Friday, July 7, 2017

Samas Dusara GuruLakshan समास दुसरा गुरुलक्षण


Dashak Pachava Samas Dusara GuruLakshan
Samas Dusara GuruLakshan. It is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about SadGuru. Everybody requires a Guru but he must be a SadGuru. SadGuru teaches him about spirituality. He makes him understand the true knowledge. He can take him to path of Moksha. Swami Samarth is telling us about SadGuru in this Samas. What qualities Sadguru must have and how he can help SatShishy to attain Moksha. By knowing these qualities of SadGuru is very important as we can avoid Bhodu-Guru.
समास दुसरा गुरुलक्षण
श्रीराम ॥
जे करामती दाखविती । ते हि गुरु म्हणिजेती ।
परंतु सद्गुरु नव्हेती । मोक्षदाते ॥ १ ॥
१) कांहीं माणसें विलक्षण करामती करुन दाखवतात. त्यांनाही गुरु म्हणतात. पण मोक्ष देणारे हे गुरु नव्हेत.
सभामोहन भुररीं चेटकें । साबरमंत्र कौटालें अनेकें ।
नाना चमत्कार कौतुकें । असंभाव्य सांगती ॥ २ ॥
२) सभेतील लोकांची नजरबंदी करणे, चेटुक करुन भुरळ पाडणे, साबरमंत्र व कौटाळे या नाथ पंथीय मंत्राद्वारे चमत्कार करणे, अशक्य वाटणार्‍या गोष्टी करुन दाखविणे,   
सांगती औषधीप्रयोग । कां सुवर्णधातूचा मार्ग ।
दृष्टिबंधनें लागवेग । अभिळाषाचा ॥ ३ ॥
३) अनेक वनस्पती व रसायनांचे औषधीप्रयोग सांगणे, दुसर्‍या धातुचा सोन्यांत रुपांतर करण्याचा प्रयोग सांगणे, नजरबंदी करुन ताबडतोप इच्छापुर्तीचा मार्ग सांगणे, 
साहित संगीत रागज्ञान । गीत नृत्य तान मान ।
नाना वाद्यें सिकविती जन । ते हि येक गुरु ॥ ४ ॥
४) साहित्य, संगीत, रागज्ञान, गायन, नृत्य, ताना, निरनिराळी वाद्यें शिकवीणारे, तेही एक प्रकारचे गुरु समजावे.
विद्या सिकविती पंचाक्षरी । ताडेतोडे नानापरी ।
कां पोट भरे जयावरी । ते विद्या सिकविती ॥ ५ ॥
५) कांहीं मंत्र जाणणारे मंत्र शिकवतात, ताईत, गंडेदोरे देण्याचे शिकवतात, कांहीं पोट भरण्याची कला शिकवतात.
जे यातीचा जो व्यापार । सिकविती भरावया उदर ।
ते हि गुरु परी साचार । सद्गुरु नव्हेती ॥ ६ ॥
६) ज्या जातीचा जो व्यापार असतो तो त्या जातींतील लोकांना पोट भरण्याससाठी शिकवतात. ते सुद्धा एक प्रकारचे गुरुच पण सद्गुरु मात्र नव्हेत. 
आपली माता आणी पिता । ते हि गुरुचि तत्वता ।
परी पैलपार पावविता । तो सद्गुरु वेगळा ॥ ७ ॥  
७) आपली आई व वडिल हे पण गुरुच पण संसारांतुन पैलतीराला नेणारा तो सद्गुरु वेगळाच असतो.  
गाईत्रीमंत्राचा उचारु । सांगे तो साचार कुळगुरु  ।
परी ज्ञानेंविण पैलपारु । पाविजेत नाहीं ॥ ८ ॥
८) गायत्रीमंत्राचा उपदेश देणारा कुळगुरु. पण तो कांही आत्मज्ञान देत नाही. त्याज्ञानवाचून पैलपारास जातां येत नाही. 
जो ब्रह्मज्ञान उपदेसी । अज्ञानअंधारें निरसी ।
जीवात्मयां परमात्मयांसी । ऐक्यता करी ॥ ९ ॥ 
९) जो ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो, अज्ञानाचा अंधार नाहींसा करतो, व जीवात्म्याचे परमात्म्याशी ऐक्य घडवून आणतो. तो सद्गुरु होय.
