Wednesday, December 18, 2013

Gurucharitra Adhyay 43 गुरुचरित्र अध्याय ४३


Gurucharitra Adhyay 43 
Gurucharitra Adhyay 43 is in Marathi. In this Adhyay King Vimarshan is telling to his wife kumudvati how he became a king in this birth. He is telling her that in his earlier birth he was a dog on a ShriShailya Parvat. He saw Shiv Pooja and perform Pardakshinas while trying to save his life. Finally he saw the deep mala before dying all these acts are pious and enough for him to became a king in next seven births. His wife was also Kapoti (kind of bird) who perform pradakshinas to God Shiv temple on ShriShailya, on ShivRatri day that pious act was enough to give her birth as a queen for next seven births. Name of this Adhyay is ShriShailya-ShivRatri-Mahima-Varnanam. 
गुरुचरित्र अध्याय ४३ 
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ 
नामधारक म्हणे सिद्धासी । पुढें चरित्र जाहलें कैसी । 
विस्तारावें आम्हांसी । कृपा करी गा दातारा ॥ १ ॥ 
सिद्ध म्हणे ऐक वत्सा । समस्त भक्त सेवा करितां । 
त्यांत एक विणकर तंतिक अत्यंता । करितसे भक्ति श्रीगुरुची ॥ २ ॥ 
तीन प्रहर संसारयात्रा । करुनि येतसे पवित्रा । 
राजागंण झाडी विचित्रा । नमस्कार करी दुरोनि ॥ ३ ॥ 
ऐसे किती दिवस क्रमिले । व्रत शिवरात्री आले । 
समस्त यात्रेसी निघाले । मातापिता तंतिकाचे ॥ ४ ॥ 
त्यासी बोलाविती यात्रेसी । तो म्हणतसे नयें तयांसी । 
तुम्हीं मूर्ख असा पिसीं । माझा श्रीपर्वत येथेंचि असे ॥ ५ ॥ 
श्रीगुरु माझा मल्लिकार्जुन । पर्वत म्हणिजे श्रीगुरुभुवन । 
आपण न ये येथून । चरण सोडोनि श्रीगुरुचे ॥ ६ ॥ 
समस्त लोक त्यासी हांसती । पिसें लागले यासी म्हणती । 
चला जाऊं म्हणोनि निघती । भ्राता माता पिता त्याचे ॥ ७ ॥ 
नगरलोक समस्त गेला । आपण एकला राहिला । 
श्रीगुरुमठासी आला । गुरु पुसती तयासी ॥ ८ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । कां गा यात्रेसी तूं न वचसि । 
तंतिक म्हणे स्वामीसी । माझी यात्रा तुमचे चरण ॥ ९ ॥ 
नाना तीर्थयात्रादि देखा । तुमचे चरणीं असे निका । 
वायां जाती मूर्ख लोक । पाषाणदर्शन करावया ॥ १० ॥ 
ऐसें म्हणोनि तंतिक । नमस्कार करी नित्य देख । 
तंव पातली शिवरात्रि ऐक । माघवद्य चतुर्दशी ॥ ११ ॥ 
श्रीगुरु होते संगमासी । दोन प्रहर होतां भक्त परियेसीं । 
