Monday, March 21, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 34 Part 1/2 श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय चौतीसावा (३४) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 34 
Gorksha chanted Sanjivani Mantra and made Virbhadra alive again. Machchhindra crowned Dharmanath as the king of Prayag. After few days he left the body of king Trivikram and entered into his own body. Then Goraksha, Chorangi and Machchhindra proceeded for tirthayatra. They reached to the Dhamapur on the bank of Godavari River. Farmer Manik was performing tapas by chanting God's name for 12 years. Gorakasha gave him diksha of Nathapanth and Mantropadesh. Machchhindra called Manik as Adbhanginath and took him with them for tirthayatra. They returned to Prayag after 12 years. Dharmanath was waiting for them. Goraksha gave MantropDikasha to Dharmanath. Revananath who was incarnation of Chamas Narayan was cared by a farmer named as Sahansaruk and his wife Uttamnami. Revannath accidently met God ShriDattaguru who gave him a Mantra. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 35th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौतीसावा (३४) भाग १/२ 
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी रघूत्तमा । आराध्य होसी प्लवंगमा । 
जटायुनामी विहंगमा । मुक्तिदाता रक्षक तूं ॥ १ ॥
तरी आतां कथाप्रसंगा । पुढें बोलवीं नवरसप्रसंगा ।
जेणें ऐकूनि श्रोतिये अंगा । अनुभवतील महाराजा ॥ २ ॥
मागिले अध्यायीं करविलें बोलणें । मच्छिंद्राचें भूमंडळी शरीर आणून ।
वीरभद्र मारुनि केला भस्म । दानवांसह रणांगणीं ॥ ३ ॥ 
तरी आतां पुढें कथा । वीरभद्र निमाल्या उमाकांता ।
सहज गुण आठवोनि चित्ता । पुत्रमोहें वेष्टिला ॥ ४ ॥
मुख वाळूनि झालें म्लान । अश्रु लोटले दोन्हीं नयनीं ।
परी न बोले कांहीं जटा वेष्टूनी । पुत्रमोहें स्फुंदतसे ॥ ५ ॥
मनांत म्हणे हा हा पुत्रा । पुरता धैर्या लावण्यगात्रा ।
विद्यासंपन्न सर्व अस्त्रां । जाणता एक होतासि कीं ॥ ६ ॥
अहा कैसा दैवहीन । हातींचें गेलें पुत्रनिधान ।
काय असोनि अपार गण । तया सरसी न पवती ॥ ७ ॥
एक इंदु खगीं नसतां । अपार उडुगण असोनि वृथा ।
तेवीं वीरभद्राविण सर्वथा । हीन तेजें वाटती ॥ ८ ॥
कीं मयूरा सर्वांगीं डोळे । परी देखण्याचे मंदावले बुबुळे । 
तेवीं वीरभद्राविण गण विकळे । सर्व मातें भासती पैं ॥ ९ ॥
कीं गात्रें सकळ चांगुलपणीं । अंगीं मिरवला लावण्यखाणी ।
परी एक घ्राण गेलें सांडोनी । सकळ विकळ तीं होती ॥ १० ॥   
तैसें माझ्या वीरभद्राविण । सकळ विकळ दिसती गण ।
अहा वीरभद्र माझा प्राण । परत्र कैसा गेला सोडोनी ॥ ११ ॥