विघडले देव आणी भक्त । जीवशिवपणें द्वैत ।
तया देवभक्ता येकांत । करी तो सद्गुरु ॥ १० ॥
१०) देव आणि भक्त यांचा वियोग झालेला असल्यामुळे जीव व शिव असे द्वैत निर्माण झालेले असते, तें द्वैत नाहीसे करुन देव व भक्त यांची गांठ घालून देऊन ऐक्य करतो, तो सद्गुरु होय. 
भवव्याघ्रें  घालूनि उडी । गोवत्सास तडातोडी ।
केली देखोनि सीघ्र सोडी । तो सद्गुरु जाणावा ॥ ११ ॥
११) भवरुपी वाघाने उडी घालून गाय-वासराची ताटातूट केली हे पाहून दया येऊन त्या भवरुपी वाघापासून सोडविणारा तो सद्गुरु. 
प्राणी मायाजाळीं पडिलें । संसारदुःखें दुःखवलें ।
ऐसें जेणें मुक्त केलें । तो सद्गुरु जाणावा ॥ १२ ॥
१२) प्राणी (जीव ) मायेच्या जाळ्यांत अडकून प्रपंचांतील दुःखाने दुःखी होतात. अशांना मायेच्या जाळ्यांतून जो सोडवितो.  तो सद्गुरु होय. 
वासनानदीमाहांपुरीं । प्राणी बुडतां ग्लांती करी ।
तेथें उडी घालूनि तारी । तो सद्गुरु जाणावा ॥ १३ ॥
१३) वासनारुपी नदीला महापूर आलेला असतां जीव त्यामधें गटांगळ्या खात बुडू लागतो. त्यावेळी तेथें उडी घालून जो तारतो, तो सद्गुरु होय.
गर्भवास अति सांकडी । इच्छाबंधनाची बेडी ।
ज्ञान देऊन सीघ्र सोडी । तो सद्गुरु स्वामी ॥ १४ ॥
१४) वासनेच्या बंधनाची बेडी त्यामुळे जीवाला गर्भवासाचे दुःख भोगावे लागते. आत्मज्ञान देऊन त्या बंधनांतून जीवास जो मुक्त करतो, तो सद्गुरु होय.
फोडूनि शब्दाचें अंतर । वस्तु दाखवी निजसार ।
तोचि गुरु माहेर । अनाथांचें ॥ १५ ॥
१५) शब्दांचे अंतरंग अर्थ त्यावरुन आत्मसोरुपाकडे नेणारा सद्गुरु हा अनाथांचे जणूं माहेरघरच असतो. 
जीव येकदेसी बापुडें । तयास ब्रह्म चि करी रोकडें ।
फेडी संसारसांकडें । वचनमात्रें ॥ १६ ॥
१६) जीव हा एकांगी असतो. अपूर्ण असतो. ब्रह्म सर्वांगी, पूर्ण स्थळ काळ परिस्थिती यांच्या पलीकडे असते. आपल्या उपदेशाने सद्गुरु जीवाला प्रत्यक्ष ब्रह्मस्वरुप बनवितो.  
जें वेदांचे अभ्यांतरीं । तें काढून अपत्यापरी ।
शिष्यश्रवणीं कवळ भरी । उद्गारवचनें ॥ १७ ॥
१७) वेदांच्या अंतरंगामधे म्हणजे उपनिषदामधे जे ज्ञान गुप्तरुपे आहे ते ज्ञान सद्गुरु लहान मुलाला जसे घास भरवितात तसे शिष्याला आपल्या बोलण्यांतून हळूहळू कानांत सांगतात.    
वेद शास्त्र माहानुभाव । पाहातां येकचि अनुभव ।
तोचि येक गुरुराव । ऐक्यरुपें ॥ १८ ॥
१८) वेद, शास्त्र व सद्पुरुष ज्ञानानुभवाने एकरुप झालेले असतात. तेच ज्ञान तोच अनुभव सद्गुरुचा असतो. ज्ञान या दृष्टीने सर्वांचे ज्ञान सारखेंच असते.  
