Shri Navanath Bhaktisar Adhyay 36
Revannath went to Swarga to bring back Prana of son of Saraswati Brahman. Yama told him that he had to follow orders from God Shiva. Hence Revannath went to Kailas. He had a war with God Shiva and hid disciples. After defeating God Shiva, God Vishnu told Revannath that he had Pranas of all seven Childs of Saraswati Brahmin who were died earlier. He gave them to Revanath. Revannath returned to Saraswati Brahmin's house and by chanting Sanjivani Mantra made alive all the Childs. Second story in this Adhyay 36 is that of Vatsidhanaganath. Vatsidhanaganath had taken birth in the comb of Padmini daughter of Takshak. Then he was brought up by Koshadharma and his wife Suradevi. At the age of 7-8 years Vatsidhanaganath was blessed by God Dattatreya. By use of the Siddhi Vatsidhanath can feed anybody with food whatever food he demands. Vatsiddhanath went to Kolhapur to meet God Dattatreya. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 37th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी भक्ततारका । मम पूर्वजा ज्ञानार्का ।
नरहरिनामें पुण्यश्र्लोका । पुढें ग्रंथ बोलवीं ॥ १ ॥
मागिले अध्यायीं कथन । रेवणनाथातें अत्रिनंदन ।
वरदचित्तें प्रसन्न होऊन । सनाथ चित्तें केला असे ॥ २ ॥
केला तरी प्रतापवंत । परी सरस्वतीविप्राचा अभिप्रायहेत ।
चित्तीं धरुनि कैलासांत । रेवणनाथ गेला असे ॥ ३ ॥
तरी आतां पुढें श्रोतीं । परिसावें आवाहना ग्रंथअर्थी ।
रेवणनाथ कैलासाप्रती । कैलासद्वारीं प्रकटला ॥ ४ ॥
दिसे जैसा भास्कर । कीं उदय पावला रोहिणीवर ।
कीं सहस्त्र चपलांचा (विद्दुल्लतेचा समूह) एकभार । अंगकांती मिरवतसे ॥ ५ ॥
ऐसा महाराज तेजःपुंज । ग्रामद्वारीं येतां भोज ।
तंव शिवगण विजयध्वज । रक्षणा असती द्वारांत ॥ ६ ॥
त्यांनीं पाहूनि योगमूर्ती । हटकोनि उभा केला क्षितीं ।
म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती । जातां कोठें महाराजा ॥ ७ ॥
येरु म्हणे रेवणनाथ । नाम असे या देहातें ।
विजयकरणीं भवभेटीतें । आम्हां जाणें आहे कीं ॥ ८ ॥
येरु म्हणती कवण कार्यें । आम्हांलागीं शीघ्र सांगावें ।
नाथ म्हणे विप्रतनय । सत्य चोरिला शिवानें ॥ ९ ॥
तरी तयासी शिक्षा करुन । घेऊनि जाईन विप्रनंदन ।
ऐसें ऐकतां शिवगण । परम चित्तीं क्षोभले ॥ १० ॥
म्हणती बाबा बोलसी वचन । यांत आम्हांसी आलें समजोन ।
तुमचा गुरु गंधर्व जाण । आम्हांलागीं वाटतो ॥ ११ ॥
परी गंधर्वाचा संस्कार । पाहूं आला वाक्प्रहार ।
तरी तो तेथेंचि करावा आदर । फीर माघारा येथोनी ॥ १२ ॥
