Friday, March 30, 2018

Samas Sahava Chaturya Lakshan समास सहावा चातुर्य लक्षण


Dashak Choudava Samas Sahava Chaturya Lakshan 
Samas Sahava Chaturya Lakshan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Chaturya in this samas. Chaturya means wiseness. Wiseness is required in Prapancha and Parnarth also. The qualities of Chaturya are described here.
समास सहावा चातुर्य लक्षण 
श्रीराम ॥
रुप लावण्य अभ्यासितां न ये । सहजगुणास न चले उपाये ।
कांहीं तरी धरावी सोये । अगांतुक गुणाची ॥ १ ॥
१) आपल्या शरीराचें रुप व सौंदर्य हे गुण अभ्यासानें साध्य होत नाहीत. तें जन्मजात असल्यानें त्यावर इलाज चालत नाहीं. म्हणून अभ्यासानें साध्य होणार्‍या आगांतुक गुणांच्या मागें लागावें. 
काळें माणुस गोरें होयेना । वनाळास येत्न चालेना ।
मुक्यास वाचा फुटेना । हा सहजगुण ॥ २ ॥
२) माणूस काळा असेल तर तो गोरा होऊं शकत नाहीं. तोंडावर असलेल्या वणाला प्रयत्नानें उपयोग होत नाहीं. म्हणजे तों घालविता येत नाहीं. मनुष्य मुका असेल तर त्याला बोलता येत नाहीं. या उपजत गोष्टींना उपाय नसतो.    
आंधळें डोळस होयेना । बधिर तें ऐकेना ।
पांगुळ पाये घेइना । हा सहजगुण ॥ ३ ॥
३) माणूसआंधळा असेल तर त्यास दृष्टि येत नाहीं. बहिरा असेल तर त्यास ऐकायला येत नाहीं. पांगळा असेल तर त्यास चालतां येत नाहीं. या उपजत गोष्टींना उपाय नसतो. 
कुरुपतेची लक्षणें । किती म्हणोनि सांगणें ।
रुप लावण्य याकारणें । पालटेना ॥ ४ ॥
४) कुरुपचेची अशी बरीच लक्षणें आहेत. तीं सगळीं सांगतां येत नाहीत. म्हणूनच शरीराचें रुप व सौंदर्य बदलतां येत नाहींत असें सांगितलें. 
अवगुण सोडितां जाती । उत्तम गुण अभ्यासितां येती ।
कुविद्या सांडून सिकती । शाहाणे विद्या ॥ ५ ॥
५) परंतु अवगुण सोडायचे म्हटल्यावर तें सोडतां येतात. व उत्तम गुण अभ्यासकरुन मिळवतां येतात. शहाणी माणसें कुविद्या सोडून देऊन विद्या शिकतात. 
मूर्खपण सांडिता जातें । शाहाणपण सिकतां येतें ।
कारबार करितां उमजतें । सकळ कांहीं ॥ ६ ॥
६) मूर्खपण सोडावयाचें म्हटलें तर सोडतां येतें आणि शहाणपण शिकायचें मनांत आणलें तर शिकतां येतें. त्या दृष्टीनें अभ्यास केला तर सर्व कांहीं ध्यानांत येते. 
मान्यता आवडे जीवीं । तरी कां उपेक्षा करावी ।
चातुर्येविण उंच पदवी । कदापी नाहीं ॥ ७ ॥
७) माणसाला मान मिळाला तर तो मनापासून आवडतो. मग शहाणपण शिकण्याचाही आळस, उपेक्षाकरुं नये.  अंगीं चातुर्य किंवा शहाणपण असल्याखेरीज समाजामध्यें मोठेपण कधीं मिळत नाहीं. 
ऐसी प्रचित येते मना । तरी कां स्वहित कराना ।
सन्मार्गें चालतां जनां । सज्जन माने ॥ ८ ॥
८) ही गोष्ट जीवनांत आपल्या प्रचितीला येते. यासाठीं आपण आपलें हित करुन घेणें जरुर आहे. जो माणूस चांगल्या मार्गानें जातो, तो संतांना आणि सामान्य जनांना योग्य वाटतो. 
देहे नेटकें श्रुंघारिलें । परी चातुर्येविण नासलें ।
गुणेंविण साजिरें केलें । बाष्कळ जैसें ॥ ९ ॥
९) समाजा एखाद्यानें आपलें शरीर पुष्कळ श्रृंगारले. परंतु त्याच्या अंगीं शहाणपण नाहीं तर तें श्रृंगारणें फुकटच जातें. एखाद्या गुणहीन वेड्याला साजशृंगार करावा तसें तें होतें. 
अंतर्कळा श्रुंघारावी । नानापरी उमजवावी ।
संपदा मेळऊन भोगावी । सावकास ॥ १० ॥