संदेह निःशेष जाळी । स्वधर्म आदरें प्रतिपाळी ।
वेदविरहित टवाळी । करुंच नेणे ॥ १९ ॥   
१९)  सद्गुरु भक्ताचे सर्व प्रकारचे संशय मुळापासून नष्ट करतो. तो मोठ्या आदराने स्वधर्माचे पालन करतो. वेदरहित म्हणजे आत्मज्ञान असलेले सर्व मिथ्या भाषण तो करत नाही. 
जें जें मन आंगिकारी । तें तें स्वयें मुक्त करी ।
तो गुरु नव्हे भिकारी । झडे आला ॥ २० ॥
२०) मनांत जें जें येते ते ते लज भीड न बाळगता जो उघड करतो. तो कांहीं सद्गुरु नव्हे. तो भिकारी आपल्यामागे लागण्यासाठी आला आहे असे सनजावे.
शिष्यास न लविती साधन । न करविती इंद्रियेंदमन ।
ऐसे गुरु आडक्याचे तीन । मिळाले तरी त्यजावे ॥ २१ ॥
२१) जो आपल्या शिष्याला साधनांत कसें राहावे हे शिकवत नाही. इंद्रियें ताब्तांत कशी ठेवावीत हे शिकवत नाही. असले गुरु दमडीला तीन मिळाले तरी त्यांच्यापासून लांब राहावे.     
जो कोणी ज्ञान बोधी । समूळ विद्या छेदी ।
इंद्रियेंदमन प्रतिपादी । तो सद्गुरु जाणावा ॥ २२ ॥
२२) जो आत्मज्ञान समजावून सांगतो, सर्वच्या सर्व अविद्या म्हणजे आत्मज्ञाना व्यतिरिक्त असलेले मिथ्या ज्ञान समूळ नष्ट करतो. इंद्रियें आवरुन कशी धरावी हे शिष्याला शिकवीतो. तो सद्गुरु समजावा. 
येक द्रव्याचे विकिले । येक शिष्याचे आखिले ।
अति दुराशेनें केले । दीनरुप ॥ २३ ॥
२३) कांही गुरु पैशाचे मिंधे होतात. शिष्याच्या आधीन होतात. वासनेच्या नादी लागून दिनवाणें बनतात.
जें जें रुचे शिष्या मनीं । तैसीच करी मनधरणी ।
ऐसी कामना पापिणी । पडळी गळां ॥ २४ ॥
२४) असे गुरु शिष्याच्या एवढे आधीन होतात की, शिष्याला जे जे आवडेल ते ते सर्व करतात कारण वासनेचा विळखा त्यांच्या मानेभोवती बसलेला असतो.
जो गुरु भीडसारु । तो अद्धमाहून अद्धम थोरु ।
२५चोरटा भैंद पामरु । द्रव्यभोंदु ॥ २५ ॥
) शिष्याच्या भीडेला बळी पडून त्याची मनधरणी करणारा गुरु अधमाहूनही अधम असतो. असा गुरु चोरट, द्रव्याचा लोभी, दुष्ट, नीच व फसवा असतो.   
जैसा वैद्य दुराचारी । केली सर्वस्वें बोहरी ।
आणी सेखी भीड करी । घातघेणा ॥ २६ ॥
२६) वैद्यकीचे ज्ञान नसणारा एखादा दुराचारी वैद्य रोग्याला सर्वस्वी लुबाडतो. तसेच रोग्याला भीड घालून शेवटी त्याचा घात करतो.  
तैसा गुरु नसावा । जेणें अंतर पडे देवा ।
भीड करुनियां गोवा । घाली बंधनाचा ॥ २७ ॥
२७) तसे हे नामधारी गुरु असतात. ज्यांच्यामुळे भक्त व देव यांतील अंतर वाढते. जो भीड घालून भक्ताला देहबुद्धिच्या बंधनांत अधिकाधिक अडकवितो. असा गुरु नसावा.
