Tuesday, April 3, 2018

Samas Aathava Akhand Dhyan Nirupan समास आठवा अखंड ध्यान निरुपण


Dashak Choudava Samas Aathava Akhand Dhyan Nirupan 
Samas Aathava Akhand Dhyan Nirupan, It is in Marathi. Swami Samarth Ramdas is telling us about Dhyan. How Dhyan is to be done. Where you have to concentrate your mind in the process of Dhyan, is described here.
समास आठवा अखंड ध्यान निरुपण 
श्रीराम ॥
बरें ऐसा प्रसंग आला । जाला तो होऊन गेला ।
आतां तरी ब्राह्मणीं आपणाला । शाहाणें करावें ॥ १ ॥
१) बरें, अशी अवस्था झाली खरी पण झालें तें होऊन गेलें. आतां ब्राह्मणांनी स्वतःला शहाणें करावें.
देव पुजावा विमळहस्तीं । तेणें भाग्य पाविजे समस्तीं ।
मूर्ख अभक्त वेस्तीं । दरिद्र भोगिजे ॥ २ ॥
२) पवित्र हातांनीं देवाची पूजा करावी. तसें केलें तर सगळ्यांना भाग्याची प्राप्ती होईल. जे अभक्त असतात ते अव्यवस्थित मूर्ख करंटेपण, दारिद्र्य भोगतात. 
आधीं देवास वोळखावें । मग अनन्यभावें भजावें ।
अखंड ध्यानचि धरावें । सर्वोत्तमाचें ॥ ३ ॥
३) प्रथम देवाला ओळखावें. मग अनन्यपणें त्याची भक्ति करावी. त्या सर्वोत्तमाचें अगदी अखंड ध्यान धरावें.  
सर्वांमधें जो उत्तम । तया नाव सर्वोत्तम ।
आत्मानात्मविवेकवर्म । ठाईं पाडावें ॥ ४ ॥
४) सर्वांमध्यें जो उत्तम असतो, त्याला सर्वोत्तम असें म्हणतात. तोच आत्मा असून बाकीचें सारें तें अनात्म होय. आत्मानात्मविवेकाचें हें रहस्य नीटपणें आकलन करुन घ्यावें. 
जाणजाणों देह रक्षी । आत्मा द्रष्टा अंतरसाक्षी ।
पदार्थमात्रास परीक्षी । जाणपणें ॥ ५ ॥
५) आत्मा द्रष्टा आहे अंतरसाक्षी आहे, जाणीरुपानें तो देहाचे रक्षण करतो. जाणिवेच्या साधनानें सर्व पदार्थांची परीक्षा तो करतो. 
तो सकळ देहामधें वर्ततो । इंद्रियेंग्राम चेष्टवितो ।
प्रचितीनें प्रत्यये येतो । प्राणीमात्रीं ॥ ६ ॥
६) तो सर्व शरीरांत राहतो. इंद्रियांच्याकडून आपापलीं कामें करवून घेतो. सर्वांना अनुभवानें ही गोष्ट समजते. 
प्राणीमात्रीं जगदांतरें । म्हणोनि राखावी अंतरें ।
दाता भोक्ता परस्परें । सकळ कांहीं ॥ ७ ॥
७) एका प्राण्याचें अंतःकरण म्हणजे सर्व जगाचें अंतःकरण होय. म्हणून सर्वांचें अंतःकरण सांभाळावें तें दुखवूं नये. मग दाता व भोक्ता; देणारा व घेणारा यांचा परस्पर प्रेमसंबंध जुळतो. मग सर्व कांहीं जुळून येते.     
देव वर्ततो जगदांतरीं । तोचि आपुले अंतरीं ।
त्रैलोकींचे प्राणीमात्रीं । बरें पाहा ॥ ८ ॥
८) जो जाणीवरुप देव सर्व जगांत वावरतो तोच आपल्या अंतःकरणांत वास करतो. त्रैलोक्यांतील सर्व प्राण्यांत तोच जाणीवरुप देव राहतो हें नीट पाहावें.
