Friday, April 1, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 38 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अडतीसावा (३८) भाग १/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 38 
In this Adhyay 38, Charpatinath, incarnation of Pippalayan Narayan has taken birth. He was brought up by Satyashrava and his wife Chandra. Charpati has learned many Vidyas from his father Satyashrava. One day he was asked by Satyashrava to go to villager for performing some religious rights. Everything was done correctly by him however he was not happy for fees offered by the villager for doing the rights. He had a quarrel with him. When Satyashrava came to know about this he punished Charpati. Charpati left the house in sadness and went to Badrikedar. He was blessed by Dattaguru and was given Brahmgyana. After performing a rigorous tapa of 12 years, he was blessed by all the gods. Then he started his tirthayatra. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narhari family in the next 39th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अडतीसावा (३८) भाग १/२
श्रीगणेशाय नमः ॥
जयजयाजी व्यंकटरमणा । दयासागरा परिपूर्णा ।
भक्तदुःखभंजना । पुढें ग्रंथ बोलवीं ॥ १ ॥
मागिले अध्यायीं कथन । नागनाथा भेटला अत्रिनंदन ।
विद्याभ्यासें दीक्षाकारण । नाथपंथी मिरवला ॥ २ ॥
उपरी मच्छिंद्रासीं खेळूनि रळी । जिंकिला मच्छिंद्र तपोबळी ।
तंव सिद्ध उत्पन्न करुनि मंडळी । शाबरी विदया ओपिली ॥ ३ ॥
यावरी श्रोतीं पुंढें कथन । पूर्वीं दक्षगृहीं वार्ता जाण ।
निघालें विवाहयोजनालक्षण । मंगलकार्याचें तेधवां ॥ ४ ॥
हिमालयाची आत्मजा । ती योजिली मंगलकाजा ।
तेव्हां देव-दानव -मानवां भोजा । पाचारण पाठविलें ॥ ५ ॥
तेणेंकरुनि दक्षागार । भरोनि निघाला सुरवर ।
मानवी दक्ष हरि हर । सभास्थानीं बैसले ॥ ६ ॥
मंडळी ऐसी सर्वांसहित । बैसली असे पार्वती त्यांत ।
मंगलकला करुनि मंडपांत । मिरवत असे नोवरी ॥ ७ ॥
परी ते नोवरी स्वरुपखाणी । कीं चंद्रकला नक्षत्रगणीं ।
जाहली जैसी सौदामिनी । उजळपणा कराया ॥ ८ ॥
कीं सहस्त्र विद्दुल्लतांचा पाळा (समुदाय) । ऐक्यपणें झाला गोळा ।
सुरवरीं घनमंडळा । चमकपणीं शोभवी ॥ ९ ॥
कीं अर्क प्रत्यक्ष दीक्षाबाळ । सभासद मिरवे केवळ ।
तयाचें प्रतिबिंब व्योमीं जळ । ब्रह्मांडकुंडीं अर्क हा ॥ १० ॥
ऐसियापरी लावण्यलता । सभेंत मिरवे जगन्माता ।
तें स्वरुप देखूनि नाभिसुता । कामानळ दाटला ॥ ११ ॥
कामविरह चपळवंत । नेणे विचार समयोचित ।
स्थान सोडोनि इंद्रियांत । लिंगामाजी पातला ॥ १२ ॥
