Sunday, April 1, 2018

Samas Satava YugDharma Nirupan समास सातवा युगधर्म निरुपण


Dashak Choudava Samas Satava YugDharma Nirupan 
Samas Satava YugDharma Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about current Kaliyug in this samas. Importance of Gruhasthaashrama in this Kaliyug. The person who is near to God prefer to live in Gruhasthaashram. What are the qualities of such a person are described here.
समास सातवा युगधर्म निरुपण
श्रीराम ॥
नाना वेश नाना आश्रम । सर्वांचें मूळ गृहस्थाश्रम ।
जेथें पावती विश्राम । त्रैलोक्यवासी ॥ १ ॥
१) नाना प्रकारचे वेष व नाना प्रकारचे आश्रम आहेत. पण गृहस्थाश्रम हा सर्वांचे मूळ आहे. त्रैलोक्यांतील सर्वांना गृहस्थाश्रमांत विश्रांती लाभते.
देव ऋषी मुनी योगी । नाना तापसी वीतरागी ।
पितृादिकरुन विभागी । अतीत अभ्यागत ॥ २ ॥
२) देव, ऋषि, मुनि, योगी, अनेक तापसी व विरक्त पुरुष, पितर व इतर हविष्य अन्नाचे भागिदार, तसेच अतिथि व अभ्यागत,
गृहस्थाश्रमीं निर्माण जाले । आपला आश्रम टाकून गेले ।
परंतु गृहस्थागृहीं हिंडो लागले । कीर्तिरुपें ॥ ३ ॥
३) हे सगळेजण गृहस्थाश्रमांत जन्मास येतात. नंतर ते हा आश्रम सोडून जातात. साधना करतात. परंतु पुढें कीर्ति मिळवल्यावर ते गृहस्थांच्या घरींच राहतात. आणि संचार करतात. 
याकारणें गृहस्थाश्रम । सकळामधें उत्तमोत्तम  ।
परंतु पाहिजे स्वधर्म । आणी भूतदया ॥ ४ ॥
४) यामुळें गृहस्थाश्रम हा सर्व आश्रमांत उत्तम आश्रम आहे, परंतु त्यांत स्वधर्माचे आचरण व भूतदया या दोन गोष्टी हव्यात.
जेथें शडकर्में चालती । विध्योक्त क्रिया आचरती ।
वाग्माधुर्यें बोलती । प्राणीमात्रासी ॥ ५ ॥
५) अध्यन, अध्यापन, यजन, याजन, दान व प्रतिग्रह हीं षट् कर्मे जेथें चालतात. धर्मशास्त्राप्रमाणें सर्व क्रियांचे आचरण घडते, जेथें सर्व लोकांशी गोड वाणीनें बोलणें चालणें होतें, 
सर्वप्रकारें नेमक । शास्त्रोक्त करणें कांहींयेक ।
त्याहिमध्यें अलोलिक । तो हा भक्तिमार्ग ॥ ६ ॥
६) जें कांहीं करायचे असेल तें सर्व प्रकारें नियमित व शास्त्रोक्त पद्धतीनें जेथें केलें जातें, तो गृहस्थाश्रम उत्तम होय. आणि असें असून जेथें अलौकिक असा भक्तीमार्ग आढळतो तो गृहस्थाश्रम तर धन्य होय.   
पुरश्र्चरणी कायाक्लेसी । दृढव्रती परम सायासी ।
जगदीशावेगळें जयासी । थोर नाहीं ॥ ७ ॥
७) जो पुरश्र्चरणें करतो, शरीराला कष्ट देण्यास मागेंपुढें पाहात नाही, दृढपणें आपलें व्रत सांभाळतो, खूप श्रम करतो, या सर्व गोष्टीअसून ज्याला एका भगवंतावाचून इतर कांहीं श्रेष्ठ वाटत नाहीं,  
काया वाचा जीवें प्राणें । कष्टे भगवंताकारणें ।
मनें घेतलें धरणें । भजनमार्गीं ॥ ८ ॥
८) शरीरानें, वाणीनें, जीवानें, प्राणानें जो भगवंतासाठीं कष्ट करतो, ज्याचें मन भजनमार्गांत जणूं काय धरणें देऊन बसतें,    
ऐसा भगवंताचा भक्त । विशेष अंतरीं विरक्त ।
संसार सांडून झाला मुक्त । देवाकारणें ॥ ९ ॥
९) असा जो भगवंताचा भक्त असतो, व विरक्त असतो, तो भगवंतप्राप्तीसाठीं संसार सोडून मोकळा होतो. 
