Monday, July 24, 2017

Samas Dahava Siddha Lakshan Nirupan समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण


DashakPachava Samas Dahava Siddha Lakshan Nirupan
Samas Dahava Siddha Lakshan Nirupan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Siddha. Who is Siddha? Sadhak has now advanced on the path of spirituality. Now he has knowledge that without any any doubt he is Atma and not body. So now he is beyond Maya and known that Sansar or Prapancha is though visible not real and permanent. Only knowledge about Atma though it is invisible, is true and permanent. Now here in this Samas who is called as Siddha, is described in this Samas by Samarth Ramdas.
समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण 
श्रीराम ॥ 
मागें बोलिला संसारिक । त्यागेंविण नव्हे कीं साधक ।
ऐका हो याचा विवेक । ऐसा असे ॥ १ ॥
१) मागील समासाच्या शेवटी श्रोत्यांने असा प्रश्र्ण केला कीं, संसाराचा त्याग केल्याशिवाय साधक होतां येणार नाही का? त्याचें उत्तर ऐका.  
सन्मार्ग तो जीवीं धरणें । अनमार्गाचा त्याग करणें ।
संसारिका त्याग येणें । प्रकारें ऐसा ॥ २ ॥
२) ज्याला साधक व्हावयाचे आहे, त्यानें मनापासून सन्मार्ग धरावा व अन्य मार्गांचा त्याग करावा. असा त्याग करणें संसारीकला शक्य आहे. 
कुबुद्धित्यागेंविण कांहीं । सुबुद्धि लागणार नाहीं ।
संसारिका त्याग पाहीं । ऐसा असे ॥ ३ ॥
३) वाईट बुद्धीचा त्याग केल्याशिवाय सुबुद्धी अंगी येणार नाही. प्रापंचिकाला अशा प्रकारे त्याग करता येतो. 
प्रपंचीं वीट मानिला । मनें विषयेत्याग केला ।
तरीच पुढें आवलंबिला । परमार्थमार्ग ॥ ४ ॥
४) प्रपंचाचा वीट आल्याने मनातून इंद्रियवासना भोगण्याची इच्छा काढून मगच साधक बनून परमार्थाची वाटचाल करणें शक्य होते. 
त्याग घडे अभावाचा । त्याग घडे संशयाचा ।
त्याग घडे अज्ञानाचा । शनै शनै ॥ ५ ॥
५) प्रत्येक साधकाला नास्तिकपणाचा, संशयाचा त्याग करावा लागतो. म्हणजे हळूहळू अज्ञानाचा त्याग करता येतो.  
ऐसा सूक्ष्म अंतर्त्याग । उभयांस घडे सांग ।
निस्पृहास बाह्यत्याग । विशेष आहे ॥ ६ ॥
६) सांसारीक असो वा नसो दोघांना सूक्ष्म व आंतरीक त्याग करावा लागतो. जो प्रपंचापासून निस्पृह असतो तो बाह्य व्यवहाराचा त्याग करतो. हे विशेष आहे.
संसारिकां ठाईं ठाईं । बाह्यत्याग घडे कांहीं ।
नित्यनेम श्रवण नाहीं । त्यागेंविण ॥ ७ ॥
७) संसारीकालही संसारांत थोडासा बाह्य त्याग घडतो. कारण तो घडल्याशिवाय नित्यनेमानें परमार्थश्रवण घडणार नाही. 
फिटली आशंका स्वभावें । त्यागेंविण साधक नव्हे ।
पुढें कथेचा अन्वय । सावध ऐका ॥ ८ ॥
८) असो. याप्रमाणें श्रोत्याला त्याच्या प्रश्र्णाचे उत्तर दिले की ज्यानें शंका सहज फिटली. आतां पुढील विषय लक्षपूर्वक ऐका.  
मागां जालें निरुपण । साधकाची वोळखण ।
आतां सांगिजेल खूण । सिद्धलक्षणाची ॥ ९ ॥
९) मागील समासांत साधक कसा ओळखावा ते सांगितले. आतां सिद्धास कसें ओळखावे त्याची खूण सांगतो. 
