Friday, November 3, 2017

Samas Pachava Anuman Nirshan समास पांचवा अनुमाननिर्शन

Dashak Navava Samas Pachava Anuman Nirshan 
Samas Pachava Anuman Nirshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Anuman and Experience in this Samas. Anuman means talking without Experience. The person who is having true Experience can talk with the people based on the knowledge gained out of his own experience and people give lot of weight to what he say.
समास पांचवा अनुमाननिर्शन 
श्रीराम ॥
पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । नये आमुच्या अनुमाना ।
प्रचित पाहातां नाना । मतें भांबावती ॥ १ ॥
१) ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे, हें कांहीं मनाला पटत नाही. प्रत्यक्ष अनुभव बघायला जावें तर अनेक मतांचा गोधळ आढळतो.  
जें पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । ऐसी बोलावयाची प्रौढी ।
हें वचन घडीनें घडी । तत्वज्ञ बोलती ॥ २ ॥
२) " जें पिंडीं तें ब्रह्मांडी " असे बोलण्याची एक सवय झाली आहे. तत्त्वज्ञसुद्धं हें वाक्य पुन्हा पुन्हा सांगतात.    
पिंड ब्रह्मांड येक राहाटी । ऐसी लोकांची लोकधाटी ।
परी प्रत्ययाचे परीपाटीं । तगों न सके ॥ ३ ॥
३) पिंडाचा व्यवहार व ब्रह्मांडाचा व्यवहार दोन्ही एकसारखेंच आहेत, असें बोलण्याची लोकांना सवय झाली आहे. पण त्याचा खरेंपणा पाहण्याचा प्रयत्न केला तर तें टिकत नाहीं.    
स्थूळ सूक्ष्म कारण माहाकारण । हे च्यारी पिंडींचे देह जाण ।
विराट हिरण्य अव्याकृत मूळप्रकृते हे खूण । ब्रह्मांडींची ॥ ४ ॥ 
४) पिंडाचे चार देह आहेत. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकारण. ब्रह्मांडाचे चार देह विराट, हिरण्य, अव्याकृत व मूळप्रकृति.   
हे शास्त्राधाटी जाणावी । परी प्रचित कैसी आणावी ।
प्रचित पाहातां गथागोवी । होत आहे ॥ ५ ॥
५) शास्त्रांमध्यें अशाप्रकारचे वर्णन आहे. पण त्याचा अनुभव कसा घ्यावयाचा असा प्रश्र्ण आहे. तसा प्रयत्न केला तर शास्त्रांमधलें काल्पनिक वाटते. 
पिंडीं आहे अंतःकरण । तरी ब्रह्मांडी विष्णु जाण ।
पिंडीं बोलिजेतें मन । तरी ब्रह्मांडीं चंद्रमा ॥ ६ ॥
६) असें कां वाटतें पाहा. पिंडांत जसें अंतःकरण तसा ब्रह्मांडांत विष्णु होय. पिंडांत जसें मन तसा ब्रह्माडांत चंद्र होय. 
पिंडीं बुद्धी ऐसे बोलिजे । तरी ब्रह्मांडीं ब्रह्मा ऐसेम जाणिजे ।
पिंडीं चित्त ब्रह्मांडीं वोळखिजे । नारायेणु ॥ ७ ॥
७) पिंडांत जशी बुद्धि तसा ब्रह्माडांत ब्रह्मदेव. पिंडांत जसें चित्त तसा ब्रह्मांडांत नारायण. 
पिंडीं बोलिजे अहंकार । ब्रह्मांडीं रुद्र हा निर्धर ।
ऐसा बोलिला विचार । शास्त्रांतरीं ॥ ८ ॥
८) पिंडांत जसा अहंकार तसा ब्रह्माडांत निःसंशयपणें रुद्र. शास्त्रांमध्यें हें असें वर्णन आढळते. 
तरी कोण विष्णूचें अंतःकर्ण । चंद्राचें कैसें मन ।
ब्रह्मयाचें बुद्धिलक्षण । मज निरोपावें ॥ ९ ॥
नारायेणाचें कैसें चित्त । रुद्रअहंकाराचा हेत । 
हा विचार पाहोन नेमस्त । मज निरोपावा ॥ १० ॥
९-१० ) यावर पुढील शंका काढल्या. विष्णूचें अंतःकरण कोणतें ? चंद्राचे मन कसे आहे? ब्रह्मदेवाच्या बुद्धीचें लक्षण काय ? नारायनाचें चित्त कसें असतें ? रुद्राचा अहंकार कश्या स्वरुपाचा असतो? या सर्व प्रश्र्नांची उत्तरें स्वामीनीं विचारपूर्वक व निश्र्चयात्मक द्यावी.
प्रचितनिश्र्चयापुढें अनुमान । जैसें सिंहापुढें आलें स्वान ।
खर्‍यापुढें खोटे प्रमाण । होईल कैसें ॥ ११ ॥
११) सिंहासमोर कुत्र्याला कांहींच किंमत नसते. त्याचप्रमाणें प्रत्यक्ष अनुभवांतून निर्माण होणार्‍या निश्र्चयात्मक ज्ञानापुढें नुसत्या अनुमानाची किंमत अगदी कमी असते. खर्‍या पुढें खोट्याला कोणीही प्रमाण मानणार नाहीं.
परी यास पारखी पाहिजे । पारखीनें निश्र्चय लाहिजे ।
परीक्षा नस्तां राहिजे । अनुमानसंशईं ॥ १२ ॥
१२) पण प्रचीतीचें महत्व ध्यानांत येण्यासाठीं खरा परीक्षक हवा. नीट परीक्षा केली म्हणजें खरें काय आहे याचा निश्र्चय करता येतो. तसें केलें नाहींतर माणुस अनुमानाच्या संशयजालामध्यें गुंतुन राहतो.   
विश्र्णु चंद्र आणी ब्रह्मा । नारायेण आणी रुद्रनामा ।
यां पाचांचीं अंतःकर्णपंचकें आम्हा । स्वामी निरोपावीं ॥ १३ ॥
१३) विष्णु, चंद्र, ब्रह्मदेव, नारायण आणि रुद्र या पांच देवतांची जीं पांच अंतःकरणें आहेत ती स्वामीनीं आम्हांला समजवून सांगावी.  
येथें प्रचित हें प्रमाण । नलगे शास्त्राचा अनुमान ।
अथवा शास्त्रीं तरी पाहोन । प्रत्ययो आणावा ॥ १४ ॥
१४) या विषयामध्यें प्रत्यक्ष अनुभवाचा पुरावा पाहिजे. शास्त्रांनी काढलेल्या अनुमानांना येथें महत्व नाहीं. किंवा शास्त्रांनी सांगितलेलें विचारांत घ्यावयाचे असेल तर तें प्रत्यक्ष अनुभवानें सिद्ध झालें पाहिजें.  
प्रचितीवीण जें बोलणें । तें अवघेंचि कंटाळवाणें ।
तोंड पसरुन जैसें सुणें । रडोन गेलें ॥ १५ ॥  
१५) स्वतः अनुभव घेतल्यावांचून नुसतें सिद्धांत बोलत सुटणे म्हणजे शब्दज्ञान त्याचा कंटााळा येतो. तोंडाचा आ वासून एखादें कुत्रे रडलें तर तें जसें ऐकवत नाहीं तसा कोरड्या शब्दज्ञानाचा प्रकार होतो.        
तेथें काये हो ऐकावें । आणी काये शोधून पाहावें ।
जेथें प्रत्ययाच्या नावें । सुन्याकार ॥ १६ ॥
१६) जें बोलणें अनुभवानें शून्य असते, तें ऐकण्यांत कांहीं अर्थ नाहीं. तसेंच त्यावर मनन करुनही निश्र्चित असें ज्ञान हातीं लागत नाहीं. 
आवघें आंधळेचि मिळाले । तेथें डोळसाचें काय चाले ।
अनुभवाचे नेत्र गेले । तेथें अंधकार ॥ १७ ॥
१७) ज्या घोळक्यामध्यें सगळेच आंधळें असतात, तेथें एकट्या डोळस माणसाचें कोणी ऐकत नाहीं. त्याचप्रमाणें जेथें स्वानुभवाचे नेत्र नाहींत तेथें स्वरुपाबद्दल सगळा अंधःकारच आढळून येतो. 
नाहीं दुग्ध नाहीं पाणी । केली वीष्ठेची सारणी ।
तेथें निवडायाचे धनी । तें एक डोंबकावळे ॥ १८ ॥
१८) देहबुद्धीची माणसें डोमकावळ्यासारखी असतात. ते दृश्याची घाण चिवडत बसतात. घाणीमधील निवडानिवड करण्यांत डोमकावळे प्रवीण असतात.  
आपुले इच्छेनें बोलिलें । पिंडाऐसें ब्रह्मांड कल्पिलें ।
परी तें प्रचितीस आलें । कोण्या प्रकारें ॥ १९ ॥
१९) पिंडाप्रमाणें ब्रह्मांडाची रचना असते अशी कल्पना करुन ती आपल्या मनास येईल तशी बोलून दाखवायची, अशी पद्धत दिसते. आपण बोलतों त्यास पुरावा कोणता आहे आणि त्याचा अनुभव कसा घ्यावयाचा हें कोणी सांगत नाहीं. 
म्हणोन हा अवघाच अनुमान । अवघें कल्पनेचें रान ।
भलीं न घ्यावें आडरान । तश्करीं घ्यावें ॥ २० ॥
२०) म्हणून " पिंडी तें ब्रह्मांडी " हा सगळा अनुमानाचा खेळ आहे. हें कल्पनेचें जंगल आहे. चांगल्या माणसानें यांत शिरु नये. चोरांनी शिरावें.  
कल्पून निर्मिले मंत्र । देव ते कल्पनामात्र । 
देव नाहीं स्वतंत्र । मंत्राधेन ॥ २१ ॥   
२१) कोणाच्या तरी मनांत कल्पना येते. तो मंत्र रचतो. त्या मंत्राची देवता कल्पनेंतूनच निर्माण होते. त्यामंत्रानें त्या देवतेची प्राणप्रतिष्ठा करतात. याचा अर्थ असा देवता स्वतंत्र नसतात, त्या मंत्राधीन असतात.  
येथें न बोलतां जाणावें । बोलणें विवेका आणावें ।
आंधळें पाउलीं वोळखावें । विचक्षणें ॥ २२ ॥
२२) या गोष्टी स्पष्टपणें बोलण्याच्या नसतात. मनांतल्या मनांत त्या ओळखून तें प्रमाण मानावें शास्त्रें किंवा विद्वान यांचे बोलणें खरेंखोटें निवडून घ्यावें. चालण्यावरुन माणूस आंधळा आहे हें शहाणी माणसें ओळखतात. त्याचप्रमाणें बोलनें अनुभवाचे आहें किंवा नाहीं हें ओळखून तें प्रमाण मानावें.  
जयास जैसें भासलें । तेणें तैसे कवित्व केलें ।
परी हें पाहिजे निवडिलें । प्रचितीनें ॥ २३ ॥
२३) ज्या माणसाला जसा भास होतो तसें तो काव्यरुपानें देवता वर्णन करतो किंवा वस्तुवर्णन करतो. पण त्याचे बोलणें खरें आहे कां नाहीं हें अनुभवानें ठरविलें पाहिजे.  
ब्रह्मयानें सकळ निर्मिलें । ब्रह्मयास कोणें निर्माण केलें ।
विष्णूनें विश्व पाळिलें । विष्णूस पाळिता कवणु ॥ २४ ॥
२४) ब्रह्मदेवानें हे सारे विश्र्व निर्माण केलें असें म्हटलें तर त्या ब्रह्मदेवाला कोणी निर्माण केलें हा प्रश्र्न मनांत येतो. विष्णु विश्वाचा सांभाळ करतो ासें म्हटलें तर विष्णुचा सांभाळ कोण करतो हा प्रश्र्न येतो.  
रुद्र विश्वसंव्हारकर्ता । परी कोण रुद्रास संव्हारिता ।
कोण काळाचा नियंता । कळला पाहिजे ॥ २५ ॥
२५) रुद्र विश्वाचा संहार करतो असें म्हतलें तर रुद्राचा संहार कोण करतो हा प्रश्न येतो. काळ सगळ्याचें नियमन करतो असें म्हतले तर त्या काळाचा नियंता कोण असा प्रश्ण येतो.   
याचा कळेना विचार । तों अवघा अंधकार ।
म्हणोनियां सारासार । विचार करणें ॥ २६ ॥
२६) या प्रश्नांची उत्तरें देता येत नाहीत. तोपर्यंत संपूर्ण अज्ञानाचा अंधार आहे हें ओळखून राहावें. या कारणासाठीं आत्मानात्मा विचार करावा लागतो.   
ब्रह्मांड स्वभावेंचि जालें । परंतु हें पिंडाकार कल्पिलें ।
कल्पिलें परी प्रत्यया आलें । नाहीं कदा ॥ २७ ॥
२७) ब्रह्मांड आपोआप घडलेले आहे. परंतु त्याची रचना पिंडासारखी आहे अशी कल्पना केली खरी पण ती खरी असल्याचा अनुभव कधींच कोणाला आला नाहीं.   
पाहातां ब्रह्मांडाची प्रचिती । कित्येक संशय उठती ।
हें कल्पनिक श्रोतीं । नेमस्त जाणावें ॥ २८ ॥
२८) खरेंच ब्रह्मांड हें पिंडासारखें आहे कां, याचा शोध घेऊ लागल्यास कितीतरी संशय निर्माण होतात. म्हणून ही केवळ कल्पना आहे असें श्रोत्यांनी ेनिश्र्चितपनें समजावें. 
पिंडासारिखी ब्रह्मांडरचना । कोण आणितो अनुमाना ।
ब्रह्मांडीं पदार्थ नाना । ते पिंडीं कैंचे ॥ २९ ॥
२९) ब्रह्मांडाची रचना पिंडासारखी आहे असें म्हणणारे त्यावर संपूर्ण विचार  करत नाहींत. कारण ब्रह्मांडामध्यें असंख्य पदार्थ आहेत. तें पिंडामध्यें असणें शक्य नाही. 
औटकोटी भुतावळी । औटकोटी तीर्थावळी 
औटकोटी मंत्रावळी । पिंडीं कोठें ॥ ३० ॥
३०) ब्रह्मांडामध्यें साडेतीन कोटी भूतें आहेत, साडेतीन कोटी तीर्थें आहेत, साडेतीन कोटी मंत्र आहेत हें सगळें पिंडांत असणें शक्य नाहीं. 
तेतीस कोटी सुरवर । अठ्यांसि सहस्त्र ऋषेश्र्वर ।
नवकोटी कात्यायेणीचा विचार । पिंडीं कोठें ॥ ३१ ॥
३१) ब्रह्मांडामध्यें तेहतीस कोटी देव आहेत, अठ्ठ्याऐंशी हजार ऋषीश्र्वर आहेत, नऊ कोटी कात्यायनी देवता आहेत, हे सगळे पिंडांत असणें शक्य नाही.  
च्यामुंडा छपन्न कोटी । कित्येक जीव कोट्यानुकोटी ।
चौर्‍यासी लक्ष योनींची दाटी । पिंडी कोठें ॥ ३२ ॥
३२) ब्रह्मांडामध्यें छप्पन कोटी चामुंडा आहेत. कोट्यावधि जीव आहेत. चौर्‍याऐंशी लाख योनीमधील प्राण्यांची गर्दी आहे. हें सगळें पिंडांत असणें शक्य नाहीं.   
ब्रह्मांडीं पदार्थ निर्माण जाले । पृथकाकारें वेगळाले ।
तेहि तितुके निरोपिले । पाहिजेत पिंडीं ॥ ३३ ॥     
३३) वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळे कितीतरी पदार्थ ब्रह्मांडांत निर्माण झालेले आहेत. ते सगळे पिंडामध्यें आहेत असे दाखवता येणें शक्य नाहीं.  
जितुक्या औषधी तितुकीं फळे । नाना प्रकारीं रसाळें ।
नाना बीजें धान्यें सकळें । पिंडीं निरोपावीं ॥ ३४ ॥
३४) असंख्य वनस्पति आहेत. तसेंच असंख्य रसाळ फळें आहेत. नाना प्राकारची बीजें, नाना प्रकारची धान्यें आहेत. ही सगळी पिंडामध्यें दाखविता येणें शक्य नाही.  
हें सांगतां पुरवेना । तरी उगैंचि बोलावेना ।
बोलिलें न येतां अनुमाना । लाजिरवाणें ॥ ३५ ॥
३५) अशा रीतीनें हें सांगतां सांगतां संपणार नाहीं. म्हणून पिंडब्रह्मांडाची रचना सारखी आहे असें बोलू नये. जें बोलतो तें तर्कानें खरें ठरणार नसेल तर लाजिरवाणेंच समजावें. 
तरी हें निरोपिलें नवचे । फुकट बोलतां काय वेचे ।
याकारणें अनुमानाचें । कार्य नाहीं ॥ ३६ ॥
३६) पिंड ब्रह्मांड यांची रचना सारखी हें दाखविता येत नसतां फुकट बोलायला काय लागतें ? म्हणून या बाबतींत उगीच कल्पना करण्यांत अर्थ नाही. 
पांच भूतें ते ब्रह्मांडी । आणि पांचचि वर्तती पिंडीं ।
याची पाहावी रोकडी । प्रचीत आतां ॥ ३७ ॥
३७) हें सारें विश्व पांच महाभूतांचे बनलेलें आहे. पिंडदेखील त्याच महाभूतांचा बनलेला आहे. याचा साक्षात रोकडा अनुभव कोणीही घ्यावा. 
पांचा भूतांचें ब्रह्मांड । आणी पंचभूतिक हें पिंड । 
यावेगळें तें उदंड । अनुमानज्ञान ॥ ३८ ॥
३८) विश्व असें पंचभूतांचें विणलेले आहे, हा प्रत्यक्ष अनुभव आहे. या व्यतिरिक्त आणखी बोलणें हें भरमसाट कल्पनेचे खूळ आहे असें समजावें.  
जितुकें अनुमानाचें बोलणें । तितुकें वमनप्रायें त्यागणें ।
निश्र्चयात्मक तेंचि बोलणें । प्रत्ययाचें ॥ ३९ ॥
३९) जें अनुमानाचें बोलणें तें ओकारीप्रमाणें बाजूस सारावें. अनुभवाचें बोलणें नेहमी निश्चयात्मक असते.   
जें चि पिंडीं तेंचि ब्रह्मांडीं । प्रचित नाहीं कीं रोकडी ।
पंचभूतांची तांतडी । दोहीकडे ॥ ४० ॥
४०) जें पिंडीं आहे तेंच ब्रह्मांडी आहे या वचनाचा अनुभव असा रोकडा घेतां येतो. पिंडांत काय किंवा ब्रह्मांडांत काय दोहीकडें पंचभूतांची गडबड चालू आहे.   
म्हणोनि देहींचे थानमान । हा तों अवघाचि अनुमान ।
आतां येक समाधान । मुख्य तें कैसें ॥ ४१ ॥
४१) म्हणून ब्रह्मांडामधील स्थानें आणि इतर गोष्टी पिंडामध्यें म्हणणे म्हणजे देहामध्ये पाहण्याचा प्रयत्न करणें हा केवळ कल्पनेचा खेळ आहे. तो खरा नाही> खरें समाधान कसें असतें त्याचा विचार आतां करुं.   
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अनुमाननिर्शननाम समास पांचवा ॥
Samas Pachava  Anuman Nirshan
समास पांचवा अनुमाननिर्शन 


Custom Search

No comments:

Post a Comment