Friday, April 1, 2016

Shree Navanath Bhaktisar Adhyay 38 Part 2/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अडतीसावा (३८) भाग २/२


Shree Navanath Bhaktisar Adhyay 38 
In this Adhyay 38, Charpatinath, incarnation of Pippalayan Narayan has taken birth. He was brought up by Satyashrava and his wife Chandra. Charpati has learned many Vidyas from his father Satyashrava. One day he was asked by Satyashrava to go to villager for performing some religious rights. Everything was done correctly by him however he was not happy for fees offered by the villager for doing the rights. He had a quarrel with him. When Satyashrava came to know about this he punished Charpati. Charpati left the house in sadness and went to Badrikedar. He was blessed by Dattaguru and was given Brahmgyana. After performing a rigorous tapa of 12 years, he was blessed by all the gods. Then he started his tirthayatra. What happens next will be told to us by Dhundisut Malu from Narhari family in the next 39th Adhyay.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अडतीसावा (३८) भाग २/२
मग भावेंकरुनि तये वेळां । उभयतांसी जाऊनि भेटला ।
त्यांतें पाहूनि लोट लोटला । चित्तसरितीं प्रेमाचा ॥ १०१ ॥
निकट बैसूनि तयांचे पंगतीं । परी एकाग्रीं मिळाल्या चतुर्थशक्ती ।
मच्छिंद्रनाथ अपर्णापती । दत्तात्रेय चतुर्थ तो ॥ १०२ ॥   
परी हे चौघेही एकाभ्यासी । दीक्षावंत पूर्ण संन्यासी ।
वैष्णवनामीं भागवतदेशीं । प्रतापार्क तयांचा ॥ १०३ ॥
कीं निधी परीस चिंतामणी । कीं चौथा कौस्तुभ वैडूर्यखाणी ।
ऐसे चौघेही एकासनीं । विराजले एकदां ते ॥ १०४ ॥
वार्तालता अपरिमित । तों चरपटवार्ता विधिसुत ।
मूळापासूनि पूर्ण कथीत । त्रिवर्गांत सांगितली ॥ १०५ ॥
वार्ता ऐकतां आदिनाथ । श्रीदत्तात्रेया बोलत ।
कीं तुम्हीं नवनारायणांत । सनाथ करुं इच्छिलें ॥ १०६ ॥   
तो पिप्पलायन नारायण । अवतार मिरवला चरपटनाम ।
तया आतां सनाथ करुन कल्याणरुपीं मिरवाल ॥ १०७ ॥
ऐसें बोलतां उमारमण । बोलता झाला अत्रिनंदन ।
कीं महाराजा पश्र्चात्तापाविण । हितप्राप्ती मिळेना ॥ १०८ ॥
तरी चरपटातें पश्र्चात्तापें । मानला नाहीं जंववरी बापें । 
तंववरी अनुग्रहलोपें । माझ्यावरी मिरवतसे ॥ १०९ ॥
