Thursday, March 24, 2022

Shri Dnyaneshwari Adhyay 11 Part 4 श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय ११ भाग ४

 

Shri Dnyaneshwari
Adhyay 11 Part 4 
Ovya 89 to 122 
श्रीज्ञानेश्र्वरी 
अध्याय ११ भाग ४ 
ओव्या ८९ ते १२२

मूळ श्लोक

मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो ।

योगेश्र्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् ॥ ४ ॥

४) हे प्रभो, तें मी पाहाणें शक्य आहे, असें जर तुला वाटत असेल तर, हे योगेश्र्वरा, श्रयरहित असें स्वतःचे रुप तूं मला दाखव.

परि आणीक एक एथ शार्ङ्गी । तुज विश्र्वरुपातें देखावयालागीं ।

योग्यता माझां अंगी । असे कीं नाहीं ॥ ८९ ॥

८९) परंतु कृष्णा, आणखी एक गोष्ट आहे, ती हीं की, विश्वरुप जो तूं त्या तुला पाहाण्याला माझ्या अंगांत योग्यता आहे कीं नाहीं, 

हें आपलें आपण मी नेणें । तें कां नेणसी जरी देव म्हणे ।

तरी सरोगु काय जाणे । निदान रोगाचें ॥ ९० ॥ 

९०) हें माझें मला समजत नाहीं, हें का समजत नाही, असे जर आपण म्हणाल; तर ( सांगा ) रोग्याला आपल्या रोगाचें मूळ कारण समजतें काय ?  

आणि जी आतांचेनि पडिभरें । आर्तु आपुली ठाकी पैं विसरे ।

तान्हेला म्हणे न पुरे । समुद्र मज ॥ ९१ ॥

९१) महाराज, आणि इच्छा वाढली म्हणजे उत्कंठित मनुष्य आपली योग्यता विसरतो. ( ज्याप्रमाणें ) फार तहान लागलेल्या मनुष्यास ‘ मला समुद्रहि पुरणार नाहीं. ‘ असें वाटतें;   

ऐसी सचाडपणाचिये भुली । न सांभाळवे समस्या आपुली ।

यालागीं योग्यता जेवीं माउली । बाळकाची जाणे ॥ ९२ ॥

९२) याप्रमाणें तीव्र इच्छेच्या वेडानें मला माझ्या शक्तीचा अंदाज कळत नाहीं; म्हणून ज्याप्रमाणें आई आपल्या मुलाची योग्यता जाणते    

तयापरी जनार्दना । विचरिजो माझी संभावना ।

मग विश्र्वरुपदर्शना । उपक्रम कीजे ॥ ९३ ॥

९३) त्याप्रमाणें हे जनार्दना, माझी योग्यता किती आहे, याचा आपण विचार करा व मग विश्वरुप दाखविण्यास आरंभ करा.

तरी तैसी ते कृपा करा । एर्‍हवीं नव्हें हे म्हणां अवधारा ।

वायां पंचमालापें बधिरा । सुख केऊतें देणे ॥ ९४ ॥

९४) तरी माझ्या योग्यतेनुरुप कृपा करा. ( एर्‍हवी माझी विश्वरुप पाहण्याची योग्यता नसेल तर ) तुला विश्वरुप दाखविणें शक्य नाहीं, असें स्पष्ट सांगा पाहा. बहिर्‍या मनुष्याला पंचम स्वरांतील गायनानें सुख देण्याचा व्यर्थ प्रयत्न करणें, हें कोठचें ? 

एर्‍हवीं येकल्या बापियाचिया तृषे । मेघ जगापुरतें काय न वर्षे ।

परि जहालीही वृष्टि उपखे । जर्‍ही खडकीं होय ॥ ९५ ॥

९५) सहज पाहिलें तर, मेघ हा एकट्या चातकाची तहान भागविण्याकरितां पर्जन्यवृष्टि करतो. ती वृष्टि जगापुरती होत नाही काय ? परंतु तीच पर्जन्यवृष्टि खडकावर झाली, तर ती वृष्टि होऊनसुद्धा व्यर्थ होते. 