मुळीं पाहाणर तो येकला । सकळां ठाईं विभागला ।
देहप्रकृतीनें जाला । भिन्न भिन्न ॥ ९ ॥
९) मुळांत पाहाणारा किंवा द्रष्टा असा तो एकच आहे. तो सर्वांत वाटलेला आहे. प्रत्येक प्राण्याच्या देहस्वभावामुळें तो वेगळा वाटतो.  
भिन्न भासे देहाकारें । प्रस्तुत येकचि अंतरें ।
बोलणें चालणें निर्धारें । त्यासीच पडे ॥ १० ॥
१०) प्रत्येक प्राण्याच्या देहाच्या आकारानें तो वेगळा भासला, तरी देहाच्या पलीकडे अंतःकरणाच्या दृष्टीनें तो एकच आहे. माणसाचे बोलणें, चालणें वगैरे खात्रीनें तोच करतो. 
आपुले पारिखे सकळ लोक । पक्षी स्वापद पश्र्वादिक ।
किडा मुंगी देहधारक । सकळ प्राणी ॥ ११ ॥
११) आपली असणारी व आपलीं नसणारी सर्व माणसें, पक्षी, श्वापदें, पशु, किडे, मुंग्या वगैरे सगळे देहधारी प्राणी,  
खेचर भूचर वनचर । नाना प्रकारें जळचर ।
चत्वार खाणी विस्तार । किती म्हणोन सांगावा ॥ १२ ॥
१२) खेचर म्हणजे आकाशांत फिरणारे भूचर,वनचर, नाना प्रकारचे जलचर, असें प्राण्यांचे चार प्रकार आहेत. त्यांचा विस्तार सगळा सांगणें कठीण आहे.   
समस्त जाणीवेनें वर्तती । रोकडी पाहावी प्रचिती ।
त्याची आपुली संगती । अखंड आहे ॥ १३ ॥
१३) परंतु हे सगळे प्राणी जाणिवेनें वागतात. असा आपला साक्षात् अनुभव आहे. त्या जाणिवेची व आपली संगती अखंड असतें. 
जगदांतरें वोळला धणी । किती येकवटील प्राणी ।
परी ते वोळायाची करणी । आपणापासीं ॥ १४ ॥
१४) जाणीवरुप असा जगाचा अंतरात्मा हा खरा जगाचा स्वामी आहे. तो प्रसन्न करुन घ्यावा. म्हणजे मग पुष्कळ लोक आपल्या भोवतीं गोळा होतील. परंतु त्या स्वामीला प्रसन्न करुन घेण्याची कला आपल्या वागण्यांत आहे.  
हें आपणाकडेच येतें । राजी राखिजे समस्तें ।
देहासि बरें करावें तें । आत्मयास पावे ॥ १५ ॥
१५) जगाचा स्वामी आपल्याला अनुकुल करुन घ्यावा. त्यासाठीं सर्वांना खूष ठेवावे. माणसाच्या देहाला बरें केलें म्हणजे तें त्याच्या आत्म्यापर्यंत पोहोचते. 
दुर्जन प्राणी त्यांतील देव । त्याचा लाताड स्वभाव ।
रागास आला जरी राव । तरी तंडों नये कीं ॥ १६ ॥
१६) दुर्जन माणसाच्या अंतर्यामीही देव असतो. पण त्या माणसाचा स्वभाव लाथा झाडण्याचा असतो.समजा राजा रागावला तर आपण त्याच्याशी भांडत नाहीं. त्याचप्रमाणें दुर्जनाशी बरोबरी करुं नये.  
प्रसंगीं सांडीच करणें । पुढें विवेकें विवरणें ।
विवेक सज्जनचि होणें । सकळ लोकीं ॥ १७ ॥
१७) प्रसंगानुसार त्या माणसाला किंवा त्या स्थानाला सोडून जाणें योग्य असतें. तसें शक्य असेल तर करावें व नंतर आपलें मन शांत करावें. अशारीतीनें सगळ्या लोकांमध्यें सज्जनपणा प्राप्तकरुन घ्यावा.   
