Thursday, April 28, 2022

ShriRamCharitManas Aranyakand Part 5 Doha 10 and 11 श्रीरामचरितमानस अरण्यकाण्ड भाग ५ दोहा १० आणि दोहा ११

 

ShriRamCharitManas 
Aranyakand Part 5 
Doha 10 and 11 
श्रीरामचरितमानस 
अरण्यकाण्ड भाग ५ 
दोहा १० आणि दोहा ११

दोहा---तब मुनि हृदयँ धीर धरि गहि पद बारहिं बार ।

निज आश्रम प्रभु आनि करि पूजा बिबिध प्रकार ॥ १० ॥

मग मुनींनी मनात धीर धरुन वारंवार प्रभूंच्या चरणांना स्पर्श केला. नंतर ते प्रभूंना आपल्या आश्रमात घेऊन गेले व त्यांची त्यांनी अनेक प्रकारे पूजा केली. ॥ १० ॥

कह मुनि प्रभु सुनु बिनती मोरी । अस्तुति करौं कवन बिधि तोरी ॥

महिमा अमित मोरि मति थोरी । रबि सन्मुख खद्योत अँजोरी ॥

मुनी म्हणू लागले, ‘ हे प्रभो, माझी विनंती ऐका. मी कशाप्रकारे तुमची स्तुती करु ? तुमचा महिमा अपार आहे आणि माझी बुद्धी अल्प आहे, जणू सूर्यासमोर काजव्याचा प्रकाश. ॥ १ ॥

श्याम तामरस दाम शरीरं । जटा मुकुट परिधन मुनिचीरं ॥

पाणि चाप शर कटि तूणीरं । नौमि निरंतर श्रीरघुबीरं ॥

हे नीलकमलांच्या माळेसारखे सावळे शरीर असलेले, हे जटामुकुट आणि मुनींची वल्कल वस्त्रे नेसलेले, हातांमध्ये धनुष्य-बाण व कटीला भाते बांधलेले श्रीराम, मी तुम्हांला निरंतर नमस्कार करतो. ॥ २ ॥

मोह विपिन घन दहन कृशानुः । संत सरोरुह कानन भानुः ॥

निसिचर करि वरूथ मृगराजः । त्रातु सदा नो भव खग बाजः ॥

जे मोहरुपी दाट वनास जाळणारा अग्नी आहेत, संतरुपी कमल-वनास प्रफुल्लित करणारा सूर्य आहेत, राक्षसरुपी हत्तींच्या कळपास लोळवणारे सिंह आहेत आणि जन्ममृत्युरुपी पक्ष्याला मारणारा बहिरी ससाणा आहेत, ते प्रभू श्रीराम सदा आमचे रक्षण करोत. ॥ ३ ॥

अरुण नयन राजीव सुवेशं । सीता नयन चकोर निशेशं ॥

हर हृदि मानस बाल मरालं । नौमि राम उर बाहु विशालं ॥

हे लाल कमळासारखे नेत्र व सुंदर वेष धारण करणारे, सीतेच्या नेत्ररुपी चकोराचे चंद्र, श्रीशिवांच्या मानसरुप मानससरोवरातील बालहंस, विशाल हृदय व बाहू असलेले हे श्रीरामप्रभू ! मी तुमची स्तुती करतो. ॥ ४ ॥

संशय सर्प ग्रसन उरगादः । शमन सुकर्कश तर्क विषादः ॥

भव भंजन रंजन सुर यूथः । त्रातु सदा नो कृपा वरुथः ॥

जे संशयरुप सर्पाला ग्रासणारे गरुड, जे अत्यंत कठोर तर्काने उत्पन्न होणारा विषाद नाहींसा करणारे, जे जन्मृत्यू नाहीसा करणारे व देवसमुदायाला आनंद देणारे ते कृपानिधान श्रीराम नेहमी आमचे रक्षण करोत. ॥ ५ ॥

निर्गुण सगुण विषम सम रुपं । ज्ञान गिरा गोतीतमनूपं ॥

अमलमखिलमनवद्यमपारं । नौमि राम भंजन महि भारं ॥

हे निर्गुण-सगुण, विषम—समरुप, हे ज्ञान, वाणी आणि इंद्रियांना अतीत, हे अनुपम, निर्मल, दोषरहित, अनंत व पृथ्वीचा भार हरण करणारे श्रीराम, मी तुम्हांला नमस्कार करतो. ॥ ६ ॥

