Wednesday, March 16, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 31 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकतिसावा (३१) भाग १/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 31 
Bhujavanti had decided to end her life as Krushnagar rejected her demand of having sex. However her servant made a plan to trap Krushnagar into it. As per the plan Bhujavanti told king Shashangar that Krushnagar behave badly with her demanded sex with him. King was very angry and he ordered his solders to cut hands and legs of Krushnagar without any further enquiry in the matter. Goraksha and Machchhindra saw Krushnagar and were very sorry for him. Machchhindra concentrated his mind and knew that Bhujavanti was the culprit. Further he also knew that Krushnagar was an incarnation. Hence they took permission from king to take Krushnagar with them to join him in Nathpanth. They took him to Badrikedar where they asked him to perform 12 years tapas. Now they named Krushnagar as Chourangi. Dhundusut Malu from Narahari family will tell us what happens next in the 32nd Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकतिसावा (३१) भाग १/२ 
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी जगत्पाळका । जगत्पते वैकुंठनायका ।
जगत्सृजका यदुकुळटिळका । भक्तसखा तूं होसी ॥ १ ॥
निखिलजीवन निर्विकारा । विवेकरत्नवैरागरा । 
शुद्धसत्वगुणगंभीरा । रुक्मिणीवरदा दीनबंधो ॥ २ ॥
हे कृपार्णवा पंढरीनाथा । पुढें बोलवीं भक्तिसारग्रंथा ।
मागिले अध्यायीं अनाथनाथा । जन्म चौरंगीचा करविला ॥ ३ ॥
करविला परी त्याचें कथन । राहिलें तें ग्रंथी लेखन ।
आतां करवीं जगज्जीवन । पुढें वैखरीं बैसूनियां ॥ ४ ॥
तरी गताध्यायीं सापत्नमाता । लोटली तीतें कामसरिता । 
परी कृष्णागर प्राज्ञिक सुता । बळेंचि नेलें पाचारुनि ॥ ५ ॥
करुनी जननीचा धिक्कारु । सदना गेला होता कृष्णागरु ।
येरी सखी जीवापारु । पाचारिली होती कीं ॥ ६ ॥
तिये सांगूनि सकळ वृतान्त । प्राणघातासी झाली होती उदित ।
परी ती सखी प्रज्ञावंत । देत मसलत तियेसी ॥ ७ ॥
म्हणे बाई वो भुजावंती । ईश्र्वरकरणी प्रारब्धगती ।
जैसी असेल पुढती । घडूनि येईल भिऊं नको ॥ ८ ॥     
परी तूतें सांगेन हित कांहीं । तैसेंचि करीं धरुनि जीवीं ।
नको कष्ट मानूं आपुले देहीं । शयन शयनीं करीं आतां ॥ ९ ॥
शयन शयनीं केलिया पूर्ण । राव येईल पारधीहून ।
आल्या सेवील तुझें सदन । परी तूं उठूं नको कीं ॥ १० ॥
मग तो राव पुसेल तूतें । तंव तूं सोंग दावीं शोकाकुलते ।