ऐसें म्हणूनि मनींच्या मनांत । पंचानन आरंबळत ।
तीं चिन्हें जाणूनि गोरक्षनाथ । चित्तामाजी कळवळला ॥ १२ ॥
मनांत म्हणे बद्रिकेदाश्रमातें । मातें बैसविलें तया गुरुनाथें ।
तैं रात्रंदिवस उमाकांत । मजसाठीं श्रम पावे ॥ १३ ॥
मायेसमान पाळूनि लळा । माता रक्षीं जेवीं बाळा ।
तरी ऐसा स्वामी चित्तकोंवळा । पुत्रमोहें वेष्टिला असे ॥ १४ ॥
अहा तरी म्यां उपकार । काय हो केला अनिवार । 
ऐसा स्वामी शिणवला हर । दुःख तुंबळ देऊनियां ॥ १५ ॥
ऐसें म्हणूनि स्वचित्तांत । पाया लागे गोरक्षनाथ ।
म्हणे पुत्रदुःखावरी मोहवेष्टित । चित्त तुमचे झालें कीं ॥ १६ ॥
तरी वीरभद्रातें आतां उठवीन । परी अस्थि आणाव्या ओळखून ।
येथें राक्षसांचें झालें कंदन । राक्षसअस्थि मिरवती ॥ १७ ॥
त्यांत वीरभद्राच्या अस्थी । मिसळल्या कृपामूर्ती ।
म्हणूनि संशय वाटे चित्ती । वीरभद्रातें उठवावया ॥ १८ ॥
जरी ऐसिया मिसळल्या नाथा । संजीवनीप्रयोग जपतां ।
सकळ राक्षस उठतील मागुतां । म्हणोनि चिंता व्यापिली ॥ १९ ॥
ऐसें बोलतां गोरक्षजती । नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती । 
वीरभद्राच्या सकळ अस्थी । ओळखूनि काढीन मी ॥ २० ॥
माझे गण आहेत जितुले । ते आसनीं शयनीं भोजनीं भले ।
मम नामीं रत झाले । काया वाचा बुद्धीनें ॥ २१ ॥
तरी चित्तबुद्धिअंतःकरणीं । वीरभद्र नामीं गेला वेष्टोनी ।
जागृतीं सुषुप्तीं स्वप्नीं । वेष्टिला असे मम नामीं ॥ २२ ॥
ऐसें बोलूनि शंकर । रणभूमींत करी संचार । 
मग तेथें अस्थि उचलूनि सत्वर । कर्णीं आपुल्या लावीतसे ॥ २३ ॥
ऐसियेपरी शोध करितां । वीरभद्र जेथें पडला होता ।
तेथें जाऊनि अवचट हस्ता । अस्थि उचली तयाच्या ॥ २४ ॥
अस्थि उचलोनि कर्णी लावीत । तंव त्या अस्थि मंद शब्द करीत ।
शिव शिव म्हणोनि शब्द येत । शिवकर्णीं तत्त्वतां ॥ २५ ॥
मग त्या अस्थि पंचानने । गोळा केल्या परीक्षेनें ।
जेथें होता गोरक्षनंदन । तेथें आणूनि ठेविल्या ॥ २६ ॥
मग तो विद्यार्णवकेसरी । भस्मचिमुटी कवळूनि करीं ।
वीरभद्रनामीं साचोकारीं । संजीवनी स्मरला असे ॥ २७ ॥
होतां संजीवनीचा प्रयोग पूर्ण । वीरभद्र उठला देह धरुन । 
म्हणे माझे धनुष्यबाण । कोठे आहे सांगा कीं ॥ २८ ॥
व्यापले अपार राक्षस कोटी । तितुके मारीन आतां जेठी । 
उपरी गोरक्षा यमपुरी शेवटीं । प्रतापानें दावीन कीं ॥ २९ ॥
ऐसें वीरभद्र बोले वचन । करीं धरी पंचानन ।
म्हणे बापा आतां शीण । व्यर्थं बोलाचा न करीं ॥ ३० ॥
मग हृदयीं कवळूनि त्यातें । सांगितला सकळ वृत्तान्त ।
उपरी म्हणे उमाकांत । स्नेह नाथीं धरावा ॥ ३१ ॥
मग गोरक्ष आणि वीरभद्रजेठी । उभयतांची करविली भेटी ।
उपरी म्हणे स्नेह पोटीं । उभयतांनीं रक्षावा ॥ ३२ ॥
उपरी बाहत्तर कोटी चौर्‍यायशीं लक्ष । शिवगण प्रतापी महादक्ष ।
ते वायुचक्रीं असतां प्रत्यक्ष । उतरी गोरक्षक तयांसी ॥ ३३ ॥