चकोरा चंद्रामृत फावलें । येरा आण बाहुनि काय वारिलें ।

परि डोळ्यांवीण पाहलें । वाया जाय ॥ ९६ ॥

९६) चकोर पक्ष्याला चंद्रामृत प्राप्त झालें, तेंच चंद्रामृत इतर प्राण्यांना घेऊं नका, म्हणून आपण घालून चंद्रानें त्यांचे निवारण केलेलें आहे काय ? परंतु असें इतरांस ( अमृतसेवनाची ) दृष्टि ( हातवटी ) नसल्यामुळे चंद्रोदय होऊनहि तो व्यर्थ जातो; 

म्हणोनि विश्र्वरुप तूं सहसा । दाविसी हा कीर भरवंसा ।

कां जे कडाडां आणि गहिंसां---। माजी नीच नवा तूं कीं ॥ ९७ ॥

९७) म्हणून तूं विश्वरुप मला एकदम दाखवीशील याबद्दलच मला खरोखर खात्री आहे. कारण कीं जाणत्यांत आणि नेणत्यांत तूं नित्य नवा ( उदार ) आहेस.

तुझें औदार्य जाणों स्वतंत्र । देवा न म्हणसी पात्रापात्र ।

पै कैवल्याऐसें पवित्र । कीं वैरियांही दिधलें ॥ ९८ ॥

९८) तुझा उदारपणा स्वतंत्र आहे. ( याचकाच्या इच्छेवर अवलंबून नाहीं.) द्यावयास लागलास म्हणजे, हा योग्य आहे अथवा हा अयोग्य आहे, अशी निचड तूं करीत नाहींस. मोक्षासारखी पवित्र वस्तु ती पण आपल्या शत्रूना देखील दिलीस.

मोक्षु दुराराध्यु कीर होय । परि तोही आराधी तुझे पाय ।

म्हणोनि धाडिसी तेथ जाय । पाइकु जैसा ॥ ९९ ॥

९९) खरोखर, मोक्ष हा मिळण्यास फार कठीण आहे; परंतु तो देखील तुझ्याच चरणाची सेवा करतो व म्हणूनच तू धाडसील तेथें तो चाकराप्रमाणे जातो.          

तुवां सनकादिकांचेनि मानें । सायुज्यीं सौरसु केला पूतने ।

जे विपाचेनि स्तनपानें । मारुं आली ॥ १०० ॥

१००) जी पूतना राक्षसी विषाचें स्तनपान करवून तुला मारण्यासाठी तुझ्याकडे आलीं, त्या पूतनेला तूं सनकादिकांच्या बरोबरीनें मोक्षाविषयीं योग्य केलेस. 

हां गा राजसूयाचां सभसदीं । देखता त्रिभुवनाची मांदी ।

कैसा शतधा दुर्वादीं । निस्तेजिलासी ॥ १०१ ॥

१०१) अहो राजसूय यज्ञाच्या सभासदांत त्रिभुवनांतील हजारों मंडळी पाहात असतांना, शेंकडों प्रकारच्या वाईट शब्दांनी ( शिशुपालाकडून ) तुझा पाणउतारा झाला.  

ऐशिया अपराधिया शिशुपाळा । आपणपयां ठावो दिधला गोपाळा ।

आणि उत्तानचरणाचिया बाळा । काय ध्रुवपदी चाड ॥ १०२ ॥

१०२) अशा अपराधी शिशुपालाला आपल्या स्वरुपाच्या ठिकाणी श्रीकृष्णा तूं जागा दिलीस आणि उत्तानपाद राजाच्या मुलाला ( ध्रुवाला ) अढळपदाची इच्छा होती काय ?

तो वना आला याचिलागीं । जे बैसावें पितयाचां उत्संगीं ।

कीं तो चंद्रसूर्यादिकांपरिस जगीं । श्र्लाघ्यु केला ॥ १०३ ॥

१०३) तो एवढ्याकरितां रानांत आला कीं, आपण बापाच्या मांडीवर बसावें; परंतु त्याला या लोकामध्यें चंद्रसूर्यादिकांपेक्षाहि प्रशंसनीय केलेंस.

ऐसा वनवासियां सकळां । देतां एकचि तूं घसाळा ।

पुत्रा आळवितां अजामिळा । आपणपें देसी ॥ १०४ ॥

१०४) याप्रमाणें दुःखानें व्यापलेल्या सर्वांना देण्यांत सढळ असें एक तुम्हीच आहांत. मुलाला हांक मारीत असतां अजामिळाला आपली तद्रुपता दिलीत.

