Sunday, September 29, 2019

Kahani Shukravarchi Devichi. कहाणी देवीची


Kahani Shukravarchi Devichi.
This is a kahani of Shukravar Varat. This is performed by a poor Brahman's wife and then by the blessings of Goddess they became rich and all their wishes were fulfilled.
कहाणी देवीची
आटपाट नगर होते. तिथे एक गरीब ब्राह्मण रहात असे. तो दारिद्राने फार पीडला होता. त्याची बायको एके दिवशी शेजारणीकडे बसावयास गेली. तीथे तीन आपल्या गरिबीच  गाण गाइल. शेजारणीने तिला शुक्रवारच व्रत करावयास सांगितले. ती म्हणाली, बाई बाई शुक्रवारच व्रत कर. हे शुक्रवार श्रावण मासापासून धरावे. सारा दिवस उपास करावा. संध्याकाळी सवाष्णीला बोलवाव. तिचे पाय धुवावे. तिला हळदकुंकु द्यावं. तिची ओटी भरावी.साखर घालून दूध प्यायला द्यावे. भाजलेल्या हरभर्‍यांची खिरापत द्यावी. नंतर आपण जेवावे. याप्रमाणे वर्षभर करुन नंतर त्याच उद्यापन करावे. असे सांगितले. ब्राह्मणाची बायको घरी आली. देवाची प्रार्थना केली व शुक्रवारच व्रत करु लागली.
त्याच भावांत तिचा भाऊ रहात असे. तो एके दिवशी सहस्रभोजन घालू लागला. सार्‍या गावाला आमंत्रण गेले. बहिणीला काहीं बोलावले नाही. ती गरीब तिला बोलावले तर लोक हसतील.पुढे दुसर्‍या दिवशी भावाकडे ब्राह्मणांचे थवेच्या थवे येत आहेत, पोटभर जेवीत आहेत. बहिणीने विचार केला, आपला भाऊ सहस्र भोजन घालतो आहे. आपल्याला बोलावणे करायला विसरला असेल. तर आपल्या भावाच्या घरी जायला हरकत नाही. असा मनांत विचार केला. सोवळे नेसली, बरोबर मुलांना घेतले आणि भावाच्या घरी गेली. पुष्कळ पान मांडली होती. एका पानावर जाऊन बसली. शेजारच्या पानांवर मुलांना बसविले. सर्व पान भरली. सार वाढून झाले. तेव्हा तिच्या भावाने तूप वाधायला घेतले. तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. तिला हांक मारली, ताई ताई तुला वस्त्र नाही, पात्र नाही, दागिना नाही. तुझ्याकडे पाहून सगळे लोक हंसतात, ह्यामुळे मी तुला काही बोलावल नाही. आज तू जेवायला आलीस आता उद्या काही येऊ नकोस. असे सांगून पुढे गेला. ही आपली तशीच जेवली. हिरमुसलेल्या तोंडाने मुलांना घेऊन घरी आली. 
दुसरे दिवशी मुले म्हणू लागली, आई आई मामाकडे जेवायला चल. बहिणीने विचार केला, कसा झाला तरी आपला भाऊच आहे. बोलला म्हणून काय झाले ? आपली गरीबी आहे तर आपल्याला ऐकून घेतले पाहिजे. आजचा आपला दिवस बाहेर पडला, तितकाच फायदा झाला. असे म्हणून त्याही दिवशी भावाकडे जेवायला गेली. भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला. ती खाली मान घालून बसली होती. भावाने तिला हाक मारली. ताई ताई भिकारडी ती भिकारडी, आणि सांगतलेले ऐकत नाही. तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितले, तरी आज डुकरिणीसारखी पोरे घेऊन आलीस. तुला लाज कशी वाटली नाही. आज आलीस तर आलीस, उद्या आलीस तर हात धरुन घालवून देईम. तिने ते मुकाट्याने ऐकून घेतले, जेवून उठून चालती झाली. पुन्हा तिसरे दिवशी जेवातला गेली. भावाने पाहिले, हात धरुन घालवून दिले. ही फार दुःखी झाली. देवीची प्रार्थना केली. सारा दिवस उपास घडला. देवीला तिची दया आली. देवी हीला दिवसानुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली. 
असे करता वर्ष सरले ब्राह्मण बाईचे दारिद्र्य गेल. पुढे एके दिवशी ती शुक्रवार व्रताचे उद्यापन करु लागली. भावाला जेवायला बोलावले. भाऊ मनांत ओशाळला. बहिणीला म्हणू लागला, ताई ताई उद्या तू माझ्या घरी जेवायला ये. नाही कांही म्हणू नको. घरी काही जेऊ नको. उद्या तू आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही. बहिणीने बर म्हटले. भावाच्या मनांतले कारण जाणले.
दुसर्‍या दिवशी लवकर उठली. वेणीफणी केली. दागदागिने ल्यायली, उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली. तो भाऊ वाटच पहात होता. ताई आली तसा तिचा हात धरला, पाटावर बसवले. पाय धुवायला गरम पाणी पायावर घालून पाय धुतले. इतक्यांत जेवायची पान मांडली असा निरोप आला. ताईच पान आपल्या शेजारी मांडले. भाऊ जेवायला बसला. ताईने शालजोडी काढून बसल्या पाटी ठेवली. भावाला वातले उकडत असेल म्हणून ताईने शालजोडी काढून ठेवली असेल. नंतर ताई आपले दागिने काढू लागली. बसल्या पाटी ठेवू लागली. भावाने विचार केला, जड झाले म्हणून काढत असेल. नंतर ताईने भात कालवला, मोठासा घास करुन सरीवर ठेवला. भाजी उचलून ठुशीवर ठेवली. लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला. जिलबी उचलून मोत्याच्या पेंडावर ठेवली. भावाने विचारले ताई ताई हे काय करतेस? ताई म्हनाली दादा मी करते तेच बरोबर आहे. जिला तू जेवायला सांगितलस, तिला मी भरवते आहे. भावाला काही हे समजेना. त्याने तिला पुन्हा सांगितले, ताई आता पुरे तू जेव. यावर ताईने दादाला सांगितले अरे हे माझे जेवण नव्हे. हे जेवण ह्या लक्ष्मीचे आहे. माझे जेवण मी तुझ्या सहस्र भोजनाचे दिवशीच जेवले. इतके ऐकल्यावर भाऊ मनांत ओशाळला. तो तसाच उठला आणि त्याने बहिणीचे पाय धरले. केलेल्या अपराधाची क्षमा मागितली. बहिणीने क्षमा केली. नंतर दोघेजण जेवली. त्यांनी मनांतली आढी काढून टाकली. दोघांनी देवीचे आभार मानले. भाऊ बहिणीकडे जेवायला गेला. तिला आनंद झाला. देवीने जसे तिला धनवान, समर्थ करुन आनंदित केले तसे तुम्हा आम्हा करो. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.



Custom Search