Monday, March 21, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 34 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौतीसावा (३४) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 34 
Gorksha chanted Sanjivani Mantra and made Virbhadra alive again. Machchhindra crowned Dharmanath as the king of Prayag. After few days he left the body of king Trivikram and entered into his own body. Then Goraksha, Chorangi and Machchhindra proceeded for tirthayatra. They reached to the Dhamapur on the bank of Godavari River. Farmer Manik was performing tapas by chanting God's name for 12 years. Gorakasha gave him diksha of Nathapanth and Mantropadesh. Machchhindra called Manik as Adbhanginath and took him with them for tirthayatra. They returned to Prayag after 12 years. Dharmanath was waiting for them. Goraksha gave MantropDikasha to Dharmanath. Revananath who was incarnation of Chamas Narayan was cared by a farmer named as Sahansaruk and his wife Uttamnami. Revannath accidently met God ShriDattaguru who gave him a Mantra. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 35th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौतीसावा (३४) भाग २/२ 
धर्मराजाची बीज म्हणवून । उत्सव करावा तुम्ही सघन ।
याचि नीतीं कुमारा सांगोन । कवळों पाहे जगासी ॥ १०१ ॥  
मंत्र स्फुरला म्हणूनि स्फुरमाण । सकळ तुम्ही बोला वचन ।
अंबीलपणें शक्तिसमान । सदैव करा उत्सवो ॥ १०२ ॥
ऐसें महाराजा गोरक्ष बोलतां मानवलें सुरवरांच्या चित्ता ।
मग प्रतिवर्षीं आनंदभरिता । महाउत्सव करीत ॥ १०३ ॥
तैंपासूनि सहजासहज । जगीं मिरवतसे धर्मनाथाची बीज ।
हें व्रत आचरल्या महाराज । तुष्ट होतसे गोरक्ष ॥ १०४ ॥
पूर्वीं किमयागार ग्रंथांत । स्वयें बोलिला गोरक्षनाथ ।
कीं बीजेचे जो आचरील व्रत । शक्तीसमान आपुल्या ॥ १०५ ॥
तयाचे गृहीं दोषदरिद्र । रोगभोगादि विघ्नेंद्र ।
स्वप्नामाजी संसार अभद्र । पाहणार नाहीं निजदृष्टीं ॥ १०६ ॥
प्रत्यक्ष रमा सुखें सुरगणीं । त्या गृहीं होईल गृहवासिनी । 
मग दोषदरिद्र तया अवनीं । स्पर्शावया येईना ॥ १०७ ॥
असो माहात्म्य वदावें किती । ते प्राज्ञिक पावले सुखसंपत्ती ।
जैसी कामना वेधेल चित्तीं । तोचि अर्थ पावेल ॥ १०८ ॥
ऐसा गोरक्ष तयाकारण । बोलिला आहे मूळग्रंथीं वचन ।
तैसें येथें केलें लेखन । विश्र्वासातें वरा कीं ॥ १०९ ॥
असो तेथें महोत्साह करुन । धर्मनाथा नाथदीक्षा देऊन ।
तेथोनि निघाले पांच जण । नरशार्दूल ते ऐका ॥ ११० ॥
नाना तीर्थें करितां महीसी । अभ्यासिलें सद्विद्येसी ।
शाबरीं सहस्त्र अस्त्रांसीं । प्रवीण केला महाराजा ॥ १११ ॥   
मग शेवटीं बद्रिकाश्रमीं जाऊन । दृश्य केला उमारमण ।
धर्मनाथ तया स्वाधीन । तपालागीं बैसविला ॥ ११२ ॥
