Monday, March 14, 2016

Shri Navanatha BhaktiSar Adhyay 30 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तीसावा (३०) भाग २/२


Shri Navanatha BhaktiSar Adhyay 30 
King Shashaangar of Koudinyapur punish his son Krushnagar very rudely and cut his arms and legs and thrown him. Krushnagar was punished by the king because his second wife Bhujavanti made a fouled complement of Krushanagar to the king. Krushanagar was a blessing to the king by God Shiva. Earlier king Shashaangar and his first wife Mandakini had taken care of Krishnagar till he became 10 years when his mother Mandakini expired. After her death Shashaangar married to Bhujavanti. Now what happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the 31st Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तीसावा (३०) भाग २/२
जय जय हर म्हणूनि वाणी । मस्तक ठेवी महीलागुनी ।
ते समयीं मृडानीवर तीलागुनी । अदृश्य होता त्यां ठायीं ॥ १०१ ॥
गुप्त तेथ शिव पंचानन । पाहता झाला तियेकारण । 
परी ती दारा सुलक्षण । मुखमंडणीं देखिली ॥ १०२ ॥
जैसी चपळा तेजभरित । शिवधामीं लखलखित । 
भीतें पाहतां अपर्णानाथ । कामवेष्टनीं पडियेला ॥ १०३ ॥
मग हास्ययुक्त होऊनि कुमारतात । मनीं इच्छि व्हावें रत ।
ऐसें योजूनि चपळवंत । धरुं पाहे ती चपळा ॥ १०४ ॥
परी तो शिव तेजखाणी । धांवतां देखिला जैसा तरणी ।
तेणेंकरुनि भयभीत होऊनी । पळूं लागे कदंबा ॥ १०५ ॥
शिवालयातें सोडूनि बाहेरी । येती झाली विप्रकुमरी ।
परी तो शिव कामातुर । तियेमागे धांविन्नला ॥ १०६ ॥
पुढें कदंबा मागें भव । उभयतां महीतें घेती धांव ।
धांव घेता सदाशिवें । जाऊनियां स्पर्शिली ॥ १०७ ॥
परी शिवस्पर्श होतां तीतें । सांडी मानवतनूतें ।
सुरोचना अप्सरा होऊनि त्वरित । स्वर्गाप्रती चालिली  ॥ १०८ ॥
चालिली परी एकीकडे । शिवकामाचा उजळिला पाड । 
ठाव सांडूनि इंद्रियपाड । द्रवद्रवला महीतें ॥ १०९ ॥
द्रव द्रवतां महीपाठीं । पाहता झाला कृष्णातटीं । 
उदक मिळतां एकवटीं । सकळ मासे संचरले ॥ ११० ॥
संचरले परी पूर्वींपासून । तये समयीं पर्वतघन ।
तेणें प्रवाहीं कृष्णासंगमनीं । रेतपात मिरवला ॥ १११ ॥
पर्जव्यकाळीं तो अचाट । जात होता कृष्णापात्रांत ।
तये संधींत राव सुभट । स्नानालागीं मिरवला ॥ ११२ ॥
स्नान करुनि शशांगर । तटीं बैसला होऊनि स्थिर ।
स्नानसंध्या सारोनि समग्र । अर्घदानीं प्रवर्तला ॥ ११३ ॥
करीं घेतां कृष्णाजीवन । तों रेत दाटले अंजुळींत येऊन ।
मानवदेहाचा स्पर्श होऊन । रेतीं पुतळा रचियेला ॥ ११४ ॥
रचिला परी न लागतां क्षण । सकळ अवयव दैदीप्यमान । 
रायें पाहतां प्रत्यक्ष वदन । बाळतनूतें देखिलें ॥ ११५ ॥
पाहतांचि राजा हर्षयुक्त । म्हणे मज पावला उमाकांत ।
अयोनिसंभव सुत । प्रतापदक्ष मज झाला ॥ ११६ ॥
तरी हा कोणी महीअवतार । असेल विरिंचि हरि हर ।
वाचस्पति सहस्त्रनेत्र । अवनीवर उतरला ॥ ११७ ॥
