Wednesday, July 5, 2017

Samas Pahila GuruNischay समास पहिला गुरुनिश्र्चय


Dashak Pachava Samas Pahila GuruNischay 
Samas Pahila GuruNischay is in Marathi. In this Samas Samarth Ramdas is telling us about SadGuru. Everybody requires a Guru right from birth. He has to learn many things which he learns from somebody who is called as Guru. However SadGuru is different. SadGuru teaches him about spirituality. He makes him understand the true knowledge. He can take him to path of Moksha. Swami Samarth is telling us about SadGuru in this Samas.
समास पहिला गुरुनिश्र्चय

श्रीराम ॥
जय जय जी सद्गुरु पूर्णकामा । परमपुरुष आत्मारामा ।
अनुर्वाच्या तुमचा महिमा । वर्णिला नवचे ॥ १ ॥
१) हे सद्गुरुराया ! तुमचा जयजयकार असो. तुमच्या सर्व वासना तृप्त झाल्याने तुम्ही पूर्णकाम आहात. तुम्ही म्हणजे ईश्र्वरच आहात. सर्वांच्या हृदयांत राहणारे आत्माराम तुम्हीच आहात. तुमचा महिमा शब्दांनी सांगता येण्यासारखा नाही. त्यामुळे तो वर्णनही करता येत नाही. 
जें वेदांस साकडे । जें शब्दांसि कानडें ।
तें सत्शिष्यास रोकडें । अलभ्य लाभे ॥ २ ॥
२) जें परमात्मस्वरुप वेदांनाही अवघड वाटते. तसेच जे शब्दांच्याही पलीकडे आहे. ते सत्शिष्यास मात्र रोखठोक स्वरुपांत प्राप्त होते. 
जें योगियांचें निजवर्म । जें शंकराचें निजधाम ।
जें विश्रांतिचें निजविश्राम । परम गुह्य अगाध ॥ ३ ॥
३) जेपरमात्मस्वरुप योगीलोकांचे खास वस्तु आहे. जे शंकराचे राहण्याचे ठिकाण आहे, जेथे विश्रांतीलाही विश्रांती मिळते, ते अतिशय गूढ व खोल आहे.
तें ब्रह्म तुमचेनि योगें । स्वयें आपणचि होइजे आंगे ।
दुर्घट संसाराचेनि पांगें । पांगिजेल सर्वथा ॥ ४ ॥
४) तें ब्रह्म तुमच्या कृपेनें शिष्य स्वतः बनून जातो. त्याच्याशी शिष्य तदाकार बनतो. मग तो या कठीण संसाराच्या यातायातीनें तो मुळींच कष्टी होत नाही. 
आतां स्वामिचेनि लडिवाळपणें । गुरुशिष्यांचीं लक्षणें ।
सांगिजेती तेणें प्रमाणें । मुमुक्षें शरण जावें ॥ ५ ॥
५) श्रोते म्हणतात की, स्वामीनीं आतां आमचे लाड पुरवावे आणि गुरु-शिष्यांची लक्षणें सांगावित अशी की ज्यामुळे मोक्षाची तळमळ असणारे लगेच सद्गुरुला 
शरण जातील. 
गुरु तों सकळां ब्राह्मण । जर्‍हीं तो जाला क्रियाहीन ।
तरी तयासीच शरण । अनन्यभावें असावें ॥ ६ ॥
६) ब्राह्मण हा सर्वांचा गुरु आहे. जरी तो क्रियाहीन झाला तरी त्याला अनन्यभावाने शरण जावे.
अहो या ब्राह्मणाकारणें । आवतार घेतला नारायेणें ।
विष्णूनें श्रीवत्स मिरविणें । तेथे इतर ते किती ॥ ७ ॥
७) अहो, या ब्रााह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला. विष्णुनें श्रीवत्स म्हणजे भृगुने मारलेल्या लाथेची खूण मिरविली. तेथे इतरांची काय कथा ?
ब्राह्मणवचनें प्रमाण । होती शूद्रांचे ब्राह्मण ।
धातुपाषाणीं देवपण । ब्राह्मणाचेनि मंत्रें ॥ ८ ॥
८) ब्राह्मणाचे वचन प्रमाण मानतात. त्याच्या वचनाने शूद्रसुद्धा ब्राह्मणाच्या योग्यतेचे बनतात. दगडामध्ये देवपण ब्राह्मणाच्या मंत्रानेच येते.