मग सकळ समुदाय एक करुन । जाते झाले गोरक्षा नमून ।
येरीकडे राव त्रिविक्रम । राज्यवैभवीं गुंतला ॥ ३४ ॥
गोरक्ष सकळ शवमांदुस । रक्षण करी शिवालयास । 
तों त्रिविक्रमराव दर्शनास । अकस्मात पातला ॥ ३५ ॥
राव देखतां गोरक्षासी । प्रेमें मिठी घाली ग्रीवेसी ।
निकट बैसवोनि त्यासी । सर्व वृत्तान्त विचारी ॥ ३६ ॥
मग शवाचा जो झाला वृत्तान्त । तो सकळ त्यातें केला श्रुत ।
होतांचि तलमळ चित्तांत । मच्छिंद्राच्या लागली ॥ ३७ ॥                       
मग गोरक्षासी बोले वचन । धैर्य धरावें कांहीं दिन ।
धर्मनाथातें राज्यासन । देऊनि येतों लगबगें ॥ ३८ ॥
ऐसें बोलूनि प्रजानाथ । स्वगृहीं आला त्वरितात्वरित ।
बोलावोनि मंत्रिकांतें । विचारातें घडविलें ॥ ३९ ॥
मग पाहूनि उत्तम दिन । महीचे राव घेतले बोलावून ।
राज्यपदीं स्वहस्तें अभिषेक करवून । धर्मनाथ स्थापिला ॥ ४० ॥
याचकांसी देऊनि अपार धनें । आणि भूपांलागीं दिधलीं भूषणें ।
परम स्नेहें बोळवून । बंदीजन सोडविले ॥ ४१ ॥
यासही लोटला एक मास । राव त्रिविक्रम आपुल्या मंदिरीं खास ।
देह सांडूनि शिवालयास । तत्क्षणीं पातला ॥ ४२ ॥   
येरीकडे रेवती सती । सहज गेली राजसदनाप्रती ।
म्हणे महाराजा हे नृपती । अजूनि कां हो निजलांत ॥ ४३ ॥
परी तीतें न बोले कांहीं । मग हालवोनि पाहे स्वहस्तप्रवाहीं ।
तंव तें प्रेत मिरवलें देहीं । पाहोनि शोका वहिवटे ॥ ४४ ॥
रेवती शोक करितां तुंबळ । ऐकूनि धांवला धर्मनाथ बाळ ।
मंत्री प्रजा सेवक सकळ । हंबरडा बहु ऊठला ॥ ४५ ॥ 
तो वृत्तान्त शिवालयासी । जनमुखें आला गोरक्षापाशीं ।
मग सिद्ध करुनि भस्मचिमुटीसी । संजीवनी प्रयोजी ॥ ४६ ॥
अस्थि मांस प्रयोजितां । देह संगीन झाला त्वरित । 
संगीन होतां मच्छिंद्रनाथा । समय पावला रिघावया ॥ ४७ ॥ 
मच्छिंद्रदेहीं संचार होतां । उठूनि बैसला क्षण न लागतां ।
येरीकडे रावप्रेत । स्मशानवाटिके आणिलें ॥ ४८ ॥
प्रेत आणिलें स्मशानीं । त्रिवर्ग पाहवया निघाले मुनी ।
तों रेवतीनें दृष्टीं पाहोनी । शोध आणविला तयाचा ॥ ४९ ॥
करुनि रायाचें दहन । स्नाना गेले सकळ जन ।
परी धर्मनाथ दारुण । शोक करी अद्भुत पैं ॥ ५० ॥
शोक करी तरी कैसा । सोडूनि प्राणाचा भरंवसा ।
लोक बोधितां न ये भासा । आरंबळत असे आक्रोशें ॥ ५१ ॥
उत्तरक्रिया झालियाउपरी । न राहे रुदन तयाचें परी ।
अन्नपाणी वर्जूनि शरीरीं । प्राण देऊं म्हणतसे ॥ ५२ ॥
मग मायेचा मोह अत्यंत । त्यातें नेऊनि परम एकांतांत ।  
म्हणे बाळा शोक कां व्यर्थ । पितयाकरितां करितोसी ॥ ५३ ॥
तरी आतां बाळा तुझा पिता । चिरंजीव आहे महीवरुता ।
प्रत्यक्ष जाऊनि शिवालयीं आतां । निजदृष्टीं विलोकीं ॥ ५४ ॥
तव पित्याचें मच्छिंद्रनाम । चिरंजीव आहे उत्तमोत्तम । 
ऐसें ऐकतां राजोत्तम । पिता कैसा म्हणतसे ॥ ५५ ॥
मग प्रवेशादि सकळ वार्ता । सांगती झाली निजसुता ।
धर्मनाथ ऐकोनि तत्त्वतां । तुष्ट झाला शरीरातें ॥ ५६ ॥
मग शीघ्र घेऊनि कटकभार । शिवालयीं आला अति सत्वर ।
भावें नमूनि नाथ मच्छिंद्र । शिबिकासनीं वाहिला ॥ ५७ ॥
नेऊनि आपुले राजभवनीं । सेवा करीतसे प्रीतीकरुनी ।
मग तो एक संवत्सर तेथें राहूनी । पुढें तीर्था चालिला ॥ ५८ ॥
चालिला परी धर्मनाथ । परम झाला शोकाकुलित ।
म्हणे ताता तव सांगातें । मीही तीर्था येतों कीं ॥ ५९ ॥
याउपरी बोले मच्छिंद्रनाथ । बाळ द्वादश वर्षीं येऊं येथें ।
मग जोग देऊं गोरक्षहातें । तूतें सवें नेईन मी ॥ ६० ॥
आतां रेवतीची सेवा करुन । भोगीं आपुलें राज्यासन ।  
जेथें रेवती तेथें प्राण । माझा असे हो बालका ॥ ६१ ॥
तिची सेवा केलियानें । संतुष्ट आहे माझें मन ।
ऐसें करुनि समाधान । त्रिवर्ग तेथून निघाले ॥ ६२ ॥
मग तीर्थाटणीं भ्रमण करिती । येऊनि पोहोंचले गोदातटीं ।
भामानगर काननपुटीं । येऊनियां पोहोंचले ॥ ६३ ॥
ग्रामनाम ऐकूनि कानीं । गोरक्षाचे अंतःकरणीं ।
स्मरण झालें कृषिधर्मीं । माणीकनामी कृषीचें ॥ ६४ ॥
मग मच्छिंद्रातें सांगे समस्त । अडबंग भेटला एक तेथें ।
मी प्रसन्न होतां आपुल्या चित्तें । कांहीं वर न घे तो ॥ ६५ ॥
मग मुळापासूनि तयाचें कथन । मच्छिंद्रा केलें निवेदन ।
मच्छिंद्रें ऐकूनि वर्तमान । म्हणे पुनः आतां पहावा ॥ ६६ ॥
मग शेतसुमार धरुनि चाली । चालत आले त्रिवर्ग पाउलीं ।
माणीकनामें निश्र्चयबळी । काष्ठासमान देखिला ॥ ६७ ॥
मौळीं विराजे वेष्टन । बाबर्‍या रुळती महीकारण । 
नखें जुळमट (वेटोळी वळलेली) गेलीं होऊन ॥ ६८ ॥
अस्थि त्वचा झालीं एक । पोट झालें पृष्ठीं स्थायिक ।
दृष्टी लावूनियां देख । मंत्रजप करीतसे ॥ ६९ ॥
ऐसी पाहतां तपाकृती । गोरक्ष धन्य म्हणे चित्तीं । 
मग नमूनि मच्छिंद्राप्रती । अडबंग हाचि म्हणतसे ॥ ७० ॥
मग निकट येऊनि त्रिवर्ग जण । बोलते झाले तयाकारण ।
म्हणती आतां तपोघना । पूर्ण तप करीं कां रे ॥ ७१ ॥
येरु वचन त्यां देत । तुमचे यांत काय जात ।
धरुनि आपुला शुद्ध पंथ । गमन करावें येथूनियां ॥ ७२ ॥
जें जें बोले मच्छिंद्रनाथ । तया वांकडेपणें उत्तर देत ।
मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रातें । हा अडबंग असे महाराजा ॥ ७३ ॥
तरी याचें आतां हित । युक्तीनें करितों बैसा स्वस्थ ।
मग तरुच्छायेनिकट तेथ । मच्छिंद्र जाऊनि बैसला ॥ ७४ ॥
चौरंगी आणि मच्छिंद्रनाथ । गोरक्षाची मौज पहात ।
गोरक्ष जाऊनि पैं तेथ । अहा अहा म्हणतसे ॥ ७५ ॥
अहा म्हणूनि वाणी । म्हणे ऐसा महीतें दुजा स्वामी ।
आम्हीं देखिला नाहीं नयनीं । तपोनिधि आगळा हो ॥ ७६ ॥        
समुद्रवलयांकित । पृथ्वी पाहिली आहे समस्त । 
परी ऐसा तपोनाथ । देखिला नाहीं निजदृष्टीं ॥ ७७ ॥
तरी ऐसा स्वामी योगमुनी । याचा अनुग्रह घ्यावा कोणीं ।
गुरु झालिया ऐसा प्राणी । दैव अपार मिरवतसे ॥ ७८ ॥
तरी आतां असो कैसें । गुरु करावा आपणास ।
