Friday, January 20, 2023

BhaktiYoga Part 12 Adhyay 12 Ovya 241 to 247 भक्तियोग भाग १२ अध्याय १२ ओव्या २४१ ते २४७

 

BhaktiYoga Part 12 
Shri Dnyaneshwari Adhyay 12
Ovya 241 to 247 
भक्तियोग भाग १२ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या २४१ ते २४७

जो धर्मकीर्तिधवळु । अगाध दातृत्वें सरळु ।

अतुलबळें प्रबळु । बळिबंधनु ॥ २४१ ॥

२४१) ज्याची ( धर्मरक्षक म्हणून ) कीर्ति उज्ज्वल आहे, अपार औदर्याने जो वैषम्यभावरहित आहे, तुलना करतां यावयाची नाहीं, अशा पराक्रमानें जो बलाढ्य आहे व जो बळीच्या बंधनांत राहिला;

जो पैं सुरसहायशीळु । लोकलालनलीळु ।

प्रणतप्रतिपाळु । हा खेळु जयाचा ॥ २४२ ॥

२४२) देवांना साह्य करणें हा ज्याचा स्वभाव आहे. लोकांचे संगोपन करणें ही ज्याची लीला आहे, शरण आलेल्याचा प्रतिपाळ करणें हा ज्याचा खेळ आहे;

जो भक्तजनवत्सलु । प्रेमजनप्रांजलु ।

सत्यसेतु सरळु । कलानिधि ॥ २४३ ॥

२४३) जो भक्तांविषयीं मायाळू आहे व जो प्रेमळ जनांना सुलभ आहे आणि ज्या परमात्म्याकडे जाण्यास सत्य हाच सरळ पूल आहे व जो कलांचा ठेवा आहे;

तो कृष्णजी वैकुंठींचा । चक्रवर्ती निजांचा ।

सांगतुसे येरु दैवाचा । आइकतु असे ॥ २४४ ॥

२४४) तो भक्तांचा सार्वभौम राजा व वैकुंठीचा श्रीकृष्णपरमात्मा सांगत आहे व भाग्यवान अर्जन ऐकत आहे.

आतां ययावरी । निरुपिती परी ।

संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥ २४५ ॥

२४५) आतां यानंतर भगवंतांचा व्याख्यान करण्याचा प्रकार ऐका, असें संजय धृतराष्ट्रास म्हणाला.

तेचि रसाळ कथा । मर्‍हाठिया प्रतिपथा ।

जाणिजेल आतां । अवधारिजो ॥ २४६ ॥

२४६) तीच रसानें भरलेली कथा मराठी भाषेच्या रुपांतरांत आणली जाईल; ती आपण ऐकावी.

ज्ञानदेव म्हणे तुम्ही । संत वोळगावेति आम्ही ।

हें पढविलों जी स्वामी । निवृत्तिदेवीं ॥ २४७ ॥

२४७) ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात; महाराज, प्रभु निवृत्तिदेवांनीं आम्हाला हे शिकविलें आहे कीं, आम्हीं तुम्हां संताची सेवा करावी.  

॥ इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादेभक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ ( श्लोक २०; ओव्या २४७ )

॥ श्रीसच्चिदानन्दार्पणमस्तु ॥   



Custom Search

BhaktiYoga Part 11 Adhyay 12 Ovya 226 to 240 भक्तियोग भाग ११ अध्याय १२ ओव्या २२६ ते २४०

 

BhaktiYoga Part 11 
Shri Dnyaneshwari Adhyay 12 
Ovya 226 to 240 
भक्तियोग भाग ११ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या २२६ ते २४०

तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ।

परि तयाचें चरित्र । ऐकती जे ॥ २२६ ॥

२२६) त्याच्याशी आमची मैत्री असते. यांत काय आश्र्चर्य आहे ? परंतु त्यांचें चरित्र जे ऐकतात, 

तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।

जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥ २२७ ॥

२२७) जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हांला प्राणापलीकडे आवडतात, हें खरें आहे.