आपण गेला स्नानासी । उपवास असे शिवरात्रीचा ॥ १२ ॥ 
संगमी स्नान करोनि । श्रीगुरुतें नमस्कारोनि । 
उभा ठेला कर जोडोनि । भक्तिपूर्वक एकोभावें ॥ १३ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । तुझीं समस्त गेलीं यात्रेसी । 
तूं एकलाचि राहिलासी । पहातासी विनोद श्रीपर्वताचा ॥ १४ ॥ 
पुसती कधीं देखिलासी ? । म्हणे स्वामी नेणें कधींसी । 
तुमचे चरणीं आम्हांसी । सर्व यात्रा सदा असती ॥ १५ ॥ 
त्याचा भाव पाहोनि । जवळी बोलाविती श्रीगुरुमुनि । 
बैस म्हणती कृपा करुनि । दाखवूं म्हणती श्रीपर्वत ॥ १६ ॥ 
नयन झांकूनि पादुकेसी । दृढ धरीं गा वेगेंसी । 
ऐसें म्हणोनि तयासी । मनोवेगें घेऊनि गेले ॥ १७ ॥ 
क्षण न लागतां श्रीगिरीसी । घेऊनि गेले भक्तासी । 
तीरीं बैसले पाताळगंगेसी । नयन उघडीं म्हणती त्यातें ॥ १८ ॥ 
क्षणैक मात्र निद्रावस्था । म्हणतां झाला जागृता । 
अवलोकितां पर्वत दिसत । म्हणे स्वप्न किंवा सत्य ॥ १९ ॥ 
श्रीगुरु म्हणती तयासी । कां गा भ्रांतपणें पाहसी । 
वेगें जावें दर्शनासी । क्षौर स्नान करुनियां ॥ २० ॥ 
श्रीगुरु ऐसे निरोप देतां । शीघ्र गेला स्नानाकरितां । 
तेथें देखिली मातापिता । भ्राता ग्रामलोक सकळिक ॥ २१ ॥ 
ते पुसती तयासी । कवणें मार्गें आलासी । 
आमुची भेटी कां न येसी । लपून येणें कोण धर्म ॥ २२ ॥ 
विनवीतसे मातापित्यांसी । आम्ही निघालों आजि दोन प्रहरेंसी । 
एक घटिका लागली वाटेसी । आतां आलों गुरुसमागमें ॥ २३ ॥ 
एक हांसती मिथ्या म्हणती । आम्हांसवेंचि आला लपत । 
ऐसें वडिवारें बोलत । अबद्ध म्हणती सकळ जन ॥ २४ ॥ 
तो कोणासवें न बोले । शीघ्र स्नान क्षौर केलें । 
पुष्पें अक्षता बेलें । घेऊनि गेला पूजेसी ॥ २५ ॥ 
पूजा करितां लिंगस्थानीं । देखता झाला श्रीगुरुमुनि । 
अति विस्मय करोनि । पूजा केली मनोभावें ॥ २६ ॥ 
समस्त लोक पूजा करिती । श्रीगुरु सर्व पूजा घेती । 
तंतिक म्हणतसे चित्तीं । श्रीगुरुराज आपणचि शंकर ॥ २७ ॥ 
ऐसा निर्धार करुनि । पाहिजे प्रसाद-फल खुणी । 
घेऊनि आला गुरुसंनिधानीं । एकचित्तें परियेसा ॥ २८ ॥ 
श्रीगुरु पुसती तयासी । एधवां राहसी किंवा जासी । 
तंतिक विनवी स्वामियासी । एक देखिलें नवल आतां ॥ २९ ॥ 
समस्त लोक जाऊनि । देवालयाभीतरीं बैसोनि । 
पूजा करिती तुमचे चरणीं । लिंग न देखों तुम्हीच तेथें ॥ ३० ॥ 
श्रीगुरु तूं जवळीच असतां । इतुके दुरी कां कष्टती वृथा । 
लोक येताति बहुता । काय कारण या स्थाना ॥ ३१ ॥ 
तूं तरी केवळ परमेश्र्वर । दिसतोसि आम्हां नर । 