द्वादश वर्षांचा केला नेम । तपा बैसला नाथधर्म ।
येरु तेथूनि चौघे जण । तीर्थालागीं चालिले ॥ ११३ ॥
द्वादश संवत्सर तीर्थें करुन । पुनः पाहिला बद्रिकाश्रम ।
मग तेथें मावदें अति दुर्गम । बद्रिकाश्रमीं मांडिलें ॥ ११४ ॥
सकळ देव सुरवरांसहित । पाचारुनि घेतले तेथ ।
मावदें झाल्या पूर्ण वरातें । देऊनि देव गेलें पैं ॥ ११५ ॥
मग तो धर्मनाथ सवें घेऊन । फेरी करीती तीर्थाटन ।
आतां पुढें ऐका कथन । रेवणसिद्धनाथाचें ॥ ११६ ॥
पूर्वीं अठ्यायशीं सहस्त्र ऋषी । झाले आहेत विधिवीर्यासी ।
त्याचि समयीं रेत महीसी । रेवातीरीं पडियेलें ॥ ११७ ॥
रेवातीरीं तेंही रेवेंत । रेत पडिले अकस्मात ।
चमसनारायण संचार करुनि त्यांत । देहद्वारीं मिरवला ॥ ११८ ॥
बाळतनू अति सुकुमार । बालार्ककिरणीं मनोहर ।
उकरडां लोळे महीवर । ठेहेंठेहें म्हणोनियां ॥ ११९ ॥
तों त्या काननीं कृषी एक । उत्तम नाम सहनसारुक । 
तो घट घेऊनि न्यावया उदक । रेवातीरा पातला ॥ १२० ॥
पातला परी अकस्मात । येता झाला बाळ जेथ ।
सहज चालीं पुढें चालत । बाळ दृष्टीं देखिलें ॥ १२१ ॥
बाळ परम अति सुकुमार । कांती कर्दळीगाभाभर ।
पाहूनि तयाचें अंतर । विव्हळ मोहें झाला असे ॥ १२२ ॥
मग घट ठेवूनि महीलागीं । धांवोनि तांतडीं उचली वेगीं ।
मोहें कवळूनि हृदयभागीं । अति स्नेहें धरिलेंसे ॥ १२३ ॥
आधींच सहनसारुक नामानें । तेथें दयेसी काय उणें ।
आवडीनें करुनि मुखचुंबन । कुरवाळीत प्रीतीनें ॥ १२४ ॥
मग रिक्तघट भरुनि आडीं । ग्रामांत आला हरुषापाडीं ।
सदनीं प्रवेशूनि आवडीं । कांतेलागीं बोलतसे ॥ १२५ ॥
म्हणे जिवलगे आजिचा दिन । मातें झाला धातुहेम ।
तरी शिवलतेलागीं द्रुम । कुंभापरी मिरवला ॥ १२६ ॥
सहज गेलों उदकातें । रेवातीरीं वाळवंटींत ।
आपणा ईश्र्वरें दिधला सुत । वंशावळी मिरवावया ॥ १२७ ॥
ऐसी ऐकतां कांता गोष्टी । म्हणे कोठें मज दावा दृष्टीं ।
तंव तो काढूनि वस्त्रपुटीं । करसंपुटीं देतसे ॥ १२८ ॥
तंव ती कांता उत्तमनामी । धार्मिकबुद्धी संसारधामीं ।
बाळ देखतां देहधर्मीं । हर्षसिंधु लोटला ॥ १२९ ॥
जैसा पूर्ण चंद्र दृष्टीं । दृश्य होतां उदधिपोटीं ।
आनंद भरुनि तोयदाटीं । उचंबळा दाटतसे ॥ १३० ॥
कीं दरिद्रियासी मांदुस होय दर्शन । मग तयाचा आनंद वर्णील कोण ।
तेवीं उत्तम मनोधर्म । आनंददरीं मिरवतसे ॥ १३१ ॥
बाळ धरुनि हृदयसंपुटीं । चुंबन घेत स्नेहाचे पोटीं ।
मग तैलउदकीं न्हाणूनि शेवटीं । पालखातें घातले ॥ १३२ ॥
तियेचें तान्हुलें होतें घरीं । निजवला योगी तयाशेजारीं ।
स्तनपान केलियाउपरी । बाळ निजे पालखीं ॥ १३३ ॥
असो ऐसें नित्यानित्य । बाळ संगोपी ममतें ।
रेवण नाम ठेवोनि त्यातें । मोहेंकरुनि सांभाळी ॥ १३४ ॥               
रेवातीरीं बाळ रेवेंत । सांपडलें म्हणूनि त्यातें ।
रेवणनाम साजूकवंत । सहनसारुक ठेवीतसे ॥ १३५ ॥
असो रेवणनामियाचें संगोपन । करिती उभयतां पालन ।
ऐसे लोटतां बहुत दिन । प्रपंचराहाटी करीतसे ॥ १३६ ॥
