Saturday, July 22, 2017

Samas Navava Sadhak Nirupan समास नववा साधकनिरुपण


Dashak Pachava Samas Navava Sadhak Nirupan 
Samas Navava Sadhak Nirupan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about Sadhak. Who is Sadhak? To know that we can think of a person who is completely absorbed in Prapancha, Now he is repenting and talking about Parmartha. He now came to know his bad virtues, his bad karmas, his bad behaviour with the people, Santa, Good people. He now thinks of Parmartha. From Mumukshu now he has made a progress on the path of spirituality. He has now knowledge that there is no happiness in Prapancha. He now in search of a sadGuru for guidance to proceed further in this path of Parmarth. Now here in this Samas who is called as Sadhak, is described in this Samas by Samarth Ramdas.
समास नववा साधकनिरुपण 
श्रीराम ॥
मागां मुमुक्षाचें लक्षण । संकेतें केलें कथन ।
आतां परिसा सावधान । साधक तो कैसा ॥ १ ॥
१) मागील समासांत मुमुक्षुची लक्षणें सांगितली. आतां साधकाची लक्षणें सावधपणें ऐका.
अवगुणाचा करुनि त्याग । जेणें धरिला संतसंग ।
तयासी बोलिजे मग । साधक ऐसा ॥ २ ॥
२) अवगुणांचा त्याग करुन ज्याने संतांचा संग धरिला त्याला मग साधक असें म्हटले आहे. 
जो संतांसी शरण गेला । संतजनीं आश्र्वासिला ।
मग तो साधक बोलिला । ग्रंथांतरीं ॥ ३ ॥
३) जो संतांना शरण गेला. संतांवर ज्यानें विश्र्वास ठेवला त्याला ग्रंथांमध्यें साधक म्हटले आहे.
उपदेशिलें आत्मज्ञान । तुटलें संसारबंधन । 
दृढतेकारणें करी साधन । या नाव साधक ॥ ४ ॥
४) संतांनी ज्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. तो श्रवण केल्यावर आपल्याला संसाराचे बंधन नाहीं हें ज्याला पटलें. तो दृढतेने साधन करुं लागतो त्याला साधक म्हणतात. 
धरी श्रवणाची आवडी । अद्वैतनिरुपणाची गोडी ।
मननें अर्थांतर काढी । या नाव साधक ॥ ५ ॥
५) ज्याला परमार्थ ऐकण्याची आवड असते. अद्वैत निरुपणाची ज्याला गोडी असते. जो गूढ व खरा अर्थ मननाने बरोबर समजतो. तो साधक समजावा.
होता सारासारविचार । ऐके होऊनि तत्पर ।
संदेह छेदूनि दृढोत्तर । आत्मज्ञान पाहे ॥ ६ ॥
६) कोणी आत्मानात्मविवेक मांडीत असेल तर ते विवेचन मनापासून ऐकतो. संशय नाहींसा करुन जो आत्मज्ञान पाहातो त्याला साधक म्हणतात.
नाना संदेहनिवृत्ती । व्हावया धरी सत्संगती ।
आत्मशास्त्रगुरुप्रचीती । ऐक्यतेसि आणी ॥ ७ ॥
७) नाना प्रकारचे संशय नाहींसे व्हावेत म्हणून जो सत्संगती धरतो. शास्त्रप्रचीति, गुरुप्रचीति व आत्मप्रचीति या तीन्हींत ऐक्य अनुभवतो.  
देहबुद्धि विवेकें वारी । आत्मबुद्धि सदृढ धरी ।
श्रवण मनन केलेंचि करी । या नाव साधक ॥ ८ ॥ 
८) मी देहच आहे ही मिथ्या भावना जो विवेकने बाजूस सारतो, मी आत्माच आहे ही सत्य भावना दृढपणें धरण्याचा अभ्यास करतो, निरंतर श्रवण मनन करतो, तो साधक असतो.  
विसंचूनि दृश्यभान । दृढ धरी आत्मज्ञान ।
विचारें राखें समाधान । या नाव साधक ॥ ९ ॥
९) दृश्याचे दिसणें नाहींसे करुन जो आत्मज्ञान घट्ट धरतो, आणि मी आत्मस्वरुप आहे, या विचारांत आपलें समाधान राखतो, तो साधक असतो.  
