Saturday, December 2, 2017

Samas Dahava ChalaChal Nirupan समास दहावा चळाचळ निरुपण


Dashak Dahava Samas Dahava ChalaChal Nirupan 
Samas Dahava ChalaChal Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chala and Achala in this Samas. Chala means Maya, the world which we see. It is not permanent. While Achala means Brahma, which is permanent and we can’t see it.
समास दहावा चळाचळ निरुपण 
श्रीराम ॥
गगनासारिखें ब्रह्म पोकळ । उदंड उंच अंतराळ ।
निर्गुण निर्मळ निश्र्चळ । सदोदित ॥ १ ॥
१) आकाश जसें पोकळ आहेव कलपनेहूनही उंच आहे, तसेच ब्रह्मही आहे. परब्रह्म नेहमी निर्गुण, निर्मळ व निश्र्चळ असते.   
त्यास परमात्मा म्हणती । आणिक नामें नेणों किती ।
परी तें जाणिजे आदिअंतीं । जैसें तैसें ॥ २ ॥
२) त्यास परमात्मा म्हणतात. त्याला आणखी किती नांवें आहेत कोण जाणें? नांवें कितीही असली तें मात्र आदि व अंती अगदी जसेंच्या तसें असतें. 
विस्तीर्ण पसरला पैस । भोवतां दाटला अवकाश ।
भासचि नाहीं निराभास । जैंसे तैसें ॥ ३ ॥
३) अशी कल्पना करावी कीं, अतिशय मोठी जागा पसरली आहे. त्या जागेच्याभोवतीं आणखी खूप पोकळी पसरली आहे. अशा अनंत जागेवरुन परब्रह्माची थोडीशी कल्पना येईल. 
चहुंकडे पाताळतळीं । अंतचि नाहीं अंतराळीं । 
कल्पांतकाळीं सर्वकाळीं । संचलेंचि असे ॥ ४ ॥
४) चारही दिशांना, पाताळाच्या खालीम आणि वर अंतराळाच्याही पलीकडे पसरलेल्या परब्रह्माला कसलाही विकार नाहीं. सर्वकाळींच नव्हे तर कल्पान्ताच्या वेळींसुद्धा तें अगदी जसेंच्या तसेंच भरुन राहिलेले असते. 
ऐसें कांहींयेक अचंचळ । तें अचंचळीं भासे चंचळ ।
त्यास नामेंहि पुष्कळ । त्रिविधा प्रकारें ॥ ५ ॥
५) परब्रह्म अशी विलक्षण निश्चल वस्तु आहे. त्या निश्चल वस्तुमध्यें कांहीं चंचळ भासतें. त्याला नांवेंही अनेक प्रकारची आहेत. व त्यांचे तीन विभाग करतां येतात.  
न दिसतां नांव ठेवणें । न देखतां खूण सांगणें ।
असो हें जाणायाकारणें । नामाभिधानें ॥ ६ ॥
६) ते चंचल इंद्रियांना दिसत नाहीं तरी त्याला नांवें दिलेली आहेत. तें न पाहातां त्याची लक्षणें सांगितलेली आहेत. हें सगळें विचित्र आहे खरें. पण तें चंचल काय आहे याची कल्पना येण्यासाठीं त्याला अनेक नांवें देतात.     
मूळमाया मूळप्रकृति । मूळपुरुष ऐसे म्हणती ।
शिवशक्ति नामें किती । नाना प्रकारें ॥ ७ ॥
७) निश्चल परब्रह्मामध्यें भासणार्‍या चंचळाला मूळमाया, मूळप्रकृति, मूळपुरुष असें म्हणतात. त्यास शिवशक्ति हें एक नांव आहे. अशीं अनेक नांवें त्यास आहेत.  
परी जें नाम ठेविलें जया । आधीं वोळखावें तया ।
प्रचितीवीण कासया । वलगना करावी ॥ ८ ॥
८) परंतु आपण एखाद्या वस्तुला जेव्हां नांव देतो. तेव्हां आधी तिला जाणतो. वस्तुचें ज्ञान नसतांना उगीच शब्द वापरण्यांत कांहीं अर्थ नाहीं.   