जें  हें अर्जुना साद्यंत । सांगितलें प्रस्तुत ।

भक्तियोगु समस्त । योगरुप ॥ २२८ ॥

२२८) अर्जुना, जें हें खरें समस्त योगरुप आम्ही तुला सांगितलें तें म्हणजे आम्हीं तुला ( आतां ) आदिअंतासहित भक्तियोग पूर्णपणें सांगितला.

जे मी प्रीति करीं । कां मनीं शिरसा धरीं ।

येवढी थोरी । जया स्थितीये ॥ २२९ ॥

२२९) ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे कीं, त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीति करतों. मी त्याचें ध्यान करतों, अथवा त्याला मस्तकावर धारण करतों.

मूळ श्लोक

ये तु धर्म्यामृतं सांगणमिदं यथोक्तं पर्युपासते ।

श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रीयाः ॥ २० ॥

२०) आणि श्रद्धायुक्त व मी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त, हें जें माझें धर्म्य व अमृतासारखें आहे, त्याचे सेवन करतात, ( त्याप्रमाणें आचरण करतात ) ते मला अत्यंत प्रिय आहेत. 

ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य ।

करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥ २३० ॥

२३०) ती ही गोष्ट ( वर सांगितलेलें तें हें भक्तियोगाचें वर्णन ) जी चित्ताला रंजविणारी, अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी गोष्ट आहे. ती ऐकून जें पुरुष तिला स्वानुभवाने जाणतात.  

तैसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचां ठायीं विस्तरे ।

जीवीं जया थारे । जे अनुष्ठिती ॥ २३१ ॥ 

२३१) त्याचप्रमाणें ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे, हा भक्तियोग विस्तार पावतो; एवढेंच नव्हे तर जयांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचें अनुष्ठान करतात.

परि निरुपती जैसी । तैसीच स्थिति मानसी ।

मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥ २३२ ॥

२३२) पण ज्याप्रमाणें मी मनाची स्थिति निरुपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिति असेल, तर तशा मनांत हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतांत पेरणी केल्याप्रमाणें आहे.

परि मातें परम करुनि । इये अर्थी प्रेम धरुनि ॥

हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥ २३३ ॥

२३३) परंतु जे मला श्रेष्ठ प्राप्तव्य समजतात व या भक्तितत्वाविषयीं आपल्या मनांत प्रेम बाळगून व हेंच आपलें सर्व भांडवल आहे, अशी समजूत ठेवून, जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात;

पार्था गा जगं । तेचि भक्त तेचि योगी ।

उत्कंठा तयालागीं । अखंड मज ॥ २३४ ॥

२३४) अगा अर्जुना, या जगामध्यें तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते.  

ते तीर्थ ते क्षेत्र । जगीं तेचि पवित्र ।

भक्तिकथेसी मैत्र । जयां पुरुषां ॥ २३५ ॥

२३५) तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामध्यें तेच पवित्र कीं, ज्या पुरुषांचा भक्तिकथेशीं स्नेह असतो.

आम्ही तयाचें करुं ध्यान । तो आमुचें देवतार्चन ।

तेवांचूनि आन । गोमटें नाहीं ॥ २३६ ॥


२३६) आम्ही त्याचें ध्यान करुं, ते आमची पूजन करण्याची देवता आहेत, त्यांच्यावांचून आम्ही दुसरें कांहीं चांगलें, मानीत नाहीं. 

तयाचें आम्हां व्यसन । तो आमुचें निधिनिधान ।

किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥ २३७ ॥

२३७) त्यांचें आम्हांस व्यसन ( छंद ) असतें व तेंच आमच्या ठेव्याची खाण आहेत. फार काय सांगावें ! तें आम्हांला भेटतात तेव्हांच आम्हांस समाधान वाटतें.  

पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पांडुसुता ।

ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥ २३८ ॥

२३८) परंतु अर्जुना, जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतों.

ऐसें निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें ।

बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥ २३९ ॥

२३९) आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचें मूळ कारण आहे तो मुकुंद याप्रमाणें बोलला, असें संजय धृतराष्ट्राला म्हणाला, 

राया जो निर्मळु । निष्कल लोककृपाळु ।

शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥ २४० ॥   

२४०) हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ, पूर्ण, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे.


Custom Search

Thursday, January 19, 2023

Bhakati Yoga Part 10 Adhyay 12 Ovya 207 to 225 भक्तियोग भाग १० अध्याय १२ ओव्या २०७ ते २२५

 

Bhakati Yoga Part 10 
Shri Dnyaneshwari Adhyay 12
Ovya 207 to 225 
भक्तियोग भाग १० 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या २०७ ते २२५

मूळ श्लोक

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनचित् ।

अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥

१९) निंदा व स्तुति समान माननारा, मौनी, जें जें कांहीं मिळेल त्यामध्यें संतोषवृत्ति ठेवणारा, कोठेंच आश्रय धरुन न राहणारा, स्थिरबुद्धि असलेला जो भक्तिमान, मनुष्य, तो मला प्रिय आहे. 

जों निंदेतें नेघे । स्तुति न श्र्लाघे ।

आकाशा न लगे । लेपु जैसा ॥ २०७ ॥

२०७) जो निंदेनें खिन्न होत नाही व स्तुतीनें चढून जात नाही; ज्याप्रमाणें आकाशाला रंगाचा लेप लागणें शक्य नाही;

तैसें निंदे आणि स्तुती । मानु करुनि एके पांती ।

विचरे प्राणवृत्ती । जनीं वनीं ॥ २०८ ॥

२०८) त्याप्रमाणें निंदा अथवा स्तुति यांचा त्याच्या मनावर कांहीं एक परिणाम होत नसल्यामुळें तो निंदा आणि स्तुति यांस सारखाच मान देऊन, प्राणासारख्या उदास वृत्तीनें लोकांमध्यें व रानामध्यें संचार करितो.

साच लटिकें दोन्ही । बोलोनि न बोले जाहला मौनी ।

जे भोगिता उन्मनी । आरायेना ॥ २०९ ॥  

२०९) खरें व खोटें हीं दोन्हीं बोलून न बोलण्यासारखें असल्यामुळें तो मौनी झाला आहे; कारण कीं, तो उन्मनी अवस्था भोगीत असतां त्यास पुरेसें वाटत नाहीं,  

जो यथालाभें न तोखे । अलाभें न पारुखे ।

पाउसेंवीण न सुके  । समुदु जैसा ॥ २१० ॥

२१०) जो ज्या वेळेला मिळेल त्यानें हृष्ट होत नाही व ज्याप्रमाणें समुद्र पावसांवाचून सुकत नाही, त्याप्रमाणें कांहीं न मिळालें तरी जो खिन्न होत नाही; 

आणि वायूसि एके ठायीं । बिढार जैसें नाहीं ।

तैसा न धरीच केंहीं । आश्रयो जो ॥ २११ ॥

२११) आणि ज्याप्रमाणें वायु हा कोठेहि एकच जागा धरुन राहात नाहीं, त्याप्रमाणें तो कोठेंहि आश्रय धरीत नाहीं;

आघवाचि आकाशस्तिति । जेवीं वायूसि नित्य वसति ।

तेवीं जगचि विश्रांति- । स्थान जया ॥ २१२ ॥

२१२) ज्याप्रमाणें आकाशाच्या सर्व विस्तारांत वायूची नित्य वस्ती आहे, त्याप्रमाणें संपूर्ण जग हें ज्यांचे विश्रांतिस्थान आहे;

हें विश्र्वचि माझें घर । ऐसी मती जयाची स्थिर ।

किंबहुना चराचर । आपण जाहला ॥ २१३ ॥

२१३) हें विश्र्वच माझें घर आहे, असा ज्याचा दृढनिश्र्चय झालेला असतो, फार काय सांगावें । सर्व स्थावरजंगमात्मक जग जो ( अनुभवाच्या अंगानें ) आपणच बनला आहे.