मुंजीबंधनेंविरहित । तो शूद्रचि निभ्रांत ।
द्विजन्मी म्हणोनि सतंत । द्विज ऐसे नाम त्याचें ॥ ९ ॥
९) ज्याची मुंज झाली नाही तो जन्माने ब्राह्मण असला तरी शूद्रच असतो. मुंज म्हणजे दुसरा जन्म म्हणून ब्राह्मणाला द्विज असे म्हणतात.
सकळांसि पूज्य ब्राह्मण । हे मुख्य वेदाज्ञाा प्रमाण ।
वेदविरहित तें अप्रमाण । अप्रिये भगवंता ॥ १० ॥
१०) सर्वांनी ब्राह्मणाला पूज्य मानावे ही वेदाज्ञा आहे. जे वेदांत नाही ते अप्रमाण आहे. ते देवालाही आवडत नाही. 
ब्राह्मणीं योग याग व्रतें दानें । ब्राह्मणीं सकळ तीर्थाटणें ।
कर्ममार्ग ब्राह्मणाविणें । होणार नाहीं ॥ ११ ॥
११) ब्राह्मणाच्या मदतीनें ज्योतिषांतील योग, होम, हवन,व्रतें दानें तीर्थयात्रा व तेथील कर्मे होतात. ब्राह्मणावांचून कर्ममार्गाचें आचरण होणार नाही.
ब्राह्मण वेद मूर्तिवंत । ब्राह्मण तोचि भगवंत ।
पूर्ण होती मनोरथ । विप्रवाक्येंकरुनी ॥ १२ ॥
१२) ब्राह्मण म्हणजे मूर्तिमंत वेदच होय. ब्राह्मणालाच देव समजावा. त्याच्या वचनाने सर्व इच्छा पूर्ण होतात.
ब्राह्मणपूजनें शुद्ध वृत्ती । होऊन जडे भगवंतीं ।
ब्राह्मणतीर्थें उत्तम गती । पावती प्राणी ॥ १३ ॥
१३) ब्राह्मणाची पूजा केली तर मन शुद्ध होते. व वृत्ति भगवंताच्या ठिकाणी जडते. ब्राह्मणाचे तीर्थ घेतल्याने माणसाला उत्तम गति लाभते.   
लक्षभोजनीं पूज्य ब्राह्मण । आन यातिसि पुसे कोण ।
परी भगवंतासि भाव प्रमाण । येरा चाड नाहीं ॥ १४ ॥
१४) लक्षभोजनें घालण्यासाठी ब्राह्मण लागतात. इतर जाती चालत नाहीत. भगवंत अंतःकरणांतील शुद्धभाव तेवढा पाहतो. इतर गोष्टींची तो पर्वा करतनाही.
असो ब्राह्मण सुरवर वंदिती । तेथें मानव बापुडें किती ।
जरी ब्राह्मण मूढमती । तरी तो जगद्वंद्य  ॥ १५ ॥
१५) असो. ब्राह्मणाला देवसुद्धा नमस्कार करतात. तेथे मानवांची काय कथा. ब्राह्मण जरी बुद्धिहीन असला तरी तो सर्वांना वंद्य असतो.
अंत्येज शब्दज्ञाता बरवा । परी तो नेऊन काये करावा ।
ब्राह्मणासन्निध पुजावा । हें तो न घडे कीं ॥ १६ ॥
१६) एखाद्या अंत्यजाला पुष्कळ शब्दज्ञान असले, तरी तो कामाचा नाही. ब्राह्मणाच्या बरोबरीने त्याची पूजा करता येणार नाही.
जें जनावेगळें केलें । तें वेदें अव्हेरिलें ।
म्हणोनि तयासि नाम ठेविलें । पाषांडमत ॥ १७ ॥
१७) लोकरीतील सोडून कांहीं वेगळें करणें वेदांना मान्य नसते.म्हणून त्याला पाखंड मत म्हणतात. 
असो जे हरिहरदास । तयास ब्राह्मणीं विस्वास ।
ब्राह्मणभजनें बहुतांस । पावन केलें ॥ १८ ॥
१८) असो. जे शंकराचे व श्रीविष्णुचे भक्त आहेत त्यांची ब्राह्मणांवर निष्टा असते. ब्राह्मणांना पूज्य मानल्याने पुष्कळ लोक पावन झाले. 