न कळे तुझा महिमा अपार । गौप्यरुपें गुरुनाथा ॥ ३२ ॥ 
सर्व जन मूढ होऊन । नेणती तुझें महिमान । 
कां हो येताति या स्थानीं । विस्तारोनि सांग मज ॥ ३३ ॥ 
श्रीगुरु म्हणती ऐक भक्ता । सर्वत्र ईश्र्वरपूर्णता । 
स्थानमहिमा असे ख्याता । जे अगम्य त्रिभुवनीं ॥ ३४ ॥ 
तंतिक म्हणे स्वामियासी । तूं तरी पूर्ण ब्रह्म होसी । 
स्थानमहिमा वानिसी । विस्तारुनि सांग आम्हां ॥ ३५ ॥ 
श्रीगुरु निरोपिती भक्तासी । येथील महिमा पुससी । 
सांगेन ऐक विस्तारेंसीं । स्कंदपुराणीं असे कथा ॥ ३६ ॥ 
माघवद्य चतुर्दशी । अपार महिमा श्रीपर्वतासी । 
सांगेन ऐक तत्परेसीं । श्रीगुरु म्हणती तंतिकातें ॥ ३७ ॥ 
पूर्वी ख्यात किरातदेशीं । ' विमर्षण ' राजा परियेसीं । 
शूर असे पराक्रमेंसीं । समस्त शत्रु जिंकिले तेणें ॥ ३८ ॥ 
आणिक एक कुबुद्धि असे । पारधी करी बहुवसें । 
बलाढ्य स्थूळ बहु असे । चंचळ सकळ-स्त्रियारत ॥ ३९ ॥ 
सर्वमांस भक्षण करी । ग्राह्य अग्राह्य न विचारी । 
ऐसा वर्ते दुराचारी । ईश्र्वर पूजी भक्तिभावें ॥ ४० ॥ 
नित्य पूजा करी अपार । शिवरात्रि आलिया हर्षनिर्भर । 
गीत नृत्य वाद्य परिकर । भक्तिपूर्वक करी पूजा ॥ ४१ ॥ 
आचार तरी बरवा नसे । शिवपूजा करी बहुवसें । 
पत्नी त्यासी एक असे । सुलक्षण नाम ' कुमुद्वती ' ॥ ४२ ॥ 
सुशील सुगुण पतिव्रता । मनीं करी बहुत चिंता । 
पुरुष आपुला परद्वाररता । ईश्र्वरभक्ति करीतसे ॥ ४३ ॥ 
ऐसें क्रमितां एके दिवसीं । पुसों लागली आपुले पुरुषासी । 
म्हणे प्राणेश्र्वरा परियेसीं । विनंति एक असे माझी ॥ ४४ ॥ 
क्षमा करावी माझिया बोला । विस्तारोनि सांगावें सकळा । 
तुम्ही दुराचारी भक्षितां सकळां । परद्वार निरंतर ॥ ४५ ॥ 
तुम्हांला ईश्र्वरावरी । भक्ति उपजली कवणेपरी । 
सांगावें स्वामी सविस्तारीं । कोप न करावा प्राणनाथा ॥ ४६ ॥ 
राजा म्हणे स्त्रियेसी । बरवें पुसिलें आम्हांसी । 
ज्ञान झालें आतां मानसीं । पूर्व जन्म सांगेन माझा ॥ ४७ ॥ 
पूर्वी पंपानगरीं आपण । श्र्वानयोनीं जन्मोन जाण । 
होतों तेथें काळ क्रमोन । शिवरात्रि आली एके दिवसीं ॥ ४८ ॥ 
त्या नगरीं होतें एक शिवालय । समस्त लोक आले पूजावया । 
आपणही गेलों हिंडावया । भक्षावया कांहीं मिळेल म्हणोनि ॥ ४९ ॥ 
उत्साहें लोक पूजा करिती । नाना वाजंतरें वाजतीं । 
गर्भगृहीं प्रदक्षिणा करिती । धरुनि आरति सकळिक ॥ ५० ॥ 
आपण गेलों द्वारांत । विनोदें पाहूं म्हणत । 
मज देखोनि आले धांवत । काष्ठ पाषाण घेवोनियां ॥ ५१ ॥ 