जेथें शुद्ध ब्रह्मज्ञान । आणी स्थूळ क्रियेचें साधन ।
तोचि सद्गुरु निधान । दाखवी डोळां ॥ २८ ॥
२८) ज्याच्याजवळ शुद्ध ब्रह्मज्ञान व प्रत्यक्ष व्यवहारांत साधनेचे आचरण आहे. असा सद्गुरु आपल्याला आपले आत्मस्वरुप दाखवितो.
देखणें दाखविती आदरें । मंत्र फुंकिती कर्णद्वारें ।
इतुकेंच ज्ञान तें पामरें । अंतरलीं भगवंता ॥ २९ ॥
२९) कांहीं गुरु आपल्या शिष्यांना मोठ्या कौतुकाने प्रकाश, नाद, सुगंध यांचे अनुभव दाखवितात. कांहीं शिष्याच्या कानांत मंत्र सांगतात. इतकेच ज्ञान त्यांच्यापाशी असते, पण ते बिचारे भगवंतापासून दूरच असतात.
बाणे तिहींची खूण । तोचि गुरु सुलक्षण ।
तेथेंचि रिघावें शरण । अत्यादरें मुमुक्षें ॥ ३० ॥
३०) शास्त्र प्रचिती, गुरुप्रचिती व आत्मप्रचिती ज्याच्यापाशी आहे, तोच उत्तम लक्षणांनी संपन्न अशी सद्गुरुची खूण आहे. ज्याला मोक्ष मिळवून घेण्याची इच्छा आहे, त्याने अशा सद्गुरुस शरण जावे.
अद्वैत निरुपणें अगाध वक्ता । परी विषईं लोलंगता । 
ऐसियागुरुचेनि सार्थकता । होणार नाहीं ॥ ३१ ॥
३१) कांही वेळेस एखादा माणूस वेदांत उत्तम प्रकारे सांगतो. पण मन मात्र इंद्रियसुखाला लालचावलेले असते. असा गुरु केल्याने आपले सार्थक होणार नाही. 
जैसा निरुपणसमयो । तैसेंचि मनहि करी वायो ।
कृतबुद्धीच जयो । जालाच नाहीं ॥ ३२ ॥
३२) उत्तम वक्ता जसा प्रसंग तसा त्यांत रंग भरतो.  परंतु देहबुद्धिचे सारे संदेह नाहीसे होऊन त्याच्या अंतर्यामी आत्मज्ञानाचा जय झालेला नसतो. 
निरुपणीं सामर्थ्य सिद्धी । श्रवण होतां दुराशा बाधी ।
नाना चमत्कारें बुद्धी । दंडळूं लागे ॥ ३३ ॥
३३) पुष्कळवेळां निरुपणामधे वक्ता आत्मज्ञानाचे सामर्थ्य सांगतो. त्यामुळे प्राप्त होणार्‍या सिद्धिंचे वर्णन करतो. त्या वर्णनाने श्रोत्यांची बुद्धि आत्मज्ञानापासून ढळूं लागते.
पूर्वीं ज्ञाते विरक्त भक्त । तयांसि सादृश्य भगवंत ।
आणी सामर्थ्यहि अद्भुत । सिद्धीचेनि योगें ॥ ३४ ॥
३४) साधकांना असे वाटते की, पूर्वी मोठे ज्ञाते, विरक्त आणि भक्त होऊन गेले. त्यांची योग्यता भगवंताच्या बरोबरीची होती. सिद्धि वश झाल्याने त्यांच्या अंगी मोठे सामर्थ्य होते. 
ऐसें तयांचें सामर्थ्य । आमुचें ज्ञानचि नुसदें वेर्थ ।
ऐसा सामर्थ्याचा स्वार्थ । अंतरीं वसे ॥ ३५ ॥
३५) त्याच्या अंगी जेवढे सामर्थ्य तेवढे आपल्याकडे नसल्याने आपले ज्ञान व्यर्थ आहे. अशा प्रकारच्या सामर्थ्यप्राप्तीचा विचार साधकाच्या मनांत दृढ होऊ लागतो. हा विचर आत्मज्ञानाला मारकच असतो.
निशेष दुराशा तुटे । तरीच भगवंत भेटे ।
दुराशा धरिती ते वोखटे । शब्दज्ञाते कामिक ॥ ३६ ॥
३६) दृश्यांतून सुख मिळविण्याची वासना समूळ नष्ट होते,  तेव्हांच भगवंत भेटतो, आत्मज्ञान होते. वासना बाळगणारे शब्दज्ञानी चांगले नसतात. 
