Sunday, February 19, 2023

Lanka Kanda Part 4 Doha 8 to 10 लङ्काकाण्ड भाग ४ दोहा ८ ते १०

 

Lanka Kanda Part 4 
ShriRamCharitManas 
Doha 8 to 10 
लङ्काकाण्ड भाग ४ 
श्रीरामचरितमानस 
दोहा ८ ते १०

दोहा--- सब के बचन श्रवन सुनि कह प्रहस्त कर जोरि ।

नीति बिरोध न करिअ प्रभु मंत्रिन्ह मति अति थोरि ॥ ८ ॥

सर्वांचे ऐकल्यावर रावण-पुत्र प्रहस्त हात जोडून म्हणू लागला, हे प्रभू, नीतीविरुद्ध काहीही करु नये. मंत्र्यांना अक्कल फारच थोडी आहे. ॥ ८ ॥

कहहिं सचिव सठ ठकुरसोहाती । नाथ न पूर आव एहि भॉंती ॥

बारिधि नाघि एक कपि आवा । तासु चरित मन महुँ सबु गावा ॥

हे सर्वजण खुशामत करणारे मंत्री तोंडदेखले बोलणारे आहेत. बाबा ! अशा गोष्टींनी काही होणार नाही. एकच वानर समुद्र ओलांडून आला होता, त्याचे चरित्र सर्व लोक अजुनी मनातल्या मनात गात आहेत. ॥ १ ॥

छुधा न रही तुम्हहि तब काहू । जारत नगरु कस न धरि खाहू ॥

सुनत नीक आगें दुख पावा । सचिवन अस मत प्रभुहि सुनावा ॥

वानर हे जर तुमचे भोजन आहे, तर मग त्यावेळी तुमच्यापैकी कुणाला भूक लागली नव्हती काय ? तो नगर जाळत होता, तेव्हा त्याला पकडून का खाल्ले नाही ? या मंत्र्यांनी तुम्हांला असा सल्ला दिला आहे की, जो ऐकायला चांगला परंतु परिणामी दुःखदायक. ॥ २ ॥

जेहिं बारीस बँधायउ हेला । उतरे सेन समेत सुबेला ॥

सो भनु मनुज खाब हम भाई । बचन कहहिं सब गाल फुलाई ॥

ज्याने सहजासहजी समुद्राला बांध घातला आणि जो सेनेसह सुवेळ पर्वतावर येऊन ठेपला आहे, तो काय मनुष्य आहे ? बंधूंनो, सांगा. त्याला आम्ही काय खाऊ शकू ? सांगा ना. सर्वजण वेड्याप्रमाणे वटवट करीत आहात ते. ॥ ३ ॥

तात बचन मम सुनु अति आदर । जनि मन गुनहु मोहि करि कादर ॥

प्रिय बानी जे सुनहिं जे कहहीं । ऐसे नर निकाय जग अहहीं ॥

हे तात, माझे बोलणे नीट लक्ष देऊन ऐका. मला मनातून भित्रा समजू नका. जगात अशी माणसे ढिगाने आहेत की, जी गोड वाटणार्‍या गोष्टी ऐकत व बोलत असतात. ॥ ४ ॥

बचन परम हित सुनत कठोरे । सुनहिं जे कहहिं ते नर प्रभु थोरे ॥

प्रथम बसीठ पठउ सुनु नीती । सीता देइ करहु पुनि प्रीती ॥

हे प्रभो, ऐकण्यास कठोर व परिणामी परम हितकारी बोलणे, जे बोलतात व ऐकून घेतात, अशी माणसे फारच थोडी असतात. राजनीती सांगते ते ऐकून घ्या आणि त्याप्रमाणे प्रथम दूत पाठवा आणि सीतेला सोपवून श्रीरामांशी समेट करा. ॥ ५ ॥

दोहा—नारि पाइ फिरि जाहिं जौं तौ न बढ़ाइअ रारि ।

नाहिं त सन्मुख समर महि तात करिअ हठि मारि ॥ ९ ॥

जर पत्नी मिळाल्यावर ते परत जात असतील तर विनाकारण भांडण वाढवू नका. नाही तर मग हे तात, युद्धभुमीवर समोरासमोर निश्चितपणे युद्ध करा. ॥ ९ ॥           

यह मत जौं मानहु प्रभु मोरा । उभय प्रकार सुजसु जग तोरा ॥

सुत सन कह दसकंठ रिसाई । असि मति सठ केहिं तोहि सिखाई ॥

हे प्रभो, जर तुम्ही माझे मत मानाल तर, जगात दोन्ही प्रकारे तुमची कीर्ती होईल.’ रावण रागाने पुत्राला म्हणाला, ‘ अरे मूर्खा, तुला असली बुद्धी कुणी शिकविली ? ॥ १ ॥