जेणें उरीं हाणितलासि पांपरा । तयाचा चरणु वाहासी दातारा ।

अझुनि वैरियांचिया कलेवरा । विसंबसीना ॥ १०५ ॥

१०५) हे उदार श्रीकृष्णा, ज्या भृगुनें तुझ्या छातीवर लाथ हाणली, त्याच्या पावलांची खूण ( भूषण ) तूं आपल्या छातीवर धारण करतोस. ( शंखासूर ) शत्रू असूनहि, तूं अजून त्याच्या शरीरास ( शंखास ) विसंबत नाहीस. 

ऐसा अपकारियां तुझा उपकारु । तूं अपात्रींही परि उदारु ।

दान मागोनि दारवंटेकरु । जाहलासी बळीचा ॥ १०६ ॥

१०६) याप्रमाणें तुझ्यावर अपकार करणार्‍या लोकांवर तूं उपकार केलेले आहेस. तूं वास्तविक योग्यता नसलेल्यांच्या ठिकाणीहि आपलें औदार्य दाखविलें आहेस. दान मागून घेऊन तूं बळीचा द्वारपाल झालास.

तूंतें आराधी ना आयके । होती पुंसा बोलवित कौतुकें ।

तिये वैकुंठीं तुवां गणिके । सुरवाडु केला ॥ १०७ ॥   

१०७) ज्या गणिकेनें तुला कधीं पूजिलें नाहीं; अथवा तुझें गुणवर्णन कधीं ऐकलें नाहीं व जीं मरतेवेळीं सहज आपल्या पाळलेल्या राघूस ‘ राघोबा, राघोबा ‘ म्हणून हांक मारीत होती, त्या गणिकेस तूं वैकुंठामध्यें सुख दिलेस.      

ऐसीं पाहूनि वायाणीं मिषें । लागलासी आपणपें देवों वानिवसें ।

तो तूं कां अनारिसें । मजलागीं करिसी ॥ १०८ ॥

१०८) अशा प्रकारची पोकळ निमित्तें पाहून तूं अपात्र माणसासहि फुकाफुकी निजपद देतोस; असा जो तूं मला कांहीं निराळें करशील काय ?

हां गां दुभतयाचेनि पवाडें । जे जगाचें फेडी सांकडें ।

तिये कामधेनूचे पाडे । काय भूकेले ठाती ॥ १०९ ॥

१०९) जी कामधेनू आपल्या दुभत्याच्या विपुलतेनें सगळ्या जगाचें संकट दूर करते, त्या कामधेनूचीं वांसरें भुकेलीं राहतील काय ? 

म्हणोनि मियां जें विनविलें कांहीं । तें देव न दाखविती हें कीर नाहीं ।

परि देखावयालागीं देईं । पात्रता मज ॥ ११० ॥  

११०) म्हणून मी जी कांही विनंती केली, त्याप्रमाणे देव आपलें विश्र्वरुप दाखविणार नाहींत, असें खरोखर नाही; परंतु तें पाहण्याला लागणारी योग्यता मला द्यावी.    

तुझें विश्र्वरुप आकळे । ऐसे जरी जाणसी माझे डोळे ।

तरि आर्तीचे डोहळे । पुरवीं देवा ॥ १११ ॥

१११) तुझ्या विश्र्वरुपाचे आकलन होईल, असे माझे डोळे समर्थ आहेत, असे जर तुला वाटत असेल तर हे श्रीकृष्णा, विश्वरुप पाहण्याच्या उत्कंठेचे हे डोहाळे पूर्ण करावेत. 

ऐसी ठायेंठावो विनंती । जंव करुं सरैल सुभद्रापती ।

तंव तया षड्गुणचक्रवर्ती । साहवेचिना ॥ ११२ ॥

११२) याप्रमाणे जशी पाहिजे तशी त्या वेळेला अर्जुन विनंती करील, तेव्हा ती ऐकून त्या ऐश्वर्यादि सहा गुणाच्या सार्वभौम राजाला धीर धरवला नाही.

तो कृपापीयूषसजळु । आणि येरु जवळां आला वर्षाकाळु ।

नाना कृष्ण कोकिळु । अर्जुन वसंतु ॥ ११३ ॥

११३) तो श्रीकृष्ण परमात्मा, कृपारुपी अमृत हेंच कोणी जल, त्यानें युक्त मेघ होता, अथवा कृष्ण हा कोकिळ असून अर्जुन हा वसंत ऋतु होता.  