बहुत ज्ञातीं नागवलीं । कामनेनें वेडीं केलीं ।
कामना इच्छितांच मेलीं । बापुडीं मूर्खें ॥ ३७ ॥
३७) कोणत्या तरी वासनेनें वेडी झालेली शब्दज्ञानी माणसे परमार्थ न साधखरल्यामुळे फुकट गेली. अशी माणसें बिचारी मरुन गेली.
निशेष कामनारहित । ऐसा तो विरुळा संत ।
अवघ्यां वेगळें मत । अक्षै ज्याचें ॥ ३८ ॥
३८) ज्याला कशाचीही वासना असत नाही असा संत विरळाच असतो. सर्व लोकांहून त्याचे मत वेगळेच असते. तो अक्षै भगवंताबद्दलच बोलत असतो.
अक्षै ठेवा सकळांचा । परी पांगडा फिटेना शरीराचा । 
तेणें मार्ग ईश्र्वराचा । चुकोनि जाती ॥ ३९ ॥
३९) खरोखर पाहीले तर भगवंत हा सर्वांचा कधीही नाहींसा न होणारा असा ठेवा आहे. परंतु देहापासून सुख मिळविण्याची वासना कमी होत नाही. त्यामुळे भगवंताकडे जाण्याचा रस्ता सापडत नाही व रस्ता चुकतात.  
सिद्धि आणी सामर्थ्य जालें । सामर्थ्यें देहास महत्व आलें ।
तेणें वेंचाड वळकावलें । देहबुद्धीचें ॥ ४० ॥
४०) एखाद्याने कांहीं साधन केले व त्याला सिद्धि प्राप्त झाल्या तर त्याचे सामर्थ वाढते. त्यामुळे देहाचे महत्व वाढते. त्यामुळे देहबुद्धिचे झुंबाड वाढते.
सांडूनि अक्षै सुख । सामर्थ्य इच्छिती ते मूर्ख ।
कामनेसारिखें दुःख । आणीक कांहींच नसे ॥ ४१ ॥
४१) भगवंताचे सुख अक्षय आहे. त्याला विनाश नाही. त्याला दूर सारुन जे सामर्थ्य मिळविण्याच्या मागे लागतात, ते मूर्ख असतात. वासनेसारखे दुःख दुसरे कोणतेच नाही. 
ईश्र्वरेंविण जे कामना । तेणेंचि गुणें नाना यातना ।
पावती होती पतना । वरपडे प्राणी ॥ ४२ ॥
४२) मला भगवंत हवा या वासनेखेरीज इतर वासना या दुःख देणार्‍या व अधःपतन करणार्‍या आहेत.   
होता शरीरासी अंत । सामर्थ्य हि निघोन जात ।
सेखीं अंतरला भगवंत । कामनागुणें ॥ ४३ ॥
४३) शरीराचा शेवट झाला की, सामर्थ्यही निघून जाते. भगवंताची कामना न धरता  इतर कामना धरल्याने भगवंत मिळत नाही.
म्हणोनि निःकामताविचारु । दृढबुद्धीचा निर्धारु ।
तोचि सद्गुरु पैलपारु । पाववी भवाचा ॥ ४४ ॥
४४) यावरुन असे दिसते की, जो अत्यंत निष्काम आहे वासनारहीत आहे, आणि ज्याच्या बुद्धिमधे आत्मस्वरुपाविषयी दृढ निश्र्चय आहे असा स्वानुभवी सद्गुरु या संसारसागरांतून पलीकडे नेतो. 
मुख्य सद्गुरुचें लक्षण । आधीं पाहिजे विमळ ज्ञान ।
निश्र्चयाचें समाधान । स्वरुपस्थिती ॥ ४५ ॥
४५) सद्गुरला शुद्ध ब्रह्मज्ञान पाहिजे हे सद्गुरुचे प्रथम लक्षण आहे. तो निश्र्चल समाधानी पाहीजे. आत्मस्वरुपांत तो नेहमी स्थिर राहिला पाहीजे. 
