Monday, April 11, 2016

RamPatha रामपाठ


RamPatha 
BrahmaChaitnya Gondavalekar Maharaj has created this beautiful RamPatha in Marathi.
रामपाठ
॥ श्रीगणेशायनमः ॥
ॐ नमोजी सद्गुरुनाथा । तुझे चरणीं ठेविला माथा ।
पूर्ण करी मनोरथा । विनन्ति माझी परिसावी ॥ १ ॥ 
रामपाठाचा उच्चार । मम हृदयीं, करी उद्धार ।
हेंचि मागणें वारंवार । तुजलागीं दयाळा ॥ २ ॥
व्यास वाल्मिक नारदमुनि । शुकसनकादिक ज्याचे ध्यानीं ।
तो श्रीराम चापपाणि । मम वाणी वदो का ॥ ३ ॥
अयोध्यावासी नगरजन । रामासी भजती अनुदिन ।
तो कौसल्यानन्दन । मम हृदयीं वसावा ॥ ४ ॥
सद्गुरु म्हणे ऊठ लवलाहीं । ज्ञानदीपाचे प्रकाश पाहीं ।
वस्तु आपुली शोधूनि घेई । मग पावसी निजसुखा ॥ ५ ॥
सद्गुरु राजवैद्य पूर्ण । रामनामाचें रसायन ।
स्वहस्तें मम मुखी पाजून । केले सावध स्वरुपीं ॥ ६ ॥
नेत्रीं घातलें बोधांजन । भवरोग काढिला मुळींहून ।
मूर्ति दाविली सगुण । तें रुप वर्णिलें न जाय ॥ ७ ॥
चतुर्भुज मेघश्याम सांवळा । कांसे पीताम्बर पिवळा ।
गळां वैजयन्तीमाळा । मुक्ताहार डोलती ॥ ८ ॥
अंगीं चंदनाची उटी । केशर कस्तुरी लल्लाटीं ।
अमूल्य रत्नें शोभती मुकुटीं । कर्णी कुण्डलें तळपती ॥ ९ ॥  
क्षुद्र घंटा वाजती कटीं । दशांगुलीं मुद्रिकांची दाटी ।
बाहुभूषणें शोभती मनगटी । सुवर्णपादुका चरणकमलीं ॥ १० ॥
शंख चक्र चाप बाण । वरद हस्त उदार वदन ।
विशाळ भाळ आकर्णनयन । ऐसा भगवान् देखिला ॥ ११ ॥
गुप्त ठेविलें निर्गुण । प्रकट केलें स्वरुप सगुण ।
श्रीराम अवतार घेऊन । धर्म स्थापिला स्वहस्तें ॥ १२ ॥
अयोध्या पुण्यपावन नगरी । तेथें श्रीराम राज्य करी ।
तपोनिधि महाक्षेत्री । सिंहासनीं विराजे ॥ १३ ॥
शेषें धरिलें छत्र । भरतशत्रुघ्न करिती चामर ।
भक्त प्रार्थिती वारंवार । जयजयकारें गर्जती ॥ १४ ॥
नळ नीळ जाम्बुवन्त । अंगद सुग्रीव बिभीषण भक्त ।
निरिच्छ वायु-सुत । सदा निमग्न रामरुपीं ॥ १५ ॥
वसिष्ठ विश्वामित्र ऋषि । दत्त दिगंबर तापसी ।
ब्रह्मचारी कित्येक संन्यासी । रामनामीं लुब्धले ॥ १६ ॥
रामनाम हृदयीं धरुन । ध्यानीं बैसले योगीजन ।
यम इंद्र अग्नि वरुण । पंचवदन तप करी ॥ १७ ॥
रामनामाची अपरिमित शक्ति । शेषाची वर्णितां खुंटली मती ।
वेदाची न चले गति । शास्त्रें लज्जित बैसलीं ॥ १८ ॥
अनन्त अवतारांचा महिमा । तोहि रामनामीं तुळेना ।
ऐशिया रामाच्या सद्गुणा । मी मानव काय वर्णू ॥ १९ ॥
रामीं रंगलें त्रिभुवन । जडमूढ काष्ठ पाषाण । 
घटमठांत सर्वांत परिपूर्ण । त्याहून वेगळा राहिला ॥ २० ॥
पिण्डब्रह्माण्डाची रचना । तूं निर्मिली रघुनन्दना ।
जगव्यापका आत्मारामा । शोधितां ठायीं न पडे कोठे ॥ २१ ॥
तुझे स्वरुपाची व्हावी प्राप्ति । यालागीं कित्येक तप करिती ॥
कित्येक पंचाग्निधूम्रपान साधिती । तयांसी अंत न लागे तुझा ॥ २२ ॥
तेथें मी अज्ञान मूढमति । करु नेणें तुझी भक्ति ।
परी संतमुखें ऐकिली कीर्ति । शरणागतां उद्धरीं तूं ॥ २३ ॥
माझ्या भाग्यासी नाहीं मिती । तूं भेटलासी जगज्योति ।
आतां कळेल तैशा रीती । उद्धारगति करीं माझी ॥ २४ ॥
तुझे ब्रीदाचें महिमान । कित्येक उद्धरिले पापीजन । 
विरोधभक्तिने रावण । वैकुण्ठपदी पावविला ॥ २५ ॥
सात्त्विक भक्त थोर थोर । तुलसीदास कमाल कबीर ।
रामदास वायुकुमर । त्यांचा किंकर मज करीं ॥ २६ ॥
मी न मागे धनसंपत्ति । मज न लागे वैकुण्ठप्राप्ति ।
परी तुझ्या भक्तांची संगति । मज घडो सर्वदा ॥ २७ ॥
कोट्यनुकोटि जन्म घेईन । करीन तुझे पादसेवन ।
अवतारलीला मुखानें गाईन । ऐसें मज देई सर्वथा ॥ २८ ॥
तुझ्या अवतारलीला बहुत । व्यास बोलिले संस्कृत ।
तें अज्ञानासी न होय प्राप्त । यास्तव प्राकृत वर्णिलें ॥ २९ ॥
सद्गुरुनें निर्मिला हा ग्रन्थ । रामपाठ केवळ अमृत ।
श्रवणद्वारें पाजूनि यथार्थ । तृप्त केले भक्तजन ॥ ३० ॥
ज्यासि वैकुण्ठपदाची गोडी । त्यानें रामपाठ भजावा आवडी ।
त्याचें संकटीं घालून उडी । श्रीराम रक्षी निजांगें ॥ ३१ ॥
ज्ञानदेव करी हरिपाठ । ब्रह्मचैतन्य करी रामपाठ ।
भक्तजनें मानावे दोन्ही श्रेष्ठ । ग्रन्थ वरिष्ठ प्रभूचा ॥ ३२ ॥
मज कांहीं ज्ञान नसे किंचित । हृदयीं दाटला जानकीकान्त ।
त्याचा त्यानें लिहूनि ग्रन्थ । भक्तांसी अर्पिला प्रीतीनें ॥ ३३ ॥
॥ श्रीराम जयराम जय जय राम ॥
॥ श्रीगोंदवलेकर महाराज यांचा रामपाठ ॥
RamPatha 
रामपाठ



Custom Search

No comments:

Post a Comment