ऐसा आनंद मानोनि चित्तीं । उठता झाला नृपती ।
बाळ कवळोनि हृदयाप्रती । शिबिरा प्रविष्ट पै झाला ॥ ११शशां८ ॥
मंदाकिनी सुंदर कांता । परम सत्वस्थ पतिव्रता ।
तिये करीं बाळ ओपितां । पाहोनि तेही आनंदे ॥ ११९ ॥
रायासीं म्हणे मंदाकिनी । बाळ कोणाचा आणिला स्वामि ।
राव म्हणे अर्घ्यजीवनी । उदय पावला करपात्रीं ॥ १२० ॥
तरी हा ईश्र्वरें पुत्र तूतें । दिधला आहे उमाकांतें ।
तरी पावला करुनि महीतें । पुत्रवती मिरवें कां ॥ १२१ ॥
ऐसी ऐकूनि नरेंद्रवाणी । परम हर्षली मंदाकिनी ।
मग अति स्नेहाचें भरतें आणूनी । बाळ हृदयीं कवळिला ॥ १२२ ॥
लावितांचि स्तन मुखासी । पान्हा आला स्तनासी ।
संस्कारोनि कृष्णसागर नामासी । द्वादशावें दिनीं स्थापिलें ॥ १२३ ॥
यावरी राव शिवापासून । निघता झाला तेथून । 
कौडण्यग्राम अपूर्व स्थान । येऊनियां पोहोंचला ॥ १२४ ॥
यावरी दिवसानुदिवस । कृष्णसागर पावला दश वर्षें । 
मग विवाहचिंता शशांगरास । स्नुषारुपी दाटली ॥ १२५ ॥
मग कर्दममंत्री पुरोहित । ऐक्य करुन नृपनाथ । 
देशावरी पाठवीत । सुलक्षण कुमारी योजावया ॥ १२६ ॥
परी राव सांगे मंत्रिकांकारण । कीं कुमारी पहावी सुलक्षण । 
रुपवती गुणानें समान । कृष्णागरासारिखी ॥ १२७ ॥
अवश्य म्हणोनि मंत्रिकवृदं । जात देशातें समुच्चयवृंद ।
पुरोहितादि पाहती संबंध । कृष्णागर रायाचा ॥ १२८ ॥
नाना क्षेत्रें राज्यें पाहुनी । कुमारी पाहे मंत्री नयनीं ।
परी कृष्णागराच्या रुपमांडणीं । एकही कन्या आढळेना ॥ १२९ ॥
सकळ मंत्री देशोदेश । पाहूं श्रमले कुमारीस । 
परी सर्वसंपन्न तयांस । कोणी एक आढळेना ॥ १३० ॥
रुप पाहती तों गुण हीन । गुण पाहती तो स्वरुप हीन ।
रुप गुण असतां घटित समान । उभयतांचें येईना ॥ १३१ ॥
ऐसियेपरी सांगोपांग । कोठेंही दिसेना शुभमार्ग ।
अति श्रमोनि लागवेग । स्वस्थानासी पावले ॥ १३२ ॥
रायासी भेटूनि सांगती वृतान्त । कीं कन्यारत्नें अपरिमित ।
परी गुण-रुप घटितार्थ । कोणी एक दिसेना ॥ १३३ ॥
आजिवरी महाराजा । द्विसंवत्सर लोटले काजा ।
परी कन्यारत्न चोजा । नातळे ऐसें झालेंसे ॥ १३४ ॥
ऐसें रायातें मंत्री सांगून । पाहते झाले आपुलीं स्थानें ।
याउपरी क्षण मास दिन । लोटूनि गेले तयापाशीं ॥ १३५ ॥
याउपरी कोणे एके दिवशीं । कृतांतभृत्य येऊनि महीसी ।
घेऊनि गेले मंदाकिनीसी । परत्रदेशाकारणें ॥ १३६ ॥
मग सुशरीर मंदाकिनी । रायें शशांगरें पाहूनी । 
परम विव्हळ झाला वियोगेंकरुनी । शोकार्णवीं दाटला ॥ १३७ ॥
परी कैसाही असला मायिक देही । मेल्यामागें मरत नाहीं ।
असो उचंबळोनि शोकप्रवाहीं । हुंदकिया संपादी ॥ १३८ ॥
उपरी उत्तरक्रिया करुन । राव सेवी सिंहासन ।
त्यासही लोटल्या संवत्सर पूर्ण । श्राद्धदशा उरकली ॥ १३९ ॥          
उरकली परी कामिनीविण । राया चित्तीं न वाटे कल्याण ।
कामानळीं पंचप्राण । व्याकुळ बहु होताती ॥ १४० ॥
परी राव तो इंद्रियदमनी । कदा न पाहे व्यभिचार मनीं ।
मग मंत्रिकासी बोलावुनी । निकट बैसवी आपुल्या ॥ १४१ ॥
म्हणे मकरंदा सुलक्षणा । तूं करुं गेलासी देशभ्रमणा । 