रुदन करुनि वदें रायातें । प्राणरहित होय मी ॥ ११ ॥
आतां काय ठेवूनि प्राण । झालें नाहीं अब्रूरक्षण ।
ऐसें बोलतां राव वचन । पुढें तुजसी पुसेल ॥ १२ ॥
पुसतां वदें कीं प्रांजळवंत । कृष्णागर तुमचा सुत ।
कामुक होऊनि मम नदनांत । स्पर्शावया धांवला ॥ १३ ॥
धांवला परी यत्नेंकरुन । बळें दिधला मागें लोटून ।
ऐसें होतां अनुचित प्राण । कैसा ठेवूं महाराजा ॥ १४ ॥
ऐशापरी आराधूनि युक्तीं । क्रोध उपजवीं रायाचित्तीं ।
क्रोधवश झालिया राय नृपती । कलहें मुला सोडील कीं ॥ १५ ॥
मग तो कदा ना म्हणे सुत । त्वरें करील प्राणरहित ।
मग तूं सदनीं आनंदभरित । सुखलाभातें सेवीं कां ॥ १६ ॥
अंगी विषतरुचा कोंब चांग । खुडूनि टाकिल्यानें मार्ग ।
मग तया विषाचा शरीरीं लाग । कोठूनि होईल जननीये ॥ १७ ॥
आधीं ठेंचिल्या उरगमुख । मग कैंचें मिरवेल विषदुःख ।
कंटकीं धरिल्या वृश्र्चिक । वेदनेतें मिरवेना ॥ १८ ॥
कीं वन्हि असतां धूम्राकार । वरी सांडावें लगबगें नीर ।
मग धांव सदनापार । घेत नाहीं जननीये ॥ १९ ॥    
तरी कृष्णागराचा वसवसा (हुरहुर) । तव हृदयीं मिरवे स्वबाळफांसा ।
तरी राया सांगूनि ऐशिया लेशा । दुःखसरिता लोटवीं ॥ २० ॥ 
तरी त्या उदकाचें आधीं वळण । दुःखसरिते बांधावें बंधन ।
बंधन बांधिल्या सजीवपणें । सुखें पुढें मिरवीं कां ॥ २१ ॥
ऐसें सांगूनि ती युवती । गेली आपुल्या सदनाप्रती ।
येरीकडे भुजावंती । कनकमंचकीं पहुडली ॥ २२ ॥
त्यजूनि अन्नोदक स्नान । कैंचे श्रृंगार कुंकुमलेण ।
सर्व उपचारांतें त्यजून । विन्मुख तईं पहुडली ॥ २३ ॥
तों येरीकडे शशांगर । पारधी खेळूनि काननभर ।
चिंताब्धीची फोडूनि लहर । सदना तदा जातसे ॥ २४ ॥
नाना गजरें यंत्रस्थित । चमूअब्धीचा लोट लोटीत । 
क्षेत्रपातीं पूर्ण भरित । चमूतोयें तेधवां ॥ २५ ॥
यावरी राव तो पूर्ण ज्ञानी । संचार करी आपुले सदनीं ।
दृष्टीसमोर न देखतां राणी । परिचारिके विचारीतसे ॥ २६ ॥
म्हणे कोठें आहे भुजावंती । सन्मुख कां न आली पारधीप्रती ।
आजि चुकुर होऊनि चित्तीं । निंबलोणा नातळी ते ॥ २७ ॥ 
रायातें बोलती परिचारिका । हे महाराजा सद्विवेका ।
आजि राणी कवण दुःखा । दुखावली कळेना ॥ २८ ॥
तेणेंकरुनि शयनपाटीं । निजली आहे होऊनि कष्टी ।
होतांचि शब्द कर्णपुटीं । सदनामाजी संचरला ॥ २९ ॥
तों ती मंचकीं भुजावंती । राव देखूनि बोले युक्ती ।
म्हणे कां हो कवण अर्थीं । शयन केलें जिवलगे ॥ ३० ॥
परी तईं उत्तरा न दे ती । कांहींच न बोले रायाप्रती ।
जीवन आणूनि नेत्रपातीं । अश्रु ढाळी ढळढळां ॥ ३१ ॥
तें पाहूनियां राव दयाळ । चित्तीं दाटला मोहें केवळ ।
मंचकीं बैसे उतावेळ । हृदयीं धरी कांतेतें ॥ ३२ ॥
अश्रुधारा नेत्रपातीं । राव पुसी स्वयें हस्तीं ।
चुंबन घेऊनि लालननीतीं । अंकावरी बैसवीतसे ॥ ३३ ॥ 
