Wednesday, March 16, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 1 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग १

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 11 Part 1 
Ovya 1 to 30 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग १ 
ओव्या १ ते ३०

आतां यावरी एकादशीं । कथा आहे दोन्हीं रसीं ।

जेथ पार्था विश्र्वरुपेंसीं । होईल भेटी ॥ १ ॥

१) आतां यानंतर अकराव्या अध्यायामध्यें दोन ( शांत व अद्भुत ) रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायांत अर्जुनाला विश्र्वरुपाचे दर्शन होणार आहे.

जेथ शांताचिया घरा । अद्भुत आला आहे पाहुणेरा ।

आणि येरांही रसां पांतिकरां । जाहला मानु ॥ २ ॥

२) या अध्यायांत शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणचारास आला आहे आणि इतर रसांनाहि या दोन रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे.

अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशीं वराडियांही लुगडीं लेणीं ।

तैसे देशियेचां सोकासनीं । मिरविले रस ॥ ३ ॥

३) अहो, नवरानवरीच्या लग्नसमारंभांत ज्याप्रमाणें ( वधूवरांबरोबर ) वर्‍हाड्यांसहि वस्त्रें दागिने मिळतात, त्याप्रमाणें इतर रसांचीहि मराठी भाषारुप पालखीत मिरवणूक होऊन त्यांस शोभा आली आहे.

परि शांताद्भुत बरवे । जे डोळियांचां अंजुळीं घ्यावे ।

जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ॥ ४ ॥

४) परंतु शांत व अद्भुत हे दोन चांगले रस ( या अध्यायांत इतके प्रामुख्यानें आहेत कीं, ) ते या डोळ्यांना उघड दिसतील जसे विष्णु व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावनेनें एकमेकांस भेटावयास यावेत;    

नातरी अंवसेचां दिवशीं । भेटलीं बिंबें दोनी जैसी ।

तेवीं एकवळा रसीं । केला एथ ॥ ५ ॥

५) अथवा अमावास्येच्या दिवशी ज्याप्रमाणें सूर्यबिंब व चंद्रबिंब एकमेकांना भेटतात, त्याप्रमाणें या अध्यायांत हे दोन रस एकत्र आले आहेत.

मीनले गंगेयमुनेचे ओघ । तैसें रसां जाहलें प्रयाग ।

म्हणोनि सुस्नात होत जग । आघवें एथ ॥ ६ ॥

६) ज्याप्रमाणें प्रयाग क्षेत्रांत गंगा व यमुना या दोन नद्यांच्या ओघांचा संगम झाला आहे, त्याप्रमाणें या अध्यायांत शांत व अद्भुत या दोन रसांचा मिलाफ होऊन, अकरावा अध्याय हा प्रयाग क्षेत्रच बनला आहे; म्हणून सर्व जग येथें स्नान करुन पवित्र होतें. 

माजीं गीता सरस्वती गुप्त । आणि दोनी रस ते ओघ मूर्त ।

यालागीं त्रिवेणी हे उचित । फावली बापा ॥ ७ ॥

७) ज्याप्रमाणें प्रयाग क्षेत्रांत गंगा व यमुना या दोन नद्यांचे ओघ प्रगट दिसतात, व त्या दोन ओघाच्या मध्यें जशी सरस्वती नदी गुप्त आहे, त्याप्रमाणे या अध्यायांत शांत व अद्भुत हे दोन रस स्पष्ट दिसणारे आहेत व या दोन रसांत गीता ही गुप्त सरस्वतीच आहे. म्हणून बापहो, ही योग्य त्रिवेणी सर्वांना प्राप्त झाली आहे.    

एथ श्रवणाचेनि द्वारें । तीर्थी रिघतां सोपारें ।

ज्ञानदेव म्हणे दातारें । माझेनि केलें ॥ ८ ॥

८) ज्ञानेश्र्वर महाराज म्हणतात, मला कारणीभूत करुन, माझे गुरु जे निवृत्तिनाथ, त्यांनी श्रवणाच्याद्वारानें या ( त्रिवेणी ) तीर्थांत प्रवेश करणे ( सर्वांना सोपे केले आहे. )    

तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मर्‍हाठियां शब्दसोपानें ।

रचिलीं धर्मनिधानें । निवृत्तिदेवें ॥ ९ ॥

९) धर्माचा ठेवा जे माझे गुरु निवृत्तिनाथ, त्यांनी ( मला कारणीभूत करुन ) संस्कृतभाषारुपी कठीण ( उंच डगरीचे ) किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरुपी पायर्‍यांचा घाट बांधला.

