Friday, December 19, 2014

DeviMahatmya Adhyay 4 श्रीदेवीमहात्म्य अध्याय (४) चौथा


DeviMahatmya Adhyay 4 
DeviMahatmya Adhyay 4 is in Marathi. It is translation of Durga SaptaShati Adhyay 4 very nicely done by Shri Rambaba Vernekar. Name of this adhyay is Shakradirsuti. Adhyay is the praise of Goddess Mahalaxmi done by God Indra and other Gods. Then they perform pooja of Goddess also. This praise is done after Goddess MahaLaxmi had killed Demon Mahishasoor. Goddess Mahalaxmi very much pleased by God Indra and Other Gods praised and asked them to name what they want as a blessing. They all asked her to help them in future whenever a demon like Mahoshasoor troubles them. Goddess gave them the blessing as they wished and disappeared.
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (४) चौथा
श्रीगणेशाय नमः ॥ श्रीदैव्यै नमः ॥
मेधाऋषि म्हणे सुरथा । एकाग्र ऐक गा नृपनाथा ।
सांगतों मी देवीची कथा । श्रवण करी आदरें ॥ १ ॥
सूत तो सांगे शौनकासी । मार्कंडेय म्हणे शिष्यासी । 
महालक्ष्मीचरित्रासी । श्रवण आतां करावें ॥ २ ॥
देवीनें तो महिषासुर । मारिला करुनि प्रताप थोर ।
तेव्हां इंद्रादि सुरवर । स्तविते जाहले देवीतें ॥ ३ ॥
देवशत्रु दुरात्मा केवळ । महापराक्रमी सकळ ।
मारिला असतां तो खळ । देव स्तविते जाहले ॥ ४ ॥
साष्टांग करुनियां नमन । अष्टभावें दाटले पूर्ण ।
म्हणती हें विश्र्व संपूर्ण । व्यापिलें अससी तूं अंबे ॥ ५ ॥
सर्व विश्र्वासी आणि तुजसी । भेद नाहींच परियेंसी ।
देवी तूंचि विश्र्वस्वरुपासी । घेती जाहलीस निर्धारे ॥ ६ ॥
सुवर्ण आणि अलंकार । भेद नाहींच परस्पर ।
तैसें हे विश्र्व चराचर । देवीरुप सर्वही ॥ ७ ॥
घटासी आणि मृत्तिकेसी । पटासी आणि तंतूसी ।
उदकासी आणि तरंगासी । भेद कांहीं असेना ॥ ८ ॥
जो कां अज्ञानी असे बाळ । अलंकारीं दृष्टी केवळ ।
ज्ञानी तोही पाहे सकळ । परी दृष्टी सुवर्णी ॥ ९ ॥
मृगासी मृगजळ भासे जळ । मिथ्यासर्प रज्जु केवळ ।
तैंसे अज्ञानियांसी विश्र्व सकळ । नानापरी दिसतसे ॥ १० ॥
विश्र्व हें तुझें स्वरुप जाण । तूं सर्वांसी पूज्यमान ।
भक्तीनें तुज आमुचें नमन । कल्याण करी जबदंबे ॥ ११ ॥
तुझा प्रभाव आणि बळ । न कळे ब्रह्मादिकां केवळ ।
विश्र्व पाळावया सकळ । बुद्धि देई आमुतें ॥ १२ ॥
अशुभाचा करावा नाश । ऐसी बुद्धि द्यावी आम्हांस ।
पुण्यवंताचे घरी वास । लक्ष्मीरुपें असे तुझा ॥ १३ ॥
तूं अलक्ष्मीरुप धरुन । पातकियांचे घरीं जाण ।