तैं विधीचा विरहकाम । अधीरपणीं द्रवला उत्तम ।
महीं प्राप्त होतां मनोधर्में । संकोचला विधि तो ॥ १३ ॥
बैसल्याठायींचि करुन । रेत रगडियेलें महीकारण । 
तैं आगळे साठ सहस्त्र पूर्ण । भाग झाले रेताचे ॥ १४ ॥
तैं सांठवली जीवदशा । रेतीं झाल्या अपार प्रवेशा ।
साठ सहस्त्र ऋषी वेषें । वालखिल्य भागीं मिरवले ॥ १५ ॥
परी एक आगळा होता भाग । तैसाचि राहिला तेथें चांग ।
सेवक झाडी महीअंग । केरसमानीं मिसळला ॥ १६ ॥
उपरी सरतां मंगळनेम । केला होता लज्जाहोम ।
केर आणि तयाचे भस्म । सेवक सांडिती सरितेंत ॥ १७ ॥
सरितेंत पडतां सकळ मेळ । सर्व रेताचा सांडूनि मळ ।
केर मग उगवोनि तळ । निर्मळपणीं वर्तला ॥ १८ ॥
मग तो जळीं ढळढळीत । तरुनि प्रवाहीं वाहत जात ।
तो वाहतां अकस्मात । कुशवेष्टनीं आतुडला ॥ १९ ॥
तैं जललहरीचे नेटेंकरुन । कुशवेष्टींत पडे जाऊन ।
तेथें लोटतां बहुत दिन । कुशमुळ्यांनीं वेष्टिला ॥ २० ॥
यापरी बहुतां दिवशीं । ईश्र्वरआज्ञा अवतारक्रमासी ।
पिप्पलायन त्या रेतासीं । नारायण संचरला ॥ २१ ॥
संचरला परी कैसे रीतीं । रोहिसावजें विपिनीं असती ।
तो मेळ त्या कुशवेष्टीप्रती । उदकपाना पातला ॥ २२ ॥
त्यांत रोहिणी ऋतुवंत । मूत्र स्रवली प्रत्यक्ष रक्त ।
तें भेदूनि वीर्यव्यक्त । रेत वाढी लागलें ॥ २३ ॥
कुशबेट गरम भुवन । तयामाजी हें सघन । 
वाढी लागतां स्वेदजविधान । कीटकन्यायेंकरुनियां ॥ २४ ॥
अंडज जारज स्वेदज प्रकरण । ऐसीं जीवां उत्पत्तिस्थानें । 
असो या विधानेंकरुन । मूर्ति रचिली नवमास ॥ २५ ॥
देह वाढतां सबळवंत । कुशमूळ झालें त्रुटित ।
मग ढाळपणीं महीवरती । बाळ दृष्टीसी तें आलें ॥ २६ ॥
तों त्या ठायीं अकस्मात । सत्यश्रवा विप्र भागीरथींत । 
येवोनियां दर्भांनिमित्त । कुशवेष्टीं विलोकी ॥ २७ ॥
तो विप्र असे परम सुशीळ । पुनीतग्रामीं तयाचें स्थळ ।
तेथें येतां दृष्टीं बाळ । पाहिलेंसे तेधवां ॥ २८ ॥
देखिलें परी दैदीप्यमान । अर्कतेजें परम सगुण ।
कीं प्रत्यक्ष चंद्रकळा जिंकोन । आणिता झाला त्या ठायीं ॥ २९ ॥
कीं अनंत मस्तकींचा मणी । विसरुनि गेला ते स्थानीं ।
ऐसें भासलें विप्रा मनीं । अति तेजस्वी चकचकाटें ॥ ३० ॥
चित्तीं म्हणे हें बाळ । कोणाचें आहे तेजःपुंजाळ ।
उर्वशी उदरकमळ । टाकूनियां गेली असे ॥ ३१ ॥
कीं राजबीज मनमोहन । जळदेवतीं दृष्टीं पाहून ।
आणिलें मातेच्या शेजेहून । आपुले स्थानीं न्यावया ॥ ३२ ॥
तरी याची पुनः माता । येऊनि भेटेल कधीं आतां ।
परी प्रेमरहित लोभ ममता । टाकूनि ती गेलीसे ॥ ३३ ॥
ऐसा तर्कवितर्क करीत । परी तो बाळा न लावी हस्त ।
कैसें न्यावें म्हणोनि मनांत । पुढील अर्थ दिसेना ॥ ३४ ॥
अति वितर्कें भेदलें मन । परी मोहें वेष्टिले पंच प्राण ।