अंकीं बैसवोनि स्वदारारत्न । हेम जडावया करी यत्न ।
राव कोंदणीं हाटकप्रयत्न । अर्थरत्ना जोडीतसे ॥ ३४ ॥
म्हणे सखये सुखसरिते । कोठूनि भेदले गढोळ चित्तीं ।
दुःखघनाचा वर्षाव अमित । कोणें केला तो सांग ॥ ३५ ॥
मी राव महीचा भूप । मी बोलणारा दर्पसर्प ।
ऐशा व्याघ्राचा करोनि लोप । दिधलें माप दुःखाचें ॥ ३६ ॥
तरी ती कवण पुरुष नारी । तूतें अन्य झाली भारी ।
तरी मातें बोलूनि वैखरीं । निमित्तमात्र दावीं कां ॥ ३७ ॥
अगे सहज दिटवा होत (पाहिलें असतां) । दावीन त्यातें अर्कसुत (यम) ।
या बोलाची सहज भ्रांत । मानूं नको जिवलगे ॥ ३८ ॥
अगे प्रिय तूं मातें अससी । कोण गांजील उद्देशीं ।
हरिबाळातें (सिंहाच्या छाव्यास) जंबुकलेशीं ॥ ३९ ॥
अगे मशकाचेनि पाडा । धडकें उतरे गिरीचा कडा ।
कीं रामरक्षे भूतवडा । रक्षणिया बैसतसे ॥ ४० ॥
तेवीं तूं माझी पट्टराणी । कोण घालूं शके काचणी ।
नाम दर्शवीं प्रांजलपणीं । मग उर्वी न ठेवीं तयातें ॥ ४१ ॥
ऐसें ऐकतां राववचन । हृदयीं तोषलीं अर्थाअर्थी सघन ।
म्हणे महाराजा तव नंदन । भ्रष्टबुद्धीं व्यापिला ॥ ४२ ॥
आपण गेलिया पारधीसी । एकान्त पाहूनि मम उद्देशीं ।
येथें येऊनि स्मरलेशीं (काम विव्हळ) । हस्त माझा धरियेला ॥ ४३ ॥
धरिला परी निर्दयवंतें । कामें ओढिता झाला हस्त ।
म्हणे चलावें एकांतांत । सुखसंवाद भोगावया ॥ ४४ ॥  
मग म्यां पाहूनि कामिकवृत्ती । हात आसडूनि घेतला निगुतीं ।
भयार्थ मानूनि आपुले चित्तीं । सदनामाजी पावलें ॥ ४५ ॥
पळतां कोण झाली स्थिती । उलथूनि पडलें महीवरती ।
परी म्यां धरुनि तैशीच शक्ती । आड कवाड पैं केले ॥ ४६ ॥
मग तो छलबलत्वहीन । होऊनि पाहे आपुलें सदन ।
तस्मात् आतां आपुला प्राण । ठेवीत नाहीं महाराजा ॥ ४७ ॥
भलतैसिया गरळातें । घेऊनि करीन प्राण मुक्त ।
परी धैर्य वरिलें तुम्हांकरिता । तुमचा मुखेंदु पहावा ॥ ४८ ॥
मज वाटलें पारधीचे कानन । अति तीव्र कर्कश भयाण ।
त्यांतूनि तुम्ही जीवंतपणें । कैसे याल वाटलें ॥ ४९ ॥
ऐसेपरी धुसधुसीत । संचार होतां हृदयांत ।
म्हणोनि महाराजा येथपर्यंत । प्राण देहीं रक्षियेले ॥ ५० ॥
ऐसें बोलतां भुजावंती । परम क्रोधावला नृपती ।
परी क्रोध नव्हे क्षितीं । वडवानलचि पेटला ॥ ५२ ॥
वडवानल तरी कैसा । शिखा मिरवी अंबरलेशा । 
सुतरत्नालागीं कैसा । ग्रासूं पाहे क्षणांत ॥ ५३ ॥
मग तैसाचि येऊनि सदनाबाह्ये । आरक्त नेत्रीं भंवता पाहे ।
म्हणे कोणी तरी येथें आहे । पुढें यावें माझिया ॥ ५४ ॥
तंव ते भृत्य धांवत येती । भृत्य नव्हे ते कृतान्त दिसती ।
राव वरुनि क्रोधरीतीं । स्वतां त्यांतें लोटीतसे ॥ ५५ ॥
म्हणे भृत्य हो याचि पावलीं । जाऊनि मम सुताची करा होळी ।
अथवा बंधन हस्तवेली । खंडोनियां टाकाव्या ॥ ५६ ॥
ऐसें बोले नृपनाथ । दूत धांवती वाताकृत । 