आपण पौळीमध्यें होतों पळत । द्वार घातलें मारुं म्हणत । 
धरा धरा मारा म्हणोनि बोलत । मारुं लागले पाषाणीं ॥ ५२ ॥ 
वाट नाहीं बाहेर जावयासी । अभिलाष असे जीवासी । 
पळतसें देवालयभीतरेसी । मार्ग नाही कोठे देखा ॥ ५३ ॥ 
बाहेर जाईन म्हणत । द्वाराकडे मागुती येत । 
सवेंचि लोक पाठीं लागत । सव्य प्रदक्षिणा पलतसें ॥ ५४ ॥ 
लपावया ठाव नाहीं देखा । वेष्टिलों पौळीं दुर्गासारिखा । 
पाठी लागले सकळिका । पुन्हा पौळींत पळे तैसाचि ॥ ५५ ॥ 
उच्छिष्ट कांहीं मिळेल म्हणोनि । देउळांत गेलो भामिनी । 
काकुळती बहु मनीं । प्राण वांचेल म्हणोनियां ॥ ५६ ॥ 
ऐसा तीन वेळां पळालो । मारतील म्हणोनी बहु भ्यालों । 
मग अंतरगृहीं निघालों । पूजा देखिली तेथ शिवाची ॥ ५७ ॥ 
 द्वार धरोनि समस्त लोक । शस्त्रें मारिलें मज ऐक । 
ओढोनि टाकिती सकळिक । शिवालयाबाहेरी ॥ ५८ ॥ 
मज पुण्य घडलें प्रदक्षिणी । पूजा देखिली नयनीं । 
तेणें पुण्यें राजा होउनि । उपजलों ऐक प्राणेश्र्वरी ॥ ५९ ॥ 
शिवरात्रि होती ते दिवसीं । न मिळे उच्छिष्ट भुक्तीसी । 
प्राण त्यजिला उपवासी । तेंही पुण्य मज घडलें ॥ ६० ॥ 
आणिक एक पुण्य घडलें । दीपमाळीस दीपक उजळले । 
ते म्यां डोळां देखिले । प्राण त्यजिला शिवद्वारीं ॥ ६१ ॥ 
तेणें पुण्यें झालें ज्ञान । ऐक शिवरात्रीचें महिमान । 
म्हणसी तूं दुराचारी म्हणोनि । त्याचा संदेह सांगेन ॥ ६२ ॥ 
पूर्वजन्म माझा श्र्वान । त्याचा स्वभाव सर्वभक्षण । 
सर्वां ठायीं त्याची वासना । तेचि स्वभाव मज असती ॥ ६३ ॥ 
 ऐसें स्त्रियेसी सांगितलें । पुन्हा प्रश्र्न तिणें केले । 
म्हणे स्वामी जें सांगितलें । आपुला जन्म पुरातन ॥ ६४ ॥ 
तुम्ही असा सर्वज्ञानी । माझा जन्म सांगा विस्तारुनि । 
म्हणोनि लागतसे चरणीं । कृपा करीं गा प्राणेश्र्वरा ॥ ६५ ॥ 
 ऐक वपुषे ज्ञान सती । तुझा पूर्व जन्म कपोती । 
करीत होतीस उदरपूर्ती । एके दिवसीं अवधारीं ॥ ६६ ॥ 
पडिला होता मांसगोळा । तो तुवां चोंचीनें धरिला कवळा । 
उडत होतीस आकाशमंडळा । तें दुरुनि देखिलें घारीनें ॥ ६७ ॥ 
कवळ घेऊन म्हणोनि । घार आली धांवोनि । 
 तूं गेलीस वो पळोनि । महारण्य क्रमीत ऐका ॥ ६८ ॥ 
पाठीं लागली ते घारी । मागें पुढें न विचारी । 
तूं पळालीस ते अवसरीं । श्रीपर्वत-गिरीवरी ॥ ६९ ॥ 
सवेंचि आली ते घारी । तूं गेलीस शिवालय-शिखरीं । 
भोंवों लागलीस प्रदक्षिणापरी । श्रम जाहले तुज बहुत ॥ ७० ॥ 
दुरोनि आलीस धांवत । प्राण होता कंठगत । 