द्वादशसंवत्सर प्रपंचराहाटी । कृषिकर्मविद्यापाठीं ।
पूर्ण झाला आउता जेठी । पितयाहूनि आगळा ॥ १३७ ॥
नांगर वरवरपाली पेरण । काकपक्ष्यादि करी रक्षण ।
ऐसा कृषिकर्मीं निपुण । रेवणनाथ झाला असे ॥ १३८ ॥
तों कोणे एके दिवशीं । उठूनि मागिले प्रहरनिशीं । 
वृषभ सोडूनि काननासी । चारावयासी चालिला ॥ १३९ ॥  
चांदणे पडलें असे सुदृढ । दृश्य होतसे महीची वाट ।
सदृढपणें गोचर वाट । निजचक्षूतें होतसे ॥ १४० ॥
दादा म्हणूनि वृषभापाठीं । हांकीत चालिला आहे जेठी 
तों अनसूयाशुक्तिकारत्न वाटीं । पुढें झाले अकस्मात ॥ १४१ ॥
परी तो महाराज अत्रिनंदन । पवनवेगें तयाचें गमन ।
नेमिले ठायीं करुनि स्नान । गिरनार पर्वतीं जातसे ॥ १४२ ॥
पायीं खडावा सुशोभित । एक अंचल अंगीं शोभत ।
शुभ्र कौपीन विराजित । कंठतटा वेष्टुनी ॥ १४३ ॥
मौळीं वेष्टिल्या असती जटा । दाढी मिशा रंग पिंगटा ।
सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा । कनककांति शोभतसे ॥ १४४ ॥
ऐसा महाराज अत्रिनंदन । जो त्रितयदेवांचा अवतार पूर्ण ।
अति लगबगें करीत गमन । पुढील नेम मानूनियां ॥ १४५ ॥
तों मार्गावरी अकस्मात । वृषभगमने देखत ।
वृषभाआड रेवणनाथ । दृष्टीं नाहीं आतळला ॥ १४६ ॥
मानवगती तेणें देखोन । पुढें आला अत्रिनंदन ।
सहजस्थिती वृषभामागून । पाउलें ठेवी चालावया ॥ १४७ ॥
तों सर्वांमागील वृषभ पूर्ण । शरीरीं मिरवे शैल्यपण ।
तयाआड नाथ रेवण । बाळतनू चालतसे ॥ १४८ ॥
तों वृषभामागें येत दत्त । वृषभ बुजोनि पुढें पळत ।
मागें अंतरतां रेवणनाथ । त्यावरी दत्त आदळला ॥ १४९ ॥
उभयदेहीं कामपणीं । ऐक्य झाली देहधरणीं ।
परी स्पर्श होतां अंतःकरणीं । ज्ञानदीप उजळला ॥ १५० ॥
विमूढपणीं कृषीकर्मांत । अज्ञान सर्वांपरी वर्तत ।
सदा बैसणें अरण्यांत । अबुद्धिपणें वर्ततसे ॥ १५१ ॥
परी दत्तात्रेयाचा स्पर्श होतां । पूर्वजन्मातें झाला देखता ।
चित्तीं म्हणे मी महीवर असतां । कवण स्थिती पावलों ॥ १५२ ॥
आहें मी पूर्वींचा नारायण । प्रकाम परम प्राज्ञिक चमसनाम ।
ऐसें असूनि कृषिकर्म । येथें करीत बैसलों ॥ १५३ ॥
वंद्य असतां तिन्ही लोकांत । आतां कोणी ओळखीना मातें ।
सदा काननीं झालों रत । अहितकामीं प्रपंच ॥ १५४ ॥
ऐसें देहीं झालिया ज्ञान । मग स्तब्ध धरुनि राहे मौन ।
परी धडक बैसतां अत्रिनंदन । कोण तूं ऐसें पुसतसे ॥ १५५ ॥
कोण तूं ऐसें पुसतां दत्त । करिता झाला प्रणिपात । 
म्हणे महाराजा या देहांत । अंश असे तुझा कीं ॥ १५६ ॥
तुमचे देहीं त्रिदेवांचें अंश । परी सत्त्वगुणी जो महापुरुष ।
तो मी येथें प्रपंचदेहास । परम कष्टें कष्टलों ॥ १५७ ॥
तरी आतां क्षेमोदयास । उदित करा जी महापुरुष ।
सनाथ करुनियां या देहास । महीलागीं मिरवावें ॥ १५८ ॥
ऐसें म्हणूनि दृढोत्तर चरणीं । मौळी अर्पी प्रेमेंकरुनी ।
म्हणे मज सनाथ केल्यावांचुनी । कदा न सोडीं तुम्हांतें ॥ १५९ ॥
ऐसें वदूनि वाग्वटीं । सदृढपणीं देत मिठी ।