भक्त कल्पपादप आरामः । तर्जन क्रोध लोभ मद कामः ॥

अति नागर भव सागर सेतुः । त्रातु सदा दिनकर कुल केतुः ॥

जे भक्तांसाठी कल्पवृक्षांची उद्याने आहेत, क्रोध, लोभ, मद आणि काम यांना भयभीत करणारे आहेत, अत्यंत चतुर आहेत आणि संसाररुपी समुद्र तरुन जाण्यासाठी सेतुरुप आहेत, ते सूर्यकुलाचा ध्वज असणारे श्रीराम सदा माझे रक्षण करोत. ॥ ७ ॥

अतुलित भुज प्रताप बल धामः । कलि मल विपुल विभंजन नामः ॥

धर्म वर्म नर्मद गुण ग्रामः । संतत शं तनोतु मम रामः ॥

ज्यांच्या भुजांचा प्रताप अतुलनीय आहे, जे बलाचे धाम आहेत, ज्यांचे नाव कलियुगातील फार मोठ्या पापांचा नाश करणारे आहे, जे धर्मरक्षक असून ज्यांचा गुणसमूह आनंद देणारा आहे, ते श्रीराम निरंतर माझ्या कल्याणचा विस्तार करोत. ॥ ८ ॥

जदपि बिरज ब्यापक अबिनासी । सब के हृदयँ निरंतर बासी ॥

तदपि अनुज श्री सहित खरारी । बसतु मनसि मम काननचारी ॥

जरी तुम्ही निर्मल, व्यापक, अविनाशी आणि सर्वांच्या हृदयात निरंतर वास करणारे आहात तरीही हे श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेसह वनात फिरणारे, याच रुपात तुम्ही माझ्या हृदयात निवास करावा. ॥ ९ ॥

जे जानहिं ते जानहुँ स्वामी । सगुन अगुन उर अंतरजामी ॥

जो कोसलपति राजिव नयना । करउ सो राम हृदय मम अयना ॥

हे स्वामी, तुम्हांला जे सगुण, निर्गुण, अंतर्यामी म्हणून जाणतात, ते तसे जाणोत. माझ्या हृदयात कोसलपती कमलनयन श्रीराम या रुपातच तुम्ही निवास करावा. ॥ १० ॥

अस अभिमान जाइ जनि भोरे । मैं सेवक रघुपति पति मोरे ॥

सुनि मुनि बचन राम मन भाए । बहुरि हरषि मुनिबर उर लाए ॥

मी सेवक आहे आणि श्रीरघुनाथ माझे स्वामी आहेत, असा अभिमान चुकूनही सुटू नये.’ मुनींचे वचन ऐकून श्रीराम मनातून खूप प्रसन्न झाले. तेव्हा त्यांनी आनंदाने त्या श्रेष्ठ मुनींना हृदयाशी धरले. ॥ ११ ॥

परम प्रसन्न जानु मुनि मोही । जो बर मागहु देउँ सो तोही ॥

मुनि कह मैं बर कबहुँ न जाचा । समुझि न परइ झूठ का साचा ॥

आणि म्हटले, ‘ हे मुनी, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, असे समजा. जो वर मागाल, तो मी तुम्हांला देईन.’ तेव्हा सुतीक्ष्ण म्हणाले, ‘ मी वर तर कधी मागितलाच नाही. मला समजतच नाही की, काय खोटे व काय खरे आहे. मग काय मागू व काय नको ? ॥ १२ ॥

तुम्हहि नीक लागै रघुराई । सो मोहि देहु दास सुखदाई ॥

अबिरल भगति बिरति बिग्याना । होहु सकल गुन ग्यान निधाना ॥

म्हणून हे रघुनाथ, हे दासांना सुख देणारे , जे तुम्हांला चांगले वाटेल, ते मला द्या.’ श्रीरामचंद्र म्हणाले, ‘ हे मुनी, तुम्ही प्रगाढ भक्ती, वैराग्य, विज्ञान आणि सर्व गुणांचे व ज्ञानाचे निधान व्हाल.' ॥ १३ ॥

प्रभु जो दीन्ह सो बरु मैं पावा । अब सो देहु मोहि जो भावा ॥

तेव्हा मुनी म्हणाले की, ‘ प्रभूंनी जे वरदान दिले, ते मला मिळाले. आता मला जे चांगले वाटते, ते द्या. ॥ १४ ॥