श्रमोनि शिखरीं तूं बैसत । घारीं येऊनि मारिलें चोंचीं ॥ ७१ ॥ 
घेऊनि गेली मांस-कवळें । तुझें देह पंचत्व पावलें । 
प्रदक्षिणा-पुण्य फळलें । झालीस तुवां राजपत्नी ॥ ७२ ॥ 
इतुकिया अवसरीं । पुनः पतीस प्रश्र्न करी । 
आतां तुमच्या निरोपावरी । ईश्र्वरपूजा करीन ॥ ७३ ॥ 
पुढें मज काय होईल । तुम्ही कवण स्थानीं असाल । 
तें विस्तारावें प्राणेश्र्वरा निर्मळ । आत्मपति राजेंद्रा ॥ ७४ ॥ 
राजा सांगे सतीसी । पुढील जन्म मज पुससी । 
आपण राजा सिंधुदेशीं । जन्म पावेन अवधारीं ॥ ७५ ॥ 
माझी भार्या तूंचि होसी । जन्म पावसी सृंजयदेशीं । 
तेथिल राजा पवित्रवंशी । त्याची कन्या होसील ॥ ७६ ॥ 
तिसरा जन्म आपणासी । राजा होईन सौराष्ट्रदेशीं । 
तूं उपजसी कलिंगराजवंशीं । माझी पत्नी होसील ॥ ७७ ॥ 
 चवथा जन्म आपणासी । राजा होईन गांधारदेशीं । 
 तूं उपजसी मागध कुळेसी । तैंही माझी प्राणेश्र्वरी ॥ ७८ ॥ 
पांचवा जन्म आपणासी । राजा होईन अवंतदेशीं । 
तूं दाशार्हराजकुळी जन्मसीं । माझी भार्या होसील तूं ॥ ७९ ॥ 
सहावा जन्म आपणासी । आनर्त नाम राजा परियेसी । 
ययातिकन्या तूं होसी । तैंही माझी प्राणेश्र्वरी ॥ ८० ॥ 
सातवा जन्म आपणासी । राजा होईल पांड्यदेशीं । 
रुप लावण्य मजसरसीं । नोहे कवण संसारी ॥ ८१ ॥ 
ज्ञानी सर्वगुणी होईन । सूर्यकांति ऐसें वदन । 
जैसा रुपें असे मदन । नाम माझें ' पद्मवर्ण ' ॥ ८२ ॥ 
तूं जन्मसी वैदर्भकुळीं । रुपसौंदर्यें आगळी । 
जैसी सुवर्णाची पुतळी । चंद्रासारिखें मुखकमळ ॥ ८३ ॥ 
' वसुमती ' असे नांव पावसी । तुज वरीन स्वयंवरेंसी । 
दमयंती नळा जैसी । स्वयंवर होईल तुज मज ॥ ८४ ॥ 
राज्य करीन बहुत दिवस । यज्ञ करीन असमसाहस । 
जिंकीन समस्त देशांस । मंत्रशास्त्र शिकेन बहु ॥ ८५ ॥ 
देवद्विजार्चन करीन । नाना अग्रहार दान देईन । 
ऐशापरी वृद्धाप्य होऊन । राज्यीं स्थापीन पुत्रासी ॥ ८६ ॥ 
आपण चवथा आश्रम घेईन । अगस्त्यऋषीपाशी जाईन । 
ब्रह्मज्ञानोपदेश शिकेन । अंतःकाळ होय तंव ॥ ८७ ॥ 
देहावसान होतां । तुज घेईन सांगता । 
 दिव्य विमानीं बैसोनि तत्त्वता । स्वर्गाप्रती जाऊं बळें ॥ ८८ ॥ 
ईश्र्वरपूजेची महिमा । शिवरात्रिव्रत श्रीशैल्य अनुपम्या । 
म्हणोनि राजा स्त्री घेऊनि संगमा । यात्रा करी शिवरात्री ॥ ८९ ॥ 
श्रीगुरु म्हणती तंतिकासी । शिवरात्री-श्रीपर्वत-महिमा ऐसी । 
ऐक तो श्र्वान परियेसीं । सप्तजन्मीं राजा झाला ॥ ९० ॥ 
अंती पावला स्वर्गलोक । पर्वतमहिमा ऐसा एक । 
तुज जाहलें गुरुमुख । ईश्र्वरपूजा करीं बरवी ॥ ९१ ॥ 
