Thursday, November 2, 2017

Samas Chavatha Janapan Nirupan समास चवथा जाणपण निरुपण


Dashak Navava Samas Chavatha Janapan Nirupan 
Samas Chavatha Janapan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Janapan in this Samas. Janapan means knowledge. The person who is having true knowledge can attain Moksha. He can become Mukta i.e. free from Birth and Death.
समास चवथा जाणपण निरुपण 
श्रीराम ॥
पृथ्वीमधें लोक सकळ । येक संपन्न येक दुर्बळ ।
येक निर्मळ येक वोंगळ । काय निमित्य ॥ १ ॥
१) या पृथ्वीवर असंख्य माणसें आहेत. त्यांपैकी कांहीं गरीब तर कांहीं श्रीमंत आहेत. कांहीं घाणेरडी तर कांहीं निर्मळ, स्वच्छ आहेत. असा फरक असण्याचे कारण काय ?
कित्येक राजे नांदती । कित्येक दरिद्र भोगिती ।
कितीयेकांची उत्तम स्थिती । कित्येक अधमोद्धम ॥ २ ॥
२) कांहीं माणसें राजवैभव भोगतात तर कांहीं दारिद्र्य भोगतात. कित्येकांची स्थिति उत्तम असते तर कित्येक हीन स्थितिंत असतात.  
ऐसें काय निमित्य जालें । हें मज पाहिजे निरोपिलें । 
याचें उत्तर ऐकिलें । पाहिजे श्रोतीं ॥ ३ ॥
३) माणसांमध्यें असा फरक, भेद असण्याचे कारण काय, तें आपण मला सांगावें. वक्ता म्हणतो या प्रश्र्णाचे उत्तर श्रोत्यांनी ऐकले पाहीजे.  
हे सकळ गुणापासीं गती । सगुण भाग्यश्री भोगिती ।
अवगुण दरिद्रप्राप्ती । येदर्थीं संदेह नाहीं ॥ ४ ॥
४) हा सगळा भेद आपल्या गुणांचा परिणाम आहे. जे गुणवान असतात ते भाग्यशाली असतात व चैभव भोगतात. जे अवगुणी असतात तें दारिद्र्य भोगतात. यांत संशय नाही. 
जो जो जेथें उपजला । तो ते वेवसाईं उमजला ।
तयास लोक म्हणती भला । कार्यकर्ता ॥ ५ ॥
५) जो माणूस ज्या धंद्यांत जन्म घेतो. तो धंदा त्यानें जाणतेपणानें व समजून केला तर लोक त्याला चांगला म्हणतात. कार्यकर्ता मानतात.
जाणता तो कार्य करी । नेणता कांहींच न करी ।
जाणता तो पोट भरी । नेणता भीक मागे ॥ ६ ॥
६) जाणता माणूस कष्ट करतो व काम करुन पोट भरतो. नेणता माणूस कांहींच करत नाही. तो आळशी असतो. त्यामुळें त्याला भीक मागावी लागते. 
हें तों प्रगटचि असे । जनीं पाहातां प्रत्यक्ष दिसे ।
विद्येवीण करंटा वसे । विद्या तो भाग्यवंत ॥ ७ ॥
७) या गोष्टी अगदी उघड असल्यानें समाजांत प्रत्यक्ष अनुभवास येऊन  दिसून येतात.  विद्याहीन माणूस करंटा तर विद्यासमपन्न माणूस भाग्यवान असतो. 
आपुली विद्या न सिकसी । तरी काये भीक मागसी ।
जेथें तेथें बुद्धी ऐसी । वडिलें सांगती ॥ ८ ॥ 
८) " आपली विद्या शिकला नाहींस तर भीक मागावी लागेल. असा जाणतेपणानें वागण्याचा सल्ला वडिल माणसें देत असतात. 