साधु वस्तु होऊन ठेला । संशय ब्रह्मांडाबाहेरि गेला ।   
निश्र्चये चळेना ऐसा जाला । या नाव सिद्ध ॥ १० ॥
१०) सिद्धपुरुष स्वतः ब्रह्मरुप होतो. त्याचा सर्व संशय ब्रह्माडाबाहेर जातो. " अहं ब्रह्मास्मी " हा त्याचा निश्र्चय ढळत नाही. त्याला सिद्ध असें म्हणतात. 
बद्धपणाचे अवगुणा । मुमुक्षपणीं नाहीं  जाण । 
मुमुक्षपणाचें लक्षण । साधकपणीं नाहीं ॥ ११ ॥
११) बद्धावस्थेंत जे दोष असतात, ते मुमुक्षु अवस्थेंत उरत नाहीत. मुमुक्षु अवस्थेंत असणार्‍या कमतरता, लक्षणें साधक अवस्थेंत दिसत नाहीत.
साधकासि संदेहवृत्ती । पुढें होतसे निवृत्ती ।
याकारणें निःसंदेह श्रोतीं । साधु वोळखावा ॥ १२ ॥
१२) साधकाच्या ठिकाणी असलेली संशय वृत्ती कलाांतराने साधनेच्या येोगे निघून जाते.  म्हणूज जो निःसंदेह असतो तो सिद्ध होय असे जाणावे. 
संशयरहित ज्ञान । तें चि साधूचें लक्षण ।
सिद्धाआंगीं संशय हीन । लागेल कैसा ॥ १३ ॥
१३) अत्यंत संशयरहित ज्ञान हें सिद्धपणा अंगी आल्याचे लक्षण आहे.  सिद्धाच्या अंगी संशयासारख  हीन अवगुण असतच नाही. 
कर्ममार्ग संशयें भरला । साधनीं संशये कालवला ।
सर्वांमधें संशय भरला । साधु तो निःसंदेह ॥ १४ ॥
१४) कर्ममार्ग समशयाने भरलेला आहे. परमार्थाच्या साधनामध्यें संशय कालवलेला आहे. मानवी जीवनां सर्वत्र संशय भरुन राहीलेला आहे. एकटा सिद्धपरुषच संशयविरहित असतो. 
संशयाचें ज्ञान खोटें । संशयाचें वैराग्य पोरटें ।
संशयाचें भजन वोखटें । निर्फळ होय ॥ १५ ॥
१५) संशयानें भरलेले ज्ञान खोटे असते. संशयासहित वैराग्य पोरटे दिनवाणें असते. तसेच भजन हे संशयानें भरलेले असेल तर तें वाईट व निर्फळ असते. 
वेर्थ संशयाचा देव । वेर्थ संशयाचा भाव ।
वेर्थ संशयाचा स्वभाव । सर्व कांहीं ॥ १६ ॥
१६) ज्या देवाबद्दल संशय येतो, तो देव व्यर्थ असतो. संशयाने भरलेला भाव व्यर्थच. संशयानें भरलेलाा स्वभाव व्यर्थच असतो. संशयानें भरलेलें सर्व कांहीं व्यर्थ जाते.  
वेर्थ संशयाचा व्रत । वेर्थ संशयाचें तीर्थ । 
वेर्थ संशयाचा परमार्थ । निश्र्चयेंविण ॥ १७ ॥
१७) सांशयसहित व्रत व्यर्थ जाते. ज्या तीर्थाबद्दल संशय तें तीर्थ व्यर्थ असते. तसेच परमार्थांत निश्र्चितपणा नसेल व संशय असेल तर सर्व परमार्थ व्यर्थच जातो. 
वेर्थ संशयाची भक्ती । वेर्थ संशयाची प्रीती ।
वेर्थ संशयाची संगती । संशयो वाढवी ॥ १८ ॥
१८) संशयासहित केलेली भक्ती, प्रीति किंवा संगती व्यर्थ जाते. त्यामध्यें संशय कमी न होतां वाढतच जातो.