तोडूनि द्वैताची उपाधी । अद्वैत वस्तु साधनें साधी ।
लावी ऐक्यतेची समाधी । या नाव साधक ॥ १० ॥
१०) आपल्यामागें लागलेलें वेगळेपणाची उपाधी जो तोडून अभेदानें विलसणरे स्वस्वरुप जो साधनद्वारे साध्य करुन घेतो, आणि मी ब्रह्मच आहे अशा ऐक्यानें समाधींत जातो तो साधक असतो.  
आत्मज्ञान जीर्ण जर्जर । त्याचा करी जीर्णोद्धार ।
विवेकें पावे पैलपार । या नाव साधक ॥ ११ ॥ 
११) आत्मज्ञान फार जुनें झालें. स्वतः आत्मसाक्षात्कार करुन घेऊन जो ते पुनरुज्जीवीत करतो. आत्मसाक्षात्काराने जो प्रपंचांतुन पार पडतो. तो साधक असतो.  
उत्तमें साधूचीं लक्षणें । आंगिकारी निरुपणें ।
बळेंचि स्वरुपाकार होणें । या नाव साधक ॥ १२ ॥
१२) अध्यात्म निरुपणांत श्रवण केलेली सांधूंची उत्तम लक्षणें जो अंगी आणण्याचे जो यत्न करतो. अभ्यासाच्या जोरावर जोआपली वृत्ती आत्म्याशी तदाकार करतो, तो साधक असतो.
असत्क्रिया ते सोडिली । आणी सत्क्रिया ते वाढविली ।
स्वरुपस्थिती बळावली । या नाव साधक ॥ १३ ॥ 
१३) जो वाईट कृत्यें सोडून देतो. चांगली कृत्यें वाढवितो, ज्याची आत्म्याशी तदाकार होण्याची पात्रता वाढत जाते, तो साधक असतो.
अवगुण त्यागी दिवसेंदिवस । करी उत्तम गुणाचा अभ्यास ।
स्वरुपीं लावी निजध्यास २ या नाव साधक ॥ १४ ॥
१४) आपलें अवगुणांचा दिवसेंदिवस त्याग करतो, उत्तम गुण अंगी बाणवण्याचा अभ्यास करतो, आत्मस्वरुपाचे चिंतन करतो, तो साधक असतो.
दृढ निश्र्चयाचेनि बळें । दृश्य असतांच नाडळे ।
सदा स्वरुपीं मिसळे । या नाव साधक ॥ १५ ॥
१५) आत्मस्वरुपच सत्य आहे, सगळें दृश्य मिथ्या आहे, असा निश्र्चय करुन स्वस्वरुपांत मिसळलेला राहतो, तो साधक असतो. 
प्रत्यक्ष माया अलक्ष करी । अलक्ष वस्तु लक्षी अंतरीं ।
आत्मस्थितीची धारणा धरी । या नाव साधक ॥ १६ ॥ 
१६) माया प्रत्यक्ष दिसत असूनही मनांतुन काढुन टाकतो, दिसत नसलेली आत्मवस्तु अंतरांत स्थिर व धारण करतो, तो साधक असतो. 
जें या जनासि चोरलें । मनास न वचे अनुमानलें ।
तेंचि जेणें दृढ केलें । या नाव साधक ॥ १७ ॥
१७) आत्मस्वरुप लोकांपासून लपविलेले आहे. आपल्या मनाला त्याची कल्पना करतां येत नाही. तें स्वरुप जोअभ्यासानें मनांत दृढ करतो. तो साधक असतो.   
जें बोलतांचि वाचा धरी । जें पाहतांचि अंध करी ।
तें साधी नाना परी । या नाव साधक ॥ १८ ॥
१८) आत्मस्वरुपाचें करतांना वाचा कुंठीत होते. जें डोळ्यांनी पाहूं गेल्यास दृष्टी लटकी पडते, तें स्वरुप नाना प्रयत्न व अभ्यास करुन जो आपलेसें करुन घेतो, तो साधक असतो.  
जें साधूं जातां साधवेना । जें लक्षू जातं लक्षवेना ।
तेंचि अनुभवे आणी मना । या नाव साधक ॥ १९ ॥ 
१९) ज्याचा अनुभव घ्यावा म्हटला तर तो घेता येत नाही, पाहण्याचा प्रयत्न केला तर पाहता येत नाही, तें स्वस्वरुप जो अभ्यासानें अंतरांत दृढ करतो, तो साधक असतो. 
जेथें मनचि मावळे । जेथें तर्कचि पांगुळे ।
तेंचि अनुभवा आणी बळें । या नाव साधक ॥ २० ॥
२०) ज्या स्वस्वरुपाशीं मन मावळतें, तर्क पांगळें पडतात, त्या आत्मस्वरुपाचा जोअभ्यासनें अनुभव घेतो, तो साधक असतो. 
