Monday, March 26, 2018

Samas Choutha Kirtan Lakshan समास चौथा कीर्तन लश्रण


Dashak Choudava Samas Choutha Kirtan Lakshan 
Samas Choutha Kirtan Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the Kirtan. Kirtan should be such that it will impart the true knowledge to the people and bring them on the path of Parmarth.
समास चौथा कीर्तन लश्रण
श्रीराम ॥
कलयुगीं कीर्तन करावें । केवळ कोमळ कुशळ गावें ।
कठीण कर्कश कुर्टे सांडावें । येकीकडे ॥ १ ॥
१) कलियुगांत कीर्तन करावें. त्यांत फक्त कोमळ गावें. पण कौशल्यानें गांवें. कठोर, कर्कश किंवा चोरटें गांवू नये.
खटपट खुंटून टाकावी । खळखळ खळांसीं न करावी ।
खरें खोटें खवळों नेदावी । वृत्ती आपुली ॥ २ ॥
२) भांडणतंटा सोडून द्यावा. दुष्टाबरोबर विरोध करुं नये. खरें खोटें करण्याच्या भानगडींत आपली वृत्ती भडकूं देऊं नये.   
गर्वगाणें गाऊं नये । गातां गातां गळों नये ।
गोप्य गुज गर्जो नये । गुण गावे॥ ३ ॥ 
३) अभिमानानें गाणें गाऊं नये. गातागाता थकून मध्येंच गाणें अर्धवट सोडूं नये. कोणाची गुप्त गोष्ट लोकांत उघड सांगूं नये. दुसर्‍याचे गुणच सांगावें. 
घष्टणी घिसणी घस्मरपणें । घसर घसरुं घसा खाणें ।
घुमघुमों चि घुमणें । योग्य नव्हे ॥ ४ ॥
४) धसधसा,घिसघिस करीत आणि घसा सारखा साफ करीत व खांकरत गाणें गाऊं नये. घशाला ताण देऊन गाणें गाऊं नये. कीर्तनांत अंगांत आल्यासारखें बोलूं नये.   
नाना नामें भगवंताचीं । नाना ध्यानें सगुणाची ।
नाना कीर्तनें कीर्तीचीं । अद्भुत करावीं ॥ ५ ॥
५) भगवंताची नाना प्रकारचीं नांवें घ्यावी. भगवंताचे अनेक सगुणरुपांचे वर्णन करावें. भगवंताच्या अनेक प्रकारच्या कीर्तीचे वर्णन करावें.  
चकचक चुकावेना । चाट चावट चळावेना ।
चरचर चुरचुर लागेना । ऐसें करावें ॥ ६ ॥
६) चक् चक् करण्याची वेळ येईल अशी चूक करुं नये. लबाड व चावट लोक चेकाळतील असें करुं नये. लोकांच्या मनाला फार लागेल असें बोलूं नये.  
छळछळ छळणा करुं नये । छळितां छळितां छळों नये ।
छळणें छळणा करुं नये । कोणीयेकाची ॥ ७ ॥
७) कोणालाही मुद्दाम फसवूं नये. कोणाचाही छळ करुं नये. एखाड्यानें अपल्याला छळलें तरी त्याला आपण छळूं नये.  
जि जि जि जि म्हणावेना । जो जो जागे तो तो पावना ।
जपजपों जनीणजनार्दना । संतुष्ट करावें ॥ ८ ॥
८) कोणाच्या फार पुढें पुढें करुं नये. जागें होणार्‍या सर्वांना परमार्थ साधत नाही, निरंतर जप करुन सर्व भूतमात्रांत वावरणार्‍या भगवंतास प्रसन्न करुन घ्यावें. 
झिरपे झरे पाझरे जळ । झळके  दुरुनी झळाळ ।
झडझडां झळकती सकळ । प्राणी तेथें ॥ ९ ॥
९) झिरपें आणि झरें यांतून पाणी पाझरते, तें पाणी लांबून झळाळतें व चमकतें. तें पिण्यासाठीं प्राणी झडझडून झर्‍यापाशीं गोळा होतात.