सदन वेढूनि राजसुत । मृत्युमहीं नेलासे ॥ ५७ ॥
परी ते सेवक ज्ञानखाणी । पुनः जाती राजांगणीं ।
म्हणती महाराजा मृत्युभुवनीं । कृष्णागरु पैं नेला ॥ ५८ ॥
राव क्रोधें तयां पहात । म्हणे हस्तपादांतें करा खंडित ।
पुनः येवोनि सांगत । धांवधांवोनि रायातें ॥ ५९ ॥
तरी रायाचा कोपानळ । कदा न होय शीतळ ।
पुनः पाहोनि दूतमेळ । तीच आज्ञा आज्ञापी ॥ ६० ॥
परी ते भृत्य देहस्थितीं । म्हणती हा स्वामी राजसुत ।
यासी वधितां काय अनर्थ । कैसा होईल कळेना ॥ ६१ ॥
ऐसे संदेहें भयस्थित । पुनः जाती राजांगणांत ।
परी तो राव अति संतप्त । तीच आज्ञा अज्ञापी ॥ ६२ ॥
मग ते दूत निष्ठूरपणीं । चौरंग आणिती कनककोंदणीं ।
तयालागीं बैसवोनी । कार्यावर्तीं वहिवटले ॥ ६३ ॥
शुद्ध चर्‍हाटें बांधोनि हस्त । तदा नेत कृष्णागरातें ।
म्हणती बंधसिद्ध केले हस्त । खंडविखंड करावया ॥ ६४ ॥
परी कृष्णागर चव्हाटां नेला । हा वृत्तान्त सकळ ग्रामांत कळला ।
मग चुंगारचुंगार (लोकांचे थवेच्या थवे) मेळा । विलोकावया धांवती ॥ 
६५ ॥
येरीकडे राजांगणीं । मिळाले थोर प्राज्ञी ।
परी नृपतीचा क्रोधाग्नि पाहूनी । बोलों न शकती कदाचित ॥ ६६ ॥
तरी वृत्तीचा क्रोधानळ । लोकबोलाचें सुभद्रजळ ।
प्राशनें भेणें उतावेळ । धांव मागें घेतसे ॥ ६७ ॥
येरीकडे चव्हाटेंसी । कनकचौरंगीं राजसुतासी । 
दूतीं बैसवोनि हस्तपादांसी । योजिते झाले छेदावया ॥ ६८ ॥
शस्त्र करुनियां नग्न त्वरित । एकें घायाळ केले हस्त ।
तैसेचि झाले चरण व्यक्त । भग्न होईनि पडियेला ॥ ६९ ॥
एकचि आकांत वर्तला तेथें । कोणी कोणा न विचारी जेथें  ।
पाहूनि सकळ संग्रामातें । भयभीत संपूर्ण ॥ ७० ॥
उपरी योजूनि पदें निगुतीं । तीक्ष्णधारा शस्त्रें हाणिती ।
तिंहीं एका धायें क्षितीं । पदकमलें पडियेलीं ॥ ७१ ॥
मग रुधिराचा भडभडाट । महीं लोटला अपार लोट ।
जेवीं युवतीकुंकुममळवट । तेवीं धारा शोभली ॥ ७२ ॥
परी राव तो कृष्णागर । मूर्च्छेनें व्यापूनि तीव्र ।
कनकासनीं चौरंगावर । उलथोनियां पडियेला ॥ ७३ ॥
प्राण होऊनि कासावीस । मुखावरी दाटला फेंस ।
उपरी कोरड पडली मुखास । श्र्वेत नयन पैं केले ॥ ७४ ॥
मग तें दुःख पाहूनि लोक । दुःखानें करिती महाशोक ।
अहा कृष्णागरा सारिखें माणिक । व्यर्थ रायें भंगिलें ॥ ७५ ॥
एक म्हणती म्हातारपणीं । राव चळला आहे प्राज्ञी ।
ऐसा पुत्र लावण्यखाणी । नष्ट केला पदवीचा ॥ ७६ ॥
तरी राजा परम भ्रष्ट । झाला आहे निर्दय नष्ट ।
आतां येथें राहतां उत्कृष्ट । योग्य कांहीं दिसेना ॥ ७७ ॥
सहज प्रपंचाचे पाउलीं । पडतसे आड पाउली ।
परी रायें हृदयीं क्षमा न केली । घात करील कधीं तो ॥ ७८ ॥
अहा एकुलता एक बाळ । त्यावरी पाखडिला क्रोधानळ ।
मग प्रजान्याया कैसा शीतळ । वृद्धराव राहील हा ॥ ७९ ॥
एक म्हणे राजनीती । तैशीच आहे सर्व क्षितीं ।