ऐसें चिंतूनि बोले त्यास । प्रज्ञावंत महाराजा ॥ ७९ ॥
म्हणे स्वामी कृपा करुन । मज अनुग्रहीं गुरु होऊन ।
ऐसें बोलणें ऐकोन । अडबंग म्हणे तयासी ॥ ८० ॥
बेटा येवढा थोर झाला । अद्यापि अक्कल नाहीं याला ।
गुरु करुं म्हणतो आम्हांला । मूर्खपणीं आगळा हा ॥ ८१ ॥
मग मजला गुरु करुं पहासी । तरी तूंचि कां बेट्या होईनास मजसी ।
ऐसें म्हणूनि स्वकर्णासी । तया मुखीं लावीतसे ॥ ८२ ॥
कर्ण लागतां गोरक्षाननीं । सज्ञानमंत्र ब्रह्मखाणी ।
परम कृपें कर्णीं फुंकूनी । सनाथ केला क्षणार्धें ॥ ८३ ॥
मंत्र पडतां कर्णपुटीं । त्रैलोक्याची आली दृष्टी ।
स्थावर-जंगम एक थाटीं । ब्रह्मरुप भासलें ॥ ८४ ॥
मग अर्थाअर्थीं सकळ ज्ञान । झाला बृहस्पतिसमान ।
मग सांडूनि आपुलें तपःसाधन । गोरक्षचरणीं लागला ॥ ८५ ॥
मग गोरक्ष भस्मशक्तिप्रयोग । प्रयोगूनि भाळीं चर्ची सांग ।
तेणेंकरुनि सर्वांग । शक्तिवान मिरवलें ॥ ८६ ॥
मग धरुनि शीघ्र तयाचा हस्त । वृक्षाखालीं आणी नाथ ।
म्हणे महाराजा कृपावंत । अडबंग हाचि ओळखावा ॥ ८७ ॥
हंसूनि बोले मच्छिंद्रमुनी । या अडबंगातें अडभंग नामीं ।
पाचारावें सर्व येथोनी । साजूकपणीं या वाटतसे ॥ ८८ ॥
मग अवश्य म्हणे गोरक्ष त्यास । नाथदीक्षा दिधली खास ।
मग शीघ्र घेऊनि व्यासंगास । तीर्थालागीं जातसे ॥ ८९ ॥
मार्गीं जातां सद्विद्येसी । सकळ तेव्हां पूर्ण अभ्यासी ।
आपुल्यासमान शस्त्रअस्त्रेंसीं । अडभंग तो मिरवला ॥ ९० ॥
असो ऐसे चारी जण । द्वादश वर्षें तीर्थाटण । 
करुनि पुनः प्रयागाकारण । चारी सूर्य पातले ॥ ९१ ॥
येरीकडे धर्मनाथासी । पुत्र झाला सतेजराशी । 
वडिलांचें नांव ठेविलें त्यासी । त्रिविक्रम म्हणोनियां ॥ ९२ ॥
चौघे प्राज्ञिक ग्रामीं येतां । श्रुत झालें धर्मनाथा ।
मग कटकभारेंसी शिबिके तत्त्वतां । बैसवोनि आणिले सदनासी ॥ ९३ ॥
मग धृति वृत्ति सदन । करुनि तोषविलें मच्छिंद्रमन ।
मग त्रिविक्रमा राज्यीं स्थापून । दीक्षा घेतली योगाची ॥ ९४ ॥
माघमासीं पुण्यतिथी । द्वितीयेसी धर्मराजाची बीज म्हणती ।
ते दिवशीं गोरक्ष जती । अनुग्रह देत तयातें ॥ ९५ ॥
याउपरी देव मिळवूनि स्वर्गींचे । आणि प्रजालोक त्या ग्रामींचे ।
मेळवूनि चोज अनुग्रहाचें । मोहळें रचिलीं अपार ॥ ९६ ॥
अनुग्रह झाल्यावरती । सकळ बैसोनि एकपंक्ति ।
गोरक्ष कवळ घेऊनि हातीं । सर्वांमुखीं ओपीतसे ॥ ९७ ॥
मग तो आनंद परम जेठी । पाहूनि धांवले सुरवर थाटीं ।
तेही प्रसाद पावोनि शेवटीं । तुष्ट चित्तीं मिरवले ॥ ९८ ॥
मितवले परी करिती भाषण । ऐसाचि प्रसाद जन्मोजन्म ।
प्रतिसंवत्सरीं असावा पूर्ण । इच्छेलागीं वाटतसे ॥ ९९ ॥
ऐसें बोलतां सुरवर सकळ । ऐकूनि बोले तपोबळ ।
माझें नाम घेऊनि केवळ । अर्पा जगा प्रतिवर्षीं ॥ १०० ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 34   श्रीनवनाथ भक्तिसार अध्याय चौतीसावा (३४)



Custom Search

No comments:

Post a Comment