अंतरापासून वैराग्य । तेंचि जाणावें महद्भाग्य ।
लोलंगतेयेवढें अभाग्य । आणीक नाहीं ॥ १० ॥
१०) अगदी अंतःकरणापासून ज्याला वैराग्य असतें, तो अतिशय भाग्यवान समजावा. अतिशय आसक्ति किंवा लोभ असणें यासारखें दुसरें दुर्भाग्य नाहीं.  
राजे राज्य सांडून गेले । भगवंताकारणें हिंडलें ।
कीर्तिरुपें पावन जाले । भूमंडळीं ॥ ११ ॥
११) मोठमोठे राजे राज्य सोडून निघून गेले व भगवंतासाठीं वणवण हिंडलें. भगवंताची प्राप्ति करुन घेतल्यामुळें या जगांत तें कीर्तिरुपानें पावन होऊन जातात. 
ऐसा जो कां योगेश्र्वर । अंतरीं प्रत्ययाचा विचार ।
उकलूं जाणे अंतर । प्राणीमात्राचें ॥ १२ ॥
१२) असा जो योगेश्र्वर असतो, त्याच्या अंतर्यामीं स्वानुभवानें उत्पन्न झालेला विवेक असतो. तोच सामान्य माणसाच्या ठिकाणीं अध्यात्माचा विकास करुं शकतो. 
ऐसी वृत्ती उदासीन । त्याहिवरी विशेष आत्मज्ञान ।
दर्शनमात्रें समाधान । पावती लोक ॥ १३ ॥
१३) त्याची वृत्ती उदासीन असते. अनासक्त किंवा वैराग्यशील असते. विशेष असें कीं त्याला आत्मसाक्षात्कार झालेला असतो. त्याच्यानुसत्या दर्शनानेंसुद्धा लोकांना समाधान लाभते. 
बहुतांसी करी उपाये । तो जनाच्या वाट्या न ये ।
अखंड जयाचे हृदये । भगवद्रुप ॥ १४ ॥
१४) जो पुष्कळांचा उद्धार करतो, तो लोकांमध्यें प्रत्येकाच्या वाट्याला येत नाहीं. त्याचे मन निरंतर परमात्मस्वरुपाशीं तदाकार होऊन राहाते.   
जनास दिसे हा दुश्र्चित । परी तो आहे सावचित ।
अखंड जयाचें चित्त । परमेश्र्वरीं ॥ १५ ॥
१५) त्याचे लक्ष धड कोठेंच नाहीं असें लोकांना वाटते, पण अंतर्यामी तो अतिसावध असतो. कारण त्याचे चित्त परमेश्र्वराशी अखंड युक्त झालेले असते.  
उपासनामूर्तिध्यानीं । अथवा आत्मानुसंधानीं । 
नाहीं तरी श्रवणमननीं । निरंतर ॥ १६ ॥
१६) आपल्या उपास्यदेवतेच्या ध्यानामध्यें तरी तो गुंतलेला असतो, किंवा आत्मस्वरुपाच्या अनुसंधानांत तरी तो लीन असतो किंवा श्रवणमननांत तरी तो निरंतर गुंतलेला असतो.
पूर्वजांच्या पुण्यकोटी । संग्रह असिल्या गांठीं ।
तरीच ऐसीयाची भेटी । होये जनासी ॥ १७ ॥
१७) पूर्वजांच्या पुण्यकर्मांचा फार मोठा सांठा जर पदरी असेल तरच अशा साक्षात्कारी थोर पुरुषाच्या भेटीचा योग लोकांना येतो. 
प्रचीतिविण जें ज्ञान । तो आवघाचि अनुमान ।
तेथें कैंचे परत्रसाधन । प्राणीयासी ॥ १८ ॥
१८) जें ज्ञान प्रत्यक्ष अनुभवांत उतरत नाहीं तें संपूर्णपणें कल्पनामय असतें अशा ज्ञानानें लोकांना अध्यात्माच्या साधनमार्गांत मार्गदर्शन होत नाहीं. 
याकारणें मुख्य प्रत्यये । प्रचीतिविण कामा नये ।
उपायासारिखा अपाये । शाहाणे जाणती ॥ १९ ॥
१९) या कारणानें परमार्थामध्यें स्वानुभव प्रधान आहे. स्वानुभवाच्या खेरीज इतर गोष्टी कामास येत नाहींत. येथें उपाय करायला जावें तर तोच अपाय बनतो. ही गोष्ट शहणे जाणतात.
वेडें संसार सांडून गेलें । तरी तें कष्टकष्टोंचि मेलें ।
दोहिकडे अंतरलें । इहलोक परत्र ॥ २० ॥
२०) एखादा वेडा माणूस उगीच संसार सोडून जातो. मगतो विनाकारण कष्ट भोगीत मरुन जातो. धड प्रपंच नाहीं व धड परमार्थ नाहीं. अशी अवस्था होऊन दोन्हीकडे तो अंतरतो. 
