Wednesday, March 28, 2018

Samas Pachava Harikatha Lakshan समास पांचवा हरिकथा लक्षण


Dashak Choudava Samas Pachava Harikatha Lakshan
Samas Pachava Harikatha Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about the Harikatha. Harikatha means Story of God. The way of telling it to the people is described in this Samas.
समास पांचवा हरिकथा लक्षण 
श्रीराम ॥
मागां हरिकथेचें लक्षण । श्रोतीं केला होता प्रस्न ।
सावध होऊन विचक्षण । परिसोत आतां ॥ १ ॥
१) हरिकथेंचे लश्रण कोणतें असा प्रश्र्ण पूर्वी श्रोत्यांनीं केला होता. त्याचे उत्तर जाणत्यांनीं आतां सावधपणें ऐकावें. 
हरिकथा कैसी करावी । रंगें कैसी भरावी ।
जेणे पाविजे पदवी । रघुनाथकृपेची ॥ २ ॥
२) हरिकथा कशी करावी. तिच्यांत रंग कसा भरावा. म्हणजे त्या कथेमुळें मोठी योग्यता मिळून भगवंताची कृपा संपादन होईल. 
सोनें आणी परिमळे । युक्षदंडा लागती फळें ।
गौल्य माधुर्य रसाळें । तरी ते अपूर्वता ॥ ३ ॥
३) समजा सोन्याला सुगंध आला किंवा उसाला गोड, मधुर फळें लागलीं तर तो मोठा अपूर्व योग होईल. 
तैसा हरिदास आणी विरक्त । ज्ञाता आणी प्रेमळ भक्त ।
वित्पन्न आणि वादरहित ।  तरी ते अपूर्वता ॥ ४ ॥ 
४) त्याचप्रमाणें हरिदास असून विरक्त; ज्ञानी असून प्रेमळ भक्त, आणि मोठा विद्वान असून वाद न घालणारा असा किर्तनकार असेल तर तो मोठा अपूर्व योग समजावा. 
रागज्ञानी ताळज्ञानी । सकळकळा ब्रह्मज्ञानी ।
निराभिमानें वर्ते जनीं ।  तरी ते अपूर्वता ॥ ५ ॥
५) उत्तम रागज्ञान, उत्तम तालज्ञान, सर्व कलांचें उत्तम ज्ञान असून शिवाय अंगी ब्रह्मज्ञान असणारा आणि तरीही लोकांशी वागतांना अत्यंत निरभिमान वृत्ति असणारा असा हरिदास मिळणें म्हणजे मोठा अपूर्व योग समजावा.    
मछर नाहीं जयासी । जो अत्यंत प्रिये सज्जनासी ।
चतुरांग जाणे मानसीं । अंतरनिष्ठ ॥ ६ ॥
६) ज्याला द्वेष, मत्सर करणें माहीत नाहीं, संतांना जो अत्यंत आवडतो, ज्याच्या अंगीं चौफेर ज्ञान आहे आणि ज्याच्या मनांत भगवंतावर पूर्ण निष्ठा आहे, असा हरिदास खरोखर उत्तम आहे. ज्ञान, विज्ञान, कला आणि लोकसंग्रह हें चतुरांग आहे.
जयंत्यादिकें नाना पर्वें । तीर्थे क्षेत्रें जें अपूर्वें । 
जेथें वसिजे देवाधिदेवें । सामर्थ्यरुपें ॥ ७ ॥
७) देवाची जयंती, संताची पुण्यतिथि या व अश्या अनेक पर्वण्या, परमात्मा जेथें वास करतो अशी तीर्थें व क्षेत्रें,
तया तीर्थातें जे न मानिती । शब्दज्ञानें मिथ्या म्हणती ।
तया पामरां श्रीपती । जोडेल कैंचा ॥ ८ ॥
८) त्यांना जो मानीत नाहीं, शब्दपांडित्याच्या अभिमानानें " त्यांत कांहीं अर्थ नाहीं " असे जो म्हणतो, त्या पामराला भगवंताची प्राप्ती होत नाहीं. 
