Tuesday, December 16, 2014

DeviMahatmya Adhyay 3 श्रीदेवीमहात्म्ये तृतीयोऽध्यायः (३)


DeviMahatmya Adhyay 3 
DeviMahatmya Adhyay 3 is in Marathi. It is translation of Durga SaptaShati Adhyay 3 very nicely done by Shri Rambaba Vernekar. This adhyay removes all difficulties and troubles from your life. In this adhyay the description of Goddess Mahalaxmi’s victory over the demons namely Chikshuranama, Chamur, Udam.Karal, Bashkal, Bhindipal, Tamra, Andhak, Ugrasya, Ugravirya, Mahahanu, Bidal, Durdhar, Durmukh. Goddess killed all these cruel demons. Then very terrible war against Mahishasoor started. Goddess finally killed Mahishasoor also.
श्रीदेवीमहात्म्ये तृतीयोऽध्यायः (३)
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदेव्यै नमः ॥ 
सूत सांगे शौनकासी । मार्कंडेय सांगे शिष्यासी ।
मेधाऋषी सुरथासी । सागता जाहला इतिहास ॥ १ ॥
तेव्हां तें असुरांचे सैन्य जाण । देवीनें मारिलें संपूर्ण ।
ऐसें सेनापतीनें पाहून । चिक्षुरनामा धांवला ॥ २ ॥
क्रोधें येऊनियां असुर । युद्ध करिता जाहला दुर्धर ।
देवीवरी अपार शर । वर्षता जाहला समरांगणी ॥ ३ ॥
जैसा मेरुशिखरावरी । मेघ तोयवृष्टि करी ।
तैसा वर्षला बाणधारी । देवीवरी असुर तो ॥ ४ ॥
तयाचें तें बाणजाळ । देवीनें छेदिलें सकळ ।
स्वबाण टाकोनि तत्काळ । घोडे सारथी मारिले ॥ ५ ॥
त्याच्या उच्च ध्वजातें छेदून । धनुष्य छेदिलें सवेंचि जाण ।
सर्व गात्रीं बाण मारुन । जर्जर केलें तयासी ॥ ६ ॥
तेव्हां चरणीं धांवला असुर । क्रोधें घेऊनि ढाल तरवार ।
सिंहाचे मस्तकीं सत्वर । ताडन करिता जाहला ॥ ७ ॥
तोंचि तीक्ष्ण खङ्ग घेऊनी । देवीचा सव्य बाहु लक्षोनी ।
ताडिता जाहला तत्क्षणीं । तो खङ्ग फुटला हातींचा ॥ ८ ॥
मग रविबिंबासारिखे जाण । शूल घेऊनि देदीप्यमान ।
परम क्रोधयुक्त होऊन । देवीवरी टाकिले ॥ ९ ॥
देवीनेंही शूल सोडिले । त्यांहीं असुरशूल खंडिले ।
आणि शतधा छिन्न भिन्न केलें । शरीर तया दैत्याचें ॥ १० ॥
ऐसा चिक्षुर पडलिया रणीं । मग चामुर गजारुढ होऊनी ।
क्रोधें धांवला तये क्षणीं । शक्ति सोडीत देवीवरी ॥ ११ ॥
तेव्हां देवीनें हुंकारें सत्वर । शक्ति पाडिली मेदिनीवर । 
मग शूल घेऊनि चामर । देवीवरी टाकीतसे ॥ १२ ॥
देवीनें आपुल्या बाणेंकरुन । शतधा शूल खंडिले जाण ।
मग सिंह तो देवीवाहन । उड्डाण करिता जाहला ॥ १३ ॥
बैसोनि गजाचे कुंभांतरीं । बाहुयुद्ध करी केसरी ।
देवशत्रूसी महीवरी । पाडिता जाहला क्षणार्धे ॥ १४ ॥
दोघे बाहुयुद्ध करितां । तों सिंह उडाला अवचितां । 
करप्रहारें तत्वत्तां । चामरशिर छेदिलें ॥ १५ ॥
मग शिलावृक्षेंकरुन । देवीने मारिला उदम जाण ।
दंत मुष्टितल हाणोन । कराल तोही पाडिला ॥ १६ ॥
देवी होऊनि क्रोधायमान । बाष्कल मारिला गदेकरुन ।
भिंदिपाल बाण सोडून । ताम्र अंधक मारिले ॥ १७ ॥
सवेंचि टाकोनियां त्रिशूळ । उग्रास्य उग्रवीर्य केवळ ।
मारोनि टाकिले तत्काळ । महाहनुही मारिला ॥ १८ ॥
देवी खङ्गेकरुनि सत्वर । छेदी बिडालाचें शिर ।
दुर्धर दुर्मुख महाक्रूर । बाणें नेले यमालया ॥ १९ ॥
असो या प्रकारेंकरुन । सैन्य जाहलें असतां क्षीण ।
महिषासुर रेडा होऊन । त्रासवीतसे गणांतें ॥ २० ॥
तेणें तुणडप्रहारेंकरुन । कित्येक विध्वंसिले गण ।
करोनि तीव्र खुरताडण । कितीएकांसी पाडिलें ॥ २१ ॥
तेणें लांगूलेंकरुनि ताडितां । गण मृत्यु पावलें तत्वत्तां । 
शृंगेकरुनि विदारतां । गतप्राण जाहले ॥ २२ ॥
त्याच्या शरीरवेगेकरुन । कितीएक पावले मरण ।
तो गर्जना करितां दारुण । मरण कित्येक पावले ॥ २३ ॥ 
भ्रमण करितां महिषासुर । अनर्थ जाहला महाघोर ।