यावरी बोले नारदमुनी । हे अवधूता बोलसी वाणी ।
तरी चरपटाचे अंतःकरणीं । पश्र्चात्ताप मिरवितों ॥ ११० ॥
परी तुम्ही जीवासम भावें । चरपटभागीं मिरवा सदय ।
तों पश्र्चात्तापउदय । चरपटदेहीं करितों मी ॥ १११ ॥
ऐसें बोलूनि अवधूताप्रती । पाहिली शीघ्र पुनीतग्रामक्षिती ।
पवित्र होऊनि विद्यार्थी । सत्यश्रव्यातें भेटला ॥ ११२ ॥
म्हणे महाराजा गुरुवर्या । मी विद्यार्थी विद्याकार्या ।
तरी मजवरी करुनि दया । विद्यारत्न ओपावें ॥ ११३ ॥
मग अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण । अभ्यासविद्येकारणें ।
कुलंब ऐसें स्वदेहा नामानें । सत्यश्रव्या वदलासे ॥ ११४ ॥
कुलंब नामें नारदमुनी । आणि चरपट नामेंकरोनी ।
उभयतां बैसूनि एकासनीं । अभ्यास करितीसद्विद्या ॥ ११५ ॥
परी कोठेंही न लागे ठिकाण । तों अवसर आला दैवेंकरुन ।
तया ग्रामीं एक यजमान । पाचारावया पातला ॥ ११६ ॥
तयाचे गृहीं प्रयोजन । करणें होतें ओंटीभरण ।
तो ग्रामजोशी म्हणोन । पाचारावया पातला ॥ ११७ ॥
पातला परी सत्यश्रवा । बैसला होता अर्चीत देवा ।
मग चरपटा सांगूनि मनोभावा । नारदासह पाठविलें ॥ ११८ ॥
चरपट जाऊनि तयाचे धामीं । विधी उरकिला मनोधर्मीं ।
उपरी यजमान दक्षिणापाणी । येता झाला महाराजा ॥ ११९ ॥
नारदें पाहूनियां संधी । स्मरण झालें पूर्वविधी । 
चरपटमनीं कलह नव्हता कधीं । परी नारदें योजिला ॥ १२० ॥
बैसले होते कार्यालागुनी । तो नारद बोले चरपटासी वाणी । 
दक्षिणा न घेतां तूं गुणी । योगपुरुषा योगज्ञाना ॥ १२१ ॥        
जरी तूं दक्षिणा हातीं घेसी । तरी योग्य न वाटे आम्हांसी ।
आपण उभयतां अज्ञान विद्यार्थी । भागाभाग समजेना ॥ १२२ ॥
तरी उगलाचि चाल चरपटा उठोनी । सत्यश्रवा येईल तव दक्षिणा घेऊनि । 
चरपट म्हणे रिक्तहस्तेंकरोनी । कैसें जावें सदनासी ॥ १२३ ॥
नारद म्हणे तूं दक्षिणा घेसी । परी अमान्य होईल तव पित्यासी ।
येरु म्हणे कसरतेसी । करुनि दक्षिणा घेईन मी ॥ १२४ ॥
कसरत करुनि सवाई पाडें । द्रव्य ठेवितां तातापुढें । 
मग तो काय बोलेल वांकुडें । भलेपणा दावील कीं ॥ १२५ ॥
ऐसें उभयतांचें झालें भाषण । तों यजमान आला दक्षिणा घेऊन ।
चरपटाहातीं देत भिजवून । अल्प दक्षिणा पहातसे ॥ १२६ ॥
तों ती दक्षिणा अति सान । नव्हती उभयतांच्या स्वरुपाप्रमाण ।
तेणेंकरुनि चरपट मनें । खिन्न झाला धार्मिक तो ॥ १२७ ॥
आधींच नारदें कळ लावूनी । ठेविली होती अंतःकरणीं ।