निर्गुण नेलें संदेहानें । सगुण नेलें ब्रह्मज्ञानें । 
दोहिकडे अभिमानें । वोस केलें ॥ ९ ॥
९) एकीकडे निर्गुण आहें किंवा नाहीं या संशयानें निर्गुण हातचे गेलें. दुसरीकडे ब्रह्मस्वरुपाच्या शब्दज्ञानानें सगुण खरें नाहीं असें वाटूं लागलें. अशा रीतीनें देहाभिमानामुळें सगुण व निर्गुण दोहींकडे नागावल्याप्रमाणें होते. 
पुढें असतां सगुणमूर्ती । निर्गुणकथा जे करिती ।
प्रतिपादून उछेदिती । तेचि पढतमूर्ख ॥ १० ॥
१०) सगुणमूर्तीपुढें कथा करीत असतां " निर्गुणच खरें, सगुण खरें नाहीं " असें सांगून जे सगुणाचा उच्छेद करतात, असें हरिदास पढतमूर्ख समजावेत. 
ऐसी न कीजे हरिकथा । अतंर पडे उभये पंथा ।
परिस लक्षणें आतां । हरिकथेचीं ॥ ११ ॥
११) अशी हरिकथा कधीं करुं नये. त्यामुळें सगुण व निर्गुण दोन्ही हातचे सुटतात. म्हणून हरिकथा कशी असावी त्याची लक्षणें सांगतो तीं ऐकावी. 
सगुणमूर्तीपुढें भावें । करुणाकीर्तन करावें ।
नाना ध्यानें वर्णावें । प्रतापकीर्तीते ॥ १२ ॥  
१२) सगुण मूर्तीपुढें मोठ्या श्रद्धेनें व प्रेमानें कीर्तन करावें. त्यामध्यें करुणेनें भगवंताला आळवावे. भगवंताची अनेक रुपें व त्याचे अनेक प्रकार वर्णन करावेत. त्याची कीर्ति गावी.  
ऐसें गातां स्वभावें । रसाळ कथा वोढावे ।
सर्वांतरीं हेलावे । प्रेमसुख ॥ १३ ॥
१३) अशा रीतीनें भगवंताचे गुण गायिले असतां किर्तनांत मोठा रसाळपणा उत्पन्न होतो. तें ऐकून सर्व श्रोत्यांच्या मनांत भगवंताचे प्रेम उचंबळून येते. सर्वांना आनंद होतो.
कथा रचायाची खूण । सगुणीं नाणावें निर्गुण ।
न बोलावे दोष गुण । पुढिलांचे कदा ॥ १४  ॥
१४) उत्तम कीर्तन करण्याची युक्ति अशीं की, सगुणाच्या प्रतिपादनामध्यें निर्गुण आणूं नये. त्याचप्रमाणें समोर बसलेल्या श्रोत्याचें गुणदोषावर बोलूं नये. 
देवाचें वर्णाावें वैभव । नाना प्रकारें महत्व ।
सगुणीं ठेउनियां भाव । हरिकथा करावी ॥ १५ ॥
१५) देवाच्या वैभवाचे वर्णन करावें. अनेक प्रकारे देवाचे महत्व सांगून तें पटवून द्यावें. सगुणाच्या ठिकाणीं पूर्ण भाव ठेवून कीर्तन करावें.  
लाज सांडून जनाची । आस्था सांडून धनाची ।
नीच नवी कीर्तनाची । आवडी धरावी ॥ १६ ॥
१६) लोकांची लाज सोडावी. पैशाची आशा सोडावी. कीर्तनाची नित्य नवी आवड उत्पन्न करावी. इतर गोष्टी मनानें बाजूस सारुन शुद्ध कीर्तनाची गोडी वाढावावी. 