१०) माणसानें आपल्या अंतरंगास चांगल्या जाणीवरुपें सजवावें. त्या जाणिवेंत अनेक प्रकारचे ज्ञान भरावें. त्यायोगें संपत्तीही मिळवावी व तीचा मनप्रमाणें भोगही घ्यावा. 
प्रेत्न करीना सिकेना । शरीर तेंहि कष्टवीना ।
उत्तम गुण घेईना । सदाकोपी ॥ ११ ॥
११) जो माणूस प्रयत्न करीत नाहीं आणि शहाणपण शिकत नाहीं, शरीर कष्ट घेत नाहीं, उत्तम गुणांचा अभ्यास करीत नाहीं, तो नेहमी चिडचिडलेला असतो.  
आपण दुसर्‍यास करावें । तें उेसिणें सवेंचि घ्यावें ।
जना कष्टवितां कष्टावें । लागेल बहु ॥ १२ ॥
१२) आपण दुसर्‍यांशी जसें वर्तन करावें त्याचे तसें उसनें लगेच फेडावें लागतें.  आपण दुसर्‍यांना त्रास दिला तर आपणाला देखील पुष्कळ त्रास भोगावा लागतो. हें ज्याला कळत नाहीं तो करंटा होय. तो दैन्यवाणाच.   
न्यायें वर्तेल तो शाहाणा । अन्याइ तो दैन्यवाणा ।
नाना चातुर्याच्या खुणा । चतुर जाणे ॥ १३ ॥
१३) जो न्यायानें वागतो तो शहाणा आणि जो अन्यायानें वागतो तो दैन्यवाणा. चतुर माणसाला चातुर्याच्या अनेक खुणा माहित असतात.  
जें बहुतांस मानलें । तें बहुतीं मान्य केलें ।
येर तें वेर्थचि गेलें । जगनिंद्य ॥ १४ ॥
१४) जी गोष्ट पुष्कळ लोकांना पसंत पडतें तिचा प्रसार पुश्कळ लोकांमध्यें होतो. पुष्कळांना नापसंत असलेलें बाकीचें वाया जाते.  
लोक आपणासि वोळावे। किंवा आवघेच कोंसळावे ।
आपणास समाधान फावे । ऐसें करावें ॥ १५ ॥ 
१५) पुष्कळ लोक आपल्यला वश व्हावेंत किंवा पुष्कळ लोक आपल्या विरुद्ध जावेत या दोन्ही गोष्टी आपल्या हातांत आहेत. म्हणून आपल्याला समाधान प्राप्त होईल असें माणसानें वागावें.       
समाधानें समाधान वाढे । मित्रिनें मित्रि जोडे ।
मोडितां क्षणमात्रें मोडे । बरेपण ॥ १६ ॥
१६) समाधानानें समाधान वाढत जातें. स्नेहानें स्नेह जुळतो. चांगलेपणा नाहींसा करायचा म्हटला तर तो क्षणांत नाहींसा करतां येतो. 
अहो कांहो अरे कांरे । जनीं ऐकिजेतें किं रे ।
कळस असतांच कां रे । निकामीपण ॥ १७ ॥
१७) " अहो तर काहो ",  " अरे तर कारे " अशी लोकांमध्यें एक म्हण आहे. हें आपल्याला समजते. तें कळत असून देखील शहाणपण मिळवण्याचा प्रयत्न न करणें योग्य नाहीं.    
चातुर्ये श्रुंघारे अंतर । वस्त्रें श्रुंघारे शरीर । 
दोहिमधें कोण थोर । बरें पाहा ॥ १८ ॥
१८) शहाणपणानें अंतरंग श्रृंगारलें जातें तर वस्त्राने शरीर श्रृंगारले जातें या दोन्हीपैकी श्रेष्ठ कोणतें याचा तुम्हीच विचार करा.
बाह्याकार श्रुंघरिलें । तेणें लोकांच्या हातासि काये आलें ।
चातुर्ये बहुतांसी रक्षिलें । नाना प्रकारें ॥ १९ ॥
१९) एखाद्यानें आपल्या शरीराला खूप सजवलें तर त्यापासून लोकांना कांहींच फायदा होत नाहीं. माणसाच्या अंगीं चातुर्य असेल तर त्यानें तो पुष्कळ लोकांचे अनेक रीतीनें तो संरक्षण करुं शकतो.
बरें खावें बरें जेवावें । बरें ल्यावें बरें नेसावें ।
समस्तीं बरें म्हणावें । ऐसी वासना ॥ २० ॥
२०) चांगलें खावें, चांगलें जेवावें, चांगलें वस्त्र पांघरावें व नेसावें, सर्वांनीं आपल्याला चांगलें म्हणावें, अशी वासना सामान्य माणसाला असते.   
तनें मनें झिजावें । तेणें भले म्हणोन घ्यावें ।
उगें चि कल्पितां सिणावें । लागेल पुढें ॥ २१ ॥
२१) परंतु शरीरानें व मनानें लोकांसाठीं झिजावें तरच लोकांमध्यें भलेपणा मिळतो. असें न करितां जो निर्थक कल्पना करीत बसतो त्याला पुढें कष्ट भोगावें लागतात.  
लोकीं कार्यभाग आडे । तो कार्यभाग जेथें घडे । 
लोक सहजचि वोढे । कामासाठीं ॥ २२ ॥
