Shri Dnyaneshwari
अनेकवक्त्रनयनमनेकाद्भुतदर्शनम्
।
अनेकदिव्याभरणं
दिव्यानेकोद्यतायुधम् ॥ १० ॥
१०) ज्यामध्यें अनेक
मुखें व डोळे होते, ज्यामध्यें अनेक आश्र्चर्यकारक देखावे होते, अनेक दिव्य
अलंकारांनी युक्त, अनेक दिव्य आयुधें धारण केलेले हात,
मग तेथ सैंध देखे वदनें ।
जैसी रमानायकाची राजभुवनें ।
नाना प्रकटलीं निधानें ।
लावण्यश्रियेचीं ॥ १९७ ॥
१९७) मग तेथें त्यानें
अनेक मुखें पाहिलीं. तीं मुखें ( जणु काय ) लक्ष्मीकांत श्रीकृष्ण यांच्या
राजमंदिरासारखीं होतीं. अथवा सौंदर्यलक्ष्मीचीं प्रकट झालेलीं भांडारेंच होती.
कीं आनंदाचीं वनें
सासिन्नलीं । जैसी सौंदर्या राणीव जोडली ।
तैसी मनोहरें देखिलीं ।
हरीचीं वक्त्रें तेणें ॥ १९८ ॥
१९८) किंवा आनंदाचे
बगीचेच बहराला आलेले, किंवा जणूं काय सौंदर्याला राज्य प्राप्त झालें; तशीं
त्यानें मन हरणकरणारी श्रीकृष्णाची मुखें पाहिली.
तयांही माजीं एकैकें ।
सावियाचि भयानकें ।
काळरात्रीचीं कटकें ।
उठावलीं जैसीं ॥ १९९ ॥
१९९) त्यांतदेखील
कित्येक मुखें जणूं काय प्रळयरात्रीच्या सैन्यानें उठाव केला आहे, अशी सहजच भयंकर
होतीं,
कीं यें मृत्यूसीचि मुखें
जाहलीं । हो कां जें भयाचीं दुर्गें पन्नासिलीं ।
कीं महाकुंडें उघडलीं ।
प्ररळयानळाचीं ॥ २०० ॥
२००) किंवा हीं
मृत्यूलाच तोंडें उत्पन्न झालेलीं आहेत, अथवा जणूं काय भयाचे किल्लेच रचलेले आहेत,
अथवा प्रळयाग्नीचीं महाकुंडेंच उघडलेली आहेत;
तैसीं अद्भुतें भयासुरें ।
तेथ वदनें देखिलीं वीरें ।
आणिकें असाधारणें साळंकारें
। सौम्यें बहुतें ॥ २०१ ॥
२०१) अशीं अद्भुत व
भयंकर मुखें शूर अर्जुनानें तेथें ( विश्वरुपांत ) पाहिली. आणखी किती एक निरुपम
अलंकारयुक्त अशीं मुखें पाहिलीं व पुष्कळ सौम्य मुखें पाहिली.
पैं ज्ञानदृष्टीचेनि
अवलोकें । परि वदनांचा शेवटु न टके ।
मग लोचन ते कवतिकें । लागला
पाहों ॥ २०२ ॥
२०२) अर्जुनानें तीं
मुखें ज्ञानदृष्टीनें पाहिली, परंतु मुखांचा अंत लागेना; म्हणून मुखें पाहणें
सोडून देऊन, तो मग कौतुकानें ( विश्र्वरुपाचे ) डोळे पाहूं लागला.
तंव नानावर्णें कमळवनें ।
कीं विकासिलीं तैसे अर्जुनें ।
डोळे देखिले पालिंगनें ।
आदित्यांचीं ॥ २०३ ॥
२०३) तेव्हां जणूं काय
अनेक रंगांच्या कमळांचे बाग प्रफुल्लित झाले आहेत, तसे ( विस्तृत व तेजाने )
सूर्याच्या समुदायासारखे डोळे अर्जुनानें पाहिले.
तेथेंचि कृष्णमेघाचिया
दाटी--। माजीं कल्पांत विजूंचिया स्फुटी ।
तैसिया वन्हि पिंगळा दिठी ।
भ्रूभंगातळीं ॥ २०४ ॥
२०४) डोळे पाहात होता,
तेथेंच काळ्या मेघांच्या गर्दीमध्यें प्रळयकाळची वीज चमकावी तशा अग्नीनें पिंगट
झालेल्या दृष्टि, चढवलेल्या भिवयांच्या खालीं त्यानें पाहिल्या.
हें एकेक आश्र्चर्य पाहतां
। तिये एकेचि रुपीं पांडुसुता ।
दर्शनाची अनेकता ।
प्रतिफळली ॥ २०५ ॥
२०५) हें एक एक
आश्र्चर्य पाहात असतां, अर्जुनाला त्या एकाच विश्वरुपामध्ये दर्शनाची अनेकता
फलद्रूप झाली.
मग म्हणे चरण ते कवणेकडे ।
केउते मुकुट कें दोर्दंडें ।
ऐसी वाढविताहे कोडें । चाड
देखावयाची ॥ २०६ ॥
२०६) मग अर्जुन
म्हणाला, विश्वरुपाचे पाय कोणीकडे आहेत ? मुकुट कोठे आहे? व त्या बळकट भुजा कोठें
आहेत ? अशी कौतुकानें तो पाहण्याची इच्छा वाढवीत आहे.