नम्र होऊन राजांगणीं । निःशंक जावें लोटांगणीं ।
करताळिका नृत्य वाणी । नामघोषें गर्जावें ॥ १७ ॥
१७) देवासमोरच्या देवळाच्या अंगणाांत कीर्तनास उभे राहिल्यावर अत्यंत नम्र व्हावें. अगदी निःशंक मनानें देवास साष्टांग नमस्कार घालावा. टाळ्या वाजवत नृत्यही करावें. आणि भगवंताच्या नावाचा घोष करावा. 
येकांची कीर्ति येकापुढें । वर्णितां साहित्य न पडे ।
म्हणोनियां निवाडे । जेथील तेथें ॥ १८ ॥
१८) ज्या देवासमोर कीर्तन असेल त्याची कीर्ति वर्णावी. एका देवासमोर दुसर्‍या देवाची कीर्ति वर्णन केल्यानें कथेला रंग चढत नाहीं. 
मूर्ती नस्तां सगुण । श्रवणीं बैसले साधुजन ।
तरी अद्वैतनिरुपण । अवश्य करावें ॥ १९ ॥
१९) समजा समोर सगुण मूर्ति नाहीं आणि साधुसंत श्रवणास बसलें आहेत, अशावेळीं अद्वैताचे प्रतिपादन कीर्तनांत अवश्य करावें.   
नाहीं मूर्ती नाहीं सज्जन । श्रवणीं बैसले भाविक जन ।
तरी करावें कीर्तन । प्रस्ताविक वैराग्य ॥ २० ॥
२०) समजा समोर सगुण मूर्ति नाही व साधुसंतही नाहींत केवळ भाविक लोक श्रवणास आहेत अशावेळीं प्रपंचाबद्दल अनुताप व वैराग्य यांचें प्रतिपादन करावें.   
श्रुंघारिक नवरसिक । यामधें सांडावें येक ।
स्त्रियादिकांचें कौतुक । वर्णूं नये कीं ॥ २१ ॥
२१) कीर्तनांत शृंगार, वीर, करुण, हास्य, अद्भुत, भयानक, बीभत्स, रौद्र व शांत हे नऊ रस अवश्य असावेत. परंतु स्त्रीयांचें हावभाव, लीला, कौतुक यांचे वर्णन करुं नये. 
लावण्य स्त्रियांचें वर्णितां । विकार बाधिजे तत्वता ।
धारिष्टापासून श्रोता । चळी तत्काळ ॥ २२ ॥
२२) कीर्तनामध्यें स्त्रियांच्या सौंदर्याचें वर्णन केल्यानें श्रोत्यांच्या मनांत कामवासनेचा विकार निर्माण होतो. त्यामुळें श्रोत्यांच्या मनाचा संयम तत्काळ सुटतो.
म्हणउन तें तजावें । जें बाधक साधकां स्वभावें ।
घेतां अंतरीं ठसावें । ध्यान स्त्रियांचें ॥ २३ ॥
२३) म्हणून साधकाला जें बाधतें तें कीर्तनामध्यें टाळावें. नाहींतर स्त्रियांच्या वर्णनानें साधकाच्या मनामध्यें स्त्रियांचे ध्यान घट्टपणानें बसतें.  
लावण्य स्त्रियांचें ध्यान । कामाकार जालें मन ।
कैचें आठवेल ध्यान । ईश्र्वराचें ॥ २४ ॥
२४) सुंदर स्त्रियांचे ध्यान ठसल्यावर संपूर्ण मन कामविकारानें भरुन जातें. असें झाल्यावर ईश्र्वराचे ध्यान लागणें अशक्य होतें. 
स्त्री वर्णिता सुखावला । लावण्याचे भरीं भरला ।
तो स्वयें जाणावा चेवला । ईश्र्वरापासुनी ॥ २५ ॥
२५) स्त्रीचें वर्णन ऐकतां ऐकतां साधकाच्या मनाला बरें वाटते, नंतर तिच्या सौंदर्याच्या चिंतनानें त्याचे मन भरुन जाते. असा साधक आपणहून ईश्र्वरापासून दूर गेला असें समजावें.  
हरिकथेसी भावबळें । गेला रंग तो तुंबळे ।
निमिष्य येक जरी आकळे । ध्यानी परमात्मा ॥ २६ ॥
२६) समजा कीर्तनांत ईश्र्वराच्या रंगाचा भंग झाला. पण नंतर जरी एक क्षणभर जरी भगवंताचें ध्यान बरोबर जमलें तरी त्या प्रेमाच्या बळानें भंगलेला रंग पुन्हां उचंबळून येतो.
ध्यानीं गुंतलें मन । कैंचे आठवेल जन ।
निशंक निर्ल्लज कीर्तन । करितां रंग माजे ॥ २७ ॥
२७) मन एकदा कां भगवंताच्या ध्यानांत गुंतले म्हणजे माणसाला लोकांचे स्मरण उरत नाहीं. मग निःशंक व निर्लज्य होऊन कथा चालू केली कीं रंग तुडूंब भरतो.  
रागज्ञान ताळज्ञान । स्वरज्ञानेंसी वित्पन्न ।
अर्थान्वयाचें कीर्तन । करुं जाणे ॥ २८ ॥
२८) चांगल्या हरिदासाला उत्तम रागज्ञन, तालज्ञान आणि स्वरज्ञान असतें. तो विद्वान असून विषयांचें अत्यंत तर्कशुद्ध प्रतिपादन कसें करावें, अर्थ व अन्वय बरोबर कसा सांगावा हें जाणतो. 
छपन्न भाषा नाना कळा । कंठमाधुर्य कोकिळा ।
परी तो भक्तिमार्ग वेगळा । भक्त जाणती ॥ २९ ॥
२९) कीर्तनामध्यें अजून एक विशेष असा आहे कीं, पुष्कळ भाषा आहेत, पुष्कळ कला आहेत, कोकिळेस कंठमाधुर्य आहे. या सार्‍या गोष्टी हरिदासापाशीं असाव्यात. परंतु भक्तिमार्ग म्हणून कांहीं वेगळाच आहे. तो फक्त भक्तच जाणतात. 
भक्तांस देवाचें ध्यान । देवावांचून नेणे अन्न ।
कळावंतांचें जें मन । तें कळाकार जालें ॥ ३० ॥
३०) मनांत केवळ एक देवाचेंच ध्यान लागलेलें असतें. देवांवाचून इतर कांहीं तें जाणतच नाहींत. कलावंताचें मन जसें कलेनें संपूर्ण भरुन जातें, तसें भक्ताचे मन संपूर्णपणें भगवंतानें भरुन जातें. 
श्रीहरिवीण जे कळा । तेचि जाणावी अवकळा । 
देवास सांडून वेगळा । प्रत्यक्ष पडिला ॥ ३१ ॥
३१) भगवंतावांचून जीं कला तीं कला नव्हे, ती प्रत्यक्ष अवकळाच होय. कलेमुळें कलावंत भगवंताला सोडतो व त्याहून वेगळा पडतो, हें प्रत्यक्ष दिसते.  
सर्पी वेढिलें चंदनासी । निधानाआड विवसी ।
नाना कळा देवासी । आड तैस्या ॥ ३२ ॥
३२) चंदनाच्या झाडाला साप वेटाळून बसतात, पुरुन ठेवलेले धनाजवळ हडळ बसलेली असतें. सापांच्यामुळें चंदन मिळत नाहीं. हडळीमुळें धन हातीं येत नाहीं. त्याचप्रमाणें निरनिराळ्या कला भगवमताच्या प्राप्तीच्या आड येतात.  
सांडून देव सर्वज्ञ । नादानध्यें व्हावें मग्न ।
तें प्रत्यक्ष विघ्न । आडवें आलें ॥ ३३ ॥
३३) कीर्तन करीत असतां सर्वज्ञ भगवंताला बाजूला सारुन जो गायनांत तल्लीन होतो त्याला देव प्राप्ती साधत नाहीं. नादामध्यें तल्लीन होणें हें भगवंताच्या आड येणारें प्रत्यक्ष विघ्न आहें.    