त्यावरी लघु दक्षिणा पाहूनी । कोप अत्यंत पावला ॥ १२८ ॥
नारदें भाषणापूर्वींच बीज । पेरुनि ठेविलें होतें सहज ।
कोपतरु फळविराज । कलह उत्पन्न झाला पैं ॥ १२९ ॥
मग बोलता झाला यजमानासी । म्हणे तुम्हीं ओळखिलें नाहीं आम्हांसी ।
कवण कार्य कवण याचकासी । द्यावें कैसें कळेना ॥ १३० ॥
यजमान म्हणे ऐक भटा । याचका पैका द्यावा मोठा ।
परी दाता असेल करंटा । मग याचकें काय करणें ॥ १३१ ॥
येरी म्हणे सामर्थ्य असतां । तरी प्रवर्तावें कार्यार्था ।
ऐसेपरी बोलतां । उभयतां कलह अपार वाढे ॥ १३२ ॥
नारद तेथोनि निघोनी । सत्यश्रवा विप्रसजवळी येऊनी ।
म्हणे दुखविला यजमान गुणी । धडगत मज दिसेना ॥ १३३ ॥
असंतुष्ट द्विज नष्ट । ऐसें बोलती सर्व वरिष्ठ । 
तरी चरपटानें केलें भ्रष्ट । यजमानकृत्य सर्वस्वीं ॥ १३४ ॥
आपण याचक संतुष्टवृत्ती । सदा असावें गौरवयुक्तीं । 
आर्जव केलिया कार्यें घडती । न घडतींचि महाराजा ॥ १३५ ॥
ऐसें बोलतां नारदमुनी । कोप चढला सत्यश्रव्यालागुनी । 
तत्काळ देवार्चन सोडोनी । यजमानगृहीं पातला ॥ १३६ ॥
तों यजमान आणि सुत । बोलबोली ऐकिली समस्त । 
तेंही पाहूनि साक्षिवंत । अति कोप वाढला ॥ १३७ ॥
जैसा आधींच वैश्र्वानर । त्यावरी सिंचिलें स्नेह अपार ।
कीं उन्मत्त झालिया पान मंदिर । त्यावरी संचार भूताचा ॥ १३८ ॥
त्याचि न्यायें सत्यश्रवा । कोपानळीं चढला बरवा ।
येतांचि चरपटमुखीं रवा (फटका) । करपुटानें काढीतसे ॥ १३९ ॥
ताडन होतां मुखावरती । चरपटही पडला क्रोधाहुतीं ।
आंधीचि बोलतां यजमानाप्रती । क्रोधोदकें भिजलासे ॥ १४० ॥
त्यावरी चरपटनेत्रीं । क्रोधाचे पूर लोटती ।
मग सर्व त्यागूनि क्रोधें जल्पत । गांवाबाहेरी निघाला ॥ १४१ ॥
गांवाबाहेर भगवतीदुर्ग । जाऊनि बैसला गुप्तमार्ग ।
पश्र्चात्तापें झाला योग । मनामाजी दाटेना ॥ १४२ ॥
येरीकडे नारदमुनी । अंतरसाक्षी सर्व जाणुनी ।
दिव्यभव्य विप्र प्राज्ञी । वेष द्वितीय नटलासे ॥ १४३ ॥
होऊनि दिव्य ब्राह्मण । दुर्गालयीं आला दर्शना म्हणोन ।
भगवतीतें नमस्कारुन । चरपटासमीप बैसला ॥ १४४ ॥
म्हणे कोण जी कां हो येथ । बैसले आहां चिंतास्थित ।
येरु ऐकूनि सकळ वृत्तान्त । तयापाशीं निवेदी ॥ १४५ ॥
ऐकूनि चरपटाचें वचन । म्हणे पिसाट झाला ब्राह्मण ।
ऐशा क्रोधें पुत्रालागून । दुखविलें वृद्धानें ॥ १४६ ॥
आपुले चरणींचे चरणसंपुट । पुत्रापायीं येतां नीट ।
मग पुत्रमर्यादा रक्षूनि चोखट । माहात्म्य आपुलें रक्षावें ॥ १४७ ॥
ऐशी चाल जगतांत । प्रसिद्धपणीं आहे वर्तत । 
तरी मतिमंद तो वृद्ध निश्र्चित । बुद्धिभ्रष्ट म्हणावा ॥ १४८ ॥
तरी ऐशियाचा संग त्यजून । तूं सेवावें महाकानन ।
परतोनि त्याच्या वदना वदन । दावूं नये पुत्राने ॥ १४९ ॥
ऐसें बोलतां नारदमुनी । चरपटा क्रोध अधिक मनीं ।
दाटला पश्र्चात्तापेंकरुनी । अधिकोत्तर नेटका ॥ १५० ॥
मग त्या विप्रालागीं बोलत । म्हणे मम गृहीं जाऊनि गुप्त ।
कुलंब नामें विप्र यथार्थ । पाचारुनि आणावा ॥ १५१ ॥
त्यातें घेऊनि स्वसंगतीं । आम्ही जाऊं विदेशाप्रती ।
पाहूनि सबळ सद्गुणमूर्ती । विद्या सकळ अभ्यासूं ॥ १५२ ॥
अवश्य म्हणोनि तो ब्राह्मण । भगवतीदुर्गाबाहेर येऊन ।
त्या स्वरुपा लोप करुन । कुलंबवेषें नटलासे ॥ १५३ ॥
पुन्हां त्यापाशीं शीघ्र येऊन । केली चरपटालागीं देखण ।
म्हणे पिसाट झाला तो ब्राह्मण । हिताहित कळेना ॥ १५४ ॥
तरी ऐसिया क्रोधापासीं । आम्ही न राहूं निश्र्चयेंसीं ।
तरी आणिक गुरु पाहूनि महीसी । विद्येलागीं अभ्यासूं ॥ १५५ ॥
ऐसें बोलतां कुलंब वचन । अधिकोत्तर चरपटमन ।
पश्र्चात्ताप दाटून । कुलंबचित्तीं मिरवला ॥ १५६ ॥
म्हणे सख्या अन्य क्षेत्रासी । आपण राहूनि उभयतांसी ।
दोघे एकचि मार्गासी । वर्तणुकीं राहूंया ॥ १५७ ॥
करुं एकचित्तें आपणास । पडणार नाहीं दुःखलेश । 
गुरु संपादूनि निःशेष । विद्येलागीं अभ्यासूं ॥ १५८ ॥
ऐसें बोलता चरपटासी । अवश्य म्हणे विधिसुत त्यासी ।
तत्काळ सांडूनियां नगरासी । मुनिराज ऊठला ॥ १५९ ॥
मग चरपट आणि नारदमुनी । उभयतां चालिले मार्ग लक्षूनी ।
पांच कोश लंघितां अवनी । नारद बोले तयातें ॥ १६० ॥
म्हणे सखया ऐक वचन । आपण पाहूं बद्रिकाश्रम । 
श्रीबद्रिकेदारा नमून । काशीक्षेत्रीं मग जाऊं ॥ १६१ ॥
तये क्षेत्रीं विद्यावंत । विप्र आहेत अपरिमित । 
कोणी आवडेल जो चित्तांत । विद्या त्यापाशीं अभ्यासूं ॥ १६२ ॥
ऐसें बोलतां कुलंब चरपटाप्रत । अवश्य म्हणे विप्रपुत्र ।
मार्ग धरुनि बद्रिकाश्रमातें । पहावया चालिले ॥ १६३ ॥
मार्गीं करुनि भिक्षाटन । पाहते झाले बद्रिकाश्रम ।
केदारेश्र्वर देवालयांत जाऊन । बद्रिकेदार नमियेला ॥ १६४ ॥
नमितां उभयीं श्रीकेदार समर्थ । तों प्रकट झाले मच्छिंद्र दत्त ।
तें पाहूनि विधिसुत । तयांपासीं पातले ॥ १६५ ॥
दत्तचरणीं ठेवूनि माथा । आणिक नमी मच्छिंद्रनाथा ।
तें पाहूनि चरपटी तत्त्वतां । तोही वंदी उभयतांसी ॥ १६६ ॥
चरपटें उभयतां करुनि नमन । पुसतसे तो कुलंबाकारण ।
म्हणे महाराजा हे कोण । उभयतां असती पैं  ॥ १६७ ॥
नारद म्हणे ओळखीं नयनीं । अत्रिसुत हा दत्तात्रेय मुनी ।
आणि मच्छिंद्र जती ऐकसी कानीं । तोचि असे हा ब्राह्मणा ॥ १६८ ॥
यानंतर मी देवऋषी । नारद म्हणती या देहासी ।
तव कार्यार्थ कुलंबवेषीं । मानवदेहीं नटलों मी ॥ १६९ ॥
ऐसें ऐकतां चरपट वचन । कुलंबचरणीं माथा ठेवून ।
म्हणे महाराजा स्वरुप दावून । सनाथ करीं मज आतां ॥ १७० ॥
नारद म्हणे ऐक वचन । आम्ही स्वरुप दावूं त्रिवर्ग जाण ।
परी बा गुरुप्रसादाविण । न देखवे गा तुजलागीं ॥ १७१ ॥
तरी गुरुप्रसादमंत्र कानीं । रिघावा होतांचि ध्यानीं ।
मग आगीच काय दिसती त्रिभुवनीं । ब्रह्मस्वरुप होशील तूं ॥ १७२ ॥
यावरी बोले चरपटनाथ । कोणता पाहूं गुरु येथ ।
तुम्हांपेक्षां प्रतिष्ठावंत । भुवनत्रयीं असेना ॥ १७३ ॥
तरी मज अनुग्रह द्यावा येथें । करावें स्वस्वरुपीं सनाथ मातें ।
नारद म्हणे दत्तात्रेयातें । कारण आपुलें संपादा ॥ १७४ ॥
ऐसें बोलतां नारदमुनी । श्रीदत्तात्रेय कृपा करुनी ।
ठेविता झाला वरदपाणी । चरपटमौळीं तेधवां ॥ १७५ ॥
संकल्पित स्थित तनु मन । कायावाचा जीवित्वप्राण ।
चित्त बुद्धि अंतःकरण । घेतलें गोवूनि संकल्पीं ॥ १७६ ॥
मग वरदहस्त ठेवूनि मौळीं । कर्णीं ओपिली मंत्रावळी ।
ओपितांचि अज्ञानकाजळी । फिटूनि गेली तत्काळ ॥ १७७ ॥
ब्रह्मदर्शनखुणा व्यक्त । होतांचि देखिलें सत्तत्त्व तेथ ।
लखलखीत तेज अद्भुत । मित्रापरी भासलें ॥ १७८ ॥
कीं औदुंबरींचा ठाव सांडून । देव मिरवती पृथ्वीवरुन ।
तेवीं विधिपुत्र वसुनंदन । तेजेंकरुन गहिंवरले ॥ १७९ ॥
मग चरपटें पाहूनि तेजोसविता । त्रिवर्गा चरणीं ठेविला माथा ।
तो अवसर पाहूनि तत्त्वतां । उमाकांत प्रकटला ॥ १८० ॥
प्रकट होतां अपर्णापती । चरपटा सांगे मच्छिंद्रजती ।
दशकर (श्रीशंकर) नमीं कां कृपामूर्ती । भेटावया आलासे ॥ १८१ ॥
ऐसें ऐकतां चरपटनाथ । शिवा नमीतसे आनंदभरित ।
मग दशकरें कवळूनि हृदयांत । मुखालागीं कुरवाळी ॥ १८२ ॥
कुरवाळूनि म्हणे अत्रिसुता । विद्या सांगावी चरपटनाथा ।
नवांच्या गणीं करुनि सरता । नाथपंथीं मिरवीं कां ॥ १८३ ॥
अवश्य म्हणोनि अत्रिसुत । चरपटासी विद्या अभ्यासीत ।
सकळ शास्त्रीं झाला ज्ञात । उपरी तपा बैसविला ॥ १८४ ॥
मग नागपत्रीं अश्र्वत्थीं जाऊन । द्वादश वर्षें वीरसाधन ।  
नऊ कोटी सात लक्ष रत्न । शाबरी कवित्व पैं केलें ॥ १८५ ॥
यापरी मंत्रविद्या करुन । मेळविले सुरवर मंडण । 
स्वर्गदेवता तोषवून । विद्यावरु घेतला ॥ १८६ ॥
मग श्रीगुरु अत्रिसुत । सेविता झाला गिरनारपर्वत ।
येरीकडे चरपटनाथ । तीर्थावळी चालिला ॥ १८७ ॥
श्रीरामेश्र्वर गोकर्ण महाबळेश्र्वर । जगन्नाथ हरिहरेश्र्वर ।
काशी मणिकर्णिका विश्र्वेश्र्वर । तीर्थें सेवीत चालिला ॥ १८८ ॥
तीर्थें करितां अपरिमित । सच्छिष्य नव झाले त्यांत । 
ते नवशिष्य प्रख्यातवंत । सिद्धकळा जाणती ॥ १८९ ॥
राघवसिद्ध बाळसिद्ध । गोकाटसिद्ध जाबुसिद्ध । 
नैमित्यक सारेंद्रक हुक्ष प्रसिद्ध । द्वारभैरव रणसिद्ध तो ॥ १९० ॥
ऐसे चरपटाचे नवसिद्ध वर्ण । शाबरी विद्येंत असती पूर्ण । 
चौर्‍यायशीं सिद्ध नवांपासून । उदयवंत पावले ॥ १९१ ॥
जोगी शारंगी निजानंद । नैननिरंजन यदु प्रसिद्ध ।
गैवनक्षुद्र कास्त सिद्ध । रेवणनाथाचे असती पैं ॥ १९२ ॥
उरेश सुरेश धुरेश कुहर । केशमर्दन सुद्धकपूर ।
भतेंद्र आणि कटभ्रवा साबर । हे नव सिद्ध भर्तरीनाथाचे ॥ १९३ ॥
दक्षेंद्र आणि अनिर्वा अपरोक्ष । कामुकार्णव सहनसिद्ध प्रसिद्ध ।
दक्षलायन देवसिद्ध । पाक्षेंद्र साक्ष मच्छिंद्राचे सिद्ध हे ॥ १९४ ॥
निर्णयार्णव हरदंतान । भोमान हुक्षे कृष्णपलायन ।
हेमा क्षेत्रांत रत्नागर नाम । गोरक्षाचे हे असती ॥ १९५ ॥
विनयभास्कर दत्तधात । पवनभार्गव सुक्षार्णव यथार्थ । 
कविटशर्वा वधम प्रोक्षित । नव जालिंदराचे हे असती ॥ १९६ ॥
शारुक वालुक शरभ सहन । प्रोक्षितशैर्भ कोकिल नाम ।
कास्मितवाच संपति नवही पूर्ण । कान्हिपाचे हे असती ॥ १९७ ॥
यापरी चौरंगीचे सहा सिद्ध । लोभ भ्रातरक चिरकालवृदं । 
नारायण काळिका साव्रजी प्रसिद्ध । चौरंगीचे असती पैं ॥ १९८ ॥
मीननाथ अडभंगीनाथ । यांचे सहा सिद्ध सिद्धिवंत ।
सुलक्षा लुक्ष मोक्षार्णव समर्थ । द्वार भद्राक्ष सहावा ॥ १९९ ॥
एकूण चौर्यायशीं सिद्धांचा झाडा पूर्ण । ग्रंथीं वदला धुंडीनंदन ।
मालू नरहरीचा वंशिक पूर्ण । सेवक असे संतांचा ॥ २०० ॥
स्वस्ति श्रीभक्तिकथासार । संमत गोरक्षकाव्य किमयागार ।
सदा परिसोत भाविक चतुर । अष्टत्रिंशतितमाध्याय गोड हा ॥ २०१ ॥
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥ 
॥ श्रीनवनाथभक्तिसार अष्टत्रिंशतितमाध्याय संपूर्ण ॥
Shree Navanath Bhaktisar Adhyay 38  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय अडतीसावा (३८) 


Custom Search

No comments:

Post a Comment