आत्मत्वीं दिसतो भेद । हा अचघाचि देहसमंध ।
येका जीवनें नाना स्वाद । औषधीभेदें ॥ १८ ॥
१८) आत्मा खरा एकच एक असतांना त्याच्या ठिकाणीं जो भेद दिसतो तो देहांमुळें दिसतो. पाणी एकच आहे, परंतु वनस्पतींच्या भेदानें त्यांत निरनिराळे स्वाद उत्पन्न होतात. आत्म्याचें तसेंच आहे.   
गरळ आणि अमृत जालें । परी आपपण नाहीं गेलें ।
साक्षत्वें आत्मयास पाहिलें । पाहिजे तैसें ॥ १९ ॥
१९) जहाल वीष व अमृत यांचें स्वाद आणि कार्य अगदी भिन्न असतात. परंतु त्यांच्यामधील पाणीपणा मात्र जसाच्या तसाच असतो. त्याचप्रमाणें सर्व प्राण्यांत स्वरुपानें तसाच राहणार्‍या आत्म्याला साक्षीपणा हवाच हवा.    
अंतरनिष्ठ जो पुरुष । तो अंतरनिष्ठेनें विशेष ।
जगामधें जो जगदीश । तो तयास वोळखे ॥ २० ॥
२०) जो अंतरनिष्ठ पुरुष असतो, त्याची आत्मनिष्ठा विशेष प्रकारची असते. जगामध्यें व्यापून असणार्‍या जगदीशाला तो ओळखतो.
नयनेंचि पाहावा नयेन । मनें शोधावें मन ।
तैसाचि हा भगवान् । सकळां घटीं ॥ २१ ॥
२१) आपण आपल्या डोळ्यानींच दुसर्‍याचा डोळा बघतो. मनानेंच मनाचा शोध घेतो. त्याचप्रमाणें स्वतःच्याच अंतःकरणांत असणार्‍या अंतरात्म्याच्या साधनानें सर्व प्राण्यांमध्यें भरलेला भगवंत पहावा. 
तेणेंविण कार्यभाग आडे । सकळ कांहीं तेणेंचि घडे ।
प्राणी विवेकें पवाडे । तेणेंचि योगें ॥ २२ ॥
२२) त्या अंतरात्म्यावाचून कार्यभाग अडून राहतो. सर्व कांहीं त्याच्या सत्तेने घडते. त्याच्यामुळेंच माणूस मोठा विवेकसंपन्न बनतो. 
जागृतीस व्यापार घडतो । समंध तयासीच पडतो ।
स्वप्नामधें घडे जो तो । येणेंचि न्यायें ॥ २३ ॥  
२३) जागेपणीं आपण जी हालचाल करतो तिचा त्या अंतरात्म्याशीच संबंध असतो. स्वप्नामध्यें जें जें घडते त्याचा संबंधदेखील त्याच्याशीच असतो.       
अखंड ध्यानाचें लक्षण । अखंड देवाचें स्मरण ।
याचें कळतां विवरण । सहजचि घडे ॥ २४ ॥
२४) त्याचे अखंड ध्यान राखावें. पण अखंड ध्यानाचे लक्षण म्हणजे देवाचे अखंड स्मरण होय. ध्यान आणि स्मरण यांचा परस्पर संबंध लक्षांत आला कीं अखंड स्मरण सहज घडते.  
सहज सांडून सायास । हाचि कोणीयेक दोष ।
आत्मा सांडून अनात्म्यास । ध्यानीं धरिती ॥ २५ ॥
२५) हें सहज होणारें ध्यान सोडून निष्कारण श्रम करणें हा एक प्रकारचा दोष आहे. कारण लोक अंतरात्मा सोडून अनात्म्याचे ध्यान करण्याची धडपड करतात. 
