Wednesday, July 20, 2022

KikshindhaKanda Part 3 ShriRamCharitManas Doha 5 to Doha 6 किष्किन्धाकाण्ड भाग ३ श्रीरामचरितमानस दोहा ५ ते दोहा ६

 

KikshindhaKanda Part 3 ShriRamCharitManas 
Doha 5 to Doha 6 
किष्किन्धाकाण्ड भाग ३ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ५ ते दोहा ६

दोहा---सखा बचन सुनि हरषे कृपासिंधु बलसींव ।

कारन कवन बसहु बन मोहि कहहु सुग्रीव ॥ ५ ॥

तेव्हा कृपेचे समुद्र आणि बलाची परिसीमा असणारे श्रीराम मित्र सुग्रीवाचे बोलणे ऐकून हर्षित झाले. ते म्हणाले, ‘ हे सुग्रीवा, तू वनात का राहातोस, ते मला सांग. ‘ ॥ ५ ॥

नाथ बालि अरु मैं द्वौ भाई । प्रीति रही कछु बरनि न जाई ॥

मयसुत मायावी तेहि नाऊँ । आवा सो प्रभु हमरें गाऊँ ॥

सुग्रीव म्हणाला, ‘ हे नाथ, वाली व मी दोघे भाऊ आहोत. आम्हा दोघांमध्ये अतिशय प्रेम होते. हे प्रभो, मय दानवाचा एक पुत्र होता. त्याचे नाव मायावी होते. तो एकदा आमच्या गावी आला. ॥ १ ॥

अर्ध राति पुर द्वार पुकारा । बाली रिपु बल सहइ न पारा ॥

धावा बालि देखि सो भागा । मैं पुनि गयउँ बंधु सँग लागा ॥

त्याने अर्ध्या रात्री नगरद्वारावर येऊन युद्धाचे आव्हान दिले. वालीला शत्रूचे आव्हान सहन झाले नाही. तो धावत गेला. त्याला पाहाताच तो मायावी पळून गेला. मीसुद्धा भावासोबत गेलो. ॥ २ ॥

गिरिबर गुहॉं पैठ सो जाई । तब बालीं मोहि कहा बुझाई ॥

परिखेसु मोहि एक पखवारा । नहिं आवौं तब जानेसु मारा ॥

तो मायावी एका पर्वताच्या गुहेमध्ये लपला. तेव्हा मला वालीने सांगितले की, ‘ एक पंधरवडा होईपर्यंत वाट बघ. जर मी तेवढ्या दिवसांत परत आलो नाही, तर मी मारला गेलो, असे समज.’ ॥ ३ ॥

मास दिवस तहँ रहेउँ खरारी । निसरी रुधिर धार तहँ भारी ॥

बालि हतेसि मोहि मारिहि आई । सिला देइ तहँ चलेउँ पराई ॥

हे श्रीराम ! मी महिनाभर तेथे राहिलो. त्या गुहेतून रक्ताचा मोठा प्रवाह बाहेर आला. तेव्हा मी समजलो की, त्या मायावीने वालीला मारले. आता तो येऊन मला मारेल, म्हणून मी तेथे गुहेच्या द्वारावर मोठी शिळा लावून पळून आलो. ॥ ४ ॥

मंत्रिन्ह पुर देखा बिनु साईं । दीन्हेउ मोहि राज बरिआईं ॥

बाली ताहि मारि गृह आवा । देखि मोहि जियँ भेद बढ़ावा ॥

मंत्र्यांनी नगराला राजा नाही, म्हणून मला आग्रह करुन राज्य दिले. नंतर वाली त्या मायावीला मारुन घरी परत आला. मला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्याच्या मनात विकल्प वाढला. ( त्याला वाटले की, राज्याच्या लोभाने मीच गुहेच्या तोंडावर शिळा बसवून आलो व येथे येऊन राजा बनलो. ॥ ५ ॥

रिपु सम मोहि मारेसि अति भारी । हरि लीन्हेसि सर्बसु अरु नारी ॥

ताकें भय रघुबीर कृपाला । सकल भुवन मैं फिरेउँ बिहाला ॥

त्याने मला शत्रूप्रमाणे खूप मारले आणि माझे सर्वस्व व माझी स्त्री हिरावून घेतली. हे कृपाळू रघुवीरा, त्याच्या भयामुळे मी सर्व लोकांत वाईट परिस्थितीत फिरत राहिलो. ॥ ६ ॥