ब्राह्मणें पाविजे देवाधेदेवा । तरी किमर्थ सद्गुरु करावा ।
ऐसें म्हणाल तरी निजठेवा । सद्गुरुविण नाहीं ॥ १९ ॥
१९) ब्राह्मणाला पूज्य मानल्याने जर देवांच्या देवापर्यंत पोहोचता येते, तर सद्गुरु कशाला करावा ? त्याची जरुर काय ? आपल्या आत्मस्वरुपाचा जो ठेवा तो सद्गुरुशिवाय मिळत नाही, म्हणून सद्गुरु करावा.
स्वधर्मकर्मीं पूज्य ब्राह्मण । परी ज्ञान नव्हे सद्गुरुविण ।
ब्रह्मज्ञान नसतां सीण । जन्ममृत्य चुकेना ॥ २० ॥
२०) आपण जी धार्मिक कर्मे करतो त्यांच्यापुरता ब्राह्मण पूज्य मानावा. हे बरोबर आहे. पण आत्मज्ञान मात्र सद्गुरुशिवाय प्राप्त होत नाही. आणि 
ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म-मृत्यु चुकत नाही.   
सद्गुरुविण ज्ञान कांहीं । सर्वथा होणार नाहीं ।
अज्ञान प्राणी प्रवाहीं । वाहातचि गेले ॥ २१ ॥
२१) सद्गुरुंच्या कृपेशिवाय ज्ञान कांहीं होत नाही.  तें ज्ञान नाही म्हणून अज्ञानी लोक या दृश्याच्या प्रवाहांत वाहून जातात.
ज्ञानविरहित जें जें केलें । तें तें जन्मासि मूळ जालें ।
म्हणौनि सद्गुरुचीं पाऊलें । सदृढ धरावीं ॥ २२ ॥
२२) आत्मज्ञान करुन न घेता माणूसजें जें करतो तें तें 
परत जन्माचे कारण होऊन बसते. तसे होऊ नये म्हणून सद्गुची पाऊले दृढ धरावी.
जयास वाटे देव पाहावा । तेणें सत्संग धरावा । 
सत्संगेंविण देवाधिदेवा । पाविजेत नाहीं ॥ २३ ॥
२३) भगवंताचे दर्शन घ्यावे असे ज्याला वाटते त्याने संतांची संगत धरावी.सत्संग केल्याखेरीज भगवंतापर्यंत पोहोचता येणार नाही.  
नाना साधनें बापुडीं । सद्गुरुविण करिती वेडीं ।
गुरुकृपेविण कुडकुडीं । वेर्थचि होती ॥ २४ ॥
२४) वेडीं, अज्ञानी माणसें सद्गुरुशिवाय निरनिराळी साधनें करतात. पण सद्गुरुची कृपा नसल्याने त्यांचे कष्ट वाया जातात.
कार्तिकस्नानें माघस्नानें । व्रतें उद्यापनें दानें ।
गोरांजनें धूम्रपानें । साधिती पंचाग्नि ॥ २५ ॥
२५) कोणी कार्तिक स्नानें, कोणी माघ स्नानें करतात, कांहीजण व्रतें उद्यापनें, दानें देतात. कांहीजण गोरांजनें स्वतःस जाळून घेणे, धूम्रपानें स्वतःला झाडाला उलटे टांगून घेऊन खाली धूर करुन तप करणे, कोणी पंचाग्नी म्हणजे स्वतःभोवती चारी बाजूंना अग्नि पेटवून रणरणत्या उन्हांत साधना करणें. परंतु अशा देह कष्टाने परमार्थ साधत नाही.   
हरिकथा पुराणश्रवण । आदरें करिती निरुपण ।
सर्व तीर्थें परम कठिण । फिरती प्राणी ॥ २६ ॥
२६) कोणी हरिकथा, पुराणें श्रवण करतात. कोणी मनापासून प्रवचनें करतात. कोणी अतिशय कठिण तीर्थयात्रा करतात.