परी तें धरितांहि धरेना । ध्यानीं येती वेक्ति नाना । 
उगेंचि कष्टती मना । कासाविस करुनी ॥ २६ ॥
२६) मग प्रयत्न केला तरी ते ध्यान टिकत नाहीं. ध्यानामध्यें नाना व्यक्ति येतात. त्यामुळें मन कासावीस होतें. व जीवाला उगीचच कष्ट होतात. 
मूर्तिध्यान करितां सायासें । तेथें येकाचें येकचि दिसे ।
भासों नये तेंचि भासे। विलक्षण ॥ २७ ॥
२७) मोठ्या सायासानें मूर्तीचे ध्यान करायला गेलें तर तेथें एकाचे एक दिसते. जें खरोखर भासायला नको, मनासमोर यायला नको, तेंच विलक्षण भासतें.
ध्यान देवाचे करावें । किंवा देवाल्याचे करावें ।
हेंचि बरें विवरावें । आपले ठाईं ॥ २८ ॥
२८) यासाठीं आपण जें ध्यान करायचे तेम देवाचें करायचे कां देवालयाचे करायचें, याचा आपण आपल्याशी आधीं नीट विचार करावा.  
देह देऊळ आत्मा देव ।  । कोठें धरुं पाहाता भाव ।
देव वोळखोन जीव । तेथेंचि लावावा ॥ २९ ॥
२९) आत्मा देव असून देह त्याचें मंदिर आहे. त्यापैकीं आपली श्रद्धा कोठें असावी, हें ठरवावें. देव ओळखून आपला जीव त्याच्यापाशींच गुंतवावा.  
अंतरनिष्ठ ध्यान ऐसें । दंडकध्यान अनारिसें ।
प्रत्ययेविण सकळ पिसें । अनुमानध्यान ॥ ३० ॥
३०) आंतरनिष्ठेवर आधारलेले ध्यान हें असें असतें. दंडक ध्यान म्हणजे परंपरेनें चालत आलेंले जे ध्यान जें असतें तें याहून निराळे असते. त्या ध्यानांत अंतरात्म्याचा साक्षात अनुभव येत नाहीं. अशीं अनुमानावर आधारलेली ध्यानें म्हणजे सारा वेडेपणा होय.
अनुमानें अनुमान वाढे । ध्यान धरितां सवेंचि मोडे ।
उगेचि कष्टति बापुडे । स्थूळध्यानें ॥ ३१ ॥
३१) कल्पनेनें कल्पना वाढत जातें. आणि त्याबरोबरच जें ध्यान धरलेलें असतें तें मोडतें. स्थूलाचें ध्यान करण्यांत समान्य लोक बिचारे विनाकारण कष्ट करतात.   
देवास देहधारी कल्पिती । तेथें नाना विकल्प उठती ।
भोगणें त्यागणें विपत्ति । देहयोगें ॥ ३२ ॥
३२) अशा ध्यानामध्ये देवाला देहधारी मानावें लागतेम. मग त्याठिकाणीं नाना विकल्प निर्माण होतात. देहाशी संबंध आला की भोग भोगणें, तो त्यागणें, संपत्ति व विपत्ति या सर्व गोष्टी येतात. 
ऐसें मनीं आठवतें । विचारितां भलतेंचि होतें ।
दिसों नये तें दिसतें । नाना स्वप्नीं ॥ ३३ ॥
३३) या गोष्टीं मनांत येऊं लागल्या म्हणजे त्यावर विचार चालतो. विचार चालूं झाला म्हणजे कांहींतरी होते.स्वप्नांत असल्याप्रमाणें जें दिसूं नये तें दिसूं लागतें. ध्यान बाजूलाच राहाते. 
दिसतें तें सांगतां न ये । बळें भावार्थ धरितां नये ।
साधक कासाविस होये । अंतर्यामीं ॥ ३४ ॥
३४) ध्यान करतांना जें दिसतें तें सांगतां येत नाहीं. बरें जें दिसतें त्यावर बळजबरीनें श्रद्धा ठेवता येत नाहीं. आणि  मग साधक मनांत कासावीस होतो. 