स्वानुभवाचेनि योगें । वस्तु साधी लागवेगें ।
तेंचि वस्तु होये आंगें । या नाव साधक ॥ २१ ॥
२१) स्वस्वरुपाचा जो अनुभव घेतो, त्यामुळें आत्मवस्तु त्याला त्वरीत प्राप्त होते, तसेच तो स्वतः आत्मस्वरुप होऊन जातो, तो साधक असतो.    
अनुभवाचीं आंगें जाणे । योगियांचे खुणे बाणे । 
कांहींच नहोन असणें । या नाव साधक ॥ २२ ॥
२२) स्वस्वरुपाच्या अनुभवाची सर्व अंगे जो जाणतो. योग्यांच्या खुणा ज्याच्या अंगी बाणतात, काहींच नसून असणे असा जो राहतो, तो साधक असतो.
परती सारुन उपाधी । असाध्य वस्तु साधनें साधी ।
स्वरुपीं करी दृढ बुद्धी । या नाव साधक ॥ २३ ॥
२३) दृश्याची सर्व बंधनें जो बाजुस टाकतो, व असाध्य वस्तु साधना करुन व अभ्यासानें जो साधतो, आणि आपली बुद्धी स्वस्वरुपांत स्थिर करतो, तो साधक असतो. 
देवाभक्ताचें मूळ । शोधून पाहे सकळ ।
साध्यचि होये तत्काळ । या नाव साधक ॥ २४ ॥
२४) देव कोण व भक्त कोण याचें मूळ जो शोधून पाहातो, आनि साध्य जें आत्मस्वरुप त्याच्याशी जो त्वरित एकरुप होऊन जातो, तो साधक असतो. 
विवेकबळें गुप्त जाला । आपोंआप मावळला ।
दिसतो परी देखिला । नाहींच कोंणी ॥ २५ ॥
२५) विवेकाच्या सामर्थ्यानें जो मीपणाने गुप्त होतो. ज्याचा अभिमान आपोआप निघून जातो. तो देहानें जरी लोकांना दिसत असला तरी त्याचे खरे स्वरुप कोणी जाणतच नाही. 
मीपण मागें सांडिलें । स्वयें आपणास धुंडिलें ।
तुर्येसहि वोलांडिलें । या नाव साधक ॥ २६ ॥ 
२६) ज्यानें मीपणा मागें टाकला, आपला खरा मी शोधून काढला, तुर्यावस्थेलाही जी द्वैतच सांगते तीलाही मागें टाकले, तो साधक असतो.
पुढें उन्मनीचा सेवटीं । आपली आपण अखंड भेटी ।
अखंड अनुभवी ज्याची दृष्टी । या नाव साधक ॥ २७ ॥ 
२७) तेथें उन्मनी अवस्था असते. शेवटीं आपल्या " मी "ची आपल्यला कधीं भंग न पडणारी अखंड भेट घडते. त्या स्वरुप साक्षात्काराकडे ज्याचे निरंतर लक्ष असते, तो साधक असतो.
द्वैताचा तटका तोडिला । भासाचा भास मोडिला ।
देहीं असोनि विदेह जाला । या नाव साधक ॥ २८ ॥
२८) जो या दृश्यमय द्वैताचा संबंध तोडून टाकतो, दृशाचा भास जो नाहींसा करतो, आणि जो देहांत असूनही विदेही बनतो, तो साधक असतो.
जयास अखंड स्वरुपस्थिती । नाहीं देहाची अहंकृती ।
सकळ संदेहनिवृत्ती । या नाव साधक ॥ २९ ॥
२९) जो अखंड स्वरुपाकार असतो, ज्याला देहाभिमान नसतो, ज्याचे सारे संशय फिटलेले असतात, त्याला साधक म्हणतात.
पंचभूतांचा विस्तार । जयासि वाटे स्वप्नाकार ।
निर्गुणीं जयाचा निर्धार । या नाव साधक ॥ ३० ॥
३०) पंचभूतांनीं गुंफलेला हा पसारा, ज्याला एखाद्या स्वप्नासारखा खोटा वाटतो, निर्गुण तेंच खरें असा ज्याचा निर्धार असतो, तो साधक असतो.  