याहिवरी वैराग्य प्रबळ । वृत्ति उदास केवळ ।
विशेष आचारें निर्मळ । स्वधर्माविषईं ॥ ४६ ॥
४६) याच बरोबर तो अतिशय वैराग्यसंपन्न असतो. त्याचे मन कशांतही गुंतलेले नसते. त्याचा स्वधर्माविषयीं आचार अत्यंत निर्मळ असतो.  
याहिवरी अध्यात्मश्रवण । हरिकथा निरुपण ।
जेथें परमार्थविवरण । निरंतर ॥ ४७ ॥
४७) त्याचे सद्गुरुजवळ बसून अध्यात्माचे श्रवण चालू असते. त्याच्यापाशी नेहमी हरिकथा व निरुपण चालते. 
जेथें सारासारविचारु । तेथें होये जगोद्धार ।
नवविधा भक्तीचा आधार । बहुत जनासी ॥ ४८ ॥
४८) जेथें सारासार विचार किंवा आत्मानात्मविवेक चालतो, तेथे जगाचा उद्धार होत असतो. बर्‍याच लोकांना नवविधाभक्ति कशी करावयाची हे त्याच्यापाशी समजते.   
म्हणोनि नवविधा भजन । जेथें प्रतिष्ठलें साधन ।
हें सद्गुरुचें लक्षण । श्रोतीं वोळखावें ॥ ४९ ॥
४९) म्हणून ज्याठिकाणी नवविधा भक्ती आचरली जाते, आणि साधनमार्गास महत्व दिले जाते,  हे सद्गुरुचे लक्षण आहे असे श्रोत्यानी ओळखावे.
अंतरी शुद्ध ब्रह्मज्ञान । बाह्य निष्ठेचें भजन ।
तेथें बहुत भक्त जन । विश्रांति पावती ॥ ५० ॥
५०) अंतर्यामी शुद्ध ब्रह्मज्ञान व बाह्यात्कारी मनापासून केलेली उपासना जेथें असते तेथे अनेक साधकांना व उपासकांना समाधान मिळते.  
नाहीं उपासनेचा आधार । तो परमार्थ निराधार ।
कर्मेंविण अनाचार । भ्रष्ट होती ॥ ५१ ॥
५१) ज्या परमार्थाला उपासनेचा, प्रत्यक्ष आचरणांत असणार्‍या भक्तीचा आधार नाही, तो परमार्थ कामाला येत नाही. कर्मांची जी शिस्त ती पाळली नाही तर अनाचार, स्वैराचार माजून माणसे भ्रष्ट होतात.  
म्हणोनि ज्ञान वैराग्य आणि भजन । स्वधर्मकर्म आणि साधन ।
कथा निरुपण श्रवण मनन । नीति न्याये मर्यादा ॥ ५२ ॥
५२) या कारणासाठी आत्मज्ञान, वैराग्य, उपासना, स्वधर्मकर्माचे आचरण, भगवंताचे साधन, हरिकथा निरुपण, श्रवण, मनन, नीति, न्याय, मर्यादा     
यामधें येक उणें असे । तेणें ते विलक्षण दिसे ।
म्हणौन सर्व हि विलसे । सद्गुरुपासीं ॥ ५३ ॥
५३) यामधे एकजरी कमी असले तरी परमार्थाच्या दृष्टीने विपरीत दिसते. म्हणून सद्गुरु असतो तेथे या सर्व परमार्थपूरक गोष्टी असतात.
तो बहुतांचें पाळणकर्ता । त्यास बहुतांची असे चिंता ।
नाना साधनें समर्था । सद्गुरुपासीं ॥ ५४ ॥
५४) सद्गुरु अनेकांना जवळ ठेवून घेतो व त्यांचे पालनपोषण करतो. त्याला पुष्कळ लोकांची काळजी घ्यावी लागते. अशासामर्थ्यवान सद्गुरुपाशी परमार्थाची अनेक साधने असतात. 