मग याहींवरी पार्था । माझां भजनीं आस्था ।

तरी तयातें मी माथां । मुकुट करीं ॥ २१४ ॥

२१४) अर्जुना, इतकें असूनहिं आणखीहि ज्याची माझ्या भजनाच्या ठिकाणी आस्था असते, तर त्याला मी आपल्या डोक्यावरचा मुकुट करतों.

उत्तमासी मस्तक । खालविजे हें काय कौतुक ।

परि मानु करिती तिन्ही लोक । पायवणिया ॥ २१५ ॥

२१५) उत्तम भक्तांपुढें मस्तक नम्र करणें यांत काय मोठें नवल आहे ? पण उत्तम भक्ताच्या चरणोदकाला त्रैलोक्य मान देतें.  

तरि श्रद्धावस्तूसि आदरु । करिता जाणिजे प्रकारु ।

जरी होय श्रीगुरु । सदाशिवु ॥ २१६ ॥

२१६) जर शंकर श्रीगुरु होतील तरच भक्तितत्त्वचा आदर करण्याचा प्रकार जाणतां येईल. 

परि हें असो आतां । महेशातें वानितां ।

आत्मस्तुति होता । संचारु असे ॥ २१७ ॥

२१७) पण, आतां हें शंकरांचें वर्णन पुरे. कारण शंकरांचे वर्णन करण्यांत आत्मस्तुतीच केल्यासारखी होते. [ भक्ततत्त्वाचा आदर कसा करावा, हे शंकरच जाणतात. हें कशावरुन ? तर माझ्या ठिकाणीं असलेली भक्ति, ही त्यांनी, माझें चरणोदक ( गंगा ) मस्तकावर धारण करुन व्यक्त केली, असें माझें चरणोदक धारण करणारे गुरु पाहिजेत असें म्हणण्यांत अप्रत्यक्ष रीतीनें मी आपली स्वतःची स्तुति केल्यासारखी होते, म्हणून शंकरांचे वर्णन पुरे. असें भगवान ह्या ओवींत सांगतात. ]  

ययालागीं हें नोहे । म्हणितलें रमानाथें ।

अर्जुना मी वाहें । शिरीं तयातें ॥ २१८ ॥  

२१८) एवढ्याकरितां हें बोलणें नको, असें लक्ष्मीपति श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, मी त्याला डोक्यावर वाहतों. 

जे पुरुषार्थ सिद्धी चौथी । घेऊनि आपुलां हातीं ।

रिगाला भक्तिपंथी । जगा देतु ॥ २१९ ॥

२१९) कारण कीं, तो भक्त चौथी पुरुषार्थसिद्धि जो मोक्ष, तो आपल्या हातात देऊन भक्तीच्या मार्गानें जगाला मोक्ष देण्यास निघाला.

कैवल्याचा अधिकारी । मोक्षाची सोडी बांधी करी ।

कीं जळाचिये परी । तळवटु घे ॥ २२० ॥

२२०) तो मोक्षाचा अधिकारी म्हणजे मोक्ष देण्यास समर्थ ( असा ) असतो, म्हणून तो मोक्षाचा व्यवहार चालवितो; ( म्हणजे मोक्ष कोणाला द्यावा अथवा न द्यावा, हें, तो ठरवीतो ) व इतका समर्थ असूनहि, तो पाण्यासारखा नम्र असतो.

