Friday, January 20, 2023

BhaktiYoga Part 11 Adhyay 12 Ovya 226 to 240 भक्तियोग भाग ११ अध्याय १२ ओव्या २२६ ते २४०

 

BhaktiYoga Part 11 
Shri Dnyaneshwari Adhyay 12 
Ovya 226 to 240 
भक्तियोग भाग ११ 
श्रीज्ञानेश्र्वरी अध्याय १२ 
ओव्या २२६ ते २४०

तेणेंसीं आम्हां मैत्र । एथ कायसें विचित्र ।

परि तयाचें चरित्र । ऐकती जे ॥ २२६ ॥

२२६) त्याच्याशी आमची मैत्री असते. यांत काय आश्र्चर्य आहे ? परंतु त्यांचें चरित्र जे ऐकतात, 

तेही प्राणापरौते । आवडती हें निरुतें ।

जे भक्तचरित्रातें । प्रशंसिती ॥ २२७ ॥

२२७) जे भक्ताच्या चरित्राची वाखाणणी करतात, ते देखील आम्हांला प्राणापलीकडे आवडतात, हें खरें आहे.

जें  हें अर्जुना साद्यंत । सांगितलें प्रस्तुत ।

भक्तियोगु समस्त । योगरुप ॥ २२८ ॥

२२८) अर्जुना, जें हें खरें समस्त योगरुप आम्ही तुला सांगितलें तें म्हणजे आम्हीं तुला ( आतां ) आदिअंतासहित भक्तियोग पूर्णपणें सांगितला.

जे मी प्रीति करीं । कां मनीं शिरसा धरीं ।

येवढी थोरी । जया स्थितीये ॥ २२९ ॥

२२९) ज्या भक्तियोगाच्या स्थितीची थोरवी एवढी आहे कीं, त्या भक्तियोगयुक्त पुरुषावर मी स्वतः प्रीति करतों. मी त्याचें ध्यान करतों, अथवा त्याला मस्तकावर धारण करतों.

मूळ श्लोक

ये तु धर्म्यामृतं सांगणमिदं यथोक्तं पर्युपासते ।

श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रीयाः ॥ २० ॥

२०) आणि श्रद्धायुक्त व मी ज्यांना अत्यंत प्रिय आहे असे जे भक्त, हें जें माझें धर्म्य व अमृतासारखें आहे, त्याचे सेवन करतात, ( त्याप्रमाणें आचरण करतात ) ते मला अत्यंत प्रिय आहेत. 

ते हे गोष्टी रम्य । अमृतधारा धर्म्य ।

करिती प्रतीतिगम्य । आइकोनि जे ॥ २३० ॥

२३०) ती ही गोष्ट ( वर सांगितलेलें तें हें भक्तियोगाचें वर्णन ) जी चित्ताला रंजविणारी, अमृताच्या धारेप्रमाणे मधुर व धर्माला अनुकूल अशी गोष्ट आहे. ती ऐकून जें पुरुष तिला स्वानुभवाने जाणतात.  

तैसीचि श्रद्धेचेनि आदरें । जयांचां ठायीं विस्तरे ।

जीवीं जया थारे । जे अनुष्ठिती ॥ २३१ ॥ 

२३१) त्याचप्रमाणें ज्यांच्या ठिकाणी श्रद्धेचा आदर असल्यामुळे, हा भक्तियोग विस्तार पावतो; एवढेंच नव्हे तर जयांच्या चित्ताच्या ठिकाणी टिकतो व जे त्याचें अनुष्ठान करतात.

परि निरुपती जैसी । तैसीच स्थिति मानसी ।

मग सुक्षेत्रीं जैसी । पेरणी केली ॥ २३२ ॥

२३२) पण ज्याप्रमाणें मी मनाची स्थिति निरुपण केली, त्याचप्रमाणे मनाच्या ठिकाणी स्थिति असेल, तर तशा मनांत हा भक्तियोग म्हणजे उत्तम शेतांत पेरणी केल्याप्रमाणें आहे.

परि मातें परम करुनि । इये अर्थी प्रेम धरुनि ॥

हेंचि सर्वस्व मानूनि । घेती जे पैं ॥ २३३ ॥

२३३) परंतु जे मला श्रेष्ठ प्राप्तव्य समजतात व या भक्तितत्वाविषयीं आपल्या मनांत प्रेम बाळगून व हेंच आपलें सर्व भांडवल आहे, अशी समजूत ठेवून, जे या भक्तियोगाचा अंगीकार करतात;

पार्था गा जगं । तेचि भक्त तेचि योगी ।

उत्कंठा तयालागीं । अखंड मज ॥ २३४ ॥

२३४) अगा अर्जुना, या जगामध्यें तेच भक्त व तेच योगी आहेत व त्यांची मला निरंतर उत्कंठा लागलेली असते.  

ते तीर्थ ते क्षेत्र । जगीं तेचि पवित्र ।

भक्तिकथेसी मैत्र । जयां पुरुषां ॥ २३५ ॥

२३५) तेच तीर्थ, तेच क्षेत्र, जगामध्यें तेच पवित्र कीं, ज्या पुरुषांचा भक्तिकथेशीं स्नेह असतो.

आम्ही तयाचें करुं ध्यान । तो आमुचें देवतार्चन ।

तेवांचूनि आन । गोमटें नाहीं ॥ २३६ ॥


२३६) आम्ही त्याचें ध्यान करुं, ते आमची पूजन करण्याची देवता आहेत, त्यांच्यावांचून आम्ही दुसरें कांहीं चांगलें, मानीत नाहीं. 

तयाचें आम्हां व्यसन । तो आमुचें निधिनिधान ।

किंबहुना समाधान । तो मिळे तैं ॥ २३७ ॥

२३७) त्यांचें आम्हांस व्यसन ( छंद ) असतें व तेंच आमच्या ठेव्याची खाण आहेत. फार काय सांगावें ! तें आम्हांला भेटतात तेव्हांच आम्हांस समाधान वाटतें.  

पैं प्रेमळाची वार्ता । जे अनुवादती पांडुसुता ।

ते मानूं परमदेवता । आपुली आम्ही ॥ २३८ ॥

२३८) परंतु अर्जुना, जे पुरुष प्रेमळ भक्तांची कथा गातात, ते पुरुष आम्ही आपले श्रेष्ठ दैवत समजतों.

ऐसें निजजनानंदें । तेणें जगदादिकंदें ।

बोलिलें मुकुंदें । संजयो म्हणे ॥ २३९ ॥

२३९) आपल्या भक्तांचा जो आनंद आहे व जो जगाचें मूळ कारण आहे तो मुकुंद याप्रमाणें बोलला, असें संजय धृतराष्ट्राला म्हणाला, 

राया जो निर्मळु । निष्कल लोककृपाळु ।

शरणागतां प्रतिपाळु । शरण्यु जो ॥ २४० ॥   

२४०) हे धृतराष्ट्र राजा, जो श्रीकृष्ण परमात्मा निर्मळ, पूर्ण, लोकांवर कृपा करणारा, शरणागतांचा प्रतिपाळ करणारा व शरण जाण्याला योग्य आहे.


Custom Search

No comments:

Post a Comment