येक मन गुंतलें स्वरीं । कोणें चिंतावा श्रीहरी ।
बळेंचि धरुनियां चोरीं । शिश्रूषा घेतली ॥ ३४ ॥
३४) एक चोर होता त्यानें बळजबरीनें एका माणसाला धरुन ठेवलेम.आणि त्याच्याकडून सेवा करुन घेतली. त्याचप्रमाणें मन एकदा स्वरांमध्यें गुंतून गेल्यावर त्यास भगवंताचें चिंतन करता येत नाहीं. तें स्वरांचे गुलाम बनते.      
करितां देवाचें दर्शन । आडवें आलें रागज्ञान ।
तेणें धरुनियां मन । स्वरामागें नेलें ॥ ३५ ॥
३५) कीर्तनाकार भगवंताच्या दर्शनास निघाला व त्यासाठीं कीर्तन करुं लागला. त्यांत संगीताचें  ज्ञान आडवें आलें. त्यानें मनाला धरलें व स्वरांच्या मागें नेलें. त्यामुळें हरिदास भगवंताला अंतरला.   
भेटों जातां राजद्वारीं । बळेंचि धरिला बेगारी ।
कळावंतां तैसी परी । कळेंनें केली ॥ ३६ ॥
३६) एक माणूस राजाला भेटण्यासाठीं राजवाड्याकडे निघाला . वाटेमध्यें त्याला बेगारी म्हणून धरला. कलावंताच्या बाबतींत कला असाच प्रकार घडवून आणते.
मन ठेऊन ईश्ररीं । जो कोणी हरिकथा करी ।
तोचि ये संसारीं । धन्य जाणा ॥ ३७ ॥
३७) जो हरिदास भगवंताच्या ठिकाणी मन ठेवून हरिकथा करतो, तोच या जगांत धन्य समजावा. 
जयास हरिकथेची गोडी । उठे नीत नवी आवडी ।
तयास जोडली जोडी । सर्वोत्तमाची ॥ ३८ ॥   
३८) ज्याला हरिकथेची गोडी असते आणि भगवंताची कथा ऐकण्याची आवड नवेपणानें वाढत जातें त्यानें भगवंताला आपलासा करुन घेतला असें निश्र्चितपणें समजावें.       
हरिकथा मांडली जेथें । सर्व सांडून धावे तेथें ।
आलस्य नीद्रा दवडून स्वार्थे । हरिकथेसी सादर ॥ ३९ ॥ 
३९) ज्या ठिकाणी हरिकथा सुरु असेल त्या ठिकाणी खरा साधक सगळीं कामें सोडून धांवत जातो. आळस, झोप, व बाकीचा स्वार्थ सोडून तो हरिकथा ऐकतो.  
हरिभक्तांचिये घरीं । नीच कृत्य अंगीकारीं । 
साहेभूत सर्वांपरीं । साक्षपें होये ॥ ४० ॥
४०) जे भगवंताचे भक्त असतात त्यांच्या घरीं वख त्यांच्या घरचें हलके काम देखील तो मनापासून करतो. सर्व दृष्टीनें तो अगदी प्रयत्नपूर्वक मदत करतो. 
या नाव हरिदास । जयासि नामीं विश्र्वास ।
येथून हा समास । संपूर्ण जाला ॥ ४१ ॥ 
४१) भगवंताच्या नावावर ज्याचा विश्र्वास असतो, त्याला हरिदास हेम नांव शोभते. येथें हा समास पूर्ण झाला. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे हरिकथालक्षणनिश्र्चयनाम समास पांचवा ॥
Samas Pachava Harikatha Lakshan
समास पांचवा हरिकथा लक्षण 



Custom Search

No comments:

Post a Comment