वेर्थ संशयाचें जिणें । वेर्थ संशयाचें धरणें ।
वेर्थ संशयाचें करणें । सर्व कांहीं ॥ १९ ॥
१९) संशयानें भरलेलें जीवन व्यर्थ जाते. संशय मनांत बाळगुन केलेले सर्व व्यर्थच जाते.
वेर्थ संशयाची पोथी । वेर्थ संशयाची वित्पत्ती ।
वेर्थ संशयाची गती । निश्र्चयेंविण ॥ २० ॥
२०) संशयानें भरलेला ग्रंथ, विद्या दोन्ही व्यर्थ असतात. संशयानें व निश्र्चयाच्या अभावाने चांगली गति पण मिळत नाही.
वेर्थ संशयाचा दक्ष । वेर्थ संशयाचा पक्ष ।
वेर्थ संशयाचा मोक्ष । होणार नाहीं ॥ २१ ॥
२१) संशयानें भरलेली तत्परता व्यर्थ असते. संशयानें धरलेला एखादा पक्ष व्यर्थ जातो. संशय असेल तर मोक्षसुद्धा व्यर्थ होतो. 
वेर्थ संशयाचा संत । वेर्थ संशयाचा पंडित ।
वेर्थ संशयाचा बहुश्रुत । निश्र्चयेंविण ॥ २२ ॥
२२) संशयानें भरलेले संत, पंडित, किंवा विद्यावंत देखिल निश्र्चय नसल्यानें व्यर्थ जातात.  
वेर्थ संशयाची श्रेष्ठता । वेर्थ संशयाची वित्पन्नता ।
वेर्थ संशयाचा ज्ञाता । निश्र्चयेंविण ॥ २३ ॥
२३) त्याचप्रमाणे संशयावर उभारलेली श्रेष्ठता, विद्वता व ज्ञान निश्र्चितपणा नसल्यानें व्यर्थ जातात.
निश्र्चयेंविण सर्व कांहीं । अणुमात्र तें प्रमाण नाहीं ।
वेर्थचि पडिले प्रवाहीं । संदेहाचे ॥ २४ ॥
२४) कोणतीही गोष्ट संशयानें व निश्र्चितपणाच्या अभावाने खोटीच ठरते. खरी म्हणुन मान्य होत नाही. संशयाच्या प्रवाहांत पडलेले सर्व व्यर्थच जाते. 
निश्र्चयेंविण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें ।
बाष्कळ बोलिजे वाचाळपें । निरार्थक ॥ २५ ॥
२५) वक्त्याचे निश्र्चय नसतांना बोललेले सर्व कंटाळवाणेच होते. वाचाळपणें तो कांही अर्थहीन बडबड करतो. असेच समजावे.
असो निश्र्चयेविण जे वल्गना । ते अवघीच विटंबना ।
संशयें कांहीं समाधान । उरी नाहीं ॥ २६ ॥
२६) असो. निश्र्चयानें संपन्न ज्ञान नसतांना जो ज्ञानच्या मोठ्या बाता मारतो तो ज्ञानाचे विडंबन करतो. कारण संशयी मनामध्यें समाधान राहु शकत नाही. 
म्हणोनि संदेहरहित ज्ञान । निश्र्चयााचें समाधान ।
तेंचि सिद्धाचें लक्षण । निश्र्चयेंसीं ॥ २७ ॥
२७) म्हणून अजीबात संशय नाही असें ज्ञान आणि अत्यंत खात्रीचे समाधान हें सिद्धाचें निश्र्चित खरे लक्षण समजावे.
तव श्रोता करी प्रश्र्न । निश्र्चय करावा कवण ।
मुख्य निश्र्चयाचें लक्षण । मज निरोपावें ॥ २८ ॥
२८) मग श्रोत्यानें विचारलें कीं, निश्र्चय कोणता करावा? निश्र्चयाचें मुख्य लक्षण मला सांगावें.  