वडिल आहे करंटा । आणी समर्थ होये धाकुटा ।
कां जे विद्येनें मोटा । म्हणोनियां ॥ ९ ॥
९) दोघे भाऊ आहेत.  धाकटा भाग्यवान निघाला व मोठा करंटा तर धकट्याचे भाग्य त्याच्याजवळच्या विद्येंने आलेले असते, असेंच आढळते.
विद्या नाहीं बुद्धि नाहीं । विवेक नाहीं साक्षेप नाहीं ।
कुशळता नाहीं व्याप नाहीं । म्हणौन प्राणी करंटा ॥ १० ॥
१०) विद्या, हुषारी, विवेक, प्रयत्न, कौशल्य आणि व्याप या गुणांपैकी एकही गुण अंगी नसेल तर माणूस करंटा असतो.  
इतुकें हि जेथें वसे । तेथें वैभवास उणें नसे ।
वैभव सांडितां अपैसें । पाठीं लागे ॥ ११ ॥
११) आणि हे सगळे गुण ज्याच्या अंगी असतात त्याला वैभव कधींहीं कमी पडत नाही. आणि नको म्हटलें तरी वैभव त्याच्या मागें लागते.  
वडिल समर्थ धाकुटा भिकारी । ऐका याची कैसी परी ।
वडिलाऐसा व्याप न करी । म्हणौनियां ॥ १२ ॥
१२) याउलट समजा मोठा भाऊ वैभव भोगतो व धाकटा भाऊ वैभवहीन असतो याचे कारण धाकटा मोठ्यासारखा व्याप करीत नाहीं. 
जैसी विद्या तैसी हांव । जैसा व्याप तैसें वैभव ।
तोलासारिखा हावभाव । लोक करिती ॥ १३  
१३) माणसाची विद्या जेवढी असेल तेवढी महत्वाकांक्षा त्यास असते. तो जेवढे व्याप करतो तेवढें वैभव त्यास मिळते. माणसाचें सामर्थ्य जेवढें असतें तितकी कर्तबगारी तो दाखवितो. 
विद्या नसे वैभव नसे । तेथें निर्मळ कैंचा असे ।
करंटपणें वोखटा दिसे । वोंगळ आणी विकारी ॥ १४ ॥
१४) ज्या माणसाजवळ विद्या नसते व वैभवही नसते तो मलिनपणें वावरतो. भाग्यहीन असल्यानें तो अगदी वाईट दिसतो. तसेच तो अगदी अस्वच्छ व वाईट प्रवृत्तीचा असतो. 
पशु पक्षी गुणवंत । त्यास कृपा करी समर्थ ।
गुण नसतां जिणें वेर्थ । प्राणीमात्राचें ॥ १५ ॥
१५) पशु व पक्षी गुणी असतील तर भाग्यवान माणूस त्यांच्यावरही कृपा करतो. पण अंगी कांहींच गुण नसतील तर माणसाचें जीवन अगदी वायां जाते.  
गुण नाहीं गौरव नाहीं । सामर्थ्य नाहीं महत्व नाहीं ।
कुशलता नाहीं तर्क नाहीं । प्राणीमात्रासी ॥ १६ ॥
१६) ज्या माणसांच्या अंगी गुण, मोठेपणा, सामर्थ्य, समाजांत महत्व नसते, कौशल्य, बुद्धिमत्ता नसते त्यांच्या जीवनांत कांहीं स्वारस्य नाहीं. अशी कांहीं माणसें असतात.  
याकारणें उत्तम गुण । तेंचि भाग्याचें लक्षण । 
लक्षणेंविण अवलक्षण । सहजचि जालें ॥ १७ ॥
१७) म्हणून उत्तम गुण अंगीं आणणें हेंच भाग्याचें लक्षण होय. हें लक्षण जेथें नाहीं तेथें अवलक्षण येणें हें स्वाभाविकच आहे. 
जनामधें जो जाणता । त्यास आहे मान्यता ।
कोणी येक विद्या असतां । महत्व पावे ॥ १८ ॥
१८) समाजांत जाणता जो असतो त्याला लोक मानतात. ज्याच्याजवळ विद्या असते त्याला महत्व मिळते.  
