Friday, February 11, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 10 Part 5 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १० भाग ५

 

Shri Dnyaneshwari 
Adhyay 10 Part 5
Ovya 119 to 140 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय १० भाग ५ 
ओव्या ११९ ते १४०

मूळ श्लोक

मच्चित्ता मद् गतप्राणा बोधयन्तः परस्परम् ।

कथयन्तश्च मां नित्यं तुषन्ति च रमन्ति च ॥ ९ ॥

९) माझ्या ठिकाणीं ज्यांचें चित्त आहे ( म्हणून जे मद्रूप झाले ) व माझ्या ठिकाणीं ज्यांचे प्राण आहेत ( म्हणून माझ्या योगानें जे तृप्त झाले आहेत. ) असे ( ते ज्ञानी ) परस्परांना ( माझ्याविषयीं ) ज्ञान देत, आणि नित्य माझ्या ( गुणांचे ) वर्णन करीत समाधान पावतात व आनंदांत मग्न होतात.

चित्तें मीचि जाहाले । मियांची प्राणे धाले ।

जीवों मरों विसरले । बोधाचि भुली ॥ ११९ ॥

११९) अंतःकरणानें ते माझेंच स्वरुप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरुपानुभवानें तृप्त झालेले असतात; व अशा स्थितींत बोधाच्या भुलीमुळे जन्ममरणाला विसरतात.

मग तया बोधाचेनि माजें । नाचती संवादसुखाचीं भोजें ।

आतां एकमेकां घेपे दीजे । बोधचि वरी ॥ १२० ॥

१२०) मग त्या ज्ञानाच्या मदानें, प्रश्र्नोत्तररुप चर्चेच्या आनंदांत प्रेमानें नाचतात. आतां ते एकमेकांस ज्ञानच देतात व घेतात. 

जैशीं जवळिकेंचीं सरोवरें । उचंबळलिया कालवती परस्परें ।

मग तरंगासि धवळारें । तरंगचि होती ॥ १२१ ॥

१२१) ज्याप्रमाणें जवळ असणारी दोन तळी उसळलीं असतां, त्यांचे पाणी उसळून एकमेकांत मिसळतें, अशा स्थितीत लाटांत लाटांचीच घरें होतात .  

तैसी येरयेरांचिये मिळणी । पडत आनंदकल्लोळांची वेणी ।

तेथ बोध बोधाची लेणीं । बोधेंचि मिरवी ॥ १२२ ॥

१२२) त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळालेअसतां आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते; अशा स्थितीत बोध बोधानेंच बोधांचे अलंकार मिरवतो. 

जैसें सूर्ये सूर्यातें वोवाळिलें । कीं चंद्रे चंद्रम्या क्षेम दिधलें ।

नातरी सरिसेनि पाडें मीनले । दोनी वोध ॥ १२३ ॥

१२३) ज्याप्रमाणें सूर्यानें सूर्याला ओंवाळावें, किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावें; अथवा सारख्या योग्यतेचे दोन प्रवाह एके ठिकाणीं येउन मिळावेत ,

तैसें प्रयाग होत सामरस्याचें । वरी वोसाण तरत सात्त्विकाचें ।

ते संवादचतुष्यर्थींचें । गणेश जाहले ॥ १२४ ॥

१२४) ( प्रयागास जसा गंगा व यमुना यांचा संगम होतो ) तसा तेथें ( म्हणजे भक्ताला भक्त जेव्हां भेटतात तेथें ) ऐक्यरसाचा संगम होतो व त्या ऐक्यरसाच्या पुरावर अष्टसात्त्विक भावांचें पुराड तरतें, ते भक्त संवादरुपी चव्हाट्यावरचे गणपति झालें;

तेव्हां तया महासुखाचेनि भरें । धांवोनि देहाचिये गांवाबाहेरें ।

मियां धालें तेणें उद्गारें । लागती गाजों ॥ १२५ ॥

१२५) तेव्हां त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरुप गांवाबाहेर धावत येउन ( देहतादात्म्य टाकून ) माझें सुख मिळाल्यामुळें प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना करावयास लागतात. 

पैं गुरुशिष्यांचां एकांतीं । जे अक्षरा एकाची वदंती ।

ते मेघाचियापरी त्रिजगतीं । गर्जती सैंघ ॥ १२६ ॥

१२६) गुरु व शिष्य, हे उपदेशाकरितां एकान्त स्थळीं जाऊन तेथें ज्या एक अक्षराचा ( ॐ संज्ञक ब्रह्माचा ) उपदेश करतात, तोच उपदेश, ते महात्मे मेघांच्या गडगडाटा प्रमाणें तिन्हीं लोकांमध्यें जिकडे तिकडे गर्जना करुन सांगतात.  

जैसी कमळकळिका  जालपणें । हृदयींचिया मकरंदातें राखों नेणे ।

दे राया रंका पारणें । आमोदाचें ॥ १२७ ॥

१२७) ज्याप्रमाणें पूर्ण उमललेली कमळाची कळी, ही आपल्या आंत असलेल्या सुवासास दाबून ठेवूं शकत नाहीं, तर ती राजास अथवा गरिबास सुवासाची ( सारखीच ) मेजवानी देते. 

तैसेनि मातें विश्र्वीं कथित । कथितेनि तोषें कथूं विसरत ।

मग तया विसरामाजीं विरत । आंगें जीवें ॥ १२८ ॥

१२८) त्याप्रमाणेंच ( हे भक्त ) सर्व जगांत माझें वर्णन करीत असतात व वर्णन करण्याच्या आनंदानें वर्णन करण्याचें विसरतात व त्या विसरामध्यें अंगानें व जीवानें वीरतात.  