झळफळित देवतार्चनें । स्नानें संध्या दर्भासनें ।
टिळे माळा गोपीचंदनें । ठसे श्रीमुद्रांचे ॥ २७ ॥
२७) कोणी देवाची सुंदर पूजा करितात.  कोणी स्नानसंध्या करतात. तर कोणी दर्भासने वापरतात. कोणी गोपीचंदनाचे टिळे लाऊन गळ्यांत माळा 
घालतात. कोणी मुद्रांचे ठसे लावतात. पण याने काही परमार्थ साधत नाही.
अर्घ्यपात्रें संपुष्ट गोकर्णें । मंत्रयंत्रांचीं तांब्रपर्णें ।
नाना प्रकारीचीं उपकर्णें । साहित्यशोभा ॥ २८ ॥
२८) देवतांना अर्घ्यपात्रे म्हणजे देवांना अर्घ्य देण्याची ताम्हणे, संपुष्ट म्हणजे देव ठेवण्याचा करंडा, गोकर्णे म्हणजे गाईच्या कानाच्या आकाराची भांडी, आणि इतर पूजा साहित्य अत्यंत सुंदर ठेवतात.
घंटा घणघणा वाजती । स्तोत्रें स्तवनें आणी स्तुती ।
आसनें मुद्रा ध्यानें करिती । प्रदक्ष्णा नमस्कार ॥ २९ ॥
२९) कांहीं लोक घणघण घंटा वाजवितात. कांहींजण देवाची स्तोत्रे, स्तवनें, स्तुती करतात. कांहीं आसनें करतात, कांहींजण मुद्रा करतात तर कांहींजण  ध्यान लावतात. प्रदक्षिणा, नमस्कार घालतात.
पंचायेत्न पूजा केली । मृत्तिकेचीं लिंगें लाखोली ।
बेलें नारिकेळें भरिली । संपूर्ण सांग पूजा ॥ ३० ॥ 
३०) कोणी पंचायतनाची पूजा करतात. कोणी मातीच्या लिंगाची लाखोली करतात. त्यांना बेल, नारळ,फळें, फुलें वाहुन यथासांग पूजा करतात. परंतु असे केल्याने आत्मज्ञान होत नाही. देवाचे दर्शन होत नाही.उपोषणें निष्ठा नेम । परम सायासीं केलें कर्म ।
फळासि पावती वर्म । चुकले प्राणी ॥ ३१ ॥
३१) कांहीं लोक उपवास करतात.  कांहीजण एखादा नेम निष्ठेने पाळतात. असे कष्ट करुन त्यांना कांहीं फल प्राप्तीही होते. पण खरी जी भगवंत प्राप्ती होत नाही.
येज्ञादिकें कर्में केलीं । हृदईं फळाशा कल्पिली ।
आपले इच्छेनें घेतली । सूति जन्माची ॥ ३२ ॥
३२) यज्ञ, याग ,होम ,हवने आदि करुन त्या कर्मांची फलाशा मनांत धरली. त्यामुळे आपल्या इच्छेनेच असे लोक परत जन्म-मरण फेर्‍यांत अडकतात.    
करुनि नाना सायास । केला चौदा विद्यांचा अभ्यास ।
रिद्धि सिद्धि सावकास । वोळल्या जरी ॥ ३३ ॥
३३) एखद्याने बरेच कष्ट घेऊन चौदा विद्यांचा अभ्यास केला. कोणी योगाभ्यास करुन ऋद्धि-सिद्धि मिळवल्या,
तरी सद्गुरुकृपेविरहित । सर्वथा न घडे स्वहित ।
येमपुरीचा अनर्थ । चुकेना येणें ॥ ३४ ॥
३४) तरीसुद्धा सद्गुरु कृपा झाल्याशिवाय स्वहित होत नाही. यमयातना 
चुकत नाहीत. 
जव नाहीं ज्ञानप्राप्ती । तव चुकेना यातायाती ।
गुरुकृपेविण अधोगती । गर्भवास चुकेना ॥ ३५ ॥
३५) जोपर्यंत सद्गुरुकडून आत्मज्ञानप्राप्ती होत नाही. तोपर्यंत अधोगती व गर्भवास चुकत नाही. 
ध्यान धारणा मुद्रा आसन । भक्ती भाव आणी भजन ।
सकळ हि फोल ब्रह्मज्ञान । जव तें प्राप्त नाहीं ॥ ३६ ॥
३६) ध्यान, धारणा, मुद्रा किंवा निरनिराळी योगासने करणे सर्व ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय फुकटच आहे.