ग्रामीं असे कल्लेक्ष्वर । गाणगग्रामीं भीमातीर । 
पूजा करीं गा निरंतर । मल्लिकार्जुनसमान ॥ ९२ ॥ 
संगमेश्र्वर संगमासी । पूजा करीं अहर्निशी । 
मल्लिकार्जुन तोचि परियेसीं । न धरीं संदेह मनांत ॥ ९३ ॥ 
तंतिक म्हणे स्वामियासी । स्वामी तूं मज चाळविसी । 
पूजेसि गेलों मल्लिकार्जुनासी । लिंगस्थानीं तुज देखिलें ॥ ९४ ॥ 
सर्वां ठायीं तूंचि एक । झाला अससी व्यापक । 
कल्लेश्र्वर संगमनायक । एकेक सांगसी आम्हांपुढें ॥ ९५ ॥ 
ऐकोनि श्रीगुरु हांसती । ये रे पादुका धरीं म्हणती । 
नयन त्याचे झांकिती । संगमा आले तात्काळीं ॥ ९६ ॥ 
इतुकिया अवसरीं । मागें गाणगापुरीं । 
श्रीगुरुसी पाहती गंगातीरीं । कोठे गेले म्हणोनियां ॥ ९७ ॥ 
एक म्हणती संगमीं होता । एक म्हणती आम्ही आलों आतां । 
कोठें गेले पहा म्हणतां । चुकर होती भक्तजन ॥ ९८ ॥ 
श्रीगुरु आले संगमासी । तंतिकास पाठविती मठासी । 
बोलवावया शिष्यांसी । आपण राहिले संगमांत ॥ ९९ ॥ 
तंतिक आला गावांत । लोक समस्त हांसत । 
क्षौर कां रे केले म्हणत । तंतिक म्हणे श्रीपर्वता गेलो होतों ॥ १०० ॥ 
दवणा प्रसाद विभूति । नानापरींचे हार दाखविती । 
लोक ऐसा विस्मय करिती । म्हणती दोनप्रहरीं घरीं होता ॥ १०१ ॥ 
एक म्हणती सत्य मिथ्या । त्यासी म्हणती सांग रे सत्या । 
तंतिक म्हणे सवें गुरुनाथा । गेलों होतों वायुवेगें ॥ १०२ ॥ 
श्रीगुरु आले संगमासी । मज पाठविलें मठासी । 
बोलाविलें शिष्यांशी । राहूं पाहती आजि संगमी ॥ १०३ ॥ 
एक म्हणती होईल सत्य । मूर्ख म्हणती नव्हे, मिथ्य । 
तंतिक गेला त्वरित । शिष्यवर्गांसी जाणविलें ॥ १०४ ॥ 
सांगितला सकळ वृतांत । समस्त गेले संगमा त्वरित । 
पूजा जाहली संगमीं बहुत । सिद्ध म्हणे नामधारकासी ॥ १०५ ॥ 
मिथ्या म्हणती जे लोक । त्यांसी होईल कुंभीपाक । 
पंधरा दिवसीं ऐक । यात्रालोक गांवा आले ॥ १०६ ॥ 
मग पुसती तयांसी । तेहीं सांगितलें भरंवसीं । 
आनंद झाला भक्तासी । म्हणे सरस्वती-गंगाधर ॥ १०७ ॥ 
सिद्धें सांगितलें नामधारकासी । तें मी सांगतसे परियेसीं । 
श्रीगुरुमहिमा आपारेंसी । अमृत सेवितों निरंतर ॥ १०८ ॥ 
॥ इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ 
श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे 
श्रीशैलशिवरात्रिमहिमावर्णनं नाम त्रिचत्वारिंशोऽध्यायः ॥ 
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
 Gurucharitra Adhyay 43 
गुरुचरित्र अध्याय ४३


Custom Search

No comments:

Post a Comment