चित्तीं म्हणे कैसें सोडून । बाळालागीं जावें हो ॥ ३५ ॥
अरण्य कर्कश तीर भागीरथी । सावजें येती उदकाप्रती ।
दृष्टि पडतां तयाचि क्षितीं । घात करितील बाळकाचा ॥ ३६ ॥
ऐसें प्रकरणीं शंकित मानस । बाळानिकट उभा असे ।
परी स्वर्गींचे देव असती डोळस । देखते झाले तयासी ॥ ३८ ॥
बाळक करीतसे रुदन । हस्तपादांतें नाचवून ।
तें स्वर्गीं सुरवर पाहून । नमन करिती भावानें ॥ ३९ ॥
म्हणती हा पिप्पलायन नारायण । आजि देखियले तयाचे चरण ।
तरी आजिचा दिन परम सुदिन । कृतकृत्य झालों कीं ॥ ४० ॥
मग सर्वत्र करुनि जयजयकार । वर्षिते झाले कुसुमभार ।
कुशवेष्टींत कुसुमें अपार । खचूनियां पडियेलीं ॥ ४१ ॥
विप्र बाळाच्या अंगावरुनी । कुसुमें अपरिमित काढूनी । 
टाकी जरी कुसुमांलागोनी । परी न सरे म्हणोनि दचकला ॥ ४२ ॥
चित्तीं म्हणे कैंचें बाळप्रकरण । पिशाचकरणी येते दिसोन ।
अकस्मात येऊनि कुसुमघन । कोणीकडून वर्षती ॥ ४३ ॥
ऐसा भयस्थित होऊनि चित्तीं । पळूं लागला नगरवाटीं । 
कैंचे दर्भ चरणसंपुटीं । अति कवळूनि पळतसे ॥ ४४ ॥
तें पाहूनि सुर समस्तीं । गदगदां हास्य करिती ।
सत्यश्रव्यासी पळतां म्हणती । उभा उभा पळूं नको ॥ ४५ ॥
ते सत्यश्रवें शब्द ऐकोन । परम घाबरला पडे उलथून ।
चित्तीं म्हणे पिशाच येऊन । भक्षावया धांवलें ॥ ४६ ॥
ढळढळीत भरले दोन प्रहर । खेळों निघालें महीवर ।
कैंचे बाळक प्राणहर । पिशाचकृत्यें मिरवला ॥ ४७ ॥
ऐशा वितर्ककल्पना आणूनी । पळत आहे श्र्वास सांडुनी ।
पडतां महींतें उलथुनी । पुनः उठोनी पळतसे ॥ ४८ ॥
सुरवर उभा उभा म्हणती । तों त्यातें न दिसे क्षितीं ।
परी शब्द सुस्वर होती । पिशाच सत्य हें आहे ॥ ४९ ॥
मग स्वर्गस्थ सुरवर शब्द सोडुनी । नारदातें बोलती वचनीं ।
स्वामी तुम्हीं जाऊनी । सत्यश्रव्यातें सुचवावें ॥ ५० ॥
हा परम भ्याड ब्राह्मण । सत्यवादी परी करी पलायन । 
तरी त्याचा संशय छेदून । टाकूनि बाळ त्या देइंजे ॥ ५१ ॥
ऐसें सुरवर कमलोद्भवसुता (ब्रह्नदेवपुत्र नारदास) । बोलतांचि महाराज होय निघता ।
ब्रह्मवीणा घेऊनि हाता । महीवरती उतरला ॥ ५२ ॥
आपुले स्वरुपाचा लोप करुन । मानववेषी दिव्य ब्राह्मण ।
सत्यश्रव्याचे पुढें जाऊन । उभा राहे मार्गांत तो ॥ ५३ ॥
सत्यश्रवा भयभीत । मार्गीं पळतां श्र्वास सांडीत ।
पडत पडत मुनी जेथ । येवोनि तेथें पोहोंचला ॥ ५४ ॥
प्राण झाला कासावीस । मुखीं न निघे श्र्वासोश्र्वास ।
तें पाहूनि नारद त्यास । बोलता झाला महाराजा ॥ ५५ ॥
म्हणे महाराजा किमर्थीं । घाबरलासी काय पंथीं ।
येरु म्हणे प्राणाहुती । आजि झाली होती कीं ॥ ५६ ॥
दर्भांनिमित्त गेलों सरितेतीरा । पिशाचकळा तेथें पाहिली चतुरा ।
बाळवेषें मी मोहिलों विप्रा । मीचि म्हणोनि टिकलों कीं ॥ ५७ ॥
टिकलों परी अकस्मात । अपार कुसुमें तेथें पडत ।