साधनेंविण परमार्थ प्रतिष्ठे । तो मागुता सवेंच भ्रष्टे । 
याकारणें दुरीद्रष्टे । माहानुभाव ॥ ५५ ॥
५५) साधनाशिवाय परमार्थ पोसण्याचा प्रयत्न केला तर तो कांहीं काळ चालतो. पण तो लगेचच विलयास जातो. म्हणून थोर आत्मज्ञानी पुरुष अत्यंत दूरदृष्टीने साधनाची प्रतिष्ठा वाढवितात.  
आचार उपासना सोडिती । ते भ्रष्ट अभक्त दिसती ।
जळो तयांची महंती । कोण पुसे ॥ ५६ ॥
५६)  जे परमार्थाची सदाचार, उपसना सोडतात ते भ्रष्ट दिसतात. अशा लोकांच्या गुरुपणाला आग लागो. त्यांना कोण विचारतो?
कर्म उपासनेचा अभाव । तेथें भकाधेसि जाला ठाव ।
तो कानकोंडा समुदाव । प्रपंची हांसती ॥ ५७ ॥               
५७) ज्या परमार्थामधे कर्म व उपासना या दोन्हींना जागा नाही. तेथे भ्रष्टाचार होण्याला सहज अवसर सांपडतो. अशा लोकांचा परमार्थ खोटा असतो. प्रापंचिक लोक त्याला हसतात. 
नीच यातीचा गुरु । तो हि कानकोंडा विचारु ।
ब्रह्मसभेस जैसा चोरु । तैसा दडे ॥ ५८ ॥
५८) खालच्या जातीचा गुरु केला तर अडचणीची परिस्थिती येते. संतांच्या सभेंत ब्रह्मस्वरुपाची चर्चा चालू असतां जर एखादा चोर तेथे आला तर त्याला जसे कानकोडें येते. तशी त्या शिष्याची समाजांत अवस्था होते.
ब्रह्मसभे देखतां । त्याचे तीर्थ नये घेतां ।
अथवा प्रसाद सेवितां । प्राश्र्चित पडे ॥ ५९ ॥
५९) त्याला लोकांसमोर गुरुचे तीर्थ घेता येत नाही. गुरुचाप्रसाद खाल्ला तर प्रायश्र्चित घ्यावे लागते.
तीर्थप्रसादाची सांडी केली । तेथें नीचता दिसोन आली ।
गुरुभक्ति ते सटवली । येकायेकी ॥ ६० ॥
६०) गुरुचा तीर्थप्रसाद घेतला नाही, टाकून दिला तर कमीपणा येतो. त्यात गुरुभक्ति एकदम नाश पावते.
गुरुची मर्यादा राखतां । ब्राह्मण क्षोभती तत्त्वतां ।
तेथें ब्राह्मण्य रक्षूं जातां । गुरुक्षोभ घडे ॥ ६१ ॥ 
६१) गुरुची मर्यादा राखण्याचा प्रयत्न करावा तर ब्राह्मण रागावतात. आणि आपला ब्राह्मणपणा सांभाळाला जावे तर गुरुचें मन मोडल्या सारखेंच होते. त्याचा राग ओढवून घेतल्यासारखे होते.    
ऐसीं सांकडीं दोहीकडे । तेथें प्रस्तावा घडे । 
नीच यातीस गुरुच न घडे । याकारणें ॥ ६२ ॥
६२) खालच्या जातीचा गुरु केला तर अशी दुहेरी अडचण होते. त्यामुळे पश्र्चाताप करण्याचा प्रसंग येतो. या कारणाने कनिष्ठ जातीला वरच्या जातीच्या गुरुत्वाचा अधिकार नाही.
तथापि आवडी घेतली जीवें । तरी आपणचि भ्रष्टावें ।  
बहुत जनांसी भ्रष्टवावें । हें तों दूषणचि कीं ॥ ६३ ॥
६३) हें सगळे जरी खरे तरी एखाद्यास कनिष्ठ जातींतील गुरु आवडला, तर त्याने एकट्याने भ्रष्ट व्हावे. पण आपल्या बरोबर अनेकांना भ्रष्ट करु नये. 
आतां असो हा विचारु । स्वयातीचा पाहिजे गुरु ।
नाहीं तरी भ्रष्टाकारु । नेमस्त घडे ॥ ६४॥
६४) आतां हे जातीच्या गुरुचे विवेचन पुरे. गुरु आपल्या जातीचा असावा नाहींतर निश्र्चितपणे भ्रष्टाचार घडतो.  