सांगोपांग घडे ध्यान । त्यास साक्ष आपुलें मन । 
मनामध्यें विकल्पदर्शन । होऊंच नये ॥ ३५ ॥
३५) सांगोपांग म्हणजे सर्व दृष्टीनें बरोबर ध्यान झालें कीं नाहीं, याची साक्ष आपलें स्वतःचे मनच देतें. ध्यान धरतांना मनांत एकही विकल्प न येतां ध्यान होणें हें सांगोपांग ध्यानाचें लक्षण आहे.  
फुटक मन येकवटिलें । तेणें तुटक ध्यान केलें ।
तेथें कोण सार्थक जालें । पाहाना कां ॥ ३६ ॥  
३६) सगळीकडे गुंतलेलें आपलें मन एखाद्यानें गोळा करुन ध्यान करण्याचा प्रयत्न केला तर मोडकें ध्यान लागेल. त्याचे सार्थक होणार नाहीं याचा तुम्हीच विचार करा.
अखंड ध्यानें न घडे हित । तरी तो जाणावा पतित ।
हाचि अर्थ सावचित । बरा पाहावा ॥ ३७ ॥
३७) अखंड ध्यान करुन ज्याचे हित होत नाहीं तो पतित म्हणावयास हरकत नाहीं. पण असें होणें शक्य नाहीं. ही गोष्ट नीट विचारपूर्वक शोधून पहावी.  
ध्यान धरितें तें कोण । ध्यानीं आठवतें तें कोण ।
दोनीमधें अनन्य लक्षण । असिलें पाहिजे ॥ ३८ ॥
३८) ध्यान करतांना जो ध्यान धरतो तो आणि ज्याचे ध्यान धरलें जातें तो अशी दोन अंगें असतात. त्या दोन्हेमध्यें समरसता असणें ,त्यामधिल वेगळेपणा लोपणे व दोघें अनन्य होणें. हें ध्यानाचें प्रधान लक्षण आहे.     
अनन्य सहजचि आहे । साधक शोधून न पाहे ।
ज्ञानी तो विवरोन राहे । समाधानें ॥ ३९ ॥
३९) वास्तविक ध्यान करणारा आणि अंतरात्मा दोघे मूळांत अनन्य आहेत. ही गोष्ट साधक शोधून बघत नाहीं. ज्ञानी पुरुष त्याचा शोध करुन अनन्यता अनुभवतो. आणि समाधानानें राहतो. 
ऐसीं हेप्रत्ययाची कामें । प्रत्ययेंविण बाधिजे भ्रमें ।
लोकदंडकसंभ्रमें । चालती प्राणी ॥ ४० ॥
४०) स्वानुभव घेण्याची पद्धती ही अशी आहे. आत्मप्रत्यय नसेल तर मात्र भ्रमाची बाधा होते. मग माणूस परंपरागत भ्रामक पद्धतीनें चालतो.    
दंडकध्यानाचें लक्षण । धरुन बैसलें अवलक्षण ।
प्रमाण आणि अप्रमाण । बाजारी नेणती ॥ ४१ ॥
४१) परंपरागत पद्धतीनें ध्यान धरणें हें ध्यानाचें लक्षण नसून तें ध्यानाचें अवलक्षण आहे. भ्रमांत राहणारे लोक तेंच घट्ट धरुन बसतात. अगदी सामान्य लोकांना खरें ध्यान व खोटें ध्यान यांतील फरक कळत नाहीं. 
मिथ्या समाचार उठविती । वाउग्याच बोंबा घालिती ।
मनास आणितां अंतीं । आवघेंचि मिथ्या ॥ ४२ ॥
४२) असें लोक खोट्या बातम्या, किंवा कल्पना किंवा मतें यांचा प्रसार करतात. निष्कारण आरडाओरड करतात. पण त्याचा मनानें शोध घेतला तर तें सगळें खोटें आहे असें लक्षांत येते. 