इहॉं साप बस आवत नाहीं । तदपि सभीत रहउँ मन माहीं ॥

सुनि सेवक दुख दीनदयाला । फरकि उठीं द्वै भुज बिसाला ॥

तो शापामुळे येथे येत नाही, तरीही मनातून मी भयभीत असतो.’ सेवकाचे दुःख ऐकून दीनांवर दया करणार्‍या श्रीरघुनाथांच्या दोन्ही भुजा स्फुरु लागल्या. ॥ ७ ॥   

दोहा---सुनु सुग्रीव मारिहउँ बालिहि एकहिं बान ।

ब्रह्म रुद्र सरनागत गएँ न उबरिहिं प्रान ॥ ६ ॥

ते म्हणाले, ‘ हे सुग्रीवा, ऐक. मी एका बाणाने वालीला मारीन. ब्रह्मदेव आणि रुद्र यांना जरी तो शरण गेला, तरी त्याचे प्राण वाचणार नाहीत. ॥ ६ ॥

जे न मित्र दुख होहिं दुखारी । तिन्हहि बिलोकत पातक भारी ॥

निज दुख गिरि सम रज करि जाना । मित्रक दुख रज मेरु समाना ॥

जे लोक मित्राच्या दुःखाने दुःखी होत नाहीत, त्यांना पाहिल्यानेही मोठे पाप लागते. आपल्या पर्वतासमान दुःखाला रजःकणाप्रमाणे समजून मित्राच्या रजःकणाप्रमाणे असलेल्या दुःखाला सुमेरुप्रमाणे मानावे. ॥ १ ॥

जिन्ह कें असि मति सहज न आई । ते सठ कत हठि करत मिताई ॥

कुपथ निवारि सुपंथ चलावा । गुन प्रकटै अवगुनन्हि दुरावा ॥

ज्यांना स्वभावतःच अशी बुद्धी नसते, ते मूर्ख बळेच कुणाशीही मैत्री का करतात ? त्याने मित्राला वाईट मार्गापासून चांगल्या मार्गावर आणावे व त्याचे गुण प्रकट करुन अवगुण लपवावेत, हा खर्‍या मित्राचा धर्म आहे. ॥ २ ॥

देत लेत मन संक न धरई । बल अनुमान सदा हित करई ॥

बिपति काल कर सतगुन नेहा । श्रुति कह संत मित्र गुन एहा ॥

देण्या-घेण्याबद्दल मनात शंका बाळगू नये. आपल्या शक्तीप्रमाणे त्याचे नेहमी हित करावे. संकटकाळी तर शंभरपट स्नेह करावा. वेद म्हणतात की, उत्तम मित्राची ही लक्षणे आहेत. ॥ ३ ॥

आगें कह मृदु बचन बनाई । पाछें अनहित मन कुटिलाई ॥

जाकर चित अहि गति सम भाई । अस कुमित्र परिहरेहिं भलाई ॥

जो समोर कृत्रिम गोड बोलतो व माघारी निंदा करतो आणि मनात कपट ठेवतो, हे बंधो, त्याचे मन सापाच्या चालीप्रमाणे वाकडे असते. अशा कृत्रिमाला टाळणेच चांगले. ॥ ४ ॥

सेवक सठ नृप कृपन कुनारी । कपटी मित्र सूल सम चारी ॥

सखा सोच त्यागहु बल मोरें । सब बिधि घटब काज मैं तोरें ॥

मूर्ख सेवक, कंजूष राजा, कुलता स्त्री आणि कपटी मित्र हे चौघे काट्याप्रमाणे दुःख देणारे असतात. हे मित्रा ! माझ्या बळावर आता तू चिंता सोडून दे. मी सर्व प्रकारे तुला मदत करीन.’ ॥ ५ ॥

कह सुग्रीव सुनहु रघुबीरा । बालि महाबल अति रनधीरा ॥

दुंदुभि अस्थि ताल देखराए । बिनु प्रयास रघुनाथ ढहाए ॥

सुग्रीव म्हणाला, ‘ हे रघुवीर ! ऐका. वाली हा अत्यंत बलवान आणि मोठा रणधीर आहे. ‘ नंतर सुग्रीवाने रामांना दुंदुभी राक्षसाची हाडे आणि ताल वृक्ष दाखविले. श्रीरघुनाथांनी सहजासहजी ते पाडले. ॥ ६ ॥

देखि अमित बल बाढ़ी प्रीती । बालि बधब इन्ह भइ परतीती ॥

बार बार नावइ पद सीसा । प्रभुहि जानि मन हरष कपीसा ॥

श्रीरामांचे हे अपरिमित बळ पाहून सुग्रीवाला श्रीरामांविषयी वाटणारे प्रेम वाढले आणि हे वालीचा वध नक्की करतील, असा त्याला विश्वास वाटू लागला. तो वारंवार श्रीरामांच्या चरणीं नतमस्तक होऊ लागला. प्रभूंचे खरे स्वरुप कळल्याने सुग्रीव मनातून आनंदित झाला होता.