अबहीं ते उर संसय होई । बेनुमूल सुत भयहु घमोई ॥

सुनि पितु गिरा परुष अति घोरा । चला भवन कहि बचन कठोरा ॥

आतापासून तुझ्या मनात भय उत्पन्न झाले ? हे पुत्रा, तू तर वेळूच्या मुळाशी लागलेली कीड झालास. ‘ पित्याची अत्यंत व कठोर वाणी ऐकून प्रहस्त स्पष्टपणे असे म्हणत घरी गेला की, ॥ २ ॥

हित मत तोहि न लागत कैसें । काल बिबस कहुँ भेषज जैसें ॥

संध्या समय जानि दससीसा । भवन चलेउ निरखत भुज बीसा ॥

‘ हिताचा सल्ला तुम्हांला मानवत नाही; ज्याप्रमाणे मरणाच्या दारी असलेल्या रोग्याला औषध आवडत नाही. ‘ संध्याकाळ झाल्याचे पाहून रावणही आपल्या वीस भुजांकडे पाहात महालाकडे गेला. ॥ ३ ॥

लंका सिखर उपर आगारा । अति बिचित्र तहँ होइ अखारा ॥

बैठ जाइ तेहिं मंदिर रावन । लागे किंनर गुन गन गावन ॥

लंकेच्या शिखरावर एक अत्यंत सुंदर महाल होता. तेथे नाच-गाण्याचा अड्डा जमे. रावण त्या महालात जाऊन बसला. किन्नर त्याचे गुण-गान करु लागले. ॥ ४ ॥

बाजहिं ताल पखाउज बीना । नृत्य करहिं अपछरा प्रबीना ॥

टाळ, मृदंग आणि वीणा ही वाद्ये वाजत होती, नृत्यात प्रवीण असलेल्या अप्सरा नाचत होत्या. ॥ ५ ॥

दोहा---सुनासीर सत सरिस सो संतत करइ बिलास ।

परम प्रबल रिपु सीस पर तद्यपि सोच न त्रास ॥ १० ॥

रावण शेकडो इंद्रांप्रमाणे नित्य भोग-विलास करीत होता. श्रीरामांसारखा अत्यंत प्रबळ शत्रू डोक्यावर होता, परंतु त्याला त्याची चिंता किंवा भीती नव्हती. ॥ १० ॥

इहॉं सुबेल सैल रघुबीरा । उतरे सेन सहित अति भीरा ॥

सिखर एक उतंग अति देखी । परम रम्य सम सुभ्र बिसेषी ॥

इकडे सुवेळ पर्वतावर प्रचंड सेनेसह श्रीराम उतरले. पर्वताचे एक फार उंच, परमरमणीय, सपाट व उजळ शिखर पाहून ॥ १ ॥

तहँ तरु किसलय सुमन सुहाए । लछिमन रचि निज हाथ डसाए ॥

ता पर रुचिर मृदुल मृगछाला । तेहिं आसन आसीन कृपाला ॥

तेथे लक्ष्मणाने वृक्षांची कोमल पाने व फुले आपल्या हातांनी सजवून अंथरली त्यावर सुंदर व कोमल मृगचर्म घातले. त्या आसनावर कृपाळू श्रीराम विराजमान झाले होते. ॥ २ ॥

प्रभु कृत सीस कपीस उछंगा । बाम दहिन दिसि चाप निषंगा ॥

दुहुँ कर कमल सुधारत बाना । कह लंकेस मंत्र लगि काना ॥

प्रभूंनी वानरराज सुग्रीवाच्या मांडीवर आपले डोके ठेवले होते त्यांच्या डावीकडे धनुष्य व उजवीकडे बाणांच भाता ठेवलेला होता. ते आपल्या दोन्ही कर-कमलांनी बाण व्यवस्थित करीत होते. बिभीषण त्यांच्याशी एकांतात सल्लामसलत करीत होता. ॥ ३ ॥

बड़भागी अंगद हनुमाना । चरन कमल चापत बिधि नाना ॥

प्रभु पाछें लछिमन बीरासन । कटि निषंग कर बान सरासन ॥

परम भाग्यशाली अंगद व हनुमान अनेक प्रकारे प्रभूंची चरण-कमले चेपत होते. लक्ष्मण कमरेला भाता बांधून व हातामध्ये धनुष्यबाण घेऊन वीरासनात प्रभूंच्या मागे शोभून दिसत होता. ॥ ४ ॥



Custom Search

2 comments: