Wednesday, November 29, 2017

Samas Navava Purusha Prakruti समास नववा पुरुषप्रकृती


Dashak Dahava Samas Navava Purusha Prakruti 
Samas Navava Purusha Prakruti, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Purusha and Prakruti in this Samas. Their relation with MoolMaya and much more is described in here.
समास नववा पुरुषप्रकृती 
श्रीराम ॥
आकाशीं वायो जाला निर्माण । तैसी ब्रह्मीं मूळमाया जाण ।
त्या वायोमधें त्रिगुण । आणी पंचभूतें ॥ १ ॥
१) आकाशामधें जसा वायु निर्माण होतो, तशी परब्रह्मामधें मूळमाया झाली. त्या वायुमधें तीन गुण व पांच भूतें असतात. 
वटबीजी असे वाड । फोडून पाहातां न दिसे झाड ।
नाना वृक्षांचे जुंबाड । बीजापासून होती ॥ २ ॥
२) वडाचे बी लहान असतें. पण त्यांत वडाचा मोठा वृक्ष असतो. तें बीज फोडून पाहिलें तर त्यांत तो वृक्ष दिसत नाहीं. अनेक वृक्षांचे समूह त्या बीजापासून होतात. 
तैसी बीजरुप मूळमाया । विस्तार जाला तेथुनियां ।
तिचें स्वरुप शोधुनियां । बरें पाहावें ॥ ३ ॥
३) मूळमाया त्या बीजासारखींच आहे. तिच्यामध्यें या विश्र्वरुप प्रचंड वृक्षाचा विस्तार होतो. त्या मूळमायेचे स्वरुप कसें आहें तें खोल सूक्ष्म विचारानें शोधून पहावें.  
तेथें दोनी भेद दिसती । विवेकें पाहावी प्रचिती ।
निश्र्चळीं जे चंचळ स्थिती । तोचि वायो ॥ ४ ॥
४) मूळमायेचा शोध घेतांना दोन तत्वें आढळतात. सूक्ष्म विचारानें त्यांचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा. निश्चळ स्वरुपामध्यें जी हालचाल होतें तोच वायु होय. 
तयामधें जाणीवकळा । जगज्जोतीचा जिव्हाळा ।
वायो जाणीव मिळोन मेळा । मूळमाया बोलिजे ॥ ५ ॥
५) त्या वायुमध्यें शुद्ध जाणीव वास करते. ती जाणीव म्हणजेच जगत् ज्योतीचा मूळ झरा आहे. म्हणून वायु आणी त्यामधील शुद्ध जाणीव दोन्ही मिळून मूळमाया असते.  
सरिता म्हणतां बायको भासे । तेथें पाहातां पाणीच असे ।
विवेकी हो समजा तैसें । मूळमायेसी ॥ ६ ॥
६) सरिता म्हणजे नदी, पण तो शब्द उच्चारताच बाईची कल्पना मनांत येते. पण ते प्रत्यक्ष पाणीच असते. तसेंच मूळमायेच्या बाबतींत होते. परंतु तें तसें नाहीं हें ध्यानांत ठेवून मूळमायेचा शोध घ्यावा. 
वायो जाणीव जगज्जोती । तयास मूळमाया म्हणती ।
पुरुष आणी प्रकृती । याचेंच नांव ॥ ७ ॥
७) वायु, जाणीव आणि जगत्ज्योती यांच्या मेळ्याला मूळमाया म्हणतात. पुरुष व प्रकृति हें मूळमायेचेंच नांव आहे. 
वायोस म्हणती प्रकृती । आणि पुरुष म्हणती जगज्जोती ।
पुरुषप्रकृती शिवशक्ती । याचेंच नांव ॥ ८ ॥
८) वायुला म्हणतात प्रकृति व जगत्ज्योतीला म्हणतात पुरुष. पुरुषप्रकृति यांनाच शिवशक्ति हें दुसरें नांव आहे. 
वायोमधें जाणीव विशेष । तोचि प्रकृतीमधें पुरुष ।
ये गोष्टीचा विश्र्वास । धरिला पाहिजे ॥ ९ ॥
९) वायुमधें जी विशेष जाणीव आढळते तोच प्रकृतिमधील पुरुष होय. या गोष्टीचा विश्र्वास धरणें जरुर आहे. 
वायो शक्ति जाणावी ईश्र्वर । अर्धनारी नटेश्र्वर ।
लोक म्हणती निरंतर । येणें प्रकारें ॥ १० ॥
१०) वायु, शक्ति आणि जाणीव ईश्र्वर होय. अशा रीतीनें लोक अर्धनारी नटेश्र्वर असा नेहमीं उल्लेख करतात. 
वायोमध्यें जाणीव गुण । तेंचि ईश्र्वराचें लक्षण ।
तयापासून त्रिगुण । पुढें जाले ॥ ११ ॥
११) वायूमधें जाणीवेचा जो गुण आहे तें ईश्र्वराचें लक्षण समजावें. त्याच्यापासून नंतर सत्व, रज व तम हें तीन गुण निर्माण होतात. 
तया गुणांमधें सत्वगुण । निखळ जाणीवलक्षण ।    
त्याचा देहधारी आपण । विष्णु जाला ॥ १२ ॥
१२) त्यापैंकीं सत्वगुण शुद्ध जाणीव आहे. त्या गुणाचा देह धारण केला तो विष्णू होय. 
त्याच्या अंशें जग चाले । ऐसें भगवद्गीता बोले ।
गुंतले तेचि उगवले । विचार पाहातां ॥ १३ ॥
१३) त्याच्या अंशानें जग चालते असें भगवत्गीता म्हणते. दृश्यामधें गुंतल्यानें शुद्ध जाणीवेचा हा अंश लोपून जातो. जे सूक्ष्म विचार करुन पाहातात त्यांना तो प्रचितीला येतो.  
येक जाणीव वांटली । प्राणीमात्रास विभागली ।  
जाणजाणों वांचविली । सर्वत्र काया ॥ १४ ॥
१४) ज्या जाणीवेचा विष्णु झाला ती जाणीव सर्व प्राण्यामध्यें विभागली गेली. तिच्या प्रेरणेनें प्रत्येक प्राणी समजून आपल्या देहाचे रक्षण करतो.  
तयेचे नांव जगज्जोती । प्राणीमात्र तिचेन जिती ।
याची रोकडी प्रचिती । प्रत्यक्ष पाहावी ॥ १५ ॥ 
१५) तिला जगत्ज्योति म्हणतात. प्रत्येक प्राणी तिच्यामुळें जिवंत राहतो. हा अगदी रोकडा प्रत्यक्ष अनुभव आहे. 
पक्षी श्र्वापद किडा मुंगी । कोणीयेक प्राणी जगीं ।
जाणीव खेळे त्याचा आंगीं । निरंतर ॥ १६ ॥
१६) पक्षी, जनावरें, किडे, मुंग्या वगैरे जे प्राणी जगांत आढळतात, त्यांच्या अंगांत जाणीव निरंतर खेळत असते.  
जाणोनि काया पळविती । तेणें गुणें वांचती ।
दडती आणि लपती । जाणजाणों ॥ १७ ॥
१७) एखादा कठिण प्रसंग आला कीं, प्राणी तो जाणीवेनेंच ओळखतात व ते तेथून पळून जातात व आपला जीव वाचवतात. या जाणिवेमुळेंच तें कधीं दडून किंवा लपून बसतात. 
आवघ्या जगास वांचविती । म्हणोनि नामें जगज्ज्योती ।
ते गेलियां प्राणी मरती । जेथील तेथें ॥ १८ ॥
१८) अशा रीतीनें ही जाणीव सर्व जगाला सांभाळते म्हणून तिला जगत्ज्योति म्हणतात. ती शरीरांतून बाहेर पडली कीं, माणूस जेथल्या तेथें मरुन पडतो. 
मुळींचे जाणीवेचा विकार । पुढें जाला विस्तार । 
जैसे उदकाचे तुषार । अनंत रेणु ॥ १९ ॥
१९) मूळ मायेमध्यें असणारी जाणीव अनंत व अपार असते. तिच्यामध्यें बदल झाला व पुढें हा सगळा पसारा झाला. पाणी मूळ एकच असते परंतु त्यामधून अनंत तुषार बाहेर पडतात. तें अत्यंत सूक्ष्म व लहान असतात. त्याच प्रमाणें मूळमायेमधील एकाच विशाल जाणीवेंतून अनंत छोटे अंश निर्माण झाले. तेच जगांत प्राण्यांच्या रुपानें पसरले.   
तैसे देव देवता देवतें  भूतें । मिथ्या म्हणों नये त्यांतें ।
आपलल्या सामर्थ्ये ते । सृष्टीमधें फिरती ॥ २० ॥
२०) म्हणून देव, देवता, दैवतें आणि भूतें यांना खोटें मानूं नये. ते जाणिवेचे भिन्न प्रकार आहेत. ज्याला ज्या प्रमाणांत जाणीव त्या प्रमाणांत त्याला सामर्थ्य असते. म्हणून या योनी विश्वामधें आपापल्या सामर्थ्याप्रमाणें वावरतात.   
सदा विचरती वायोस्वरुपें । स्वइच्छा पालटिती रुपें ।
अज्ञान प्राणी भ्रमें संकल्पें । त्यास बाधिती ॥ २१ ॥
२१) ते सदैव वायुरुपानें संचार करतात. मनास येईल तसा देह धारण करतात. अज्ञानी माणसांना त्यांच्या भ्रमामुळें किंवा संकल्पामुळें बाधा करतात. 
ज्ञात्यास संकल्पचि असेना । म्हणोन त्यांचेन बाधवेना ।
याकारणें आत्मज्ञाना । अभ्यासावें ॥ २२ ॥
२२) ज्ञानी माणसाला मुळीं संकल्पच नसतो. म्हणून त्यांना ही बाधा होऊ शकत नाहीं. या कारणासाठीं आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. 
अभ्यासिलीयां आत्मज्ञान । सर्व कर्मास होये खंडण ।
हे रोकडी प्रचित प्रमाण । संदेह नाहीं ॥ २३ ॥
२३) आत्मज्ञानाचा अभ्यास केला असतां सर्व कर्मांचा नाश होतो. माझा असा साक्षात अनुभव आहे. यामध्यें मुळींचसुद्धा संशय नाहीं.    
ज्ञानेविण कर्म विघडे । हें तों कदापि न घडे ।
सद्गुरुवीण ज्ञान जोडे । हेंहि अघटीत ॥ २४ ॥
२४) ज्ञानावाचून कर्माचें बंधन नाहींसें होते असें कधीही घडत नाहीं. त्याचप्रमाणें सद्गुरुवाचून ज्ञान झाले असें देखील कधीं घडलें नाही.
म्हणोन सद्गुरु करावा । सत्संग शोधून धरावा ।
तत्वविचार विवरावा । अंतर्यामीं ॥ २५ ॥
२५) म्हणून ज्याला आत्मज्ञान हवे असेल त्यानें सद्गुरु करावा. नीट चौकशी करुन संतसंगत करावी. आणि आपल्या अंतरंगांतच तत्वांचा विचार करावा.   
तत्वें तत्व निरसोन जातां । आपला आपणचि तत्वता ।
अनन्यभावें सार्थकता । सहजचि जाली ॥ २६ ॥
२६) तत्त्वांचा सूक्ष्म विचार करतां करतां एकानें दुसर्‍या तत्वाचा, दुसर्‍यानें तिसर्‍या तत्वाचा असा तत्वांचा निरास होतो. तत्त्वांचे निरसन झालें म्हणजे जें शिल्लक उरतें तें आपलें खरें शुद्ध स्वरुप होय. त्या शुद्ध स्वरुपाशीं आपण तदाकार झालो कीं आत्मसाक्षात्कार होतो. त्यामुळें आपोआप सार्थकता होते.   
विचार न करितां जें जें केलें । तें तें वाउगें वेर्थ गेलें ।
म्हणोनि विचारीं प्रवर्तलें । पाहिजे आधीं ॥ २७ ॥
२७) नीट विचार न करितां केलेल साधन वायां जातें म्हणून साधकानें प्रथम नीट विचार करायला सुरवात करावी.
विचार पाहेल तो पुरुष । विचार न पाहे तो पशु ।
ऐसी वचनें सर्वेशु । ठाईं ठाईं बोलिला ॥ २८ ॥
२८) जो नीट विचार करेल तोच खरा मनुष्य आहे. जो विचार करीत नाहीं तो पशु समजावा. अशा अर्थांची वचनें भगवंत ठिकठिकाणी बोलला आहे. 
सिद्धांत साधायाकारणें । पूर्वपक्ष लागे उडवणें ।
परंतु साधकां निरुपणें । साक्षात्कार ॥ २९ ॥
२९) सिद्धान्त काय आहे हें लक्षांत येण्यास प्रथम पूर्वपक्षाचे खंडण करावें लागतें. परंतु साधकाला या भनगडीची जरुर नसतें. त्याला नुसत्या स्वानुभवसंपन्न निरुपणानेच साक्षात्कार होतो.  
श्रवण मनन निजध्यास । प्रचितीनें बाणतां विश्र्वास ।
रोकडा साक्षात्कार सायास । करणेंचि नलगे ॥ ३० ॥
३०) प्रथम श्रवण करावें, त्याचें उत्तम मनन करावें, नंतर निदिध्यास लागावा. रात्रंदिवस मनांमध्यें तेंच घोळत राहातें. मग हळुहळु परमार्थमार्गांतील अनुभव येऊं लागतात. त्यानें साधकाची श्रद्धा अधिक दृढ बनत जाते. अखेर त्यास प्रत्यक्ष आत्मसाक्षात्कार होतो. त्यासाठीं काहीं निराळा प्रयत्न करावा लागत नाहीं.   
इति श्रीदासबोधें गुरुशिष्यसंवादे पुरुषप्रकृतीनाम समास नववा ॥
Samas Navava  Purusha Prakruti 
समास नववा पुरुषप्रकृती 


Custom Search

No comments:

Post a Comment