ऐसें बोलती शिवगण त्यासी । परम कोप चढला त्याचे मानसीं ।
म्हणे गुरु गंधर्ववंशीं । तरी तुम्हां दावितों ॥ १३ ॥
अरे तुम्ही गंधर्वासमान । फिरों नका रानोरान ।
ऐसें म्हणोनि करें भक्तिबंधन । भस्मचिमुटी कवळिली ॥ १४ ॥
स्पर्शअस्त्र जपोनि होटीं । फेंकिता झाला भस्मचिमुटी ।
तेणें द्वारपाळ महीपाठीं । खिळोनियां राहिले ॥ १५ ॥
एक सहस्त्र तीन शत । गण महीतें केले व्यक्त ।
उचलूं जातां स्वपदातें । मही पदातें सोडीना ॥ १६ ॥
पद महीपासूनि कदा न सुटती । म्हणोनि हस्त धरुनि काढूं जाती ।
तेणें महीतें व्यक्त होती । उभय हस्त गणांचे ॥ १७ ॥
ऐसे एक सहस्त्र तीन शत । ओणवे केले महीं व्यक्त ।
मग सर्वालागीं बोले नाथ । कोण गंधर्व सांगा रे ॥ १८ ॥
ऐसी विपरीत करणी । प्रविष्ट होतां त्या शिवगणीं ।
हा वृत्तान्त सकळ शिवभुवनीं । शिवालागीं समजला ॥ १९ ॥
कैलासवासी शिवाचे गण । त्यांनी विपर्यास पाहून ।
परम भयभीत चित्तीं होऊन । शिवालागीं दर्शविती ॥ २० ॥
उभे राहोनि शिवानिकट । म्हणती महाराज नीळकंठ ।
एक मानव सुभट । ग्रामद्वारीं पातलाहे ॥ २१ ॥
तेणें एक सहस्त्र तीन शत । द्वारगण केले महीव्यक्त ।
करचरण दोन्ही ओणवे समस्त । आरंबळती महाराजा ॥ २२ ॥
ऐसी ऐकूनि शिवें मात । कल्पांतभैरवां आज्ञापीत ।
म्हणे कोण आला येथ । शिक्षा त्यातें करा रे ॥ २३ ॥
ऐसें ऐकतां शिववचन । अष्टही भैरव प्रळयाग्न ।
सवें घेऊनि शतकोटी गण । ग्रामद्वारीं पातले ॥ २४ ॥
तंव ते एक सहस्त्र तीन शत । भैरवीं पाहिले महीव्यक्त ।
मग परम कोपोनि पिनाकहात । शरभया योजिती ते ॥ २५ ॥
तें नाथें चपळपणीं पाहून । पुनः शस्त्रअस्त्रांचें संधान ।
तीव्र कल्पूनि शतकोटिगण । तयांसी तेथ खिळियेलें ॥ २६ ॥
अष्टभैरव प्रतापदर्प । कदा न गणिती अस्त्रप्रताप ।
टणत्कारुनि शरचाप । तीव्र अस्त्रें योजिती ॥ २७ ॥
एक योजिती वातास्त्र प्रबळ । एक योजिती प्रळयानळ ।
एकीं नागास्त्र परम विशाळ । विषधारा योजिलें ॥ २८ ॥
एकीं धूम्रास्त्र योजिलें कठिण । एकीं वासवशक्ति केली निर्माण ।
एकीं ब्रह्मास्त्र शापवचन । शापादपि योजिलें तें ॥ २९ ॥
एकें वज्रास्त्र योजिले सबळ । जें सकळ अस्त्रां असे अतुळ ।
वीरभैरव तो साधनीं चपळ । विभक्त अस्त्र निर्मीतसे ॥ ३० ॥
ऐसी योजूनि सायकमुष्टी (बाणांचा समुह) । शर सोडिते झाले जेठी ।
मग अष्टास्त्रांतें प्रतापकोटी । अंबरातें मिरवले ॥ ३१ ॥
तें पाहोनियां रेवणनाथें । भस्मचिमुटी कवळूनि हातें ।
एकदांचि उत्तीर्ण अष्ट अस्त्रांतें । मुखेंकरोनि जपिन्नला ॥ ३२ ॥
वातास्त्रावरी पर्वतास्त्र । अग्निअस्त्रावरीं जलदास्त्र ।
नागास्त्रावरी खगेशास्त्र (गरुडास्त्र) । यापरी तो जल्पतसे ॥ ३३ ॥
धूम्रास्त्रावरी आदित्यनामी । वासवशक्तीते काळिका निर्मी ।
शापादपि ब्रह्मास्त्रखाणी । स्तवनअस्त्र त्या ओपी ॥ ३४ ॥