कितीएक गणांते सत्वर । पाडिता जाहला भूमीसी ॥ २४ ॥
त्याच्या उच्छवासवायूकरुन । कितीएक जाहले गतप्राण ।
ऐसा तो देवीगणांतें बघून । सिंहावरीही धाविन्नला ॥ २५ ॥
सिंहातें मारावें म्हणोनि । धांवूनि जातसे तये क्षणीं । मग अंबिका तयालागूनि । कोप करिती जाहली ॥ २६ ॥
तोही महापराक्रमी असुर । कोपें करुनियां घोर ।
भूमीप्रती मारोनि खुर । विदारिता जाहला ॥ २७ ॥
मोठमोठे उच्च पर्वत । शृंगेकरुनि विदारित ।
क्षणें उडवूनियां टाकीत । गर्जना करित भयंकर ॥ २८ ॥
त्याच्या वेग भ्रमणें करुन । विदारिली पृथ्वी आपण ।
जेणें लांगूलताडनें जाण । सागरांतेंही क्षोभविलें ॥ २९ ॥
शृंगभ्रमणेकरुनि सत्वर । विदारिले सर्व जलचर ।
ज्याच्या श्र्वासानिलें अपार । पर्वत गेले आकाशीं ॥ ३० ॥
ऐसा क्रोधें तीव्र जाहला । मग देवीवरी धांविन्नला । 
तेव्हां वधावया दैत्याला । कोप आणिला चंडिकेनें ॥ ३१ ॥ 
चंडिका पाशातें टाकोनी । बांधिती जाहली तयालागूनी ।
तोही रेड्याचें रुप सोडोनी । सिंह होता जाहला ॥ ३२ ॥
इतुक्यांत छेदावें त्याचें शिर । तों तो पुरुष जाहला खङ्गधर ।
देवीनें तो लक्षूनि सत्वर । बाण हातीं घेतला ॥ ३३ ॥
खङ्गचर्मासहित छेदून । पाडावें इतुक्यांत जाण ।
असुर महागज होऊन । दिसता जाहला देवींतें ॥ ३४ ॥
असुर शुंडादंडें करुनी । सिंहासी आकर्षितां ते क्षणीं ।
जगदंबा खङ्गातें टाकोनी । शुंडादंड छेदीत ॥ ३५ ॥
इतुक्यामध्यें तो असुर । रेडा जाहला सत्वर ।
पुनः त्रैलोक्य चराचर । क्षोभविता जाहला ॥ ३६ ॥
त्यानंतर क्रोध पावून । जगन्माता करी मधुपान । 
दिसतसे अरुणलोचन । हंसती होय क्षणक्षणां ॥ ३७ ॥
तेव्हां गर्जना करुनि असुर । बलवीर्ये मदोन्मत्त निष्ठुर ।
शृंगेकरुनि पर्वत थोर । देवीवरी टाकीतसे ॥ ३८ ॥
देवीनें सोडोनि तीव्र बाण । पर्वत थोर टाकिले फोडून ।
मग त्या असुरालागीं वचन । देवी बोलती जाहली ॥ ३९ ॥
मूढा क्षणमात्र गर्ज गर्ज । मीं जोंवरी मधु प्राशीं सहज ।
तुज मारितां अदितिज । गर्जतील सर्वही ॥ ४० ॥
मेधा म्हणे सुरथासी । ऐसें देवी वदूनि त्यासी ।
मग उड्डाण करुनि वेगेंसीं । असुरावरी बैसली ॥ ४१ ॥
त्याच्या कंठाचे ठायीं जाण । पादें केलें आक्रमण । 
शूळेंकरुनि ताडण । त्यातें करिती जाहली ॥ ४२ ॥
ऐसियापरी तो निशाचर । देवीनें पदें आक्रमितां सत्वर ।
निजमुखापासोनि बाहेर । अर्धा निघता जाहला ॥ ४३ ॥
अर्ध निघाला असतां जाण । युद्ध करी असुर आपण ।
देवीनें पराक्रमेंकरुन । मोहें व्यापिलें तयासी ॥ ४४ ॥
नंतर खङ्ग घेऊनि सत्वर । तत्काळ छेदिलें असुरशिर ।
महिषासुर तो पृथ्वीवर । पडता जाहला ते काळीं ॥ ४५ ॥
तेव्हां दैत्यसैन्यीं हाहाकार । होता जाहला अनर्थ थोर ।
उरले जे कां असुरभार । दाही दिशा पळाले ॥ ४६ ॥
देवसैन्यीं जयजयकार । वर्षाव होतसे पुष्पनिकर ।
अत्यंत हर्षातें सुरवर । पावते जाहले ते काळीं ॥ ४७ ॥
तेव्हां महर्षीसहित सुरवर । देवीसी स्तविते जाहले अपार ।
गंधर्वपतीही सुस्वर । गाते जाहले ते समयीं ॥ ४८ ॥
देवता-अप्सरांचे गण । करिते जाहले दिव्य नर्तन ।
या प्रकारें त्रैंलोक्य जाण । सुखी होतें जाहले ॥ ४९ ॥
असो हें महालक्ष्मीचें आख्यान । जो करी श्रवण पठन ।
त्यासी सर्व पुरुषार्थ जाण । येणेंकरुनि साधती ॥ ५० ॥
श्रलोकश्र्लोकाचा अर्थ सकळ । राममुखें वदविला केवळ ।
सज्जनीं मिळोनियां कुशळ । श्रवण केला पाहिजे ॥ ५१ ॥
स्वशत्रूसी व्हावें दमन । सर्व बाधांचे व्हावें प्रशमन ।
ऐसें मनी वाटतां जाण । हा अध्याय पहावा ॥ ५२ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये तृतीयोऽध्यायः ॥
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥

DeviMahatmya Adhyay 3
श्रीदेवीमहात्म्ये तृतीयोऽध्यायः (३)


Custom Search

No comments:

Post a Comment