स्वप्नीं भये जें वाटलें । तें जागृतीस नाहीं आलें ।
सकळ मिथ्या निर्धारिलें । या नाव साधक ॥ ३१ ॥
३१) स्वप्न भयानक पडले, भीति वाटली. पण जाग आल्यावर भीति कसली? सगळेंच खोटे. तसेच दृश्य विश्र्व हे खोटे आहे. हे जो ओळखतो. तो साधक होय. 
मायेचें जे प्रत्यक्षपण । जनास वाटे हें प्रमाण ।
स्वानुभवें अप्रमाण । साधकें केलें ॥ ३२ ॥
३२) मायेनें निर्माण केलेले दृश्य विश्र्व प्रत्यक्ष दिसते. म्हणून सामान्य माणसे ते प्रमाण मानतात. परंतु स्वस्वरुपाचे ज्ञान झाल्यावर साधक जगाचें खरेपण अज्ञान मानतो.  
निद्रा सांडूनि चेइरा जाला । तो स्वप्नभयापासून सुटला ।
माया सांडून तैसा गेला । साधक स्वरुपीं ॥ ३३ ॥
३३) एखादा झोपी गेलेल्या माणूस जागा झाल्यावर स्वप्नभयापासून मुक्त होतो. त्याचप्रमाणें मायानें निर्माण केलेले दृश्य खोटे आहे हे ओळखून साधक आत्मरुपी स्थिर होतो. 
ऐसी अंतरस्थिती बाणली । बाह्य निस्पृहता अवलंबिली ।
संसारउपाधी त्यागिली । या नाव साधक ॥ ३४ ॥
३४) अशारीतीनें जो अंतर्यामी आत्मस्वरुपी लीन आहे, बाहेर व्यवहारांत जो निःस्पृहपणें वागतो आणि जो संसारबंधनानें बांधलेला नसतो, तो साधक असतो.  
कामापासून सुटला । क्रोधापासून पळाला ।
मद मत्सर सांडिला । येकीकडे ॥ ३५ ॥
३५) साधक कामवासनेच्या विळख्यांतून सुटलेला असतो. क्रोधापासून दूर राहतो. मदव मत्सर यांचा त्याग करतो.
कुळाभिमानासि सांडिलें । लोकलाजेस लाजविलें ।
परमार्थास माजविलें । विरक्तिबळें ॥ ३६ ॥
३६) साधक कुलाभिमान सोडून देतो. लोकलाजेला हरवितो. वैराग्याच्या बळावर परमार्थ खूप वाढवितो.  
अविद्येपासून फडकला । प्रपंचापासून निष्टला ।
लोभाचे हातींचा गेला । अकस्मात ॥ ३७ ॥
३७) साधक अविद्येशी संबंध तोडतो. प्रपंचातून निसटतो. लोभाच्या मोहांतून तो एकदम बाहेर पडतो.  
थोरपणासि पाडिलें । वैभवासि लिथाडिलें । 
महत्वासि झिंजाडिलें । विरक्तिबळें ॥ ३८ ॥
३८) साधक जगांतील मोठेपणाचा त्याग करतो. वैभवाला किंमत देत नाही. वैराग्याच्या बळावर मानसन्माला झुगारुन देतो. 
भेदाचा मडघा मोडिला । अहंकार सोडून पाडिला ।
पाईं धरुनि आपटिला । संदेहशत्रु ॥ ३९ ॥
३९) साधक भेद मोडून काढतो. अहंकाराला हरवून त्याला बाजुस टाकतो. संशयरुपी शत्रुला पायाखाली लोळवतो. 
विकल्पाचा केला वधु । थापें मारिला भवसिंधु ।
सकळ भुतांचा विरोधु । तोडून टाकिला ॥ ४० ॥
४०) साधक त्याच्या विकल्पाचा नाश करतो. मोठा प्रहार करुन भवसागर मारुन टाकितो. तसेंच पंचभूतांमधें असणारा विरोध तो नाहीसा करुन टाकतो. 
भवभयासि भडकाविलें । काळाचें टांगें मोडिलें ।
मस्तक हाणोनि फोडिलें । जन्ममृत्याचें ॥ ४१ ॥
४१) साधक संसाराच्या भयाचे थोबाड फोडतो. काळाची तंगडी मोडतो. तो मृत्युच्या मस्तकावर प्रहार करुन तें फोडून जन्ममृत्युचे भयही नाहीसे करतो.
देहसमंधावरी लोटला । संकल्पावरी उठावला ।   
कल्पनेचा घात केला । अकस्मात ॥ ४२ ॥
४२) साधक देहरुपी पिशाच्चावर हल्ला करुन त्यास काढून टाकतो. म्हणजेच मी आत्मा असतांना मी देह आहे अशी भ्रामक कल्पना,  भावना टाकून देतो. म्हणजेच तो कल्पना करणेंही बंद करतो.   