श्रद्धारुपेंकरुन । साधुगृहीं राहसी सदा ॥ १४ ॥
देवी तूं लज्जारुप धरिसी । कुलवंताचे गृहीं राहसी ।
अक्षय त्यातें क्षेम करिसी । विश्र्वपाळे तुज नमो ॥ १५ ॥  
तुझें रुप गुण चरित । काय वर्णावें अत्युद्भुत ।
जगाचा हेतु तूं हे निश्र्चित । नाहीं जाणत कोणीही ॥ १६ ॥
सर्वाश्रया तूं अपार । तुझा नाहीं अंतपार ।
आद्याप्रकृतिगोचर । स्वाहा स्वधा अससी तूं ॥ १७ ॥
अचिंत्य महाव्रता मुक्ती । तूंचि मुक्तीची हेतुशक्ती ।
विद्या परमा भगवती । उपासिती तुज सदा ॥ १८ ॥
शब्दात्मिका भगवती । सर्व वेदांची शब्दशक्ती ।
सर्व जगाची वार्ता निश्र्चितीं । निर्वाहरुपिणी आहेस ॥ १९ ॥
मेधादेवी तूं अंबिका । या भवसमुद्राची नौका ।
कैटभारीहृदयीं एका । लक्ष्मीरुपी आहेस ॥ २० ॥
तूंचि देवी गौरी पार्वती । शिवाचे अर्धांगीं निश्र्चितीं ।
तुजवांचूनि त्रिजगतीं । शक्ति आन असेना ॥ २१ ॥ 
हास्य करोनि अलंकृत । चंद्रबिंबाऐसें निश्र्चित ।
तुझें मुख पाहूनि त्वरित । महिष प्राण सोडीना ॥ २२ ॥
तत्काळ न सोडितां प्राण । अवकाशें पावला मरण ।
हें आश्र्चर्य काळदर्शन । होतां कोण वांचेल तो ॥ २३ ॥
कल्याणाकारणें प्रसन्न होसी । कोपल्या कुळातें नाशिसी ।
आतांचि जाणिलें निश्र्चयेंसीं । तूं दैत्यसैन्य मर्दिले ॥ २४ ॥
तेचि देशांत होती मान्य । धन यश त्यां करिती धन्य ।
तूं प्रसन्न झालिया दैन्य । जाय सर्व निरसोनी ॥ २५ ॥
जो कां असे पुण्यवंत । आदरें सत्कर्म आचरीत ।
तेणें स्वर्गलोका जात । देवी तुझ्या प्रसादें ॥ २६ ॥
तपादि क्लेश करुन । तुझे ठायीं पावतसे जन ।
म्हणोनि दुर्गा नामाभिधान । होतें जाहलें तुजलागीं ॥ २७ ॥ 
दुर्गे ऐसें स्मरण करितां । सर्व जीवांच्या भयव्यथा ।
यांते हरी ही सत्ता । तुझ्या असे स्मरणाची ॥ २८ ॥
आत्मसुखाचे ठायीं जाण । राहिले जे कां अनुदिन ।
स्वस्थ असें नामाभिधान । त्यांचें असे निर्धारें ॥ २९ ॥
स्वस्थ म्हणजे ज्ञानी जन । तेही करितां तुझें स्मरण ।
अत्यंत शुभमति त्यां देऊन । दारिद्र्य दुःख हरिसी तूं ॥ ३० ॥
दुःख हरावया जाण । तुजवांचूनि समर्थ कोण ।
सर्व भक्तोपकारालागून । आर्द्र चित्तीं सर्वदा ॥ ३१ ॥
ऐसियापरी भगवतीस्तवन । वारंवार करिती सुरगण ।
असुरांसी जाहले मरण । म्हणोनि हर्षें गजबजती ॥ ३२ ॥
म्हणती यद्यपि पातकी असुर । त्यांसी निजहस्तें वधूनि सत्वर ।
स्वर्गी राहोत निरंतर । ऐसें इच्छिसी कृपाळें ॥ ३३ ॥
तूं दृष्टीनें करिसी भस्म । परी स्वर्गप्राप्तीचा जाणोनि काम ।
शस्त्रपूत होऊनि परम । गति पावोत ही इच्छा ॥ ३४ ॥
तव वदन पाहिलें म्हणोन । असुरांच्या दृष्टी जाण ।