परी आदरें प्रेमपोटीं । दत्तजेठी मिरवला ॥ १६० ॥
तयाचा पाहूनि भक्तिआदर । सदृढपणीं निश्र्चयपर ।
मग कमंडलू ठेवूनि महीवर । मौळीं कर स्थापीतसे ॥ १६१ ॥
भाळाखालीं घालूनि हात । उठविला रेवणनाथ ।
मनांत म्हणे हा सनाथ । पूर्वींचाचि असे कीं ॥ १६२ ॥
हा नवांमाजी असे एक । नाथपंथी अवतार दोंदिक ।
चमसनारायण प्रतापार्क । महीवरी विराजला ॥ १६३ ॥
तरी आतां यातें सनाथ । करुनि वाढवावा नाथपंथ ।
कृपें ठेवोनि मौळीं हस्त । केला अंकित आपुला ॥ १६४ ॥
कृपें मौळीं ठेविला कर । परी अनुग्रहाचें केलें अंतर ।
म्हणाल कासयासाठीं उदार । झाला नाहीं अनुग्रहा ॥ १६५ ॥
तरी चित्तीं योजिता झाला दत्त । भक्तिश्रम यासी घडले नाहींत ।
तरी कांहीं देहीं प्रायश्र्चित्त । घडोनि यावें ययातें ॥ १६६ ॥
तरी भक्तिश्रम घडतां सांग । उपदेश मग द्यावा अव्यंग ।
मग ज्ञानवैराग्याचा मार्ग । ब्रह्मस्थितीं मिरवेल हा ॥ १६७ ॥
ऐसें म्हणूनि अनुग्रहारहित । कृपा मौळीं ठेविला हस्त ।
परी भक्तीलागीं रेवणनाथ । काय करी महाराजा ॥ १६८ ॥
एक सिद्धीची कळा त्यातें । सांगता झाला कृपावंत ।
असतां बीज रोपूनि किंचित । दृष्टी ठेवील पुढारां ॥ १६९ ॥
जैसें अर्भका देऊनि धन । पिता मिरवी व्यवसायाकारण ।
मग तयाचें पुढें चांगुलपण । निजदृष्टीं पहातसे ॥ १७० ॥
किंवा महींत मेळवण । घालूनि पाहती दुग्धाकारण ।
कीं पत पहातसे देऊनि धन । सावकार कुळातें ॥ १७१ ॥
तेवीं सहस्त्रांशेंकरुन । महिमान सिद्धीचें सांगून ।
तुष्ट केलें तयाचें मन । प्रज्ञावंतें महाराजें ॥ १७२ ॥
परी ती कळा होतांचि प्राप्त । रेवण झाला आनंदभरित ।
मग प्रेमे नमूनि अनसूयासुत । बोळविले तत्क्षणीं ॥ १७३ ॥
परी विरह मानूनि चित्तीं । चालता झाला काननाप्रती ।
परी अंतरला आपुल्या हितीं । निजपदातें पहावया ॥ १७४ ॥
जैसें कोंडवळ्या कांजी । देता भूत होतसे राजी । 
तैसा अल्पसिद्धीमाजी । तुष्ट झाला तो पुरुष ॥ १७५ ॥
परम लाधली होती धणी । परंतु दवडिली अज्ञानपणीं ।
खापरासाठीं चिंतामणी । सोडूनि दिधला हातींचा ॥ १७६ ॥
कीं सुरा लागूनि परम गोड । सोडिली अमृतरसाची चाड ।
कीं निर्मळपणीं पाहूनि दगड । परिस हातींचा सोडिला ॥ १७७ ॥
तेवीं प्रत्यक्ष नाथ रेवण । भुलला सिद्धिप्रकरणेंकरुन । 
सिद्धिबुद्धि अत्रिनंदन । हातींचा सोडिला नायकें ॥ १७८ ॥
असो ऐसी संप्रदाययुक्ती । निःस्पृह पातला आपुल्या शेतीं ।
तेथील कथा होईल श्रोतीं । पुढिले अध्यायीं ऐकावी ॥ १७९ ॥
धुंडीसुत नरहरिवंशीं । सांगेल तुम्हां श्रोतियांसी ।
संतकृपें नाम देहासी । मालू ऐसें म्हणती तया ॥ १८० ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । चतुस्त्रिंशतितमाध्याय गोड हा ॥ १८१ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथ भक्तिसार चतुस्त्रिंशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 34  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय चौतीसावा (३४) 




Custom Search

No comments:

Post a Comment