२२) समजा लोकांचे एखादे काम अडून राहीलें आहे, तर तें काम अडचण दूर करुन जो तें व्यवस्थितपणें करतो, त्याच्याकडे लोक आपोआप आपल्या कामासाठीं येऊं लागतात.  
म्हणोन दुसर्‍यास सुखी करावें । तेणें आपण सुखी व्हावें ।
दुसर्‍यास कष्टवितां कष्टावें । लागेल स्वयें ॥ २३ ॥
२३) म्हणून जो दुसर्‍याला सुखी करतो तो स्वतः सुखी होतो. जो दुसर्‍यास कष्ट देतो त्यास स्वतः पुढें कष्ट भोगावें लागतात. 
हें तो प्रगटचि आहे । पाहिल्याविण कामा नये ।
समजणेम हा उपाये । प्राणीमात्रासी ॥ २४ ॥
२४) या गोष्टी अगदी उघड आहेत. पण त्या नीट पाहून समजून घेतल्याखेरीज कामाला येत नाहीं. यासाठीं त्या समजून घेणें हा भाग्यवान बनण्याचा सोपा उपाय आहे.    
समजले आणी वर्तले । तेचि भाग्यपुरुष जाले ।
यावेगळे उरले । ते करंटे पुरुष ॥ २५ ॥
२५) अशा रीतीनें जीवन समजून घेऊन जें वागतात तेच भाग्यवान पुरुष बनतात. बाकीचे न समजणारे उरलेले पुरुष करंटे समजावे. 
जितुका व्याप तितुकें वैभव । वैभवासारिखा हावभाव ।
समजले पाहिजे उपाव । प्रगटचि आहे ॥ २६ ॥
२६) जेवढा व्याप तेवढें वैभव, हा नियम आहे. ज्या मानानें वैभव असतें त्या मानानें वागावें लागतें. माणसाला हें समजलें पाहिजें. वैभव प्राप्त करुन घेण्याचा उपाय अगदी उघड आहे. 
आळसें कार्येभाग नासतो । साक्षेप होत होत होतो ।
दिसते गोष्टी कळेना तो । शाहाणा कैसा ॥ २७ ॥
२७) कोणतेहीं काम आळशीपणानें नासतें. परंतु  माणुसप्रयत्न करीत राहीला तर तें क्रमाक्रमानें सिद्धीस जातें. ही उघड असलेली गोष्ट ज्याला कळत नाहीं, त्याला शाहाणा म्हणतां येत नाहीं.  
मित्रि करितां होतें कृत्य । वैर करितां होतो मृत्य ।
बोलिलें हें सत्य किं असत्य । वोळखावें ॥ २८ ॥
२८) मित्रत्व जोडल्यानें काम शेवटास जातें आणि वैर केल्यानें मरणाचा प्रसंग ओढवतो. हें माझें म्हणणें खरें कां खोटे तें तुम्हीच ओळखा. 
आपणास शाहाणें करुं नेणे । आपलें हित आपण नेणे । 
जनीं मैत्रि राखों नेणे । वैर करी ॥ २९ ॥
२९) आपण आपल्याला शाहाणें कसें करावें हें कळत नाहीं, लोकांशी स्नेह राखतां येत नाहीं, आपले हित कसें करावें कळत नाहीं, उगीच वैर करतो, 
ऐसे प्रकारीचे जन । त्यास म्हणावें अज्ञान । 
तयापासीं समाधान । कोण पावे ॥ ३० ॥
३०) अशा प्रकारच्या माणसांना अज्ञानी म्हणावें. त्यांच्यापाशीं कोणासही समाधान मिळत नाहीं. 
आपण येकायेकी येकला । सृष्टींत भांडत चालिला ।
बहुतांमध्यें येकल्याला । येश कैचें ॥ ३१ ॥
३१) आपण एकटाच एकअसणारा आणि तो जर जगांत सर्वांशी भांडत सुटला तर पुष्कळ लोकांमध्यें या एकट्याला यश मिळणें शक्य नाहीं.  
बहुतांचे मुखीं उरावें । बहुतांचे अंतरीं भरावें ।
उत्तम गुणीं विवरवें । प्राणीमात्रासी ॥ ३२ ॥  
३२) म्हणून पुष्कळ लोकांच्या तोंडीं आपलें नांव असावें. पुष्कळ लोकांच्या अंतःकरणांत आपण प्रेमरुपानें भरुन जावें. आणि आपल्या उत्तम गुणांनी अनेक लोकांना विवेकी बनवावें.       
शाहाणे करावे जन । पतित करावे पावन ।
सृष्टिमधें भगवद्जन । वाढवावें ॥ ३३ ॥
३३) पुष्कळ लोकांना शहाणें करावें, जे भ्रष्ट असतील त्यांना पवित्र करावें. आणि जगामध्यें भगवंताची भक्ति वाढवावी. 
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चातुर्येलक्षणनाम समास सहावा ॥
Samas Sahava Chaturya Lakshan
समास सहावा चातुर्य लक्षण 



Custom Search

No comments:

Post a Comment