नातरी चंद्रबिंब वाटोळें । देखोनि क्षीरसागर उचंबळे ।

तैसा दुणेंही वरी प्रेमबळें । उल्लासितु जाहला ॥ ११४ ॥     

११४) अथवा चंद्राचें पूर्ण बिंब पाहून क्षीरसमुद्राला जसें भरतें येतें, त्याचप्रमाणें प्रेमाला दुपटीपेक्षा अधिक जोर येऊन श्रीकृष्ण आनंदित झालें.

मग तिये प्रसन्नतेचेनि आटोपें । गाजोनि म्हणितलें सकृपें ।

पार्था देख देख उमपें । स्वरुपें माझीं ॥ ११५ ॥

११५) मग त्या प्रसन्नपणाच्या आवेशांत गर्जना करुन

 कृपावंत श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना पाहा पाहा हीं माझी

 अनंत स्वरुपें.

एकचि विश्र्वरुप देखावें । ऐसा मनोरथु केला पांडवें ।

कीं विश्र्वरुपमय आघवें । करुनि घातलें ॥ ११६ ॥

११६) एकच विश्वरुप पाहावें, असा मनोरथ अर्जुनानें केला; इतक्यांत ( देवानें ) सर्वच विश्वरुप करुन ठेवलें,

बाप उदार देवो अपरिमितु । याचक स्वेच्छा सदोदितु ।

असे सहस्त्रवरी देतु । सर्वस्व आपुलें ॥ ११७ ॥

११७) धन्य श्रीकृष्ण परमात्मा ! तो अमर्याद उदार आहे तो नेहमी याचकाच्या इच्छेच्या सहस्त्रपट आपलें सर्वस्व देतो.

अहो शेषाचेहि डोळे चोरिले । वेद जयालागीं झकविले ।

लक्ष्मीयेही परि राहिलें । जिव्हार जें ॥ ११८ ॥

११८) अहो, जे हजार डोळे असलेल्या शेषाच्याहि दृष्टीस पडूं दिलें नाहीं; वेदांना ज्याचा पत्ता लागू दिला नाहीं, ( फार काय सांगावें ?) लक्ष्मी हें भगवंताचे कुटुंब खरें, पण तिलाहि जें दाखविलें नाही, असें जे भगवंताच्या जीवाचें गुह्य विश्वरुप,     

तें आतां प्रगटुनी अनेकधा । करीत विश्र्वरुपदर्शनाचा धांदा ।

बाप भाग्या अगाधा । पार्थाचिया ॥ ११९ ॥

११९) तें आतां अनेक प्रकारांनीं प्रकट करुन, देव विश्वरुप दाखविण्याचा व्यवहार करुं लागले. अर्जुनाच्या अपार भाग्याची धन्य आहे !

जो जागता स्वप्नावस्थे जाये । तो जेवीं स्वप्नींचें आघवें होये ।

तेवीं अनंत ब्रह्मकटाह आहे । आपणचि जाहला ॥ १२० ॥

१२०) जागा असलेला मनुष्य स्वप्नावस्थेंत गेल्यावर तो जसा स्वप्नांतील सर्व वस्तु आपणच बनून राहतो, त्याप्रमाणें श्रीकृष्ण परमात्माआपणच अनंत ब्रह्मांडे बनून राहिलेला आहे.  

तेथिंची सहसा मुद्रा सोडिली । आणि स्थूळ दृष्टीची जवनिका फाडिली ।

किंबहुना उघडिली । योगऋद्धि ॥ १२१ ॥

१२१) श्रीकृष्णांनी तेथील विश्वरुपाचा आकार एकदम प्रकट केला आणि स्थूल दृष्टीचा पडदा ( दूर केला ) फार काय सांगावें ! त्यानें तो आकार म्हणजे आपल्या योगाचें वैभव प्रकट केलें;

परि हा हें देखेल कीं नाहीं । ऐसी सेचि न करी कांहीं ।

एकसरां म्हणतसे पाहीं । स्नेहातुर ॥ १२२ ॥  

१२२) परंतु हा अर्जुन हें विश्वरुप पाहूं शकेल की नाहीं,

 हें देवांनी कांहीं लक्षांतच घेतले नाहीं; तर अर्जुनाच्या

 प्रेमामुळे उतावळे होऊन एकाएकी अर्जुनास ‘ पाहा

 पाहा ‘ असें म्हणावयास लागले.



Custom Search

No comments:

Post a Comment