ऐक निश्र्चय तो ऐसा । मुख्य देव आहे कैसा ।
नाना देवाचा वळसा । करुंचि नये ॥ २९ ॥
२९) त्यावर श्रीसद्गुरु म्हणाले कीं, मुख्य देव कसा आहे हें निश्र्चितपणें ओळखणे यांचे नांव निश्र्चय होय. अनेक देवांच्या घोटाळ्यांत आपण पडूं नये. 
जेणें निर्मिलें सचराचर । त्याचा करावा विचार ।
शुद्ध विवेकें परमेश्र्वर । वोळखावा ॥ ३० ॥
३०) ज्यानें हे चराचर विश्व निर्माण केले त्याच्याविषयीं विचार करावा. अत्यंत शुद्ध, निःसंदेह व निःस्वार्थी विवेकाने परमेश्र्वराचें ज्ञान करुन घ्यावे.
मुख्य देव तो कवण । भक्ताचें कैसें लक्षण । 
असत्य सांडून वोळखण । सत्याची धरावी ॥ ३१ ॥
३१) मुख्य देव कोण? भक्ताचे लक्षण काय? हे प्रश्र्ण मिथ्या दृश्य बाजूस सारुन सत्यस्वरुप परमात्म्याचें ज्ञान करुन घ्यावे. 
आपल्या देवास वोळखावें । मग मी कोण हें पाहावें ।
संग त्यागून राहावें । वस्तुरुप ॥ ३२ ॥
३२) आधी आपल्या देवास ओळखावें, मगच " मी कोण आहे? " याचे ज्ञान करुन घ्यावे. मग सर्व दृश्यांतून बाहेर पडून ब्रह्मस्वरुप होऊन राहावें'.  
तोडावा बंधनाचा संशयो । करावा मोक्षाचा निश्र्चयो ।
पाहावा भूतांचा अन्वयो । वितिरेकेंसीं ॥ ३३ ॥
३३) मी बांधलेला आहे हा विकल्प तोडून मोक्ष निळविण्याचा निश्र्चय करावा. जें जे आपल्या अनुभवांत येते तें तें आत्मीय भावनेने पहावे. व तें तें मिथ्या आहे या भावनेने पहावे.  
पूर्वपक्षेसिं सिद्धान्त । पाहावा प्रकृतीचा अंत ।
मग पावावा निवांत । निश्र्चय देवाचा ॥ ३४ ॥
३४) " मी देह आहे " हा पूर्व पक्ष व " मी आत्मा आहे " हा सिद्धान्त. पूर्वपक्ष खोटा ठरवून मग आत्मज्ञानामार्फत सिद्धांतापर्यंत दृश्य प्रकृतींत विलीन झालेले पाहवे. मग प्रकृती स्वरुपांत विलीन देवाचे शुद्ध स्वरुप निश्र्चितपणें कळते.    
देहाचेनि योगें संशयो । करी समाधानाचा क्षयो ।
चळो नेदावा निश्र्चयो । आत्मत्वाचा ॥ ३५ ॥
३५) देहबुद्धीच्या ज्ञानाने संशय निर्माण होतो मगसमाधानाचाही लोप होतो. यासाठीं आपल्या स्वस्वरुपाचा निश्र्चय मुळींच ढळूं देऊ नये.
सिद्ध असतां आत्मज्ञान । संदेह वाढवी देहाभिमान ।
याकारणें समाधान । आत्मनिश्र्चयें राखावें ॥ ३६ ॥
३६) आपल्या अंतर्यामी आत्मज्ञान हें स्वतः सिद्ध आहे. पण देहाभिमान संशय निर्माण करतो. म्हणुन आत्मनिश्र्चय करुन समाधान राखावें.