परी कुमारी रुपवंत आणि सगुणा । कोणी तरी आढळली का ॥ १४२ ॥
मंत्री म्हणे जी नृपनाथ । कुमारी आहे स्वरुपवंत ।
आणि गुणही उत्तम दिसत । परी घटीत दिसेना ॥ १४३ ॥
उपरी मंत्रिका बोलत । जरी सुतालागीं न उतरे घटित ।
तरी आमुचे नामीं घटितार्थ । शोध शोघूनि पाहावा ॥ १४४ ॥
मंत्री म्हणे जी पुरोहितें । टिप्पणें आणिलीं आहेत लिखितें ।
तरी त्यातें पाचारुनि संबंधातें । विलोकूनि पाहिजे ॥ १४५ ॥
मग पाचारुनि पुरोहितास । सकळ कुमारींचीं टिप्पणें पहात ।
तों चित्रकूटींचा नृपनाथ । घटितार्थ आववडला ॥ १४६ ॥
नाम जयाचें भुजध्वज । धार्मिक प्राज्ञिक महाराज ।
तयाची कन्या तेजःपुंज । भुजावंती मिरविली ॥ १४७ ॥
रुपवंत गुणवंत । तया नामीं आलें घटित ।
मग पाचारुनि मंत्रिकातें । तया स्थानीं पाठविलें ॥ १४८ ॥
मंत्री जाऊनि चित्रकूटासी । पुन्हां भेटूनि भुजध्वजासी ।
वृत्तान्त सांगूनि रायासी । लग्नपत्रिका काढिली ॥ १४९ ॥
लग्नपत्रिका आणि भृत्य । लिहूनि पाठविले अर्जदास्त ।
रायापाशीं येतांचि दूत । वर्तमान निवेदिती ॥ १५० ॥
लग्नपत्रिका आणि दूत । पाहूनि राव संतोषत ।
मग सरंजामी जाऊनि तेथ । लग्नसोहळा उरकिला ॥ १५१ ॥
मग ती कांता घेवोनि राव । पाहता झाला आपुला ठाव ।
उपरी दिवसेंदिवस थोरीव । भुजावंती झालीसे ॥ १५२ ॥
त्रयोदश वर्षें व्यवस्थित । भुजावंती महीं मिरवत ।
येरीकडे सप्तदश वर्षांत । कृष्णागर मिरवला ॥ १५३ ॥
परी भुजावंती अंतःपुरांत । धाम उभविलें एकान्त ।
अगम्य जितुकें रायातें । तितुकें ती मिरवत ॥ १५४ ॥
असो एकांतीं भुजावंती । परी सापत्नसुताची ऐकीव उक्ती ।
होती परी दृष्टिव्यक्तीं । एकमेकांतें पाहती तीं ॥ १५५ ॥
तों कोण एके सुदिनासी । राव गेला मृगयेसी ।
कृष्णागरु धामासी । वेधोनियां पहातसे ॥ १५६ ॥
सहज वावडी घेवोनि हातीं । चित्त रंजवी खेळा निगुतीं ।
तों येरीकडे भुजावंती । धामावरी आलीसे ॥ १५७ ॥
राजकिशोर पाहूनि नयनीं । दृष्टी वंचली सुतालागूनी ।
तेणें वेष्ठूनि पंचबाणी । परिचारिके बोलत ॥ १५८ ॥
म्हणे पैल धामाप्रती । वावडी उडवी वाताकृती ।
त्यातें पाचारुनि उत्तमगती । स्वधामातें आण वेगें ॥ १५९ ॥
ऐसें ऐकूनि दासी वचन । पाहती झाली राजनंदन ।
राजासी म्हणे तव मातेनें । चित्तीं हेतू वरियेला ॥ १६० ॥
तरी महाराज उत्तम जेठी । शीघ्र चलावें तियेचे भेटी ।
राव ऐकोनि कर्णपुटीं । अवश्य म्हणे येतों कीं ॥ १६१ ॥
भवंडीदोर देत सेवकाहातीं । आपण निघे सर्वज्ञमूर्ती ।
सहज चाले सदनाप्रती । जात आनंदेकरोनियां ॥ १६२ ॥
रायें करुनि आणिलें लग्न । तेव्हां गेला होता दर्शन । 
तयासी लोटले बहुत दिन । म्हणे आजि सुदिन उगवला ॥ १६३ ॥
मज आजि वत्सातें माउली । कोणीकडूनि पान्हावली ।
तरी आजि भाग्यसाउली । सकळ पूर्ण झालीसे ॥ १६४ ॥
ऐसा आनंदोत्साह चित्तीं । मानूनि जातसे नृपती ।
सहज चाली सदनाप्रती । जावोनियां पोंचला ॥ १६५ ॥
तंव ती दारा उपरीवरी । येतां पाहिलें कृष्णागरीं । 
खालीं उतरुनि शयनगुहारीं । पाहती झाली वेल्हाळी ॥ १६६ ॥
शयनसदनाचें धरुनि द्वार । उभी राहिली ती सुकुमार ।