कोणीयेक ध्यानस्त बैसला । कोणीयेक सिकवी त्याला ।
मुकुट काढूनि माळ घाला । म्हणिजे बरें ॥ ४३ ॥
४३) एक माणूस ध्यानास बसला व तो मुकुटधारी मूर्तीचे ध्यान करुं लागला. मूर्तीच्या गळ्यांतील हार आखूड झाला. तेव्हां दुसर्‍यानें त्यास सुचविलें कीं अरें ! त्यांत काय मुकुट काढून गळ्यांत हार घाल म्हणजे झालें अशा प्रकारें ध्यान करणारा व त्याला युक्ति सुचविणारा दोघेही भ्रमांत वावरतात.  
मनाचेथें काये दुष्काळ । जे आखुड कल्पिली माळ ।
सांगते ऐकते कोवळ । मूर्ख जाणावे ॥ ४४ ॥
४४) जेथें मनानें नुसती कल्पनाच करायची आहे तेथें कल्पना करायला कांहीं लागत नाहीं. तरी ध्यान करणारा उगीचच आखूड हाराची खोटी कल्पना करतो. अशा ठिकाणीं सांगणारा व त्याचे ऐकणारा दोघेही मूर्ख समजावे. 
प्रत्यक्ष कष्ट करावे न लगती । दोरे फुलें गुंफावी न लगती ।
कल्पनेची माळ थिटी करिती । काये निमित्य ॥ ४५ ॥
४५) मनामध्यें ध्यान करतांना प्रत्यक्ष खटपट कांहींच करावी लागत नाहीं. प्रत्यक्ष दोरी घेऊन फुलें माळावी लागत नाहीत. असें असतांना कल्पनेनें रचलेली माळ आखूड करण्याचें कारणच नाहीं. 
बुधीविण प्राणी सकळ । ते ते अवघेचि बाष्कळ ।
तया मूर्खासीं खळखळ । कोणें करावी ॥ ४६ ॥
४६) तात्पर्य अशी बुद्धिहीन माणसें सगळीं मूर्ख असतात. त्या मूर्खांना समजावण्यांत कांही अर्थ नाहीं. 
जेणें जैसा परमार्थ केला । तैसाच पृथ्वीवरी दंडक चालिला ।
साता पाचांचा बळावला । साभिमान ॥ ४७ ॥
४७) ज्या पुरुषानें जसा परमार्थ केला असेल तशी त्याची परंपरा जगांत चालते. त्याला पांच सात अनुयायी मिळतात आणि ते त्याचा अभिमान धरतात. 
प्रत्ययेंविण साभिमान । रोगी मारिले झांकून ।
तेथें अवघाचि अनुमान । ज्ञान कैंचें ॥ ४८ ॥
४८) आपल्या साधनाचा प्रत्यक्ष अनुभव येत नसून देखील त्याचा अभिमान धरणें योग्य नाहीं. औषधाचा गुण येत नसतांना रोग्यास झांकून ठेवून मारण्याचा प्रकार आहे. अशा ठिकाणीं सगळा कल्पनेचा गोंधळ असतो. ज्ञान असत नाहीं.
सर्व साभिमान सांडावा । प्रत्ययें विवेक मांडावा ।
माया पूर्वपक्ष खंडावा । विवेकबळें ॥ ४९ ॥
४९) म्हणून खर्‍या साधकानें सर्व संप्रदायांचा अभिमान सोडावा. अनुभव घेऊन मग विवेक मांडावा. आणि त्या विवेकाच्या बळावर मायेचा पूर्वपक्ष खंडून टाकावा, मायेचा निरास करुन परब्रह्माला स्पर्श करावा.  
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे अखंडध्याननिरुपणनाम समास आठवा ॥
Samas Aathava Akhand Dhyan Nirupan
समास आठवा अखंड ध्यान निरुपण 



Custom Search

No comments:

Post a Comment