तें पाहूनियां भयभीत । होऊनियां पळालों ॥ ५८ ॥
पळालों परी मागाहून । अपार शब्दें पिशाचगण येऊन ।
उभा रहा ऐसें म्हणोन । वारंवार ऐकितों मी ॥ ५९ ॥                             
परी मी न पाहें मागें । पडत झडत आलों लगबगें ।
ऐसी कथा सांगोपांगें । झाली असे मज विप्रा ॥ ६० ॥
मग नारद धरुनि त्याचा हात । तरुखालतें नेऊनि त्वरित ।
बैसवूनि त्या स्वस्थचित्त । वृत्तांतातें सांगतसे ॥ ६१ ॥
म्हणे विप्रा ऐक वचन । तूं होतासी कुशबेटाकारण । 
तेव्हां तुज म्यां विलोकून । ऊर्ध्वदृष्टीं पाहिलें ॥ ६२ ॥
पाहिलें परी अंबरांत । मज दृष्टी पडलीं सुरवर दैवतें ।
त्यांनीं कुसुमें घेऊनि हातांत । तुजवरी झोंकिलीं ॥ ६३ ॥
झोंकिलीं याचें कारण । तुज बोलाविलें नामाभिधानें ।
येरी म्हणे माझेंचि नाम । सत्यश्रवा म्हणताती ॥ ६४ ॥
नारद म्हणे असो कैसें । सत्यश्रवा नाम तुज वसे ।
म्हणोनि पुकारीत होते देव तैसें । भूतचेष्टा नसे बा ॥ ६५ ॥
तरी सत्यश्रवा तुझें नाम । कोठें आहे तुझें धाम ।
नाहीं ठाऊक आम्हां ग्राम । कोण आहे सांग पां ॥ ६६ ॥
असो इतुकें त्यासी विचारुन । पुढें बोलला एक वचन ।
बाळालागीं सदनीं नेऊन । करीं पाळण प्रीतीनें ॥ ६७ ॥
ऐसें बोलूनि आणिक बोलले । कीं हे बाळक ब्रह्मठेलें । 
पिप्पलायन नारायण जन्मले । अवतार प्रकट जाहला ॥ ६८ ॥
तरी सकळ संशय सांडून । बाळ नेईं सदनालागून । 
याचें करितां संगोपन । सकळ सिद्धि साधती ॥ ६९ ॥
ऐसें सुरवरांचें बोलणें । विप्रा म्यां येथूनि ऐकिलें कानें ।
असत्य मानूं नको जाणें । देव सर्वही बोलती ॥ ७० ॥
सत्यश्रवा विचारी मानसीं । स्वर्गांत मम नाम काय माहितीसी । 
हाचि संशय धरुनि चित्तासी । क्षण एक तिष्ठतसे ॥ ७१ ॥
करुनिं पाहे ऊर्ध्व दृष्टी । तों देखिली अपार देवथाटी (देवसमुह) ।
परी नारदकृपेची सर्व हातवटी । देव दृष्टी पडियेले ॥ ७२ ॥
मग नारदबोलें तुकवी मान । म्हणे विप्रा बोलसी सत्य वचन ।
माझे दृष्टी सुरवरगण । येथोनियां दिसती पैं ॥ ७३ ॥
तरी विप्रा ऐक सत्य वचन । येईं माझ्या समागमेंकरुन ।
कुशवेष्टींतील बाळ उचलोन । मम करीं ओपीं कां ॥ ७४ ॥
ऐसे बोल ऐकतां । अवश्य म्हणे संवत्सरपिता ।
मग नेऊनि सत्यश्रव्याचे हाता । बाळकाकारणें ओपिलें ॥ ७५ ॥
सत्यश्रव्यातें नारदें ओपूनि बाळ । तेणें योगें मन सुढाळ । 
पोटीं आनंद भरोनि सबळ । बाळ हृदयीं कवळीतसे ॥ ७६ ॥
बाळ ओपूनि नारदमुनी । बोलता झाला तयालागुनी ।
सत्यश्रव्या बाळ नामीं । चरपट ऐसें पाचारीं ॥ ७७ ॥
चरपटनामी बाळ गुणी । सुरवर बोलिले आहेत वाणी ।
ती ऐकिली निजश्रवणीं । तरी हेंचि नाम ठेवीं कां ॥ ७८ ॥
अवश्य म्हणोनि सत्यश्रवा । येता झाला निकट आपुल्या गांवा ।
येरीकडे नारद देवां । स्वर्गीं जाऊनि संचरला ॥ ७९ ॥
सांगतां सकळ देवां वृत्तान्त । स्थाना गेले देव समस्त । 