रुपाची न धरितां सोये । नामासरिसें भरंगळों नये ।
प्रत्ययाविण गळंगा होये । अनुमानज्ञानें ॥ ९ ॥
९) वस्तूचें स्वरुप न कळतां नुसत्या नांवावरुन उगीच कल्पना करीत बसूं नये. वस्तु प्रत्यक्ष न पाहातां तिच्याविषयीं उगाच कल्पना करीत गेल्यास सगळाच गोंधळ होतो.   
निश्र्चळ गगनी चंचळ वारा । वाजों लागला भरारां ।
परी त्या गगना आणि समीरा । भेद आहे ॥ १० ॥
१०) निश्चळ आकाशामध्यें चंचळ वारा वाहुं लागला म्हणजे तो वेगळेपणानें अनुभवास येतो. वारा आकाशांतच उत्पन्न होतो व आकाशांतच वावरतो. परंतु त्या दोघांमध्यें भेद आढळतो.   
तैंसे निश्र्चळ परब्रह्म । चंचळ माया भासला भ्रम ।
त्या भ्रमाचा संभ्रम । करुन दाऊं ॥ ११ ॥
११) त्याचप्रमाणें परब्रह्म निश्चळ आहे. त्या परब्रह्मामध्यें चंचल माया निर्माण झाल्यास भास होतो. माया निर्माण झाली हें वाटणें हा भ्रमच आहे. त्या भ्रमाचा विस्तार कसा आहे तें आतां दाखवतो. 
जैसा गगनी चालिला पवन । तैसें निश्र्चळीं जालें चळण ।
इच्छा स्फूर्तिलक्षण । स्फूर्णरुप ॥ १२ ॥
१२) आकाशामध्यें वारा जसा वाहातो तशी निश्चळ ब्रह्मामध्यें हालचाल झाली. ही हालचाल इच्छारुप, स्फूर्तिरुप किंवा स्फुरणरुप असते. 
अहंपणें जाणीव जाली । तेचि मूळप्रकृति बोलिली ।
माहाकारणकाया रचली । ब्रह्मांडीची ॥ १३ ॥
१३) निर्विकार परब्रह्मास " मी ब्रह्म आहे " ही स्वतःची जाणीव उत्पन्न झाली. या जाणीवेलाच मूळ प्रकृति असें म्हणतात. ब्रह्मांडाचा महाकारण देह रचला गेला.  
माहामाया मूळप्रकृती । कारण ते अव्याकृती ।
सूक्ष्म हिरण्यगर्भ म्हणती । विराट ते स्थूळ ॥ १४ ॥
१४) महामाया ती मूळप्रकृति होय. अव्याकृत तो कारणदेह होय. हिरण्यगर्भ  तो सूक्ष्म देह आणि विराट तो स्थूल किंवा दृश्य समजावा. 
ऐसें पंचीकर्ण शास्त्रप्रमये । ईश्र्वरतनुचतुष्टये ।
म्हणोन हें बोलणें होये । जाणीव मूळमाया ॥ १५ ॥
१५) शास्त्रांमध्यें सिद्धान्तरुपानें जें पंचीकरण सांगितलें आहे त्याप्रमाणें ईश्र्वराचे हे चार देह आहेत. म्हणून मूळमायेमध्यें जाणीव आहे असें म्हणावें लागते. 
परमात्मा परमेश्र्वरु । परेश ज्ञानघन ईश्र्वरु ।
जगदीश जगदात्मा जगदेश्र्वरु । पुरुषनामें ॥ १६ ॥
१६) परमात्मा, परमेश्र्वर, परेश, ज्ञानघन, ईश्र्वर, जगदीश, जगदात्मा, जगदीश्र्वर, अशीं त्याची पुरुषवाचक नामें आहेत. 