प्रपंच अथवा परमार्थ । जाणता तोचि समर्थ ।
नेणता जाणिजे वेर्थ । निःकारण ॥ १९ ॥
१९) प्रपंचांत किंवा परमार्थांत जो जाणता असतो त्याचा प्रभाव असतो. जो नेणता असतो तो आपलें आयुष्य फुकट दवडतो. 
नेणतां विंचु सर्प डसे । नेणतां जीवघात असे ।
नेणतां कार्य नासे । कोणी येक ॥ २० ॥
२०) अज्ञानानामुलें साप किंवा विंचु  चावण्याचा प्रसंग येतो. अज्ञानामुळें जीवाचा घात होतो. आपण करीत असलेले एखादे काम अज्ञानामुळें बिघडते. 
नेणतां प्राणी सिंतरे । नेणपणें तर्‍हे भरे ।
नेणपणें ठके विसरे । पदार्थ कांहीं ॥ २१ ॥  
२१) आज्ञनामुळें माणूस भ्रमांत पडतो. अज्ञानामुळें भलत्या भरीला पडून माणूस कांहींतरी वागतो. अज्ञानामुळें माणूस फसतो व आपली वस्तु विसरतो.          
नेणतां वैरी जिंकिती । नेणतां अपाई पडती ।
नेणतां संव्हारती घडती । जीवनास ॥ २२ ॥
२२) आपल्या अज्ञानामुळें शत्रु आपल्याला जिंकतो. अज्ञानाच्यापायीं आपल्याला नुकसान सोसावें लागते. अज्ञानामुळें संहार होतो. व जीवाचा नाश होतो.   
आपुलें स्वहित न कळे जना । तेणें भोगिती यातना ।
ज्ञान नेणतां अज्ञाना । अधोगती ॥ २३ ॥
२३) अज्ञानामुळें माणसाला स्वहीत कळत नाही. त्यामुळें त्याला यातना भोगाव्या लागताता. ज्ञान नसल्यानें अज्ञानी माणसाची अधोगती होते. 
मायाब्रह्म जीवशिव । सारासार भावाभाव ।
जाटिल्यासाठीं होतें वाव । जन्ममरण ॥ २४ ॥
२४) माया व ब्रह्म, जीव व शीव, सार व असार यांचें बरोबर ज्ञान झाले म्हणजे जन्ममरण नाहींसे होते.   
कोण कर्ता निश्र्चयेंसीं । बद्ध मोक्ष तो कोणासी ।
ऐसें जाणतां प्राणीयासी । सुटिकां घडे ॥ २५ ॥
२५) खरा कर्ता कोण आहे ? बंध व मोक्ष कोणास घडतो ? याचें निश्र्चित ज्ञान झालें कीं माणसाच्या सुटका होते तो मुक्त होतो.  
जाणिजे देव निर्गुण । जाणिजे मी तो कोण ।
जाणिजे अनन्यलक्षण । म्हणिजे मुक्त ॥ २६ ॥
२६) देव निर्गुण आहे याचें ज्ञान करुन घ्यावे. मी कोण आहे याचे ज्ञान करुन घ्यावें. मी आणी देव एकरुपच आहोत हें ज्ञान करुन घ्यावें म्हणजें माणूस मुक्त होतो. 
जितुकें जाणोन सांडिलें । तितुकें दृश्य वोलांडिलें ।
जाणत्यास जाणतां तुटले । मूळ मीपनाचे ॥ २७ ॥
२७) ज्ञान व्यवहारांत जितकें कांहीं जाणलें आणि मिथ्या म्हणून बाजूस सारलें तितकें दृश्य ओलांडलें असें समजावें. अखेर सर्व जाणणारा जो आत्मा त्याला जाणलें कीं मीपणाचें मूळ नाहींसे होते.   