तों परिचारिका कृष्णागर । घेऊनियां पोंचली ॥ १६७ ॥
पोंचली परी हस्तसंकेतें । रायाप्रती दावी सदनातें ।
आपुल्या घरीं दासी जात । भेट करुनि उभयतां ॥ १६८ ॥
येरीकडे कृष्णागर । चालीं चालतां गेला समोर ।
जातांचि करी नमस्कार । सापत्नमाता म्हणोनि ॥ १६९ ॥
परी ती बाळा मदनबाळीं । वेष्टिली होती कामानळीं ।
तेणें चित्तदरीं काजळी । अज्ञानपणीं मिरवतसे ॥ १७० ॥         
सुतें केला नमस्कार । परी ती न वदे यावर ।
तें पाहूनियां कृष्णागर । मनामाजी चाकाटला (आश्र्चर्य चकित) ॥ १७१ ॥
परी निकट झालिया त्या वास । येरी जाऊनि धरी हस्तास । 
म्हणे माझें तुष्ट मानस । कामानळें विझवीं कां ॥ १७२ ॥
राया तव स्वरुप अर्ककांत । द्रवतें झालें कामानळांत ।
तरी चितेविण जाळूं पहात । शांत करीं महाराजा ॥ १७३ ॥
ऐसें ऐकतां तियेचें वचन । राव कोपे क्रोधेंकरुन ।
म्हणे सेवूनि राहसी कानन । सावजापरी काय वो ॥ १७४ ॥
तूं प्रत्यक्ष माझी सापत्नमाता । कुडी बुद्धी वरिसी चित्ता ।
तरी या कृत्या कोण त्राता । तूतें होईल पुढारा ॥ १७५ ॥
अहा स्त्रीजाती अमंगळा । दुर्गमसरिता परम चांडाळा ।
नेणें अनर्थासह बंडाळा । जगामाजी वाढविती ॥ १७६ ॥
ऐसें म्हणूनि कृष्णागर । आसडूनि चालिला आपुला पदर ।
सदना येऊनि खेळावर । तैसाचि पुन्हां वहिवाटला ॥ १७७ ॥
येरीकडे भुजावंती । सुत ऐसें समजतां चित्तीं ।
परम भयाचे व्याप्ती । दासीलागीं पाचारी ॥ १७८ ॥
म्हणे बाई वो झालें विघ्न । प्रेम भयानक घेईल प्राण ।
तो परपुरुष नव्हता सापत्ननंदन । अर्थ ओंगळ झाला गे ॥ १७९ ॥
तरी हा झाला वृत्तान्त । आतां रायासी करील श्रुत ।
श्रुत झालिया प्राणघात । मितवेल सखे मम देहीं ॥ १८० ॥
तरी आता विष घेऊन । द्यावा वाटतो आपुला प्राण ।
प्राण हरल्या सकळ कल्याण । मजप्रती वाटतसे ॥ १८१ ॥
विपरीतासी विपरित करणी । गुप्त राहील सकळ जनीं ।
नातरी वांचल्या विटंबनीं । नाना क्लेशा भोगावें ॥ १८२ ॥
तरी यांतचि सारगोष्टी । हेत मिरवावे मृत्युवाटीं ।
नातरी वांचल्या राव शेवटीं । विटंबोनि मारील गे ॥ १८३ ॥
मारिल्यासी सर्व लोकांत । बाई गे होईल अपकीर्त ।
म्हणतील रांड परम कुजात । भ्रष्टबुद्धि पापिणी ॥ १८४ ॥
असो ऐसा दुर्घट विचार । ओढवला तरी सारांत सार ।
गुप्तप्रकरणीं प्राणावर । उदार व्हावें आपणचि ॥ १८५ ॥
ऐसी तीतें बोलतां युवती । सखी देईल उत्तराप्रती ।
तें पुढिले अध्यायीं भक्तिसारग्रंथीं । श्रवण करा श्रोते हो ॥ १८६ ॥
तरी हा ग्रंथ भक्तिसार । तुम्हीच वदवितां मनोहर ।
निमित्त मात्र धुंडीकुमर । मालू नरहरिचा मिरवतसे ॥ १८७ ॥
स्वस्ति भक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । त्रिंशतितमाध्याय गोड हा ॥ १८८ ॥ 
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥
॥ श्रीनवनाथभक्तिसार त्रिंशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shri Navanatha BhaktiSar Adhyay 30  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय तीसावा (३०) 


Custom Search

No comments:

Post a Comment