सत्तारुप ज्ञानस्वरुप । प्रकाशरुप जोतिरुप । 
कारणरुप चिद्रुप । शुद्ध सूक्ष्म अलिप्त ॥ १७ ॥
१७) सत्तारुप, ज्ञानस्वरुप, प्रकाशरुप, ज्योतिरुप, कारणरुप, विद्रूप, शुद्ध, सूक्ष्म, अलिप्त, 
आत्मा अंतरात्मा विश्र्वात्मा । द्रष्टा साक्षी सर्वात्मा ।
क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा । देही कूटस्त बोलिजे ॥ १८ ॥
१८) आत्मा, अंतरात्मा, विश्वात्मा, द्रष्टा, साक्षी, सर्वात्मा, क्षेत्रज्ञ, शिवात्मा, जीवात्मा, देही, आणि कूटस्थ असेंही त्यास म्हणतात. 
इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा । येमात्मा धर्मात्मा नैरुत्यात्मा ।
वरुवायोकुबेरात्मा । ऋषीमुनिधर्ता ॥ १९ ॥
१९) इंद्रात्मा, ब्रह्मात्मा, हरिहरात्मा, यमात्मा, धर्मात्मा, नैरुत्यात्मा, वरुवायुकुबेरात्मा, ऋषिदेवमुनिधर्ता अशी देखिल त्यास नांवें आहेत.  
गण गंधर्व विद्याधर । येक्ष किन्नर नारद तुंबर ।
सर्व लोकांचें अंतर । तो सर्वांतरात्मा बोलिजे ॥ २० ॥   
२०) गण, गंधर्व, विद्याधर, यक्ष, किन्नर, नारद, तुंबर, यांचा आणि सर्व लोकांचा जो अंतर्यामीं त्यास सर्वातरात्मा म्हणतात.                 
चंद्र सूर्य तारामंडळें । भूमंडळें मेघमंडळें । 
येकवीस स्वर्गें सप्त पाताळें । अंतरात्माच वर्तवी ॥ २१ ॥
२१) चंद्र, सूर्य, तारामंडलें, भूमंडलें, मेघमंडलें, एकवीस स्वर्ग, आणि सात पाताळें, या सगळ्यांना अंतरात्माच चालवतो. 
गुप्त वल्ली पाल्हाळली । तिचीं पुरुषनामें घेतलीं ।
आतां स्त्रीनामें ऐकिलीं । पाहिजे श्रोतीं ॥ २२ ॥
२२) मूळमाया हीच कोणी एक गुप्त वेली आहे. ती भरमसाट फोफावली. तिला दिलेली पुरुषवाचक नामें सांगून झाली. आतां तिला दिलेली स्त्रीवाचक नामें ऐकावी.   
मूळमाया जगदेश्र्वरी । परमविद्या परमेश्र्वरी ।
विश्र्ववंद्या विश्र्वेश्र्वरी । त्रैलोक्यजननी ॥ २३ ॥
२३) मूळमाया, जगदीश्र्वरी, परमविद्या, परमेश्र्वरी, विश्ववंद्या, विश्वेश्र्वरी, त्रैलोक्यजननी,
अंतर्हेतु अंतर्कळा । मौन्यगर्भ जाणीवकळा ।
चपळ जगज्जोती जीवजकळा । परा पश्यंती मध्यमा ॥ २४ ॥
२४) अंतर्हेतु, अंतर्कळा, मौनगर्भी, जाणीवकळा, चपला, जगत्ज्योति, जीवनकळा, परा, पश्यन्ती, मध्यमा, 
युक्ति बुद्धि मति धारणा । सावधानता नाना चाळणा ।
भूत भविष्य वर्तमाना । उकलून दावी ॥ २५ ॥
२५) युक्ति, बुद्धि, मति, धारणा, सावधानता, अनेक प्रकारची शोधकबुद्धि, भूत, भविष्य, वर्तमान उलगडून दाखविणारी शक्ति,  
जागृति स्वप्न सुषुप्ती जाणे । तुर्या ताटस्ता अवस्ता जाणे ।
सुख दुःख सकळ जाणे । मानापमान ॥ २६ ॥  
२६) जागृति,स्वप्न व सुषुप्ति या अवस्था ती जाणते. तुर्या व तटस्थ अवस्था ती जाणते. सुख, दुःख व मानापमान हें सर्व ती जाणते.    
ते परम कठीण कृपाळु । ते परम कोमळ स्नेहाळु ।
ते परम क्रोधी लोभाळु । मर्यादेवेगळी ॥ २७ ॥
२७) ती अति कठोर आहे व अति कृपाळू आहे. ती अत्यंत कोमल आणि प्रेमळ आहे. ती अतिशय रागीट आहे. व कमालीची मायाळू आहे.   
शांती क्ष्मा विरक्ती भक्ती । अध्यात्मविद्या सायोज्यमुक्ति ।
विचारणा सहजस्थिति । जयेचेनी ॥ २८ ॥
२८) शांति, क्षमा, विरक्ति, भक्ति, अध्यात्मविद्या, सायुज्यमुक्ति, सूक्ष्म विचार करण्याची शक्ति आणि सहजस्थिति, तिच्या कृपेनें पदरीं पडतात. 
पूर्वीं पुरुषनामें बोलिलीं । उपरी स्त्रीनामें निरोपिलीं ।
आतां नपुषकनामें ऐकिलीं । पाहिजे चंचळाचीं ॥ २९ ॥
२९) प्रथम पुरुषवाचक नांवें सांगितलीं. मग स्त्रीवाचक नावें सांगितली. आतां या चंचळाची नपुसंक नांवें ऐकावी. 
जाणणें अंतःकर्ण चित्त । श्रवण मनन चैतन्य जीवित ।
येतें जातें सुचीत । होऊन पाहा ॥ ३० ॥
३०) जाणणें, अंतःकरण, चित्त, श्रवण, मनन, चैतन्य, जीवित, शरीरांत येणारें व जाणारें सूक्ष्म हें नीट लक्ष देऊन पाहावें.  
मीपण तूंपण जाणपण । ज्ञातेपण सर्वज्ञपण ।
जीवपण शिवपण ईश्र्वरपण । अलिप्तपण बोलिजे ॥ ३१ ॥
३१) मीपण, तूंपण, जाणपण, ज्ञातेपण, सर्वज्ञपण, जीवपण, शिवपण, ईश्र्वरपण, अलिप्तपण, अशीं नपुंसक नावें सांगून झालीं. 
ऐसीं नामें उदंड असती । परी ते येकचि जगज्जोती । 
विचारवंत ते जाणती । सर्वांतरात्मा ॥ ३२ ॥
३२) आतांपर्यंत सांगितलेलीं अशी नांवें खूप असलीं तरी मूळ जगत् ज्योति एकच आहे. एका सर्वांतरात्म्याचींच हीं सगळीं नांवें आहेत. असें विचारवंत ओळखून असतात.  
आत्मा जगज्जोती सर्वज्ञपण । तीनी मिळोन येकचि जाण ।
अंतःकर्णचि प्रमाण । ज्ञेप्तीमात्र ॥ ३३ ॥
३३) आत्मा, जगत्ज्योति आणि सर्वज्ञपणा हे तिन्ही मिळून अखेर एकच आहेत. शुद्ध जाणीवस्वरुप अंतःकरण हा याचा प्रत्यक्ष पुरावा आहे. 
ढीग जाले पदार्थाचे । पुरुष स्त्री नपुसंक नामांचे ।
परंतु सृष्टीरचनेचें । किती म्हणोन सांगावें ॥ ३४ ॥
३४) पुरुषवाचक, स्त्रीवाचक व नपुंसकवाचक नांवें असणार्‍या अक्षरशः अगणित वस्तु आहेत. त्यांचे ढीगचे ढीग आहेत. त्यांचे अनेक प्रकार आहेत. ते सगळे सांगणें शक्य नाहीं.  
सकळ चाळिता येक । अंतरात्मा वर्तवी अनेक ।
मुंगीपासून ब्रह्मादिक । तेणेंचि चालती ॥ ३५ ॥ 
३५) एक अंतरात्मा सर्वांना चालवतो. तोच नाना प्रकारची हालचाल घडवून आणतो. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्व जीव अंतरात्म्याच्या सत्तेनें काम करतात. 
तो अंतरात्मा आहे कैसा । प्रस्तुत वोळखाना आमासा ।
नाना प्रकारींचा तमासा । येथेंचि आहे ॥ ३६ ॥
३६) तो अंतरात्मा कसा आहे याची आतांच थोडीशी ओळख करुन घ्यावी. त्याच्या सत्तेमध्यें नाना प्रकारची मौज आढळते.  
तो कळतो परी दिसेना । प्रचित येते परी भासेना ।
शरीरीं असे परी वसेना । येके ठाईं  ॥ ३७ ॥
३७) तो आहे असें कळतें, पण तो दिसत नाहीं, त्याच्या अस्तित्वाचा अनुभव येतो पण तो वेगळेपणानें भासत नाहीं. तो शरीरांत असतो पण तो एकाच ठिकाणीं राहात नाहीं.  
तीक्ष्णपणें गगनीं भरे । सरोवर देखतां च पसरे ।
पदार्थ लक्षून उरे । चहुंकडे ॥ ३८ ॥
३८) एखाद्यावेळीं तो झटकन आकाशभर संचरतो. तर एखाद्यावेळीं मोठें सरोवर पाहून तो सरोवरभर पसरतो. अशा रीतीनें तो सर्व पदार्थ पाहून पुन्हा चहूंकडे उरतो. 
जैसा पदार्थ दृष्टीस दिसतो । तो त्यासारिखाच होतो ।
वायोहूनि विशेष तो । चंचळविषईं ॥ ३९ ॥
३९) जो पदार्थ दृष्टीस पडतो त्याच्या एवढा तो बनतो. त्याचे रुप घेतो. असे अनेक पदार्थ त्याच्या दृष्टीस पडतात. प्रत्येक पदार्थासारखा तो बनतो. म्हणून चंचलपणाच्या बाबतींत तो वायुला मागें टाकतो.   
कित्येकउ दृष्टीनें देखे । कितीयेक रसनेनें चाखे ।
कितीयेक ते वोळखे । मनेंकरुनि ॥ ४० ॥
४०) दृष्टीनें तो कितीतरी पाहातो, जिभेने कितीतरी चाकहतो. मनाच्या मदतीनें तो कितीतरी तो ओळखतो.
श्रोतीं बैसोन शब्द ऐकतो । घ्राणेंद्रियें वास घेतो ।
त्वचेइंद्रियें जाणतो । सीतोष्णादिक ॥ ४१ ॥
४१) कानांत शिरुन तो शब्द ऐकतो, नाकानें वास घेतो, त्वेचेनें थंड व गरम जाणतो. 
ऐशा जाणे अंतर्कळा । सकळामधें परी निराळा ।
पाहातां त्याची अगाध लीळा । तोचि जाणे ॥ ४२ ॥
४२) सर्वांच्या अंतर्यामीं राहून वागण्याची त्याची करामत अशी आहे. सर्वांमध्यें असून पुन्हा तो सर्वाहून निराळा आहे. त्याची लीला खरोखर अगाध आहे. त्याची लीला तोच जाणें.    
तो पुरुष ना सुंदरी । बाळ तारुण्य ना कुमारी ।
नपुसंकाचा देहधारी । परी नपुसक नव्हे ॥ ४३ ॥
४३) तो पुरुष नाहीं, तो स्त्री नाहीं, तो बाळ नाहीं, तरुण नाहीं किंवा कुमारी नाहीं. नपुंसक माणसाच्या देहांत राहून देखील तो नपुंसक नाहीं.   
तो चालवी सकळ देहासी । करुन अकर्ता म्हणती त्यासी ।
तो क्षेत्रज्ञ क्षेत्रवासी । देही कूटस्त बोलिजे ॥ ४४ ॥
४४) तो सर्व देहांना चालवतो. परंतु असें चालवून देखील सर्व करुन अकर्ता आहे असें त्याचे वर्णन करतात. देहांत असतांना त्याला क्षेत्रज्ञ, क्षेत्रवासी किंवा कूटस्थ असें म्हणतात.   
श्र्लोक 
द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च ।
क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्चते ॥
श्र्लोकाचा अर्थ
या लोकांत हे दोनच पुरुष आहेत. त्यांना क्षर आणि अक्षर असें म्हणतात. सर्व भूतें म्हणजे क्षर पुरुष तर कूटस्थ म्हणजे अक्षर पुरुष होय.  
दोनी पुरुष लोकीं असती । क्षराक्षर बोलिजेती ।
सर्व भूतें क्षर म्हणती । अक्षर कूटस्त बोलिजे ॥ ४५ ॥
४५) या विश्वामध्यें दोन पुरुष आहेत. त्यांना क्षर व अक्षर म्हणतात. सर्व भूतांना क्षर म्हणतात तर कूटस्थाला अक्षर असें म्हणतात. 
उत्तम पुरुष तो आणीक । निःप्रपंच निःकळंक ।
निरंजन परमात्मा येक । निर्विकारी ॥ ४६ ॥
४६) या दोन्हीहून निराळा असा एक उत्तम पुरुष आहे. तो अगदी प्रपंचरहित, कलंकरहित, मलरहित आणि विकाररहित असा परमात्मा होय. 
च्यारी देह निरसावे । साधकें देहातीत व्हावें ।
देहातीत होतां जाणावें । अनन्य भक्त ॥ ४७ ॥
४७) साधकानें चारही देहांचे निरसन करावें. त्यानें देहांच्या पलीकडे जावें. देहांच्या पलीकडे गेलेला भक्त अनन्य होतो.
देहमात्र निरसुनी गेला । तेथें अंतरात्मा कैसा उरला ।
निर्विकारीं विकाराला । ठाव नाहीं ॥ ४८ ॥
४८) चारही देहांचे निरसन झालें म्हणजे मग त्या ठिकाणीं अंतरात्मा -आंत राहणारा आत्मा उरत नाहीं. विकाररहित स्वरुपामध्यें विकाराला मुळीं जागाच नाहीं. 
निश्र्चळ परब्रह्म येक । चंचळ जाणावें माईक ।
ऐसा प्रत्यय निश्र्चयात्मक । विविकें पाहावा ॥ ४९ ॥
४९) परब्रह्म तेवढें एक निश्चळ आहे. बदलणारें जें आहे तें सारें मायामय आहे असें ओळखावें. अत्यंत खोल विचार करुन याचा निश्चयात्मक अनुभव घ्यावा.  
येथें बहुत नलगे खळखळ । येक चंचळ येक निश्र्चळ ।
शाश्र्वत कोणतें केवळ । ज्ञानें वोळखावें ॥ ५० ॥
५०) या बाबतींत उगीच फार खटपट करण्याची जरुर नाहीं. दोन गोष्टीं आहेत. एक निश्चय व एक चंचल. यापैकी शाश्वत कोणतें आहें ते ज्ञानानें, केवळ सूक्ष्म विविकानें ओळखून काढावें.    
असार त्यागून घेईजे सार । म्हणोन सारासार विचार ।
नित्यानित्य निरंतर । पाहाती ज्ञानी ॥ ५१ ॥
५१) असार काढून टाकून सार घेण्यासाथीं सारासार विचार करावयास हवा. शाश्वत काय आणी अशाश्वत काय याचा विचार ज्ञानीं माणसें निरंतर करीत असतात. 
जेथें ज्ञानचि होतें विज्ञान । जेथें मनांचे होते उन्मन ।
तेथें कैचें चंचळपण । आत्मयासी ॥ ५२ ॥
५२) निदिध्यासाच्या ज्ञानाचें जेव्हां विज्ञान होतें म्हणजे प्रत्यक्ष अनुभवांत रुपांतर होतें, त्याचप्रमाणें जेव्हां मनाचें मनपण जाऊन तें उन्मन बनतें, त्या अवस्थेमध्यें पूर्वीप्रमाणें अंतरात्म्याचें चंचलपण उरत नाहीं.  
सांगणोवांगणीचें काम नव्हे । आपुल्या अनुभवें जाणावें  ।
प्रत्ययाविण सिणावें । तेंचि पाप ॥ ५३ ॥
५३) मी हें जें बोलतों आहें तें सांगोवांगीचें काम नाही. आपण स्वतः अनुभव घेऊन हें जाणायचें आहे. अनुभवावाचून तक्रार करणें हें पाप आहे. 
सत्यायेवधें सुकृत नाहीं । असत्यायेवढें पाप नाहीं ।
प्रचितीविण कोठेंचि नाहीं । समाधान ॥ ५४ ॥ 
५४) सत्याएवढें पुण्य नाहीं, असत्याएवढें पाप नाहीं. अनुभवाशिवाय समाधान मिळणें शक्य नाहीं.          
सत्य म्हणिजे स्वरुप जाण । असत्य माया हें प्रमाण ।
येथें निरोपिलें पापपुण्य । रुपेंसहित ॥ ५५ ॥
५५) सत्य म्हणजे आत्मस्वरुप होय. असत्य म्हणजे माया होय. हें अनुभवसिद्ध आहे. पाप व पुण्य यांचीं लक्षणें हीं अशीं आहेत.  
दृश्य पाप वोसरलें । पुण्य परब्रह्म उरलें ।
अनन्य होतांच जालें । नामातीत ॥ ५६ ॥
५६) मायामय दृश्य हें पाप ओसरलें, म्हणजे मग परब्रह्मस्वरुप हें पुण्य तेवढें शिल्लक उरतें. त्याच्याशीं तदाकार झालें कीं नांवाच्या पलीकडे जातां येते. 
आपण वस्तु स्वतसिद्ध । तेथें नाहीं देहसमंध ।
पापरासी होती दग्ध । येणें प्रकारें ॥ ५७ ॥
५७) स्वतःसिद्ध परमात्मवस्तु आपणच आहोत असा प्रत्यक्ष अनुभव येतो. तेथें देहाचा व दृश्याचा मुळींच संबंध नाहीं. अशा रीतीनें पापराशी जळून जातात. 
येरवी ब्रह्मज्ञानेंवीण । जें जें साधन तो तो सीण ।
नाना दोशांचें क्षाळण । होईल कैसें ॥ ५८ ॥
५८) खरें म्हणजें ब्रह्मज्ञानाची अनुभुति असल्याशिवाय जें जें साधन करावें तो फुकट शीण मात्र होतो. ब्रह्मज्ञानावांचून अनेक प्रकारच्या पापदोषांचे निराकरण होत नाहीं. 
पापाचें वळलें शरीर । पापचि घडे तदनंतर ।
अंतरीं रोग वरीवरी उपचार । काय करी ॥ ५९ ॥
५९) हा देह मुळांत पापापासून बनलेला आहे. त्यानंतर त्याच्याकडून पापच घडत जातें. रोग अंगांत मुरल्यावर ववरचा उपाय उपयोगी पडत नाहीं. या देहाचा वापर दृश्यापासून सुख घेण्यासाठीं वापरला. अशी ही खोल गेलेली देहबुद्धि वरवरचे उपचार करुन नाहींशीं होत नाहीं.   
नाना क्षेत्रीं हें मुंडिलें । नाना तीर्थीं हें दंडिलें ।
नाना निग्रहीं खंडिलें । ठाईं ठाईं ॥ ६० ॥
६०) अनेक क्षेत्रांत जाऊन देहाचे मुंडन केलें, अनेक तीर्थांत जाऊन देहाला कष्ट दिलें, अनेक प्रकारचे निग्रह करुन देहाला ठिकठिकाणीं तोडलें,   
नाना मृत्तिकेनें घांसिलें । अथवा तप्तमुद्रेनें लासिलें ।
जरी हें वरीवरी तासिलें । तरी शुद्ध नव्हे ॥ ६१ ॥
६१) किंवा निरनिराळ्या मातीनीं देहाला घासला, तापलेल्या मुद्रांनी देहाला डाग दिले, किंवा देहाला वरुन घासून घेतलें तरी तो कांहीं केल्या शुद्ध होत नाहीं. 
सेणचे गोळे गिळिले । गोमुत्राचे मोघे घेतले ।
माळा रुद्राक्ष घातले । का ष्ठमणी ॥ ६२ ॥
६२) शेणाचे किंवा गोमयाचे गोळे गिळले, गोमुत्राचे हंडे पिऊन टाकले, माळा, रुद्राक्ष किंवा तुळशीकाष्ठाचे मणी गळ्यांत घातलें,
वेष वरीवरी केला । परी अंतरीं दोष भरला ।
त्या दोषाच्या दहनाला । आत्मज्ञान पाहिजे ॥ ६३ ॥
६३) वरुन वेष अगदीं बदलला, हे असे सारे उपचार केलें तरी तें वरवरचे ठरतात. आंतमध्यें दोष भरलेला आहे, त्याला त्या उपचारांचा उपयोग होत नाहीं. त्या दोषांच्या निरसनासाठीं आत्मज्ञानच जरुरीचे आहे. 
नाना व्रतें नाना दानें । नाना योग तीर्थाटणें ।
सर्वांहुनी कोटीगुणें । महिमा आत्मज्ञानाचा ॥ ६४ ॥
६४) सगळीं व्रतें, दानें, योगयाग, तीर्थाटनें या सगळ्यांहून आत्मज्ञानाचा महिमा कोटीपटीनें अधिक आहे.  
आत्मज्ञान पाहे सदा । त्याच्या पुण्यास नाहीं मर्यादा ।
दुष्ट पातकाची बाधा । निरसोन गेली ॥ ६५ ॥
६५) जो सदैव आत्मज्ञानसंपन्न आहे त्याच्या पुण्याला काहींच मर्यादा नाहीं. देहबुद्धीच्या पापाची जी बाधा झालेली होती ती नाहींशी होऊन जाते.  
वेदशास्त्रीं सत्यस्वरुप । तेंचि ज्ञानियांचें रुप ।
पुण्य जालें अमूप । सुकृतें सीमा सांडिली ॥ ६६ ॥
६६) वेदशास्त्रांमध्यें जें सत्यस्वरुपाचें म्हणजे परमात्मस्वरुपाचें जे वर्णन केलेलें आहे तें ज्ञानी पुरुषांचें रुप असतें. त्याच्या अंगी प्रचंड पुण्य साठतें. त्याच्यापाशीं अमर्याद सुकृत आढळतें.   
या प्रचितीच्या गोष्टी । प्रचित पाहावी आत्मदृष्टीं ।
प्रचितीवेगळें कष्टी । होऊंच नये ॥ ६७ ॥
६७) या गोष्टी अनुभवाच्या आहेत. स्वस्वरुपाचा अनुभव घेऊन याची प्रचिती घ्यावी. अनुभव घेतल्यावांचून उगीच दुःखी होऊं नये.  
आगा ये प्रचितीचे लोक हो । प्रचित नस्तां अवघा शोक हो ।
रघुनाथकृपेनें राहो । प्रत्यय निश्र्चयाचा ॥ ६८ ॥
६८) अहो, प्रचीति यावी असें वाटणार्‍या लोकांनो! प्रचीति घेण्याचा प्रयत्न करा. प्रचिती नसेल तर सगळें दुःखच आहे. म्हणून मी प्रार्थना करतों कीं, रामराया, तुझ्या कृपेनें प्रचीति घेण्याचा लोकांचा निश्र्चय कायम टिकूं दे.
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चळाचळनिरुपणनाम समास दहावा ॥
Samas Dahava  ChalaChal Nirupan 
समास दहावा चळाचळ निरुपण


Custom Search

No comments:

Post a Comment