या या या या म्हणावें नलगे । या या या या उपाव नलगे ।
या या या या कांहीं च नलगे । सुबुद्धासी ॥ १० ॥  
१०) त्याचप्रमाणें जो शहाणा व समजदार असतो त्याला या या असें बोलवावें लागत नाहीं. तो यावा म्हणून कांहीं उपाय करावा लागत नाहीं. जेथें कांहींतरी विशेष आहे तेथें येण्यासाठीं शहाण्याला कांहीं लागत नाहीं.       
टक टक टक करुं नये । टाळाटाळी टिकों नये ।
टम टम टम टम लाऊं नये । कंटाळवाणी ॥ ११ ॥
११) सारखी कटकट करुं नये. टाळाटाळ करुं नये. कंटालवाणी बडबड करुं नये. 
ठस ठोंबस ठाकावेना । ठक ठक ठक करावेना ।
ठाकें ठमकें ठसावेना । मूर्तिध्यान ॥ १२ ॥
१२) अडाणी व निर्बुद्ध माणसाशी संगत नसावी. उगीच रटाळ भुणभुण लावूं नये. बाहेरुन कांहीं नखरेलपणा केला तरी अंतःकरणांत भगवंताचें ध्यान स्थिर होत नाहीं. 
डळमळ डळमळ डकों नये । डगमग डगमग कामा नये ।
डंडळ डंडंळ चुकों नये । हेंकाडपणें ॥ १३ ॥
१३) मनाचा फार अनिश्र्चितपणा असूं नये.  सारखी बदलणारी वृत्ती चांगलीं नाही. अनिश्र्चितपणामुळें चुकींचें वेडगळ वर्तन करुं नये. 
ढिसाळ ढाला ढळती कुंचे । ढोबळा ढसका डुले नाचे ।
ढळेचिना ढिगाढिगांचे । कंटाळवाणे ॥ १४ ॥
१४) कशातरी चवर्‍या व निशाणें हालवतात. कांहीं ढोबळ माणसें डोलतात. नाचतात. कांहीं पोत्यासारखीं एकाच ठिकाणीं उभी राहतात.    
नाना नेटक नागर । नाना नम्र गुणागर ।
नाना नेमक मधुर । नेमस्त गाणें ॥ १५ ॥
१५) नेटकेपणा व सुसंस्कृतपणा असावा. अनेक गुणांनी संपन्न असून नम्र असावें. नियमांनी निश्र्चित असें वर्तन असावें. गोड व व्यवस्थित गाणें गावें.   
ताळ तंबुरे तानमानें । ताळबद्ध तंतगाणें ।
तूर्त तार्किक तनें मनें । तल्लीन होती ॥ १६ ॥
१६) गाण्याच्या साथीला ताल, तंबोरें, ताना, तालबद्ध तंतुवाद्य असें असावें. त्यामुळें तेवढावेळ तरी गाणें जाणणारे तल्लीन होऊन जावेत.  
थर्थरां थरकती रोमांच । थै थै थै स्वरें उंच ।
थिरथिर थिरावे नाच । प्रेमळ भक्तांचा ॥ १७ ॥
१७) प्रेमळ भक्त प्रेमाच्या आवेशांत उंच स्वरांत थय थय नाचतात. त्यांच्या अंगावर रोमांच उठून ते बराच वेळ नाचतात.  
दक्षदाक्षण्य दाटलें । बंदे प्रबंदे कोंदाटलें ।
दमदम दुमदुमों लागलें । जगदांतर ॥ १८ ॥
१८) मग श्रोते आदरानें पूर्ण लक्ष देऊन किर्तनांत रंगतात. श्रोत्यांच्या मनांत बंध, प्रबंध इत्यादी साहित्य भरुन त्यांचें अंतःरंग कीर्तनाच्या घोषानें दुमदुमतें.  
धूर्त तूर्त धावोन आला । धिंगबुद्धीनें धिंग जाला ।
धाकें धाकें धोकला । रंग अवघा ॥ १९ ॥
१९) अशा रीतीनें कीर्तन रंगांत आलें असतां एक धटिंगण धांवत येतो व कीर्तनांत घुसतो. त्यानें दांडगाई केल्यानें त्याच्या भीतीनें कीर्तनाच्या रंगाचा बेरंग होतो की काय असें वाटते. 
नाना नाटक नेटकें । नाना मानें तुकें कौतुकें ।
नाना नेमक अनेकें । विद्यापात्रें ॥ २० ॥ 
२०) पण हा एक कीर्तनाचाच भाग होता, नाटक होतें असें लक्षांत आल्यावर श्रोते कौतुक करतात. त्यांच्यापैकी कांहींजण माना डोलावतात. 
पाप पळोन गेलें दुरी । पुण्य पुष्कळ प्रगटे वरी ।
परतरतो परे अंतरीं । चटक लागे ॥ २१ ॥ 
२१) अशा कीर्तनाच्या प्रभावानें पाप दूर पळून जाते. पुष्कळ पुण्य प्रगट होते. आणि लोकांना कीर्तनाची आवड लागल्यानें तें परत कीर्तनास येतात.   
फुकट फाकट फटवणें नाहीं । फटकळ फुगडी पिंगा नाहीं ।
फिकें फसकट फोल नाहीं । भकाध्या निंदा ॥ २२ ॥
२२) चांगल्या कीर्तनांत फसवाफसवी नसतें. फुगडी, पिंगा सारख्या गोष्टी नसतात. फुसकी, कुटाळकी व निंदा नसतें. 
बरें बरें बरें म्हणती । बाबा बाबा उदंड करिती ।
बळें बळेचिं बळाविती । कथेलागीं ॥ २३ ॥
२३) जो असें कीर्तन करतो त्याला लोक चांगलें म्हणतात. बाबा बाबा म्हणून त्याची सगळी सोय करतात. मोठ्या आग्रहानें त्याला कथा करावयास बोलवितात. 
भला भला भला लोकीं । भक्तिभावें भव्य अनेकीं ।
भूषण भाविक लोकीं । परोपकारें ॥ २४ ॥
२४) असा कीर्तनकार खरा भला कीर्तनकार होय. भक्तिभाव अंगी मुरलेला असल्यानें तो लोकांत तो भव्यपणें वेगळा दिसतो. परोपकार करणारा असल्यानें भाविकांत तो भूषण होतो. 
मानेल तरी मानावें मनें । मत्त न व्हावें ममतेनें ।
मी मी मी मी बहुत जनें । म्हणिजेत आहे ॥ २५ ॥
२५) आतां सांगितलेलें जर पटत असेल तर मनांत धरुन ठेवावें. माझेपणानें उगीच माजूं नये. उन्मत्त होऊं नये. मी मी असा अहंकाराचा दर्प जगांत पुष्कळ लोकांत असतो. 
येकें टोंकत येकांपासीं । येऊं येऊं येती झडेसीं ।
या या या या असे तयासी । म्हणावें नलगे ॥ २६ ॥
२६) स्वार्थी कलाहीन कीर्तनकार " मी तुमच्याकडे कीर्तनास येतो " असें म्हणून जबरदस्तीनें मागें लागतात. " आमच्याकडे या " असें त्यांना म्हणावें लागत नाहीं. 
राग रंग रसाळ सुरंगें । अंतर संगित रागें ।
रत्नपरीक्षा रत्नामागें । धांवती लोक ॥ २७ ॥
२७) ज्या कीर्तनांत रंग भरतो, जें रसाळ असतें, शिवाय सुंदर रागदारीचें संगीत असते, अशा कीर्तनाला लोक आपणहून धावतांत. जसें कीं, रत्नपारखी रत्नाच्या मागें.   
लवलवां लवती लोचन । लकलकां लकलें मन ।
लपलपों लपती जन । आवडीनें ॥ २८ ॥
२८) श्रोत्यांचें डोळे पाण्यानें भरुन येतात. मन कौतुकानें, आनंदानें भरुन जातें. आणि लोक अगदी दाटीवाटीनें बसतात.   
वचनें वाउगी वदेना । वावरेविवरे वसेना ।
वगत्रुत्वें निववी जना । विनित होउनी ॥ २९ ॥
२९) कीर्तनकार वाफळ शब्द बोलत नाहीं. त्याच्या मनांत भकत्या गोष्टी राहात नाहीत. तो अत्यंत नम्रपणें बोलतो. आणि आपल्या बोलण्यानें लोकांना शांत करतो. 
सारासार समस्तांला । सिकऊं सिकऊं जनाला ।
साहित संगित सज्जनाला । बरें वाटे ॥ ३० ॥
३०) कीर्तनास येणार्‍या सर्व लोकांना तो सारासार विचार करायला शिकवतो. साहित्य आणि संगीतानें सज्जन श्रोत्यांचे मन भरुन जाते.  
खरेंखोटें खरें वाटलें । खर्खर खुर्खुर खुंटलें ।
खोटें खोटेपणें गेलें । खोटें म्हणोनियां ॥ ३१ ॥
३१) जगामध्यें खरें व खोटे यांचें मिश्रण सगळीकडे भरलें आहे. त्यामध्यें खरें कोणतें तें कळलें कीं जीवनामधील खरखर किंवा घर्षण बंद पडतें. खोटे खोटेच असते तें खोटेपणामुळें नाहींसे होते. 
शाहाणें शोधितां शोधेना । शास्त्रार्थ श्रुती बोधेना ।
शुक शारिका शमेना । शब्द तयाचा ॥ ३२ ॥
३२) शहाणे म्हणणारांना शोध धेऊन देखील मूळस्वरुपाची प्राप्ती होत नाहीं. शास्त्राचा खरा अर्थ व श्रुतीचा भाव त्यांच्या लक्षांत येत नाहीं. पण पोपट व साळुंखी या पक्ष्यांप्रमाणें तें आपलें शब्दज्ञान बडबडतच असतात. 
हरुषें हरुषें हासिला । हाहाहोहोनें भुलला ।
हित होईना तयाला । परत्रीचें ॥ ३३ ॥
३३) हर्षानें सुखावून जाऊन जो हसतो, श्रोत्यांनी हा हा हो हो केलें कीं जो भुलतो, अशा कीर्तनकाराला परमार्थ साधत नाहीं. 
लक्षावें लक्षितां अलक्षीं । लक्षिलें लोचनातें लक्षी ।
लंगलें लयेते अलक्षी । विहिंगमार्गे ॥ ३४ ॥
३४) अलक्ष असणारें जे परमार्थस्वरुप तिकडे लक्ष लावण्याचा प्रयत्न करावा. डोळ्यांनीं सगळें पाहातां येते, त्या डोळ्यांना जो पाहातो तो आत्मा पहावा. देहबुद्धि लंघून ओलांडून विहंगम मार्गानें अलक्षी लय लावावा. 
क्षेत्र क्षेत्रज्ञ क्षोभतो । क्षमेनें क्षमून क्ष्मवितो । 
क्ष्मणें क्षोभणें क्षेत्रज्ञ तो । सर्वां ठाईं ॥ ३५ ॥   
३५) शरीरांत राहाणारा आत्मा विकारवान होतो. प्रक्षुब्ध होतो. त्याला शांत करुन इतरांना जो शांत करतो तो धन्य होय. क्षुब्ध होणें आणि शांत होणें असे दोन्ही गुण ज्याच्यापाशी आढळतात तो आत्मा सर्वांच्या ठिकाणी आहे.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे कीर्तनलक्षणनाम समास चौथा ॥
Samas Choutha Kirtan Lakshan
समास चौथा कीर्तन लश्रण

Custom Search

No comments:

Post a Comment