म्हणोनि गा नमस्कारुं । तयातें आम्ही माथां मुगुट करुं ।

तयाची टांच धरुं । हृदयीं आम्ही ॥ २२१ ॥

२२१) म्हणून आम्ही त्याला नमस्कार करुं. त्याला आम्ही डोक्यावरचा मुकुट करुं व त्याचीं टांच आम्ही हृदयावर धरुं.

तयाचिया गुणांची लेणीं । लेववूं अपुलिये वाणी ।

तयाची कीर्ति श्रवणीं । आम्ही लेऊं ॥ २२२ ॥

२२२) त्याच्या गुणांचे अलंकार आम्ही आपल्या वाचेला घालूं ( आम्ही आपल्या वाचेनें त्याचे गुण गाऊं ), आणि त्याची कीर्ति हाच, कोणी दागिना, तो आम्ही आपल्या कानांत घालूं. ( कानानी आम्ही त्याची कीर्ति ऐकूं ,) 

तो पाहावा हे डोहळे । म्हणोनि अचक्षूसी मज डोळे ।

हातींचेनि लीलाकमळें । पुजूं तयातें ॥ २२३ ॥

२२३) तो पाहावा, ही आम्हांला इच्छा होते. म्हणून आम्ही डोळेरहित आहोत. तरी डोळे धारण करतों, आणि अमच्या हातांतील क्रीडेच्या कमळानें आम्ही त्याची पूजा करतों.  

दोंवरी दोनी । भुजा आलों घेउनि ।

आलिंगावयालागुनी । तयाचें आंग ॥ २२४ ॥

२२४) त्याच्या शरीराला आलिंगन देण्याकरितां दोन हातांवर आणखी दोन हात घेऊन आलों. ( म्हणजे मी चतुर्भुज सगण रुप धारण केलें. )   

तया संगाचेनि सुरवाडें । मज विदेहा देह धरणें घडे ।

किंबहुना आवडे । निरुपमु ॥ २२५ ॥  

२२५) त्यांच्या संगतीच्या सुखाकरितां मी देहरहित, त्या

 मला देह धारण करावा लगतो. फार काय सांगावें ? तो

 मला किती आवडतो याला उपमाच नाहीं. 



Custom Search

BhaktiYoga Part 9 Adhyay 12 Ovya 186 to 206 भक्तियोग भाग ९ अध्याय १२ ओव्या १८६ ते २०६

 

BhaktiYoga Part 9
Shri Dnyaneshwari Adhyay 12
Ovya 186 to 206 
भक्तियोग भाग ९ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या १८६ ते २०६

कीं भक्तिसुखालागीं । आपणपेंचि दोही भागीं ।

वांटूनिया आंगीं । सेवकै वाणी ॥ १८६ ॥

१८६) तथापि भक्तिसुखाकरितां आपल्यांतच ( देव व भक्त असे ) दोन भाग करुन तो आपल्या ठिकाणीं सेवाधर्म स्वीकारतो.

येरा नाम मी ठेवी । मग भजती वोज बरवी ।

न भजतया दावी । योगिया जो ॥ १८७ ॥

१८७) व दुसर्‍या भागाला मी ( देव ) असें नांव ठेवतो. याप्रमाणें देव व भक्त, या दोन्ही कल्पना आपल्यांतच सारख्या कल्पून, अद्वैतांत भजन करणे शक्य नाहीं, अशा समजुतीनें भजन न करणार्‍या लोकांना, जो भजनाची चांगली पद्धत ( आचरुन ) दाखवितो.

तयाचें आम्हां व्यसन । आमुचें तो निजध्यान ।

किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥ १८८ ॥

१८८) त्या भक्ताचा आम्हांला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावें ! त्याची जेव्हा आम्हांस भेट होते, तेव्हांच आम्हांस समाधान वाटतें.  

