं निवडला । समुद्र कां वोघीं पडिला ।

तो मागुता जैसा आला । आपणपेयां ॥ ३०७ ॥

३०७) मेघांच्या द्वारानें समुद्रापासून वेगळें झालेलें समुद्राचें पाणी, नदीच्या ओघांत पडून नदीच्या रुपानें जसें पुनः समुद्रास मिळतें, ( तो समुद्रच नदी रुपानें आपण आपणास मिळतो. )  

तेवीं पिंडाचेनि मिषें । पदीं पद प्रवेशे ।

तें एकत्व होय तैसें । पंडुकुमरा ॥ ३०८ ॥

३०८) हे अर्जुना, त्याप्रमाणें शरीराच्या द्वारें जेव्हां शक्तिरुप टाकून शिवच शिवांत मिळतो, तेव्हां तें एकत्व वरील समुद्राच्या ऐक्याप्रमाणें आहे. 

आतां दुजें हन होतें । कीं एकचि हें आइतें ।

ऐशिये विवंचनेपुरतें । उरेचिना ॥ ३०९ ॥

३०९) आतां द्वैत होतें कीं हें स्वरुप स्वतःसिद्ध एकच होतें, असा विचार करण्यापुरतीहि जागा उतरतच नाहीं.

गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।

तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ॥ ३१० ॥

३१०) चिदाकाशांत मूर्ध्निआकाश लयास जातें, अशी जी कांहीं स्थिति आहे, ती अनुभवानें जो होईल, त्यालाच ती प्राप्त होईल.

म्हणोनि तेथिंची मातु । न चढेचि बोलाचा हातु ।

जेणें संवादाचिया गांवआंतु । पैठी कीजे ॥ ३११ ॥

३११) म्हणून त्या स्थितीचें वर्णन शब्दांनीं सांगताच येत नाहीं आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हांच ती गोष्ट संवादाच्या गांवांत स्थापित करतां येईल.( अर्थात शब्दांनींच सांगतां येत नाहीं तर तिजविषयीं संवादहि होणें शक्य नाही. )    

अर्जुना एर्‍हवीं तरी । इया अभिप्रायाचा जे गर्वु धरी ।

ते पाहें पां वैखरी । दुरी ठेली ॥ ३१२ ॥

३१२) अर्जुना, सहज विचार करुन पाहिलें तर हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते, ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली.

भ्रूलता मागिलीकडे । मकाराचेंचि आंग न मांडे ।

सडेया प्राणा सांकडें । गगना येतां ॥ ३१३ ॥

३१३) भुवईच्या मागल्या बाजूस ( आज्ञाचक्रांत ) मकाराचें स्वरुप राहात नाहीं; इतकेंच नव्हे, तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याला संकट पडतें, 

पाठीं तेथेंचि तो भासळला । तव शब्दांचा दिवो मावळला ।

मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ॥ ३१४ ॥

३१४) नंतर तो प्राणवायु तेथेंच ( मूर्ध्निआकाशांत ) मिळाल तेव्हां शब्दाचा दिवस मावळला. मग त्यानंतर आकाशाचाहि लय झाला.

आतां महाशून्याचां डोहीं । जेथ गगनासीचि ठावो नाहीं ।

तेथ तागा लागेल काई । बोलाचा या ॥ ३१५ ॥

३१५) आतां परब्रह्मरुपी डोहांत जेथें आकाशाचाच थांग लागत नाहीं, तेथें या शब्दरुपी ( नाव ढकलण्याच्या ) वेळूचा लाग लागेल काय ?

म्हणूनि आखरामाजि सांपडे । कीं कानावरी जोडे ।

हें तैसें नव्हे फुडें । त्रिशुद्धी गा ॥ ३१६ ॥

३१६) या कारणास्तव ती ब्रह्मस्थिति अक्षरांत सापडेल ( शब्दांनीं सांगता येईल ) अथवा कानांनीं ऐकतां येईल, अशी खरोखर नाहीं, हें त्रिवार सत्य आहे.

जैं कहीं दैवें । अनुभविलें फावे ।

तैं आपणचि हें ठाकावें । होऊनियां ॥ ३१७ ॥

३१७) जेव्हां कधीं तरी दैवयोगानें तें अनुभवाला प्राप्त होईल, तेव्हां तें आपण होऊन राहावें, असें तें आहे. 

पुढती जाणणें तें नाहींचि । म्हणोनि असो किती हेंचि ।

बोलावें आतां वायांचि । धनुर्धरा ॥ ३१८ ॥

३१८) अर्जुना, तद्रुप झालें म्हणजे त्यापुढें आतां जाणणें कांहीं उरलें नाहीं, म्हणून आतां हें राहूं दे, हेंच व्यर्थ किती बोलावें ?