रागें रागें निघोन गेला । तरी तो भांडभांडोंचि मेला ।
बहुत लोक कष्टी केला । आपणहि कष्टी ॥ २१ ॥
२१) कोणी एखादा रागारागानें घर सोडून निघून जातो आणि मग ज्याच्यात्याच्याशी भांडणतंटा करीत मरुन जातो. असा माणूस पुष्कळांना कष्ट देतो व आपणदेखील कष्ट भोगीत मरतो.   
निघोन गेला परी अज्ञान । त्याचें संगती लागले जन ।
गुरु शिष्य दोघे समान । अज्ञानरुपें ॥ २२ ॥
२२) एक माणूस घर सोडून निघून गेला पण स्वानुभव नसल्यानें अज्ञानीच राहिला. पण कांहीं लोक त्याच्या नादीं लागले. अशा ठिकाणी गुरु व शिष्य दोघेही अज्ञानाच्या एकाच पातळीवर असतात. 
आशाबद्धी अनाचारी । निघोनि गेला देशांतरीं ।
तरी तो अनाचारचि करी । जनामदज्यें ॥ २३ ॥
२३) वासनेनें बरबटलेला व वाईट वर्तनाचा एखादा माणूस आपला देश सोडून दुसर्‍या देशांत गेला तरी तेथील लोकांत त्याचें दुराचरण चालूच राहते.  
गृहीं पोटेविण कष्टती । कष्टी होऊन निघोन जाती ।
त्यास ठांई ठांई मारिती । चोरी भरतां ॥ २४ ॥
२४) घरीं धड पोटाला मिळत नाहीं म्हणून एक माणूस कष्टी होऊन घर सोडून गेला. पण चोरींत सापडला म्हणून किंवा चोरीचा आळ येऊन पुष्कळ ठिकाणीं त्याला लोकांचा मार खावा लागला.
संसार मिथ्या ऐसा कळला । ज्ञान समजोन निघोन गेला ।
तेणें जन पावन केला । आपणाऐसा ॥ २५ ॥
२५) याच्या उलट संसार मिथ्या आहे, यांत कांहीं अर्थ नाहीं, असें खरोखर ज्याला कळते तो आत्मज्ञानास पात्र होतो. असा पुरुष संसार सोडून निघून गेल्यावर तो स्वतः पावन होतोच पण लोकांनासुद्धा आपल्यासारखेंच पावन करतो. 
येके संगतीनें तरती । येके संगतीनें बुडती ।
याकारणें सत्संगती । बरी पाहावी ॥ २६ ॥
२६) माणूस जसा संगतीनें तरतो तसा तो संगतीनें बुडतो. म्हणून माणसानें सत्संगती धरावी.  
जेथें नाहीं विवेकपरीक्षा । तेथें कैंची असेल दीक्षा ।
घरोघरीं मागतां भिक्षा । कोठेंहि मिळेना ॥ २७ ॥
२७) जो विवेकाच्या कसोटीला उतरत नाहीं, विवेकानें घेतलेल्या  परीक्षेला उतरत नाहीं त्याच्यापाशीं अध्यात्माचे मार्गदर्शन करण्याचें सामर्थ्य नाहींअसें समजावें घरोघरी भिक्षा मागितली ती मिळत नाहीं. त्याचप्रमाणें ज्याच्या त्याच्यापाशीं परमार्थ मिळत नाहीं.  
जो दुसर्‍याचें अंतर जाणे । देश काळ प्रसंग जाणे ।
तया पुरुषा काय उणें । भूमंडळीं ॥ २८ ॥
२८) जो दुसर्‍याचे अंतःकरण ओळखतो, देश, काळ, प्रसंग जाणतो अशा चतुर पुरुषाला जगांत कोठेंहि कांहीहि कमी पडत नाहीं.  
नीच प्राणी गुरुत्व पावला । तेथें आचारचि बुडाला ।
वेदशास्त्रब्राह्मणाला । कोण पुसे ॥ २९ ॥
२९) हलक्या दर्जाच्या माणसाकडे गुरुपण गेला कीं मग आचाराचा लोप होतो. आचारलोप झाला कीं वेद, शास्त्र व ब्राह्मण यांचे पूज्यपण नाहींसे होतें.  
ब्रह्मज्ञानाचा विचारु । त्याचा ब्राह्मणासीच अधिकारु ।
वर्णानां ब्राह्मणो गुरुः । ऐसें वचन ॥ ३० ॥
३०) ब्राह्मणपणालाच फक्त ब्रह्मज्ञानाचा अधिकार आहे. ब्राह्मण सर्व वर्णाांच गुरु आहे. असें वचन आहे. 