न जाणतां कोटीवरी । साधनें केलें परोपरीं ।
तरी मोक्षाचा अधिकारी । होणार नाहीं ॥ २८ ॥
२८) अशा रीतीनें जाणत्याला न जाणतां, करोडों साधनें नाना प्रकारानें केली तरी कोणी मोक्षाचा अधिकारी होणार नाही. 
मायाब्रह्म वोळखावें । आपणास आपण जाणावें ।
इतुक्यासाठीं स्वभावें । चुके जन्म ॥ २९ ॥
२९) माया आणी ब्रह्म कसें तें जाणावें, आपणच "मी कोण" याचें ज्ञान करुन घ्यावें  म्हणजे माणूस मुक्त होतो. 
जाणतां समर्थाचें अंतर । प्रसंगें वर्ते तदनंतर ।
भाग्य वैभव अपार । तेणेचि पावे ॥ ३० ॥
३०) प्रथम भगवंताच्या खर्‍या स्वरुपाचें ज्ञान करुन घ्यावें. त्यानंतर व्यवहारांतील प्रसंग ओळखून वर्तन करावें. असें केल्यानें फार मोठे भाग्य व वैभव वाट्यास येईल. 
म्हणौन जाणणें नव्हे सामान्य । जाणतां होईजे सर्वमान्य ।
कांहींच नेणतां अमान्य । सर्वत्र करिती ॥ ३१ ॥
३१) म्हणून ज्ञान हें सामान्य समजूं नये. ज्ञानी माणसाला सर्व लोक मानतात. जो कांहींच जाणत नाहीं अशा अज्ञानी माणसाला कोणीच मानीत नाही. 
पदार्थ देखोन भूत भावी । नेणतें झडपोन प्राण ठेवी ।
मिथ्या आहे उठाठेवी । जाणते जाणती ॥ ३२ ॥
३२) एका अज्ञानी माणसानें अंधारांत कांहीं बघितलें तें भूत आहे  अशा प्रकारे खोट्या कल्पनेनें झपाटून तो प्राणास मुकला.  हा सगळा खेळ अज्ञानाच्यामुळें निर्माण झालेल्या खोट्या कल्पनेचा आहे. ही गोष्ट जाणते लोक ओळखतात.   
जाणत्यास कळे वर्म । नेणत्याचें खोटे कर्म ।
सकळ कांहीं धर्माधर्म । जाणतां कळे ॥ ३३ ॥
३३) जाणत्याला रहस्य कळतें. नेणत्याचें कर्म खोटें असतें. तो चुकीचें कर्म करतो. धर्म कोणता व अधर्म कोणता हें जाणत्याला सर्व कळतें. 
नेणत्यास येमयातना । जाणत्यास कांहींच लागेना ।
सकळ जाणोन विवंचना । करी तो मुक्त ॥ ३४ ॥
३४) अज्ञानी माणसाला यमयातना भोगाव्या लागतात. पण ज्ञानी माणसाचा त्यांच्याशी संबंध येत नाही. सगळें जाणून तो सारासार विचार करतो तो मुक्त होतो. 
नेणतां कांहीं राजकारण । अपमान करुन घेती प्राण ।
नेणतां कठीण वर्तमान । समस्तांस होये ॥ ३५ ॥
३५) व्यवहारामध्यें प्रसंगानुसार कसें वागावें हें ज्याला कळत नाहीं, असा माणूस दुसर्‍याचा अपमान करतो. आणि त्याचा प्राण देखिल घेतो. अशा अज्ञानी माणसाच्या वागण्यामुळें सर्वानांच मोठा कठीण प्रसंग प्राप्त होतो.  
म्हणौनियां नेणणें खोटें । नेणते प्राणी ते करंटे ।
जाणतां विवरता तुटे । जन्ममरण ॥ ३६ ॥
३६) म्हणून अज्ञान वाईट आहे. अज्ञानी माणूस करंटा असतो. भग्यहीन असतो. अज्ञानाचा हा परिणाम ओळखून जो आत्मानात्मविवेक करतो तो जन्ममरणांतून मुक्त होतो. 
म्हणोन अलक्ष करुं नये । जाणणें हाचि उपाये ।
जाणतां सापडे सोये । परलोकाची ॥ ३७ ॥
३७) म्हणून ज्ञानाकडे दुर्लक्ष करुं नये. ज्ञानाची हेळसांड करुं नये. ज्ञान हाच सर्वोत्तम उपाय आहे. ज्ञानच्या उपायानेंच परमार्थाचा लाभ घडणें सोपें होते. 
जाणणें सकळांस प्रमाण । मूर्खास वाटे अप्रमाण ।
परंतु अलिप्तपणाची खूण । जाणतां कळे ॥ ३८ ॥
३८) ज्ञानाचें थोरपण सर्वांनाच मान्य आहे. मूर्खाला तें पटत नाहीं. अलिप्त कसें राहतां येतें तें ज्ञान झाल्यावरच समजतें. 
येक जाणणें करुन परतें । कोण सोडी प्राणीयातें ।
कोणी येक कार्य जें तें । जटिल्याविण न कळे ॥ ३९ ॥
३९) ज्ञानाल जर बाजूला सारलें तर माणसाला अज्ञानांतून मोकळे करणारें कोणी नाही. कार्य कोणतेंही असले तरी तें ज्ञानाशिवाय तें कसें करावें हें  कळणार नाहीं.  
जाणणें म्हणिजें स्मरण । नेणणें म्हणिजे विस्मरण ।
दोहींमधें कोण प्रमाण । शाहाणे जाणती ॥ ४० ॥
४०) ज्ञान हें स्मरण तर अज्ञान हें विस्मरण आहे. या दोन्हीमध्यें मान्य कोणतें हें शहाणें पुरुष जाणतात. 
जाणते लोक ते शाहाणे । नेणते वेडे दैन्यवाणे ।
विज्ञान तेहि जाणपणें । कळों आलें ॥ ४१ ॥
४१) ज्ञानी लोक खरे शहाणें असतात. अज्ञानी लोक वेडे व दैन्यवाणें असतात. स्वरुपानुभव काय असतो हें ज्ञानानेंच कळायला लागतें. 
जेथें जाणपण खुंटलें । तेथें बोलणें हि तुटलें ।
हेतुरहित जालें । समाधान ॥ ४२ ॥
४२) ज्ञानानें अज्ञान नाहींसे होते. आणि नंतर ज्ञानदेखिल विलीन होऊन जातें. '" मी देव आहे " या अनुभवानें " मी देहच आहे " हें भान लोपतें नंतर " मी देव आहे" हें भान देखील परब्रह्मांत लीन होतें. त्या ठिकाणीं भाषा बंद पडतें. अत्यंत वासनारहित असें संपूर्ण समाधान लाभते. 
श्रोते म्हणती हें प्रमाण । जालें परम समाधान ।
परी पिंडब्रह्मांडऐक्यलक्षण । मज निरोपावें ॥ ४३ ॥
४३) वरील विवेचन ऐकून श्रोत्यांना वक्त्याचें म्हणणें पटलें. त्यांना अगदी समाधान प्राप्त झालें. मग पिंड व ब्रह्मांड दोन्ही सारखें कसें तें ऐकण्याची इच्छा त्यांनी सांगितली.  
ब्रह्मांडी तेंचि पिंडीं असे । बहुत बोलती ऐसें ।
परंतु याचा प्रत्यय विलसे । ऐसें केलें पाहिजे ॥ ४४ ॥
४४) " जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं " असें पुष्कळ लोक म्हणतात. याचा खरा अर्थ आम्हाला समजेल असें आपण विवेचन करावें.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे जाणपणनिरुपणनाम समास चवथा ॥
amas Chavatha Janapan Nirupan 
समास चवथा जाणपण निरुपण 



Custom Search

No comments:

Post a Comment