ऐसें शब्दजात माघौतें सरे । तेथ संकल्पाचें आयुष्य पुरे ।

वाराही जेथ न शिरे । विचाराचा ॥ ३१९ ॥

३१९) याप्रमाणें शब्दमात्र जेथून माघारी परततो, जेथें संकल्प नाहींसा होतो व विचाराचा वाराहि जेथें प्रवेश करुं शकत नाहीं;

जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।

अनादि जें अगण्य । परमतत्त्व ॥ ३२० ॥ 

३२०) जें परमात्म तत्त्व मनरहित अवस्थेचें सौंदर्य आहे व चौथ्या ज्ञानरुप अवस्थेचें तारुण्य आहे आणि जें नित्यसिद्ध व अमर्याद आहे;

जें आकाराचा प्रांतु । जें मोक्षाचा एकांतु ।

जेथ आदि आणि अंलतु । विरोनी गेले ॥ ३२१ ॥

३२१) जें आकाराचा शेवट आहे, जें मोक्षाचें निश्चयाचें ठिकाण आहे, ज्या ठिकाणीं आरंभ आणि शेवट हीं नाहींशीं झाली आहेत; 

जें विश्र्वाचें मूळ । जें योगद्रुमाचें फळ ।

जें आनंदाचें केवळ । चैतन्य गा ॥ ३२२ ॥

३२२) जें त्रैलोक्याचें कारण आहे, जे अष्टांगयोगरुप वृक्षाचें फळ आहे व जें आनंदाची केवळ जीवनकला आहे,

जें महाभूतांचें बीज । जें महातेजाचें तेज ।

एवं पार्था जें निज । स्वरुप माझें ॥ ३२३ ॥ 

३२३) जे पंचमहाभूतांचें बीज आहे, जें सूर्याचें तेज आहे; त्याप्रमाणें अर्जुना, जें माझे खास स्वरुप आहे.

ते हे चतुर्भुज कोंमेली । जयाची शोभा रुपा आली ।

देखोनि नास्तिकीं नोकिलीं । भक्तवृदें ॥ ३२४ ॥

३२४) नासतिकांनी भक्तांचे समुदाय पराभव केलेले पाहून ज्याची ( निर्गुण स्वरुपाची ) शोभा व्यक्ततेला आली, तीच ही आकाराला आलेली चतुर्भुज मूर्ति होय.

ते अनिर्वाच्य महासुख । पैं आपणचि जाहले ते पुरुष ।

जयांचे कां निष्कर्ष । प्राप्तिवेरीं ॥ ३२५ ॥

३२५) ज्या पुरुषांचे निश्चय प्राप्तीपर्यंत टिकतात ते पुरुष असें हें शब्दांतील उत्कृष्ट सुख आपणच बनतात.

आम्हीं साधन हें जें सांगितलें । तेंचि शरीर जिहीं केलें ।

ते आमुचेनि पाडें आले । निर्वाळलेया ॥ ३२६ ॥

३२६) आम्हीं जें हें अष्टांगयोगरुपी साधन सांगितलें, त्या साधनाची मूर्तीच आपलें शरीर ज्यंनी केले, ते योगाभ्यासानें शुद्ध झाल्यावर आमच्या बरोबरीला आले.

परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचीये मुसे ।

वोतींव जाहले तैसें । दिसती आंगें ॥ ३२७ ॥

३२७) देहकृतीच्या मूशींत परब्रह्मरुप ओतून तयार केलेली ( जणू काय ) मूर्तीच तें शरीरानें दिसतात.

जरि हे प्रतीति हन अंतरीं फांके । तरी विश्र्वचि हें अवघें झांके ।

तंव अर्जुन म्हणे निकें । साचचि जी हें ॥ ३२८ ॥

३२८) जर हा अनुभव अंतःकरणांत प्रकाशला तर हें सर्व जग मावळेल. तेव्हां अर्जुन म्हणाला, ठीक हें खरें आहे महाराज.  

कां जे आपण आतां देवो । हा बोलिले जो उपावो ।

तो प्राप्तीचा ठावो । म्हणोनि घडे ॥ ३२९ ॥

३२९) कारण कीं, आतां देवा, आपण जो हा उपाय सांगितला, तो ब्रह्मप्राप्तीचें ठिकाण आहे; म्हणून त्या उपायाने ब्रह्मप्राप्ती होते,

इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसोनि ब्रह्मत्वा येती ।

हें सांगतियाचि रीती । कळळें मज ॥ ३३० ॥

३३०) याचा दृढ निश्र्चयानें जे अभ्यास करतात, ते खात्रीनें

 ब्रह्मत्वास प्राप्त होतात, हें आपल्या सांगण्याच्याच

 रीतीवरुन मला समजलें.




Custom Search