जे जे कांहीं उत्तम गुण । तें तें सद्गुरुचें लक्षण ।
तथापि सांगो वोळखण । होये जेणें ॥ ६५ ॥
६५) सर्व प्रकारचे उत्तम गुण सद्गुरु लक्षण म्हणून मानावयास हरकत नाही. तरी सद्गुरुची बरोबर ओळख होण्यास इतर गुरुंबद्दल माहिती सांगणे जरुरचे आहे.   
येक गुरु येक मंत्रगुरु । येक यंत्रगुरु येक तांत्रगुरु ।
येक वस्तादगुरु येक राजगुरु । म्हणती जनीं ॥ ६६ ॥
६६) एक नुसता गुरु, तर एक मंत्रगुरु, एक यंत्रगुरु तर एक तंत्रगुरु असतो. एक व्यायामाचा गुरु तर एखाद्याला राजगुरु म्हणजे राजाचा उपाध्याय म्हणतात.
येक कुळगुरु येक मानिला गुरु । येक विद्यागुरु येक कुविद्यागुरु ।
येक असद्गुरु येक यातिगुरु । दंडकर्ते ॥ ६७ ॥
६७) एक कुलगुरु तर एक मानलेला गुरु असतो. एक अविद्या म्हणजे भलतीच विद्या शिकवणारा गुरु तर एक खोटा गुरु तर एक जातीचा शिक्षा देणारा गुरु असतो.
येक मातागुरु येक पितागुरु । येक राजागुरु येक देवगुरु ।
येक बोलिजे जगद्गुरु । सकळकळा ॥ ६८ ॥
६८) एक मातागुरु तर एक पिता गुरु असतो. एकराजाचा गुरु तर एक देवांचा गुरु असतो. ज्याच्या अंगी पुष्कळ कला असतात त्याला जगद्गुरु म्हणतात. 
ऐसे हे सत्रा गुरु । याहिवेगळे आणीक गुरु ।
ऐका तयांचा विचारु । सांगिजेल ॥ ६९ ॥
६९) अशा प्रकारचे हे सतरा गुरु सांगितले. याहून वेगळे आणखी गुरु आहेत त्यांचेही वर्णन ऐका. 
येक स्वप्नगुरु येक दीक्षागुरु । येक म्हणती प्रतिमागुरु ।
येक म्हणती स्वयें गुरु । आपला आपण ॥ ७० ॥
७०) एक स्वप्नगुरु तर एक दीक्षा गुरु असतो. कोणी देवाच्या प्रतिमेला गुरु मानतात. कोणी म्हणतात की, ते स्वतःच त्यांचे गुरु आहेत.
जे जे यातीचा जो व्यापार । ते ते त्याचे तितुके गुरु ।
याचा पाहातां विचारु । उदंड आहे ॥ ७१ ॥
७१) ज्या जातीचा जो धंदा आहे. तो धंदा शिकवणारा गुरुच मानतात. असा विचार केला तर गुरुंच्या संख्येला शेवटच नाही.
असो ऐसे उदंड गुरु । नाना मतांचा विचारु । 
परी जो मोक्षदाता सद्गुरु । तो वेगळाचि असे ॥ ७२ ॥
७२) असो अशा रीतीनें गुरुंची संख्या व त्यांची निरनिराळी मते आहेत. परंतु मोक्ष मिळवून देणारा गुरु वेगळाच असतो.
नाना सद्विद्येचे गुण । याहिवरी कृपाळूपण । 
हें सद्गुरुचें लक्षण । जाणिजे श्रोतीं ॥ ७३ ॥
७३) आत्मज्ञानांतून स्वाभाविकपणे अंगी येणारे अनेक गुण व त्यापेक्षाही अज्ञानी जीवांबद्दल दया असणे हे सद्गुरुचे लक्षण श्रोत्यांनी ध्यानांत ठेवावे. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुलक्षणनाम समास दुसरा ॥
Samas Dusara GuruLakshan
समास दुसरा गुरुलक्षण


Custom Search

No comments:

Post a Comment