आठवंता देहबुद्धी । उडे विवेकाची शुद्धी ।
याकारणें आत्मबुद्धी । सदृढ करावी ॥ ३७ ॥
३७) देहबुद्धीची आठवण झाली की विवेक संपतो. म्हणून मी आत्मा आहे ही आत्मबुद्धी सदृढ राखावी.
आत्मबुद्धि निश्र्चयाची । तेचि दशा मोक्षश्रीची ।
अहमात्मा हें कधींचि । विसरों नये ॥ ३८ ॥
३८) आत्मबुद्धीचा निश्र्चय दृढ असणें. मी आत्मा आहे हे निःसंशयानें अनुभवास येणे. हेंच मोक्षरुपी लक्ष्मीचे वैभव आहे. म्हणून मी आत्मा आहे ही जाणीव कधींहीं विसरु नये.   
निरोपिलें निश्र्चयाचें लक्षण । परी हें न कळे संतसंगेंविण ।
संतांसि गेलिया शरण । संशये तुटती ॥ ३९ ॥
३९) निश्र्चय कोणता करावा हें सांगिंतलें पण सत्संगतीवाचून त्याचा बरोबर अर्थ ध्यानांत येत नाही. संतांना शरण गेल्यावर संशय आपोआप दूर होतात. 
आतां असो हें बोलणें । ऐका सिद्धांची लक्षणें ।
मुख्य निःसंदेहपणें । सिद्ध बोलिजें ॥ ४० ॥
४०) आतां हें बोलणें पुरें. सिद्धपुरुषाची लक्षणें थोडक्यांत ऐका. जो संपूर्ण निःसंशय झाला तो सिद्ध बनला.
सिद्धस्वरुपीं नाहीं देहो । तेथें कैंचा हो संदेहो ।
याकारणें सिद्ध पाहो । निःसंदेही ॥ ४१ ॥
४१) सिद्धावस्थेंत देहाची आठवण उरत नाही. म्हणून तेथें संशयाला जागा रहात नाही. यामुळें सिद्धपुरुष सतत निःसंदेह असतो. 
देवसमंधाचेनि गुणे । लक्षणासि काये उणें ।
देहातीताची लक्षणें । काये म्हणोनि सांगावी ॥ ४२ ॥
४२) जेथें देहाचा व दृश्याचा संबंध असतो, तेथें हवीतेवढी लक्षणें सांगता येतात. पण देहाच्या पलीकडे गेलेल्याची लक्षणें सांगता येत नाहीत. त्याचे वर्णन करता येत नाही. 
जें लक्षवेना चक्षूसी । त्याचीं लक्षणें सांगावीं कैसीं ।
निर्मळ वस्तु सिद्ध त्यासी । लक्षणें कैसीं ॥ ४३ ॥
४३) जे डोळ्यांनीं पाहतां येत नाहीं, त्याची लक्षणें सांगता येत नाहीत. सिद्ध हा शुद्ध ब्रह्मस्वरुप झालेला असल्यानें त्याची लक्षणें वर्णिता येत नाहीत.  
लक्षणें म्हणिजे केवळ गुण । वस्तु ठाईची निर्गुण ।
तेचि सिद्धांचें लक्षण । वस्तुरुप ॥ ४४ ॥
४४) त्रिगुणांना लक्षणें असतात. पण ब्रह्मस्वरुप झालेली वस्तु तर निर्गुण मग लक्षणें कशी?  गुणरहित असणें हेच सिद्धपुरुषाचे लक्षण होय.  
तथापि ज्ञानदशकीं बोलिलें । म्हणौनि वगतृत्व आटोपिलें ।
न्यूनपूर्ण क्ष्मा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥
४५) परंतु हा विषय पुढें ज्ञानदशकांत सांगितला आहे. म्हणून हें वर्णन आतां पुरें. ह्यांत जें कमी असेल त्याबद्दल श्रोत्यांनी क्षमा करावी. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सिद्धलक्षणनाम समास दहावा ॥
Samas Dahava Siddha Lakshan Nirupan 
समास दहावा सिद्धलक्षणनिरुपण 


Custom Search

No comments:

Post a Comment