गृहीं दाविली क्रोधसंपत्ती । धाक पडेल प्रजेतें ॥ ८० ॥
एक म्हणे भ्रष्ट कृष्णागर । कुबुद्धि धरिली मातेवर ।
तैं शिक्षा पावला साक्षात्कार । राया दोष न लागेचि ॥ ८१ ॥
गौपीडक व्याघ्र असला । तरी कां मारु नये त्याला ।
तरी रायानें धर्म पाळिला । लोभ धरिला नाहीं की ॥ ८२ ॥
वृश्र्चिक होतां दृष्टीव्यक्त । तरी कां करुं नये प्राणान्त ।
दुष्ट आहे कीं घुसघुसीत । मारुं नये कीं त्याला ॥ ८३ ॥
ऐशा नानापरी युक्तीं । तर्कवितर्क जग बोलती । 
अपार मेळा चव्हाट्याप्रती । मिळाला असे लोकांचा ॥ ८४ ॥
त्यांत सहजासहज गमन । गोरक्ष मच्छिंद्र उभय जाण ।
करीत आले चव्हाटेकारणें । तों अपार मेळा देखिला ॥ ८५ ॥       
सोडूनि गर्भाद्रिपर्वतातें । न्यावें भेटीसी मच्छिंद्रातें ।
घेऊनि जातां गोरक्षनाथ । आले होते त्याठायीं ॥ ८६ ॥
आले परी सहजचालीं । नगरदीक्षेची कामना फिरली ।
म्हणोनि पाहतां व्यवहारपाउलीं । येवोनि तेथें धडकले ॥ ८७ ॥
धडकले परी अपार मेळ । पाहूनि त्यांत संचरले गौरबाळ ।
तो कृष्णागर होऊनि विकळ । कनकचौरंगीं पडियेला ॥ ८८ ॥
मग मच्छिंद्रातें पाचारुन । दाविता झाला गौरनंदन ।
जळचरसुतें पाहून । परम चित्तीं द्रवलासे ॥ ८९ ॥
परी त्याचा अन्याय काय । लोकांपाशीं पुसो जाय ।
क्षण स्थिर करुनि हृदय । करणी विलोकी बाळाची ॥ ९० ॥     
तों सहज अंतरीं दृष्टी करितां । त्या समजली तयाची माता ।
आणि कृष्णागरासी वरता । अवतारदक्ष आढळला ॥ ९१ ॥
ऐसा शोध शोधिल्या चित्तीं । मग क्रोधें दाटले तपोगभस्ती ।
म्हणे अहो हे रांड शक्ती । प्रविष्ट झाली लोकांत ॥ ९२ ॥
परी तो आहे मूर्ख राय । चित्तीं योजितां न ये न्याय ।
बाळावरी तिनें घाय । कोपशस्त्रीं योजिला ॥ ९३ ॥
तरी ऐसा बुद्धिभ्रष्ट । विषयलोभी अति वरिष्ठ ।
महीं नसावा महाभ्रष्ट । महीभार आगळा ॥ ९४ ॥
लागूनि कांतेच्या बुद्धिसंगतीं । बाळालागीं केली आर्ती ।
तस्मात् राव विषयभक्ती । ठेवूं नये महीसी ॥ ९५ ॥
ऐसें चित्तीं धरुनि तेथून । उभय निघाले मंडळांतून ।
मग गोरक्षा सकळ खूण । निवेदिली रायाची ॥ ९६ ॥
सकळ गोरक्षा निवेदन होतां । तोही आपुल्या हृदयीं पाहतां ।
पाहूनि म्हणे गुरुनाथा । याचें नांव रंगातें आणावें ॥ ९७ ॥
कृष्णागर तो चौरंगीं व्यक्त । म्हणोनि चौरंगीं बोलला नितांत ।
कृष्णागर हें नाम महींत । नाहीं म्हणोन वदलासे ॥ ९८ ॥
आणि हस्तपादादि सकळ । एका चौरंगीं झाले सकळ ।
म्हणोनि चौरंगी गौरबाळ । सहजस्थितीं वदलासे ॥ ९९ ॥
असो गोरक्ष मच्छिंद्रातें । म्हणे राजसदना जाऊं त्वरितें ।
मागूनि घ्यावें चौरंगातें । नाथपंथीं मिरवावया ॥ १०० ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 31 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकतिसावा (३१) 


Custom Search

No comments:

Post a Comment