ऐसें प्रेमाचेनि बहुवसपणें । नाहीं राती दिवो जाणणें ।

केलें माझें सुख अव्यंगवाणें । आपणपेयां जीहीं ॥ १२९ ॥ 

१२९) याप्रमाणें ज्यांनीं माझें पूर्ण सुख आपलेसें करुन घेतलें आहे, त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षांत दिवस अथवा रात्र यांचें भान राहिलेलें नसतें.

मूळ श्लोक

तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम् ।

ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते ॥ १० ॥

१०) याप्रमाणें ( माझ्या ठिकाणी ) सतत युक्त असलेल्या व प्रीतिपूर्वक ( माझी ) भक्ति करणार्‍या त्यांना, मी अशा प्रकारची बुद्धि देतों की, जिच्या योगानें ते माझ्या समीप येतील.

तयां मग जें आम्हीं कांहीं । द्यावें अर्जुना पाहीं ।

ते ठायींचीच तिहीं । घेतली सेल ॥ १३० ॥

१३०) अर्जुना, असें समज कीं, मग त्यांना आम्ही जें कांहीं ( निरतिशय प्रेम ) द्यावयाचें, तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणीं, आम्ही देण्याच्या अगोदरच कमावून बसलेले असतात.

कां जे ते जिया वाटा । निगाले गा सुभटा ।

ते सोय पाहोनि अव्हांटा । स्वर्गापवर्ग ॥ १३१ ॥

१३१) कारण कीं, अर्जुना, ते ज्या वाटेनें निघाले, त्या मार्गाशीं स्वर्ग व मोक्ष याची तुलना केली असतां, त्या आडवाटा वाटतात.

म्हणोनि तिहीं जें प्रेम धरिलें । तेंचि आमुचें देणें उपाइलें ।

परि आम्हीं देयावे हेंहि केलें । तिहींचि म्हणियें ॥ १३२ ॥

१३२) म्हणून त्यानीं जे प्रेम धरलें, तेंच आमचें देणे, त्यांना आपल्या कमाईने मिळविलें ( अशा रीतीनें ) आमचें काम त्यांनींच केले पण तें आम्हीं दिले, असें त्यांनीच ( जगांत ) प्रसिद्ध केलें.

आतां यावरी येतुलें घडे । जें तेंचि सुख आगळें वाढे ।

आणि काळाची दिठी न पडे । हें आम्हां करणें ॥ १३३ ॥

१३३) आतां यानंतर इतकें घडेल कीं, प्रेमसुख अधिक वाढावें आणि त्यावर काळाची दृष्टि पडूं नये, हें आम्हाला करावे लागतें.   

लळेयाचिया बाळका किरीटी । गवसणी करुनि स्नेहाचिया दिठी ।

जैसी खेळतां पाठोपाठीं । माउली धांवे ॥ १३४ ॥

१३४) अर्जुना, ज्याप्रमाणें आई ही, आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरुण करुन आपल्या आवडत्या मुलाच्या मागें तें मूल खेळत असतांना धांवते;   

तें जो जो खेळ दावी । तो तो पुढें सोनयाचा करुनि ठेवी ।

तैसी उपास्तीची पदवी । पोषित मी जायें ॥ १३५ ॥

१३५) तें बालक जो जो खेळ दाखवील, तो तो खेळ ती आई त्याच्यापुढें सोन्याचा करुन ठेवते; त्याचप्रमाणें माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवित जातों.  

जिये पदवीचेनि पोषके । ते मातें पावती यथासुखें ।

हे पाळती मज विशेखें । आवडे करुं ॥ १३६ ॥

१३६) उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणानें ते भक्त मला अनायासानें प्राप्त होतील, अशा तर्‍हेनें पालन करणें मला विशेष आवडतें.    

पैं गा भक्तासि माझें कोड । मज तयाचे अनन्यगतीची चाड ।

कां जे प्रेमळांचे सांकड । आमते घरीं ॥ १३७ ॥

१३७) अरे, भक्ताला माझें कौतुक असतें व त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते; कारण कीं, प्रेमळ भक्तांची आमच्या घरीं कमतरता आहे.  

पाहें पां स्वर्ग मोक्ष उपायिले । दोन्ही मार्ग तयांचिये वाहणी केले ।

आम्हीं आंगही शेषा वेंचिलें । लक्ष्मीयेसीं ॥ १३८ ॥

१३८) अर्जुना, पाहा ! उपायांनीं प्राप्त करुन घेण्याचें स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्हीं त्यांच्या ( स्वर्गेच्छु व मुमुक्षु यांच्या ) रहदारीस खुले केले. आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचें शरीर देखील विकून टाकलें.    

परि आपणपेंवीण जें एक । तें तैसेंचि सुख साजुक । 

सप्रेमळांलागीं देख । ठेविलें जतन ॥ १३९ ॥

१३९) परंतु, ज्यांना मीपणाचा लेश नाहीं, असें जें एक ताजें प्रेमसुख, तें तसेंच प्रेमळ भक्तांकरितां जतन करुन ठेवलें आहे, असें समज.

हा ठायवरी किरीटी । आम्ही प्रेमळु घेवों आपणपयासाठीं ।

या बोलीं बोलिजत गोष्टी । तैसिया नव्हती गा ॥ १४० ॥      

१४०) अर्जुना, येथपर्यंत ( वर संगितल्याप्रमाणें ) आम्ही आपलेपण देऊन प्रेमळ भक्ताचा अंगीकार करतों, ह्या गोष्टी शब्दांनीं सांगाव्यात, अशा प्रकारच्या नाहींत. 



Custom Search

No comments:

Post a Comment