तुझ्या खङ्गशूलेंकरुन । नाश नाहीं पावल्या ॥ ३५ ॥
तुझ्या सुस्वभावेंकरुन । दुष्ट स्वभाव नासे पूर्ण ।
तुझें रुप पराक्रम जाण । त्यासी उपमा असेना ॥ ३६ ॥
तुझी वैरियांचे ठायीं दया । उत्तम गति देसी तयां ।
समरनिष्ठुरता वायां । दाखविसी भुवनत्रयीं ॥ ३७ ॥
रिपूंचा त्वां वध करुन । त्रैलोक्याचें केलें पालन ।
आतां देवी साष्टांग नमन । तुज असो आमुचें सदा ॥ ३८ ॥
शूल खङ्ग घंटेचा नाद । चौथा चापरज्जूचा शब्द । 
तेणेंकरुनियां आनंद  । आम्हांलागीं रक्षावें ॥ ३९ ॥
तुझ्या शूलभ्रमणेंकरुन । चहूं दिशांचे ठायीं पूर्ण ।
आमुचे करावें देवी रक्षण । नमस्कार तुज असो ॥ ४० ॥
सौम्य अथवा अत्यंत घोर । देवी तुझे जे रुपावतार ।
या त्रैलोक्यीं करिती संचार । ते रक्षोत सर्वदा ॥ ४१ ॥
आम्हांतें तैसेच पृथ्वीतें । तुझे अवतार रक्षोत माते ।
सर्व शस्त्रेंकरुनि आमुतें । रक्षीं तूंचि सर्वदा ॥ ४२ ॥
मेधा म्हणे सुरथाप्रती । ऐसी देवांनीं केली स्तुती ।
नाना कुसुमांनीं निश्र्चितीं । अर्चियेली जगदंबा ॥ ४३ ॥
गंधानुलेपन धूप दीप । ते लाविते जाहले अमूप ।
उपचार अर्पूनि समीप । नमन करिते जाहले ॥ ४४ ॥
आनंदें देवी यानंतर । देवांतें बोलिली उत्तर ।
प्रसन्न जाहलें मागा वर । मजपासूनि इच्छित ॥ ४५ ॥
तैं देव बोलते जाहले । भगवती त्वां सर्वही केलें ।
आतां नाहीं कार्य राहिलें । किंचितही अवशिष्ट ॥ ४६ ॥
हा मारिला निशाचर । आमुचा शत्रु महिषासुर ।
तथापि आम्हांसी देसी वर । तरी आतां मागतसों ॥ ४७ ॥
तुज स्मरतांचि सत्वरीं । आमुच्या शत्रूचा नाश करी ।  
अथवा दुःखातें संहारीं । हा एक वर मागितला ॥ ४८ ॥ 
जो तुजप्रती या स्तवनें । तोषवील अमलानने ।
त्याच्या धनादिवृद्धीकारणें । प्रसन्न होई सदांबिके ॥ ४९ ॥
आम्हां जाहलीस प्रसन्न । तरी त्याचा करीं मनोरथ पूर्ण ।
हा दुसरा वर जाण । मागितला तुज जगदंबे ॥ ५० ॥
मेधा म्हणे सुरथासी । ' तथास्तु ' बोलोनि देवी त्यांसी ।
गुप्त जाहली वेगेसी । देव तटस्थ जाहले ॥ ५१ ॥
ऐसी सर्व देवशरीरांपासून । महालक्ष्मी जाहली उत्पन्न ।
हें द्वितीयावतारचरित्र तीन । अध्यायीं रामें निरुपिलें ॥ ५२ ॥
आतां गौरीदेहापासाव । महासरस्वतीचा उद्भव । 
होईल तें चरित्र अध्याय नव । श्रवण करा आदरें ॥ ५३ ॥
ह्या देवीस्तुतीचें जाण । भावें करितां श्रवण पठण ।
सर्व बाधा निरसून । इष्ट कार्यसिद्धि होतसे ॥ ५४ ॥
॥ इति श्रीमार्कंडेयपुराणे सावर्णिके मन्वंतरे देवीभगवतीमाहात्म्ये शक्रादिस्तुतिर्नाम चतुर्थोऽध्यायः ॥
॥ श्रीजगदंबार्पणमस्तु ॥
DeviMahatmya Adhyay 4 
श्रीदेवीमहात्म्य अध्याय (४) चौथा



Custom Search

No comments:

Post a Comment