दोहा—अनुज जानकी सहित प्रभु चाप बान धर राम ।

मम हिय गगन इंदु इव बसहु सदा निहकाम ॥ ११ ॥

हे प्रभो ! हे श्रीराम, लक्ष्मण व सीतेसह धनुष्य-बाण-धारी या रुपात तुम्ही माझ्या हृदयाकाशात चंद्राप्रमाणे नित्य निवास करावा.’ ॥ ११ ॥

एवमस्तु करि रमानिवासा । हरषि चले कुंभज रिषि पासा ॥

बहुत दिवस गुर दरसनु पाएँ । भए मोहि एहिं आश्रम आएँ ॥

‘ तथास्तु ‘ असे म्हणून लक्ष्मीनिवास श्रीरामचंद्र आनंदाने अगस्त्य ऋषींच्याकडे निघाले. मग सुतीक्ष्ण मुनी म्हणाले, ‘ गुरु अगस्ती यांचे दर्शन घेऊन या आश्रमात आल्याला मला पुष्कळ दिवस झाले. ॥ १ ॥

अब प्रभु संग जाउँ गुर पाहीं । तुम्ह कहँ नाथ निहोरा नाहीं ॥

देखि कृपानिधि मुनि चतुराई । लिए संग बिहसे द्वौ भाई ॥

आता मीही हे प्रभू, तुमच्याबरोबर गुरुजींच्या जवळ येतो. हे नाथ, यामध्ये माझा तुमच्यावर काहीही उपकार नाही.’ मुनींचे चातुर्य पाहून कृपानिधी श्रीरामांनी त्यांना आपल्यासोबत घेतले. मग दोघे बंधू हसू लागले. ॥ २ ॥

पंथ कहत निज भगति अनूपा । मुनि आश्रम पहुँचे सुरभूप ॥

तुरत सुतीछन गुर पहिं गयऊ । करि दंडवत कहत अस भयऊ ॥

वाटेत आपल्या अनुपम भक्तीचे वर्णन करीत देवांचे राजराजेश्र्वर श्रीराम अगस्त्य मुनींच्या आश्रमात पोहोचले. सुतीक्ष्ण त्वरित गुरु अगस्त्यांपाशी गेले आणि दंडवत करुन म्हणू लागले. ॥ ३ ॥

नाथ कोसलाधीस कुमारा । आए मिलन जगत आधारा ॥

राम अनुज समेत बैदेही । निसि दिनु देव जपत हहु जेही ॥

‘ गुरुवर्य, तुम्ही रात्रंदिवस ज्यांचा जप करता ते अयोध्येचे राजे दशरथ यांचे कुमार जगदाधार श्रीरामचंद्र हे लक्ष्मण व सीता यांचे सोबत तुम्हांला भेटायला येत आहेत. ॥ ४ ॥

सुनत अगस्ति तुरत उठि धाए । हरि बिलोकि लोचन जल छाए ॥

मुनि पद कमल परे द्वौ भाई । रिषि अति प्रीति लिए उर लाई ॥

हे ऐकताच अगस्त्य मुनी त्वरित उठून धावले. भगवंतांना पाहताच त्यांच्या नेत्रांतून आनंद आणि प्रेमाचे अश्रू वाहू लागले. दोन्ही बंधूंनी मुनींच्या चरणी लोटांगण घातले. ऋषींनी उठवून मोठ्या प्रेमाने त्यांना हृदयाशी धरले. ॥ ५ ॥   

सादर कुसल पूछि मुनि ग्यानी । आसन बर बैठारे आनी ॥

पुनि करि बहु प्रकार प्रभु पूजा । मोहि सम भाग्यवंत नहिं दूजा ॥

ज्ञानी मुनींनी आदराने क्षेम-कुशल विचारुन त्यांना श्रेष्ठ आसनावर बसविले. नंतर अनेक प्रकारे प्रभूंची पूजा करुन म्हटले, ‘ माझ्यासारखा भाग्यवान असा दुसरा कोणी नाही.’ ॥ ६ ॥

जहँ लगि रहे अपर मुनि बृंदा । हरषे सब बिलोकि सुखकंदा ॥

तेथे जितके इतर मुनिगण होते, ते सर्व आनंदकंद

 श्रीरामांचे दर्शन घेऊन आनंदित झाले. ॥ ७ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment