Tuesday, March 29, 2016

Shri Navanath Bhaktisar Adhyay 36 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६) भाग २/२


Shri Navanath Bhaktisar Adhyay 36 
Revannath went to Swarga to bring back Prana of son of Saraswati Brahman. Yama told him that he had to follow orders from God Shiva. Hence Revannath went to Kailas. He had a war with God Shiva and hid disciples. After defeating God Shiva, God Vishnu told Revannath that he had Pranas of all seven Childs of Saraswati Brahmin who were died earlier. He gave them to Revanath. Revannath returned to Saraswati Brahmin's house and by chanting Sanjivani Mantra made alive all the Childs. Second story in this Adhyay 36 is that of Vatsidhanaganath. Vatsidhanaganath had taken birth in the comb of Padmini daughter of Takshak. Then he was brought up by Koshadharma and his wife Suradevi. At the age of 7-8 years Vatsidhanaganath was blessed by God Dattatreya. By use of the Siddhi Vatsidhanath can feed anybody with food whatever food he demands. Vatsiddhanath went to Kolhapur to meet God Dattatreya. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narahari family in the next 37th Adhyay. 
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६) भाग २/२
ऐसें म्हणोनि स्नेहभरित । बाळ उचलोनि हृदयीं लावीत ।
मग कोशधर्में सकल वृत्तान्त । निवेदिला कांतेतें ॥ १२१ ॥
सुरादेवीते सकळ कथन । सुरवरवाक्यासी ऐकोन ।
परम पावोनि समाधान । पालखा घालोनि हालवीत ॥ १२२ ॥
हृदयीं कवटाळितां बाळ । पयानें दाटलें कुचमंडळ ।
पान्हावोनि बाळमुखकमळ । पयोदहराग्रीं प्रेरीतसे ॥ १२३ ॥
मग तें बाळ घोंटीत क्षीर । जठराग्नीचा दाहक उबार ।
शांतवोनि शांतिपर । बाळ मिरवे देहस्थ ॥ १२४ ॥
अति लालनें स्नेहभरित । मार्जन न्हाणोनि पालखांत । 
नाम ठेविलें वटसिद्धनागनाथ । ओंव्या मंगलें गातसे ॥ १२५ ॥
मग दिवसेंदिवस रहणीं घन । सिंचन करी मोहसंजीवन ।
सुरादेवीचे पंचप्राण । निजांकुरीं लवलवती ॥ १२६ ॥
मग ती पल्लवाकार । फळ दावी भक्तिपर ।
परी तीक्ष्ण कटु व्यचहार । स्वप्नामाजी दिसेना ॥ १२७ ॥
जैसें तमारीचे गांवीं । नांदूं न शके तमाची पदवी । 
कीं कामधेनूचे कांसेठायीं । क्षुधानळें पीडिजेना ॥ १२८ ॥
तेवीं सुरादेवीचें अंतःकरण । कदा न दर्शवी भिन्न दर्शन ।
परम मोहें गेली वेष्टोन । पाषाण जेवीं शेवाळीं ॥ १२९ ॥
असो ऐसें सुखस्थित । बाळा लोटले दिवस बहुत । 
सप्तवरुषी कोशसुत । मौंजीबंधना मिरवला ॥ १३० ॥
या उपरांतिक एके दिवशीं । सोडोनियां क्षेत्र काशी । 
नागनाथ सहज खेळावयासी । भागीरथीतें पातला ॥ १३१ ॥
टळटळीत भरले दोन प्रहर । काशीविश्र्वेश्र्वराचे समोर ।
बाळ क्रीडतसे मनोहर । अर्क जेवीं दुसरा ॥ १३२ ॥
तों तेचि समयीं अकस्मात । येता झाला अत्रिसुत ।
येतांचि दृष्टी यथास्थित । बाळावरी गेलीसे ॥ १३३ ॥
तो बाळ तेजस्वी अर्कनीतीं । खेळताहे स्वस्थगतीं । 
बहु मुलें बैसवोनि पंगती । लटकेंचि अन्न वांटीतसे ॥ १३४ ॥
मुलें गड्या गड्या म्हणोन । धालों (समाधान पावलो) म्हणती सेवोनि अन्न ।
आतां पुढें वाढणें । वाढूं नको आम्हांसी ॥ १३५ ॥
परी तो तयांसी आग्रह करीत । घ्या घ्या म्हणोन वाचे वदत ।  
न घे त्यासी विनंति करीत । रसाळवाणी करुनियां ॥ १३६ ॥        
तें पाहोनियां अनसूयासुत । पाहोनि मनीं हास्य करीत ।
चित्तीं म्हणे लटक्या अन्नातें । मुलें धालों म्हणताती ॥ १३७ ॥                   
तरी आतां आपण संचरोन । मुलांलागीं द्यावें अन्न ।
मग प्रत्यक्ष बाळतनु धरोन । तयांमाजी संचरला ॥ १३८ ॥ 
बाळ अंगणी उभा राहोन । म्हणे अतीत (पाहुणा) आला तुम्हांकारणें ।
अन्न मागतो उदराकारणें । तृप्त त्यातें करावें ॥ १३९ ॥
तंव तीं मुलें तीव्रपणें । पाठी लागती वसवसोन ।
म्हणती आमुचे मंडळांत कोण । आला असे आतां खेळावया ॥ १४० ॥
कोणी दाटूनि पुढें येती । कोणी शेला उगारिती ।
कोणी पाषाण घेती हातीं । जातोसि कीं मारुं तुज ॥ १४१ ॥
ऐसीं मुलें दाविती चिन्ह । तें श्रीनागनाथें पाहोन ।
सकळ मुलांची इच्छा पाहोन । वारिता झाला स्वहस्तें ॥ १४२ ॥
म्हणे गडे हो ऐका वचन । आपण बैसलों सेवूं अन्न ।
त्यांत अतीत आला जाण । त्यांसी दवडूं नये कीं ॥ १४३ ॥
पहा आपुले घरीं सांगे पिता । विन्मुख कोणी न व्हा अतीता ।
तैसाचि आपण भिक्षुक मागता । आला आहे समयासी ॥ १४४ ॥
काढोनि अंगावरील चीर । अंग पुसीतसे आपुले करीं  ।
गंध लावी भाळावरी । शुष्कपूजा करीतसे ॥ १४५ ॥
तरी अतीताचें करुनि पूजन । पोटभरी घालावें अन्न ।
प्रत्यक्ष नाथ करीं धरोन । बाळें अंगणीं बैसविला ॥ १४६ ॥
लटकेंचि कल्पनेंचें करुन जीवन । तया अतीता घालितां स्नान ।
हस्तपादावरी फिरवून । करिती क्षालन अंगाचें ॥ १४७ ॥
लटकें मनाचें करुनि सुमन । हार गुंफिला कल्पनेकरुन ।
तो अतीताचे गळा घालोन । लटका धूप दाविती ॥ १४८ ॥       
भावपूर्वक लावोनि नयन । ऐक्य करिती पंच प्राण ।
परी सहजदृष्टीतें ज्ञानपण । आरती करिती अतीताची ॥ १४९ ॥
मग लटकेंचि पात्र पुढें ठेवून । कल्पूनि लटिकें आणूनि वाढिती अन्न ।
मग उभय हस्त जोडून । प्रार्थना करिती अतीताची ॥ १५० ॥
नम्र वाचा रसाळ वचन । म्हणती स्वामी सेवा अन्न । 
वारंवार नमस्कार करोन । आणीक वाढूं म्हणताती ॥ १५१ ॥
ऐसें आदराचें चांगुलपण । पाहूनियां अत्रिनंदन । 
चित्तीं म्हणे प्रज्ञावान । बाळ सुशीळ आहे हा ॥ १५२ ॥
उदारबुद्धीं तृप्ती करुन । वर्तताहे दातृत्वपणें । 
हें तों पूर्वींचे योगदृष्टीकरोन । योग्यावांचूनि घडेना ॥ १५३ ॥
सुशब्द आणि विवेकशांती । विचरे जयाचे देहाप्रती । 
तरी पूर्वींचा योगभ्रष्टगती । योग्यावांचूनि घडेना ॥ १५४ ॥
स्नान आणि हरणी स्थिती । याचक आर्तवान बहुत युक्ती । 
तरी पूर्वींची योगश्रेष्ठ गती । योग्यावांचूनि घडेना ॥ १५५ ॥
उदारबुद्धि धार्मिकस्थिती । विचार रसाळ सर्वांप्रती ।
दुःख न देणें परांप्रतीं । हें योग्यावांचूनि घडेना ॥ १५६ ॥
ऐसें चित्तीं अवगमून (समजून) । शोधी तयाचा पूर्वजन्म । 
तों आविर्होत्र नारायण । निजमानसीं भासला ॥ १५७ ॥     
मग कृपासिद्धि करुनि युक्तीं । देता झाला तयाचे हातीं ।
जे जे वदे वाणी निश्र्चितीं । ते ते पदार्थ मिरवावे ॥ १५८ ॥
मग परम होऊनि हर्षयुक्त । म्हणती हा एक उदेला महीनाथ ।
समीप बोलावोनि त्यातें । हस्त धरी तयाचा ॥ १५९ ॥
उपरी कर्णीं सांगे मात । भोजन घालीं सकळ मुलांतें ।
परी तूं न सेवीं सिद्धिअन्नातें । कदाकाळीं बाळका रे॥ १६० ॥
नाथ आग्रहें त्या वाढीत । तरी तें पात्र मिरवे अति अद्भुत । 
ज्या पदार्थाचें नाम वदत । तो पदार्थ मिरवे पात्रावरी ॥ १६१ ॥
मग तीं बाळें अज्ञानपणें । साचोकारीं करिती भोजन ।
ऐसे लोटले बहुत दिन । नित्य खेळ खेळताती ॥ १६२ ॥
स्वनाम सांगूनि अत्रिनंदन । चालता झाला पुसोनि नाम ।
येरीकडे पंक्ती बैसवोन । भोजनखेळी खेळती ॥ १६३ ॥
आपुलाले गृहीं जाऊन । सेविती कांहीं किंचित अन्न । 
ते चाटीबोटीकरुन । अन्न नासिती विखुरती ते ॥ १६४ ॥
येथें यथेष्ट इच्छेसमान । सर्व पदार्थ षड्रसान्न ।
मग तें गृहींचें कदन्न । तुच्छपणीं वाटलें त्यां ॥ १६५ ॥
जे ब्रह्मरुप रसातें धाले । आपपर सकळ विसरले । 
ते मायाद्वैतकांजीसी बैसले । लाळ घोंटीत सेवावया ॥ १६६ ॥
कीं हाटकतगट जडावासी । नवरत्नकोंदण त्या भूषणासी ।
ते काय करुनि काचमण्यासी । स्पर्शित होतील चित्तांत ॥ १६७ ॥
कीं सुरंगरंगीं धाममंचकीं । कुसुमगंधागरु सेवितां थोर कीं ।
तो त्यजूनि दुर्गंध लोकीं । गल्लीमाजीं पडेल कीं ॥ १६८ ॥
तन्नायें मुलें सकळ । सेविती षड्रसान्नातें अमळ । 
तयां गृहींचें कदन्न केवळ । मिष्ट कांहीं लागेना ॥ १६९ ॥
मग ते तयांचे तात मात । गृहीं मुलांसी पुसती यथार्थ । 
तेही वदती प्रांजलवंत । षड्रस खेळ अन्नाचा ॥ १७० ॥
म्हणती तुम्ही दरिद्रपणीं । सेवितां कदन्न कांजीपाणी ।
आम्ही नित्य सुरनदीवरी जाऊनी । षड्रस अन्न सेवितों ॥ १७१ ॥
तंव ते असत्य मानूनि चित्तीं । गुप्तवेषें दुरुनि पाहाती ।
सरितातीरीं बैसवोनि पंक्ती । नागनाथ वाढीतसे ॥ १७२ ॥
मग ती चर्चा सर्वांगृहीं । प्रकट झाली सर्वदेहीं । 
मग कोशधर्मासी सर्वही । सुचविती अर्थातें ॥ १७३ ॥
म्हणती विप्रा तव नंदन । स्वर्गसरिते नित्य जाऊन ।
अपार पंक्ती बैसवून । षड्रसान्न वाढीतसे ॥ १७४ ॥
आम्ही प्रत्यक्ष पाहूनि दृष्टीं । बोलतों तूतें वाग्वटीं ।
पात्रेंविण उभय करपुटीं । इच्छान्न वाढीतसे ॥ १७५ ॥
नेणो कैशी करितो गती । उगला हात ठेवितो क्षितीं ।
पदार्थविवरणा वाचेप्रती । होतां पदार्थ मिरवत ॥ १७६ ॥
ऐसें ऐकोनि कोशधर्म । आठवीं केलें सुरवरांचें वचन ।
कीं पुढें पावोनि सिद्धकर्म । सिद्धनामें मिरवेल हा ॥ १७७ ॥
ऐसी खूण जाणूनि चित्तीं । म्हणे आश्र्चर्य दावी लोकांप्रती ।
ऐंसें कोणासही या क्षितीं । घडूनि येत नसे कीं ॥ १७८ ॥
धिक्कार करुनि म्हणे तयांचा । बाळ विकारी असत्य वाचा ।
एके दिवशीं हस्त सुताचा । धरुनि बैसवी अंकासनीं ॥ १७९ ॥
घेऊनियां मुखचुंबन । आणि कुरवाळी हस्तें वदन ।
म्हणे बा रे मुलांकारणें । भोजन घालिसी कैसें तूं ॥ १८० ॥
ऐसें पुसतां कोडेंकरुन । तोही दाटला स्नेहेंकरुन ।
तातासी म्हणे भोजन । तैसेंचि घालितों आतां मी ॥ १८१ ॥
अंकींहूनि तत्काळ उठोन । क्षितीं हस्त ठेवी पात्र म्हणोन ।
तंव ते प्रत्यक्ष पात्रीं दिसे अन्न । कोशधर्म पहातसे ॥ १८२ ॥
उपरी बहुधा प्रत्यक्षपणीं । तंव ते पदार्थ दिसती नयनीं ।
खाद्यें उपजलीं हें पाहोनी । मनीं आश्र्चर्य मानिलें ॥ १८३ ॥
मग मान तुकवूनि कोशधर्म । म्हणे बाळा होतें कैसें कर्म ।
प्रसन्न झालें त्याचें नाम । मजलागीं सांगावें ॥ १८४ ॥
यावरी म्हणे ताता ऐक । आमुचे खेळीं आलें बालक ।
तेणें सांगितलें कौतुक । तें तुजप्रती सांगतो ॥ १८५ ॥
तेणें माझा हस्त धरोन । उगाचि कान फुंकोन ।
मौळीं हस्त ठेवोन । वाढावया लाविलें ॥ १८६ ॥
परी तें पोर आमुचे मेळीं । सहज रीतीं आलें खेळीं ।
परी त्या पोरीं करोनि रळी (भांडण) । वारिलें म्यां सकळांते ॥ १८७ ॥
उपरी मीं त्या मुलाकारणें । तोषविलें मोठ्या गौरवानें । 
जैसें तुम्ही अतीताकारणें । गौरवीतसां महाराजा ॥ १८८ ॥
लटकमटक स्नानभोजन । सारुनि तयाचे पूजिले चरण ।
नमस्कारुनि ते देखोन । बोळविला महाराजा ॥ १८९ ॥
ऐसें ऐकोन कोशधर्म । आल्या अतीता धरोनि नेम ।
बाळाहातीं अतीतपूजा करोन । तुष्टचित्तें बोळवी ॥ १९० ॥
ऐसा पाहोनि विप्रनेम । परम संतोषला दत्तात्रेयनाम ।
चित्तीं म्हणे मार्ग सुगम । बाळालागीं लाधला ॥ १९१ ॥
तेणेंकरुनि सकळ क्षेत्रांत । कीर्ति वाढली असंभावित ।
महासिद्ध नारायणनाथ । कितीकांनीं आराधिला ॥ १९२ ॥
मग शतानुशत सहस्त्र पंक्ती । षड्रस अन्नें सेवोनि जाती ।
बहुतांचीं कार्यें होती । कनक-धन-वसना पावती ते ॥ १९३ ॥
मग जिकडे तिकडे नागेशसिद्ध । कीर्ति वानिती जन प्रसिद्ध ।
पंचविषयां संतोषोनि सिद्ध । इच्छिले कामा फळतसे ॥ १९४ ॥
मग अंगी आलें शहाणपण । देहाचे गेलें अज्ञानपण ।
एके दिवशीं ब्रह्मनंदन । ताताजवळी बैसला ॥ १९५ ॥
तातासी म्हणे महाराज । मम हातें पुरे जगाची चोज ।
तरी कवणे अर्थीं जगाचे काज । कवण्या अर्थें फलतसे ॥ १९६ ॥
दत्तात्रेय नामें बाळवेष । बाळपणीं भेटला आम्हांस ।
तरी कोण महापुरुष । प्रतापी बळें आगळा ॥ १९७ ॥
तात म्हणे तो दत्तात्रेयमुनी । त्रयदेवांचा अवतार भुवनीं ।
सुफळ प्रारब्धें गेला भेटोनी । तुजलागीं पाडसा ॥ १९८ ॥
नागेश म्हणे आतां परतोन । कैसा भेटेल अत्रिनंदन ।
हें सांगें मजलागून । निवेदन करी महाराजा ॥ १९९ ॥
याउपरी बोले कोशधर्म । बाळा तयाची भेटी दुर्गम ।
तो एकें ठायीं नसे नेम । अनेक क्षेत्रीं हिंडतसे ॥ २०० ॥
कोल्हापुर पांचाळेश्र्वर । काशीक्षेत्र मातापुर ।
ऐसीं हिंडतां अनेक क्षेत्रें । कोठे पहासी पाडसा ॥ २०१ ॥
परी प्रारब्धयोगेंकरोनी । भेटतसे दत्तात्रेयमुनी ।
यत्न केल्या भेटीलागुनी । आतुडेना बाळका ॥ २०२ ॥
जैसा कल्पतरु चिंतामणी । निधीपरीस लावण्यखाणी ।
बा रे नातुडे यत्नेंकरोनी । अवचटपणीं मिळती ते ॥ २०३ ॥
तेचि रीतीं अत्रिनंदन । प्राप्त नव्हे यत्नेंकरुन । 
ऐसें सांगूनि कोशधर्म । बाहेर गेला कार्यासी ॥ २०४ ॥
येरीकडे नागनाथ । हृदयीं आपुले विचारीत ।
कीं ऐसा रवि सनाथवंत । निजदृष्टीनें पाहावा ॥ २०५ ॥
परी पांचाळेश्र्वरीं मातापुरीं । जाऊनि शोधावें कोल्हापुरीं ।
जेथें जेथे वास धरित्रीं । तेथें तेथें शोधावें ॥ २०६ ॥
मग पुसोनि मातेसी । निघता झाला मुनिशोधासी ।
मातापुरादि पांचाळेश्र्वरासी । पाहूं पातला कोल्हापुरीं ॥ २०७ ॥
क्षेत्र कोल्हापुरीं संचरोन । पुसता होय जनांकारणें ।
कीं येथें तो अत्रिनंदन । कोणे ठायीं रहातसे ॥ २०८ ॥
ऐसें ऐकोनि लोक हांसती । वेड लागलें तूतें म्हणती ।
अवधूत येतसे क्षेत्राप्रती । तो कोणा प्रकट नव्हे रे ॥ २०९ ॥
कोण्या स्वरुपीं येथें येऊनी । जात आहे भिक्षा मागोनी ।
ऐसें जनाचे बोल ऐकोनी । प्रत्युत्तर त्यां देतसे ॥ २१० ॥
म्हणे येथें भिक्षेकारणें । येत आहे अत्रिनंदन ।
तरी अन्य क्षेत्रीं भिक्षा मागणें । तया घडत नाहीं कीं ॥ २११ ॥
येर (इतर लोक) म्हणती त्यासी । भिक्षा मागावी कोल्हापुरासी । 
याव्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी । अन्न न सेवी मागोनी ॥ २१२ ॥
अन्य क्षेत्रीं तया अन्न । चित्तीं न वाटे सुढाळपण ।
यासम कैसें ग्राम आन । पुण्यक्षेत्र हें असे ॥ २१३ ॥
ऐसें क्षेत्र पुण्यपावन । जरी या गांवीं न मिळे अन्न ।
तरी उपवास करी अत्रिनंदन । परी अन्य क्षेत्रीं सेवीना ॥ २१४ ॥   
अरे या गांवींचें शाकपात्र (भाजीचें पान) । मानीत आहे परम पवित्र । 
परी अन्य गांवींचें पक्वान्न स्वतंत्र । विटाळापरी मानीतसे ॥ २१५ ॥ 
जैसें एकपत्नी नरा । कुरुप असेल जरी दारा ।
तरी तीच भोगी व्यभिचारा । लावण्यलतिका आकळीना ॥ २१६ ॥          
कीं विप्रकरींचें कदन्न । सोडूनि शूद्राचें षड्रस अन्न ।
सेवील काय प्रसिद्ध ब्राह्मण । मनें देवता न वरीच ॥ २१७ ॥
तेवीं दत्त क्षेत्र हें सोडून । कदा न पाहे अन्य ग्राम । 