अपधाकासि ताडिलें । लिंगदेहासि विभांडिलें ।
पाषांडास पछ्याडिलें । विवेकबळें ॥ ४३ ॥
४३) साधक स्वतःचें  स्वतःला जें भय वाटते त्याला बडवून बाहेर काढतो. साधक आपल्या सूक्ष्म देहास जिंकतो. आपल्या वासना सूक्ष्म देहांत राहतात. साधक त्यांना पराभूत करतो. विवेकाच्या बळावर पाखंडी लोकांचा व पाखंडी मतांना विरोध करुन पराभूत करतो.         
गर्वावरी गर्व केला । स्वार्थ अनर्थी घातला ।
अनर्थ तोहि निर्दाळिला । नीतिन्यायें ॥ ४४ ॥
४४) मी ब्रह्म आहे या अभिमानानें साधक मी देह आहे हा अभिमान नष्ट करतो. तो देहबुद्धिच्या स्वार्थी अहंकाराला नाहींसा करतो. तो दुर्दैवाला सरळ शास्त्रोक्त मार्गाने मारुन टाकतो.   
मोहासी मधेंचि तोडिलें । दुःखासि दुःधडचि केलें ।
शोकास खंडून सांडिलें । येकीकडे ॥ ४५ ॥
४५) साधक मोहाला उभा चिरतो. दुःखाचे दोन तुकडे करतो. शोकाचे तुकडे तुकडे करुन बाजूला फेकून देतो. म्हणजेच मोह. दुःख व शोक यांना साधक जीवनांतून नाहींसे करतो. 
द्वेष केला देशधडी । अभावाची घेतली नरडी ।
धाकें उदर तडाडी । कुतर्काचें ॥ ४६ ॥
४६) साधक द्वेषाला देशोधडीस लावतो. नास्तिकपणाला नरडे दाबून मारुन टाकतो. कुतर्काला इतका दम देतो की, त्याचे हृदय धडधडते. 
ज्ञानेंविवेक माजला । तेणें निश्र्चयो बळावला ।
अवगुणाचा संहार केला । वैराग्यबळें ॥ ४७ ॥
४७) आत्मज्ञानानें साधकाचा विवेक बलवान होतो. त्यामुळें स्वस्वरुपाबद्दल निश्र्चय बळकट होतो. वैराग्याच्या सामर्थ्यानें तो अवगुणांचा संहार करतो.  
अधर्मास स्वधर्मे लुटिलें । कुकर्मासि सत्कर्में झगटिलें ।
लांटून वाटा लाविलें । विचारें अविचारासी ॥ ४८ ॥
४८) स्वधर्माच्या आचरणाने साधक अधर्माचें सर्वस्व काढून घेतो. सत्कर्मांनी कुकर्मास हाकलून लावतो. सद्विचारांनी अविचारांना वाटेस लावतो. 
तिरस्कार तो चिरडिला । द्वेष खिरडूनि सांडिला ।
विषाद अविषादें घातला । पायांतळीं ॥ ४९ ॥
४९) साधक तिरस्कार चिरडून टाकतो. द्वेष खरडून काढतो. खेदाला स्वानंदाच्या पायतळीं तुडवतो.  
कोपावरी घालणें घातलें । कापट्या अंतरी कुटिलें ।
सख्य आपुलें मानिलें । विश्र्वजनीं ॥ ५० ॥
५०) साधक क्रोधावर हल्ला करुन त्याचा नाश करतो. कपटाचा मनामध्येंच कुटुन नायनाट करतो. तो विश्र्वांतील सर्व भूतांमधें मित्रत्वानें पाहातो.  
प्रवृत्तीचा केला त्याग । सुहृदांचा सोडिला संग ।
निवृत्तिपंथे ज्ञानयोग । साधिता जाला ॥ ५१ ॥    
५१) साधक दृश्याकडे धांव घेणार्‍या वृत्तीचा त्याग करतो. आप्तजनांची संगत सोडतो. आणि वृत्तीला अंतर्यामी आत्मस्वरुपाकडे वळवून आत्मज्ञान करुन घेतो.  