येरीकडे स्वसदनांत । सत्यश्रवा संचरला ॥ ८० ॥
गृहीं कांता चंद्रानामी । अति लावण्य धार्मिक लक्ष्मी ।
पतिव्रता ती अपारनेमी । कीं ती अनसूया दूसरी ॥ ८१ ॥
तिचे निकट सत्यश्रवा । उभा राहूनि बोले बरवा ।
म्हणे कामिनी दर्भ मिळावा । गेलों होतों काननीं ॥ ८२ ॥
तेथें अवचट लाभ झाला । सुत तूतें दैवें दिधला ।
तरी पालन करुनि नाम याला । चरपट ऐसें पाचारीं ॥ ८३ ॥
तयाच्या योगेंकरुन । सुरवरांचे पाहिले चरण ।
मग मुळापासूनि सकळ कथन । कांतेपाशीं वदला तो ॥ ८४ ॥चि
कांता ऐकूनि वर्तमान । तुकवीतसे आनंदे मान ।
म्हणे दर्भभावें सेवितां विपिन । वंशलता सांपडली ॥ ८५ ॥
कीं खापर वेंचूं जातां अवनीं । तों सांपडला चिंतामणी ।
तेवीं तुम्हां दैवेंकरुनी । बाळ लाभलें महाराजा ॥ ८६ ॥
कीं भूत पूजावया मसणवटीं । जातां लक्ष्मी भेटे वाटीं ।
तेवीं तुम्हां काननपुटीं । बाळलाभ झाला असे ॥ ८७ ॥ 
कीं दगड उलथायाचे मिषें । दैवें लाभला चोख परीस ।
तेवीं तुम्हां लाभ सुरस । बाळलाभ झाला असे ॥ ८८ ॥
कीं सहज मर्कट धरुं जातां । गांठ पडली हनुमंता ।
तेवीं तुम्हां दर्भभावार्था । बाळलाभ झाला असे ॥ ८९ ॥  
ऐसें म्हणोनि चंद्रा नारी । बाळ हृदयीं कवळी करीं ।
परी अति स्नेहचित्तसमुद्रीं । आनंद लहरी उठवीत ॥ ९० ॥
जैसा दरिद्री पिशुन वनांत । निजे परी मांदुस सांपडे त्यांत । 
मगआनंद तयाचे हृदयांत । कवण अर्थीं वर्णिला ॥ ९१ ॥
तेवीं वाढोनि आनंदलहरी । बाळा आलिंगीं चंद्रा नारी ।
मग स्नान पान पयोधरीं । करुनि पालखातें हालवीतसे ॥ ९२ ॥
चरपट ऐसें बोलूनि नाम । गीत गातसे साधूसम । 
ऐसें सलील दावूनि प्रेम । अपार दिवस लोटले ॥ ९३ ॥
सप्त वर्षेंपर्यंत । पालन केलें कालस्थित । 
उपरी मौंजीबंधन त्यांत । अति गजरें केलें असे ॥ ९४ ॥
मग करवूनि वेदाध्ययन । शास्त्र विद्येंत केलें निपुण ।
मीमांसादि सकळ व्याकरण । न्यायशास्त्र पढविलें ॥ ९५ ॥
यावरी कोणे एके दिवशीं । गमन करितां देवऋषी ।
सहज येत पुनीतग्रामासी । स्मरण झालें नाथाचें ॥ ९६ ॥
मग आगंतुकाचा वेष धरुन । पाहे सत्यश्रव्याचा आश्रम ।
तों द्वादश वर्षांचा चरपट नाम । महातेजस्वी दिसतसे ॥ ९७ ॥
मग विप्रवेषें ते गृहभक्ती । सारुनि पाहिली चरपटमूर्ती ।
तों सुगम विद्येची दैदीप्यशक्ती । तया देहीं देखिली ॥ ९८ ॥   
ब्रह्मरेतोदयप्राणी । म्हणोनि बंधुत्व नारदमुनी ।
त्या मोहानें सकळ करणी । चरपटाची देखिली ॥ ९९ ॥
परम तोष मानूनि चित्तीं । जात बद्रिकाश्रमाप्रती ।
तों आत्रेय आणि मच्छिंद्रजती । निजदृष्टीं देखिले ॥ १०० ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 38  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अडतीसावा (३८) 


Custom Search

No comments:

Post a Comment