ऐसे त्या जनाचे बोल ऐकोन । विचार करी मग नाथ ॥ २१८ ॥
चित्तीं म्हणे करोनि पाकाग्नी । ग्रामांत पेटूं न द्यावा अग्नी ।
सकळ क्षेत्रा भोजन घालोनी । पाठवावें गृहीं गृहीं ॥ २१९ ॥
मग तो स्वामी येतां भिक्षेसी । कोठोनि अन्न वाढिती त्यासी । 
मग सहजचि स्वकीर्तिसी । आपणापासीं येईल कीं ॥ २२० ॥
येईल परी सिद्ध अन्न । घेणार नाहीं भिक्षेलागून ।
हेचि ओळखी जाणोनि खूण । पाय वंदावे तयाचे ॥ २२१ ॥
आणिक माझें विचारुनि नाम । गेला आहे योगद्रुम ।
तरी तोही भेटेल कृपेंकरोन । नामाभिधान ऐकोनी ॥ २२२ ॥
आणि मजही गेला सांगोनि जाण । कीं सेवूं नको सिद्धान्न ।
आणिकांतें घाली भोजन । तुष्ट करीं क्षुधार्थी ॥ २२३ ॥
ऐसी सांगूनि गेला मात । तो सेविणार नाहीं सिद्धान्नातें ।
ऐसा उपाय योजूनि चित्तांत । लक्ष्मीदेउळीं संचरला ॥ २२४ ॥
भेटूनि पुजारियासी । ओवरी एक रहावयासी । 
मागूनि घेत अति प्रीतीसीं । बंदोबस्तीं नेटकी ॥ २२५ ॥
परी तो पुजारी भक्तिवान । अतीतपूजा करीन । 
नित्य पंक्तीसी घेवोन । भोजनातें सारीतसे ॥ २२६ ॥
ऐसे लोटतां कांहीं दिवस । पाचारुनि पुजार्‍यास । 
म्हणे माझे आहे मनास । ग्रामभोजन घालावें ॥ २२७ ॥
परी तुम्हीं साह्य होवोनि मातें । खटपटीसह सारावें कृत्य ।
तंव तो हांसूनि बोले त्यातें । फार बरें आहे जी ॥ २२८ ॥
आम्ही खटपट करुं सघन (मोठी) । परी तुम्हांपासीं कोठें अन्न ।
उगेंचि कैसें ग्रामभोजन । सबळ सामर्थ्य असावें ॥ २२९ ॥
नाथ म्हणे ऐका वचन । सर्व सामग्री ठेविली करोन ।
परी खटपटीची आंगवण । करा कार्य सिद्ध हें ॥ २३० ॥
मग तो अवश्य म्हणोनि त्यातें । बोले आपुचें काय जातें ।
पुण्यासाठीं धर्मकृत्य । घडोनि येतें आम्हांसी ॥ २३१ ॥
ऐसें बोलोनि नाथातें । पुजारी गेला स्वकार्यातें ।
येरीकडे ओवरींत । काय करी महाराजा ॥ २३२ ॥
कोरडे अन्नाचें घेवोनि नाम । क्षितीसी ठेवी करपद्म ।
तों धान्यराशी पर्वतासमान । तया ठायीं बैसल्या ॥ २३३ ॥
ऐशापरी अपार राशी । निर्मिता झाला स्वकरेंसीं ।
घृतस्नेहादि सांठवणासी । ओवरीमाजी विराजवीत ॥ २३४ ॥
मग येवोनि पुजार्‍याचे सदनीं । आणिला करीं कवळोनी ।
ओवरीमाजी शीघ्रगती नेवोनी । सिद्धाश्रम दाविला ॥ २३५ ॥
यावरी आतां पुढें कथन । अन्नछत्रीं इच्छेसमान । 
श्रीनागेंद्र सिद्ध करोन । भेट घेईल दत्ताची ॥ २३६ ॥
तरी ती कथा सुधाकर । पुढें सेवा श्रवणद्वारें ।
धुंडीसुत मालू सुरस । हरिकृपें सांगेल कीं ॥ २३७ ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । षट्त्रिंशतितमाध्याय गोड हा ॥ २३८ ॥
श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार षट्त्रिंशतितमाध्याय संपूर्ण ॥ 
Shri Navanath Bhaktisar Adhyay 36 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय छत्तीसावा (३६) 



Custom Search

No comments:

Post a Comment