विषयेमैंदास सिंतरिलें । कुविद्येसि वेढा लाविलें ।
आपणास सोडविलें । आप्ततश्करापासुनी ॥ ५२ ॥
५२) साधक दृश्यरुपी चोराला फसवितो. दृश्याच्या कचाट्यांतून निसटतो. विपरीत ज्ञानाला सर्व बाजुनीं वेढून तें नाहीसें करतो. आप्तरुपी चोरांपासून आपली सुटका करुन घेतो. 
पराधेनतेवरी कोपला । ममतेवरी संतापला ।
दुराशेचा त्याग केला । येकायेकी ॥ ५३ ॥
५३) साधक पराधिनतेवर रागावतो. ममतेवर संतापतो. लगेचच दुराशेचा त्याग करतो. 
स्वरुपीं घातलें मना । यातनेसि केली यातना ।
साक्षेप आणि प्रेत्ना । प्रतिष्ठिलें ॥ ५४ ॥
५४) साधक मनाला स्वस्वरुपी लीन करतो. त्यामुळे यातनेला यातना होतात. कारण यातना भोगायला मन उरतच नाही. तो उद्योग, श्रम आणि प्रयत्न यांची प्रतिष्ठा वाढवतो.     
अभ्यासाचा संग धरिला । साक्षपासरिसा निघाला ।
प्रेत्न सांगाती भला । साधनपंथें ॥ ५५ ॥
५५) साधक आपल्या साधनमार्गांत अभ्यासावर भर देतो. तो प्रयत्न आणि कष्ट यांनी साधनापंथ अभ्यासितो.  
सावध दक्ष तो साधक । पाहे नित्यानित्य  विवेक ।
संग त्यागूनि येक । सत्संग धरी ॥ ५६ ॥
५६) साधक अति सावध व दक्ष असतो. तो शाश्वत, अशाश्वत विवेकाने जाणतो. इतर सर्व संग सोडून एक सत्संग तेवढा धरतो.
बळेंचि सारिला संसार । विवेकें टाकिला जोजार ।
शुद्धाचारें अनाचार । भ्रष्टविला ॥ ५७ ॥
५७) साधक प्रपंचाला विवेकाच्या बळावर बाजूला टाकून देतो. संसाराचा बोजा फेकून देतो. स्वतःच्या शुद्धाचरणाने अनाचाराला हरवितो, भ्रष्ट करतो.
विसरास विसरला । आळसाचा आळस केला ।
सावध नाहीं दुश्र्चित्त जाला । दुश्र्चित्तपणासी ॥ ५८ ॥
५८) साधक स्वस्वरुपाचे अनुसंधान विसरण्याचे विसरतो. कामचुकारपणाचा स्वीकार करत नाही. म्हणजे आळसाचा आळस करतो. चित्ताची व्यग्रता नसते. म्हणजे अनेक गोष्टींमध्ये मन व्यग्र नसते. 
आतां असो हें बोलणें । अवगुण सांडी निरुपणें ।
तो साधक ऐसा येणें प्रमाणें । बुझावा ॥ ५९ ॥
५९) आतां हें बोलणें पुरें. उपदेश ऐकून जो आपले अवगुण सोडतो तो साधक असतो. हें या वर्णनावरुन ओळखावें. 
बळेंचि अवघा त्याग कीजे । म्हणौनि साधक बोलिजे ।
आतां सिद्ध तो जाणिजे । पुढिले समासीं ॥ ६० ॥
६०) मुद्दाम बळजबरीनें आपल्या देहबुद्धीचा त्याग करणारास साधक म्हणतात. आतां सिद्ध कोण असतो त्याचे लक्षण पुढील समासांत सांगितलें आहे. 
येथे संशय उठिला । निस्पृह तोचि साधक जाला ।
त्याग न घडे संसारिकाला । तरी तो साधक नव्हे कीं ॥ ६१ ॥
६१) येथें एक शंका येते ती अशी की जो निस्पृह होतो तो सादक बनतो. पण प्रापंचिकाला सर्व त्याग घडत नाही. मग तो साधक बनूं शकत नाहीं कीं काय?     
ऐसे श्रोतयांचें उत्तर । याचें कैसें प्रत्योत्तर । 
पुढिले समासीं तत्पर । होऊन ऐका ॥ ६२ ॥
६२) श्रोत्यांच्या या प्रश्र्णाचे उत्तर पुढील समासांत दिलें आहे. ते श्रोत्यांनी तत्पर हौऊन ऐकावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे साधकलक्षणनिरुपणनाम समास नववा ॥
Samas Navava Sadhak Nirupan
समास नववा साधकनिरुपण 


Custom Search

No comments:

Post a Comment