ब्राह्मण बुद्धीपासून चेवले । आचारापासून भ्रष्टले ।
गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥ ३१ ॥
३१) पण सध्या ब्राह्मणांची बुद्धि चांगल्यापासून ढळली आहे. ते आचारभ्रष्ट झालें आहेत. आपलें उच्च स्थान सोडून शिष्यांचे शिष्य झालें आहेत.    
कित्येक दावलमलकास जाती । कित्येक पीरास भजती ।
कित्येक तुरुक होती । आपले इच्छेनें ॥ ३२ ॥
३२) पुष्कळ ब्राह्मण दावलमलक नावाच्या प्रसिद्ध पीरास जातात. कांहीं ब्राह्मण इतर पीरांना भजतात. कांहीं ब्राह्मण आपणहून मुसलमान होतात.  
ऐसा कलयुगींचा आचार । कोठें राहिला विचार ।
पुढें पुढें वर्णसंकर । होणार आहे ॥ ३३ ॥
३३) या कलियुगामध्यें असा आचारलोप झाला आहे. विचारही कोठें उरला नाहीं. येणार्‍या काळांत वर्णसंकर होणार आहे.  
गुरुत्व आलें नीचयाती । कांहीयेक वाढती महंती ।
शूद्र आचार बुडविती । ब्राह्मणाचा ॥ ३४ ॥
३४) अध्यात्मिक गुरुत्व खालच्या दर्जाच्या लोकांत गेल्यानें ते लोक आपली महंती कमीजास्त प्रमाणांत वाढवतात. शूद्र लोक ब्राह्मणांचा आचार बुडवतात. 
हें ब्राह्मणास कळेना । त्याची वृत्तिच वळेना ।
मिथ्या अभिमान गळेना । मूर्खपणाचा ॥ ३५ ॥
३५) आपला अधःपात होत आहे हें कांहीं ब्राह्मणांच्या ध्यानांत येत नाही. त्यांची वृत्ती कांहीं सुधारत नाहीं. मूर्खपणा ते अजिबात सोडत नाहींत.  
राज्य नेलें म्लेंचिं क्षेत्रीं । गुरुत्व नेलें कुपात्रीं ।
आपण अरत्रीं ना परत्रीं । कांहींच नाहीं ॥ ३६ ॥
३६) मुसलमान व क्षत्रियांनी त्यांचे राज्य जिंकून घेतलें. त्यांचे गुरुत्व भलत्याच लोकांच्या हातीं गेलें. धड इहलोक नाहीं कीं धड परलोक नाहीं अशी त्यांची अवस्था झाली. 
ब्राह्मणास ग्रामणीनें बुडविलें । विष्णूनें श्रीवत्स मिरविलें ।
त्याच विष्णूनें श्रापिलें । फरशरामें ॥ ३७ ॥
३७) गावगुंडी केल्यानें ब्राह्मणांना अशी हीन दशा प्राप्त झाली. विष्णूनें श्रीवत्स ही खूण मिरविली अशी ब्राह्मणांची थोरवी होती. त्याच विष्णूनें परशुरामाचा अवतार घेऊन त्यांना शाप दिला.  
आम्हीहि तेचि ब्राह्मण । दुःखें बोलिलें हें वचन ।
वडिल गेले ग्रामणी करुन । आम्हां भोंवते ॥ ३८ ॥
३८) आम्ही देखील ब्राह्मणच आहोत त्यांच्या दुःस्थितीबद्दल दुःखानें बोललो. वडील माणसें गांवगुंडी करुन गेली, ते आम्हांला सध्या भोवते आहे.  
अतांचे ब्राह्मणीं काये केलें । अन्न मिळेना ऐसें जालें ।
तुम्हा बहुतांचे प्रचितीस आलें । किंवा नाहीं ॥ ३९ ॥
३९) बरें पण सध्याचें ब्राह्मणसुद्धा कोठें नीट वागत आहेत ? खायला अन्न मिळत नाहीं अशी त्यांची दशा आहे. मला वाटते हे तुमच्यापैकी पुष्कळांच्या अनुभवास आलें आहे. 
बरें वडिलांस काये म्हणावें । ब्राह्मणाचें अदृष्ट जाणावें । 
प्रसंगें बोलिलें स्वभावें । क्ष्मा केलें पाहिजे ॥ ४० ॥
४०) जाऊं द्या वडील माणसांना दोष देऊं नये. त्याचा काय उपयोग ? आपलाच पूर्व ठेवा वाईट आहे. असें म्हणावें. सहज विषय निघाला म्हणून हें बोललो त्याबद्दल क्षमा करावी.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे युगधर्मनिरुपणनाम समास सातवा ॥ 
Samas Satava YugDharma Nirupan 
समास सातवा युगधर्म निरुपण



Custom Search

No comments:

Post a Comment