तयालागीं मज रुपा येणें । तयाचेनि मज एथें असणें ।

तया लोण कीजे जीवें प्राणें । ऐसा पढिये ॥ १८९ ॥

त्याच्याकरितां मला सगुण मूर्ति धारण करावी लागते. आणि त्याच्याकरितांच ( मला सगुण विग्रहानें ) या जगांत राहावें लागतें, तो मला इतका आवडतो की, त्यावरुन जीव व प्राण ओवाळून टाकावेत.

मूळ श्लोक

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति ।

शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥

१७) जो हर्ष पावत नाही, द्वेष करीत नाहीं, शोक करीत नाहीं, ( अप्राप्त वस्तूची ) इच्छा करीत नाहीं, चांगलें व वाईट या दोन्हींचा त्याग केलेला जो भक्तिमान् मनुष्य असतो, तो मला प्रिय आहे. 

जो आत्मलाभासारिखें । गोमटें कांहींचि न देखे ।

म्हणोनि भोगविशेखें । हरिखेजेना ॥ १९० ॥

१९०) जो आत्मप्राप्तीच्या तोडीचें दुसरें कांहींच चांगलें समजत नाहीं, म्हणून जो एखाद्या विशेष भोगाने आंनदित होत नाही;

आपणचि विश्र्व जाहला । तरि भेदभावो सहजचि गेला ।

म्हणोनि द्वेषु ठेला । जया पुरुषा ॥ १९१ ॥

१९१) आपणच विश्व आहोंत अशी समजूत बनलेली असल्यामुळें, त्याचा भेदभाव अनायासानेंच नाहींसा झालेला असतो, म्हणून ज्या पुरुषाच्या ठिकाणीं द्वेषबुद्धि राहिलेली नसते;

पैं आपुलें जें साचें । तें कल्पांतीही न वचे ।

हें जाणोनि गताचें । न शोची जो ॥ १९२ ॥

१९२) आपलें जें खरें ( त्रिकालाबाधित आत्मस्वरुप ) आहे, तें कल्पाच्या अंताच्या वेळीदेखील ( आपणापासून ) जात नाही, हें जाणून जो गेल्याचा शोक करीत नाही;

आणि जयापरौतें कांहीं नाहीं । तें आपणपेंचि आपुलां ठायीं ।

जाहला यालागीं जो कांहीं । आकांक्षी ना ॥ १९३ ॥

१९३) आणि ज्याच्या पलीकडे कांहीं नाहीं, असें जें ब्रह्म तें तो पुरुष आपण आपल्या ठिकाणीं झाल्यामुळे कशाचीच इच्छा करीत नाही;

वोखटें कां गोमटें । हें कांहींचि तया नुमटे ।

रात्रिदिवस न घटे । सूर्यासि जेवीं ॥ १९४ ॥

१९४) सूर्याच्या ठिकाणीं रात्र किंवा दिवस, हे दोन्ही जसें घडत नाहींत, त्याप्रमाणें वाईट किंवा बरें हें त्याला कांहींच वाटत नाहीं,   

ऐसा बोधुचि केवळु । जो होऊनि निष्फळु ।

त्याहीवरी भजनशीळु । माझां ठायीं ॥ १९५ ॥

१९५) असा जो केवळ अखंड बोधरुप असून त्याशिवाय आणखी, जो माझ्या ठिकाणीं भजनशील असतो, 

तरि तया ऐसें दुसरें । आम्हां पढियंतें सोयरें ।

नाहीं गा साचोकारें । तुझी आण ॥ १९६ ॥    

१९६) तरी अरे अर्जुना, त्याच्यासारखें दुसरें आवडतें नातलग मनुष्य आम्हांला खरोखर कोणी नाही, हें तुझी शपथ वाहून सांगतों.     

मूळ श्लोक

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः ।

शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥

१८) शत्रु व मित्र, मान व अपमान यांच्या ठिकाणीं समान असणारा, शीत व उष्ण, सुख व दुःख यांच्या ठिकाणीं समान असणारा, ( अंतर्बाह्य ) संगरहित.      