म्हणौनि भलतेणें एथ सद्भावें नाहावें । प्रयागमाधव विश्र्वरुप पहावें ।

येतुलेनि संसारासि द्यावें । तिलोदक ॥ १० ॥  

१०) म्हणून या त्रिवेणी संगमांत हवें त्यानें आस्तिक्यबुद्धीनें स्नान करुन, जसे प्रयाग क्षेत्रांत माधवाचें दर्शन घेतात, तसें येथें विश्वरुप माधवाचे दर्शन घ्यावें, अशा रीतीनें संसाराला तिलांजलि द्यावी.

हें असो ऐसे सावयव । जेथ सासिन्नले आथी रसभाव ।

जे श्रवणसुखाची राणीव । जोडली जगा ॥ ११ ॥

११) हें रुपक पुरें याप्रमाणें येथें ( नव ) रसांचे मूर्तिमंत स्वरुप भराला आलें आहे. जगाला श्रवणसुखाचें राज्य प्राप्त झालें आहे.

जेथ शांताद्भुत रोकडे । आणि येरां रसां पडप जोडे ।

हें अल्पचि परी उघडें । कैवल्य जेथ ॥ १२ ॥

१२) ह्या अकराव्या अध्यायांत शांत रस व अद्भुत रस हें मूर्तिमंत आहेतच; पण इतर रसांसहि या अध्यायांत शोभा प्राप्त झाली आहे. हें याचें वर्णन थोडेंच आहें, पण खरोखर या अध्यायांत मोक्ष स्पष्ट झालेला आहे.

तो हा अकरावा अध्यायो । जो देवाचा आपणपें विसंवता ठावो ।

परि अर्जुन सदैवाचा रावो । जे एथही पावला ॥ १३ ॥

१३) तो हा अकरावा अध्याय आहे की, जो देवाचें खास विश्रांतीचे ठिकाण आहे. पण अर्जुन हा दैववान् पुरुषांचा राजा आहे; कारण कीं, तो तेथेहि प्राप्त झाला आहे.

एथ अर्जुनचि काय म्हणों पातला । आजि आवडतयाही सुकाळु जाहला ।

जे गीतार्थु हा आला । मर्‍हाठिये ॥ १४ ॥

१४) येथें अर्जुनच एकटा प्राप्त झाला आहे असें काय म्हणावें ? तर गीतार्थ मराठी भाषेंत आल्याकारणानें आज वाटेल त्यालाहि सुकाळ झाला आहे.    

याचिलागीं माझें । विनविलें तें आइकिजे ।

तरी अवधान दीजे । सज्जनीं तुम्हीं ॥ १५ ॥

१५) याचकरितां मी जी विनंती करीत आहें, ती तुम्ही ऐकावी. ती इतकीच कीं, तुम्ही संतानी ( मी कथा वर्णन करीत आहे ) इकडे लक्ष द्यावें 

तेवींचि तुम्हां संतांचिये सभे । ऐसी सलगी कीर करुं न लभे ।

परि मानावें जी तुम्हीं लोभें । अपत्या मज ॥ १६ ॥

१६) तसेच तुम्हां संतांच्या सभेमध्यें अशी ही सलगी करणें माझ्यासारख्यास खरोखर योग्य नाहीं; पण मी जें तुमचें लेंकरुं, त्या मला तुम्ही प्रेमानें मानावें म्हणून सलगी करतों.  

अहो पुसां आपणचि पढविजे । मग पढे तरी माथा तुकिजे ।

कां करविलेनि चोजें न रिझे । बाळका माय ॥ १७ ॥

१७) अहो, आपणच राघूला शिकवावें आणि शिकविल्याप्रमाणे तो बोलूं लागला, म्हणजे पसंतीने मान डोलवावी; किंवा मुलाकडून एखादी करवून घेऊन मग त्यानें केलेल्या कृत्याच्या कौतुकानें आई आपल्या मनांत मुलाविषयी संतुष्ट होत नाही काय ? 

तेवीं मी जें जें बोलें । ते प्रभु तुमचेंचि शिकविलें ।

म्हणोनि अवधारिजे आपुलें । आपण देवा ॥ १८ ॥

१८) त्याप्रमाणें मी जें जें प्रतिपादन करतो, महाराज, तें तुम्हीच शिकविलेले आहे. एवढ्याकरितां अहो संतजनहो, आपण शिकविलेले आपणच ऐकावें.   

हें सारस्वतांचे गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।

तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजो ॥ १९ ॥

१९) महाराज, हें सारस्वताचें सुंदर झाड आपणच लावलें आहे तर आतां याकडे आपण लक्ष देणे, हेंच कोणी एक अमृत तें शिंपून मोठे करावें,  

मग हें रसभावफुलीं फुलेल । नानार्थफळभारें फळा येईल ।

तुमचेनि धर्में होईल ॥ सुकाळ जगा ॥ २० ॥   

२०) मग हें सारस्वताचें झाड नवरसभावरुपी फुलांनी फुलेल आणि नाना प्रकारच्या अर्थरुपी फळभाराने फळास येईल व तुम्हीं ( लक्षदेणेरुप ) धर्म केलात म्हणजे, जगास ( श्रवणसुखाचा ) सुकाळ होईल.  

