Sunday, April 3, 2016

Shree Navnath Bhaktisar Adhyay 39 Part 1/2 श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणचाळिसावा (३९) भाग १/२


Shree Navnath Bhaktisar Adhyay 39 
CharpatiNath completed TirthYatra of all pious tirthas on the earth. Now he started for the Swarga where he wanted to bath in the pious Mankarnika River and then proceed to Patala. He reached Swarga and met Brahma who was his father. Narad told the story of Charpati to Brahma from his birth to diksha by Dattaguru to Charpati. Brahma asked Charpati to wait for some period in Swarga and he told him that on a pious day they will have a bath in Mankarnika. Charpati and Narad use to go to a beautiful garden at Amarpur where God Indra lives. The garden was somehow spoiled by both of them while eating fruits and picking up flowers. Hence guards after keeping a watch caught hold of Charpati and beat him. Charpati very angry and by using his Vatakarshanastra Mantra made the guards to lose their lives. Then there was a war between him and God Indra, God Shiva and God Vishnu. Charpati defeated all of them. Then he took out crown, Koustubha Mani and Gandiva from God Vishnu and went to his father God Brahma. God Brahma convinced him and told him that he should immediately make God Shiva, God Vishnu and all others free from his Vatakarshanastra Mantra. Charpati used his Vatakarshanastra Mantra and made them live again. He used Sanjivani Mantra for those who were dead, too alive them again. Then God Brahma introduced Charpati to God Vishnu and God Shiva. Charpati bowed both of them and received their blessings. On a pious day he had a bath in the pious Mankarnika River with God Brahma. Then Charpati went in Patala where he met God Vaman bowed him. King Bali bowed to Charpati and welcomed him in Patala. In the next 40th and the last Adhyay Dhundisut Malu from Nrahari family is going to tell us what happens next.
श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणचाळिसावा (३९) भाग १/२
श्रीगणेशाय नम ॥
जयजयाजी आदिनाथा । कर्पूरवर्णा उरगभूषिता । 
बोलवीं पुढें ग्रंथार्था । नवरसादि कृपेनें ॥ १ ॥
मागिले अध्यायीं केले कथन । चरपटीचा होऊनि जन्म ।
दत्तदीक्षा पुढें घेऊन । नाथपंथीं मिरवला ॥ २ ॥
उपरी एकादश नाथांपासून । चौर्‍यायशीं सिद्ध झाले पूर्ण ।
तयांचीं सांगीतलीं नामें । यथाविधीकरुनियां ॥ ३ ॥
एक गहनी वेगळा करुन । बहात्तर आठांनीं केलें निर्माण । 
उपरी मीननाथ चौरंगी अडभंगण । बारा सिद्ध निर्मिले ॥ ४ ॥
एकूण चौर्‍यायशीं सिद्ध पूर्ण । पुढें आतां ऐका कथन ।
चरपटी करी तीर्थाटन । कथा कैसी वर्तली ॥ ५ ॥
गया प्रयाग काशीहून । जगन्नाथ मल्लिकार्जुन ।
फणिपर्वत रामेश्र्वर करुन । कुमारीदैवत पाहिलें ॥ ६ ॥
बारा मल्हार हिंगलाज । बारा लिंगें तेजःपुंज । 
सप्त मोक्षपुर्‍या पाहोनि सहज । महीप्रदक्षिणा घातली ॥ ७ ॥
सकळ महीचें झालें तीर्थ । गुप्त प्रकट अत्यद्भुत ।
परी एक राहिलें इच्छिलें तीर्थ । स्वर्गपाताळ तीर्थांत ॥ ८ ॥
करुनि मणिकर्णिकेचें स्नान । सकळ स्वर्ग यावें पाहून ।
उपरी पाताळभुवनीं जाण । भोगावती (पाताळगंगा) वंदावया ॥ ९ ॥
ऐसा विचार करुनि चित्तीं । गेला बद्रिकाश्रमाप्रती । 
तेथे नमूनि उमापती । पुढें चालिला महाराजा ॥ १० ॥ 
व्यानप्रयोगीं भस्मचिमुटी । चर्चूनियां निजललाटीं । 
तेणेंकरुनि वातगतीं । गमनातें दावीतसे ॥ ११ ॥
मग आदित्यनामी मंत्र जपून । प्रत्यक्ष केला नारायण ।
तो मागें पुढें सिद्ध होऊन । मार्गापरी गमतसे ॥ १२ ॥
कीं मनयोगाचा धीर धरुनि करीं । चरपट लंघी महेंद्रगिरी ।
शैल्यबर्फ लहरी । अंगी झगट करिताती ॥ १३ ॥
सवितातेज अति अद्भुत । परम तीव्र दाहातें करीत ।
तेणेंकरुनि बर्फगणांत । वितळपणीं मिरवत ॥ १४ ॥
जैसें पर्जन्यकाळीं महीं । वितळे मित्रतेज प्रवाहीं ।
त्याचि न्यायें ते समयीं । हिमाचलकण वहिवटले ॥ १५ ॥  
ऐसी करुनि गमनस्थिती । लंघूनि गेला स्वर्गाप्रती ।
तों प्रथम श्रृंगमारुती । सत्यलोका पाहिलें ॥ १६ ॥
जातांचि गेला विधिसभेंत । चतुराननाचे चरण वंदित । 
वंदूनियां जोडूनि हस्त । सन्मुख उभा राहिला ॥ १७ ॥
विधि पाहूनि चरपटासी । म्हणे कोण आला योगाभ्यासी ।
ऐसें बोलतां ते घडीसी । नारद उभा तैं होता ॥ १८ ॥
तो तयाच्या सन्मुख होऊन । म्हणे महाराजा चतुरानना ।
मग मूळापासूनि जन्मकथन । तयापासीं वदला तो ॥ १९ ॥
ऐकूनि विधि सर्व वृत्तान्त । आनंदला अति अद्भुत । 
मग चरपटाचा धरुनि हस्त । अंकावरी घेतला ॥ २० ॥
हस्तें मुख कुरवाळून । क्षणोक्षणीं घेत चुंबन । 
म्हणे बाळा तुझें येणें । कैसें झालें स्वर्गासी ॥ २१ ॥
येरी म्हणे जी ताता । नारदें ओपिलें दत्तहस्ता । 
तेणें वरदपाणी माथां । ठाऊक केला बळासी ॥ २२ ॥
मग सकळ चरपटीतें विद्यार्णव । वैखरीपत्रें आणूनि ठेव । 
त्यावरी मोदानें कमलोद्भवें । श्रवणपात्रीं भरलासे ॥ २३ ॥        
तो कुशल विद्यारत्न । श्रवणशक्ती कीं सांठवण ।
परम आल्हादें आनंदून । पुन्हां चुंबन घेतसे ॥ २४ ॥
यावरी बोले चतुरानन । बाळा कामना वेधली कोण ।
येरु म्हणे तव दर्शन । घ्यावें मनी वाटलें हो ॥ २५ ॥
यापरी होतां कामना चित्तीं । तेथेंचि वेधली कृपामूर्ती ।
कीं मणिकर्णिका स्नाना निगुतीं । भोगावती पहावी ॥ २६ ॥
यावरी बोले कमलोद्भव । बा रे एक संवत्सर येथें असावें । 
त्यांत पर्वणी आल्यासी अपूर्व । स्नानासी जाऊं सकळिक ॥ २७ ॥
ऐसें बोलतां कमलोद्भव तात । अवश्य म्हणे चरपटीनाथ ।
यापरी राहतां सत्यलोकांत । बहुत दिन लोटले ॥ २८ ॥
परी चरपट आणि नारदमुनी । वर्तती एकिचित्तें खेळणीं ।
चैन पडे एकांवाचुनी । एकमेकां क्षणार्ध ॥ २९ ॥
यापरी कथा पूर्वापारेंसीं । नारद जातसे अमरपुरीसी । 
तों सहस्त्रचक्षु देखतां त्यासी । विनोदउक्तीं पाचारी ॥ ३० ॥
देखतांचि हा तपोवृदं । म्हणे यावें कळीनारद ।
ऐसे शक्राचे ऐकूनि शब्द । मुनि क्षोभ पावला ॥ ३१ ॥
चित्तीं पेटतां कोपाग्नी । अंतरी जल्पे नारदमुनी ।
म्हणे तोही समय तुजलागुनी । एक वेळां दाखवीन ॥ ३२ ॥
ऐसें म्हणूनि स्वचित्तांत । नारद जातां आपुल्या स्थानाप्रत । 
यासही लोटले दिन बहुत । परी शब्द चित्तांत रक्षीतसे ॥ ३३ ॥
तों सांप्रतकाळीं चरपटमुनी । विद्यापात्र प्रळयाग्नी । 
तें पाहूनि जल्पे नारदमुनी । इंद्र आहुतीं योजावा ॥ ३४ ॥
ऐसें कामरत्नीं इच्छाधामीं । रक्षीत असतां देवस्वामी ।
तों एके दिवशीं श्रवणउगमीं । श्रृंगारिला चरपट तो ॥ ३५ ॥
म्हणे बांधवा ऐक वचन । कामें वेधलें माझें मन ।
कीं अमरकुसुमवाटिकाश्रम । पाहूं क्रीडेकरणें ॥ ३६ ॥
चरपट म्हणे अवश्य मुनी । चला जाऊं येचि क्षणीं ।
ऐसा विचार करोनि मनीं । अमरपुरीं चालिला ॥ ३७ ॥
मार्गीं चलतां चरपटनाथ । शांतपणें महीं पाऊल पडत ।
तें पाहूनि कमलोद्भवसुत (नारद) । चरपटातें बोलतसे ॥ ३८ ॥
म्हणे सखया जाणें येणें । आहे परम लंबितवाणें ।          
तरी गमन ऐसें चालीनें । घडोनि कैसें येईल ॥ ३९ ॥
चरपट म्हणे आम्ही मानव । आमुची हीच चाली काय करावें ।
तुम्हांपाशी असे चपल उपाव । तरी तेणेंकरुनि मज न्यावें कीं ॥ ४० ॥
नारदें ऐसें शब्द ऐकून । कार्यकामनीं मोहित मन ।
मग मार्गालागीं स्थिर होऊन । गमनकळा अर्पिली ॥ ४१ ॥
जो महाद्भुत कमलापती । तेणें दिधली होती नारदाप्रती ।
तीं प्रारब्धबळें चरपटाप्रती । लाधली असे अवचित्तीं ॥ ४२ ॥
ती गमनकळा कैसी स्थित इच्छिल्या ठायां ती नेत ।
आणि त्रिभुवनांतील सकळ वृत्तांन्त । दृष्टीपुढें बैसतो ॥ ४३ ॥
आयुष्यभावी वर्तमान । गुप्तकृत्यें झाली होऊन ।
कोण्या ठायीं वसे कोण । सकळ दृष्टीं पडतसे ॥ ४४ ॥
ऐसी कळा ती गमनस्थिती । चरपटातें होतां प्राप्ती ।
मग हृदयीं सरिताभरती । तोय आनंदाचें लोटलें ॥ ४५ ॥
मग उभय एकें कलेंकरुन । मार्गीं करिते झाले गमन ।
एकासारखा एक चंडकिरण । स्वर्गालागीं मिरवले ॥ ४६ ॥
मग लवतां डोळियाचें पातें । मनोवेगीं अपूर्व असत ।
गगनचुंबित मार्गें अमरक्षितींत । कुसुमवाटिकेंत पातले ॥ ४७ ॥
तंव तेथें नाना तरु विस्तीर्ण । गगनचुंबित विशाल वन ।
ज्यांच्या कुसुमसुगंधेकरुन । अमोघ पाषाण मिरवती ॥ ४८ ॥
सहस्त्र योजन कानन समस्त । झालें आहे गंधव्यक्त ।
तें पाहूनियां चरपटनाथ । परम चित्तीं आल्हादे ॥ ४९ ॥  
मग कुसुमवाटीं करितां गमन । खेळती नाना क्रीडावचनें ।
खेळतां खेळतां येती दिसून । पीयूषफळें त्या ठाया ॥ ५० ॥
नारदासी म्हणे चरपटनाथ । फळें भक्षावीं कामना होत ।
नारद म्हणे कोणी हस्त । धरिला आहे तुमचा ॥ ५१ ॥
मग मन मानेल तैसें फळ । तोडूनियां तपोबळ । 
भक्षण करिती एकमेळ । उभय सुत विधीचे पैं ॥ ५२ ॥
तयांच्या बीजसाली सांडून । पीयूषरसासी करिती सेवन ।
उपरी सांडूनि तें स्थान । अनेक स्थानें सेविती ॥ ५३ ॥        
फळें तोडितां पक्वशाखा । महीं पडती विभक्त रुखा ।
ऐसी ठाईं ठाईं कुसुमवाटिका । महींलागीं दर्शवी ॥ ५४ ॥
यापरी उभय ते समयीं । कुसुमें तोडिती गंधप्रवाहीं ।
आणि भूषणेंमिषें सर्व देहीं । घेऊनि कांहीं जाताती ॥ ५५ ॥
तों ब्रह्मदेव देवतार्चनीं । बैसता ठेविती पुढें नेऊनी ।
म्हणती ताता हिंडतां काननीं । अपूर्व पुष्पें आणिली ॥ ५६ ॥
ऐसें धैर्यें ते नित्य । उभय पाहती बागाईत । 
परी रक्षक येतां मार्गीं तेथ । निजदृष्टीनें न दिसती ॥ ५७ ॥
मनांत होऊनि साशंकित । म्हणती कोण येतो न कळे येथ ।
सकळ नासूनि बागाईत । जात आहे येथूनी ॥ ५८ ॥
मग ते रक्षक पाळतीवरी । गुप्त बैसती अन्यक्षेत्रीं ।
तों एके दिनीं उभय सत्वरीं । कुसुमवाटिके संचरले ॥ ५९ ॥
संचरतांचि विभक्त ठाया । चरपट गेला फळें तोडावया । 
तों रक्षक येऊनि पृष्ठीमाया । चरपटातें धरियेलें ॥ ६० ॥
तें नारदानें पाहून । त्वरेंकरुन केलें पलायन । 
स्वस्थानासी जाऊन । स्थिर होऊनि राहिला ॥ ६१ ॥
येरीकड़े लतिकापाळ । धरुनि चरपटबाळ ।
येतांचि भेदिलें मुखकमळ । हस्तप्रहारेंकरुनियां ॥ ६२ ॥
तेणें कोपोनि तपकेसरी । कीं अपूर्व भासे वैश्र्वानरी ।
मग तीव्रशिखा आहुती बनकरी । चावावया धांवतसे ॥ ६३ ॥
करीं कवळून भस्मचिमुटी । वाताकर्षण जल्पे होटीं ।
तेणेंकरुनि बनकर थाटीं । व्याप्त झाले सकळिक ॥ ६४ ॥        
परम अस्त्र तें कठिण । सकळांचे भेदलें हृदयस्थान । 
तेणें देहींचा सकळ पवन । कुंठित झाला ते समयीं ॥ ६५ ॥ 
कुंठित होतां श्र्वासोच्छ्वास । तेणें प्राण झाले कासावीस ।
सकळ उलथोनि महीस । डोळां विकास दाटला ॥ ६६ ॥
गात्रें कांपती थरथराट । मुखीं रुधिराचा पूरलोट ।
नेत्र वटारुनि स्थूळवट । बुबुळांतें दाविताती ॥ ६७ ॥
ऐसा होतां विपर्यास । तो आणिक बनकर त्या ठायास । 
मागूनि येतां सहज स्थितीस । तेथें पाहिलें सकळिकां ॥ ६८ ॥
तों अव्यवस्थित सकळ बनकर । पडिले आहेत महीवर । 
ऐसें पाहूनि करिती विचार । तों सिद्ध बाळक पाहिला ॥ ६९ ॥
परम तीव्र अति कठिण । दैदीप्यरुप तेज गहन ।
त्यातें दृष्टीं पाहून । मागचे मागें ते सरले ॥ ७० ॥
त्वरें येऊनि नगरक्षिती । म्हणती महाराजा हे नृपती । 
एक जोगी अर्कस्थिती । आला असे महाराजा ॥ ७१ ॥
बाळरुपी अति सान । तेणें बनकरांचें प्राण । 
हृदयीं पेटला प्रळयानळासमान । दशा मिरवूं म्हणतसे ॥ ७२ ॥
आणीक वल्लीं तरु पहात । फिरत आहे बागाईत । 
न चाले आमुचें महात्म्य तेथ । म्हणोनि आलों या ठाया ॥ ७३ ॥
मग पाचारुनि सुरवरमेळा । इंद्र म्हणे तुम्हीं जाऊन सकळ ।
शासन करुनियां बाळ । धरुनि आणा मजपुढें ॥ ७४ ॥
नावरे तरी करा बंधन । शस्त्रास्त्रीं करावें कंदन ।
युक्तिप्रयुक्तीकरुन । अरिष्टातें दवडावें ॥ ७५ ॥
ऐसें बोलता देवपाळ । सकळ देव उठले सबळ ।
चरपटप्रतापसमुद्रजळ । प्राशन करुं पाहती ॥ ७६ ॥
कीं तें सैन्य नोहे वडवानळ । अति क्षोभूनि शिखाजाळ ।
शस्त्रास्त्रीं महादळ । घेऊनिया चालिले ॥ ७७ ॥
येताचि कुसुमवाटीनिकटीं । चरपट पाहता झाला दृष्टीं ।
मग सावध राहूनि कोपार्णव पोटीं । लहरा सोडूं म्हणतसे ॥ ७८ ॥
भस्मचिमुटी करीं कवळून । सावध उभा ब्रह्मनंदन ।
तों देवसैन्य अपार घन । निकट येऊन बोलती ॥ ७९ ॥
पाहूनि तयाचें तीव्रपण । मनीं म्हणे ब्रह्मनंदन ।
व्यर्थ विद्या अपार शीण । कासयासी करावा ॥ ८० ॥
सकळ अस्त्रप्रतापतरणी । त्यांत अस्त्र मुकुटमणी ।
तेंचि द्वंद्वासी पाठवूनी । वाताकर्षण रुझवावा ॥ ८१ ॥
मग हातीं भस्मचिमुटी । वाताकर्षण झालें होटीं ।
पाहूनि देवचमूथाटी । सव्य अपसव्य फेकीतसे ॥ ८२ ॥
मग तो अस्त्रप्रयोग कठिण । सकळ चमू घाली वेष्टून । 
सर्वां हृदयीं संचरुन । आकर्षिला वात तो ॥ ८३ ॥
सर्वांतें वात होतां लिप्त । श्र्वासोच्छ्वास झाले कुंठित ।
मग ते शस्त्रअस्त्र हस्त । मोकलोनि देताती ॥ ८४ ॥
प्राण होऊनि कासावीस । देह सांडिती स्वर्गमहीस ।
रुधिर येऊनि आननास । पूर वाहे भडभडां ॥ ८५ ॥
नेत्रद्वारें वटारुन । सकळ सांडूं पाहती प्राण ।
गात्रें विकळ शवसमान । सकळ काननीं मिरवले ॥ ८६ ॥
ऐशा दशेंत देव सघन । हाती येरीकडे पाकशासन ।
हर भृत्य पाठवून । समाचार आणवी ॥ ८७ ॥
येऊनि हेर पाहूनि तेथें । सांगते झाले अमरपाळातें ।
म्हणती महाराजा अत्यद्भुत । देव सर्वस्वीं निमालें ॥ ८८ ॥      
निमाले परी पुढें आतां । येथें येऊनि अमरनाथा । 
तुमचे सकळ जीविता । ओस नगरी करील कीं ॥ ८९ ॥
बाळरुप दिसतो सान । परी कृतांताचा घेईल प्राण ।
प्रळयरुद्र तो आकर्षण । करील मही वाटतसे ॥ ९० ॥
कीं महाप्रळय आजीच आला । ऐसेपरी भासे आम्हांला ।
ऐसें ऐकूनि बहु बोलां । पाकशासन दचकतसे ॥ ९१ ॥
यावरी धैर्य धरोनि बोलत । सिद्ध करा ऐरावत ।
महाप्रळय वज्रघातें । भग्न करणें तयासी ॥ ९२ ॥
ऐसें ऐकूनि बोलती हेर । म्हणती न्यून काय झुंजणार ।
परी तो धनुष्यालागीं शर । न लावी अजूनि महाराजा ॥ ९३ ॥
पाहतां पाहतां रणांगणीं । विपरीत करितो करणी ।
उगीच श्र्वासोच्छ्वास कोंडूनी । प्राण सोडिती झुंजार ॥ ९४ ॥
तेथें तुमचें वज्रअस्त्र । काय करील सहस्त्रनेत्र । 
तयाची विद्या गुप्तक्षेत्र । कांहीं करुं नेदीचि ॥ ९५ ॥
नातरी उगलाचि जाईल प्राण । मग सकळ राहील मुखभंजन ।
तरी दशकरातें साह्य करुन । तेथें आणावा महाराजा ॥ ९६ ॥
त्याची होतांचि दृष्टादृष्टी । याची होय श्र्वासकुंठी ।
तरी महाराज हे दयाजेठी । शिव साह्य करावा ॥ ९७ ॥ 
तरी देव उठती पुढती । नातरी सकळांची होईल शांती ।
तस्मात् आतां युद्धाप्रती । जाऊं नये महाराजा ॥ ९८ ॥
ऐसें ऐकतां हेरभाषण । उठता झाला पाकशासन । 
वाहनारुढ प्रत्यक्ष होऊन । कैलासासी पातला ॥ ९९ ॥
तैं शिवगणवेष्टित सदाशिव । बैसला होता महादेव ।
तों अकस्मात् देवराव । जाऊनियां पोहोंचला ॥ १०० ॥
Shree Navnath Bhaktisar Adhyay 39  श्रीनवनाथभक्तिसार अध्याय एकोणचाळिसावा (३९) 


Custom Search

No comments:

Post a Comment