सद्गुरुकृपा न जोडे । आणी भलती च कडे वावडे ।
जैसे आंधळे चाचरोन पडे । गारीं आणी गडधरां ॥ ३७ ॥
३७) जसे एखादा आंधळा कोणाची मदत न घेता चाचपडत चालू लागला तर तो चिखलां किंवा खोल खड्यांत पडतो. तसेच जो सद]गुरु करत नाही तो त्याची कृपा न मिळाल्याने वेगळ्याच मार्गाला लागतो.
जैसे नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान ।
तैसें सद्गुरुवचनें ज्ञान- । प्रकाश होये ॥ ३८ ॥
३८) जसे डोळ्यांत अंजन घातले की, जमिनींतील गुप्तधन दिसते. तसेच गुरुची कृपा झाली की, ब्रह्मज्ञान प्रकट होते.  
सद्गुरुविण जन्म निर्फळ । सद्गुरुविण दुःख सकळ ।
सद्गुरुविण तळमळ । जाणार नाहीं ॥ ३९ ॥
३९) सद्गुरुशिवाय जन्म फुकट आहे. सद्गुरु नसल्याने दुःखच वाढते. सद्गुरुशिवाय ज्ञानप्राप्तीची तळमळ शांत होणार नाही.
सद्गुरुचेनि अभयंकरे । प्रगट होईजे ईश्र्वरें ।
संसारदुःखें अपारें । नासोन जाती ॥ ४० ॥
४०) सद्गुरुच्या अभयाने, कृपेने ईश्र्वर प्रकट होतो. अगणित संसारांतील दुःखांचा नाश होतो.  
मागें जाले थोर थोर । संत महंत मुनेश्र्वर । 
तयांस हि ज्ञानविज्ञानविचार । सद्गुरुचेनी ॥ ४१ ॥
४१) पूर्वी मोठमोठे संत, महंत, मुनिश्र्वर होऊन गेले त्यांनासुद्धा सद्गुरुमुळेच ब्रह्मज्ञान प्राप्त झाले.  
श्रीरामकृष्ण आदिकरुनी । अति तत्पर गुरुभजनीं ।
सिद्ध साधु आणी संतजनीं । गुरुदास्य केलें ॥ ४२ ॥
४२) श्रीराम, श्रीकृष्ण यांनी मनापासून गुरुसेवा केली. तसेच सिद्ध,साधु आणि संतांनी देखिल सद्गुरुचे दास्य केले.
सकळ सृष्टीचे चाळक । हरिहरब्रह्मादिक ।
तेही सद्गुरुपदीं रंक । महत्वा न चढेती ॥ ४३ ॥
४३) हें विश्र्व चालविणारे ब्रह्मा, विष्णु व महेश हे सुद्धा सद्गुरु चरणी लीन होतात. तेथे स्वतःचे मोठेपण दाखवत नाहीत. 
असो जयासि मोक्ष व्हावा । तेणें सद्गुरु करावा ।
सद्गुरुविण मोक्ष पावावा । हें कल्पांतीं न घडे ॥ ४४ ॥
४४) असो. ज्याला मोक्ष हवा असेल त्याने सइद्गुरु करावा. सद्गुरुशिवाय मोक्ष मिळणे शक्य नाही.
आतां सद्गुरु ते कैसे । नव्हेति इतरां गुरु ऐसे ।
जयांचे कृपेनें प्रकाशे । शुद्ध ज्ञान ॥ ४५ ॥
४५) आतां सद्गुरु कसे तर ते इतर गुरुं सारखे नसतात. सद्गुरुंमुळे शुद्ध ज्ञान किंवा आत्मज्ञान आपल्या अंतरी प्रगटते.  
त्या सद्गुरुची वोळखण । पुढिले समासीं निरुपण ।
बोलिलें असे श्रोतीं श्रवण । अनुक्रमें करावें ॥ ४६ ॥   
४६) तो सद्गुरु कसा असावा ते पुढील समासांत सांगितले आहे. ते श्रोत्यांनी क्रमशः श्रवण करावे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे गुरुनिश्र्चयेनाम समास पहिला ॥ 
Samas Pahila GuruNischay
समास पहिला गुरुनिश्र्चय



Custom Search

No comments:

Post a Comment