या बोला संत रिझले । म्हणती तोषलों गा भलें केलें ।

आतां सांगें जें बोलिलें । अर्जुनें तेथ ॥ २१ ॥

२१) या बोलण्यावर संत संतुष्ट झाले व म्हणाले, ज्ञानोबा, आम्ही संतुष्ट झालों, तू फार चांगलें केलेंस. आतां त्या प्रसंगी अर्जुनाने जो प्रश्र्ण केला, त्याचे व्याख्यान कर.    

तंव निवृत्तिदास म्हणे । जी कृष्णार्जुनांचें बोलणें ।

मी प्राकृत काय सांगों जाणें । परि सांगवा तुम्ही ॥ २२ ॥

२२) तेव्हां निवृत्तिनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणाले, महाराज, कृष्ण व अर्जुन यो दोघांमध्यें झालेले भाषण माझ्यासारख्या सामान्य पुरुषाला सांगण्याचे काय ठाऊक ? परंतु ते माझ्याकडून सांगून घेण्याचें काम तुम्ही करीत आहांत.    

अहो रानींचिया पालेखाइरा । नेवाणें करविजे लंकेश्र्वरा ।

एकला अर्जुन परी अक्षौहिणी अकरा । न जिणेचि काई ॥ २३ ॥

२३) अहो, रानातील पाले खाणार्‍या वानरांकडून लंकेचा राजा जो रावण, त्याचा पराभव केला जावा; अर्जुन एकटाच होता, पण त्यानें अकरा अक्षौहिणी सैन्य जिंकलें नाहीं काय ?

म्हणोनि समर्थ जें जें करी । तें न हो न ये चराचरीं ।

तुम्ही संत तयापरी । बोलवा मातें ॥ २४ ॥

२४) म्हणून समर्थ जें जें करील, तें तें चराचरांत होणार नाहीं, असें नाही त्याप्रमाणे तुम्ही संत समर्थ आहांत; म्हणून तुम्ही जर मनांत आणाल, तर मजसारख्या ( नेणत्या ) कडून ( गूढ गीतार्थ ) बोलवाल. 

आतां बोलिजतसे आइका । हा गीताभाव निका ।

जो वैकुंठनायका । मुखौनि निघाला ॥ २५ ॥

२५) आता जो ( प्रत्यक्ष ) वैकुंठाचा राजा, त्याच्या मुखांतून निघालेल्या गीतेचा अभिप्राय नीट सांगतों. तिकडे लक्ष द्यावें. 

बाप बाप ग्रंथ गीता । जो वेदी प्रतिपाद्य देवता ।

तो श्रीकृष्ण वक्ता । जिये ग्रंथीं ॥ २६ ॥

२६) धन्य धन्य गीता ग्रंथ की, ज्या गीताग्रंथाचा वक्ता वेदांच्या प्रतिपादनाचा विषय जो कृष्ण परमात्मा, तो आहे.

तेथिंचे गौरव कैसें वानावें । जें शंभूचिये मति नागवे ।

तें आतां नमस्कारिजे जीवें भावें । हेंचि भलें ॥ २७ ॥

२७) त्या ठिकाणचा मोठेपणा कसा वर्णन करावा ? कारण तें गीतातत्त्व शिवाच्या बुद्धीला आकलन होत नाहीं. त्याला आतां सर्व भावानें नमस्कार करावा, हेंच बरें.

मग आइका तो किरीटी । घालूनि विश्र्वरुपीं दिठी ।

पहिली कैसी गोठी । करिता जाहला ॥ २८ ॥  

२८) यानंतर तो अर्जुन विश्वरुपावर नजर ठेवून पहिल्या प्रथम कसें बोलला तें ऐका.

हें सर्वही सर्वेश्र्वरु । ऐसा प्रतीतिगत जो पतिकरु ।

तो बाहेरी होआवा गोचरु । लोचनासी ॥ २९ ॥

२९) हें सर्वहि सर्वेश्र्वरस्वरुप असा अनुभवास आलेला जो परमात्मा, तो आपल्यापुढें डोळ्यांना प्रत्यक्ष दिसावा

हे जिवाआंतुली चाड । परि देवासि सांगतां सांकड ।

कां जे विश्र्वरुप गूढ । कैसेनि पुसावें ॥ ३० ॥

३०) ही मनांतील इच्छा खरी. परंतु ती देवास सांगतांना

 संकट वाटतें. कारण ज्या अर्थी देवाचें विश्वरुप गुप्त

 आहे, त्या अर्थी उघड करुन दाखवा, असें आपण कसें

 विचारावें ?  



Custom Search

No comments:

Post a Comment