वज्रास्त्रातें शक्रास्त्र (इंद्रास्त्र) जपोन । विभक्तास्त्र केलें निर्माण मोहन ।
अष्टअस्त्रांचें निवारण । एकाचि वचनें केलें तें ॥ ३५ ॥
असो अष्टास्त्रीं अष्ट अस्त्रें जाऊन । नाहींशीं केलीं अंबरांत जाण ।
परी ती अष्ट अस्त्रें उकलोन । भैरवांवरी पडियेलीं ॥ ३६ ॥
तेणें अष्टभैरव झाले जर्जर । शिवालागीं सांगती हेर ।
हे महाराज उमावर । भैरव क्षीण झालेती ॥ ३७ ॥
तें ऐकोनि शिव चित्तीं । सिद्ध गोसुत (नंदी) केला निगुतीं ।
आव्हानोनि रोहिणीपती । त्रिशूळ हातीं मिरवला ॥ ३८ ॥
चक्र खड्ग शर सायक । अंकुश आणि डमरु देख ।
शंख नरकपाळ हस्तीं एक । नंदी वाग्दोर मिरवतसे ॥ ३९ ॥
ऐशियेपरी भूषण । कामांतक तो शस्त्र संजोन ।
परम संतापें उभा राहोन । बहु त्वरें धांवला ॥ ४० ॥
तें पाहूनि रेवणनाथ । चित्तीं म्हणे युद्ध कासया बहुत ।
एकाचि अस्त्रें प्रतापवंत । शिवालागीं करावें ॥ ४१ ॥
जल्पूनि अस्त्र वाताकर्षण । फुंकूनि देत भस्म जल्पून ।
तें प्रविष्ट होतां तीव्रपण । आकर्षिला ॥ ४२ ॥
तेणेंकरोनि उमास्वामी । विकळ झाला नंदीवरोनी ।
धीर न धरवे महीलागुनी । उलथोनियां पडियेला ॥ ४३ ॥
परम झाला गात्रीं विकळ । शस्त्रें मुठींचीं सुटलीं सकळ ।
मुखीं रुधिर लोटलें तुंबळ । सरितापाठीं मिरवलें ॥ ४४ ॥
अष्टभैरव अष्टअस्त्रें करुन । तेही पडले जर्जर होऊन ।
तीव्र प्रहारें मूर्च्छा येऊन । महीवरती मिरवती ॥ ४५ ॥
सकळ पडले शुद्धिरहित । अष्टअस्त्रें तीं झालीं गुप्त ।
परी गंधर्वा हा सकळ वृत्तान्त । युद्ध पाहतां समजला ॥ ४६ ॥
मग ते परम तांतडीकरोन । विष्णूसी ही जाणविती खूण ।
परम अवस्थेसी ऐकून । कमलापति धांविन्नला ॥ ४७ ॥
मनोवेगातें मागें टाकून । शीघ्र पातला रमारमण ।
नाथासन्मुख निकट येऊन । हृदयीं प्रीतीनें कवळीतसे ॥ ४८ ॥
हृदयीं कवळूनि योगमूर्ती । म्हणे महाराजा तपःपती ।
कवण कारणें विक्षेप चित्तीं । कोपानळ पेटला ॥ ४९ ॥
येरी म्हणे पंकजाक्ष । मी सरस्वतीविप्राच्या गृहीं प्रत्यक्ष ।
असतां शिवें धाडूनि यक्ष । पुत्र त्याचा मारिला ॥ ५० ॥
तरी त्या अभिप्रायेंकरुन । आतां घेईन शिवाचा प्राण ।
उपरी संजीवनीअस्त्रेंकरुन बाळ उठवीन तयाचें ॥ ५१ ॥
नातरी रक्षिणें असेल प्राण । तरी सप्तबाळें द्या आणोन ।
ऐसें नाथ बोले वचन । विष्णु त्यातें बोलतसे ॥ ५२ ॥
म्हणे महाराजा बाळें सप्त । आहेत मजपाशीं जीवदशाव्यक्त ।
तरी सप्तही जीव तुम्हांतें । हस्तगत करितों मी ॥ ५३ ॥
जीवदशा तुम्हां करिता अर्पण । पुढें देह तुम्ही करा निर्माण ।
ऐसें नाथें ऐकूनि वचन । अवश्य म्हणे तयातें ॥ ५४ ॥
मग वातप्रेरक आस्त्र जपूनी । सावध केला शूलपाणी ।
उपरी विभक्तअस्त्र जपूनी । गण सोडविले सकळिक ॥ ५५ ॥
स्थितिमंत्र सुखवास सघन । अष्टभैरवां लाविलें भस्म ।
तेही झाले सुखरुप पूर्ण । अस्त्रप्रहारांवेगळे ॥ ५६ ॥
मग सकळ सावध होऊनि प्रीतीं । नमिते झाले योगपती ।
मग सप्तजीवदशा देऊनि हातीं । बोळविला महाराजा ॥ ५७ ॥
व्यानास्त्र मुखीं जपून । महीं उतरला तपोघन ।
शीघ्र विप्रग्रामीं येऊन । सरस्वतीविप्रा सांगतसे ॥ ५८ ॥
म्हणे बा रे पुत्रकलेवर । कुटीं मेणासम समग्र ।
ऐसें ऐकतां सरस्वतीविप्र । उखळीं पुत्र वाहिला ॥ ५९ ॥
कुटूनि केला मेणासमान । मग समग्र भाग दिला आणून ।
मग तयाचे यथाविभाग करुन । सप्त पुतळे बनविले ॥ ६० ॥
सिद्ध पुतळे झालियावर । संजीवनीप्रयोगीं वागुत्तर ।
तेणें सजीव झाले समग्र । जीवदशा प्रकटुनी ॥ ६१ ॥
प्रकटती अट्टहास्य करुन । रुदन करिती सप्तही नंदन ।
मग सरस्वतीकांतेसी ओपून । म्हणे पाळण करीं यांचें ॥ ६२ ॥
मग द्वादश दिवसां पालखीं घालून । सप्त पुत्रांचें ठेविलें नाम ।
एक सारंगीनाथ द्वितीयाकारण । जोगिबा नाम ठेविलें ॥ ६३ ॥
तृतीय बाळक निजानंद दीनानाथ । नयननाथ मिरवला चतुर्थ ।
यदुनाथनामीं पंचम समर्थ । षष्ठ निरंजननामीं मिरवला ॥ ६४ ॥
सातवा महापुरुष गहिनीनाथ । असे सप्त पुरुष जगविख्यात ।
पुढें द्वादश वरुषें रेवणनाथें । अनुगृहीत केले ते ॥ ६५ ॥
मग त्या सप्त शिष्यांकारण । सिद्ध केलें विद्या ओपून ।
जगीं मिरवले सिद्ध म्हणून । चौर्यायशीं सिद्धांत पैं ॥ ६६ ॥
मग तिथेंचि राहूनि योगपती । सेवा घेतसे सातांहातीं ।
असो रेवणनाथ विटें प्रांतीं । अद्यापपर्यंत नांदतसे ॥ ६७ ॥
असो ऐसें कथेचें चांगुलपण । जो नित्य करी श्रवण पठण ।
बाळमृतीचा दोष जाऊन । पुत्रवान होईल कीं ॥ ६८ ॥
बाळें होऊनि दोषें मरती । तिनें सुस्नात होऊनि कथेप्रती ।
मग बाळें तियेचीं चेवली (नष्ट होणार नाहींत) न जाती ।
हें गोरक्ष बोलिला जाण पां ॥ ६९ ॥
तरी ऐसी दोषनिवारण । कथा ऐकावी कामिकानें ।
याउपरी वटसिद्धनाथाचें कथन । स्वीकारावें श्रोत्यांनीं ॥ ७० ॥
पूर्वीं सरस्वतीचें उद्देशेंकरुन । ब्रह्मवीर्य गृहातें पडले खचोन ।
सर्पिणीमस्तकीं अकस्मात येवोन । आदळलें ते समयीं ॥ ७१ ॥
मौळदंडीं पडलें रेत । तंव ती पाहे अकस्मात ।
चित्तीं म्हणे भक्ष महीतें । पडला आहे सुढाळ ॥ ७२ ॥
मग तें उचलोनि आननपुटीं । सांठविती झाली आपुले पोटीं ।
परी सांठविल्या रेत शेवटीं । गर्भ वाढी लागला ॥ ७३ ॥
राहिला परी अस्तिकासी । समजूनि आलें अंतरासी ।
कीं ब्रह्मवीर्य तक्षकात्मजेसी । प्राप्त झालें तये वेळीं ॥ ७४ ॥
झालें परी महासिद्ध । उदरा येईल अवतार प्रसिद्ध ।
जो नवांतील नारायण शुद्ध । सिद्धनाथ म्हणतील जो ॥ ७५ ॥
ऐसें जाणोनि आस्तिकमुनी । पाहता झाला तक्षकनंदिनी ।
समीप तीतें पाचारुनी । बोलता झाला महाराजा ॥ ७६ ॥
म्हणे माय वो ऐक वचन । तव तो भोग नव्हे दुर्बळवान ।
तुज उदरीं नारायण । आविर्होत्र येतो गे ॥ ७७ ॥
परी हें तूतें सांगावया कारण । पुढें आहे दुर्घट विघ्न ।
जनमेजय राजयानें । सर्पसत्र मांडिलेंसे ॥ ७८ ॥
सकळ ऋषींचा घेवोनि मेळ । मखकुंडीं ठेविला प्रळयानळ ।
सर्पसमिधा योजूनि सबळ । ऋषि मंत्र आव्हानिती ॥ ७९ ॥
तरी माय वो सांगो किती । बहु फण्यांची होईल आहुती ।
तें अवगमोनि माझिये चित्तीं । तुजपाशीं पातलों ॥ ८० ॥
तरी आतां गर्भभरणीं । स्वदेहातें बैसें आच्छादुनी ।
येरी म्हणे कवणा स्थानीं । राहूं लपोनि महाराजा ॥ ८१ ॥
ऐसें बोलतां वागुत्तर । तों समीप देखतां वटतरुवर ।
तोही जुनाट काष्ठपोखर । महीवरती मिरवतसे ॥ ८२ ॥
तें पाहूनियां आस्तिकमुनी । म्हणे माय वो तक्षकनंदिनी ।
या वटपोखरांत संचरोनी । प्राण आपुला रक्षीं पैं ॥ ८३ ॥
मग तक्षकात्मजबाळा । रिघती झाली वटस्थळा ।
काष्ठपोखरीं तपोवेल्हाळा । गरोदरपण भोगीतसे ॥ ८४ ॥
परी आस्तिकें अचळ वज्रप्रयोगीं । सिंचिला तरु अंबुभागीं ।
अचळ करुनि तरु वेगीं । हस्तिनापुरीं चालिला ॥ ८५ ॥
जाऊनि मखमंडपांत । भेटूनि सकळ ऋषींतें गुप्त ।
तक्षकसुतेचा सकळ वृत्तान्त । निवेदिला तयांसी ॥ ८६ ॥
म्हणे ब्रह्मवीर्य सानाथवंत । तें उदरीं आहे नेमस्त ।
तरी वटसिद्धनागनाथ । प्रकट होईल महाराजा ॥ ८७ ॥
ऐसें सांगतसें वर्तमान । जो नवांतील आविर्होत्र नारायण ।
सर्पसत्रीं आपण । योजूं नये तयासी पैं ॥ ८८ ॥
ऐसें साकल्य (सर्व) वर्तमान । ऐकूनि ऋषी तुकविती मान ।
आपुलें हृदयीं शोध करुन । अवश्य म्हणती तयातें ॥ ८९ ॥
मग तक्षकात्मजा नाम पद्मिणी । मंत्रप्रयोगीं देती सोडुनी ।
येरीकडे उरगी (सर्पीण) गर्भिणी । नवमासांतें पुरलीसे ॥ ९० ॥
तिकडे सर्पसत्र झालें समाप्त । इकडे दिवस भरले नेमस्त ।
मग प्रकृतिअंड होऊनि उदित । प्रसूत झाली पद्मिणी ॥ ९१ ॥
असो वटवृक्षपोखरांत । अंड राहिलें दिवस बहुत ।
आविर्होत्र नारायण त्यांत । ईश्र्वरसत्ते संचरला ॥ ९२ ॥
दिवसेंदिवस अंडांत । वाढी लागलेंसे जीववंत ।
देह होतां सामर्थ्यवंत । भग्न झालें अंड तें ॥ ९३ ॥
मग त्या तळवटपोखरांत । बाळ रुदन करी अत्यंत ।
निढळवाणी (निराश्रित) त्यातें । रक्षणातें नसेंचि ॥ ९४ ॥
जैसी जळांतील जळमासोळी । उड्डाण घेतां पडे वेगळी ।
मग ती अत्यंत चित्तीं तळमळी । तैसें झालें बाळका ॥ ९५ ॥
अट्टहासें करीतसे रुदन । तैं पातला शुचि ब्राह्मण ।
गौडजाती अथर्वण । वेदभूषणीं मिरवतसे ॥ ९६ ॥
कोशधर्म तयाचें नाम । आचारशील विद्यावान ।
सहा शास्त्रीं पारंगत पूर्ण । चतुर्विध जाणता तो ॥ ९७ ॥
अपर सूर्य तो सर्वज्ञानमूर्ती । परी दरिद्री प्रारब्धगतीं ।
तेणेंकरुनि संसारक्षितीं । परम चित्तीं विटला ॥ ९८ ॥
विटला परी पत्रावळीकारण । पाहता झाला वटस्थान ।
पत्रें तोडावीं हें मनीं इच्छून । तयानिकटीं पातला ॥ ९९ ॥
निकट येतां तया तरुतळवटीं । बाळ रडे तें कर्णपुटीं ।
ऐकूनि चहूंकडे फिरती दृष्टी । तों कांहीं दिसेना ॥ १०० ॥
मनांत होय साशंकित । म्हणे बाळरुदन कोठें होत ।
स्वर्गींचे सुरवर त्यातें पाहात । बोलते झाले तयातें ॥ १०१ ॥
म्हणती कोशधर्मा सुशीळा ऐक । वटतरुंत आहे बाळक ।
तरी त्या मांदुसा तूं पाईक । दृष्टिगोचर नव्हेसी ॥ १०२ ॥
तरी प्रज्ञावंता ऐक वचन । तूं ते मांदुस काढून ।
आपुल्या गृहासी तें नेऊन । संगोपन करीं त्याचें ॥ १०३ ॥
तव घरीं येतां तें बाळक । सुदैवदशेचा उगवेल अर्क ।
मग दरिद्रता सकळिक । जाईल नासूनि महाराजा ॥ १०४ ॥
जैसें परिसअंगसंगेकरुन । लोहजाती होय सुवर्ण ।
मग षड्गुणैश्र्वर्य तयाकारण । दृष्टी पडेना काळिमा ॥ १०५ ॥
तेवीं तूं बाळ गृहीं नेतां । सकळ हरेल व्यथा दरिद्रता ।
बाळ नव्हे प्रत्यक्ष सविता । आविर्होत्र नारायण तो ॥ १०६ ॥
ऐसें बोलोनि साचोकार (खरोखर) । सुरवरीं पाठविला एक शर ।
तेणें तरु तो महीवर । खंडूनियां पडियेला ॥ १०७ ॥
तरु खंड होतां त्वरित । तों कोशधर्म बाळ देखत ।
बालार्ककिरणीं तेज अद्भुत । नक्षत्रपतींतें लाजविता ॥ १०८ ॥
बाळ तेजस्वी मनोहर । अंबरीं पाहते झाले सुरवर ।
मग सकळीं घेवोनि कुसुमभार । वर्षाव करिती भावार्थें ॥ १०९ ॥
देखतांचि पादपद्मा । सकळीं जोडोनि करयुग्मा ।
नमोनियां योगसद्मा (योगांचे घर असलेल्या ब्राह्मणाला) । कोशधर्मा बोलती ते ॥ ११० ॥
म्हणती महाराजा सभाग्यवंत । तूं एक आहेसी भूमंडळांत ।
वटसिद्ध नागेशनाथ । तूतें प्राप्त झाला असे ॥ १११ ॥
तरी हा पद्मिणी नागिणीपोटीं । रक्षिला गेला तरुच्या तळवटीं ।
आणि सिद्धता पावूनि त्या नागवटीं । नाथ मिरवेल योग्यांचा ॥ ११२ ॥
ऐसी करणी झाली येथ । म्हणोनि नाम वटसिद्धनागनाथ ।
तरी तुम्ही आतां महीतें । हेंचि नांव पाचारा ॥ ११३ ॥
ऐसें ऐकोनि कोशधर्में । बाळ उचलिलें अति प्रेमें ।
परम आनंदें आपुलें धाम (घर) । सेवोनि कांतेप्रती बोलतसे ॥ ११४ ॥
तंव ती कांता सुरादेवी । परम प्राज्ञिक सुशील महीं ।
धैर्य औदार्य सत्वपदवी । लोकांमाजी दावीतसे ॥ ११५ ॥
बाळ सत्यवतीनें देखतां । म्हणे मजकडे द्या लावण्यवंता ।
तंव ते दृष्टिगोचर करितां । बाळ अर्कासम दिसतसे ॥ ११६ ॥
मग हांसोनि बोले कोशधर्मा । म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा ।
बाळ कोणाचें उगमा । आणिलें तें मज सांगा ॥ ११७ ॥
मज वाटतें कीं बाळ नव्हे । सानरुपी यमपिता (सूर्य) झाला आहे ।
कीं ईश्र्वरें सृष्टीं पाहें । दुजा चंद्र निर्मिला कीं ॥ ११८ ॥
कीं विद्दुल्लता सकळ लाजिरवाण । मेघापरती लपवी स्वरुपानन ।
म्हणोनि ईश्र्वरें तेज हरुन । तुम्हांहातीं दीधलें ॥ ११९ ॥
कीं नक्षत्रांचा अपार मेळा । नावडे ईश्र्वरा पृथक्पाळा ।
म्हणोनि हें समुच्चयेंकरुनि गोळा । तुम्हांलागीं ओपिलें ॥ १२० ॥
Shri Navanath Bhaktisar Adhyay 36 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६)
Custom Search
No comments:
Post a Comment