पार्था जयांचा ठायीं । वैषम्याची वार्ता नाहीं ।

रिपुमित्रां दोहीं । सरिसा पाडु ॥ १९७ ॥

१९७) अर्जुना, ज्याच्या ठिकाणीं भेदभावाची गोष्टहि नाहीं, शत्रु आणि मित्र या दोघांची ज्याच्या ठिकाणीं सारखी योग्यता आहे;

कां घरींचियां उजियेडु करावा । पारखियां आंधारु पाडावा ।

हें नेणेचि गा पांडवा । दीपु जैसा ॥ १९८ ॥

१९८) अथवा घरच्या माणसांना ( तेवढा ) उजेड पाडावा व परक्या माणसांना अंधार पाडावा, हे जसें दिव्याला माहीत नसतें;   

जो खांडावया घावो घाली । कां लावणी जयानें केली ।

दोघां एकचि साउली । वृक्ष दे जैसा ॥ १९९ ॥

१९९) जो तोडण्याकरितां घाव घालतो किंवा जो लागवड करतो, त्या दोघांना वृक्ष जसा सारखी सावली देतो;

नातरी इक्षुदंडु । पाळितया गोडु ।

गाळितया कडु । नोहेचि जेवीं ॥ २०० ॥  

२००) अथवा ज्याप्रमाणे ऊंस हा आपल्या पिकास पाणी घालून वाढविणाराला गोड, व चरकांत घालून गाळणाराला कडू असा असत नाहीं.   

अरिमित्रीं तैसा । अर्जुना जया भावो ऐसा ।

मानापमानीं सरिसा । होतु जाय ॥ २०१ ॥

२०१) अर्जुना, त्याप्रमाणें शत्रुमित्रांच्या ठिकाणीं ज्याचा असा भाव आहे व ज्याच्या मनाची स्थिति मानाच्या व अपमानाच्या वेळीं सारखीच राहाते; 

तिहीं ऋतूं समान । जैसे कां गगन ।

तैसें एकचि मान । शीतोष्णीं जया ॥ २०२ ॥

२०२) तिन्ही ॠतूंमध्यें आकाश जसें सारखें असतें, त्याप्रमाणे थंड व उष्ण इत्यादि द्वंद्वांची किंमत ज्याच्याजवळ सारखीच असते; 

दक्षिण उत्तर मारुता । मेरु जैसा पांडुसुता ।

तैसा सुखदुःखप्राप्ता । मध्यस्थु जो ॥ २०३ ॥

२०३) अर्जुना, दक्षिण दिशेकडील व उत्तर दिशेकडील वार्‍यांमध्ये जसा मेरु पर्वत ( अचल असतों ) तसा प्राप्त होणारीं जों सुखदुःखें त्यांमध्यें जो अचल असतो; 

माधुर्यें चंद्रिका । सरिसी राया रंका ।

तैसा जो सकळिकां । भूतां समु ॥ २०४ ॥

२०४) ज्याप्रमाणें चांदणें आपली मधुरता राजा आणि रंक यांस सारखीच अनुभविण्यास देतें, तसा जो सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी सारखा असतो;

आघविया जगा एक । सेव्य जैसें उदक ।

तैसें तयांतें तिन्ही लोक । आकांक्षिती ॥ २०५ ॥

२०५) ज्याप्रमाणें पाणी हे सर्व जगाला एकच सेव्य आहे, त्याप्रमाणें ज्या भक्ताची स्वर्ग, मृत्यु व पाताळ हे तिन्ही लोक इच्छा करितात; 

जो सबाह्यसंगु । सांडोनिया लागु ।

एकाकी असे आंगु । आंगीं सूनी ॥ २०६ ॥

२०६) जो अंतर्बाह्य संगाचा संबंध सोडून जीव स्वरुपाचा

 ब्रह्मस्वरुपांत प्रवेश करुन एकाकी असतो.



Custom Search