उपजा ग्यान बचन तब बोला । नाथ कृपॉं मन भयउ अलोला ॥

सुख संपति परिवार बड़ाई । सब परिहरि करिहउँ सेवकाई ॥

जेव्हा तो भानावर आला, तेव्हा म्हणाला, ‘ हे नाथ, तुमच्या कृपेमुळे माझे मन शांत झाले. सुख, संपत्ती, परिवार व मोठेपणा सोडून मी तुमचीच सेवा करीत राहीन. ॥ ८ ॥   

ए सब रामभगति के बाधक । कहहिं संत तव पद अवराधक ॥

सत्रु मित्र सुख दुख जग माहीं । मायाकृत परमारथ नाहीं ॥

कारण सुख-संपत्ती इत्यादी रामभक्तीच्या विरोधी आहेत, असे संत सांगतात. जगाला जितके मित्र व शत्रू आहेत आणि सुख-दुःखादी द्वंद्वे आहेत, ती सर्वच्या सर्व मायारचित असून परमार्थतः खरी नाहीत. ॥ ९ ॥

बालि परम हित जासु प्रसादा । मिलेहु राम तुम्ह समन बिषादा ॥

सपनें जेहि सन होइ लराई । जागें समुझत मन सकुचाई ॥

हे श्रीरामा ! वाली हा तर माझा परम हितकारी आहे. कारण त्याच्या करणीमुळे शोकाचा नाश करणारे तुम्ही मला मिलालात आणि आता स्वप्नातही जरी त्याच्याशी लढाई झाली, तरी जागे झाल्यावर माझ्या मनाला संकोच वाटेल. ॥ १० ॥

अब प्रभु कृपा करहु एहि भॉंती । सब तजि भजनु करौं दिन राती ॥

सुनि बिराग संजुत कपि बानी । बोले बिहँसि रामु धनुपानी ॥

हे श्रीराम, आता माझ्यावर अशी कृपा करा की, सर्व सोडून रात्रंदिवस मी तुमचे भजन करीत राहीन.’ सुग्रीवाची ती वैराग्ययुक्त वाणी ऐकून हाती धनुष्य धारण केलेले श्रीराम हसत म्हणाले, ॥ ११ ॥

जो कछु कहेहु सत्य सब सोई । सखा बचन मम मृषा न होई ॥

नट मरकट इव सबहि नचावत । रामु खगेस बेद अस गावत ॥

‘ तू जे सांगितलेस ते सर्व सत्य आहे. परंतु हे मित्रा, माझे बोलणे मिथ्या नसते. वाली मारला जाईल व राज्य तुला मिळेल. ‘ काकाभुशुंडी म्हणतात, ‘ पक्ष्यांच्या राजा गरुडा ! माकडवाल्याच्या माकडाप्रमाणे श्रीराम सर्वांना नाचवितात, असे वेद म्हणतात. ॥ १२ ॥

लै सुग्रीव संग रघुनाथा । चले चाप सायक गहि हाथा ॥

तब रघुपति सुग्रीव पठावा । गर्जेसि जाइ निकट बल पावा ॥

त्यानंतर सुग्रीवाला बरोबर घेऊन हातात धनुष्य धारण करुन श्रीरघुनाथ निघाले. मग रघुनाथांनी सुग्रीवाला वालीकडे पाठविले. श्रीरामांचे बळ मिळाल्यामुळे वालीजवळ जाऊन त्याने गर्जना केली. ॥ १३ ॥

सुनत बालि क्रोधातुर धावा । गहि कर चरन नारि समुझावा ॥

सुनु पति जिन्हहि मिलेउ सुग्रीवा । ते द्वौ बंधु तेज बल सींवा ॥

ती ऐकताच वाली क्रोधाने धावून गेला. त्याची पत्नी तारा हिने त्याचे पाय धरुन समजाविले की, हे नाथा, ऐकून घ्या. सुग्रीव ज्यांना भेटला आहे, ते दोघे भाऊ पराक्रमी व बळाची परिसीमा आहेत. ॥ १४ ॥

कोसलेस सुत लछिमन रामा । कालहु जीति सकहिं संग्रामा ॥

ते कोसलपती दशरथाचे पुत्र राम व लक्ष्मण युद्धामध्ये

 काळालाही जिंकू शकतात. ‘ ॥ १५ ॥



Custom Search

No comments:

Post a Comment