तेथ भाग्यनिधि पार्था । कां
विफलत्व होईल मनोरथा ।
काय पिनाकपाणीचां भातां ।
वायकांडीं आहाती ॥ २०७ ॥
२०७) तेथें अर्जुन
दैवांचा ठेवा असल्यानें त्याची इच्छा व्यर्थ कां होईल ? पिनाक नांवाचें धनुष्य
हातांत असलेल्या शंकराच्या भात्यामध्यें निष्फळ बाण असतात काय ?
ना तरी चतुराननाचिये वाचे ।
आहाती लटिकिया अक्षरांचे सांचे ।
म्हणोनि साद्यंतपण
अपारांचें । देखिलें तेणें ॥ २०८ ॥
२०८) अथवा
ब्रह्मदेवाच्या जिव्हेवर खोट्या अक्षरांचे ठसे असतात काय ? म्हणून अर्जुनानें
अमर्याद विश्वाचा आदि व अंत पाहिला.
जयाची सोय वेदा नाकळे ।
तयाचे सकळावयव एकेचि वेळे ।
अर्जुनाचे दोन्ही डोळे ।
भोगिते जाहले ॥ २०९ ॥
२०९) ज्या विश्वरुपाचा
मार्ग वेदाला कळत नाहीं त्या विश्वरुपाचीं सर्व अंगे अर्जुनाच्या दोन्ही डोळ्यांनी
एकाच वेळीं पूर्णपणे पाहिलीं.
चरणौनि मुकुटवरी । देखत
विश्र्वरुपाची थोरी ।
जे नाना रत्न अलंकारीं ।
मिरवत असे ॥ २१० ॥
२१०) जें विश्वरुप अनेक
प्रकारच्या रत्नांच्या अलंकारांनीं शोभत होतें, त्या विश्वरुपाचा विस्तार अर्जुन
पायापासून मुकुटापर्यंत पाहूं लागला.
परब्रह्म आपुलेनि आंगें ।
ल्यावया आपणाचि जाहला अनेगें ।
तियें लेणीं मी सांगें ।
काइसयासारिखीं ॥ २११ ॥
२११) जे अनेक अलंकार,
देव ( परब्रह्म ) आपल्या अंगावर घालण्याकरितां आपण बनला, ते अलंकार कशासारखे आहेत
म्हणून मी सांगू ?
जिये प्रभेचिये झळाळा ।
उजाळु चंद्रादित्यमंडळा ।
जे महातेजाचा जिव्हाळा ।
जेणें विश्र्व प्रकटे ॥ २१२ ॥
२१२) ज्या प्रभेच्या
कांतीनें चंद्रसूर्यमंडळें प्रकाशित होतात व जी प्रभा महातेजाचें ( प्रळयकाळच्या
तेजाचें ) जीवन आहे व ज्या प्रभेनें विश्व दिसावयास लागतें,
तो दिव्यतेज शृंगारु ।
कोणाचिये मतीसी होय गोचरु ।
देव आपणपेंचि लेइले ऐसें
वीरु । देखत असे ॥ २१३ ॥
२१३) तें दिव्य तेज
असलेले अलंकार कोणाच्या बुद्धीस विषय होतील ? असे दागिने देवानें स्वतःच आपल्या
अंगावर धारण केले आहेत, असें अर्जुनानें पाहिलें.
आपण आंग आपण अलंकार । आपण
हात आपण हातियेर ।
आपण जीव आपण शरीर । देखे
चताचर कोंदलें देवें ॥ २१४ ॥
२१४) देवआपणच, आपणच
अवयव, आपणच दागिने, आपणच हात, आपणच शस्त्र, आपणच जीव व आपणच देह वगैरे सर्व बनले
होते. हार काय सांगावें ! सर्व स्थावरजंगमात्मक विश्व देवानेंच भरलें आहे. असे
अर्जुनाने पाहिलें.
मग तेथेंचि ज्ञानाचां डोळां
। पहात करपल्लवां जंव सरळा ।
तंव तोडित कल्पांतीचिया
ज्वाळा । तैसीं शस्त्रें झळकत देखे ॥ २१५ ॥
२१५) मग तेथें (
विश्वरुपात ) ज्ञानदृष्टीनें अर्जुन तेव्हां हाताचे सरळ पंजे पाहूं लागला, तेव्हां
तेथें त्या हाताच्या पंजांत प्रळयकाळच्या अग्नीच्या ज्वाळांना तोडणारीं शस्त्रें
झळकत असलेलीं त्यानें पाहिलीं.
जयांचिया किरणांचेनि
निखरेपणें । नक्षत्रांचे होत फुटाणे ।
तेजें खिरडला वह्नि म्हणे ।
समुद्रीं रिघों ॥ २१६ ॥
२१६) ज्यांच्या (
शस्त्रांच्या ) किरणांच्या प्रखरपणानें मागें सरलेला अग्नि ‘ समुद्रांत प्रवेश
करावा ‘ असें म्हणावयास लागला.
मग काळकूटकल्लोळीं कवळिलें
। नाना महाविजूंचे दांग उमटलें ।
तैसे अपार कर देखिले ।
उदितायुधीं ॥ २१७ ॥
२१७) मग काळकूट विषाच्या ( जणूं काय ) लाटाच
बनल्या आहेत अथवा प्रलयकाळच्या विजेचें अरण्य
प्रकट झालें आहे, तसे उगारलेल्या शस्त्रांसहित अगणित
हात ( त्यानें ) पाहिले.
No comments:
Post a Comment